जर....तर!!

आले जर आभाळ हातात,
अन आला जर चंद्र हाती..
तर...करीन मी पायपुसणे; आभाळाचे,
तर हिणवीन चंद्राला; मुठीत घेऊन
म्हणत...या सहजसाध्य वाटणार्‍या, बाहुलीसारख्या
जर तरला; जाऊ सहज ओलांडून
आणि करू स्पर्श स्वप्नांच्या लखल्खत्या चंद्राला
या शैशवी भ्रमात जगतांनाच,
अचानक....
होत गेले मोठे; कणांएव्हढे वाटणारे जर, तर
अगदी डोंगरांएव्ह्ढे, आणि
मी अगदीच क्षुद्र, एवढुशी त्यांच्यापुढे; मुंगीएव्हढी
वाट काढीत, पराभूत आयुष्यासह.... बेचकीतून
ईतर मुंग्यांसोबत, त्या विराट जर, तरच्या;
प्रयत्न करीत त्यांची नजर चुकवण्याचा
आणि ते जर, तर हसत मला..कुत्सितपणे
सूड उगवीत पुरेपूर माझ्या निरागस आत्मविश्वासावर
आणि मी...मुसमुसत, चडफडत; त्या
अजिंक्य, अजेय जर, तरवर
निराशेने पाहात काळोखून;
दूरवरच्या माझ्या लखलखत्या स्वप्नांना
पण.......
आहे मनात अजूनही; पंखहीन परीची आशा
की... येईल कोणीतरी , घेउन माझ्यासाठी पंख
जर मी असेन लाडकी दैवाची; कदाचित..
तर,
घेईन मी भरारी; या आभासी उंच जर, तरच्या पल्याड
उंच, उंच्.......दाखवित वाकुल्या त्यांना
आणि, घेतील मला मिठीत स्वप्नं माझी;
प्रेमभरे...पाकळ्यांसारखी
जोजवित मला, करीत शिंपण, पखरण
मुलायम,शाश्वत सुखाची माझ्यावर,
आणि होतील नतमस्तक
हे गर्वोन्नत जर, तर माझ्यापुढे
पण.....खरंच
येईल का कोणी पंख घेऊन; माझ्यासाठी?
आणि नाही आले तर??
नाही, नाही... जर मी असेल लाडकी दैवाची
तर......
ओह........ अरेरे!!
हे पण अवलंबून जर, तरच्या मनावर?
च्च च्च!!

Submit to kanokani.com

जमली स्मित

खुप छान जमलीय.. !!!
सर्वच जगणं अडकलेले असते या जर तर मधे.. तरीही.. इच्छाशक्ती अन दैवाच्या बळावर.. पार होतिल सर्व जर..तर.. छान मांडलस.. !!!

जर मलाही असे लिहिता आले तर......च्च च्च!

जर..तर.. अ ओ, आता काय करायचं

छान जमली

मस्तच!

छान जमलीय!!

शरद

उमेश... जर.. तर... शेवटी हे असच आहे तर ! स्मित
कविता आवडल्ई.

स्मित छान विचार करतोस बाबा तू. स्मित

पण ही जर तरची कुंपणे विचारांना हवीत कशाला? महारथी कर्ण म्हणतो, 'दैवायत्तं कुले जन्मं, मदायत्तं तु पौरुषम्' (जन्म कुठे घ्यावा हे दैव ठरवत असले तरी कर्तृत्व तर आपल्याच हातात आहे ना?')
एक कविता आणि उमेश तुझा स्वतंत्र विचार म्हणून स्वागत, पण माझे मन कवितेतील अगतिकतेशी नाही तादात्म्य पाऊ शकत. सॉरी बॉस. पण तुम्हाला अभिप्रेत असलेले जर मला कळले नसेल तर उलगडून सांगा.

जर्-तर चा संभ्रम छान पकडलायस.

धन्यवाद विशाल योग्य ती दुरूस्ती सुचविल्याबद्दल. धन्यवाद चेतना, राहुल, वार्‍या, पल्ली, शरदजी, योगेश, अज्ञातजी, सुमतीजी, रूपाली, वैशू.
योगेश, ही जर...तरची अगतिकता अपरिहार्य आहे; मानवी जीवनाची आणि मनाची पण. स्वतः महारथी कर्णाचा जीवनपट पण जर, तरच्या हिंदोळ्यानेच त्रस्त आहे. जर कुंतीने दुर्वास ऋषींनी दिलेला इष्ट देवतांपासून पुत्रप्राप्तीचा मंत्र विवाहानंतर सूर्यदेवतेसाठी स्मरला असता तर?...... जर कर्णाची कवचकुंडले ईंद्राने दान मागितली नसती तर?... जर द्रौपदी स्वयंवरप्रसंगी कर्णाला संधी मिळाली असती तर?....
अगदी महाभारतातील भीष्मांच्या या वाक्यापासून,' जर भगवान कृष्ण पांडवांसोबत नसता तर एकाच धनुष्याने पाचही पांडवांना लोळविले असते'...तर अगदी मेट्रीक्स या चित्रपटातील प्रकांड तत्वज्ञानापर्यंत की,' आपल्या सर्व हालचाली, क्षमता या कोणीतरी आधीच नियंत्रित करून ठेवल्या आहेत.' 'जर त्या तशा नसत्या तर?'....
थोडक्यात आपला उद्याचा दिवस आणि आपले जीवन हे या जर आणि तरवरच अवलंबून आहे. मानवी मनदेखील या जर आणि तरच्या कार्यकारणभावावरच आशाळभूतासारखे टपून आहे. त्यामुळे आपण आपल्या कर्तुत्वामुळे कितीही या जर, तरला गृहीत धरले तरी या जर, तरला गाठणे, मनाप्रमाणे गुलाम करणे शक्य नाही. तीच अगतिकता आणि या जर.. तरच्या मर्जीतून मुक्त होण्याची दुर्दम्य ईच्छा असे काहीसे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. कदाचित पूर्णपणे उतरले नसावे.