सहानुभूतीची अनुभूती जुळून आली प्रीती
जन्म जन्म वाहिली; उसळली सुप्त अचानक भरती
विस्मय; युगे युगे सरली; तेवती राहिली पणती
परस बदलले शीण सोसले परी न विझली नाती
अभ्यंग नाहिली स्नेहभेट डोही आनंद विभूती
अभंग भक्ती ओढ जिवांची; नव्हती ती आसक्ती
अर्थ भाव सण एक सुरांचे मधुमिलींदसम तृप्ती
विरघळले अस्तित्व द्वैत अन शब्द जाहले नृपती
-----------------------------------------
स्वप्नभंग तडिता वास्तव अवचित अवतरली भीती
बंधनात अडकल्या; वेढल्या पुन्हा कुडाच्या भिंती
कुणी म्हणावे का; हे चुकले वा चुकली ही नियती
निरुद्देश उठलेले होते तरंग पृष्ठावरती
ते क्षण कांही घनआशयगर्भ लोपले क्षितीजावरती
क्रमू लागली रात्र उद्याच्या अभिलाषेवरती
....................अज्ञात


देवा नाही झेपली.
सुरेख सुखस्वप्न तरंग !
कमालीचे लिहिता आपण. छान.
काही सुत्र लागले नाही..... जर उलगडुन सांगता का?
प्रकाश आणि अलका,
आपल्या प्रतिसादांमुळे मला जरा धीर आला.
बूमरँग आणि विशाल,
एका विस्तृत भावविश्वाची ही अल्पशी मिमांसा आहे ज्यातून प्रत्येक इसम केंव्हा ना केंव्हा जात असतो. आपल्या अपेक्षेचा अनादर होऊ नये म्हणून ही उकल करण्याची उठाठेव-------
कुठेतरी स्वभावानुरूप सहानुभूती दाखविली जाते आणि नकळत तिचं मैत्रीत रूपांतर होतं. अचानक आलेली प्रीतीची ही भरती तत्कालीक नसून जन्मोजन्मीच्या ऋणानुबंधांचा स्त्रोत असल्याची जाणीव ही अनुभूती करून देते. अशी नाती ही क्षणिक नसून जागा; जन्म; योनी; गण; गोत; लिंग; वेष; प्रदेश बदलूनही शाबूत राहिलेले अनुबंध असावेत ह्याची आश्चर्यकारक प्रचिती येते.
प्रचंड ओढ निर्माण झालेल्या दोन जिवांची घडलेली स्नेहभेट (अस्पर्श ओळख) ही एका अभंग आसक्तीविरहित अभ्यंग अमृतस्नानाचा अनुभव देते. यातील कमलपुष्पाशी एकरूप झालेल्या भृंगाप्रमाणे काया वाचा मन बुद्धी यांचं अद्वैत; विचारांना /शब्दांना राजयोग प्रप्त करून देतं आणि राजस कथा कल्पना काव्य जन्माला येऊ लागतं.
......................................................................................................................
मात्र वास्तवात ह्या निर्व्याज मैत्रीचे आणि त्यातून निर्माण झालेल्या अवस्थांचे विपरित पडसाद उमटू नयेत म्हणून दोघेही कर्तव्यभावनेने आपापल्या संसाराच्या नैतिक बंधनात पुन्हा गुरफटून जातात.
त्या दोघांचे अथवा नियतीचे; यांत कांही चुकले होते, असे त्यांनी किंवा इतर कुणीही म्हणू नये, कारण दोघांच्याही मनःपटलावर काळानुरूप उमटलेले हे निरुद्देश सहजतरंग होते.
त्या तरल अवस्थेत जगलेले सारेच घनआशयगर्भ क्षण आता असीम क्षितिजापलिकडे लोप पावलेत आणि रात्र; उद्याच्या नव्या उदयाच्या आशेवर; आपला मार्ग क्रमीत आहे.
.........अज्ञात