Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through June 07, 2007

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » अधिक - ज्येष्ठ » काव्यधारा » मराठी गज़ल » Archive through June 07, 2007 « Previous Next »

Pulasti
Wednesday, May 23, 2007 - 4:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"ओल"

मनी काय होते, जनी काय केले?
तुम्ही येउनी या जगी काय केले?

तसा दोष असतो कधी हो कुणाचा
तरी प्रश्न उरतो - कुणी काय केले

मला वेगळा काय पर्याय होता?
तरी वाटते - हाय मी काय केले!

पुन्हा कोपर्‍यातून आवाज आला
"तुम्हाला कधी मी कमी काय केले?"

मला श्रेय मिळते - भल्याचे, बुर्‍याचे
स्मरेना खरे मी कधी काय केले

खरे चेहरे का कधी पाहिले मी
कसे ओळखावे - कुणी काय केले

तसा काळजाला बरा ओल आहे
विचारू नका पण तरी - काय 'केले'

-- पुलस्ति

Swaatee_ambole
Wednesday, May 23, 2007 - 8:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आभाळा, गज़ल चांगली जमली आहे. मतलाच त्यामानाने फिका वाटला. आणि उखाण्याचा शेर तर मला कळलाच नाही. नक्की काय सांगायचंय? शिवाय तो ' कश्या भावनेनी' वाचायचा हे सांगावं लागलं हे काही बरोबर नाही, नाही का? :-)
पत्थरांचा शेरही वाचताना खूप आकर्षक वाटतो, पण दृष्टांत नीट लागू होत नाही असं माझं वैयक्तिक मत. तुला काय अर्थ अभिप्रेत आहे ते सांगशील का?

पुलस्ति, गज़ल छान आहे ( आणि तशी काळजाला बरी ओल आहे ) हे सांगून झालंच आहे. :-)


Devdattag
Thursday, May 24, 2007 - 3:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>पुन्हा कोपर्‍यातून आवाज आला
"तुम्हाला कधी मी कमी काय केले?"
आवडला..:-)


Mankya
Thursday, May 24, 2007 - 3:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुलस्ति .. मस्त उतरलिये !
कोपर्‍यातून .. आवडला !
काळजाला .. मस्तच !

माणिक !


Shyamli
Thursday, May 24, 2007 - 3:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तसा दोष असतो कधी हो कुणाचा
तरी प्रश्न उरतो - कुणी काय केले >>>
क्या बात है, आवडलं

मला वेगळा काय पर्याय होता
तरी वाटते - हाय मी काय केले?>>
मस्तच....
आवडली गझल, सहज आणि सोपी :-)


Mayurlankeshwar
Thursday, May 24, 2007 - 4:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाहवा! पुलस्ति.. सहज सुंदर गझल...
प्रत्येक शेर आवडला...

स्वाती...
मतला 'त्यामानाने' म्हणण्यापेक्षा खरोखरच फार फिका आणि मचूळ आहे.
मतल्याविषयी मी अजून झटतोय. खरे तर मतला सोडून सगळे शेर आधी लिहिले आणि नंतर मतला लिहिला ह्यावेळी!

उखाण्याचा शेर अतिशय सहज आणि साधाच आहे. तो 'कश्या भावनेने' वाचायचा हे केवळ गंमत म्हणून सांगितले आहे. 'हजारो' रदीफ मुळे.
----------------------------------------------------
तुझे ओठ पोरी किती लाल झाले!
-- तुझ्या ओठांवर ही नवेपणाची आकर्षकता आली आहे. 'किती' म्हणूनच वापरले आहे..'कसे' म्हटल्यावर प्रश्नार्थक झाले असते. तुझे ओठ आकर्षक होतेच..पण आता एक वेगळाच बाज आणि वेगळ्या आयुष्याचा रंग त्यांना लाभलेला आहे. हे कोणतं नवं आयुष्य? तर...
-कधी चुंबिले तू उखाणे हजारो?

अजून एक...
उगा माणसांची नको खूण शोधू
गवसतील पत्थर पुराणे हजारो

शेर तसा Complicated आहे.
मानवी संस्कृतीचा शोध घेण्याचा ध्यास... आणि त्यातून गवसलेले काळाच्या उदरात गडप झालेले पुरावे... ह्या एका अर्थाने हा शेर
'पुरातत्व खात्याचा स्लोगन' वाटेल कदाचित... पण विराट संस्कृतीची चिरंतनता दाखवायचा प्रयत्न केला आहे.
अजून एक नेहमीचा अर्थ म्हणजे... माणसांचा शोध घेण्यास जाशील आणि जुने पुराणे दगडच गवसतील.. 'माणूसपण' राहिलं नाही हा अर्थाने नेहमीचा गळा काढणारा शेर.
मला अभिप्रेत असलेला दृष्टांत पहिल्याच अर्थाचा.
-धन्यवाद :-)






Mankya
Thursday, May 24, 2007 - 5:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मयुरा .. बदल बघ बरं कस वाटतोय .. मीटर मात्र नीट बघ कारण त्याची मला ईतकि जाण नाही !
जमीनही व्यवस्थित निभावून नेतोय बदल अस मला वाटतय !

