इट्स गॉट टु गो

घराबाहेर पाऊल टाकलं नि एक बस समोरून निघून गेली. जरा अर्धं मिनिट आधी निघायला काय होतं असं मनात म्हणत मी परत घरात शिरले. बाहेर थंडीत १२ मिनिटं उभं राहण्यापेक्षा उबेत घरात थांबलेलं बरं. आत आलेच आहे तर म्हणून मग तीन जिने चढून मघाशी विसरलेली टोपी घेतली. ही नवी टोपी एकदम मस्त आहे. कान झाकणारी. शिवाय तीन वेण्या, दोन बाजूला दोन आणि शेंडीसारखी आणखी एक. मेड इन नेपाळ! पुन्हा बस जायला नको म्हणून मग लगेच बाहेर पडले. बसस्टॉपवर एक आजी आधीपासून उभ्या होत्या. त्यांना गुड मॉर्निंग घालून मी बसच्या वाटेकडे डोळे लावले. नकळत दोन्ही हातांनी कानावरून चाललेल्या टोपीच्या त्या दोन वेण्या ओढल्या आणि आजी बोलत्या झाल्या.
"मस्त टोपी आहे ना!"
"अं... हो. कान झाकते ना, त्यामुळे मला फार आवडली." मी तोंडभर हसून उत्तरले. या आधी कोणी बसस्टॉपवर असं गुड मॉर्निंग सोडून बोललं नव्हतं. इंग्रज लोकांशी, त्यातून ज्येष्ठांशी बोलायचं म्हणजे मला अजुनी जरा गडबडायला होतं. कुठे काय चुकेल अशी काळजी वाटत राहते.
"दक्षिण अमेरिकेहून आणलीस का? इंकांच्याच असतात ना असल्या टोप्या?"
"इंका!?" मला मी ऐकले ते बरोबर का चूक कळेना. "काय म्हणालात?"
"असल्या कान झाकणार्‍या टोप्या इंकांच्या. तिकडे अँडीज पर्वतांत खूप वारं, थंडी त्यामुळे त्यांनी अश्या कान झाकणार्‍या टोप्या तयार केल्या. त्या आता जगभर गेल्या आहेत. तू कुठे घेतलीस ही टोपी?"
आजींच्या सामान्य ज्ञानावर थक्क होत, मान डोलवत, मी म्हणाले, "इथेच, बाथमध्ये, गावात..."
"सगळीकडे सगळं मिळतं हल्ली"
"हो ना"
खरंतर इथे संभाषण थांबायला हरकत नव्हती. बसची वेळ झालीच होती पण ती येत नव्हती. मी घड्याळात पहातेय हे पाहून आजींनी १२ मिनिटांनी येणारी बस आपण नसतो तेव्हाच फक्त वेळेवर येते हे माझेच आवडते मत व्यक्त केले. मी पुन्हा हो-ना-ले. पण आजी पुढे म्हणाल्या, "मी इथे वर टेकडीवर राहते, तू?"
थेट प्रश्न! मी गडबडून काय सांगावे, का सांगावे अशा विचारात, खरं उत्तर देती झाले, "इथेच, या रस्त्यावर, इथून चौथ्या घरात."
"पण तू आहेस कुठली?"
"आणखी कुठली? भारतातली." आता आजी चौकस आहेत हे मी मान्य करून टाकले.
"पण भारतात कुठे?"
"अं... पश्चिम भारत. महाराष्ट्र. हे म्हणजे भारतातलं एक राज्य आहे. मुंबई, त्याची राजधानी." मी आपली नेहमीची टेप टाकली. "माझे आई बाबा मुंबईच्या दक्षिणेला साधारण ३००किमीवर राहतात."
"अच्छा! मी राजस्थानला गेले आहे." टिपिकल. ब्रिटिश लोक भारत म्हटलं की राजस्थानला जातात.
तितक्यात बस येताना दिसू लागली. बसला हात हलवत मी म्हटलं, "वा वा. सुंदर आहे राजस्थान. मीही जाईन म्हणते कधीतरी."

