माझे स्वयंपाकाचे प्रयोग : चायनीज

Submitted by वर्षा_म on 5 February, 2010 - 03:15

चायनीज म्हणजे जीव की प्राण यांचा...नवर्‍याला आणि लेकाला प्रचंड आवड या चायनीज पदार्थांची. मला तर टीव्हीवर तो खतरोंके खिलाडी पाहिल्यापासुन आजीबात आवडत नाही.
नुडल्स म्हटलेकी समोर येतो तो अक्षयकुमार त्या तसल्या अळ्या तोंडावर घेतलेला...य्य्य्य्य्य्य्य्य्क

माबोवरचा काटकसरीचा बीबी वाचुन मी पण ठरवले आता काटकसर करायची. आणि मला प्रत्येक ठिकाणी मी उधळी वाटायला लागले. मागच्या आठवड्यात हॉटेल मधे जायचे ठरले. मग एकमताने (इथे माज़्या मताला काडीचीही किंमत नसते) चायनीज जेवायचे ठरले. मला समजवन्यात आले तु अळ्या (नुडल्स) सोडुन बाकी खाउ शकतेसच ना.

मीही मनाशी काहीतरी ठरवले आणि गेलो आम्ही जवळच्याच चायनीज हॉटेलात. ऑर्डर दिल्यावर मी वेटरला म्हणाले मला तुमचे किचन पहायचे आहे किती स्वछता आहे हे. खर तर मला पदार्थ शिकायचे होते :डोमा: पण अर्ध्या तासाने त्यांनी प्रेमाणे (बील बाकी होते ना) मला किचन बाहेर काढले. "काय पण ते मिचक्या डोळ्यांचे एक एक नग असतात" म्हणत बाहेर येउन बसले. तर नवरा म्हणे "तु पण त्यांच्यातीलच वाटायला लागलीस आता आधीच नकटे नाक आणि वाढलेल्या वजनामुळे बारीक दिसनारे डोळे." असे म्हणुन दोघे फिदीफिदी हसायला लागले. हे असे दोघे एका बाजुला झाले की मी गप्प बसते. मला माहित आहे अशा वेळी आपले तोंड उघडले की भांडण ठरलेले.

मग मनात आले काय अवघड आहे चायनीज पदार्थ करणे आपण पण करु शकतो. मग काय दुसर्‍या दिवशी ओफिस मधे गेल्या गेल्या गुगल देवाला सांगडे घातले. मग "तु नळी" वरुन ३ - ४ मंजुळा पेन ड्राइवमधे कोंबल्या. या मजुळाताईंच बर असत जेव्हा पाहिजे तेव्हा बटण दाबुन यांचे तोंड बंद करता येते. मला नेहमी वाटते असे माझ्या बॉसिनीचे करता आले तर किती छान होइल. :डोमा:

हाफ डे रजा काढुन मनात आज चायनीज पदार्थ करुन सगळ्यांना चकीत करायचे असे ठरवुन लवकर घरी आले. हो पण आधी येताना सबसे सस्ता चार दिन मधुन सगळे सॉस, कॉर्नफ्लोअर, तयार कापलेल्या भाज्या , नुड्ल्सची पाकीटे (हो पाकीटेच दोनावर तिन फ्रि म्हणुन पाच पाकीटे) आता सॉसच्या बाटल्या पण सगळ्यात मोठ्या घेतल्या, म्हटले आता नेहमीच घरी करायचे म्हणजे लागलेच. चांगले हजार रुपयांचे बिल झाले.

घरी आल्यावर फ्रेश होऊन कॉप्युटरवर मंजुळा बाईंना चालु केले, एप्रन चढवला, सगळे सॉस काढले, भाज्या काढल्या, आता तांदुळ , नुडल्स ठेवायला ओट्यावर जागाच नाही मग खाली मांडायला सुरुवात केली. खरच कौतुक वाटते जे लोक स्वयंपाक करताना पण फोटॊ काढतात त्यांचे. पण माझे किचन खरच फोटॊ काढन्यासारखे नक्कीच झालेले होते एव्हना (केव्हडा तो पसारा). आधी मंचुरीयन केले आणि तेव्हड्यात बेल वाजली मुलगा आला. त्याला प्रेमाने डिश मधे सजवुन मंचुरीयन दिले तर म्हणाला "व्वा! आमटी भजी. पोळी पण दे की मग" :अओ: गाढवाला गुळाची चा काय म्हणत हाकलला त्याला खेळायला.

मनाचा निश्चय करुन राईस करायला घेतला त्यात थोड्या नुडल्स पण टाकल्या आणि चायनीज वाले उडवतात तसाच उडवला .. तर हे काय निम्माच झाला राईस... काहीतरी भुताटकी झाली वाटते असा विचार करते न करते तोच माझ्या डोक्यावर काहीतरी पडल्या सारखे वाटले, हात लावला तर राईस होता. वर पाहिले तेव्हा कळाली भुताटकी.. सगळा भात छताला चिकटलेला होता आणि नुड्ल्स लोंबत होत्या. तेव्ह्ड्यात चिरंजीवांनी एन्ट्री मारली "मा अब तुम मेरा कमाल देखो" करत थोबाड वर करुन वासले आणि एक एक नुडल तोंडात घेण्याचा प्रयत्न सुरु केला. मी तर डोक्याला हात लावुन फतकल मारुन तिथेच बसले. थोड्या वेळाने पाहिले तर चिरंजीवांचा पुतळा झालेला नुडल्स छतावरुन पडायची वाट पहात. पण डोके सगळे भाताच्या शितांनी भरलेले. ओढुन बसवले समोर आणि शित काढायला सुरुवात केली त्याच्या डोक्यातले. मला खरच पिल्लाच्या डोक्यातील उवा काढणारी माकडीनच आठवली.

आता राहीले होते सुप. पण घड्याळात पाहिले तर नवर्‍याची यायची वेळ झालेली. पाकप्रयोग बंद केले आणि आधी घर आवरायला घेतले. कुठुन सुरुवात करावी हेच कळेना. तशी मी ५ वर्षांपुर्वीच व्हॅक्यूम क्लीनर घेउन आधुनीक ग्रुहिनी झालेले पण आता तो वापरायचा म्हणजे त्यावरची धुळ काढायला तास लागला. साफ करायला सुरुवात केली आणि साक्षातकार झाला हे काम काही या नविन खेळण्याने होण्यासारखे नाही. मग सरळ झाडु घेतला आणि केले घर साफ.

तयार केलेले दोन्ही पदार्थ फ्रिजमधे कोंबले. आणि फोन करुन हॉटेलातुन चायनीज मागवले. तसे नवर्‍याला आश्चर्य वाटलेच एतकी मी चेंगट असताना हॉटेलमधुन कसे मागवले ते. पण मी ही सांगितले मी आता आधुनीक होणार आहे. पैशाचा जास्त विचार करणार नाही. बिचारा एकल्यावर चक्कर येउन पडायचा बाकी होता.

मस्त तिघांनी जेवण केले. "मी खुप दमले आहे" असे सांगुन झोपायला गेले. तर १० मिनीटातच खिदळण्याचा आवाज आला. येउन पहाते तर मी व्हॅक्यूम क्लीनर साफ करत होते तेव्हड्या वेळात चिरंजीवाने किचनचे आणि मी केलेल्या पदार्थाचे फोटो काढलेले आणि आता ते पाहुन हसने चालु होते. :राग:

अजुनही त्या सॉसच्या बाटल्या पाहिल्या की मला परत उत्साह येतो पण मुलाने काढलेले फोटो आठवुन परत मावळतो.

गुलमोहर: 

मनाचा निश्चय करुन राईस करायला घेतला त्यात थोड्या नुडल्स पण टाकल्या आणि चायनीज वाले उडवतात तसाच उडवला .. तर हे काय निम्माच झाला राईस... काहीतरी भुताटकी झाली वाटते असा विचार करते न करते तोच माझ्या डोक्यावर काहीतरी पडल्या सारखे वाटले, हात लावला तर राईस होता. वर पाहिले तेव्हा कळाली भुताटकी..> । हा हा हा ............... म स्त लिहीलयं .............

Pages