इथे जीवनाचे दिवाणे हजारो
अधाशी मनाचे बहाणे हजारो

बदल करून

इथे जीवनाचे दिवाणे हजारो
अधाशी मृत्यूचे बहाणे हजारो

स्वाती .. तू ही सांग गं !

माणिक !


Mayurlankeshwar
Thursday, May 24, 2007 - 5:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणिक...
'मृत्यूचे' हे 'गागागा' असे होईल...
'मृ' वर पुढच्या 'त्यू' मुळे जोर येतोय... म्हणून 'मृ' हे 'गा'...


Swaatee_ambole
Thursday, May 24, 2007 - 1:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

' नवेपणाची आकर्षकता..' - हं.. हे नव्हतं आलं ध्यानात माझ्या. धन्यवाद. :-)

पत्थरांच्या शेरात

>>>> पण विराट संस्कृतीची चिरंतनता दाखवायचा प्रयत्न केला आहे.
अरे, मग संस्कृती म्हटलंस तर ती essentially माणसाचीच खूण नाही का? ' संस्कृतीत' ' माणुसकी' नसते का?

सॉरी, कदाचित मी उगीचच अती कीस काढत्ये. पण मला खरंच नाही समजलं.
तुझा दृष्टीकोन स्पष्ट केल्याबद्दल मनापासून आभारी आहे. :-)


Mayurlankeshwar
Thursday, May 24, 2007 - 1:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वाती... ह्म्म्म !! संस्कृतीत' ' माणुसकी' असणं Not necessary ... किंबहुना बर्‍याच वेळा हा विषय वादग्रस्त.
-धन्यवाद :-)


Mayurlankeshwar
Friday, May 25, 2007 - 3:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अभ्यास

आता मला गवसला आभास आसवांचा
दडपून ठेविला मी जो श्वास आसवांचा

मज कोडग्या मनाने जगणे पसंत नाही
वाटे हवाहवासा मज त्रास आसवांचा

रेखाटतो सुखाची मी रंगहीन चित्रे
डोळ्यांत रंग भडके सर्रास आसवांचा

पत्रात भेटल्या मज फिक्कट अबोल ओळी...
ताजाकलम असावा त्या खास आसवांचा

एकादशीस विठ्ठल आला घरात माझ्या
मी सोडला कधीचा उपवास आसवांचा

जगण्यास जे परीक्षा संबोधतात त्यांनी
केला कधी पुरेसा अभ्यास आसवांचा?


Swaatee_ambole
Wednesday, May 30, 2007 - 2:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा! ताजा कलम आणि परीक्षा मस्त!

Vaibhav_joshi
Thursday, May 31, 2007 - 5:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुलस्ति

गज़ल छान आहे .

मयूर
स्वातीशी सहमत .
मतला संदिग्ध वाटला .

मज कोडग्या मनाने जगणे पसंत नाही
वाटे हवाहवासा मज त्रास आसवांचा

छान

रेखाटतो सुखाची मी रंगहीन चित्रे
डोळ्यांत रंग भडके सर्रास आसवांचा

भडके ला काही पर्याय नाही का ?

एकादशीस विठ्ठल आला घरात माझ्या
मी सोडला कधीचा उपवास आसवांचा

नाही पोचला .

पत्रात भेटल्या मज फिक्कट अबोल ओळी...
ताजाकलम असावा त्या खास आसवांचा

जगण्यास जे परीक्षा संबोधतात त्यांनी
केला कधी पुरेसा अभ्यास आसवांचा?

खास


Devdattag
Tuesday, June 05, 2007 - 8:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रान होते आसवांचे भेटले शब्दात सार्‍या,
राहिल्या ओल्याच गोष्टी शेवटी वणव्यात सार्‍या

जाणिवा माझ्या पुसोनी, मोकळे जगण्यास झाले,
जाणिवा त्यांच्या तश्याही का कुठे उरल्यात सार्‍या?

ओढण्या अंगावरी देऊ कुणाला काय आता?
चादरी माझ्या मलाही तोकड्या झाल्यात सार्‍या

भूक त्यांची एकट्याची का कधी होती अधाशी?
वाढण्याआधी पुरेसे, पंगती उठल्यात सार्‍या

बोलला तो देव होता,"कामिनीचा जन्म आता"
कामना तेंव्हाच होत्या जाळल्या गर्भात सार्‍या



Moderator_2
Tuesday, June 05, 2007 - 5:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Mansmi18 ,
हा विभाग स्वताः लिहीलेल्या मराठी गझलांसाठी आहे. तेव्हा तुमचे पोष्ट काढुन टाकण्यात आले आहे.


Sanghamitra
Tuesday, June 05, 2007 - 5:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मयूर सुरेख गज़ल. त्रास आवडला. :-)
ता.क. आणि परिक्षा तर निर्विवाद.
देवदत्ता चादरींचा शेर छान आहे.


