Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through May 06, 2007

Hitguj » Rangiberangi » Members A-N » dineshvs » Archive through May 06, 2007 « Previous Next »


Sunday, April 15, 2007 - 4:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

kailasapati
या फ़ुलाला नागचाफा म्हणायची चुक बरेच जण करतात. माझा पण असाच गैरसमज होता. हा आहे कैलासपति. Couroupita guianensis . या नावावरुन सुचित होतेय त्याप्रमाणे याचे मूळस्थान गियाना. पण आपल्याकडे सगळीकडेच छान वाढतो.
या झाडाचे सगळे अदभुत. याची उंची प्रचंड. फांद्याचा दाट पसारा. पाने हाताच्या पंज्यासारखी आणि कायम हिरवीगार. या झाडाची पानगळ वर्षातुन दोनदा होते, पण नविन पालवी ईतक्या झटकन येते, कि हा वृक्ष निष्पर्ण असा फारसा दिसतच नाही. फुलावर येण्यापुर्वी याचे रुप तसे सामान्यच असते.
पण मग अचानक याच्या उभ्या खोडाला नेहमीपेक्षा वेगळ्या फ़ांद्या फ़ुटतात. शंकराच्या जटाच जणु. या फांद्या सदैव खालीच झुकलेल्या असतात. त्यावर वेगवेगळ्या आकाराच्या कळ्या येतात. उमलण्याच्या आदल्या दिवशी हि कळी चांगली दीड दोन ईंच व्यासाची होते. आणि. रंगाने सुरेख मोतिया रंगाची, मिटलेल्या पाकळ्यांची कड मात्र गुलाबी.
उमलल्याबरोबर याचा धुंद दरवळ सगळीकडे पसरतो. जाड सहा खोलगट पाकळ्या. मधे पांढरे केसर आणि मधोमध शिवलिंगासारखा एक स्त्रीकेसर. याचाच एक भाग नागाच्या फ़ण्यासारखा दिसतो आणि त्याला असतात जांभळे पुंकेसर. या फ़ण्याने जणु शिवलिंगावर छत्र धरलेले असते.
संध्याकाळी या पाकळ्या सुट्या होवुन खाली पडतात आणि तो फण्यासारखा भागहि गळुन जातो. उरलेल्या भागाचे एक छोट्या फ़ळात रुपांतर होते. हे फळ वर्षभर वाढतच असते. पुर्ण वाढ झालेले फळ चांगले, असोल्या नारळाएवढे मोठे होते. तपकिरी रंगाचे हे फळ, तोफगोळ्यासारखे दिसते, म्हणुन याला कॅनन बॉल ट्री पण म्हणतात.
हि फळे मग खाली पडुन फ़ुटतात, आत पिवळा चिकट गर आणि काळ्या बिया असतात. याला वास मात्र अगदी घाणेरडा आंबुस असा येतो.
पुण्यात बालगंधर्वच्या आवारात हि झाडे आहेत. वरच्या फोटोत आहे ती जरा गडद जात. यापेक्षा फ़िक्या रंगाची पण एक जात असते.
खरा नागचाफ़ा मात्र वेगळाच असतो. त्याचे नाव Mesua Ferrea याचे मूळ स्थान म्यानमार, मलेशिया, श्रीलंका आणि भारत हे देश. याची पाने साधारण निलगिरीसारखी असतात. वरुन हिरवी आणि खालुन फ़िकट रंगाची असतात. याला दोन इंच्य व्यासाची पांढरी फ़ुले येतात. चारच मोठ्या पाकळ्या असतात. मधे पिवळ्या पुंकेसराचा मोठा गुच्छ असतो.
या पुंकेसराना नागकेशर म्ह्णतात. रक्ती मूळव्याध, आव, अतिसार वैगरे विकारात होणारा अतिरक्तस्त्राव थांबवण्यासाठी रक्तस्तंभक म्हणुन हे वापरातात. याचे लाकुडहि अत्यंट टणक असते, म्हणुन त्याला सिलोन आयर्न वुड ट्री, असेहि नाव आहे.
कोल्हापुर भागात एक मसाल्याचा पदार्थ वापरतात. तो आणखीनच वेगळा. त्याने नाव नाकेश्वर. तो साधारण लंवगेसारखाच दिसतो.




Sunday, April 15, 2007 - 5:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Hirava chapha
हिरव्या चफ्याची आठवण निघालीच आहे.
लपविलास तू हिरवा चाफा, सुगंध त्याचा लपेल का
प्रीत लपवुनी लपेल का, हे माणिक वर्मांचे गाणे परिचयाचे आहेच.
याला आपण चाफा म्हणतो ते याच्या गंधावरुन. पण याचे झाड नसते, तर झुडुप असते. लांब विस्तारणार्‍या याच्या फांद्याना कसलातरी आधार लागतो.
झाड वयात आले कि पाना आड बारिक फुले लागतात. हो पानाच्या मागे दडायची वाईट खोड आहेच या झाडाला. पानाचा रंग आणि फुलांचा रंग एकच असल्याने, फुल दिसतहि नाही.
मी वर बारिक फुले असे लिहिलेय, कारण या फुलाला कळी हि अवस्थाच नसते. बारिक असले तरी ते फुलच असते. हळुहळु ते मोठे होत जाते आणि ते चक्क, पिकुन पिवळे होते. याच अवस्थेत त्याला तो गंध प्राप्त होतो.
पण कितीहि सुगंधी असले तरी हे फुल तोडणे वा डोक्यात माळणे कठिण असते. कारण पिकल्यावर याच्या पाकळ्या गळु लागतात. आणि देठहि अगदी छोटासा व बाकदार असतो. फुल तोडायचे तर पानासकटच तोडावे लागते.
पण ज्याना हौस आहे त्यानी, सोनाराकडे मिळतात ती चांदी सोन्याची फुले माळावीत.
या झाडाची माझी आठवण खुप जुनी आहे. माझ्या शाळेच्या बाजुलाच अभिनेत्री तनुजाचा बंगला होता. खेळताना आमचा बॉल बरेचवेळा तिच्या आवारात जायचा. ( आम्ही नाही टाकायचो. ) मग भिंतीवरुन उडी मारुन शोधाशोध, कुत्री मागे लागली कि पळापळ हे सगळे आलेच. तिच्या आवारात भलेमोठे हिरव्या चाफ्याचे झुडुप होते.
पण त्यावेळी फुलांसाठी नव्हे तर, फळांसाठी या झाडाशी लगट झाली. या झाडाला हिरव्या मोहक आकाराची फळे लागतात. तीदेखील पिकुन पिवळी होतात. त्याचा वास इतका मोहक होता कि मी ते फ़ळ चक्क चाखुन बघितले. चव गोडसर कडवट लागली. पण चांगली नव्हती.

Hiravya Chaphyachee phaLe
( हा अगोचरपणा मी आयुष्यात अनेकवेळा केलाय. पण जंगलात भटकताना, आकर्षक दिसणारी पण अनोळखी फळे कधीही खाऊ नयेत. ती विषारी असण्याची शक्यता जास्त असते. )
या चाफ्याचे आणखी एक भावंड नायजेरिआत बघितले. तसे ते नंतर भारतातही बघितले. याचे मात्र मोठे झाड असते. झाडाचा आकार शंकुसारखा. पाने खाली झुकलेली. पण याची फुले मात्र वरच्या बाजुला येतात. सगळी फांदी या फ़ुलानी भरुन जाते. सगळी फुले पोपटी रंगाची असतात. पाकळ्यांचा आकार आपल्या हिरव्या चाफ्यासारखाच असला तरी, प्रत्येक पाकळी मन मानेल तशी मुरडलेली असते. त्यामूळे लांबुन हि फुले न वाटता, कोवळी पालवीच वाटते. सुगंध मात्र थेट हिरव्या चाफ्यासारखाच. नायजेरियात मी मुद्दाम माझ्या चालकाला हि फ़ांदी तोडुन गाडीत ठेवायला लावायचो. वेगळ्या फ़्रेशनरची गरज उरायची नाही मग. या झाडाची फळे मात्र सोनचाफ्यासारखी असतात. या झाडाबद्दल आणखी एक जपुन ठेवलेली आठवण म्हणजे, याच झाडामुळे माझी आणि डॉ. डहाणुकरांची ओळख झाली.


