Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
रंगसंगती

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » वैशाख » ललित » रंगसंगती « Previous Next »

Mrinmayee
Thursday, April 19, 2007 - 2:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"आल्या आल्या चित्रे बाई आल्या!!!"
शारदा ओरडली आणि अख्खा वर्ग चिडीचुप्प झाला. मग आमचं सगळ्यांचं एकमेकींकडे बघून गालातल्या गालात हसणं सुरु झालं.
"बबे, ओळख आज बाईंनी कुठल्या रंगाची साडी, ब्लाउज आणि परकर घातला असेल!" शारदानी हळूच विचारलं. पण बबीच्या उत्तरा आधीच बाई वर्गात आल्या आणि आमचं नेहमीच्या सवयीप्रमाणे त्यांच्या बोलण्यापेक्षा त्यांच्या अत्यंत विसंगत रंगसंगतीकडे निरखून बघणं सुरु झालं.
चित्रे बाई आम्हाला ईंग्रजी शिकवायच्या. कायम हसत असायच्या. बरंच गमतीदार बोलायच्या आणि दर तासाच्या शेवटी, "काय पण दात काढता गं तुम्ही.. आचरट कार्ट्या!!!" असं काहीसं बोलून वर्गाबाहेर पडायच्या.
शाळेच्या सगळ्या शिक्षकांमधे बाई आपल्या अखंड हसण्यानी, मुख्य म्हणजे अगम्य रंगसंगतीच्या कपड्यांनी आणि एकूणच पेहेरावातल्या बेंगरूळपणानी उठून दिसायच्या. देखण्या असल्या तरी रहायच्या अगदी गबाळग्रंथी! पातळ केसांची अगदी शेवटच्या टोकापर्यंत गुंफलेली वेणी, नेहमी तिरकं लागलेलं कुंकु, बारक्या देहावर एक ढगळं ब्लाऊज, साडी फिकी हिरवी असली की परकर गडद जांभळा, तोही साडीखाली चार इंच तरी दिसायचा. ब्लाउज अशावेळी निळ्या रंगाचं. पायात हवाई चप्पल आणि पर्स कधीच नाही, हातात कायम एक शबनम बॅग. अशा थाटात येणार्‍या बाईंची बहुतेक इतर शिक्षकही थट्टा करायचे पण चित्रे बाईंनी कधी रागावून उत्तर दिल्याचं बघीतलं नाही. त्या छान शिकवंत असाव्यात. पण आम्हा कार्ट्यांचं सगळं लक्ष त्यांचं हात वारे करत बोलणं, त्यांची साडी, अघळपघळ ब्लाऊज आणि रंगपंचमीच्या रंगांसारखे कपडे बघण्यातच असायचं. एकूण काय तर बाई अगदी अजागळ आहेत यावर आमचं एकमत!