Vaibhav_joshi
Wednesday, June 06, 2007 - 11:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



हितशत्रू ....



शंकांचे वादळ मागे हटले आहे
प्रश्नांना उत्तर नसते ! पटले आहे

काहीच कधी उल्लेखनीय ना घडले
आयुष्य अश्या घटनांनी नटले आहे

होकार तुझा हलकेच बजावून गेला
" समजूत काढण्यापुरते म्हटले आहे "

पाऊस तिच्या डोळ्यांच्या देशी पडला
अन इंद्रधनू इथले विस्कटले आहे

हितशत्रू माझा कोण कसे सांगावे
माझ्यावरती काळीज उलटले आहे

तन श्वास घ्यावयासाठी रोजच लढते
मन श्वास सोडण्यासाठी झटले आहे

चाहूल तुझी प्रियतमेपरी रे मृत्यो
येण्याआधी पाऊल उमटले आहे


Mankya
Thursday, June 07, 2007 - 2:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जियो वैभवा .. व्वाह ! अप्रतिम !

एक एक शेर भिडतोच कसा मनाला !
मतला .. प्रश्नांना उत्तर नसते .. वा !
उल्लेखनीय .. खूप वेळा अस वाटून जातं खरं ! मांडणी छानच !
होकार .. आवडला !
पाऊस .. तसा पोहोचला आहे व्यवस्थित तरी एकदा तूझ्याकडून एकायला आवडेल आशय !
श्वास .. हा जबरदस्तच ! हा मुकुटमणि या रचनेचा !
( एक शंका, ' झटले ' एवजी ' झटते ' केलं म्हणजे काळ व्यवस्थित साधला जाईल का ? चु. भु. दे. घे. )
शेवटचा शेर .. class!! तरी ह्यातही तुझा दृष्टीकोन समजून घ्यायला आवडेल !
' मृत्यो '... शब्द खूपच आवडला !

माणिक !


Devdattag
Thursday, June 07, 2007 - 3:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरं सांगू वैभव.. पहिल्या वाचनात नाही भिडली एकदम..
पण आज सकाळी परत वाचली तेंव्हा आवडली..
विशेषत: खालचा शेर काल अगदीच साधा वाटला होता
काहीच कधी उल्लेखनीय ना घडले
आयुष्य अश्या घटनांनी नटले आहे
पहिल्या ओळीचे दृगोच्चर करण्यासाठी दुसरी ओळ असं वाटलं होतं.. पण आज वाचल्यावर अजून काही अर्थ लागले..:-).. छान

अजून एक.. हे वृत्त कुठलं?
मात्रा वृत्त आहे का?
का
गा गा गा गा गा गा गा गा गा गा



Vaibhav_joshi
Thursday, June 07, 2007 - 5:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणिक , देवा धन्यवाद

माणिक ...

तन श्वास घ्यावयासाठी रोजच लढते ही एक सतत सुरू असणारी प्रक्रिया आहे आणि मन श्वास सोडण्यासाठी झटले आहे म्हणजे मनासमोर ते एक आणि केवळ एकच उद्दिष्ट आहे या अर्थाने तो शेर आलेला आहे .

पाऊस मध्ये विरोधाभास आणण्याचा प्रयत्न केला आहे . खरंतर जिथे पाऊस असतो तिथेच इंद्रधनुष्य पहायला मिळते पण हा पाऊस तिच्या डोळ्यांच्या देशात पडला आहे आणि हे इंद्रधनुष्य म्हणजे त्याच्या डोळ्यातली रंगीबेरंगी स्वप्नं आहेत . आज असा पाऊस पडला आहे ( कदाचित शेवटचा ) की पुढील अटळ परीणामांची कल्पना येऊन त्याचे इंद्रधनुष्य विस्कटले आहे .

शेवटच्या शेरात आपल्याला अत्यंत प्रिय ज्या व्यक्ती असतात त्यांच्याबाबत आपले ( instincts ) जास्त संदेश देत असतात ( असा माझा अनुभव आणि मत )
. पाऊल उमटले आहे ही एक प्रतिमा आहे . तुझ्या येण्याच्या बाबतीत मी इतका आतूर आहे की मला तू येण्याआधीच तुझी चाहूल लागली आहे इतकाच त्याचा अर्थ .

देवा ...

गज़ल पहिल्या वाचनात न भिडलेलं कळवल्याबद्दल शतशः धन्यवाद . कारण मला त्या दृष्टिकोणातून विचार करता येईल . दुसर्‍यांदा वाचाविशी वाटल्याबद्दल व दुसर्‍या वाचनात आवडल्याचे कळवल्याबद्दल आभारी आहे . माझ्यामते तरी ह्यातील कुठलीही ओळ अतिरिक्त वाटली नाही ( कदाचित म्हणूनच लोकांसमोर ठेवली गेली ) अर्थात तुला आता वेगवेगळे अर्थ लागले आहेतच तरीही काही शंका असल्यास जरूर मेल करणे वा इथे विचारणे





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators