राहुलची शिंक

वेळ - रात्रीचे ९:३०
प्रेक्षक दूरदर्शन संच सुरू करून उत्सुकतेने IBN-Lokmat ही वाहिनी बघण्यास सुरूवात करतात. पडद्यावर वागळेंचा चेहरा उमटतो. त्यांचा चेहरा हास्याने फुललेला आहे. चष्म्याआडच्या त्यांच्या डोळ्यातला आनंद लपत नाही. बोलण्यासाठी ते ओठ किंचित किलकिले करतात तेव्हा, हिमनगाचा जसा फक्त एक षष्ठांश भागच पाण्यावर दिसतो व उरलेला पाच षष्ठांश भाग पाण्याखाली असतो, तसे त्यांच्या पांढर्‍या दातांच्या एक षष्ठांश भागाचे त्यांच्या काळ्या रूबाबदार दाढीतून दर्शन होते.

वागळे: नमस्कार. IBN-Lokmat च्या आजच्या भागात तुमचे स्वागत आहे. आजचा नवा दिवस म्हणजे नवा प्रश्न. राहुल गांधी परवा मुम्बई भेटीसाठी आले असताना त्यांना जोरदार शिंक आली व त्यामुळे शिवसेना पूर्णपणे आडवी झाली असे सर्वसाधारण मत आहे. आजचा आपला प्रश्न आहे की "राहुल गांधीच्या मुम्बई भेटीतल्या गगनभेदी शिंकेमुळे शिवसेना नेस्तनाबूत झाली आहे का?" या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आले आहेत शिवसेनेचे संजय राऊत, काँग्रेसचे हुसेन दलवाई, ख्यातनाम गायक हृदयनाथ मंगेशकर आणि ख्यातनाम समाजसेवक आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष नरेंद्र दाभोळकर. चर्चा सुरू करण्यापूर्वी आपण तो शिंकेचा प्रसंग पुन्हा एकदा पाहू या.

पडद्यावर राहुल गांधी दिसू लागतात. ते मुम्बईत सुरक्षा रक्षकांच्या गराड्यात उभे आहेत. आजूबाजूला अशोक चव्हाण, रमेश बागवे, कृपाशंकर वगैरे उन्हात उभे आहेत. अशोक चव्हाण राहुलला बसण्यासाठी खुर्ची पुढे करतात. राहुल खुर्चीवर बसतात. अशोक चव्हाण खाली वाकणार तेवढ्यात बागवे चपळाईने वाकून राहुलचे जोडे सतःच्या हातात घेतात, त्यावरची धूळ स्वत:च्या हाताने पुसून भाविकपणे कपाळाला लावतात. आपली जोडे उचलण्याची संधी बागवेंनी पटकावल्यामुळे चव्हाण एक रागाचा कटाक्ष त्यांच्याकडे टाकतात. राहुल बोलयला सुरूवात करतात.

"मै कहाका हू? भारत, ईट्ली, मुम्बई, दिल्ली . . .? पूरा भारत मेरा घर है. विपक्षोंको गरीबोंके दुखोंकी क्या कल्पना? AC मे बैठनेवाले गरीबोंका दुख कभी नही समझेंगे. सिर्फ कॉन्ग्रेसही गरीबोंके हितोंका रक्षण कर सकती है."

अचानक राहुलचे तोंड वेडेवाकडे होऊ लागते. तो आपला हात खिशात घालतो व रूमाल काढण्याआधीच त्याला एक जोरदार शिंक येते. इतकी जोरदार शिंक पूर्वी कधीही कोणी ऐकली नसते. आचार्य अत्र्यांच्या शब्दात सांगायचे तर अशी जोरदार शिंक गेल्या १० हजार वर्षात कोणाला आली नव्हती. अशोक चव्हाण ही संधी उचलण्याच्या प्रयत्नात तोंड उघडणार तेवढ्यात कृपांशंकर पुढे येऊन राहुलच्या ऐवजी स्वत:च "Excuse Me" असे म्हणतात. त्यावर अशोक चव्हाण स्वतःच "जीझस! गॉड ब्लेस यू!" असे राहुलला म्हणून स्वत:ची कॉलर ताठ करतात.