गॅदरिंगचे दिवस होते. शाळेचं तीन अंकी नाटक नेहमीप्रमाणे बसलेलं. प्रॉपर्टीला लागणार्‍या सगळ्या वस्तु चित्र्यांच्या घरून यायच्या. कारण बाईंच घर शाळेमागेच. नाटक आटोपून संध्याकाळी सगळं सामान परत करायला आम्ही मुली त्यांच्या घरी गेलो. टेबल लँप्स, खुर्च्या, उश्या असल्या सगळ्या वस्तु आत ठेवायला सांगितल्या होत्या म्हणून आम्ही १५-२० जणींचा घोळका घरात शिरलो आणि समोरचं दृष्य बघून जागीच थांबलो! आतून एक म्हातार्‍या बाई अंगावर एक कपडा नाही अश्या अवस्थेत बाहेर पडायच्या प्रयत्नात होत्या!!! मागून चित्रे बाई हातात एक गाऊन धरून "आई थांबा!! थांबा म्हणातेय ना!" असं किंचाळत बाहेर आल्या. म्हातार्‍या आजी आमच्यासमोर येऊन जोरात ओरडल्या,
"कोण आहात गं तुम्ही? नालायक पोर्ट्या माझ्या घरात गर्दी करताय. बाहेर व्हा नाही तर काठी हाणीन एकेकीच्या टाळक्यात! सुशे, बघतेस काय, हाकल यांना. तुही काही कामाची नाहीस म्हणा! फुकटाचा पगार खाते माझ्या लेकाकडून!!" आम्ही घाबरून सामान तिथेच टाकून काढता पाय घेणार तेव्हड्यात बाईंनी आजींच्या अंगावर कसाबसा गाऊन चढवला. आपल्या मुलाला हाक मारली. नातु आजीला घेऊन बाहेर गेला.
"बसा मुलींनो. मी सरबत केलय सगळ्यांसाठी. चिवडा पण आहे खाऊन जा. दमल्या असाल ग! खूप मेहेनत केलीत आज!" आम्ही सगळ्या निमूटपणे मिळेल त्या खुर्चीवर बसलो. बाईंनी आतून सरबताचे पेले, चिवड्याच्या बश्या आणल्या. आमची बडबड पूर्णत: थांबली होती. खिडकीतून बाहेर बघीतलं तर आजी आता फाटकाशी खुर्ची टाकून शांतपणे बसल्या होत्या. परत पोटात गोळा. आता फाटकातून जाताना काय बोललतील या?
"खा गं!" बाई म्हणाल्या.
"घाबरू नका आजींना. काही करणार नाहीत त्या. त्या आहेत माझ्या सासुबाई." बाई सांगत होत्या. आमच्याशी बोलताना हातात मोगरीच्या फुलांचा अर्धवट गजरा आणि त्यात आणखी फुलं ओवायचं काम सुरु होतं.
"तुम्ही बघीतलच आत्ता. डोक्यावर बराच परिणाम झालाय. तुम्ही लहान आहात अजून तेव्हा काय झालय ते सांगु शकत नाही. पण त्यांनी खूप खूप सहन केलय आयुष्यात. त्यात मोठ्ठा आघात म्हणजे माझे सासरे अपघातात गेले. तरुण वयात. त्यानंतर त्या बर्‍या होऊच शकल्या नाहीत! कश्याकश्याची शुध्द नसते. चित्रे साहेब इथे नसतात. त्यांची नोकरी फिरतीची आणि सध्या बदली पण झालीय दिल्लीला.. घरी मदतीला कुणी नसतं. आमच्या आई कुणाला टिकु देत नाहीत.त्या मलाच घरातली मोलकरीण समजतात!" त्या हसत म्हणाल्या.
"मला मुलींची हौस! पण दोन्ही मुलगेच. आता उरलेली हौस आईंवर पुरवून घेते."
अंगावर काटा आला हे ऐकून आमच्या!
"कठीण आहे ग मुलींनो आयुष्य! त्यांनी तरी हे वेडेपण मागीतलं का? रोज संध्याकाळी अजूनही बाबांची म्हणजे माझ्या सासर्‍यांची वाट बघतात त्या फाटकाजवळ, तिन्हीसांजा झाल्या की. रोज नीट तयार होतात. आणि एक गजरा पण लागतो डोक्यावर माळायला!" पुन्हा एक शहारा आला.
"बरं चला पटापट आटपा आणि निघा. घरी पोचा व्यवस्थीत!!"
आम्हाला फाटकाशी सोडून त्या मागे वळल्या. आम्ही पण पुन्हा मागे बघीतलं. चित्रे बाई सासूबाईंच्या डोक्यात गजरा माळून देत होत्या.

गॅदरिंगच्या धामधुमीनंतर वर्ग सुरु झाले. आज चित्रे बाईंचा तास झाला. त्यांनी शिकवलेली Miller of The Dee आजही लक्षात राहिली. कारण सोपं आहे. त्या दिवशी त्यांच्या रंगगसंगतीकडे लक्षच गेलं नाही.


Swaatee_ambole
Thursday, April 19, 2007 - 3:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

व्वा!!
       

Supermom
Thursday, April 19, 2007 - 3:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृ, खूपच छान लिहिलयस ग. नेहेमीप्रमाणेच. तुझं लिखाण हे नेहेमी मॅच्युअर अन आयुष्यातल्या खर्‍या गोष्टी साध्या सरळ शब्दात मांडणारं असतं. म्हणूनच काळजाला भिडतं अगदी.
खरं सांगायचं तर आज बाबांची खूप आठवण येतेय. त्यात तू हे लिहिलेलं वाचलं. माझ्या बाबांची पण माझ्या आईनं त्यांचा मानसिक तोल ढळलेला असताना खूप सेवा केली. अगदी जिवापाड. अशा माणसांचं करणं अतिशय म्हणजे अतिशयच कठीण. पण माझी आई नेहेमी म्हणते की अशा माणसांना कळत नसलं तरी त्यांचं अगदी मायेनं करावं. त्यांच्या अंतरात्म्याचे आशिर्वाद पोचतात आपल्याला.


Arch
Thursday, April 19, 2007 - 3:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृ, नेहेमीप्रमाणे विचार करायला लावणारं.

Ashwini
Thursday, April 19, 2007 - 4:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृण, छान लिहीलयस.
Supremom , खरं आहे. आणि बाकी काही कळत नसलं तरी कुठेतरी माया जाणवत असेल त्या लोकांना.


Dineshvs
Thursday, April 19, 2007 - 4:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृणमयी, छान लिहिलेय. अशीच एक बाई माझ्या बघण्यात होती. तिची सुन तिला शिव्यांची लाखोली वहायची, पण तरिही सगळे निगुतीने करायची.
आणि काहिही साम्य नसताना मला जयवंत दळवींची कल्याणी आणि मानुहि आठवली. असाच तिढा.


Mankya
Thursday, April 19, 2007 - 5:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृ .. खूपच छान लिहिलयस !
सुमॉ .. अगदि खरंय, अगदि मनातलं लिहिलस !

माणिक !


Chinnu
Thursday, April 19, 2007 - 6:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृण, छान आठवण.. छान लिहीलसं.

Disha013
Thursday, April 19, 2007 - 7:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिनु,डगळ नाही गं,ढगळ!:-)

मृण्मयी, छान लिहिलेस. सुमॉ म्हण्ते तसं matured .
शेवटच्या दोन ओळी खुप भावल्या.
त्या आजींचे नशीब किती चांगले ना. अशांना फ़क्त समजुन घेणारं माणुस असले ना तरी पुरे.

दिसतं तसं नसतं हेच खरं.


Psg
Friday, April 20, 2007 - 5:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्त!!
... ... ... ... ...


Daad
Friday, April 20, 2007 - 5:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृण्मयी, खूप छान लिहिलयस. माणसांना त्यांच्या appearance वरून जोखण्याची "कला" आपण खूप लहानपणापासून शिकतो. फार थोडी संवेदनाशील मनं त्याच्यामागचं माणूस पहाण्याची "नजर" किंवा कला आत्मसात करतात.
मस्तच लिहिलयस. साध्या सोप्प्या भाषेत. आवडलं!


Bee
Friday, April 20, 2007 - 6:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक प्रामाणिक प्रतिक्रिया..

ह्या पुर्वीच्या कथा अधिक आवडल्या.. ही ऐवढी आवडली नाही पण लिहिलीस छान.


Sanghamitra
Friday, April 20, 2007 - 8:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृण्मयी सुरेखच लिहीलंयस अगदी.

Meggi
Friday, April 20, 2007 - 12:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृ, खरचं आपण बाह्यरुपाला किती वेळा महत्त्व देतो, अंतरंग जाणुन घेणं जास्त महत्वाचं, हे आपण बर्‍याच वेळी विसरुन जातो.

Srk
Friday, April 20, 2007 - 1:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृण्मयी, छान लिहीलं आहेस. मेग्गिला पूर्ण अनुमोदन.

Hems
Friday, April 20, 2007 - 4:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान लिहिलंय ! हे आवडल मला

Princess
Friday, April 20, 2007 - 5:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृण... काय लिहिलय ग. पाणी आले डोळ्यात.

Apurv
Friday, April 20, 2007 - 5:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Meggi ल माझे पण अनुमोदन. अत्यंत आभार हा लेख लिहिल्याबद्दल!

Mrinmayee
Friday, April 20, 2007 - 6:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रतिक्रीयांबद्दल मन:पूर्वक आभार!
नात्यांमधली रंगसंगती साधली की आणखी काय हवं? :-)


Rupali_rahul
Saturday, April 21, 2007 - 6:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृण्मयी, खुपच सुंदर लिहिल आहेस...

R_joshi
Saturday, April 21, 2007 - 7:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृण्मयी खुपच छान लिहिलस. चित्रे बाई त्यांच्या रंग संगतीसह डोळ्यांसमोर ऊभ्या राहिल्या.:-)

Savani
Tuesday, April 24, 2007 - 1:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृ, आजच वाचलं. छानच आहे नेहेमीप्रमाणे.:-)

Sakheepriya
Wednesday, April 25, 2007 - 5:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आमच्याही मनावर ठसा उमटवून गेल्या गं चित्रे बाई... सुरेख व्यक्तिचित्रण!

Saee
Friday, April 27, 2007 - 7:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हृदयस्पर्शी म्हणतात तसं उतरलंय अगदी.




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators