बरेच काही

बरेच काही

वाटलं तुझ्या मिठीचे पडदे ओढून घेतले
झाकायला आतले सारे-
विस्कटलेले.. उचकटलेले..
अन बरेच काही

वाटलं तुझ्या मूक सम्मतीचे पैंजण लेवून घेतले
ऐकायला आतले नाद-
किणकिण.. कुणकुण..
अन बरेच काही

वाटलं तुझ्या नागव्या स्पर्शाचे सर्प विणून घेतले
टाकायला रोज कात-
नात.. गोत..
अन बरेच काही

वाटलं तुझ्या नजरेचे डोह भरून घेतले
बुडवायला सर्व काळ-
काल.. आज...
अन बरेच काही

वाटलं तुझ्या श्वासांचे कतरे वेचून घेतले
झुलवायला रोज एक-
जन्म.. मृत्त्यू...
अन बरेच काही

वाटलं तुझ्या नसण्याचे भास कोरून घेतले
विसरायला पुन्हा सारे-
मि.. तू...
अन बरेच काही

तरिही वाटतं
उरेल वाटण्यासारखे तुझे-
आत... बाहेर..
अन बरेच काही

Submit to kanokani.com

मस्त ....मिठीचे पडदे, नजरेचे डोह खास !