प्रसंग संपतो. पडद्यावर पुन्हा वागळेंचा प्रफुल्लित चेहरा दिसू लागतो.

वागळे - आता आपण एक ब्रेक घेऊन मग चर्चेला सुरूवात करणार आहोत.

ब्रेकनंतर . . .

वागळे: दाभोळकर, आपण तुमच्यापासून सुरूवात करू या. काय वाटते तुम्हाला या शिंकेबद्दल? ही शिंक म्हणजे शिवसेनेला मोठी चपराक आहे का?

दाभोळकरः निश्चितच. शिंक येऊनसुद्धा राहुलचा दौरा यशस्वी झाला हे बुद्धीप्रामाण्यवाद्यांचे मोठे यश आहे तर शिवसेनेसारख्या प्रतिगामी पक्षांचा फार मोठा पराभव आहे असे मी मानतो. मी अंनिस तर्फे राहुलचे अभिनंदन करतो. आज माझ्याबरोबर अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रमातले माझे आघाडीचे सहकारी डॉ. श्रीराम लागू हे सुद्धा येणार होते. पण कुठे माशी शिंकली कोणास ठाऊ़क, त्यांचे येणे रद्द झाले. पण त्यांनी आपल्यासाठी संदेश पाठविला आहे. तो मी वाचून दाखवितो.
"शिंक येणे ही नैसर्गिक क्रिया आहे. शिंक आल्यावर देवाचे नाव घेणे ही अंधश्रद्धा आहे. राहुलला शिंक आल्यावर अशोक चव्हाण राहुलला "जीझस! गॉड ब्लेस यू!" असे म्हणाले. हा महाराष्ट्रातील बुद्धिवादी जनतेचा अपमान आहे. देवाला रिटायर केल्याशिवाय आपल्या अंधश्रद्धा दूर होणार नाहीत."

वागळे: आता आपण संजय राउतांना विचारूया. राहुलला आलेल्या गगनभेदी शिंकेमुळे शिवसेनेच्या जातीय आणि प्रांतीय राजकारणाला मोठी चपराक मिळाली आहे असे नाही का तुम्हाला वाटत?

राऊत: मुळीच नाही. राहुलने महाराष्ट्रात येऊन शिंकून महाराष्ट्राला अपशकुन केला आहे व तमाम मराठी जनतेचा अपमान केला आहे असेच शिवसेनाप्रमुखांचे मत आहे. शिंकताना त्याने तोंडावर रूमाल सुद्धा घेतला नव्हता. यामुळे वराहज्वर पसरण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही.

हुसेन दलवाई (मध्येच तोंड खुपसत): राहुल इतक्या जोरात शिंकले की शिवसेनेच्या सर्वांच्या कानठळ्या बसून त्यांचे कान बधिर झाले आहेत. त्यांच्या शिंकेचे महाराष्ट्रातील जनतेने जोरदार स्वागत केले आहे.

राऊत: अजिबात नाही. राहुलच्या शिंकेचे काय सांगता? शिवसेनाप्रमुख जेव्हा शिंकतात तेव्हा लाहोरपासून कराचीपर्यंत संपूर्ण पाकिस्तानी जनतेचे कान बधिर होतात. त्यांच्या शिंकेने काँग्रेसच्या देशद्रोही कारवायांना अपशकुन होतो. राहुलने इटलीत जाऊन शिंकावे. नाहीतर बिहार किंवा युपीमध्ये जाऊन शिंकावे. आमची काहिही हरकत नाही. पण इथे महाराष्ट्रात येऊन आणि शिंकून मराठी जनतेचा अपमान करू नये.

हुसेन दलवाई: राहुल शिंकू नये म्हणून शिवसेनेने खूप प्रयत्न केले होते. त्यांनी बाजारातून तपकीरीच्या पुड्या गायब केल्या होत्या. भाजपच्या प्रभावाखालील व्यापार्‍यांना तपकीर विकण्यास बंदी घातली गेली होती. तरी देखील राहुलने शिंकून दाखविलेच व शिवसेनेला जोरदार तडाखा दिला.

राऊतः राहुलला शिंक आल्यावर अशोक चव्हाण राहुलला "जीझस! गॉड ब्लेस यू!" म्हणाले. हिंदू देवाचे नाव का नाही घेतले? हा सर्व भारताचा अपमान आहे.

हुसेन दलवाई: आमचा पक्ष सर्वधर्मसमभावर विश्वास ठेवणारा आहे. शिंकल्यावर आम्ही कधी "शिव शिव" म्हणतो, कधी "माशाल्ला" म्हणतो तर कधी "येशू"चे नाव घेतो. सर्व धर्मांना समान संधी असे आमचे निधर्मी धोरण आहे. राहुल शिंकले त्या दिवशी "जीझस" म्हणण्याची पाळी होती. राहुल शिंकतात तेव्हा शिवसेनेला अपशकुन होऊन त्यांना धडकी भरते. याउलट शिवसेनाप्रमुख शिंकतात तेव्हा सर्व महाराष्ट्राला अपशकुन होतो.

राऊतः
काय वाटेल ते बोलू नका. माननीय शिवसेनाप्रमुखांच्या राष्ट्रवादी शिंकेची राहुलच्या हिरव्या शिंकेबरोबर तुलना करता? राहुल शिन्कला तेव्हा काँग्रेसचा इतर एक तरी नेता शिंकला का? माननीय शिवसेनाप्रमुख जेव्हा शिंकण्याचा आदेश देतात तेव्हा सर्व शिवसैनिक एका वेळी एका स्वरात शिंकतात आणि त्यामुळे पाकड्यांचे धाबे दणाणते. राहुलच्या शिंकेमुळे साधे चिलट सुद्धा घाबरले नाही.

वागळे: आपण आता हृदयनाथ मंगेशकरांना त्यांचे मत विचारूया.

हृदयनाथः भारतवर्षात शिंकण्याची परंपरा फार जुनी आहे. महाभारतात कृष्ण शिंकाळ्यावर ठेवलेले लोणी पळवत असे. शिंकाळे या शब्दातच शिंक आलेली आहे. ज्ञानेश्वरीतल्या अनेक ओव्यात शिंकेचा उल्लेख आहे. शिंकेचा शंकासुर पळवून लावा अशा अर्थाचे संत एकनाथांचे एक भारूड आहे. लता १९५२ मध्ये प्रभातच्या एका चित्रपटातील गाणे ध्वनिमुद्रित करताना तिला शिंक आली होती तेव्हा प्रत्यक्ष दिलीपकुमार "माशाल्ला" म्हणला होता. गुलाम अली खांना एका मैफिलीत षडज लावताना शिंक आली तेव्हा शिंकताना आ वासलेल्या अवस्थेत त्यांनी एक बहारदार तान घेऊन आपली शिंक त्या तानेत जिरून टाकली होती.

वागळे (त्यांना मध्येच तोडून): आपल्याकडे वेळ फार थोडा उरलेला आहे. चर्चेच्या शेवटी आपण दाभोळकरांना त्यांचे मत विचारूया.

दाभोळकरः शिंक येणे ही नैसर्गिक क्रिया आहे असे अंनिस मानते. शिंक आल्यावर देवाचे नाव घेणे ही अंधश्रद्धा आहे. ही अंधश्रद्धा पाळणार्‍यांना शिक्षा व्हावी असा कायदा करावा म्हणून अंनिसचे कार्यकर्ते येत्या जोतिबा फुले पुण्यतिथीच्या दिवशी फुले स्मारकात जमून स्वतःच्या रक्ताने मुख्यमंत्र्याना पत्रे लिहीणार आहेत. त्यांनंतर आम्ही सर्वजण डोळ्यांवर काळी पट्टी बांधून जोरदार शिंकून मुख्यमंत्र्यांचा निषेध करणार आहोत.

असे म्हणून ते खिशातून डबी काढून दोन्ही नाकपुड्यात तपकीर भरतात आणि जोरदार गगनभेदी शिंकतात. शिंक ऐकल्यावर वागळे अभावितपणे "शिव शिव" असे उद्गारतात.

वागळे: चर्चेच्या शेवटी आपण आपला आजचा पोल बघूया. आजचा आपला प्रश्न आहे की "राहुल गांधीच्या मुम्बई भेटीतल्या गगनभेदी शिंकेमुळे शिवसेना नेस्तनाबूत झाली आहे का?". बघा पडद्यावर.

पडद्यावर पोलचे आकडे उमटतात. "0" टक्के "हो" म्हणत आहेत तर "नाही" म्हणणार्‍यांची संख्या "0" टक्के आहे.

वागळे:
अरेच्चा! एकाही प्रेक्षकाने आपले मत दिलेले दिसत नाही. कुणी हा कार्यक्रम बघत नाही असेच दिसतेय. आपली एवढी महत्वाची चर्चा फुकटच गेली म्हणायची!

स्थळ - १०, जनपथ. वेळ - रात्रीचे १०

सोनिया (राहुलला) - राहुल बाबा, थुम इथने झोरसे कैसे छीखे? थुम भीम्हार तो नही पड गया?

राहुल हसत हसत खिशातून एक काड्यापेटीच्या आकाराचे उपकरण बाहेर काढतो, आ वासून तोंड वेडेवाकडे करतो आणि उपकरणावरचे बटण दाबतो. त्याबरोबर त्या उपकरणातून एका गगनभेदी शिंकेचा आवाज बाहेर पडतो.

राहुल - मॉमी, समझा क्या मेरी जबरदस्त चींख का रहस्य?

Submit to kanokani.com

गुर्जी मस्त लिहिलय स्मित

गुर्जी, मस्त लिहीलय.

पण माशी शिंकली आणि लिहीण्याची जागा चुकली. तिकडे गुलमोहरात टाका 'विनोदी लेखन' मधे स्मित

अरे लै भारी आहे.. गुर्जी नादखुळा लिहिलेय.. लाजो म्हणते त्या प्रमाणे हलवा विनोदी लेखनात स्मित

गुलाम अली खांना एका मैफिलीत षडज लावताना शिंक आली तेव्हा शिंकताना आ वासलेल्या अवस्थेत त्यांनी एक बहारदार तान घेऊन आपली शिंक त्या तानेत जिरून टाकली होती. >>
:हसून हसून गडबडा लोळण हसून हसून गडबडा लोळण

सही आहे हाहा

अफलातून...

खुप खुप हसु आले...निखील वागळे आधी (झि मराठी...५-६ वर्षापुर्वी) थोडे बरे वाटत होते....पण आजकाल फक्त एकच घोडे नाचवत असतात...

हास्यकल्लोळ. शिंक.... अफलातुन गुरुजी.

हाहा

वा ... धमाल मांडलयं ... मस्तच गुरूजी.

हाहा
मला राजकारण जराही आवडत नाही, पण विनोदी लेखन म्हणून वाचायला घेतले, खरच सांगू मजा आली. स्मित
गुरुजी प्रसंग ईतका मस्त रेखाटला आहे . स्मित

गुरुजी छान आवडले.प्रत्येकाचे व्यक्तिचित्र हुबेहूब.

स्मित

मस्त गुरूजी....खुसखुशीत आहे...

हिमनगाचा १/८ दिसतो.....

हाहा

लई भारी .

जबरी लिहीलय खो खो
पण खरच त्या दिवशी सगळ्या न्युज चॅनल वर दुसरी बातमी नव्हती, उबग आला अक्षरश: आपल्या राजकारण्यांचा आणि किव सुद्धा अरेरे

छान लिहिलय..

तुम्ही राहुलचे जोडे उचलले म्हणून अंनिस वाल्यांनी मंत्रीमहोदयांचा जाहीर निषेध केल्याचं लिहिलंच नाहीत, राव! अरेरे अंनिसवाले कित्ती नाराज झाले म्हणून सांगू.... असे कोणाचे जोडे उचलणे म्हणजे अंधश्रध्दाच, असं काहीसं पुटपुटत होते!!! स्मित

आजच्या पेपरात ढोणिने ईडलि खाल्ल्याची बातमी.
हा लेख आठवला मग एकदम. किळस आलि न्युजचॅनल वाल्यांची.

हाहा

त्या १ आणि १/२ शहाण्या निखील वागळेंची शिस्तीत ठासल्याबद्दल अनावर आनंद जाहला.
लेखन देखील खतरनाक झाले आहे.
अभिनंदन.