"चला" बसमध्ये चढता चढता मी म्हणाले.
पण आजी चलत नव्हत्या, "कुठे बसूया?"
मी पुन्हा थक्क. किती गप्पा मारणार आहेत या! समोरासमोरच्या दोन बाकांवर आम्ही बसलो.
"मग कोणती भाषा बोलतेस तू घरी?"
"मराठी. महाराष्ट्रातले लोक मराठी बोलतात. राजस्थानातले राजस्थानी." ऑफिसच्या पार्ट्यांमुळे मला या संवादाचाही चांगलाच सराव होता.
"मग हिंदीचं काय?"
"उत्तरप्रदेश नावाचं आणखी एक राज्य आहे. तिथले, झालंच तर दिल्लीचे लोक हिंदी बोलतात."
"... आणि बॉलिवुड ...?"
"हो, बॉलिवुडचे सिनेमे मुंबईत तयार होतात सहसा. पण ते हिंदीत असतात."
"पण मग वेगवेगळ्या राज्यांतले लोक कोणत्या भाषेत बोलतात?"
"इंग्लिश! म्हणजे तसे वेगवेगळ्या भाषांत बोलू शकतात. पण लसावि इंग्लिश."
"मग हिंदी? ती राष्ट्रभाषा आहे ना?"
"भारताची राजधानी दिल्लीत आहे. म्हणून तिथली भाषा राज्यकारभाराला वापरतात. पण तश्या सगळ्या मुख्य राज्यभाषा चालतात. लोकसभेतले खासदार त्यांच्या मातृभाषेत बोलू शकतात. आणि दुभाषेही असतात."
"तुला कोणत्या भाषा येतात?"
आजी असे थेट माझ्याविषयीचे प्रश्न विचारू लागल्या की मी थोडी चकित होत होते खरी. पण मलाही आता गप्पांमध्ये मजा येऊ लागली होती. हिंदी काही भारताची एकमेव भाषा नाही हे माझं लाडकं मत मांडायची संधी मिळाल्याचा परिणाम.
"मराठी, इंग्लिश, हिंदी. झालंच तर कन्नडा थोडी नि थोडीफार संस्कृत."
खरं म्हणजे अशी यादी सांगितली की सगळे ऐकणारे बर्‍यापैकी कौतुक करतात. पण आजींचा पुढचा प्रश्न तयार होता.
"पण मग तुझं शिक्षण कोणत्या भाषेत झालं?"
"मराठी ..."
"मग इंग्लिश कशी काय शिकलीस तू?"
"पाचव्या इयत्तेपासून आम्ही इंग्लिश तिसरी भाषा म्हणून शिकलो. आता बहुतेक पहिल्या इयत्तेपासूनच शिकवतात."
"पण मग तुला इथे नोकरी कशी मिळाली?"
कशी म्हणजे काय!? हा काय प्रश्न आहे! मला थोडा रागच आला.
"मी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहे. इथे एका चिपा बनवणार्‍या कंपनीत काम करते. तसलं काम मी गेली ८ वर्षे करते आहे. या आधी केंब्रिजमध्ये ..."
"पण तेही मराठीत शिकलीस तू?" आजींना मराठीतला ठ म्हणता येतो हे पाहून मी पुन्हा चकित.
"नाही हो! उच्चशिक्षण इंग्लिशमध्येच होतं. सोळाव्या वर्षांनंतरचं सगळं शिक्षण इंग्लिशमध्ये. तोवर इंग्लिश यायला लागलेली असते ना."
"पण त्या आधीचं, गणित, विज्ञान वगैरे?" आजींचे मुद्द्याला हात घालणारे प्रश्न येत होते.
"ते आधी मराठीतच शिकले. गणिताला काही फारशी भाषा लागत नाही. विज्ञानातल्या संज्ञांचे शब्द मात्र नव्याने शिकायला लागले. पण फार काही अवघड नव्हतं ते."
"पण मग आधीपासून इंग्लिशमध्ये शिकली असतीस तर सोपं गेलं असतं ना."
"अं ... काही शाळांत शिकवतात तसं. विज्ञान, गणित इंग्लिशमध्ये आणि बाकी विषय मराठीत. पण आमच्या शाळेत सोय नव्हती. आणि एबीसीडी शिकून थेट इंग्लिशमध्ये एखादा विषयच शिकायचा तेही अवघडच जाणार थोडं."
"लिपी कोणती वापरतात मराठीसाठी?" विषयाचा रूळ बदलण्याचा आजींचा वेग भारी होता.
"देवनागरी. मूळ संस्कृतची लिपी. जशी इंग्लिशची रोमन."
"हम्म. म्हणजे ही अगदी अख्खी भाषा आहे म्हणायची."
"हो मग!"
"किती दिवस टिकणार तशी..."
"म्हणजे!? लाखो लोक बोलतात ही भाषा. साहित्यनिर्मिती होते. न टिकायला काय!"
"पण उपयोग काय?"
"आँ!" मी अवाक्.

"आता बघ, मी ट्युनिशियाला होते काही वर्षं. तर तिथे आमचे शेजारी बर्बर भाषा बोलत."
"ओह! हो, माहितेय मला. पण बर्बर भाषेला लिपी नाहीये ना? फ्रेंच किंवा अरबी भाषेत लिहायचे व्यवहार करतात ना ते?" चला, बर्बर घरमैत्रिणीच्या कृपेने आजींसमोर आपण काही अगदीच 'हे' नाही हे दाखवता आलं.
"तेच ना. तर ते त्यांच्या घरात कायम बर्बर भाषेत बोलणार. वयाच्या सातव्या वर्षापर्यंत मुलांना केवळ तीच एक भाषा येते. आणि शाळेत गेल्यावर अचानक सगळे अरबी भाषेत. हाल होतात गं मुलांचे खूप. मी म्हणायची त्यांच्या आयांना, कि घरात थोडं अरबी बोला. मुलांना सवय करा. पण नाही! भाषा हरवून जाईल म्हणे!"
"पण खरंच आहे ना ते", माझ्या डोळ्यासमोर मुलांना गणपतीची आरती शिकवणारे अनिवासी मराठी आईबाबा, "एक भाषा म्हणजे एक संस्कृती असते म्हणतात. जपायला नको का ती? लिपी नसली तरी त्यातली गाणी, वाक्प्रचार ..."
"पण काय उपयोग!" आजींनी बस थांबवण्याचं बटण दाबलं. "एक दिवस जाणारच आहे ना ते सगळं. दरवर्षी सहाशे भाषा गतप्राण होतात म्हणे. त्या कोवळ्या मुलांना द्यायचं का हे मरू घातलेलं ओझ? का उगाच?"
"..." मी काही प्रत्युत्तर द्यायच्या आत त्या उठल्या.
"इतिहास, संस्कृती सगळं वाहत्या नदीसारखं आहे." खिडकीपलिकडच्या न दिसणार्‍या नदीकडे हात करत त्या म्हणाल्या. "थांबून उपयोग नाही."
बस थांबली आणि त्या भराभर उतरून गेल्या.

---
या आजी भेटून दोनेक आठवडे झाले. माझी ती इंका टोपी बघितली की त्यांची आठवण होते. एकदाच भेटल्या त्या. पण डोक्यात किडा सोडून गेल्या. बसमधल्या पाच दहा मिनिटातल्या गप्पा. त्यांच्या विषय बदलण्याच्या वेगावरून, हा त्यांचा आवडता मुद्दा असावा असं मला फार वाटलं. बस थांबायच्या आत चर्चेचा हवा तसा शेवट व्हावा हा त्यांचा हट्टही उघडच होता. पण तरी त्यांच्या किंचित थरथरत्या आवाजातलं, "आफ्टर ऑल इट्स गॉट टु गो" विसरण्यासारखं नाही.


छान लिहिलंस मृदु. लिहीत रहा.



छानच लीहीलयस म्रुदू.

माझा एक मित्र आहे ट्युनीशीयन त्याला आता विचारल "तूला येते का बर्बर"
"नाही"
" तूझ्या वडिलांना?"
"नाही"
"आजोबांना?"
" नाही. बर्बर जून्या लोकांची भाषा आहे (लॅटीन सारखी). फक्त बोली भाषा. अल्जेरीया आणि मोरक्को मध्ये थोड्या प्रमाणावर बोलतात.पण ट्युनीशीया मध्ये जवळ जवळ नाहीच"

खरच विचार करण्यासारख आहे. आपली संस्क्रुत आणि आपली मराठी. खूप जपायला हवीये अरेरे



मृदु, तुझ्या डोक्यातला किडा आता आमच्या डोक्यात सोडलास ना... छान लिहिलं आहेस. शिक्षण इंग्रजीतून झालं तरी घरच्या घरी मुलांना मराठी लिहा - वाचायला शिकवणं एवढं अवघड नाही. दरवर्षीच्या त्या ६०० भाषांमध्ये आपली मराठी कधीच येऊ नये हीच इच्छा.



फारच सुन्दर लिहुले आहे. प्रसन्ग अगदी दोल्यासमोर उभा राहतो आहे. फ्लो चान्गला जमला.
हे असेच चित्र आता आपल्याकदेहि बघायला मीलते. १८ - २५ या वयातिल किति मुल आवर्जुन मराथि बोलतात? वाचतात?



आजींना नक्की काय म्हणायचे होते? आपण मराठी टिकवायचा प्रयत्न नाही करायचा? मग जगभर फक्त ईंग्रजीच बोलली गेली पाहीजे का? अजूनही असे कितीतरी देश आहेत जिथे सर्व शिक्षण, कारभार, सरकार, सर्व सर्व काही फक्त त्यांच्या स्थानिक भाषेतुनच होतं.
मराठीचे म्हणाल तर ... मला त्यामध्ये बरीच प्रगती दिसते... मराठी वाहिन्या आल्या आहेत. मराठी चित्रपटांचाही दर्जा आणि प्रेक्षक वाढले आहेत. हिंदी क्षेत्रात सुद्धा पुरस्कार देउन त्याचे अस्तित्व मान्य केले आहे. मराठी ऑनलाईन वृत्तपत्र, फॉन्टस, ब्लॉग्स आहेत.

आणि भाषेचं ओझ म्हणजे काय?

लेख छान लिहीला आहे आणि विचार करण्याजोगा आहे, पण मराठी विषयी किंवा कोणत्याही भाषेविषयी अश्या प्रकारचा आजींचा निराशाजनक दृष्टिकोन खटकला.

ईंग्रजी भाषेची संस्कृती काय आहे आणि ती कितपत जपली जाते? त्यांच्या भाषेत शिव्या घाणरडे शब्द किती सहजगत्या बोलल्या जातात. फक्त पुरुष नाही तर बायकासुद्धा. टिव्ही, चित्रपटामध्येतर आहेच, पण कामावर सुद्धा सहकर्मचारी असे बोलताना मी बर्याच वेळा ऐकतो.

जी लोकं आपला देश सोडून इतर ठिकाणी राहतात त्यांच्यासाठी. आपण फक्त आपल्याच नाही तर ईतर भाषांचा ही मान केला पाहीजे. मग सर्व भाषा टिकतील. मुलांसमोर जर दोन्ही भाषांना समान मान दिला गेला, दोन्ही संस्कृतीला समान मान दिला गेला तर तीसुद्धा आपली संस्कृती जपतील. पण आपण फक्त आपलीच भाषा आणि देश महान असे दाखवले तर त्याना ते पटणार नाही.



आजींना नक्की काय म्हणायचे होते हे मलाही नक्की माहित नाही. त्यांच्या ट्युनिशियाच्या उदाहरणातून असे वाटले की एखादी भाषा कारभारासाठी, शिक्षणासाठी वापरात नसेल तर तिला पुढे चालवण्यात फारसा अर्थ नाही. अल्जीरिया, ट्युनिशिया, मोरोक्को या देशात इस्लामी कायदा आहे. त्यामुळे अरबी ही (देवाची, प्रेषिताची इइ) एकमेव महत्त्वाची भाषा आहे. फ्रेंचांच्या आक्रमणामुळे, किंवा युरोपाच्या आकर्षणामुळे फ्रेंच शिकवली नि शिकली जाते. आणि जागतिकीकरणाच्या लेबलाखाली इंग्रजीही. तर यात बर्बरसारख्या बोलीचे स्थान कुठे? तर केवळ घरात. तेही आता कमी होत चाललेच आहे. माझ्या बर्बर मैत्रिणीला विचारल्यास तिची घरात बोलायची भाषा बर्बर, फ्रेंच आणि अरबीचे मिश्रण आहे. जर सातव्या वर्षानंतर शिक्षणात बर्बरचे स्थान कुठेच नसेल तर ती का शिकावी. पुढच्या आयुष्यात उपयुक्त भाषा शिकली तर आणखी चांगले नाही का? असा आजींचा मुद्दा होता.

मला त्यातून 'पहिलीपासून इंग्रजी' आठवले आणि मग बर्बर जात्यात तर मराठी सुपात आहे की काय असे वाटून अस्वस्थता आली.

मी दहावीपर्यंत मराठीतून शिकले. पण भारतात माझ्याबरोबर काम करणार्‍यांत (म्हणजे ५०-१०० लोकांत) स्थानिक भाषीय माध्यमातून शिकलेला केवळ एक माणूस मला भेटला आहे. मी पहिलीत गेल्याला पंचविसेक वर्षे झाली. अजून पंचवीस वर्षांनी काय चित्र असेल? खेडोपाडी इंग्रजी माध्यमाच्या शाळा? मग मराठी किंबहुना कानडी, तमिळ अशा सगळ्याच भारतीय भाषांचे बोलीभाषेत रूपांतर व्हायला किती काळ लागेल? आणि मग बर्बरच्या माळेत जायला किती? अशा काळजीत पाडणार्‍या विचारांनी गर्दी केली, म्हणून मग डोक्यातला किडा इतरांनाही द्यावा या हेतूने हे सगळे संभाषण इथे लिहिले. या आशेने की कोणी असे होणार नाही असे म्हणेल, थोडी कारणे देईल, सिद्ध करून दाखवेल.



तसं बघितलं तर मालवणी मा़झी मातृभाषा म्हणायला हरकत नाही, पण आधीच्या पिढीपासून मुंबईत राहिल्याने तिच्याशी नाळ जुळली नाही. आता तर ती जेमेतेम समजते एवढेच.
कामाच्या निमित्ताने, अरबी, स्वाहीली, फ्रेंच थोडेफार शिकलो. पण आता काही कारण उरले नाही.
मराठीशी संबंध मात्र केवळ मायबोलीमुळे टिकुन राहिला.
तो धागा मात्र कधी सोडणार नाही.



उम्मीदसे दुनिया कायम है |
अजून बरेच देश आहेत जिथे कारभारासाठी आणि शिक्षणासाठी स्थानिक भाषा वापरली जाते... पण दुर्दैवानी भारतात नाही.. निदान उच्च शिक्षण नाहीच. आपल्यालाच आपली भाषा बोलायला ते सुद्धा मुंबईत असून लाज वाटणं (कुठेतरी वाचलं होतं) हा मुर्खपणा आहे.
पण पुढे काय होणार हे कसं कोण सिद्ध करेल? आपल्याला मराठी भाषेची गोडी आहे आणि आपण त्याचा आनंद लुटायचा... पुढच्या पिढीवर लादायचं नाही ... त्याना पण आपसूक गोडी लागून द्यायची. कोणतीही गोष्ट जबरदस्तीने होत नाही.



विषयांची निवड आणि वैचारिक संवेदना आवडली.