मराठीचा झेंडा असाच, फडकत राहू दे
हे आईचे गीत माझ्या, आज मला गाउ दे
ज्ञानेश्वर अन मुक्तेश्वर, यांनी रचीला पाया
तुकया अन रामदास, यांनी झिजवीली काया
मज पामरासही हिला, चार फुले वाहू दे
मराठीचा झेंडा असाच, फडकत राहू दे
मी नाथांचा दास व्हावे, नामदेवा नित्य भजावे
सावता अन चोखोबा, यांच्याच मार्गास जावे
जनाई अन बहीणाई, भक्तीभावे गाउ दे
मराठीचा झेंडा असाच, फडकत राहू दे
थोरवी मी काय वाणू, अमृताते ही पैजा लावी
अवीट गोडी हीची , मी नित्यनेमी गावी
हिच्या शब्दांच्या धारेमधे, मला न्हाउ दे
मराठीचा झेंडा असाच, फडकत राहू दे
हिच्या सेवेत जन्म जावा, कळस शिखरावरी पहावा
मी बालक हीच्या अंगणी , असाच खेळत रहावा
ज्ञानदिप हा चैतन्याचा , रोज जळताना पाहू दे
मराठीचा झेंडा असाच, फडकत राहू दे
-हरीश दांगट


तुमचे मराठीबद्दलचे प्रेम प्रकर्षाने जाणवले.आणि प्रत्येक मराठी मनात असेच जाज्वल्य मराठी प्रेम निर्माण होऊ देत.छान कविता!
माझ्या माय माऊलीच गीत फार आवडलं. प्रत्येक मराठी मनात ही ज्योत जागुदे!