चाफ्याचा चाप्टर संपवण्या आधी आणखी एका चाफ़्याचा उल्लेख केला पाहिजे. तो म्हणजे भुई चाफा. हा चाफा नव्हे, हे झाडहि नव्हे. हे आहे आलेहळदीच्या कुटुंबातले गोंडस बाळ.
वर्षभर याचा कंद जमिनीत निद्रावशेत असतो. पावसाला सुरवात झाली, कि याला एक निळा जांभळा तुरा फुटतो. जंगलात्तो आपसुक उगवतो. पण मुद्दाम लावलाहि जातो. याची खुप उत्सुकतेने वाट बघितली जाते. ती जागा शेणाने सारवुन ठेवली जाते, याचे सगळेच अवखळ. आधी कळस मग पाया अशी रित. याला निळी जांभळी फुले येतात. अत्यंत सुगंधी अशी फ़ि फुले, साताठ दिवस जोडीजोडीने फ़ुलत राहतात. हा सगळा सोहळा आटपला, कि मग याला पाने फुटतात. पावसाळा संपला कि परत हा कंद निद्रीस्त होतो.




Thursday, April 19, 2007 - 4:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुरुषी सौंदर्याचे वर्णन आपल्याकडे फारच अभावाने करतात. बघाना अगदी हेमा मालिनी पासुन शबाना आझमीच्या सौंदर्याचे वर्णन करणारी हिंदी गाणी असतील, पण हृतिकच्या देखणेपणाचे वर्णन करणारे गाणे आठवतेय का ?

पण हा श्लोक मात्र याला अपवाद असावा. कारण ईथे ज्याचे वर्णन केलेय, तो मुळातच एक मदनाचा पुतळा आहे.

आरग्वधो राजवृक्षः शम्पाकश्च्तुरंगुलः |

आरेवतो व्याधिघातः कृतमालः सुवर्णकः |

कर्णिकारो दीर्घफलः स्वर्णांगः स्वर्णभूषणः |

रोगांचा वध करणारा म्हणून आरग्वध
फुलांच्या दागिन्याने मढलेला म्हणून राजवृक्ष
व्याधींचे शमन करणारा म्हणून शम्पाक
पानांच्या जोड्यांमधलं अंतर चार बोटांचे म्हणून चरुरंगुल
शरीरातील मलाचे विसर्जन करणारा म्हणुन आरेवत
व्याधीना घातक असा व्याधिघात
स्वतःच्याच फुलांच्या माळा करुन ल्यालेला म्हणून कृतमाल
फुलांच्या सोनपिवळ्या रंगामूळे सुवर्णक
लांबट शेंगा येणारा म्हणुन दिर्घफल
सोन्याच्या आभूषणासारख्या फुलांमूळे स्वर्णभूषण


Bahava

तर हा आहे बहावा. Cassia fistula . भारतभर आढळणारा हा वृक्ष हिंदीत अमलताश म्हणुन ओळखला जातो. गोल्डन शॉवर, गोल्डन रेन आणि इंडियन लॅबर्नम ट्री हि इंग्लिश नावे.

बहाव्याचे झाड फार उंच वाढत नाही. याची साल झाडाच्या तरुणपणी हिरवट करडी असते पुढे ती निबर होत जाते. पाने संयुक्त. सहा ते आठ पानाचे मिळुन एक पान होते. साधारण निलगिरीच्या पानासारखी पण जरा रुंद आणि आखुड. पाने कोवळी असताना फ़िकट हिरवी असतात पण नंतर करडी होत जातात. एप्रिलमधे बहुतेक पाने गळतात. या झाडाच्या पानाफुलाचे पुर्वी अजिबात पटत नसे. दोघांपैकी एकच काहितरी झाडावर असे. आता मात्र समझौता झालेला दिसतोय. कारण एकाचवेळी दोन्ही दिसतात झाडावर.
अशी पाने गळाली कि या झाडाला सोनेरी स्वप्न पडते आणि फांद्यातुन खोडातुन अशी झुंबरं बाहेर पडतात. लांबी सहज एक ते दीड फ़ुट असते. अगदी नाजुक बाकदार देठाची पुर्ण उमललेली फुले ते अगदी पिटुकल्या कळ्या अशी झुंबरासारखी उतरंड दिसते झाडावर. क्रमाक्रमाने हि फुले फुलत जातात आणि मंदसा सुगंध हवेत पसरतो. पाच दलांचा फिक्कट हिरवा बाह्यकोष. लहानमोठ्या आकारांच्या पाच पाकळ्या. त्यासुद्धा हलकासा बाक असलेल्या. मध्यभागी हिरवा लांब बाकदार स्त्रीकेसर आणि भोवती पिवळे पुंकेसर. फुले तीनचार दिवस टिकतात, पण नंतर पाकळ्या थोड्या फ़िकट होत जातात.
हि अशी नजाकतीची अनेक झुंबरे झाडावर लटकत मंद हेलकावे खात असतात. पुर्वी लिरील साबणाची जाहिरात असायची त्यात, निंबुओकी सनसनाती ताजगीवाला, असे शब्द असत. या झाडाच्या फुलोर्‍याकडे बघुन मला तेच शब्द आठवतात. याचे सौंदर्य आहे ते फुलांच्या रंगात आणि संख्येत. तसे याचे झाड पुरुषभर उंचीचे झाले कि फुलु लागतेच. वरच्या फोटोत हे सौंदर्य जाणवत नाही, पण लांबुन फोटो घेतला असता तर फुले स्पष्ट दिसली नसती.
हा देखणा वृक्ष थायलंडचा राष्ट्रीय वृक्ष आहे तर केरळ राज्याच्या राज्यवृक्ष. तिथल्या विशु या सणात, या फुलांची देखणी सजावट केलेली असते.

यानंतर याला लांबट गोल शेंगा लागतात. पुर्वी उदबत्त्यांचे छापील पुडे नसायचे, त्यामुळे त्या ठेवायला पत्र्याच्या उभट डब्या असत. या शेंगा अगदी तश्याच दिसतात. त्याही फ़ुटभर लांब होतात. या शेंगांमुळेच या झाडाला लॅटिनमधे फ़िस्टुला म्हणतात. या गडद तपकिरी रंगाच्या शेंगा सहज मोडतात. आतमधे काळ्या चिकट गरात, चपट्या बिया असतात. हा गर चवीला गोड लागतो, आणि खायला काहिच हरकत नाही. हा गर औषधी आहे. पोटातील मल बाहेर काढणारा आहे. माकडाना पण हा गर फार आवडतो, म्हणुन याला बंदर कि लाठी असेहि नाव आहे. तसेच गोड गरामुळे याला पुडिंग पाईप ट्री असेहि म्हणतात.

याची पानेहि गोडसर चवीची असावीत. आपण नेहमी बघतो त्या पिवळ्या फुलपाखरांच्या अळ्या याच्या पानावर पोसतात. त्यामुळे खुपदा हि पाने कडेने अर्धगोल कातरलेली दिसतात. याचे लाकुड मात्र टणक असते.

वरच्या फोटोत दिसतोय त्या पिवळ्या रंगापेक्षा गडद आणि टोकदार पाकळ्यांची एक जात मी पनवेलला बघितलीय. ती फुले तर फारच सुंदर दिसतात.




Friday, April 20, 2007 - 3:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रुईया कॉलेजच्या मागे गेटजवळ एक मोठे झाड होते. २५ ते ३० सेमी लांबीरुंदीची पाने. तीसुद्धा खुप दाट. खालुन चंदेरी हिरवी तर वरच्या बाजुने काळपट हिरवी. खुप देखणे रुप होते ते. त्या झाडाखाली नेहमीच पिवळ्या केळ्याची साले पडलेली दिसायची. साले पण कशी तर अगदी नजाकतीने पाच भागात सोललेली. पण ईतक्या नीटसपणे केळी सोलुन खाणारा, साली अश्या रस्त्यावर का फ़ेकेल ?
याच झाडाखाली एक मंदसा सुगंध दरवळत रहायचा. एके दिवशी अगदीच रहावले नाही म्हणुन एक साल उचलुन घेतले. त्यावेळी लक्षात आले कि ते केळाचे साल नाही. आतुन पांढरे तर बाहेरुन हिरवट पिवळे असणारे ते एक फुलच आहे. त्याला बाहेरुप तपकिरी रंगाची भरड पुड चिकटवल्यासारखे काहितरी दिसत होते. शिवाय मधल्या भागात तपकिरी सुकलेले काहितरी होते. त्यावेळची ओळख तेवढीच. मग पुढे हा मुचकुंद भेटला.


<--------> muchakund

मधुबालाचे सौंदर्य काय होते ते मी सांगायला नको. पण व्हायचे काय, तर तिच्या रुपाकडे टक लावुन बघताना, तिच्या अभिनयाकडे पार दुर्लक्ष व्हायचे. तसेच मुचकुंदाचे होते. याची पाने ईतकी दिमाखदार असतात, कि फुलाकडे लक्षच जात नाही. शिवाय हि फुले असतात उंचावर. पानाच्या दाट पसार्‍यात दिसणारहि नाहीत.
हे वरचे फोटोज काढताना मला खुप प्रयत्न करावे लागले. माझे वेगवेगळ्या कोनातुन वाकुन कॅमेरा लावुन बघणे, यामुळी आजुबाजुच्या बघ्याना झाडावर सापबिप आलाय का असे वाटले.

अगदी पिवळ्या केळ्यासारखाच दिसणारा याचा कळा असतो. मग याच्या पाच बाहेरच्या पाकळ्या अलगद उकलतात आणि हे आतले आठ ते दहा सेमी उंचीचे फ़ुल नजरेस पडते. सकाळच्या वेळी तलम शुभ्र रंग असतो याचा, पण दुपार झाली कि पिवळे पडते आणि संध्याकाळी तर पार कोमेजुन जाते. हे फुल जेव्हा गळुन पडते त्यावेळी आतल्या फुलाचा मागमुसही राहिलेला नसतो. त्यामुळे अनेकजणाना या पाच बाह्यदलात एक वेगळे फुल असते हेच माहित नसते. पण खाली पडलेल्या बाह्यदलानाहि मंदसा सुगंध येत असतो.

याचे नाव Pterospermum acerifolium मेपल वृक्षाचे दुसरे नाव असेर आणि याचीहे पाने तशीच म्हणुन हे नाव. याच्या भल्यामोठ्या पानामुळे याला डिनरप्लेट ट्री असेहि नाव आहे. दाट सावलीमूळे सावलीसाठी हा उत्तम. शिवाय सुगंधी फुलांचा बोनस आहेच.

याला छोट्या घोसाळ्यासारखी खडबडीत सालीची फळे लागतात. ती सुकली कि पाच भागात उकलतात. त्यातल्या बियाना (sperm) पंख (Pteros) असतात, म्हणुन हे नाव. खरे तर कर्णिकार आणि मुचकुंद हे दोन सारखे असले तरी वेगळे वृक्ष आहेत. कर्णिकार जरा मोठा तर मुचकुंद जरा लहान. ( पण हा कोण ते मला नाही सांगता येणार )




Saturday, April 21, 2007 - 1:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वरचेच फ़ुल, पण जरा वेगळ्या कोनातून
muchakund1


Sunday, April 22, 2007 - 4:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ही आहेत गुलाबी करवंदं
gulabee karavand

आणि ही आहे कौशीची अनोखी शेंग
kausheechee sheng


Sunday, April 22, 2007 - 4:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अंजनाचा आधीचा फोटो परिपुर्ण नव्हता. आज मुद्दाम परत त्याचा शोध घेत गेलो, तर हे नजारे बघता आले.

anjan1


Sunday, April 22, 2007 - 4:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एखाद्या निजामाच्या जवाहिराचे प्रदर्शनच जणु.

anjan2


Sunday, April 22, 2007 - 4:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

किती नेमके रंग, किती सुंदर कलाकुसर, आणि हे सगळे एकाच झाडावर, एकाच वेळी

anjan3


Monday, April 23, 2007 - 4:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वसंताची पहिली चाहुल लागते ती बहुदा पळसाला. तशी लहानपणापसुन आपली पळसाची, निदान पळसाला पाने तीनच, या म्हणीपुरती तरी ओळख असते. इतिहासातली प्लासीची लढाई, पण पळसाशीच नाते सांगते


paLas

होळीच्या सुमारास जंगलात गेलात तर पळसाची अनेक झाडे चंदेरी भगव्या फुलानी सजलेली दिसतात. याचे झाड तसे लहानखुरेच असते. फांद्या काळ्या रंगाच्या आणि वेड्यावाकड्या वाढलेल्या असतात.
एरवी जाडसर त्रिदलीय पानानी बहरलेला वृक्ष डिसेंबरमधे मात्र वेड्यावाकड्या काळ्या फ़ांद्यांमूळे अगदीच कुरुप दिसतो. जानेवारीच्या शेवटी यावर जाडसर काळ्या कळ्या येतात, आणि फ़ेब्रुवारी मार्चमधे हे सगळे झाड फुलानी भरुन जाते.

या फ़ुलाना वास नसतो, पण याचा आकार मात्र खुपच वैशिष्ठपुर्ण असतो. एकंदर पाच पाकळ्यापैकी एक मोठी असते व ती थेट पोपटाच्या चोचीसारखी बाकदार असते. या झाडाकडे बघुन शुकच कि काय, असा प्रश्न पडला असेल म्हणुन याचे संस्कृत नाव, किंशुक. ( किं शुकः ?) पण त्यापेक्षा बहिणाबाईंचे निरिक्षण जास्त सुक्ष्म आहे,

पयसाची लाल फुलं, हिरवे पान गेले झडी
विसरले चोची मिठू, गेले कोठी उडी

असे त्यानी नमुद करुन ठेवले आहे. याच्या पाकळ्यावर सुक्ष्म लव असते, त्यामुळे या केशरी रंगाला एक चंदेरी छटा येते, आणि त्याचमुळे काहि कोनातुन बघितल्यास हे झाड चमकते.
या फुलातला मकरंद चाखण्यासाठी शिंजिर, सुर्यपक्षी, मैना आदी पक्ष्यांची लगबग चाललेली असते. त्यावर येणार्‍या मधमाश्या खाण्यासाठी वेडा राघु पण ईथे घुटमळत असतो. आणि या सगळ्यांच्या गोंगाटानी हे झाड गजबजत असते.

फ़ुलांच्या पाकळ्याचा सडा झाडाखाली पडलेला असतो. या पाकळ्या रात्रभर पाण्यात ठेवुन कुस्करल्या कि सुंदर केशरी रंग तयार होतो. कपडे रंगवायला तो उपयोगी असतोच, पण नेमके रंगपंचमीचे निमित्त साधल्याने, नैसर्गिक आणि सुरक्षित रंगहि मिळतो. हि फ़ुले दाहनाशक असल्याने, उष्णतेच्या, पित्ताच्या विकारावर उपयोगी असतात. ती कफशामकहि असतात.

फुलानंतर याला शेंगा लागतात. आधी हिरवट केसाळ असणार्‍या या शेंगा मग पिवळट तपकिरी असतात. तीनचार इंच लांब शेंगेत एकच चपटी तपकिरी बी असते. यामुळे याचे शास्त्रीय नाव Butea monosperma . हे बी कृमिनाशक असते, आणि कृमिकुठार रस या आयुर्वेदिक औषधातले एक घटक असते.

या झाडापासुन एक डिंक मिळतो. बेंगल किनो नावाने ओळखला जाणारा हा डिंक, अनेक औषधात वापरला जातो. सालीचा उपयोग कातडे कमावण्यासाठीहि होतो.

याचे पाने तीन असतात. तीन चार इंच लांबरुंद असणारी हि पाने कोवळी असताना, पोपटी दिसत असली तरी मग मात्र जाड आणि मजबुत होत जातात. या पानांचा उपयोग पत्रावळी करण्यासाठी होतो. याची मुळेहि मजबुत असतात. त्यापासुन दोर वळुन, त्याच्या वहाणा बनवता येतात. या झाडावर लाखेच किडे पोसले जातात.

पळसाला ब्रम्हतेजाचे प्रतीक मानतात. त्याची तीन दले ब्रम्हा, विष्णु आणि महेशाची प्रतीक मानली जातात. बटुच्या हाती पळसाचा दंड दिला जातो. पुर्वा फाल्गुनी नक्षत्रावर जन्मणार्‍या व्यक्तींसाठी तो आराध्य वृक्ष आहे.

याची अगदी क्वचित दिसणारी पिवळी जातहि आहे. आपल्याकडच्या हवेत याचा फुलोरा दाट असतो, तर उत्तरेकडे तो विरळ असतो.

खास निवेदन. या भागात वापरलेला फोटो मी काढलेला नाही. यावर्षी पळसाची झाडे बघितली खरी, पण फोटोज काढायचे राहुन गेले. तर वरचा फोटो आपल्या मायबोलीवरच काहि वर्षांपुर्वी झळकला होता. खुप आवडला होता, म्हणुन सेव्ह करुन ठेवला होता. पण त्या कलाकाराचे नाव मात्र टिपून ठेवायचे राहून गेले. त्या कलाकाराचे मनापासुन आभार मानतानाच, या चित्राचा इथे वापर करण्यास हरकत नसावी, असे मी गृहित धरतोय



Tuesday, April 24, 2007 - 4:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पळसाच्या आगेमागे जंगलात परिभद्र फुलत असतो. या झाडाचे इंग्लिश नाव एरिथिना इंडिका. एरिथ्रिनाचा अर्थच मुळी रक्तवर्णाचा, असा होता. इंडिका म्हणजे भारताचा. याचे शास्त्रीय नाव Erythrinaa variegata . याचा वर्ण कसा तर लाल. केवळ लाल. कुठलिही भेसळ नसलेला लाल.

Ranpangara

बघा मी ईतका शब्दांचा खेळ कळतोय तरी फोटो बघताच ओळख पटली कि नाही ? हा आहे आपला पांगारा. अगदी लहानपणापासुन आपण याला बघत आलोय. याच्या गुलाबी राजम्यासारख्या दिसणार्‍या बिया जमिनीवर घासुन त्याचा चटका, देण्याचा खेळ आपण सगळेच खेळले असु.

वर लिहिल्याप्रमाणे याचा रंग लालभडक असतो. ग्रीष्माचा दाह जाणवु लागला. सगळीकडे धुळीचे साम्राज्य पसरले, झाडांच्या पानाना मरणकळा लागली, कि नेमका पांगारा फ़ुलु लागतो.
आपल्याकडे अगदी नैसर्गिकरित्या वाढतो हा. या झाडाचे खोड पांढरट रंगाचे असते, आणि पाने पळसासारखीच त्रिदलीय. पण त्यापेक्षा पातळ. याची हिरवीपिवळी नक्षीची पाने असलेली एक जात आता शोभेसाठी लावली जाते. ती मुद्दाम तयार केलेली नाही. निर्गातच ती तयार होते. तिला ओरिएंटालिस किंवा पार्सेली असे म्हणतात. एरवी याच्या पानाना तितकी शोभा नसते. तरिही हे झाड कायम नीटनेटके दिसते. अगदी पानगळ झालेली असली तरीही निष्पर्ण फांद्याहि सुरेख दिसतात. असे रुप फार दिवस नसतेच. लगेच हे झाड लालभडक फ़ुलानी भरुन जाते.

इंदिरा संतानी त्यांच्या मृदगंध कवितेत, याला सुर्योपासक म्हंटले आहे. याच्या फ़ुलात तशी एकच पाकळी मोठी असते. बाकिच्या चार अगदीच छोट्या. यातले पुंकेसरहि तसेच लालभडक. याचा तुरा तळाकडुन फ़ुलत जातो. लालभडक रंग याची खासियत असली तरी याची भगवी आणि पांढरी ( अल्बा ) फुले येणारी जातहि असते. पण त्या झाडाकडे बघुन समाधान होत नाही.
वरच्या फोटोत बघताय तो आहे रानपांगारा. ( एरिथ्रिना सुब्रोसा ) याची फुले थोडी लहान असतात.

पांगार्‍याच्या खोडावरहि बरेच काटे असतात. पण जसजसे झाड वाढत जाते तसे ते काटे बोथट होत जातात. पुढे त्याचा मागमुसहि उरत नाही.

हे झाड फ़ुलावर आले कि यावर जणु पक्षी सम्मेलनच भरते. कावळे, मैना, बुलबुल, कोकिळा, वेडा राघु यांची लगबग असते झाडावर. एक थवा उडुन गेला कि दुसरा येत असतो. अगदी मग्न होवुन सगळी मंडळी यातला मकरंद पित असतात. खारींची पण अखंड पळापळ चाललेली असते.

फ़ुले गळुन गेली कि याला फ़रसबीसारख्या शेंगा घोसानी लागतात. यथावकाश त्या तपकिरी रंगाच्या होतात, आणि त्यात बिया तयार होतात.

याच्या बिया तर रुजतातच. पण फ़ांद्याहि सहज जगतात. हे झाड दुष्काळाला उत्तम प्रकारे तोंड देते. याचे लाकुड मऊ असल्याने कोरीवकामासाठी उत्तम असते. पुर्वी याची पाने गायीगुराना खाऊ घालत असत. सध्या तसा वापर कमी झालाय.

याचे झाड एकटे असले तरी आपल्या डेरेदार आकारामुळे, घनदाट पानांमुळे आणि अर्थातच फुलांमुळे शोभुन दिसते. अगदी खार्‍या जमिनीतही उत्तम रित्या वाढते हे झाड.

याला कोरल ट्री आणि टायगर क्लॉ ट्री अशीहि नावे आहेत. याच्या बिया मात्र अखाद्यच नसुन विषारिही असतात.

याची एक जात कॉकस्पर कोरल ट्री (E. crista galli) अर्गेंटिनाचे राष्ट्रीय फ़ुल आहे तर कॅलिफ़ोर्निया, LA चा तो ऑफ़िशियल सिटि ट्री आहे.

याची झाडे मिरीचे वेल चढवण्यासाठी उपयोगी पडतात. कोको कॉफ़ीच्या बागामधे, सावलीसाठी हि झाडे लावतात. याची मुळे सरळ खोल जात असल्याने, पिकाना त्याच्याशी स्पर्धा करावी लागत नाही. या झाडांच्या दाट पानांमुळे उष्ण वारे व त्याबरोबर येणार्‍या रेतीला अटकाव होतो. शिवाय पानांपासुन उत्तम खत मिळते.

याच झाडापासुन परिभद्र नावाचे औषध मिळते. ते जंतुनाशक असुन सांधेदुखीवर उपयोगी आहे. पानांचा काढा कृमिनाशक आहे. स्त्रीयांच्या काहि रोगात हा काढा उपयोगी असतो. झाडाच्या सालीचा सारक म्हणुन उपयोग होतो.
एक खास सुचना, मी ईथे जे औषधी उपयोग लिहितो, ते पुरेश्या अभ्यासानेच लिहितो. पण कुठलेही औषध योग्य त्या वैद्याच्या सल्ल्यानेच घ्यायचे असते. अशी औषधे तयार करताना, झाडाचे वय, उपजाती अश्या बर्‍याच बाबी विचारात घ्यायच्या असतात.


Pangara


Wednesday, April 25, 2007 - 4:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जंगलात फ़िरताना आपण आपल्या सौंदर्याच्या कल्पनांचे ओझे घेऊनच जातो. फुल म्हंटले कि ते भडक रंगाचे असावे. सुवासिक असावे असे आपले पुर्वग्रह असतात.

या दिवसात अशी भटकंती करताना या साध्याश्या फुलांकडे लक्षहि जात नाही. ह्या गुच्छातली काहि फुले सुकल्यासारखी तपकिरी रंगाची दिसत असतात, आणि त्यामूळे जास्तच दुर्लक्षिली जातात.


kuDaa

हा आहे कुडा. आणखी नेमके सांगायचे तर सफ़ेद कुडा. डोंगरदर्‍यात, पायवाटेच्या काठाने अशी शेकडो फ़ुले फ़ुललेली असते. सुगंधाचे फवारे नसले तरी मंद सुवास असतोच.

आषाढस्य प्रथम दिवसे, पर्वतावर कृष्णमेघाकडे अलकानगरीतल्या प्रियेला प्रेमसंदेश पाठवण्यासाठी शापित यक्षाला याचना करायची आहे. पण त्यापुर्वी त्या कृष्णमेघाची त्याला पूजा करायची आहे. त्या दिवसात पर्वतावर ईतर फ़ुले कुठली मिळायला ? मग हि हजारोच्या संख्येने फ़ुललेली कुड्याची फुलेच उपयोगाला आली.

याची झाडे चांगली वीस पंचवीस फ़ुट वाढु शकतात. अशी काहि झाडे मी बघितलिही आहेत. प्रत्येक फांदीच्या टोकाशी असा गुच्छ असतोच. पण तरिही जास्त करुन याची छोटीछोटी झुडुपेच दिसतात.

याची पाने मोठीशी विड्याच्या पानासारखी दिसतात. अगदी तुकतुकीत दिसतात. वर्षभर हि पाने असतातच.

वत्सकः कुटजः शक्रोवृक्षकोगिरिमल्लिका |
बीजानीन्द्रयवास्तस्य तथोच्यन्तेक्लिकंगकाः ||
बृह्त्फ़लः श्वेतपुष्पः स्निग्धपत्रः पुमान्भवेत |

असे याचे वर्णन केले आहे. फ़ुले सरली कि याला लांबट शेंगा जोडीजोडीने येतात. या लांबलचक शेंगा एकमेकीना लपेटुन असतात. यात तपकिरी रंगाच्या, साधारण अळशीच्या बियांसारख्या दिसणार्‍या बिया असतात. त्याला पातळ पापुद्रे जोडलेले असल्याने, या बिया वार्‍याने दुर उडत जाऊन रुजतात.

या बियाना इंद्रयव असे खास नाव आहे. अतिसार, अमांश. रक्तस्त्राव, मूळव्याध, अग्निमांद्य या विकारात वापरले जाणारे कुटजरिष्ट औषध या कुड्यापासुनच करतात. याचे शास्त्रीय नाव आहे Holarrhena Antidysenterica काळ्या पानाची आणि पांढरीच पण वेगळी फ़ुले येणारी एक जात आहे, तिला म्हणतात काळा कुडा.
याच दिवसात येणार्‍या इष्टर सणाच्या दिवशी, सजावटीसाठी हि फुले उपलब्ध असतात, म्हणुन या झाडाचे नाव इष्टर ट्री सुद्धा आहे.

याच्या सालीपासुन ३० प्रकाराची अल्कलॉईड्स मिळतात. यापैकी कॉनेसाईन, अमिबासकट अनेक जिवाणुंचा नश करु शकते. काहि त्वचाविकारातही याचा चांगला उपयोग होतो. गोमूत्रात मिसळुन याच्या सालीचे चुर्ण वापरले जाते.

या दिवसात जरी हे झुडुप फुलानी भरुन जात असले तरी काहि फुले एरवीहि झाडावर दिसतात.
परत कधी हे झुडुप रस्त्याच्या कडेला दिसले तर, एक कृतज्ञतेची नजर अवश्य टाका.




Thursday, April 26, 2007 - 4:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सावरीचा वृक्षही तसा आपल्या सर्वांच्या परिचयाचा. ४० मीटर्सपर्यंत उंच वाढणारा हा वृक्ष, भारतात सगळीकडे दिसुन येतो.

याचे खोड काटेरी म्हणुन याला काटेसावर म्हणायचे. पण या दोन्ही नावांपेक्षा शाल्मली हे संस्कृत नाव जास्त गोड आहे. याचे पुर्वीचे शास्त्रीय नाव होते, साल्मलिका मलबारिका, पण आता मात्र हा वृक्ष Bombax ceiba या नावाने ओळखला जातो.


saavar

याची पाने हाताच्या बोटांसारखी पाच भागात विभागलेली असतात. वर्षभर हे झाड पानानी भरुन गेलेले असते. पानांचा रंगही तजेलदार हिरवा असतो.

पण डिसेंबरमधे बहुतेक सगळी पाने गळुन जातात. आणि याचे काटेरी अंग उघडे पडते. याची साल करडी असते, आकारहि खुप मोठा, पण या अवस्थेत एक आकार म्हणुन छान दिसत असला, तरी रुप बघवत नाही. जिवंतपणाचीही शंका येते.

आणि एकेदिवशी अचानक फ़ांद्यांवर छोट्या कळ्या दिसु लागतात. त्या कळ्या भराभर मोठ्या होत जातात. आणि हे चांगले घसघशीत मोठे फ़ुल उमलते. याचा बाह्यकोषहि चांगलाच मांसल असतो. पाच पाकळ्या पण जाड, गुलाबी वा लाल रंगाच्या असतात. आत पुंकेसराचा झुपका असतो. पाकळ्या गुलाबी असल्या तरी त्यावर निळसर झाक असते. चमकहि असते.
या फ़ुलात मकरंदहि असतोच. खारी आपल्या दोन्ही हातानी फ़ुले धरुन तो पित असतात. फ़ुलटोचे, दयाळ, मैना बुलबुल यांचाहि कलकलाट असतो. निष्पर्ण फांद्यांमूळे, आणि भल्यामोठ्या आकारामूळे, हि फ़ुले दुर अंतरावरुनही स्पष्ट दिसतात.

पण या सगळ्या मंडळींचा धुसमुसळेपणामूळे वा फ़ुलांच्या वजनामूळे म्हणा, हि फुले ताजी असतानाच धपकन खाली पडतात. रानातले ससे हरिणं आवडीने खातात हि फ़ुले. याची भाजीही करतात.

फ़ुलानंतर साधारण वीतभर लांबीच्या हिरव्या फळानी झाड भरु लागते. ही लवकरच तपकिरी होवुन, उन्हे चढली कि तडकतात. आणि मग त्यातुन सावरीचा मऊ कापुस वार्‍यावर उडु लागतो. खरे तर बियांचा प्रसार करण्याची ती या झाडाची युक्ती आहे. किडणीच्या आकाराच्या नाजुक काळ्या बियांचे ते केस असतात.

या दिवसात पावसाळ्यापुर्वीचे वारे वहात असतात, आणि त्यावर स्वार होवुन या बिया पुंजक्याने उडत असतात. प्रपंच सिनेमात, बैल तुझे हरिणावाणी, गाडीवान दादा, हे आशाचे, सीमावर चित्रीत झालेले गाणे आहे. त्या गाण्यात या उडणार्‍या कापसाची सुरेख दृष्ये टिपलीत.

कोकणात काटेरी झुडुपांमूळे हा कापुस खाली पसरतो, आणि बर्फ पडल्याचा भास होतो. पठारावर मात्र शेतातुन हा कापुस बराच दुरवर उडत जातो. तो गोळा करण्यासाठी खुप धावाधाव करावी लागते.

हा कापुस अत्यंत हलका, व न कुजणारा असल्याने, गादी उश्यांबरोबरच, लाईफ़ बेल्ट्स, इन्सुलेशन, साऊन्ड प्रूफ़ींगसाठी वापरता येतो. सर्जिकल ड्रेसींगसाठीदेखील तो वापरतात. चीनमधे यापासुन कापडहि विणले जाते. नाजुक लेस तयार केल्या जातात. यालाच सिल्क कॉटन ट्री असेहि नाव आहे.

या झाडावर अगदी बुंध्यावरहि मोठेमोठे पण बोथट काटे असतात. पण जसजसे झाडाचे वय वाढते तसतसे ते कमी होतात. याच्या सालीपासुन निघणारा गोंद, मोचरस म्हणुन ओळखला जातो. जुलाब, आव, अतिसार, रक्तस्त्राव यावर तो देतात. याच्या जरा जून झाडाची मुळे, सुकवुन मुसळी म्हणुन औषधात वापरतात. सहनही होत नाही, व सांगताही येत नाही, अश्या विकारात ते वापरतात.
मी वर फोटो टाकलाय त्यापेक्षा लाल रंगाचीहि एक जात दिसते. तिचा आकार एवढाच असतो. पण दक्षिण भारतात Bombax insigne Wall नावाची एक जात आढळते, तिची फुले भरपुर मोठी, म्हणजे यापेक्षा दुप्पट आकाराची असतात.

याची पांढरी जात Ceiba pentandra मूळची अमेझॉनमधली. आपल्याकडे क्वचित दिसत असली तरी दक्षिण भारतात खुप दिसते. याची फुले तितकी शुभ्र नसतात. आणि कापुसहि पिवळट रंगाचा असतो. पण तो लाईफ़ बेल्ट्स साठी जास्त उपयोगी असतो. याच झाडाला कपोक ट्री असेहि म्हणतात.

पिवळी सावर Cochlospermum religiosum हि आणखीनच वेगळी जात. याला सोनसावर म्हणत असलो तरी, गंगलाई, असे खास मराठी नावही आहे.
याची फ़ुले तेजस्वी पिवळ्या रंगाची असतात. कोकणात क्वचित दिसत असला तरी कात्रज घाटात याची बरीच झाडे आहेत. याचे झाड जरा लहान असते. आणि फ़ुलांचा आकार जरा पसरट असतो. हे झाड दुष्काळाला चांगले तोंड देऊ शकते व वणव्यातही तग धरु शकते. यापासुन मिळणारा गोंद पुस्तकबांधणीसाठी वापरला जात असे. याच गोंदामूळे याची सुकलेली फांदी तेजस्वी पिवळ्या ज्योतिने जळत राहते. म्हणुन याला टॉर्च ट्री असेहि नाव आहे.




Friday, April 27, 2007 - 4:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काश्मिर उच्चारले कि आपल्या मनात एक वेगळेच चित्र तयार होते, पण अगदी प्राचीनकाळापासुन काश्मिर आणि सौंदर्य हे सामानार्थी शब्द मानले जात असत. ईतके कि एका सर्वांगसुंदर वृक्षाला, काश्मरी, असे नाव दिलेले आहे.

shivaN

शास्त्रीय नाव, Gmelina arborea मराठीत याचे नाव शिवण किंवा शेवण. मराठीतल्या अनेक नावांचा संदर्भच लागत नाही. हिंदीत हा आहे गंभार. हा देखणा वृक्ष भारतात हिमालयापासुन थेट केरळपर्यंत सगळीकडे आढळतो.

गम्भारी भद्रपर्णीच श्रीपर्णी मधुपर्णिका |

काश्मरी कश्मरी हिरा काश्मर्यः पीतरोहिणी ||

अशी याची नावे. पिवळसर करड्या रंगाचे याचे खोड असते आणि हा वृक्ष बर्‍यापैकी उंचहि असतो. याची पाने साधारण पिंपळाच्या पानासारखी असली तरी जरा पातळ असतात. रंगाने जरा गडद असतात. झाड नेहमी पानानी डवरलेले असते. या झाडाखाली उभे राहुन वर बघितले तर पानातुन झरणारा हिरवा प्रकाश खुपच छान दिसतो. आणि झाडाखाली छान शीतल वातावरण असते. याची पाने गोडसर चवीची असतात. गुरे आवडीने खातात. हरणे, ससे, रानडुक्करे याची पाने व सालहि ओरबाडुन खातात. याच्या पानावर एका प्रकारचे रेशमाचे किडे पोसले जातात.

वसंत ऋतुमधे हा वृक्ष फुलायला लागला कि आणखीनच देखणा दिसु लागतो. फ़ुलाचा आकारहि खास. सगळ्या पाकळ्या एकत्र जोडलेल्या. चार पाकळ्या बाहेरच्या बाजुला झुकलेल्या. तर एक मोठी आणि सरळ ताठ उभी राहिलेली. एकंदर रुप एखाद्या ऑर्किडसारखे. रंगाने आधी पिवळी असतात, मग त्यात लालसर तपकिरी रंग भरला जातो. झाडावर हि फुले तुर्‍याने लागतात. शिवाय झाडाखाली देखील पडलेली असतात. या फ़ुलांचा वास आणि चवहि गोड असतो, आणि गुरे आवडीने खातात. रक्तदोषामधे आणि लेप्रसीच्या उपचारात फ़ुलांचा उपयोग होतो.

फ़ुले गेली कि सांधारण जांभळाच्या आकाराची फळे लागतात. लंबगोल अशी हि फळे तुकतुकीत हिरव्या रंगाची असतात आणि मग लालसर शेंदरी होतात. या फळाची चवदेखील कडवट गोड असते. काही आदीवासी ही फळे खातातहि. या फळांचा उपयोग तहान शोष कमी करण्यासाठी होतो. केश्य रसायनं मेध्यं शीतलं दाहपित्तजित, असे याच्या फळांचे वर्णन केले आहे.

हा वृक्ष नुसताच देखणा नाही तर बहुगुणी देखील आहे. आयुर्वेदातल्या बृहतपंचमुळांमधे याचा समावेश होतो. या मुळांपासुन चमकदार पिवळ्या रंगाचे तेल मिळते.

शिवणीची पानेहि शीतल गुणाची. मूत्रविकारात तसेच दाह कमी करण्यासाठी उपयोगी पडतात.
याचे खोडहि पिवळसर रंगाचे असते. यापासुन उत्तम कोळसा तयार होतो आणि तो बराच वेळ जळत राहतो. सुपीक जमिनीत हा व्यवस्थित वाढतो. पण जमीन सकस नसेल तर याची वाढ खुपच खुंटते. एका अर्थाने उत्तम वाढलेला शिवण म्हणजे जमिनीच्या कसदारपणाची खूण आहे.

हे लाकुड कुजत नाही शिवाय वाळवीलाही जुमानत नाही. फ़र्निचरसाठी ते वापरले जातेच पण खास करुन वाद्ये बनवण्यासाठी या लाकडाचा उपयोग होतो. टेनिस रॅकेटसाठी पण याचा उपयोग होतो तसेच कृत्रिम अवयव बनवण्यासाठी पण याचे लाकुड वापरतात. कागद करण्यासाठी पण याचा लगदा वापरतात.

गावठी उपचारात तर अनेक विकारांवर हा वापरतात.

ईतका देखणा आणि उपयोगी वृक्ष असुनही तूमच्यापैकी अनेकजणानी तो पाहिलाही नसेल. कदाचित बघितलेलाही असेल पण ओळख नसेल. तर अशी ओळख पटवणारी नजर लाभावी, म्हणून तर हे सगळे हिहितोय ना मी !

हा फ़ुलांचा हात पुढे करतोय.

ShivaNeechee phule


Monday, April 30, 2007 - 5:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आज आणखी एका देखण्या वृक्षाचा परिचय करुन घेऊया. हा आहे पिवळा टॅबेबुया. हा आपल्याकडे आलाय ब्राज़िलमधुन. तिथे त्याचे नाव आहे tacyba bebuya याचे शास्त्रीय नाव, Tabebuia argentea

Tabebuia vRux


याला मराठी नाव बहुतेक नाहीच. याचे खोड खडबडीत असते पण वर्षभर याच्यावर पाने असतात. पाच लांबट चमकदार पानांचे बनलेले एक संयुक्त पान असते. हिवाळ्यात मात्र सर्व पाने गळुन जातात. आणि मग हे सगळे झाड असे फुलानी बहरुन जाते. हा फोटो आहे कोल्हापुरच्या महावीर उद्यानातला. पण यापेक्षाहि जास्त फुले झाडावर असु शकतात. बेळगाव परिसरात, अशी अनेक झाडे मी बघितली आहेत. आता जरा फुलांकडे जवळुन बघु या.

pivaL tabebuia

याच्या तुतारीसारख्या आकारामुळे याला सिल्व्हर ट्रंपेट ट्री असेहि म्हणतात आणि सोन्यासारख्या झळाळत्या रंगामुळे याला गोल्ड ट्री असेहि म्हणतात.

याचा पिवळा रंग भलताच गडद असतो. आणि उन्हाळ्याच्या निरभ्र आकाशात तो आणखीनच उठुन दिसतो. तसा झाडाखालीही फुलांचा सडा असतो. पण तरीही झाडावर भरपुर फुले असतात. एप्रिल सरता सरता, यावर काहि कोवळी पाने येतात. ती चमचमत असतात. पण त्यावेळी फुलांची संख्या खुपच कमी झालेली असते. नाहीतर अशी हिरव्यापिवळ्या रंगाची उधळण नक्कीच नजरबंदी करणारी ठरली असती.

आपल्याकडे हा वृक्ष तसा अलिकडेच आलाय. पण आपल्याकडची हवा त्याला चांगलीच मानवते. पाण्याचा नीट निचरा होणार्‍या जमिनीत तो छानच वाढतो. आणि याची पाण्याची गरज फारच कमी असते. दुष्काळाला तो चांगलाच तोंड देऊ शकतो आणि निव्वळ पावसाच्या पाण्यावर वर्षभर तग धरु शकतो. उलट बहराच्या आधी याचे पाणी तोडले, तर तो आणखीनच भरभरुन फ़ुलतो.

तुलनेने नवा असल्याने, आपल्याकडे त्याचे औषधी उपयोग माहीत नाहीत. पण ब्राझिलमधे मात्र त्याची अंतर्साल खोकल्यावरती औषध म्हणुन वापरली जाता. या सालीचा काढा खासकरुन स्मोकर्स कफ साठी उपाय मानला जातो. हा काढा दिल्यानंतर उलट खोकला बळावतो, आणि सगळा कफ बाहेर पडतो.

याचे लाकुड पण खुपच किमती असते. अमेरिकेत तर त्याची तस्करी होत असे. या लाकडाचा फ़र्निचरसाठी उपयोग तर होतोच पण खास करुन डेकिंगसाठी हे लाकुड जास्त वापरले जाते. हे लाकुड नैसर्गिक रित्याच वाळवीप्रतिबंधक आहे. हे लाकुड आगप्रतिबंधक आहे आणि याबाबतीत त्याची गुणवत्ता सर्वोत्तम म्हणजे, A1 या दर्ज्याची आहे. हे लाकुड पाण्यापेक्षा जड असल्याने, पाण्यावर तरंगत नाही.




Monday, April 30, 2007 - 5:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुठल्याहि तरुण माणसाला खास करुन तो प्रेमात वैगरे पडला असेल तर, असे विचारले कि बाबा तुला पिवळ्या आणि गुलाबी रंगांपैकी कुठला रंग जास्त आवडतो, तर हटकुन तो गुलाबी रंगाला पसंती देईल.

पण टॅबेबुया च्या बाबतीत मात्र, निदान मी तरी पिवळ्या रंगाला झुकते माप देईन ( अर्थात मी तरुण नाही आणि प्रेमाबिमाचा माझ्याशी काही संबंध नाही, हा भाग अलहिदा )


gulabee tabebuia

हा आहे गुलाबी टॅबेबुया. Tabebuia rosea . हा देखील पिवळ्या टॅबेबुयासारखाच भरभरुन फ़ुलतो. पण तरिही तो नजरेत भरत नाही, याची कारणे दोन. एकतर जिथे पिवळा टॅबेबुया जिथे जेमतेम ९ ते १० मीटर्सची उंची गाठतो, तिथे हा त्याच्या तिप्पट उंची गाठतो. यामुळे याचा फ़ुलोरा नजरेच्या टप्प्यात नसतो. शिवाय उन्हाळ्याच्या निरभ्र निळ्या आकाशात हा रंग तितकासा उठुन दिसत नाही.

झाडाखाली याही फुलांचा सडा असतो, पण हे भाग्य केवळ बागेत लावलेल्या झाडाना. रस्त्याच्या कडेला हा लावलेला असेल तर याची हलकी फुले वाहतुकीमूळे आणि वार्‍यामूळे दुरवर विखुरली जातात. या फुलांचा रंग आणि आकार गळल्यावरहि बर्‍यापैकी टिकुन असला तरी, या कारणामुळे जरी तुमच्या पायाजवळ एखादे फुल सापडले, तर डोक्यावर हा बाबा असेल याची खात्री नाही देता येणार. पण तरिही लांबुन हा लक्षात आला, तर अवश्य जवळ जाऊन बघा.

या रंगाला मी एवढी नावं ठेवतोय. पण याची एक गर्दगुलाबी जातही असते. तिचे नाव टॅबेबुया अव्हेलांडी. हा खराच दुर्मिळ आहे. पुण्यात प्रभात रोडवरच्या पंधराव्या गल्लीत, सिंबॉयसिस शाळेजवळ मी हा बघितला होता. याचा रंग ईतका गडद असतो, कि थेट गुलबक्षीच्या फुलांचा भास होतो. शिवाय याच्या फुलांची रचना गोलाकार असल्याने, फांद्यांच्या टोकाना, गर्दगुलाबी गेंद लावल्यासारखे दिसतात.

सर्वच टॅबेबुयाना लांबट शेंगा लागतात आणि त्यात पंखधारी बियाही असतात.



Tuesday, May 01, 2007 - 3:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एखाद्या रात्री उशीरा घरी यावे तर दरवाज्याजवळ नुसता घमघमाट सुटलेला असतो. एक संमिश्र गंध. बकुळ, चाफा, रातराणी, प्राजक्त असे सगळेच सुगंध एकवटल्यासारखा सुगंध असतो हा, पण तरीही त्यात कुठेही मादकपणा नसतो. छाती भरुन घ्यावीशी वाटते या सुगंधाने. हा सुगंध असतो कुंतीचा अर्थात Murraya exotica चा

Kunti

बघितलतं ? नावातही या सुगंधाचे अनोखेपण उमटलेय. हे मूळचे ऑस्ट्रेलियामधले असे मानतात, तर तिथे कदाचित आशिया मधुनच गेले असावे.

आपल्याकडे हे झाड मुद्दाम अंगणाच्या कडेला लावलेले असते. याचा पसारा आटोपशीर असतो. दोनतीन मीटर्स उंची असु शकते. पण बहुदा छाटुन हे झाड छोटेच राखले जाते. पाने बरिचशी कढीपत्त्यासारखी. पण आकाराने थोडी मोठी व जास्त गडद हिरवी. हा हिरवा रंग काळपट वाटावा इतका गडद असतो.

अनेक पुस्तकातुन याच्या पानाची तुलना कढीपत्त्याच्या पानाशी केलेली आढळते, पण रोज बघणार्‍याला, या दोन झाडातला फरक सहज कळु शकतो. कढीपत्त्याची पाने फ़ांदीभोवती गोलाकारात येतात तर कुंतीची पाने फांदीच्या दोन बाजुलाच येतात. कढीपत्त्याच्या संयुक्त पानात, पानांची संख्या जास्त असते.

पण तरीही त्यांचे गोत्र एकच आहे. कुंतीची पाने चुरडली तर त्यालाहि कढीपत्त्याच्या पानासारखाच वास येतो, पण त्यात थोडासा लिंबाच्या पानाचा वासही मिसळल्यासारखा वाटतो. आणि तेहि साहजिकच आहे, कारण हे मुराया कुळ, सायट्रस च्या नात्यातलंच की.

कुंतीला मॉक ऑरेंज असेहि म्हणतात. संत्र्याच्या फुलांशी या फुलांचे खुप साम्य आहे.

याची फुले अगदी शुभ्र रंगाची. पावसाळ्यात पावसाचा थेंब पाण्यात पडला, कि जसा आकार तयार होतो, तसाच या फुलांचा आकार असतो. गर्द हिरव्या पानात याची शुभ्र फुले खुपच उठुन दिसतात. या शुभ्रतेची झळाळी उन्हात डोळे दिपवते. वरचा फोटो मुद्दाम तसा काढलाय.

पण याच्या फुलण्याचा तसा काहि निश्चित नियम नाही. पावसाळ्याच्या सुरवातीला याला एक मोठा बहर येतो. त्यानंतरहि तुरळक फुले येतच असतात. कधी गुच्छात तर कधी एकांडीही.

पण याचे खरे वैभव खुलते उत्तररात्री. अगदी पन्नास फ़ुटावरही याचा दरवळ जाणवतो.
झाडाखाली तर चांदण्याची बरसातच चाललेली असते जणु. या फुलांचे गळणेही अनोखे. यातली प्रत्येक शुभ्र पाकळी सुटी होवुन अलगद गळत राहते. हा वर्षाव रात्रभर धीम्या गतीने होत असतो. सकाळी या शुभ्र पाकळ्यांचा सडा झाडाखाली असतो, फ़ुलांच्या पायघड्या घातल्यासारखा.

फुलानंतर याला लंबगोल फळे लागतात. आधी हिरवी असणारी हि फळे मग लालचुटुक रंगाची होतात. याची पुर्ण पानगळ होत नसल्याने, शुभ्र फुले आणि लालचुटुक फळे, दोन्हीही झाडावर शोभुन दिसतात. याची लागवड कुंडीतही करता येते. आणि जर ते झाड घराजवळ असले, तर सगळे घर सुगंधी करायची किमया करु शकते.




Wednesday, May 02, 2007 - 5:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुंतीच्याच कुळातले दुसरे झाड म्हणजे आपला कढीपत्ता, किंवा Murraya koenigii . इंग्लिशमधे करी लीव्हज. या झाडाचे आणि कढी वा करीचे ईतके सख्य आहे कि अनेक भाषात, त्याच्या नावाच्या आगेमागे करी आहेच. उदा. थायलंड मधे तो आहे बै करी, मलेशियात आहे दौन करी तर इंडोनेशियातपण आहे तो दौन करि.
काही जुन्या मराठी पुस्तकात याचा उल्लेख करीपाकाची पाने असाहि केलेला असतो.


kaDheepatta

फ़ोडणीसाठी तेल तापत ठेवावे आणि मग जाऊन परसातल्या कढीपत्त्याची पाने तोडावीत, असे सुख मी आफ़्रिकेत अनुभवले आणि भारतातही. अनेक गृहीणींचे असे स्वप्न असते. पण घरात आणलेली पाने, आवर्जुन वापरली जातातच असे नाही. खुपदा फ़्रीजमधे ती पाने सुकुन जात असतात.

अनेक लहान मुलाना, ती पाने वेचुन बाजुला काढुन टाकायची खोड असते. पण ती खाणे आवश्यक आहे. एखादेवेळी जास्त पाने घरात आलीच, तर त्याची चटणी करुन ठेवली तर छान. खुप खमंग लागती ही चटणी.

कढीपत्त्याचे झाड तसे लहानखुरेच. दोन तीन मीटर्स पर्यंत वाढु शकते. पुर्वी याची एक मोठ्या पानाची जात बाजारात दिसायची, पण ती स्वादाला कमी असल्याने, सध्या बारिक पानाची जातच जास्त लोकप्रिय आहे. मोठी पाने अजुनही चिवडा, ढोकळा वैगरेच्या फ़ोडणीत वापरली जातात.

या झाडाना मार्चमधे वरीलप्रमाणे हिरव्या फुलांचा मोहोर येतो. मग याला वाटाण्याएवढी फळे लागतात. आधी हिरवी असणारी हि फळे नंतर गुलाबी व शेवटी काळी होतात. आत तपकिरी रंगाचे एक बी असते. या फळांचा गुच्छ खुपच छान दिसतो.

पण याचा सगळा स्वाद असतो तो याच्या पानात. तीसुद्धा जुन झाली तरच. कोवळ्या पानाना तितकासा स्वाद नसतो. फ़ुलानाही नसतो. फळे कच्ची असताना वा पिकल्यावरही तितकासा स्वाद नसतो. फळांचा गरही तुरटच लागतो. पण हि झाली माझी आवड. पक्ष्याना मात्र हि फळे खुप आवडतात. बुलबुल, सुतार, हॉर्नबिल, साळुंख्या सगळेच आपापला वाटा घेऊन जातात. या पक्ष्यांच्या कृपेनेच बहुदा, जंगलातही हि झाडे सुखाने वाढत असतात.

या झाडाखाली नेहमीच त्याची पिल्लावळ दिसत असते. आणि त्यातले पिल्लु, उचलुन नेले तर कुठेही सुखाने जगु शकते. या झाडाचे मुळ स्थान भारत आहे, आणि भारतात अगदी हिमालय सोडला, तर सगळीकडेच हे झाड आढळते.

आपल्या जेवणात याचा उपयोग सहेतुकच केला आहे. याच्या नियमित वापराने, कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतो, असे अलिकडे मला कळले. तसेच मधुमेहावर पण याचा उपयोग होतो.




Wednesday, May 02, 2007 - 5:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बकुळी माझी सखी जीवाची,
जन्मांतरीचे प्रेम दिले
तिला पाहता खुलते मी अन
मला पाहुनी तिही फुले


bakuL

बकुळीचे झाड खरे निर्मोही. फुलाचा फुला इतकाहि मोह नाही त्याला, असे डॉ डहाणुकरानी लिहुन ठेवले आहे. दुपार झाली कि याचे फुले गाळणे सुरु होते. याचे खाली पडणेहि इतके हळुवार आणि सहज असते, कि प्राजक्तासारखे ते आसवे गाळणे वैगरे वाटतच नाही.

याची लौकिक पुंजी तशी फारशी नाहीच. फुलाचा आकार जेमतेम एक सेमी. रंग म्हणाल तर टसर सिल्कसारखा मातकट पांढरा. अगदी पहाटे जरा शुभ्र असतो, पण सकाळच्या कोवळ्या उन्हातच तो काळवंडु लागतो. जरा उन जाणवु लागले कि पाकळ्यांची टोके करपु लागतातच. पाकळ्यांचा पोतही खरखरीत. पाकळ्या सोडल्या तर बाकिचे अवयव जाणवतही नाहीत.

पण हि सगळी कसर भरुन काढलीय ती अलौकिक सुगंधाने. झाडाखाली या सुगंधाची फारशी जाणीव होत नाही. खरे तर या झाडाचे रुप इतके साधे आहे कि नजरेला खास काहि वेगळे जाणवतही नाही. या झाडाची जाणीव बहुदा पायदळी पडलेल्या फुलांमुळेच होते. त्या झाडाखाली घटकाभर थांबावे आणि या फुलांचे गळणे अनुभवावेच एकदा. मग हळुहळु हा सुगंध आपल्याला वेढु लागतो. खालची फुले गोळा करण्याचा मोह आवरत नाही. आणि आपण गोळा करु लागलो, कि झाडाला याची जाणीव होते, आणि आपल्या आजुबाजुला ते मुद्दाम फुले टाकु लागते.

हे फुल निरखुन बघितले तर जाणवते कि फुलांच्या पाकळ्याच फक्त गळुन पडल्या आहेत. मधला बीजकोष झाडावर शाबुत आहे. त्यामुळेच या फुलाला एक आरपार छीद्र असते. अगदी खास ओवण्यासाठीच जणु. एवढेसे तर फ़ुल, एका गजर्‍यासाठी कितीतरी लागतील, असा विचार करत बसलात, तर तुमच्या कल्पनेपेक्षाही कमी वेळात गजरा तयार होईल, ईतकी फुले तुमच्या ओंजळीत असतील.

हि झाडे मी कोकणात तर बघतोच, पण पुण्यात आणि नाशकातही बघितली. त्यामुळे हे झाड कुठल्याही हवामानात वाढु शकते, असा कयास करायला हरकत नाही. मला सगळ्यात नवल वाटले जेव्हा मी मस्कतमधी हि झाडे बघितली तेव्हा. तिथल्या बागातुन तर मोठी झाडे आहेतच पण रस्त्याच्या कडेनेही भरपुर झाडे आहेत. अगदी पुरुषभर उंचीची झाडेहि भरभरुन फ़ुलतात तिथे. त्या लोकाना सुगंधाचे वेड आहेच, आणि हे झाडहि सुगंधाचे माप भरभरुन देते.
तिथल्या वास्तव्यात मी शुक्रवारी पहाटे बागेत जाऊन, भरपुर फुले गोळा करुन आणायचो. आठवडाभर घर सुगंधी होवुन जायचे. कपड्याच्या कपाटात ठेवली तर सगळे कपडे सुगंधी होवुन जायचे.

या झाडाना जांभळाएवढी फळेही लागतात. आधी हिरवी असणारी हि फळे मग फिक्कट केशरी रंगाची होतात. आत पिवळा पिठुळ गोडसर तुरट गर असतो. मायमुसॉप्स नावाने ओळखली जाणारी हि फळे खातातही. ( जगभरात हे झाड फ़ुलांपेक्षा फळासाठी ओळखले जाते ) पण त्याना तो सुगंध नसतो. या झाडाचे शास्त्रीय नाव Mimusops elengi या फ़ळांच्या तुरट चवीमुळे चार पाच फळे खाल्ली कि घश्याला कोरड पडते. या फळांचे सरबत करुन, मुत्रदोषावर दिले जाते.

हा तुरट रस बकुळीच्या सर्वांगात असतो. यामुळे आयुर्वेदात याचा स्तंभक म्हणुन उपयोग होतो. अतिसार, रक्तस्त्रावावर उपयोग होतो. हिरड्या घट्ट करण्यासाठी याच्या सालीचे भस्म, मंजन म्हणुन वापरतात. आयुर्वेदात या फुलाना हृद्य असे संबोधिले आहे. हृद्य म्हणजे हृदयाला पोषक किंवा मनाला संतोष देणारी. या फ़ुलांचा काढा जुनाट खोकल्यावर, डांग्या खोकल्यावरही दिला जातो. गॅस्ट्रिक अल्सर्स वर देखील याचा उपयोग होतो. अनुराधा नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तींसाठी तो आराध्य वृक्ष आहे.

बकुळाच्या फ़ुलासोबत आठवतात ती सुरंगीची फुले. याचा वृक्षही लहानसाच असतो. याला संस्कृतमधे सुरपुन्नाग असे नाव आहे तर याचे शास्त्रीय नाव आहे, Mammea suriga या दोन्ही झाडांची पाने सारखीच असतात. आणि दाटही. दोन्ही झाडे आतल्या फांद्यांचा आणि फुलांचा पत्ता लागु देत नाही.
सुरंगीच्या कळ्या लालसर असतात आणि फुले आटवलेल्या दुधाच्या रंगाची. चारच पाकळ्या आणि मधे पिवळे पुंकेसर. पण याचा गंध मात्र मला खुप मादक वाटतो. याचा गजरा केला तरी मधमाश्याना याचा मोह आवरत नाही.
( मधमाश्या फुलातुन मध गोळा करत नाहीत, तर त्या मध तयार करतात. त्यावर मग कधीतरी )




Monday, May 07, 2007 - 1:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काहि महिन्यांपुर्वी आपल्याला थायलंडच्या पॅरट फ़्लॉवरचे फोटो ईमेलमधुन आले होते. फ़िकट ज़ांभळ्या रंगाचे ते फुल, मी वर्णन केलेल्या कांचनाच्या कुळातील एका झाडाचे असते. आपल्याकडेहि एक बदकाचे फुल असते.
badak
हे आपले माझ्या आईने ठेवलेले नाव. तिच्या लहानपणापासुन हे फुल ती बघत आलीय. पण नंतर दाखवायलाही हे फुल कुठे दिसले नव्हते.

केनयात मी असेच फुल बघितले होते. ते आकाराने थोडे लहान होते. पण आकार थेट बदकाचा. ते थोडेसे उमलायचे देखील. उमलले कि टेबलावर ठेवता यायचे. ( उमललेली बाजु खाली करुन. ) मग ते थेट बदकासारखेच दिसायचे. रंग पांढरा व तपकिरी असायचा. पण त्याला फक्त एकच फ़ुगीर भाग असायचा.
हे फुल मात्र जरा जास्त कल्पनारम्य आहे. बदकापेक्षा पेलिकनचा भास होतोय यातुन.
आता बदक आणि हे फ़ुल यापैकी, कुणी कुणाची नक्कल केलीय ते नाही सांगता येणार

badak1

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६



 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators