Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Kokan... आनंदसण

Hitguj » My city » Greater Mumbai and Konkan » Kokan... आनंदसण « Previous Next »

Zulelal
Wednesday, August 15, 2007 - 1:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

....अंधार पडायच्या आधीच आसपास असंख्य पाखरांच्या किलबिलीचं संगीत सुरु होतं आणि एखाद्या कोंबड्याची बांग त्यात ‘र्‍हिदम’ पेरते... गोठ्यातल्या गायि-म्हशीचं लांबलचक हंबरणं आणि घराच्या पडवीतला पाडसाचा प्रतिसाद आतुरतेचे सूर आळवतात... रेडिओवरची ‘मंगलप्रभात’ पहाटेचं वातावरण पवित्र करते आणि या भारावलेपणातच आपण अंथरुणावरून उठून बाहेर पडतो.. जांभ्या दगडांच्या ओबडधोबड तुकड्यांनी बांधलेल्या ‘गडग्यां’च्या मधल्या रस्त्यावरून चालताना, बांबूच्या बेड्यापलीकडल्या एखाड्या दुपाखी कौलारू घरातली जागती चाहूल सकाळ झाल्याची जाणीव करून देत असते...
... आणि एका ‘जादू’चा अनुभव सुरू होतो... मागल्या दारीच्या अंगणात्ल्या ‘पाणचुली’वर उकळणार्‍या पाण्याचा खमंग वास परमळत असतो... दुधाच्या कासंड्या घेऊन ‘वाड्या’कडे ये-जा करणार्या घरधन्याच्या हालचाली टिपताना पडवीतल्या पाडसाची धडपड वाढत जाते...
गोठ्याकडून येणार्‍या प्रत्येक हंबरण्याबरोबर कान टवकारणारी पाडसं टपोर्‍या डोळ्यांनी मालकाची लगबग टिपत अस्वस्थ होतात, आणि
गळ्याभोवतीचं ‘दावं’ सुटताच, वाकड्यातिकड्या उड्या मारत आईच्या ओढीनं गोठ्याकडे धाव घेतात...

.... मग सुरु होतो, एक अद्भुत ‘मातृसोहळा’!!...

कोवळी, सोनेरी उन्हं कौलारू घरांवर आणि केंबळी वाड्यांवर पसरतात आणि कोकणातलं ते खेडं जागं होतं... रात्रीच्या ‘पसार्‍या'ला गेलेली जनावरं टम्म फुगल्या पोटांचा जडपणा सावरत समाधानानं गोठ्याकडं परतत असतात... कमरेच्या कोयंड्याला कोयता अडकवून हिरव्या चारीचा भारा रानातून आणण्यासाठी बापये गडी तयार होत असतात आणि वाफाळलेला भात अन कुळदाच्या पिठीची गरमगरम न्ह्यारी स्वैपाक्घरात रटरटायला लागते... मागल्या पडवीवर पत्रावळी लावल्या जातात आणि परस्भरात सगळीकडे कुळदाचा खमंग वास
दरवळतो... विहीरीवरच्या रहाटाचे एकसुरी फेरेही एव्हाना सुरू झालेले असतात. कामावरची ‘बायामाणसं’ ‘चा’ पिऊन, ‘कोप’ धुवून परड्यातल्या फोपळींना पाणी ‘दाखवाला’ दाखल होतात आणि न्याहरी आटपून एक जथ्था रानाकडे रवाना होतो... इकडे लख्ख सारवलेल्या अंगणाचे केरवारे सुरू होतात, कुठे घरतल्या सारवणाची तयारी सुरू होते, कुणी सारवण झालेल्या अंगणात रांगोळी घालू लागते. देवघरातल्या घंटेचा किणकिणाट सकाळची प्रसन्नता आणकीनच खुलवतो... उन्हं चढत जातात... पहाटे संगीत पेरणारा पाखरांचा कलकलाट मंद होत
कानाआड जातो आणि कोकणातलं ते अवघं गाव कामाधंद्याला लागतं...

खाडीकिनारी तालुक्याला जाणार्‍याची गर्दी सुरू होते आणि तरीतून पलिकडे जाण्यासाठी नंबर लागतात... पलीकडची एस्टी भरते आणि त्याच किनार्‍याला ‘तर’ विसावते. गर्दी ओसरते आणि खाडीचे मंद, संथ पाणी विश्रांती घ्यायला लागते... सकाळपासून ताजीतवानी झालेली काठावरची माडंझाडं एकएक करून खाडीच्या आरश्यात स्वत:चं रूप न्याहाळत वार्‍याबरोबर डुलायला लागतात... बाजूच्या वेळूच्या बनाची सळसळ सुरू होते आणि त्या ‘आनंदसणा’त आंब्ये-फणसपण सामील होतात... पहाटेची तीच टवटवी, उन्हं डोक्यावर आली, तरी तशीच ताजीताजी असते...

दुपारी जेवणं आटपली, की सगळीकडे चारदोन तासांची निजानीज होते, आणि गाव थोडासा सुस्तावतो... संध्याकाळी, तिन्हिसांजेला पुन्हा पहाटेचे सूर गावात घुमायला लागतात... रात्री मिणमिणत्या विजेत कुठे भजनं रंगतात, घराघरात देवाधर्माचे विधी सुरू होतात, चंदन-धुपाचा गंध अवघा गाव व्यापून ताकतो, ... आणि, काही वेळात, निजानीजही होते... पुन्हा गाव शांतशांत होऊन पहुडतो...

कोकणातल्या कुठल्याही गावात आजही हेच चित्र दिसतं म्हणूनच, कोकण ही आजही एक ‘अपूर्वाई’ आहे... सकाळी दरवज्याला भैयानं लटकावलेल्या ‘पिशवीच्या दुधा’चा वाफाळलेला कप तोंडला लावताना ‘कार्टून नेट्वर्क’वरचा स्कूबी शो बघणर्‍या मुलांसाठी, कोकणातलं खेडं हा एक जिवंत चमत्कार आहे. चारदोन दिवसाची सुट्टी घ्यावी आणि कोकणातल्या कुठल्यातरी गावी मुक्काम ठोकावा... तरीतून खाडी पार करण्याचा आणि बैलगाडीच्या सफरीचा आनंद काय असतो, गायीची ‘पाडी’, ‘लुचते’ कशी, आपण पिशवीतून पाहातो, ते दूध कोण देतं, ते काढतात कसं, मार्केटातल्या भैय्याच्या टोपलीतली हिरवीकंच भाजी कुठल्या झाडांना लागते, झाडावर लटकताना ती कशी दिसते, आंब्या-फणसाची झाडं कशी असतात, काजू कसा भाजावा, कसा फोडावा आणि कसा खावा... फणसाचे गरे कसे ‘गट्टम’ करावेत आणि
आख्खा हापूस कसा चोखावा, शेत कसं नांगरावं, अनवाणी पायांनी डोंगरकपारी कशा तुडवाव्यात... सगळंसगळं ‘याचि देहि’
अनुभवण्यासाठी, कोकणाला पर्याय नाही.... कोकण हे सगळ्या अनोख्या, आणि अनेक अननभूत आनंदाचं उत्तर आहे...

टीव्हीवरच्या एखाद्या कार्यक्रमात पाहिलेली अन ऐक्लेली समुद्राची निवांत गाज अनुभवायची असेल, तर कोकणाचा किनाराच गाठायला हवा.. रात्रीच्या वेळी, झाडाझुडुपांच्या गर्दीतून वाट काढत जामिनीवर सांडणारं चांदणं पाहायचं असेल, तरीदेखील कोकणालाच पसंती द्यावी, आणि आकाशातला चांदण्याचा पसारा मोजायचा असेल, तरी, कोकणच खरं...

आजकाल कोकणाचा कायापालट होतोय... निसर्गानं भरभरून दिलेलं हे दान, जगानं अनुभवावं, आणि जागाच्या समाधानासोबत आपल्या गाठीशी थोडी ‘माया’ही गोळा व्हावी,असा ‘व्यवहारी’ विचार आजकाल कोकणात सुरू झालाय. आता पहिल्यासारखं कुणाच्याही घरातला गुळपाण्याचा पाहुणचार कदाचित आपल्या वाट्याला येणार नाही. बाहेरच्या, पडवीवरच्या दुकानातलीच एखादी ‘बिस्लेरी’ विकत घेऊन आपल्याला तहान भागवावी लागेल... पाहुणचारासाठी पैसे मोजावे लागतील... कारण आता पाहुणचाराला व्यवसायाची आणि व्यवहाराची जोड मिळाली आहे...

कोकणाचा कॆलिफोर्निया करायचं एक स्वप्नं कित्येक व्र्षांपासून कोकणानं उराशी जपलं होतं... आता कॆलिफोर्नियाचा अर्थ कोकणाला उमगलाय... कोकणात नुस्ताच कॆलिफोर्नियाच नव्हे, नंदनवन फुलवण्याचं एक स्वप्न साकारतंय...

कोकण आपली वाट पाहातय... येवा... कोकण आपलंच आसा!!....


Bgovekar
Friday, September 07, 2007 - 7:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अति सुंदर अन परीणामकारक वर्णन कोकणचं!.. आजच इकडे भेट दिली.. छान वाटलं वाचुन.. अगदी गावाक जावन इल्यासारख्या वाटला.:-)
कोकण खरंच बदलतय.. पण म्हटल्याप्रमाणे पाहुणचाराची रीत अजुन नाही बदललिय.. खेडेगावात गेलात तर अजुनही पुर्वीसार्खीच साधी माणसं अन त्यांचं साधेपणं अनुभवायला मिळेल. खुप छान शब्दात कोकण नजरेसमोर आणला आहे.


Shubhi
Friday, September 28, 2007 - 10:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Ashach Koknat amache pan ghar ahe navya prakarche second home Devgadla. Just now I am in USA. Pan vachun bare vatle. Tya gharachi athavan zali. Welcome to our home also.


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती







Add Your Message Here
Posting is currently disabled in this topic. Contact your discussion moderator for more information.

 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators