Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through April 12, 2007

Hitguj » My Experience » भटकंती » माझे दुर्गभ्रमण » वसंतगड आणि जंगली जयगड » Archive through April 12, 2007 « Previous Next »

Gs1
Tuesday, April 10, 2007 - 4:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वसंतगड आणि जंगली जयगड ..

Gs1
Tuesday, April 10, 2007 - 4:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उन्हाळ्यात दुर्गभ्रमण करायचे झाले तर ते शक्यतो रात्री पायथ्याला मुक्काम करून पहाटे करणे, रात्रीच चढाई करणे, घनदाट जंगलातले दुर्ग करणे किंवा सागरी दुर्गांची सफर करणे असे पर्याय आहेत. आम्ही जंगली जयगडला जाताना रात्रीचा मुक्काम अजून एका गडावरच ठरवला.

शनिवार दिनांक आठ एप्रिलला सचिन (फदि), सौमित्र, आरती आणि कूल असे पाच जण साडे आठला पुण्याहून निघालो. अटलजींच्या कृपेने पुणे बंगलोर महामार्गावर वाहन चालवणे आता चक्क सुखावह वगैरे वाटायला लागले आहे. माझ्या 'एकदा' करायच्या यादीत संपूर्ण स्वप्नील स्वर्णिम चतुष्कोणावरून स्वतः गाडी चालवत फिरून येणे असेही एक कलम आहे. त्यातच साताऱ्याच्या पुढे थोडा पाऊस पडलेला असल्याने मातीचा सुगंध श्वासात भरून घेतच कराडच्या १५ किमी अलीकडच्या उंब्रज या गावापर्यंत पोहोचलो, उंब्रजच्या पुढे टोलनाक्याच्या नंतर सुमारे दोन एक किमी अंतरावर तळबीड या गावाकडे जायला फाटा फुटतो.

अकराच्या सुमारास तळबीडला पोहोचलो, रंगरंगोटी सुरू असल्याने एक दुकान उघडे होते, त्यांच्याकडून थोडी माहिती घेऊन, तिथेच गाडी लावून गावातल्या काँक्रीटच्या छोट्या रस्त्याने गावाबाहेर आलो. समोर वसंतगडाचा आडवा डोंगर पसरलेला दिसत होता, वर महादेवाचे देऊळ आहे, पंधरा तारखेला यात्रा आहे, देवळात बऱ्यापैकी जा ये असते अशी माहिती गावात मिळाली होती. पायथ्याशी भक्त निवासाचे काम जोरात सुरू आहे. त्याच्या जवळून दीडएकशे दगडाच्या पायऱ्या चढून गेल्यावर पायवाट सुरू झाली. अर्धे चढून येतो तेच हवेच्या थंडगार झुळुका अंगाला भिडू लागल्या. हे भाग्य कोंकणातल्या किल्ल्यावर नाही येत कधी वाट्याला. समोरच्या गडाच्या लांबच लांब पहाडाला खेटून डाव्या बाजूला काटकोनात अजून एक आडवा पहाड पसरला होता आणि त्याच्या आडून तांबूस चंद्र उगवत होता, आणि लगेच ढगाआड जाऊ पाहत होता. मध्ये एकदा वाट चुकण्याचा प्रयत्न करूनही फारसे इकडेतिकडे न भटकता साडेबाराच्या सुमारास गडावर तुटक्या तटबंदीतून दाखल झालो. तिथे पूर्वी दरवाजा असावा.

वर येताच लक्षात आले की गडाला लांबी भरपूर पण रुंदी कमी आहे. थोड्याच अंतरावर कळसावर मिणमिणता दिवा असलेले एक देऊळ उभे होते, तिकडे मोर्चा वळवला, दार बंद होते, पण बाहेरचा नंदीचा मंडप आणि ओसरीही ऐसपैस आणि मुक्कामाला छान होती. मंडपात वाऱ्याच्या सुखावणाऱ्या सान्निध्यात जेवणे आटोपली आणि ओसरीत पथाऱ्या पसरल्या. बाकीचे गाढ झोपले, पण मला काही झोप येईना, मग विजेरी आणि दंड घेतला आणि चक्कर मारायला बाहेर पडलो.

पूर्वेला थोडे दूर महामार्गावर दिवे दिसत होते, बाकी साऱ्या दिशांना काळोखात मधूनच एखाद्या वाहनाच दिवा चमकून जात होता. चंद्र आता माथ्यावर आला होता, गडाची तटबंदी, चार बाजूंच्या थोडी पडझड झालेल्या उंच बांधीव माच्या, अजून एक दोन देवळे आणि काही बांधकामाचे अवशेष त्या प्रकाशात उजळून निघाले होते, पण मंत्रमुग्ध करणारे काही असेल तर ते म्हणजे चाफ्याच्या झाडांचा एक समूह, ज्यांच्या माथ्याचा इंच न इंच पांढऱ्या फुलांनी डवरला होता आणि चांदण्यांशी स्पर्धा करत होता. जमिनीवरही अगणित फुलांचा सडा, आणि साऱ्या वातावरणात तो घमघमाट इमाने इतबारे वाहून नेणाऱ्या शीतल झुळुका. गडावरच्या त्या अपरिचित भग्नावशेषात रात्री एकट्याने फिरतानाही विलक्षण प्रसन्नतेशिवाय इतर कुठलीच भावना मनात मनात येऊ न देण्याची किमया होती त्या सगळ्या वातावरणात. दुसऱ्या दिवशीचा कार्यक्रम आणि नंतर परतीचे सारथ्य आठवले म्हणून सक्तीने थोडी झोप घ्यायला परत फिरलो.

पहाटे सहाला उठून गडप्रदक्षिणा सुरू केली, भरपूर पाणी असलेले कृष्णा तळे पाहिले. अजूनही दोन तळी आहेत पण ती उन्हाळ्यात कोरडी पडतात. एवढ्या पहाटे पलीकडच्या वसंतगड्वाडी गावातून गावातलेच तीन चार तरुण वर चढून आले होते आणि पाण्यात उड्या घेत होते. मध्यभागी चांगले तीस एक फूट खोल आहे तळे असे कळले. गडावर एक टपरीही आहे, पण आम्ही निघेपर्यंत तरी ती उघडलेली नव्हती. गड तसा बुलंद वाटत नाही, बऱ्याच ठिकाणाहून चढता येईल असे वाटते, पश्चिमेकडे कोयनेचे पात्र दिसत राहते, तळबीड, वसंतगड्वाडी अगदी तळाशीच दिसतात. पश्चिमेचे प्रवेशद्वार बऱ्यापैकी सुस्थितीत आहे आणि गडाच्या वैभवाची कल्पना देणारे आहे. प्रवेशद्वारापाशी एक गणपतीचे सुरेख छोटेसे मंदिर आहे, गणपतीची मूर्ती विशेष छान आहे. गडावर काही झाडे आहेत आणि त्यावर पक्ष्यांची मोठी लगबग सुरू होती, टिटवी, साळुंकीपासून ते भारद्वाज, कोतवाल.. किती विविध पक्षी, त्यांचे नाना आवाज, मला अडाण्याला त्यातले काहीच कळत नाही, पण अनुभवायला मजा मात्र खूप येते. दरीत मोराची केकाही घुमत होती. प्रदक्षिणा आटोपून खाली उतरलो, तळबीड गावाचे अजून मोठे महत्त्व म्हणजे हे सरसेनापती हंबीरराव मोहितेंचे गाव. त्यांचे स्मारक, समाधी गावात आहे, आणि गावाला त्याचे कौतुकही आहे.

हे सर्व बघण्यात आमचे वेळापत्रक जरा बिघडले होते, पुन्हा उंब्रज गाठले आणि NH4 सोडून कोयनानगरकडे वळलो. हा रस्ताही नुसता गाडी चालवण्याचे सुख घेण्यासाठी जाण्यासारखा. दोन्ही बाजूला हिरवी झाडे, डावीकडे वळणांवळणांनी साथ करणारी कोयना या सगळ्याची मजा लुटत पन्नास किमीचा प्रवास करून कोयनानगरला पोहोचलो, तिकडे थोडेसे खवून नवजा ची वाट धरली, हा रस्ता तर अगदी दाट जंगलाकडे नेणारा. डिचोलीपुढे एक फाटक लागते आणि त्यापुढे खाजगी वाहनांना जाता येत नाही, रस्ता पुढे डोंगराच्या पोटातल्या वीजनिर्मिती केंद्राच्या चौथ्या टप्प्याकडे जातो. आम्हाला जंगली जयगडपर्यंतच जायचे आहे म्हटल्यावर चौकीदाराने सोडले. आता एकदम घनदाट झाडी, रुद्र कडे आणि त्यावरून पावसाळ्यात कोसळणाऱ्या रुद्र जलप्रपातांच्या खुणा, या भागात आमचे स्वागतच एका आठ फुटी आणि बलदंड अशा धामणीने समोरूनच सळसळत केले. फाटकापासून साधारण दोन किमीवर, एक कचा रस्ता फुटत होता आणि लगेच संपतही होता, तिथेच गाडी लावून सव्वाअकरा वाजता आम्ही आमची चढाई सुरू केली. खरं तर भर उन्हाची वेळ, पण आभाळ भरून आले होते, आणि ते मोकळे होते न होते तोच आम्ही वासोट्यासारख्याच किंबहुना त्याहून दाट आणि दुर्गम अशा जंगलात प्रवेश केला. वासोट्याची वाट प्रशस्त आणि फारसे फसणार नाही अशी आहे. इथे चहूबाजूला उंच उभे पर्वत आणि पाचोळ्यात बुडलेली नक्की वाट कुठली असा पावला पावलाला प्रश्न पडावा अशी स्थिती. त्यात किमान दहा बारा किमीच्या परिसरात कोणी माणूस सापडणार नाही याची खात्री. आम्ही नक्की कशाच्या बळावर जंगली जयगडाला जाऊ म्हणून आलो असे क्षणभर वाटले, पण तेवढ्यात एका दगडावर धूसर पिवळा बाण रंगवलेला दिसला. या बाणांची महती अशा जागांवर गेल्याशिवाय लक्षातही येणार नाही. नाही म्हणायला विद्युत तारांची एक रांग थेट खडा चढ चढून समोरच्या डोंगराच्या माथ्याला गेली होती. त्या तारांची दिशा धरून वर गेलो म्हणजे आपण हमखास भलत्याच भागात जाऊन अडकतो. तेव्हा त्या अनामिक गिरीप्रेमींचे आभार मानत बाण शोधत शोधत वाटचाल सुरू केली. पन्नास एक पावलं चालूनही पुढचा बाण दिसला नाही की मनात शंका कुशंका सुरू [ त्यांच्याकडचा ऑईलपेंट संपला तर नसेल ना इथपासून, ते ही आडवाटेवरची खसपस रानडुकराची तर नाहीना इथपर्यंत] एकूण दोनदाच चुकत दीड तासाच्या गारेगार जंगलातल्या जोमदार चढाईनंतर सह्यमाथा गाठला, माथ्यावर एक छोटी माचीच आहे, तिकडून दिसणाऱ्या देखाव्याला तोड नाही. त्याचे वर्णन करण्याचा मी प्रयत्नही करत नाही. केवळ त्या ठिकाणी दोन मिनिटे उभे राहण्यासाठी ही सर्व यातायात कुणीही करेल अशी ती जागा आहे. तिथून उजवीकडे खाली कोंकणात डोकावून पाहिले आणि जंगली जयगडाचे दर्शन झाले. लोहगडाच्या विंचूकाट्यासारख्या लांबुळक्या चिंचोळ्या मानेने हा गड सह्यधारेला जोडला गेला आहे. गंमत म्हणजे इतक्या घनदाट जंगलातून येऊन आपण या गडावर उतरतो त्या या जंगली जयगडावर सावलीलासुद्धा एकही झाड नाही. उन्हात तापत गडावर उतरलो. उजवीकडे हजार फूट तर डावीकडे चार हजार फूट अशी दरी. कुठल्या बाजूला पडलो तर चालेल असा निवडीला फारसा वाव नाही. पण कोयनेच्या पाण्याचे फार छान दर्शन होते इथून. गडावर अगदी शेवटच्या टप्प्यात घसारा फार वाढला, मग त्या टोकापर्यंत न जाता तिथूनच परत फिरलो, आणि पुन्हा जंगलात शिरलो तेव्हा हायसे वाटले.

उतरायला सुरुवात केली, वाटेत एका झऱ्याजवळ काकड्या खाण्याचा कार्यक्रम करून गाडीजवळ परतलो. कोयनानगरचे नेहरू उद्यान काही फार पसंत पडले नाही, तिथून धरणभिंतीचे मात्र फार जवळून आणि छान दर्शन घडते. एवढ्याशा भिंतीने कोयनेचे पाणी पार पन्नास किमी मागे महाबळेश्वरच्या पायथ्यापर्यंत लोटले आहे याचे मोठे आश्चर्य वाटते. परतीचा प्रवास सुरू केला, वाटेत कोयनेत उतरलो, अर्धा तास त्या पाण्यात यथेच्छ स्नान करून मग चाफळच्या समर्थांनी स्थापिलेल्या राममंदिरात गेलो. फार प्रसन्न स्थळ आहे. इथेही मींड नदीच्या घाटावर बरेच पक्षी आपल्या सायंलीला दाखवायला जणू आमची वाटच पाहत होते.

केवळ चोवीस तासात एवढे सर्व अनुभवायला मिळणे कमी होते म्हणून की काय, पण साताऱ्यात उत्कृष्ट जेवण करून सव्वाअकराला पुण्याला पोहोचलो.

१ मे २००५ ला आम्ही नागेश्वराचा पहिला ट्रेक केला तेव्हा किमान पन्नास दुर्ग वा गिरिस्थाने बघायची असा संकल्प केला होता, जंगली जयगड हा पन्नासावा हे आता लिहिताना लक्षात आले. उण्यापुऱ्या दोन वर्षात या सख्या सह्याद्रीने किती आनंद दिला त्याचा वृत्तांत काही लिहिता यायचा नाही, तो अनुभवायलाच हवा.


Dineshvs
Tuesday, April 10, 2007 - 5:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

GS1 तुझा प्रत्येक लेख, आधीच्या लेखापेक्षा सुंदर होतोय.
मधेच डिचोली नाव वाचुन चमकलो.
का ते गिर्‍या लिहिलच.


Cinderella
Tuesday, April 10, 2007 - 5:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

GS1, नेहेमी प्रमाणे एकदम छान वाटले वाचुन...मी वाटच बघत होते ह्या week end च्या वर्णनाची...:-)

Itsme
Wednesday, April 11, 2007 - 5:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


राम मंदीराच्या आवारात रेलींग ला रेलुन उभे होतो तेंव्हा समोर एखादा bird show चालु आहे असेच वाटले. निरनिराळे पक्षी आपापल्या लिला दाखवुन जात होते. एक black & white सुरेख नक्षी असलेला पक्षि पाण्यातले मासे शोधण्यासाठी जवळ जवळ मिनीट भर एकाच जागी फ़डफ़डत रहायचा.

वसंत गडावर सुर्योदयाला जेव्हडे सुंदर पक्षी दर्शन झाले तेव्हडेच सुंदर सुर्यास्ताला चाफळ ला झाले.

मंदीरातल्या मुर्ती अतिशय भव्य आणि तितक्याच प्रसन्न आणि देखण्या आहेत. आवारात मोठे बकुळीचे झाड आहे. फुलांचा मस्त सडा पडला होता. एकुणच रम्य परीसर आहे.

सर्वांग सुंदर असा अजुन एक ट्रेक .... :-)


Itsme
Wednesday, April 11, 2007 - 5:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ट्रेक ची आवड नसणार्‍यांनी, जंगली जयगडाच्या पयथ्या पर्यंअत नुसते long drive ला म्हणुन तरी नक्किच जाउन यावे. अफाट स्रुष्टी सौंदर्य बघायला मिळते. शिवाय वाटेत रान मेव्याची पण रेलचेल आहेच.

आम्ही त्यावर ताव मारला हे वेगळे सांगायला नकोच.



Sakhi_d
Wednesday, April 11, 2007 - 7:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

GS1 आणि Itsme मस्तच....

अजुन एक चांगला Trek मिसला....


Jo_s
Wednesday, April 11, 2007 - 9:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

GS सुंदर वर्णन, पन्नासाव्या गडासाठी अभिनंदन

Anilbhai
Wednesday, April 11, 2007 - 11:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

डिचोली नाव वाचुन मी पण चमकलो. अर्थात गिर्‍या लिहिलच. :-)

Phdixit
Wednesday, April 11, 2007 - 3:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जी एस. मस्तच लिहिले आहेस, जेवढा आनंद मला फिरताना मिळाला ती प्रत्तेक गोष्ट तू येथे विस्तुत पणे मांडली आहेस
सातार्‍या जवळचा तो मातीचा सुगंध, तळबीड गावातला तो सिमेंटचा रस्ता, गडावर जाणारी चुकलेली पायवाट, गडावरील सहभोजन, रात्री हवेत असणारा गारवा, विविध पक्ष्याच्या आवाजात उजाडलेली पहाट, गडाची प्रदक्षिणा, गडावरुन दिसणारे कोयनेचे हिरवेगार खोरे, तळबीड मधे असलेली हंबीरराव मोहीत्यांची समाधी, कोयना नगर कडे जाणारा रस्ता, नवजा पाशी धामिणीने केलेले स्वागत, जयगडचे घनदाट जंगल, मधेच झालेली जंगलतोड, येताना वाटेत खाल्लेल्या काकड्या, चाफळ चे श्री राम मंदिर, सातार्‍यातील झणझणीत जेवण हे सारे काही एकदम डोळ्यापुढे उभे रहाते, पण हे डिचोली काही माझ्या लक्षात येत नाहीये. कदाचीत तेव्हा माझे जंगलातिल फणस आंबे ह्यांकडे असावे


Robeenhood
Wednesday, April 11, 2007 - 5:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

GS1 तुझा प्रत्येक लेख, आधीच्या लेखापेक्षा सुंदर होतोय.
>>>>>
म्हणजे? याचा व्यत्यास नन्तरच्या लेखापेक्षा आधीचा लेख भिकार होता असा होत नाही का?

दिवे घ्या रे दोघेही...:-)


Robeenhood
Wednesday, April 11, 2007 - 5:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अटलजींच्या कृपेने पुणे बंगलोर महामार्गावर वाहन चालवणे >>>
यात अटलजींचा काय संबंध? पं. प्र. कुठे रस्ते बांधतो का?

हे ** वाले ना वडाची साल पिम्पळाला लावण्यात पटाईत:-)


Itsme
Thursday, April 12, 2007 - 4:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Robinhood .... :-)

तुम्ही आमच्या बरोबर एक सफर करणार होता, त्याचे पुढे काय झाले ??


Giriraj
Thursday, April 12, 2007 - 5:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी लिहितो पण काय लिहायचे ते तरी सांगा ना! :-)

डिचोली हा उत्तर गोव्यातला तालुका आहे जिथे अस्मादिकंनी चार वर्षे राज्य केले! :-)

GS ला झोप लागली नाही याची नोंद गिनिज बुकात झालीच पाहीजे... :-)


Nandini2911
Thursday, April 12, 2007 - 7:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी पण हा ट्रेक मिसला.
पुढच्या वेळी नक्की...


Bhagya
Thursday, April 12, 2007 - 7:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गोविंद पन्नासाव्या ट्रेक बद्दल अभिनंदन.
पुढच्या वेळेस ट्रेक मिसायचा नाही, असा निर्धार केलाय.


Gs1
Thursday, April 12, 2007 - 8:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

http://en.wikipedia.org/wiki/Golden_Quadrilateral
http://www.answers.com/topic/golden-quadrilateral
http://pib.nic.in/feature/feyr2003/fapr2003/f020420031.html

वाजपेयींकडुन बर्‍याच अपेक्षा होत्या, त्या काही पूर्ण नाही झाल्या. पण जे केले त्याचेही श्रेय न देण्याचा कद्रूपणा करू नये असे माझे मत आहे.
भारतातही उत्तम रस्ते असू शकतात हे आधी ठाकरे - गडकरी यांनी आणि मग देशपातळीवर वाजपेयी यांनीच करून दाखवले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पन्नास वर्षत पहिल्यांदाच. मोठ्या आणि चांगल्या रस्त्यांमुळे अर्थव्यवेस्थेला मोठी गती मिळू शकते याची दृष्टी नक्कीच त्यांच्याकडे होती.

बाकी दिनेशने सौजन्य आणि प्रेमापोटी कौतुक केले तरी माझे सर्वच लिखाण भिकार आहे याची कल्पना आहेच. पण ज्यांना रस आहे त्यांना अशा नोंदींचा उपयोग होतो असा माझा स्वत : चा अनुभव असल्याने दर वेळेला चिकाटीने इथली जागा अडवतो आहे.


Itsme
Thursday, April 12, 2007 - 8:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>> GS ला झोप लागली नाही ...

आणि त्यामुळे माझा बाबा 'आता' घोरत नाही असे चि.सौमीत्र चे ठाम 'एकमत' झाले :-)

Cool
Thursday, April 12, 2007 - 8:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>> GS ला झोप लागली नाही ...

गिरी, मागची पापं आहेत दुसरं काय ..

Mandard
Thursday, April 12, 2007 - 9:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जी एस आता सह्याद्री सोडुन बाकी कुठे चढाईचा विचार आहे का. आमच्याइथे (थोडे दुर उत्तरांचल मधे हिमालयाच्या पायथ्याला) पण खुप सुन्दर जागा आहेत. एकदा जरुर या. तुमच्यासारख्या दर्दी माणसाला तर नक्की आवडतील.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators