Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
gajanandesai
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती

Hitguj » Rangiberangi » Members A-N » gajanandesai « Previous Next »

ÈÈ EaI gaNaoXaaya namaÁ ÈÈ
­­­­


या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता

या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना

या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता

सा माम् पातु सरस्वती भगवती निःशेष जाड्याऽपहा||


हावीपर्यंत मला एकूण चार शाळा बदलाव्या लागल्या. बालपणातली काही वर्षं मी माझ्या गावी माझ्या आजीजवळ होतो. आणि त्या गावातली प्राथमिक शाळा ही त्यातली सगळ्यात पहिली. आमचा गाव म्हणजे बत्तीस शिराळ्यातलं एक अगदी छोटं खेडं. पाण्याचं दुर्भिक्ष वगैरे वगैरे अनेक समस्यांना तोंड देणार्‍या अनेक खेड्यांसारखंच एक. गावात सहावीपर्यंतच शाळा. सहावीनंतर पुढे शिकायचे असेल तर शेजारच्या गावी म्हणजे माझ्या आजोळी जावे लागायचे. तेथे दहावीपर्यंतचे हायस्कूल होते. त्या शाळेत येण्याजाण्याकरता एस. टी. ची सोय नसल्यामुळे ये-जा पायी करावी लागायची.

गावातल्या आमच्या शाळेची अधिकृत इमारत म्हणजे दोन प्रशस्त वर्ग असलेली एक कौलारू इमारत. त्यातल्या पहिल्या वर्गात पहिलीचा वर्ग बसायचा आणि पार्टीशन करून तेथेच हेडमास्तरांचं छोटंसं ऑफिस थाटलेलं. तेच स्टाफ रूम पण. शाळेची कागदपत्रे, हजेरी, टाचणवही हे ठेवण्यासाठी शाळेत लाकडाच्या काही भल्यामोठ्या मजबूत पेट्या होत्या, त्या एकीवर एक रचून या पार्टीशनची भिंत तयार केली होती... शाळेतल्या दुसर्‍या वर्गात दोन वर्ग भरायचे, दुसरी आणि तिसरी. चौथीचा वर्ग आमच्या घरी माडीवर भरायचा. गावात तालमीची इमारत होती तिच्या माडीवर पाचवी भरायची आणि गावच्या ग्रामपंचायतीच्या कार्यालयात सहावी!

मुख्याध्यापकांना धरून या शाळेत एकूण चार शिक्षक होते. पैकी मुख्याध्यापक म्हणजे यवतकर गुरूजी पहिलीला शिकवायचे. त्यांना सगळे आबा म्हणत. गोटखिंडीचे सावंत गुरूजी दुसरी आणि तिसरीला शिकवायचे. पाटील गुरूजी चौथीला आणि मुळीक गुरूजी आणि सावंत गुरूजी मिळून पाचवी आणि सहावी सांभाळत. आमचे सगळे गुरूजी दुसर्‍या गावाहून यायचे आणि आमच्या गावात शाळेच्या वेळेत येणारी एस. टी. नसल्यामुळे आजूबाजूच्या गावात आणून सोडणार्‍या एस. टी. ने तेथपर्यंत येऊन मग पुढे चालत आमच्या गावात शाळेला यायचे. हे सगळे शिक्षक म्हणजे शिक्षणकार्याला वाहून घेतलेले, शिकवणे म्हणजे केवळ नोकरी म्हणून नव्हे तर जगण्याचा एक भाग म्हणून आवडीने करणारे असे हाडाचे शिक्षक होते. आणि गावात, 'एकदा पोरगं साळंत टाकलंय न्हवं का, मग घोर मिटला!' एवढा विश्वास त्यांनी माझ्या या अडाणी गावात कमावला होता.

... छडी हा शाळेचा अविभाज्य असा घटक होता. पाटील गुरूजी गमतीने तिला मावशीबाय म्हणायचे. आणि शिस्तभंग किंवा इतर कुठलाही गुन्हा - शाळेत असेपर्यंतच नाही तर शाळा सुटल्यावरही - करणार्‍यावर या मावशीबायची पघळ कृपा व्हायची. यामुळेच शाळेतल्या शिक्षकांविषयी पालकांच्या मनात अतिशय आदर असायचा. एकतर चार बुकं शिकलेली सज्जन माणसं आणि त्यात आपल्या पाल्याला घडवणारे. आणि हा आदर त्यांच्या वागण्या बोलण्यातून स्पष्ट दिसायचा. कधी गुरुजी घरी आले (जन गणना वगैरेच्या कारणाने) तर फडताळाच्या अगदी तळाशी ठेवलेली ठेवणीतली शाल काढून त्यांच्यासाठी बसायला अंथरली जायची... परिणामी विद्यार्थ्यांवर शाळेच्या शिस्तीची जशी एक जरब होती, त्याचबरोबर गुरुजींविषयी अत्यंत आदरही वाटायचा.

शाळेत सरकारी शिपाई नव्हता आणि त्यामुळे शाळेतली कामे म्हणजे पाणी भरणे, शाळेची आणि शाळेच्या अंगणाची झाडलोट करणे इथपासून ते शाळेच्या वेळांनुसार घंटा वाजवणे इथपर्यंत, आम्हा विद्यार्थ्यांनाच करावी लागत. शनिवारची शाळा सकाळी सातला भरायची आणि अकरा वाजता सुटायची. मग प्रत्येक शनिवारी शाळा सुटल्यावर शाळेचे सगळे वर्ग शेणाने स्वच्छ सारवून घेण्यात येत आणि वर्षातून एकदा संपूर्ण शाळेला रंग देण्यात येई... शाळा रंगवणे हा प्रकार आम्हाला खूप आनंद देई. त्यासाठी गावातून अनेक शिड्या गोळा केल्या जात आणि दोन तीन शिड्या एकीला एक जोडून एक मोठ्ठी शिडी, अशा चारपाच मोठ्या शिड्या तयार करण्यात येत. गुरूजी रंग कालवून पत्र्याच्या डब्यात, बादलीत ओतून शिडीवर हव्या त्या उंचीवर बांधायचे आणि केरसूनी हातात देऊन आम्हाला शिडीवर चढवायचे. खाली चारपाच जणांनी शिडी घट्ट धरून ठेवायची. आणि ती केरसूनी रंगात बुडवून आम्ही शाळेच्या भिंतींवर सपासप वार करायचो. शाळा रंगवून झाल्यावर शाळेच्या भिंतींवर चिकटवण्यासाठी आम्ही कागदाचे तक्ते तयार करायचो. आपापल्या अभ्यासक्रमातल्या गणिताची सूत्रे, भाषांमधील व्याकरणातील अव्यये, समानार्थी-विरुद्धार्थी शब्द, वाक्प्रयोग, इतिहासातल्या सनावळ्या, वंशवृक्ष, भूगोलातील प्रादेशिक माहिती हे सगळं रंगीत स्केचपेन वापरून लिहायचो आणि त्यांनी आपापले वर्ग सजवायचो. सावंत गुरूजी इतिहासातील प्रसंग, विज्ञानातील प्रयोग, आणि शाळेच्या प्रथमदर्शनी भिंतीवर भारताचा, महाराष्ट्राचा, जिल्ह्याचा आणि तालुक्याचा असे चार नकाशे रेखाटायचे. चांगला वर्ग सजवणार्‍या वर्गाला बक्षीस मिळे. खूप मजा यायची.


Scout म्हणजे बालवीर. (मुलगी असेल तर तिला Guide म्हणतात.) स्वावलंबन, स्वसंरक्षण आणि समाजाला उपयोगी पडणे हे त्याचे ब्रीद असते. बदल्यात तो कसलीही अपेक्षा ठेवत नाही. स्काऊटची शिकवण आम्हाला शाळेतून दिली जायची. प्रत्येकाने आपण समाजात राहतो, त्याशिवाय जगूच शकत नाही हे नेहमी लक्षात ठेवायला हवे, आपण समाजासाठी काही करतो म्हणजे समाजावर उपकार करत नाही तर आपण त्या समाजाचे देणे लागतो आणि त्याची परतफेड करणे हे आपले कर्तव्यच आहे. हे आमच्या मनावर बिंबवले जाई.

वर्षातून एकदा स्काऊटचा मेळावा भरायचा. (त्याचं खरं नाव स्काऊट मेळावा असं असलं तरी आमच्या तोंडी फक्त 'स्काऊट' असंच बसलेलं... स्काऊटला जायचं!) जिल्हा परिषदेतल्या सगळ्या शाळा त्यात सहभागी होत असत. हा स्काऊट मेळावा म्हणजे एक अतिशय सुंदर असा सोहळा असतो. तो एखाद्या गावाशेजारील विस्तीर्ण मोकळ्या पठारावर भरवण्यात येतो. मेळाव्याची तारीख आणि कोणत्या गावी भरणार हे ठिकाण सगळ्या शाळांना कळवण्यात येई. आणि मग सगळ्या शाळांतून उत्साहाचे भरते येई. हा मेळावा तीन दिवसांचा असायचा. त्यात विविध स्पर्धा ठेवलेल्या असायच्या. पहिला दिवस हा त्या ठिकाणी दाखल होऊन आपल्या शाळेच्या तंबूसाठी आखून दिलेली जागा स्वच्छ करून शाळेचा तंबू टाकायचा, तंबूचे अंगण, आजूबाजूचा परिसर ठाकठीक करायचा (या टापटिपीला काही गुण राखून ठेवलेले असत) , पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करायची असा स्थिरस्थावर होण्यात जाई. रात्री प्रकाशासाठी या मेळाव्याच्या केंद्रस्थानी एक विजेचा शक्तिशाली दिवा असला तरी तंबूत प्रकाशाकरता मशाली असायच्या. पहिल्या दिवशी हळूहळू ते पठार युनीफॉर्ममधल्या असंख्य उत्साही विद्यार्थ्यांनी फुलून जाई... प्रत्येक दिवशी सायंकाळी सगळ्या शाळांची सामुहीक कवायत व्हायची. काटेकोर रांगांमध्ये उभे राहून एवढ्या जणांनी एकाच लयीत केलेल्या कवायती पाहणे हा एक नयनरम्य अनुभव असतो. (एकदा अगदी चुकून माझ्या सुदैवाने मला या मेळाव्यात पुढे येऊन, 'एक साथ सावधान!', 'विश्राम!', 'पिछे मुड', 'बैठेंगे बैठ जाव!' अशा ऑर्डर्स या प्रचंड ताफ्याला द्यायची संधी मिळाली तेव्हा मला कळले की आपल्या या कवायती नुसत्या बघायलाही किती सुंदर दिसतात!)

या मेळाव्यात मुख्य आकर्षण असायचे ते दुसर्‍या दिवशी रात्री होणार्‍या सांस्कृतीक कार्यक्रमांचे! रात्री मोठी शेकोटी पेटवून तिच्या भोवती फेर धरून म्हटलेल्या शेकोटीगीताने या स्पर्धेला प्रारंभ होई. सगळ्या शाळांच्या सहभागामुळे या स्पर्धेत मोठीच चुरस असायची. सगळ्यांमधून आपल्या शाळेला बक्षीस मिळावे यासाठी आधी जो तो मजबूत तयारी करीत असायचा. हा कार्यक्रम बघण्यासाठी आजूबाजूच्या गावातले लोक आवर्जून यायचे. त्यामुळे प्रत्येकासमोर इज्जत का सवाल असायचा. तिसर्‍या दिवशी सकाळी सहभोजनाची पंगत उठायची. त्यानंतर शोभायात्रा नावाची एक स्पर्धा असायची आणि मग शिक्षणाधिकार्‍यांच्या हस्ते किंवा त्यांच्या उपस्थितीत एखाद्या मान्यवर व्यक्तीच्या हस्ते होणार्‍या बक्षीस समारंभाने या सोहळ्याची सांगता व्हायची.

...तर त्यावर्षी सांस्कृतीक रात्रीसाठी आपण एक शेतकरी गीत बसवायचे असे आमच्या शाळेत घाटत होते. एक शेतकरी असतो त्याची बायको माहेरी जाण्यासाठी रुसून बसलेली असते. पण हा शेतकरी काही ऐकायला तयार नसतो. आधी हे काम कर आणि मग जा! हा त्याचा हेका. त्याच्या कामाची जंत्री काही संपत नसते. पण माहेरी जायला मिळेल म्हणून ती तो जे सांगेल ते सगळे करते आणि मग माहेरी जाते, असे ते गीत होते. त्यावर समुहनृत्य बसवायचे होते. आणि गायनही अर्थात आम्हालाच करायचे होते. कारण कॅसेट टाकून रेडीमेड गाण्यावर नुसतं येऊन नाचून जाणार्‍या शाळेला कधीच बक्षीस मिळायचे नाही. नाचताना दमल्यावर शेवटी शेवटी नीट गाता येत नाही त्यामुळे असे गाणे असेल तर गाण्यासाठी विद्यार्थ्यांची स्वतंत्र टीम सहभागी करण्याची मुभा असायची. वाद्यांची साथ देण्यासाठी मेळाव्यातर्फे वादकांची टीम असायची. आवश्यक वाटल्यास त्यांची मदत घेण्याचीही मुभा असे. आमच्या गाण्यात एक शेतकर्‍यांची रांग आणि एक शेतकरणींची अशा दोन रांगा होत्या. शाळेत, आपल्याला या स्काऊट मेळाव्याला जायला मिळावे असे प्रत्येकाला वाटे. पण सहलीप्रमाणे सगळ्यांनाच जाता यायचे नाही. स्पर्धांमध्ये ज्यांचा सहभाग असेल त्यांना आणि संबंधितांनाच फक्त जायला मिळे. मुलींना पाठवायला पालक तयार नसत. पर्यायाने गाण्यातील शेतकरणीचे काम पण मुलांनाच करायला लागणार होते.


- आणि रांगेतल्या सगळ्यात पहिल्या शेतकरणीसाठी माझी निवड करण्यात आली! त्या शेतकरणीने मला थोडे खट्टू केले पण म्हटले चला शेतकरीण तर शेतकरीण. स्काऊटला तर जायला मिळणार! इतर स्पर्धांतील सहभागाच्या दृष्टीने कार्यक्रम ठरवले गेले. त्याप्रमाणे निवड केली गेली, आणि त्या दिशेने आमच्या तालमी सुरू झाल्या. शोभायात्रेसाठी आम्ही जोतिबाचा छबिना काढायचा ठरवले. आदल्या आठवड्यात आम्ही शाळेचा तंबू धुवून आणला. तो धुवायचा म्हणजे त्याचे बोचके उचलून गुरुजींसोबत विहिरीवर जायचे. तिथे एक दगडी कुंड असायचा. (म्हणजे टब!) त्यात निरमा पावडर टाकायची. पाणी शेंदून त्या कुंडात भरपूर फेस करायचा. त्यात तंबू भिजायला घालायचा. आणि जेवून घ्यायचे. जेवून झाल्यावर दोघादोघांच्या जोड्या करायच्या आणि एकेका जोडीने अगदी पाय दुखेपर्यंत त्या कुंडात नाचायचे! मधूनच गुरुजी, 'हो हो रे हो हो रे ह्हो!' असे ओरडून थांबवून तंबूची खालची बाजू वर करायचे मग कुंडातील थयथयाट पुन्हा सुरू होई...

शेवटी तो दिवस आला. दोन दिवस पुरतील एवढ्या चपात्या, तेल-चटणी आणि भजी बांधून घेऊन, तंबू, बांबू, कवायतीकरता लेझिम, लाठ्या, dumbbells तसेच पांघरुणं वगैरे वगैरे पाठीवर टाकून आमची फौज स्काऊटच्या ठिकाणी उतरली. आणि सगळे कामाला लागले. मी ज्या गाण्यात भाग घेतला होता त्यातल्या शेतकरणीला साडी, गळ्यात, कानात दागिने, बांगड्या आणि कपाळावर मोठ्ठच्या मोठं कुंकू अशी वेशभूषा होती. आम्हाला साड्या नेसवायला, शिक्षकांपैकी एकजण पत्नीला घेऊन थेट त्या ठिकाणी येणार होते. पण काही कारणाने त्या येऊ शकल्या नाहीत.

ऐन वेळी आमची चांगलीच पंचाईत झाली. आता आम्हाला साड्या कोण नेसवणार? एखाद्या शिक्षिकेची मदत मिळू शकेल असा विचार करून आमचे गुरुजी कन्याशाळेच्या एका तंबूत गेले आणि त्यांच्या शिक्षिकेला विनंती केली की, आमच्या पोरांना तेवढ्या साड्या नेसवून द्याल का? त्या बाई म्हणाल्या ठिक आहे, त्यात काय एवढे? रात्री आठच्या दरम्यान येऊन तुमच्या मुलांना साड्या नेसवून जाईन असे आश्वासन त्यांनी आमच्या गुरुजींना दिले. आम्ही निर्धास्त झालो. त्या दिवशी सात वाजता गुरुजी जाऊन पुन्हा त्यांना आठवण करून आले. पण 'हो हो आलेच आता तुम्ही चला पुढे' असे सांगितलेल्या त्या बाईंचा साडे आठ वाजायला आले तरी पत्ता नव्हता. गुरुजी पुन्हा गेले तर त्या वैतागून म्हणाल्या की आता तुम्हीच नेसवा हो! आमच्या मुलींना पण तयार करायचे आहे! आता मात्र गुरुजींच्या पण तोंडचे पाणी पळाले. आम्ही बाकी सारा मेक - अप करून साड्या घेऊन बसलेलो. गुरूजी डोक्याला हात लावून बसले.

एव्हाना तिकडे कार्यक्रम सुरूही झाला होता. आमचीही धडधड आता वाढायला लागली होती. शेवटी जवळच असलेलं पाण्याचं मोठं पातेलं पालथं घालून त्यावर गुरूजी बसले आणि 'आपापल्या साड्या घेऊन रांगेत माझ्यासमोर या' असे फर्मान आम्हाला सोडले! त्यांनीच आम्हाला साड्या नेसवल्या. आम्ही तयार झालो. त्या साडीत मला कमालीचे uncomfortable वाटत होते. आम्ही आमच्या शाळेचे नाव पुकारण्याची वाट बघत बसलो. मग एकदाचे आमच्या शाळेचे नाव पुकारले आणि आम्ही ओळीने एकदाचे रंगमंचावर गेलो! गाणे सुरू झाले. गाणे साधारण मध्यावर आले असेल आणि मला काहीतरी घोळ होतोय असे वाटू लागले! मला साडी सावरता येत नव्हती. हे'वाटणे'वाढतच चालले होते. आमच्या गाण्याची आधी भरपूर प्रॅक्टीस झाली होती पण हे साडी वगैरे मला नविन होते. आणि एका क्षणी माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला की माझी साडी सुटली आहे!

आता आपली चांगलीच फजिती होणार असा विचार मनात आल्यावर मी पार गडबडून गेलो. साडी सावरण्याचा व्यर्थ प्रयत्न करू लागलो. पण छे! त्याचा उलट परिणाम झाला. त्या नादात मला गाण्याचे शब्द आठवेनात की नाचाच्या steps आठवेनात! माझी कानशिलं एकदम गरम झाली. आता आपले काही चालत नाही हे उमगल्यावर शेवटी सगळी साडी गुंडाळून पोटाशी धरून, ओठ आवळून मी माझ्या जागेवर तसाच उभा राहिलो! नुसताच इकडे तिकडे पाहू लागलो. एव्हाना हा प्रकार शिक्षक आणि प्रेक्षकांच्याही लक्षात आला असावा कारण स्टेजवर वेळेच्या सूचनेची शिटी वाजवणार्‍या माणसापासून सगळे प्रेक्षक खो खो हसत होते. मी आणखीणच बावरून गेलो. हातपाय बधीर पडले आणि काही न सुचून मी तिथेच फतकल घातले! समोर सगळे जोरजोरात हसत होते.

गाणे संपल्यावर सगळे सहकारी निघून गेले. आमचे गुरूजी आले आणि माझ्या दंडाला धरून त्यांनी जवळ जवळ फरफटतच मला स्टेजवरून ओढून नेले! आणि हास्याची लाट आणखीनच जोरात उसळली.

पुढे परतीच्या प्रवासात आणि नंतरही बरेच दिवस हा विषय सगळ्यांना पुरला.
सुरूवातीला मी मनातून एकदम निराश झालो. हे लक्षात आल्यावर माझ्या मुख्याध्यापकांनी मला बोलावून घेतले आणि समजावले. शेवटी म्हणाले, 'अरे यडा की शाना तू? चोर नाही तर चोराचा लंगोट! एवढी लोकं तुझ्यामुळं खदखदून हसली हे काय सोप्पं काम आहे का? तू मुळीच काळजी करू नको. काहीच बिघडलेलं नाही.' आणि हे शिरसावंद्य मानून आम्ही पण'बर' म्हटलं. :-)


त्यानंतर पुढच्या वर्षी ( या प्रकारानंतर
:-) ) स्काऊटसाठी नृत्य बसवण्यापेक्षा काहीतरी बैठा कार्यक्रम बसवूया यावर आमच्या शाळेत एकमत व्हायला वेळ लागला नाही. त्यावेळी आमच्या घरी आम्हाला संगीत शिकवण्यासाठी एक संगीत शिक्षक नेमले होते. मग त्यातलेच काही बसवूया असे ठरले. आम्ही तशी तयारी सुरू केली. आणि मी माझ्या सहकार्‍यांच्या आणि तबला, हार्मोनिअम, टाळ, चिपळ्या यांच्या सहाय्याने वारकरी वेषात संत जनाबाईंचा 'धरीला पंढरीचा चोर गळा बांधोनिया दोर' हा अभंग गायला आणि आमच्या शाळेने द्वितीय क्रमांक पटकावला!
If You Can Keep Your Head

"If you can keep your head when all about you
      Are losing theirs and blaming it on you;
If you can trust yourself when all men doubt you,
      But make allowance for their doubting too;
If you can wait and not be tired by waiting,
      Or being lied about, don't deal in lies,
Or being hated, don't give way to hating,
      And yet don't look too good, nor talk too wise.
If you can bear to hear the truth you have spoken
      Twisted by knaves to make a trap for fools,
Or watch the things you gave your life broken,
      And stoop to build 'em up with worn-out tools.
If you can talk with crowds and keep your virtue,
      Or walk with Kings - nor loose the common touch,
If niether foes nor loving friends can hurt you,
      If all men count with you, but none too much;
If you can fill the unforgiving minute
      With sixty seconds' worth of distance run,
Yours is the Earth and everything that's in it,
      And - which is more - you'll be a Man, my son!"

-Rudyard Kipling
[Some stanza's from the poem]
न मार्गशीर्ष-पौषात जेव्हा बोचरी थंडी पडायची तेव्हा पावसाच्या पाण्यावर येणार्‍या पिकांची सुगी करून, त्याच जागी केलेली रब्बी पिके खुरपणीला आलेली असत. हवेत गारवा, सगळीकडे अजूनही असलेली हिरवळ, शेतात वार्‍याच्या लयीवर हलणारी गहू, हरभरा, वाटाणा यांची चिमुकली रोपं, खळाळत वाहणारे ओढे आणि गावाला सगळीकडून वेढणार्‍या डोंगरांवर वाढलेल्या कमरेइतक्या गवतावर अखंड लाटा उमटवणारा वारा... या सगळ्यांमुळे हे दिवस संपूच नयेत असं वाटायचं. पण म्हणतात ना- शाळू दिवस... कसे भुर्रकन निघून जातात.. आणि मग येतो रखरखीत उन्हाळा!

तर या शाळू दिवसांतच - खरेतर पावसाळ्यातल्या पिकांबरोबरच केलेले पण मुद्दाम या दिवसांची मजा चाखायला मागे रेंगाळणारे पीक म्हणजे पावटा! तो आपल्या हिरव्यागार पसरट पानांनी आणि पांढर्‍या शुभ्र फुलोर्‍याने शेताचा बांध न् बांध सजवून टाकायचा. आणि मग त्याच फुलांच्या घसाला त्याच्या शेंगा लागायच्या. या शेंगा म्हणजेच 'चिंबं' भरायला लागली की आमच्या शाळेत पुन्हा एक उत्साह भरून यायचा आणि आम्हाला निराळेच वेध लागायचे. ते असायचे वनभोजनाचे!

असे सगळीकडून जुळून आले म्हणजे गुरुजींच्या मागे आमची पिरपिर सुरू व्हायची- "गुरुजी वनभोजन!" "गुरुजी वनभोजन!" "गुरुजी मग केव्हा जायचे वनभोजनाला?".. गुरुजींच्या मागे हा धोशा लागला की मग आमच्या वनभोजनाचा दिवस पक्का व्हायचा. तो एका पूर्ण दिवसाचा कार्यक्रम असायचा. आमची चंगळ.

वनभोजनाच्या दिवशी अगदी अंथरुणातून उठल्यापासून आम्ही वेगळ्याच जगात तरंगत असायचो. त्या दिवशी प्रत्येकाने आपापल्या घरातून भाकरी, तांदूळ, चटणी-मीठ इ. आणि मुख्य म्हणजे एका गाठोड्यातून कमीतकमी आपल्याला पुरतील एवढे शेतातून काढलेले पावटे घेऊन शाळेच्या गणवेषात नेहमीच्या वेळेआधी शाळेत हजर व्हायचे! शाळेत आल्यावर, वनभोजनाला गेल्यावर तिथे लागणार्‍या सामानाची बांधाबांध सुरू व्हायची. दोन मोठेच्या मोठे टोप, तेवढीच मोठी उलताणी, आणखी दोन जरा लहान टोप, मोठ्या पळ्या(डाव) आणि नेहमीचे कवायतींचे सामान-ढोल, पडघम, लेझिम, लाठ्या, Dumbbells वगैरे...

ही सगळी तयारी झाल्यावर मग शाळेतल्या वार्ताफलकावर मोठ्या झोकात 'वनभोजन' असे लिहून त्याखाली आम्ही वनभोजनाला कुठे जाणार आहोत त्या ठिकाणाचे नाव भिजवलेल्या रंगीत खडूने लिहिले जाई आणि प्रार्थना म्हणून झाल्यावर दोघादोघांच्या जोड्या करून रांगेत आमची सेना ढोलताश्यांच्या गजरात त्या दिशेने कूच करायची. सोबतीला बेंबीच्या देठापासून दिलेल्या साक्षरता, स्वातंत्र्य, देशभक्त यांच्यावरच्या घोषणा!

तिथे पोहोचेपर्यंत ऊन चांगलेच वर आलेले असायचे. आमचा तळ जवळच एखादी विहीर असणार्‍या दाट सावलीच्या मोठ्या झाडाखाली पडायचा. मग आपल्या पिशव्या ठेऊन थोडे हाशहूश करायचे आणि पुढच्या तयारीला लागायचे. सगळ्यात आधी चुलीसाठी योग्य आकाराचे दगड शोधून आणायचे. वार्‍याची दिशा बघून गुरुजी त्या दगडांच्या पाहिजे तेवढ्या उंचीच्या तीन मोठ्या चुली मांडायचे. (या चुली घरातल्या नेहमीच्या नाजूक, नक्षीदार आणि सारवून निगा राखलेल्या चुलींच्या पुढे अगदीच रांगड्या आणि ओबडधोबड वाटायच्या. म्हणून त्यांना तसलेच रांगडे आणि ओबडधोबड नाव-चुलवण!)

त्यानंतरचे काम म्हणजे सरपण जमवायचे. सगळ्यांनी आणलेले तांदूळ आणि पावटे यांचे वेगवेगळे ढीग करून भगिनी मंडळ त्याची नीटवाट करायला लागायचे. आणि आम्ही झाडांच्या वाळलेल्या फांद्या, वाळलेले शेण, काटक्या हे सगळे गोळा करण्यासाठी चारी दिशेला पांगायचो.

तोपर्यंत गुरुजी ते आणलेले मोठे टोप घासून त्यांना बाहेरून मातीचा पातळ लेप द्यायचे. (म्हणजे टोप जाळाने काळे होत नाहीत आणि पुन्हा स्वच्छ करायला सोपे पडते.)

ही सगळी व्यवस्था झाल्यावर बरीच खटपट करून ती चुलवणं पेटवली जायची. तांदूळ धुवून शिजायला टाकले जायचे आणि त्यानंतर या वनभोजनाच्या केंद्रस्थानी असलेल्या पावट्याला फोडणी दिली जायची! तोपर्यंत आमच्या पोटात कावकाव सुरू व्हायला लागायची. मग हे 'भोजन' शिजेपर्यंत झाडाखाली बसून आम्ही शाळेत बसवलेली सगळी गाणी म्हणून टाकायचो. (जागेवर बसूनच:-)) नक्कला वगैरे प्रकारांना ऊत येई. आमच्या शिक्षकांच्या नक्कला त्यांच्याचसमोर करण्याची ही एकमेव संधी आम्हाला मिळायची. आणि हसून हसून सगळ्यांची पुरेवाट व्हायची.

एव्हाना भाताचा आणि त्या शिजत आलेल्या कालवणाचा सुगंध जोरजोरात त्या जाळाच्या धगीसह आमच्यापर्यंत येऊ लागायचा आणि आमच्या माना पुन्हा पुन्हा त्या चुलवणांकडे वळायच्या. आयशप्पथ! भूक कसली खवळून उठायची! ..भात आणि कालवण शिजल्यावर वाढपे-पाणके नेमले जायचे आणि मग आपापल्या थाळ्या आणि तांब्यांचा ठणाणा करत आमची एकच एक गोलाकार पंगत पडायची.
सोबत दुमडून बांधून आणलेल्या भाकरीचे आतापर्यंत उन्हामुळे तुकडे झालेले असत. ती भाकरी, थाळीतच वाढलेले ते वाफाळते कालवण, वाट्टेल तसे वेडेवाकडे फोडलेल्या कांद्याचे तुकडे आणि अजून पाणीसुद्धा नीट न मुरलेला तो गरम गरम भात... अहाहा! त्या वनभोजनातला तो अक्षरश: परमोच्च बिंदू असायचा! या मोठ्या पंगतीनंतर वाढपे-पाणके आणि गुरुजींची एक छोटी पंगत बसायची. त्यानंतर सगळी भांडी स्वच्छ करून मग शिक्षकांसहीत आम्ही सगळे कबड्डी, खोखो खेळायचो. चार पाच वाजायला आल्यावर मग कवायती व्हायच्या आणि परत दोघादोघांच्या रांगा करून आम्ही शाळेत परतायचो. तिथे वन्दे मातरम् म्हणायचो आणि दमून भागून आपापल्या घरी जायचो.
..

ध्ये गावाला जाऊन आलो. यावेळी काही कारणाने एप्रिलमध्ये गावच्या यात्रेला जाता आले नाही. त्यामुळे मे अखेरीस सुटी काढून काहीशा आडनिड्या वेळी गेलो. गेल्यावर पाणी-बिनी घेतघेतच माझी सगळी विचारपूस करायला सुरूवात होते. सगळ्यांची, एकूणच गावाची ख्यालखुशाली मिळाल्याशिवाय गावात आल्यासारखे वाटत नाही. घरात पोहोचण्यापूर्वीच वाटेत दोन आत्यांची गावं लागतात आणि तिथूनच ख्यालखुशाली सुरू होते. तर बोलता बोलता आत्या म्हणाली की, "अरे, परटाची वनुबाई दोन महिने इस्लामपुरात हॉस्पीटलात होती. आता घरी आणून दीड महिना झाला. सगळं अंथरुणावरच चाललंय. लकवा झालाय तिला. डावी बाजू पार लुळी पडलीय.. शश्या आता परत गेलाय. सतीश काम सोडून तीनचार महिने तिची औषधपाणी बघतोय.. दैवानं तरी किती अंत बघायचा असल्या गरीबांचा? मागच्या आठवड्यात आप्पा खुर्चीत बसता बसता कसे घसरले आणि त्यांचे माकड हाड मोडले.. त्यांना दुसर्‍याच्या मदतीशिवाय ना उठबस करता येत, ना चालता येत.. गुणाची पोरं तेवढी पोटाला आलीत.. "
फार वाईट वाटलं ऐकून. अर्थात मी जाऊन भेटून यावं हे या बोलण्यामागे ओघाने आलेच.

पिकणार्‍या जमिनीची दोन तीन तुकडी आणि वंशपरंपरागत चालत आलेला व्यवसाय यावर गुजराण करणारं हे कुटुंब. वनुबाई कुणाच्यात तरी रोजगारावर काम करायची आणि आप्पा लोकांचे कपडे इस्त्री करून द्यायचे. त्यासाठी शेजारच्या गावात पायपीट करायचे. एवढे करून पण एवढ्या लहान लहान खेड्यांतून असे कितीशे कपडे मिळणार? पैशाची चणचण कायमच.. यातूनच आलेले दारूचे व्यसन.. गावातल्या मिळतील त्या वाकळा, गोधड्या धुवून त्यातून बदल्यात काही धान्य त्यांना मिळायचे. दोन मोठ्या मुलींसह सहा मुले. त्यातल्या एका मुलीचं नाव पमो. त्यामुळं आम्ही लहान मुले वनुबाईला पमूची आई म्हणायचो. संसाराची ओढाताण विचारायला नको. अपार कष्ट पाचवीलाच पुजलेले. तरीही आहे त्यात समाधान मानून ते जगायचे. कुणाच्या अध्यात ना मध्यात. सुरूवातीपासूनच या कुटुंबाबद्दल सगळ्यांना आपुकली वाटत आलेली. मुलं शिकून काहीतरी करतील म्हणून सगळ्यांनाच शाळेत घातलेले. ती फारशी शिकली नाहीतच. पुढे दोन्ही मुलींची लग्नं झाली. आणि मुलं काम करण्याजोगी झाल्यावर एकेकाने धडपडत कुठेतरी काम शोधलेले. पुढे ती चारही मुलं इचलकरंजीला आली आणि तिथे एकत्र राहू लागली. पुढे आईबापांना पण तिकडेच घेऊन गेली आणि तेव्हापासून आतापर्यंत ते सगळे तिथेच राहत होते. मोठ्या दोन मुलांची लग्न झाली. त्यानंतर ते कधीतरीच गावाला यायचे, दोन तीन वर्षातून एकदा. माझी गाठ तर कितीतरी वर्षांतून कधीतरी पडायची. भेटल्यावर ती दोघंही भरभरून बोलायची. पमूच्या आईचा आणि आप्पांचाही आमच्यावर खूप जीव आणि कौतुक. आणि म्हणून मोठे झाल्यावर शक्य होईल तेव्हा आठवणीने भेटल्यावर त्यांना फार आनंद व्हायचा. आतेकडून आता हे ऐकल्यावर खूपच वाईट वाटलं. आमच्या घराच्या पुढच्या रस्त्यापलीकडे त्यांच घर. आमच्या घराकडे पाठ असलेले.

भेटायला गेलो तेव्हा सतीश आण्णा आणि त्याची बायको घरात होते. माझा आवाज ऐकल्याबरोबर आत जमिनीवर अंथरूणात पडून असलेल्या पमूच्या आईंनी "अगं हा कधी आला?" असं जवळजवळ ओरडूनच विचारलं. उठायची धडपड करू लागल्या. पण लगेचच त्यांच्या लक्षात आले, ही नुसतीच धडपड.. मी झपाट्याने आत गेलो आणि त्यांच्या उशाशी बसलो. त्यांनी पुन्हा उठायची धडपड केली आणि शेवटी असहायतेनं ढसाढसा रडू लागल्या. मला काय करावे तेच सुचेना. बोलायचे पण. डोळे बोट बोट खोल गेलेले. आपला दुसर्‍याला कमीत कमी ताप व्हावा म्हणून अन्न जवळ जवळ वर्ज्यच केलेलं. त्यातून आलेला अशक्तपणा आणि क्षीण झालेली प्रतिकारशक्ती याने अधूनमधून अंगात ताप यायचा. खूप रडल्या. मी गप्प बसून राहिलो. काय बोलायचे? मला आतून भडभडून आलं होतं. जरा मोकळ्या झाल्यावर बोलायला लागल्या. मी उगीच इकडची तिकडची विचारपूस करायला सुरूवात केली. तुझं कसं चाललंय? शिक्षण झालं का? चांगली नोकरी मिळाली का? आई-बाबा आणि घरातले सगळे कसे आहेत? अजूनही भांडता का रे आप-आपसात? असं खूप बोलल्या त्या. आणि अचानक पुन्हा गाडी त्याच रुळावर आली. "माझ्या मुलांनी खूप केलं बघ माझ्यासाठी... अजिबात हयगय केली नाही, औषधपाण्याची, दवाखान्याची, की शुश्रुषा करण्याची. त्यांनी किती करायचं? आता मी काही यातून उठणार नाही... मग देवानं आणखी कसला विचार करायचा ठेवला आहे?..." म्हणून पुन्हा हुंदके देऊन रडू लागल्या. शेवटच्या वाक्यानं एवढा वेळ दुसर्‍या कोपर्‍यात शांत बसलेले आप्पा पण रडायला लागले. ही गेली तर माझं कसं व्हायचं?....

"हा सतीश चार महिने झाले काम सोडून माझ्यासाठी इथे बसला आहे. आज इकडचे औषध आण, उद्या तो काढा कढवून पाज, परवा कुठले आयुर्वेदीक औषध आण. काय उपयोग या सार्‍या धडपडीचा? आणखी किती दिवस तो असा राहणार? किती ताप ह्यांना? त्यातच आप्पांचं असं झालं.... किती करायचं पोरांनी?..." ...या एकाही प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे नव्हते. "पमूच्या आई असं काय बोलता? सारखं अजिबात रडायचं नाही. आईवडिलांची सेवा करण्यात कसला आलाय ताप? ती न करून असं काय मिळवणार आहेत ते? तुम्हाला वाटतंय ना, ह्यांना ताप कमी व्हावा, तर त्यासाठी तुम्ही व्यवस्थित जेवण, औषध वगैरे घ्यायला नको का? येईल त्याच्याजवळ असे रडून त्रास कशाला करून घ्यायचा?" असं काहीतरी बोलत राहिलो. खूपवेळ बसलो. शेवटी "निघू मग आता मी?" असं विचारलं. त्या गप्प झाल्या. आलेलं रडू आवरत त्या कशाबशा म्हणाल्या "आता परत कधी भेटणार? माहित नाही.. पुन्हा गाठ पडेल की नाही.." चुळबूळ करत हळूच म्हणाल्या "मला जरा उठवून बसव." मी आणि आण्णाने त्यांना उठवून बसवले.
मला जवळ बोलावून उजव्या हाताने माझा चेहरा कुरवाळला आणि म्हणाल्या "खूप मोठा हो" ...माझ्या गालावर - त्या जन्मभर कष्ट आणि कष्टच करून खरबुडीत झालेल्या - त्यांच्या हाताचा स्पर्श झाला तेव्हा मला गलबलून आलं. डोळे केव्हा वाहायला लागले ते कळलं नाही. एवढं निर्व्याज प्रेम करणार्‍या माणसांना, कसलीच अपेक्षा न ठेवता आतून आलेल्या या सदिच्छांच्या बदल्यात द्यायला माझ्याकडे काय आहे?
जीवे अधिक तू माझ्या हृदयाला
तिन्हीसांजा सखे मिळाल्या



tinhisanja

tumacaI dad Aaplaa saMvaad
Owner gajanandesai Type HTG0001



 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators