हा देखील आपल्या नेहमीच्या बघण्यातला वृक्ष. जंगलात तर तो दिसतोच पण शहरातही दिसू शकतो.
हा ओळखायची महत्वाची खुण म्हणजे, या झाडाची हि फ़ळे. अशी फळे झाडावर घोसाघोसानी लगडलेली असतात.
Terminalia tomentosa असे याचे शास्त्रीय नाव. संस्कृतमधेही अर्जुन असेच याचे नाव आहे.
याचे झाड खुप उंच वाढते. २५ ते ३० मीटर्स उंची असते. झाडाचा विस्तारही खुप असतो. रस्त्याच्या कडेने असतात ते अंग चोरुन घेतात, पण जंगलात मात्र ते भरपूर पसरतात. याची पाने वीतभर लांबीची व चंद्रकोरीप्रमाणे मागे झुकलेली असतात.
याची साल वरुन पांढरी असते आणि झाडाचे खोड आतुन लाल असते. ( ऐनाचे झाड पण असेच असते. त्याची साल मात्र आधी पांढरी असली तरी सुकल्यावर लालसर असते. अर्जुनाची पांढरीच राहते. )
अर्जुनाची साल वर्षातून एकदा आपोआप गळून पडते. याला वरच्या फोटोतल्याप्रमाणे पंचधारेची फळे येतात. हिरवी असली तरी पानापेक्षा वेगळ्या छटेमुळे सहज दिसतात. हि फळे मात्र चवीला कडवट असतात.
याचे लाकूड मजबूत असते. घरबांधणीत त्याचा उपयोग होतो. अर्जुनाची साल औषधी आहे. तिच्या राखेत ३४ टक्के शुद्ध चुना सापडतो.
अर्जुनाच्या सालीपासून अर्जुनारिश्ट हे प्रसिद्ध औषध तयार करतात. त्याचा हृदयविकारात छान उपयोग होतो. याच्या सालीचे चूर्ण दूधात उकळुन देतात, त्याने रक्तवाहिन्या मजबूत होतात, व हृदयाला बल मिळते.
याची सालीत व्रणलेखनाचा गुणही आहे त्यामूळे, जखमा भरुन येण्यास तिचा उपयोग होतो. हाडाच्या बळकटीसाठी, क्षयरोगावर, मुरुमावर या सालीचा उपयोग होतो.
सातार्याला ठोसेघर परिसरात याची अनेक झाडे आहेत. कोकणात जागोजागी दिसतो हा. मुंबईत देखील बीकेसी मधे याची झाडे आहेत.
