माठाय तस्मै नमः |

होळी जळाली, थंडी पळाली की उन्हाचा प्रखर ताप जाणवू लागतो. हिवाळ्यात मऊसूत वाटणारे ऊन अंगाची कल्हई करू लागते. आणि पावले मग आपोआपच कुंभारवाड्याकडे वळतात. तऱ्हेतऱ्हेच्या आकाराचे, घाटाचे, मातीचे माठ तिथे तुमच्या प्रतीक्षेतच असतात. अगदी छोट्याशा मडक्या, सुगडांपासून ते गरगरीत डेऱ्यांपर्यंत आणि नळाच्या तोट्या असलेल्या सुबक घड्यांपासून ते उभट रांजणांपर्यंत वैविध्याने नटलेली ही मृत्तिकापात्रे तुमची तहान भागविण्यासाठी सज्ज असतात. तुम्हाला हव्या त्या माठापाशी बसकण ठोकायची, माठ उभा - आडवा - तिरपा करून सर्व कोनांतून चौफेर पडताळून झाला की त्यावर बोटे वाजवून येणारा नाद तपासायचा, पुन्हा त्याला उलटा-पालटा करून न्याहाळायचा.... अशा सूक्ष्म तपासणीनंतर तोंडाने 'हम्म... ' असे काहीसे आवाज काढत आपल्या घासाघिशीच्या ठेवणीतल्या आवाजात विक्रेत्याला साद घालायची....

पुढची पाच-दहा मिनिटे सुखेनैव घासाघीस - भाव करण्यात घालवल्यावर मनासारखी किंमत मिळाल्याचा आनंद चेहऱ्यावर तसूभरही दिसू न देता आक्रसलेल्या कपाळाने पैसे देऊन माठ ताब्यात घ्यायचा, वर 'गळका निघाला ना तर आहे तस्सा परत करीन, ' अशी सज्जड धमकीवजा सूचना करून पाय घराकडे वळवायचे. [एवढे ओझे घेऊन कोण शहाणा/णी इकडे-तिकडे उंडारेल? ] मग रस्त्याने 'घट डोईवर, घट कमरेवर' असले कसलेसे गाणे गुणगुणत, माठाला मिरवत ठुमकत ठुमकत विजयी मुद्रेने जायचे.....

... पण कायमच अशी परिस्थिती नसते बरं का! ह्या माठाने मला काय काय दिवस दाखवले आहेत, काय सांगू!

एके वर्षी कुंभारवाड्यात जायला जमले नाही म्हणून घराजवळ आलेल्या हातगाडीवरून माठ आणला. दोन दिवस त्याला चांगला पाझरवला. तिसऱ्या दिवशी मोठ्या प्रेमाने त्याच्यात पाणी भरले. वाळ्याची जुडी आत सोडली. वरून जुन्या बनियनचे ओले केलेले फडके लपेटले. आज दुपारी भर उन्हात आपल्याला गारेग्गार वाळ्याचे पाणी प्यायला मिळणार ह्याची सुखस्वप्ने रंगविते तोच...... स्वयंपाकघरात घोर हाहाःकार माजला! पाण्याने भरून ठेवलेला माठ कोणतीही पूर्वसूचना न देता अलगद मधोमध दुभंगला होता. त्याच्या भग्नावशेषांत वाळ्याची जुडी पोरकेपणाने तरंगत होती. ओटा, फरशी डोळे गाळीत होते. माझ्याही घशात दुःखातिरेकाने हुंदका दाटून आला. त्या दुर्दैवी माठाचे और्ध्वदेहिक उरकल्यावर दोन दिवस तसेच सुतकात गेले. पण तिसऱ्या दिवशी प्रखर उन्हाचे चटके स्वस्थ बसू देईनात.

एव्हाना आमची शोकगाथा शेजाऱ्यापाजाऱ्यांना कळली होती. [आमचीच टकळी! दुसरे काय?!! ] दुःखी चेहऱ्यावरचा आपला कुत्सित आनंद कसाबसा लपवत सख्या शेजारणी सांत्वनपर चौकशी करत, माठ कसा - कोठून -किती रुपयांपर्यंत खरेदी करावा, ह्याबद्दल अनाहूत सल्ले देत कलकलाट करून गेल्या.

मनाचा हिय्या करून मी शिफारस केल्या गेलेल्या जवळच्या विक्रेत्याकडून दुसरा माठ खरेदी करून घेऊन आले. आधीचा उत्साह, आनंद यांची जागा नव्या माठाच्या भवितव्याच्या चिंतेने घेतली होती. ''ह्या खेपेस माठ नीट नाही मिळाला तर सगळ्या मेल्या शेजारणी मलाच फिदीफिदी हसतील! म्हणतील, ''काय बावळट बाई आहे! हिला साधा माठही खरेदी करता येत नाही!! '' इति मी.

ह्याही खेपेस मोठ्या वात्सल्याने पहिले दोन दिवस मी माठाला न्हाऊ-माखू घातले, उन्हात शेकले, पाण्यात घालून - पाणी ठेवून 'बुड बुड गंगे' केले. मग सप्तनद्यांचे, गोमातेचे व कुळदैवताचे मनोभावे स्मरण करून त्या माठाची ओट्यावर प्रतिष्ठापना केली. धडधडत्या अंतःकरणाने त्यामध्ये पाणी ओतले, झाकण ठेवले व निकालाची वाट पाहत बसून राहिले.

दुपारी दबक्या पावलांनी स्वयंपाकघरात डोकावले -- माठ भरपूर पाझरत होता, पण अद्याप अभंग होता. माझा आनंद गगनात मावेना. ताबडतोब ही बातमी जिने माठवाल्याची शिफारस केली त्या शेजारणीला तिच्या वामकुक्षीचे पुरेपूर खोबरे कसे होईल ह्याची काळजी घेत ऐकवण्यात आली. आप्तसुहृदांना ''आमच्याकडच्या माठाचं थंडगार पाणी प्यायला यायचं हं! " असे साग्रसंगीत निमंत्रण देऊन झाले. मोठ्या खुशीत ''आज गोकुळात रंग खेळतो हरी, राधिके जरा जपून जा तुझ्या घरी'' च्या ओळी गुणगुणतच मी त्या गारगार माठातले गारगार पाणी प्यायला स्वयंपाकघरात प्रविष्ट झाले. माठाकडे एक प्रेमळ कटाक्ष टाकत त्यातले पाणी घेण्यासाठी झाकणी बाजूला केली, हातातले ओगराळे आतल्या पाण्यात बुडवल्यावर त्याचा जो 'डुच्चदिशी' आवाज झाला तो ह्या कर्णरंध्रांत साठवून घेतला आणि पाण्याने आटोकाट भरलेले ओगराळे बाहेर काढणार तोच..... ह्या माझ्या चक्षूंसमोर तो अगस्तीमुनींचा तात - माझा माठ - भंगोनी गेला.... माझ्या हातात फक्त ओगराळेच उरले!!

घरात पुढचे काही दिवस सामसूमच होती. प्रसंगाचे गांभीर्य ओळखून कोणीही आपापली रसवंती पाजळली नाही. शेजारणीदेखील दूर दूर फटकूनच राहू लागल्या. न जाणो माझी नजर त्यांच्या घरांतील माठांवर पडली तर!

एक दिवस ओळखीचे एक मामा आकाराने जरा लहान, पण बरा दिसणारा माठ अंगापोटावर वागवत घरी घेऊन आले. त्यांच्याच शुभहस्ते त्याला स्वयंपाकघरात बसविले. ते म्हणे आपल्या स्वतःच्या घरी त्या माठाची दोन दिवस 'ट्रायल' घेऊन आले होते. माठात पाणी भरून, त्याला ओल्या फडक्यात थापटून थोपटून, माझ्या हातचा चहा पिऊन, ''आता काळजी नको, '' असे बजावत मामांनी निरोप घेतला. मी मनातल्या शंका - कुशंकांना मोठ्या मुश्किलीने दाबत असताना कामवाली बाई पचकलीच, "आजा झाला, बिजा झाला, आता तिजा न्हाय झाला म्हंजे मिळवलं रे बाप्पा! "

त्या बाप्पाने बहुधा तिची व आमची लाज राखायचे ठरवले असावे. झिरपून झिरपून पाणी गाळत का होईना, तो माठ त्या उन्हाळ्यात आमचा त्राता ठरला. ह्यापुढे कोणतीही माठ-खरेदी कुंभारवाड्यात जाऊनच करायची हे मी एव्हाना मनाशी पक्के केले होते.

आता मी जेव्हा कुंभारवाड्यात जाते तेव्हा तेथील विक्रेत्यांशी विशेष ममत्वाने बोलते. फारशी घासाघीस करत नाही. फार चिकित्सा करत बसत नाही. आणि हो, येताना त्या माठाला नेहमीसारखा मिरवत न आणता ओढणीखाली लपवून आणण्याची दक्षता मात्र जरूर घेते. हसणारे हसतात. हसेनात का! त्यांना काय माहीत, एक माठ सलामत, तो उन्हाळा पचास!

-- अरुंधती

Sing, Dance, Meditate, Celebrate!
http://iravatik.blogspot.com/

Submit to kanokani.com

आवडलं माठपुराण हाहा

हाहा

अरुंधती .....सादरीकरण मस्त जमलय !
मी माठ घेताना नक्की काळजी घेइन ...

मस्तय हाहा

उन्हाळे पचास! अगदी!! स्मित

आहाहा! माठातले वाळ्याच्या सुगंधाचे पाणी! मस्त जमलाय लेख!

छानच हाहा

मस्त!

धन्यवाद! स्मित

हाहा

सही आहे मजा आली.....

मस्त लिहिलय!
साधाच विषय छान फुलवलाय!

मस्त स्मित आवडलं माठ पुराण

माठ सलामत, तो उन्हाळा पचास! फिदीफिदी फिदीफिदी

अहाहा! माठातलं थंडगार वाळ्याचं पाणी!
त्याला सर नाही कशाचीच...

सुरेख लिहिलंय!

झक्कासच लिहिलंय !!!

मस्त लिहिलय Smiley

मस्त स्मित
खरंच... माठातल्या थंडगार वाळ्याच्या पाण्याला कशाचीच सर नाही!
खुप वर्षात प्यायलाच मिळालं नाहीये अरेरे

अरुंधती, मस्त लिहिलं आहेस. धम्माल आली वाचताना.
माठ! हसून हसून गडबडा लोळण

जबरदस्त.
अगदी सु.पा.शे.प. स्मित

घट कमरेवर घट डोईवर हसून हसून गडबडा लोळण
गाणंही ऐकलं हे वाचता वाचता मग...
http://www.youtube.com/watch?videos=XvHQOl587cg&v=yxixZ8YohoU

छानच लिहीलंय हो स्मित
शुभेच्छा!!!

मस्तच हाहा

धन्यवाद मंडळी! आजच ह्या वर्षीची माठ-खरेदी करायला जाणार आहे. आपल्या शुभेच्छांची नितांत गरज आहे! डोळा मारा स्मित

हाहा स्मित

छानच लिहिले आहेत. पुढिल लिखाणासाठी शुभेच्छा

हाहा
पु. ले. शु.
मा. ख. शु. स्मित

मस्त लेख. इथे सुरया. अगदी झाकणाच्या, तोटी बसविलेल्या सुरया. ते घेउन येताना अगदी ये कैसी अजब दासतां हो गयी है मधल्या सुरैया सारखे अरबी वाट्ते. वाळा पाहिजेच व माठा शेजारी ते लांब दांडीचे एकच फुलपात्र पाणी येइल असे पाणी काढ्णे भांडे असायचे ते. अगदी उन्हाळा आला गं बाइ सुट्टी पड्ली गं बाइ वाट्ते.

छान लिहिलंय.

मामी स्मित
मी ही उद्याच जाऊन माठ आणतेच आता.

हाहा मस्तच लिहीलय.
तुला नविन माठासाठी शुभेच्छा!

अगदी भारी लिहिल आहे.. स्मित आवडल माठपुराण...
आजच ह्या वर्षीची माठ-खरेदी करायला जाणार आहे >>
माठ कुठुनही आणावा पण नळ किंवा तोटी वाला कधीही आणू नये.. हमखास त्या ठिकाणी गळतो.. फिदीफिदी
त्यापेक्षा पेला माठात बुचकळून पाणी पिण्याची मजा काही वेगळीच फिदीफिदी

अहाहा माठ आणि वाळा . वा !
माठ कुठुनही आणावा पण नळ किंवा तोटी वाला कधीही आणू नये.. हमखास त्या ठिकाणी गळतो>> अगदी अगदी केदार. आजच एम सील याच कारणासाठी आणायचय. फिदीफिदी