Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
लोणारचे सरोवर.. ...

Hitguj » My Experience » भटकंती » लोणारचे सरोवर.. « Previous Next »

Bee
Friday, March 02, 2007 - 11:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पांढर्‍या रंगाचा ढाणा वाघ आढळणार्‍या बुलडाणा जिल्यामधे सुमारे पन्नास हजार वर्षापुर्वी उल्कापात झाल्यामुळे लोणारचे सरोवर निर्माण झाले. शास्त्रज्ञांसाठी आणि वैज्ञानिक संशोधकांसाठी लोणारचे सरोवर हा एक फ़ार मोठा अभ्यासाला मिळालेला विषय आहे. अनेक हौशी देशी परदेशी लोणारचे सरोवर बघायला येतात. जिथे पिकते तिथे विकत नाही असे म्हणतात. माझ्याबाबतीत असे होऊ नये म्हणून मी लोणारला जायचेच असा एक बेत अकस्मात ठरवून टाकला.

अकोल्याहून आधी मालेगाव. मालेगावहून नंतर मेहकर. मेहकरहून मग कुठे लोणार अशा ३ गाड्यांचा ४ तासांचा प्रवास करुन आम्ही खूप उशिरा म्हणजे १ वाजता लोणारचा पोचलो. उन अगदी दणकट आणि चटचटीत पडले होते. लोणार हा तालूका अगदी भंगार दिसत होता. त्यामुळे सोबतची मंडळी नाखूष वाटतं होती. मी त्यांना अजून सरोवर आलेले नाही तेंव्हा उगाच खिन्न होऊ नका असे सारखे सांगत होतो. खूप यातायात होऊ नये आणि परतीचा प्रवास सुरक्षित व्हावा म्हणून मी १२५ रुपयाला एक रिक्षा ठरविला. संपूर्ण लोणार फ़िरवून परत डेपोवर आणून सोडण्याचे काम त्याच्याकडे दिल्यानंतर मला जरा निश्चिंत झाल्यासारखे वाटले.

सुरवातीला आम्ही दैत्यसुदन मंदीरात गेलो. हे एक सुंदर हेमांडपंथी मंदीर! माझ्या आयुष्यात हेमांडपंथी मंदीर बघण्याची ही पहिलीच संधी होती. ह्या मंदीराची पडझड झालेली नव्हती. मंदीर पूर्णपणे शाबूत होते. 'हेमांडपंथी' म्हणजे मोठमोठ्या पाषाणांचा वापर करुन बांधलेले मंदीर. ह्याची आणखी एक खूबी म्हणजे दगड रचताना अधेमधे सिमेंटचा वापर करत नाही. ही माहिती मी एका वर्तमानपत्रात वाचलेली. तरी प्राचीन काळी सिमेंट वगैरे होते का हा प्रश्न मला माहिती वाचताना पडलेला. असो. मंदीरातील भरभक्कम दगड आणि त्यावर केलेले कोरिवकाम बघून आम्ही सगळे जण अगदी स्तंभित झालो. खाली ह्या मंदीराचे काही छायाचित्र दिलेले आहेत ते बघून तुम्हाला कल्पना येईलच.

दैत्यसुदन मंदीराची काही छायाचित्रे :

daityasudan part one

नृत्य सादर करणारी श्रीगणेशाची एक मुर्ती.
part2


असे म्हणतात ह्या दैत्यसुदन मंदीरात आत कुठेतरी दगडांमधे एक हिरा लपवून ठेवला आहे. आम्ही मंदीर बघत असताना तीन लहान मुले आलीत आणि त्यांना न विचारता त्यांनी आम्हाला मंदीराविषयी माहिती सांगायला सुरवात केली. आयतेच तीनचार गाईड मिळाल्यामुळे मला दैत्यसुदन मंदीरातील देव लगेच पावला असे वाटले. मंदीराच्या आत अत्यंत तेजस्वी आणि प्रसन्न चेहर्‍याची पुरुषभर उंचीची उभी असलेली विष्णूची एक मुर्ती आहे. तिला लावलेल्या चांदीच्या डोळ्यांमुळे आणि तिने शुभ्र वर्स्त्र परिधाण केल्यामुळी काळोखात तिचे तेज आणखीच अवर्णनीय झाले आहे. त्या मुर्तीला मी बघतच उभा राहिलेलो बघून माझ्याकडे सगळे जण प्रश्नांकीत नजरेने पाहत होते की नक्की मला त्या मुर्तीमधे असे काय गवसले. शेवटी प्रत्येकाची आकलन शक्ती वेगळी असते. खरे तर मला त्या मुर्तीभोवती एक क्षणभंगूर करून टाकणारी प्रसन्न शांतता अनुभवता आली. म्हणूनच ती मुर्ती मला अशक्य आवडली. खचाखच फोटो काढून आम्ही त्या मंदीराला फ़क्त एकच प्रदर्शिना मारेपर्यंत पायाची सालं निघतील का इतके पाय भाजायला सुरवात झाली. मग धावा धावा चपला आणा म्हणून सर्वांनी पायताणा चढविल्या. मी काही इतकाही नाजूक नाही म्हणून मी टाळाटाळ केली पण शेवटी मलाही चपला घालाव्याच लागल्यात. हे पहिले मंदीर असेल जिथे मी चपला घालून प्रदर्शिना घातली. पाय भाजण्याचे कारण एकच की पायाखाली काळे दगड बसविलेले होते. मग ऊन आणखी तापणारच की! ह्याच मंदीराच्या दुसर्‍या भागात ब्रह्मा विष्णू महेशाची पुरुषभर उंचीची मुर्ती आहे. पण ब्रम्हाची मुर्ती तेथून काढून तिथे गरुड स्थापिले आहे. ते मंदीर बाहेरून बंद होते. तरीही माझ्या कॅमेराच्या डोळ्यांनी त्यांना नेमके टिपले. आतमधे काळोख झिरपत होता आणि बाहेर लख्ख उन्न पडले होते. किती हा विरोधाभास खरच! माझ्या सोबतीचे सर्व जण मी माझ्या चिमुकल्या गाईडला किती प्रश्न विचारतो म्हणून माझ्याकडे बघत होती.. हसत होती. म्हणत होती असा पावणा परत कधी इथे येणार नाही. पण ह्या निष्पाप जनांना हे कुठे ठावूक की अशा प्राचीन मंदीराचे संधोधन करणे हा केवढा मोठा विषय आहे. मी तर आयत्या पिठावर रेघा मारण्याचे काम करत होतो. त्या पोरांच्या हातात खाऊला पाच पाच रुपये ठेवून मी तेथून लगेच रिक्षामधे स्वार झालो.

हीच ती विष्णूची मुर्ती :

part21


चटके खावून कधी एकदाचे नयन गार करणारे सरोवर येते म्हणून आम्ही रिक्षावाल्याचा नांदा धरला पण त्याने त्याची वाट झोपलेल्या मारोतीच्या देवळाकडे नेली. हा झोपलेला मारोती खरच गाढ झोपलेला आहे. असे म्हणतात हा मारोती चुंबकीय आहे. म्हणजे तिथे नाणी वगैरे चिकटतात. हे आम्हाला नंतर माहिती पडले. मंदीराच्या शेजारी कानिटकरांचे घर आहे. तिथली एक पाटी वाचून मला पुणेकरांच्या पाट्या आठवल्या. मग त्यांना पाणी न मागता आम्ही विहीरीवर गेलो. मी खाली बघतो तर बापरे विहीरीचा खोल गर्ता बघून लहान मुलांना आधी बाजू सारले. तरी भाचीला विहीरीत डोकावून बघायचे होतेच. तिने जरा आत नजर केली आणि ती तेथून पळाली. मग खिराडीच्या सहाय्याने आम्ही चामड्याच्या एक बकेटीतून पाणी शेंदले. पाण्याला केवढी मधुर चव असते खरच! जवळ असलेला पाण्याचा flask आम्ही लगेच भरून घेतला. असे वाटले हे पाणी संपूच नये. मधुर जीवन संपावे असे तरी कुणाला कधी वाटते का खरचं!

झोपलेल्या मारोतीचे एक छायाचित्र :

jhopalelaa maarotee

आता मात्र आम्हाला मंदीर वगैरे बघण्यापेक्षा सरोवरात जाऊन डुंबावे असे वाटायला लागले. ३ वाजायला आले होते. अजून निम्माशिम्मा प्रवास देखील पार पडला नव्हता. सकाळची न्याहरी देखील कुणीच केली नव्हती. साध्या चहावर किती मेलं फ़िरायचं. तरी सर्वांनी मिळून एक ठरवले की सरोवरावरच जेवन करु.

झाले एकदाचा आमचा रिक्षा सरोवराजवळ येऊन ठेवपा. दुरुनच त्याचा बशीसारखा आकार बघून आम्ही धन्य झालो. असे वाटले किती जवळ आहे सरोवर आपल्या अगदी डोळ्यांना स्पर्श करतो की काय. पण आणखी जवळ अगदी सरोवराच्या कडेवर उभे राहून बघतो तर सरोवराच्या काठाला उभी असलेली झाडे एखाद्या टिंबासारखी भासत होती आणि सभोवार पसरलेली शेते गोधडीसारखी दिसत होती. ऊन मी म्हणत होते. सरोवराच्या काठापर्यंत पोचायचे म्हणजे खालपर्यंत दगडांच्या पायर्‍याची एक वाट केली होती. ती वाट वळणांची होती आणि तिला बराच उतार होता. पाय घरसला तर हातपाय फ़ोडून निकाल अशी एक भिती सर्वांना वाटली. तरीही आता आलोच आहे तर खाली काठापर्यंत सर्वांनी उतरायचेच असा निर्धार केला. जवळ ६ वर्षांची चिमुकली भाची होती. तिचा हात मी घट्ट धरुन तिला खालपर्यंत पोचेपर्यंत माझे श्वासोश्वास कमीजास्त होत राहिले. एकदाचे कधी खाली पोचतो आणि पुर्ण पाय गुडघे सरळ करुन उभे रहातो असे मला झाले होते. पायर्‍या उतरतांना दगड सारखे सरकत म्हणून भितीची शिरशिरी उमटत होती. शेवटी एकदाचे सर्वजण खाली पोचलो. तिथे राम मंदीर आहे. ते देखील हेमांडपंथी मंदीरच आहे. आत मधे रामाची एक मुर्ती आहे. पण संपूर्ण मंदीर काळाच्या ओघात वृद्ध होऊन गेले आहे. आजूबाजूला परसरलेला कचरा मंदीराचे प्रसन्न भाव नष्ट करणारा आहे. आतील शीतल जागेवर आम्ही बसून एकदाचे जेवन उरकून घेतले. जेवताना अनेक पक्षांचे ध्वनी ऐकायला आले. चार दोन मोर लांडोरही दिसले. मधाचे पोळे तर जिथेतिथे लागलेले आढळले.

सुरवातीला दृष्टीक्षेपास पडलेले लोणारचे सरोवर :

mainsarowar

आणि हा सरोवराचा काठ :
kaaTh

झाडाला लगडलेले दोन पोळे, पैकी एक पोळे मधमाशांनी रिक्त केले आणि दुसरे आता फ़ुलांच्या रसस्वादानी भरले जात आहे...
poLe

जळात उतरलेला तप्त सुर्य :
surya

सरोवराच्या संपूर्ण व्यास फ़िरून यायला पूर्ण एक दोन दिवस लागतील आणि बाजूला एकूण अशी १४ मंदीर बघायला आणखी वेळ लागेल हे ऐकून आम्ही फ़क्त सभोवतालाचा भाग न्याहाळला. पायाची बोटे सरोवराच्या खार्‍या पाण्याला स्पर्श होऊन आम्ही धन्य झालो होतो. मग परत वर जाणार्‍या पायरांचा चढ बघून आणि सांजेची होत आलेली वेळ लक्षात घेता आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. तरीही गुरु शुक्राचार्यांचे मंदीर नक्की कुठे आहे ह्यासाठी माझी नजर वर पोचल्यानंतर शोधत होती. फ़िर कभी असे मनातल्या मनात म्हणून आम्ही रिक्षात बसलो आणि परत अकोल्याचा पल्ला गाठायला सुरवात केली. After all, home sweet home!

गूड बाय लोणार, तिन्हीसांजेला टिपलेले हे एक छायाचित्र :

good bye

Shonoo
Friday, March 02, 2007 - 2:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी

सुंदर लिहिले आहेस. लेखन अलंकारिक करणे कटाक्षाने टाळशील तर आणखीन भावेल.

प्रदक्षिणा, प्रदर्शिना नव्हे.

क्षणभन्गूर म्हणजे fleeting, transient, non-permanent असा अर्थ होतो. तुला नक्की काय म्हणायचं तिथे ते कळलं नाही.

'अकस्मात' काही करत नाहीत. अकस्मात घटना होतात. unexpected असा अर्थ होतो. कदाचित 'तडका फडकी' ठरवले म्हणणे, किंवा 'अचानक विचार आला आणि ठरवले' म्हणणे चालले असते.

दैवजात दु:खे भरता मधे ओळ आहे
अतर्क्य ना झाले काही जरी अकस्मात

रसास्वाद शब्द सुद्धा तिथे बरोबर नाही असं मला वाटतं पण तो का बरोबर नाही याचं विश्लेषण नाही करता येणार.

फोटो अतिशय छान आहेत.


Dipadeshpande
Friday, March 02, 2007 - 7:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी,
फोटो खूप सुन्दर आहेत.


Manuswini
Saturday, March 03, 2007 - 5:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान वाटले वाचुन, त्या झोपलेल्या मारुतीची गोष्ट काय आहे ते नाही सांगीतले.

Jo_s
Saturday, March 03, 2007 - 10:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

bee छान लिहीलय, फोटोही छान आलेत.

Bee
Monday, March 05, 2007 - 8:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शोनू, दिपा, मनु, जो - अभिप्राय दिल्याबद्दल धन्यवाद!


Bee
Monday, March 05, 2007 - 8:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनु, मी रिक्षावाल्याला झोपलेल्या मारतोतीबद्दल विचारले पण त्यालाही काही माहिती नव्हते. तो मारोती चुंबकीय आहे हे मला नंतर घरी आल्यावर शेजारच्या जोशींकडून माहिती पडले. मी पुर्वी कधीच 'शनी यंत्र' बघितले नव्हते जे मला ह्या मंदीरात बघायला मिळाले.

Mahaguru
Tuesday, March 06, 2007 - 1:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोणारच्या हनुमान हा झोपलेला आहे हे माहिती नव्हते. माझ्या माहिती प्रमाणे फक्त दोनच झोपलेले हनुमान देवस्थळे आहेत. एक खुलताबाद (औरंगाबाद जवळ) आणि दुसरे उत्तर प्रदेशाजवळ. त्याची दंतकथा अशी सांगितली की हनुमान जेव्हा लक्ष्मणासाठी औषधी वनस्पती आणायला हिमालयाकडे गेला त्यावेळी फक्त २ वेळा विश्रांती साठी थांबला आणि ती ही दोन देवस्थाने. पुराणातल्या कथे मधे तरी असे कुठे सापडले नाही.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators