धक्का...

धक्का.....

थंडीत सकाळी सकाळी ऑफिसला जायचं म्हणजे मोठं कंटाळवाणं काम. च्यायला जन्मभर हे मागे लागलंय शुक्लकाष्ठ.. शाळेत असताना शाळा म्हणून लवकर उठा.. कॉलेजात ते काय सुख मिळाले.. सुख काय म्हणा.. गावातून शहरात यायला सकाळी एस टी पकडायला पळावे लागे पण.. कॉलेजचा मामला जरा तरी हातातला होता. दांडी मारावीशी वाटली मारा दांडी.. पण हे ऑफिस म्हणजे झक मारत जावंच लागत. त्यात पडलो बॅचलर.. लवकर उठा आपलं आपल पाणी भरा.. अंघोळ आटोपून कुठेतरी चहा मारून, समोरच्या काकूंकडून डबा घेऊन.. पळतपळत या बसस्टॉपला या. बरं ऑफिस आता लांब गेलय पण त्या भागात कुठे मला परवडणार्‍या रूम्स नाहीत त्यामुळे हा रोजचा प्रवास आणि ही शिक्षा.. कधी संपणार कोण जाणे.. माणसाने ना एकतर एकदम गरीब व्हावं यार नाहीतर एकदम श्रीमंत.. हे आमच्या सारखे अधले मधले नको... शिका पोटासाठी.. मग चपला झिजवा नोकरीसाठी.. कारण घरातल्यांचे डोळे आपल्याकडे लागलेले.. न करून सांगता कोणाला..

चला विनोबा पटकन उचला पाय अस मनाला बजावत पाय ओढत निघालो.. आज अंघोळीलाही बुट्टी मारली .मरू दे , आज गुरुवार पाणी आलंच नाही.. कुठे बसता वाट पाहत.. चलो.. डिओ जरा जास्त फवारलाय.. आत एकदम फ्रेश. हाय काय नाय काय.

पस्तीस नंबरच्या स्टॉपवर आलो.. नेहमीचे चेहरे दिसले.. निम्म्या बायका पोरी.. इतक्या सकाळी सकाळी कुठून वेळ काढतात या भवान्या रंगरंगोटीला कोण जाणे.. पण त्यांच्या वर नजर टाकता टाकता नजर जिच्या शोधात होती तिथे बरोबर स्थिरावली.. चला झालं दर्शन देवीचं.. आजचा दिवस वसूल
दोन महिने झाले रोज याच बसला बघतो तिला. या सगळ्या नटरंगी पोरींमध्ये एकदम साधी.. अन त्यामूळेच नजरेत भरणारी.. चेहर्‍यावरचे ते शांत सोज्वळ भाव, स्निग्ध नजर.. नुसते बघूनच खूप बरे वाटायचे.. कधी बोलायला मिळेल की नाही कोण जाणे.. असो निदान नजरेच सुख आहे ते ही नसे थोडके.. प्रेमात पडावं आणि पोरींमागे फिरावं हि आपली वृत्तीच नाही..
चलो बस आली..

आज दैव बलवत्तर म्हणायचं देवी शेजारची सीट मिळाली
आहा काय सुगंध येतोय शेजारी बसली तरी.. खिडकी बाहेर बघतेय.. बोलाव का? की नको.. काही पोरी च्यायला सर्किट असतात.. उगा अर्थाचा अनर्थ करून घेतात.. बोलूच
"अं खिडकी उघडता का? "
’अं"
ती एकदम दचकली
"काच उघडता का? "
"नाही उघडली तर नाही चालणार.. तशी थंडी बरीच आहे ना बाहेर.. " काय आवाज आहे.. व असा गोडवा असावा आवाजात..
माझीही भीड चेपली
"थंडी आहे पण चालत काय , पळत आलो आज ना त्यामूळे प्रचंड गरम होतय अस वाटतंय.. "
"मग लवकर निघायचे.. "
यावर मी आपला केविलवाणा हसलो..
"रोज याच बसला असता ना तुम्ही.. " अस्मादिकांनी अजून थोडी हिंमत बांधली
"हो, आठ पस्तीसचा लेट मार्क असतो.. मस्टर गाठायचं म्हणजे ही बस पकडलीच पाहिजे.. "
चलो.. आता पुढे बोलायला हरकत नाही..
मग काय गप्पा मध्ये कधी स्टॉप आला कळलंच नाही..
माझा स्टॉप आधी आला तसे ति पटकन म्हणाली
"तुमचा स्टॉप आला.. "
:"हो हॊ.. चला बाय.. भेटू उद्या.. संध्याकाळी कधी जाता.. "
"संध्याकाळी.. लवकर जाते" का कोण जाणे हे म्हणताना तिचा चेहरा एकदम आक्रसला
जाणे दो एकाच भेटीत काय विचार करायचा.. पण या ओघात लक्षात नाही आले की तिला माझा स्टॉप माहितेय.. याने ती पण बघते की काय माझ्याकडे रोज.. येस.. भगवान देता है तो छप्पर फाडके.. आंधळा मागतो एक आणि देव देतो दोन.. आज तसंच काहीस झालंय.

**************************************************************************************

मग काय आता रोज बरोबर जायचं हा परिपाठच झाला वासंतीचा आणि माझा..
अरे हो सांगायचेच राहिले तीच नांव वासंती. ती माझ्या ऑफिसच्या पुढच्या स्टॉपवर असलेल्या विलिंग्टन मध्ये नोकरीला होती आणि मी राहत होतॊ त्या घरापासून जवळच राहत होती.. ती ही कुठे रूम घेऊन राहत होती.. या पलिकडे मलाही फारशी माहित्ती नव्हती
तशी ती थोडी रिझवर्डच होती.. स्वत:बद्दल फार माहिती द्यायला तिला आवडत नसावे. अर्थात माझा स्वभाव ही फार भोचक चौकस नसल्यामुळे मी पण तिला फार काही विचारत नव्हतो. ती सांगेन तितकेच....

एका शनीवारी म्हणाली"उद्या काय करतोय सुटीचं"
"कुछ नही कपडे धुणार आणि फारतर एखादा पिक्चर टाकणार आणि ताणून देणार.. "
"मग जहांगिरला येशील प्रदर्शन बघायला जाऊ"
"अरे वा.. चित्रकलेत रस आहे का? "
"अं रंग अन रेषाच्या त्या साम्राज्याच मला अतिशय आकर्षण आहे.. "
"अच्छा जाऊ या.. मग दुपारी तिथेच जेवू जवळ चर्चगेटला.. आणि मग मस्त एखादी मूव्ही टाकून परत चौपाटीला जाऊ.. की एकदम बॅण्ड स्टॅण्ड चालेल? "मी हसत विचारले
"न ..नको संध्याकाळी नको.. मला सहा पर्यंत घरी परतायचं असतं"
"ओ के.. मग पिक्चर बघून डायरेक्ट घरी.. डन? "
"डन.. " तिची मघाशी एकदम आक्रसलेली कळी खुलली..
मग काय विचारता तो रविवार म्हणजे माझ्या सारख्या कफल्लक माणसाच्या झोळीत एकदम सोन्याचे दान पडावे असा होता...
प्रदर्शन बघताना ती चित्रे बघत होती अन मी तिच्याकडे.. किती बोलत होता तिचा चेहरा ती चित्रे बघून.. मला क्षणभर त्या चित्रांचा हेवा वाटला..
"निशीकांत, तुला माहितेय या रंगाची जादू काही औरच ना.. किती तर्‍हेतर्‍हेचे ... प्रत्येक छटेचा एक भाव असतो.. एक स्वभाव असतो.. या रंगाच्या माध्यमातून चित्रे बोलतात आपल्याशी.. तो चित्रकार बोलतो.. काय अफाट सामर्थ्य आहे या रंग रेषांच .. "
"वसू खरं सांगू मला काही कळत नाही गं.. पण तुझ्या चेहरा जसा फुललाय ना हे बघून तसं मला वाटतंय की खरंच ही चित्रे खूप ग्रेट असावीत.. "मी आपलं सरळ सरळ कबूल केलं
"हं.. "ती परत अचानक काहीशी अबोल झाली.. नक्की काहीतरी वेदना दडली आहे हिच्यात. ही दाखवत नाही आपल्याला.. पण एखाद्या पुस्तका सारखा हिचा चेहरा बोलतो.. या सार्‍यांत एक वेदनेची झाक आहे.. ती तरळते बर्‍याचदा तीच्या डोळ्यात, तिच्या एखाद्या वाक्यात.

... पिक्चर सुटले तर चार वाजत आले होते.
"चल अजून कुठे जायचे भटकायला? "
" नको अंधार पडायला आलाय घरी परतायला हवे.. "
"लहान मुलीसारखी काय घाबरते अंधाराला.. मी आहे ना.. "
"नको रे.. नको म्हटलंय ना मी" तिचा स्वर एकदम चिडका अन त्रासिक झाला.. मी ही गप्प झालो.. पण का कोण जाणे दिवस भरच्या सुखाच्या पेल्यात हा मिठाचा खडा पडवा तसे मला झाले..
जाऊ दे.. असेल काही.. इतकं काय मनाला लावून घ्यायचे.. ईन मीन तीन महिन्याची तर मैत्री
***************************************
उद्या संध्याकाळी आमच्या कंपनीचे गेट टुगेदर ठेवले होते. सगळा ऑफिस स्टाफ आपल्या माणसांना घेऊन जमणार होता.
मी मनाशी ठरवले वसुला निमंत्रण करूया.. नाहीतरी आपले आहे कोण असे..
"उद्या येशील संध्याकाळी.. आमच्या ऑफिसात पार्टी आहे"
"संध्याकाळी.. " वसू एकदम शहारत म्हणाली..
"नाही मला नाही जमणार.. "
"का गं.. "
"नाही म्हटले ना.. "
ती एकदम तटकन बोलली.. अन गप्प बसली
हा काय प्रकार आहे? संध्याकाळ रात्र म्हटलं की ही अशी का आक्रसून घेते स्वत:ला.. काय आहे काय.. माझ्या मनात प्रश्न आला.. परत म्हटलं जाऊ दे.. काय करायचंय सांगेल कधीतरी.. नाहीतर नाही सांगणार.. आपण कोण एखाद्याच्या पर्सनल मॅटर मध्ये दखल देणार..
***********************************
वसू अन मी आत बर्‍या पैकी सरावलॊ होतो एकमेकांना. पण प्रेमात बिमात पडलो का? हा प्रश्न मी ही मनाशी अनेकदा विचारला.. पण तिने कायम एक धुक्याच पडदा धरला होता आमच्या दोघांमध्ये. मला जाणवत होता तो.. ती स्पष्ट पणे एकाही भावना दाखवत नव्हती.. कधी खूप हळवी व्हायची पण लगेच एकदम तटकन तॊडून टाकल्य़ा सारखे करायची...नक्की काय विचार करते ती माझ्या बाबत? नाही नाही म्हणता मी ही बराच गुंतत चाललो होतो तिच्यात
.........
आज वसू आलीच नाही बसला.. काय आजारी वैगरे पडली की काय कोण जाणॆ
बघू वाट... पावसाळ्याचे दिवस आहे.. आजारपण आहेत असेल काहीतरी नाहीतर गेली असेल कुठे..
कुठे बरं.. अरेच्या तिने कधी स्वत; बद्दल सांगितलेच नव्हते फारसे.. म्हणजे कुठली.. काय.. काहीच नाही मला फक्त तीच्या ऑफिस नाव यापलिकडे काही माहीत नव्हतं.
......................
होता होता दहा दिवस झाले.. आज शोधूयाच म्हणून मी अर्धा दिवसाची रजा टाकून गेलो तिच्या ऑफिसात.. तीच्या नावाची चौकशी केली असता कळले तिने नोकरी सोडली. तसा फोन आला होता..
"काय वसू ने नोकरी सोडली? "

आपल्याला एका शब्दानेही बोलली नाही. मैत्री म्हणत होतो आपण.. गुंतलो का अस शंभरदा वाटत होतं अन नोकरी सोडून जाताना या मुलीने शब्दाने पण सांगू नये आपल्याला.. म्हणजे तिच्या लेखी मी कोणीच नव्हतो.. आपण थोड्या ओळखीच्या व्यक्तीलाही सांगतो आणि आज सहा महिने कायम बरोबर जात येत होतो.. मित्र म्हणवत होतो.. तिने आपल्याला सांगायची सुद्धा दखल घेऊ नये.. वाईट वाटण्या पेक्षा मला तो अपमान वाटतं होता.. छे नाही सांगता येणार पण खूप वेगवेगळ्या भावना दाटल्या ,दु:ख ,वंचना ,अपमान ,उपेक्षा, वैफल्य.. का अशी वागली ती? का?????"
माझ्या डोक्यातून काही केल्या जाईना.. मी तिच्या ऑफिसातून तिच्या घरचा पत्ता मिळवला.. आज जायचंच अन विचारायचं.. चल तू इतकी स्वत:ला कोणी समजत असशील तर समज.. पण मला काय समजलीस एक कस्पट..
रागाच्या तिरीमिरीत तिचे घर शोधायला सुरवात केली.. पाऊस परत सुरू झाला होता.. मी भिजत होतॊ पण मला त्या भिजण्याची तमा नव्हती.. त्या उपेक्षेच्या जाणीवेने इतका धगधगत होतो मी की पाऊस वैगरे मला दिसत नव्हता
त्या मिळालेल्या पत्त्याच्या जागी आलो तर तिथे पडकी इमारत.. सगळीकडे पडझड झालेल्या खुणा.. नुकतीच झाली होती की काय अशा खुणा
म्हणजे आता पडली हि इमारत? . म्हणजे वसू.. नाही नाही तीने तर नोकरी सोडलीय.. मग?

माझी विचारांची हि झटापट चालू असतानाच एक म्हातारे गृहस्थ आले जवळ
"कोण पाहिजे..? "
"अं.. वसू.. म्हणजे वासंती"
"म्हणजे ती त्या अकरा नंबर मधील मुलगी का? "
"थांबा.. बघतो.. "मी परत तो पत्ता बघितला. खोली नं अकराच
"हो हो अकरा नंबर खोली.. "
"अरे.. कोण तुम्ही तिचे? ओळखता का तिला? "
"हो, पण काय झाले.. "मी धसकुन विचारले...
"अहो त्या दिवशी च्या पावसात ही इमारत पडली ना.. "
"हा मग.. "मला धीर धरवत नव्हता
"हा तर त्या पावसात हे अचानक खचायला लागली आधी ही भिंत समोरची.. अन मग भरभर सगळे बाहेर पडायला लागले ओ.. काय सांगता आठवण आली तरी काटा येतो बघा अंगावर.. "
"मग वसू ला काय.. "
"अहो सगळे बाहेर आले. आम्ही ओरडत होतो बाहेर पळा पळा.. सगळी धावपळ बघा.. पण ही अकरा नंबर मधली मुलगी बाहेरच नव्हती आली.. "
"का.. "
"तेच तर ना.. दोघा चौघांनी दरवाजा ठोकला पण आतून काहीच नाही.. मग काय महाराज.. "
"काय.. " हा म्हातारा सांगत का नाहीये लवकर
"मग दरवाजा धक्के मारुन उघडला तर एका कोपर्‍यात ही पोरगी भीतीने थरथर कापत बसलेली.. "
"मग तिला काही लागले बिगले?.. "
"नाही हो लागले नव्हते.. तीच्या घरच्या बाजूचा भाग पडला होता थोडा पण ही दुसर्‍या कोपर्‍यात होती.. तिला ये म्हणालो आम्ही तर येईना पण.. मग एक जण जवळ गेला अन चल म्हणाला.. शेवटी हाताला धरून बाहेर काढली.. न काय"
"वाचली ना ती..? "
"वाचली तर पण चालताना जेव्हा चाचपडायला लागली तेव्हा कळेना रोज तर ही एकटी जाते ऑफिसला आणि आत का अशी चाचपडतेय.. "
"का..? "
"तेच.. पण तितक्यात रडायला लागली ती.. आमच्या बायकोनेच बघा जवळ घेतली.. रडू नको म्हणून समजावले.. अन तेव्हा कळले.. "
"काय.. "
"अहो बिचारी एकतर अनाथ होती हो आणि त्यात तीला रात्रीच दिसत नव्हत.. रातांधळेपणा आलेला हो.. "
"काय रातांधळेपण????.. "मी जवळपास किंचाळलोच.. अन मग ते सारे प्रसंग भिरभिरायला लागले माझ्या भोवती.. तो परिसर तो म्हातार सगळे फिरायला लागले भोवती
हे असे होते तर??. मग इतका परकं समजली मला की हे सांगितले नाही.. माझ्याबद्दल इतका विश्वास नाही वाटला तिला?
’ओ नो.. " मी डोके धरून तिथेच बसकण मारली
"मग आत गेली कुठे? "
तिचे कोणीतरी लांबचे मामा आहे त्यांना आम्ही बोलावून घेतले आणि तिला त्यांच्या बरोबर पाठवले...
"यावर इलाज असतील ना पण.. "
"हं असतील की !करतील काही.. तूम्ही कोण म्हणालात तिचे? "
"मी? कोणी नाही" मी हताश स्वरात उद्गारलो

***************

Submit to kanokani.com

छान लिहिलीय,शेवट एकदम अनपेक्षित,आवडली स्मित

नेहमी सारख झकास

पण
शुक्लकाष्ठ म्हणजे काय ?

सुंदर

आवडली , पण सुखान्त आवडला असता .........

अप्रतिम कथा आहे.. मला तर खुप आवडली..
पण खरंच .. असं घडायला नको होतं .. शेवट .. बाकी आहे का आजुन ..

मस्त.

दे धक्का

अरे देवा.. जोर का झटका जोरसे लगा !!!!!!!!

काही प्रमाणात अपेक्षित शेवट..

" नको अंधार पडायला आलाय घरी परतायला हवे.. ">> ह्या वाक्यालाच अंदाज आला होता...

आवडली स्मित

आवडली मलाही ...

छान आवडली,

छान.. अशा शेवटाचा विचारच केला नव्हता.. स्मित

छान आवडलि

स्मित कथा आवडल्या बद्दल सगळ्यांचे मनःपूर्वक आभार!!!
असाच लोभ असु देत

धक्काच !
बासुरी, कथा पुर्ण केल्यावर वाचली नाहीत का ? काही ठिकाणी क्षुल्लक चुका राहील्यात. कथेत नव्हे... लेखनातल्या. उदा. काकूंकडून दबा घेऊन.. , साम्राज्याच मन अतिशय आकर्षण आहे.. तुमच्या कथात तशा नसतात म्हणून सांगितोय.

कौतुकजी..सर्वप्रथम आभार . कथा इतकी लक्षपूर्वक वाचल्याबद्दल आणि ख्ररच मनापासुन दिलगिरी.
नीट वाचुन टाकायला हवी होती कथा . आता इथुन पुढे काळजी घेईन..स्मित मी दुरुस्त्या केल्या आहेत.

मला वाटले की विशल्या च्या भय कथेसारखा काही प्रकार असेल म्हणजे ते वयस्कर गृहस्थ सांगतील" वसु तर ५ एक वर्षापुर्वी वारली वगैरे वगैरे.............. शेवट अनपेक्षित होता हे खरे.

मला वाटत होते क्रमशः पुढचा भाग येईल. कथा छान आहे एकदम अनपेक्षित कलाटणी देत शेवट!

आवडली. स्मित

कथा आवडली.

छान आहे कथा. शेवट तर एकदम अनपेक्षित !

चांगली आहे.. पण एकदम संपल्यासारखी वाटली...

छान कथा.. शेवट अनपेक्षित.. खरच भुत कथेच्या वळणावर जातेय असे वाटत होते.. स्मित

शुक्लकाष्ठ >> कटकट - विकतचे दुखणे..

आवडली.

धन्यवाद वैभव, कदंब, पनू, स्वाती , राधिका, पग्या, चेतना,नानबा, सुनिधी..स्मित
नानबा बरोबर माझे सांगायचे राहूनच गेले होते..स्मित

अनपेक्षित कलाटणि आहे. मला वाटले होते तिचा कुणि दारुडा नवरा असावा, जो रात्री /संध्याकाळी तिला घरी नसली तर मारत असावा वै.

मला तो बोल राधा बोल चा कादर खान आठवला एकदम!

बासुरी, छानच अगदी! स्मित
ओघवती, कुठेही थबकले नाही कथानक! आणि शेवट अगदी धक्कादायक! सगळ्या अथेतल्या खुब्या चपखल जागी वापरल्या!! स्मित

धन्यवाद आशु, कृष्णा..स्मित
कृष्णा , तुझ्या परिक्षणाने बळ आले बघ अजुन लिहायचे..स्मित