Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
समाजसेवा

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२७ ( २००५ - ०६ ) » मार्गशीर्ष » कथा कादंबरी » समाजसेवा « Previous Next »

Rachana_barve
Wednesday, December 21, 2005 - 6:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ही लक्ष्मी आज उगवणार आहे की नाही. स्वातीने हातातले मासिक समोरच्या टीपोयवर आपटले. दोन वाजून गेले होते. आता कपडे धुतले तर उद्या वाळणार नाहीत. स्वातीने बाथरुम मधे जाऊन बादलीभर कपडे बघितले. आजच काही नडल होत का आपल्याला चादरी धुवायला काढायचे. साडी वर खेचुन स्वातीने एक एक कपडा स्वछ पाण्यात बुचकळून पिळायला सुरुवात केली.

" अवो राहुंद्या बाई आना हिकड " लक्ष्मीच्या आवाजाने स्वाती पदराला हात पुसत बाहेर आली.
" या आलात मिळाला का वेळ आमच्या कडे यायला "

लक्ष्मी पदरात तोंड लपवून खुसुखुसु हसली.

" कायच्या काय हो बाई अवो वेळ कसला घेउनशान बसलात. त्ये बेण आल की दारु पिउन आन मंग लय वंगाळ बोल्ल बगा. त्येच्या नरड्यात दारुचा घोट गेला तेंव्हा जमल बग यायला. अजून दोन घरची धुनी खोळंबली असतील बगा "

लक्ष्मीने धुण्याचा कब्जा घेत स्वातीला सांगीतले. आअता हे बेण अवो त्यो मुडदा वगैरे म्हणजे लक्ष्मीचा नवरा गोपाळ हे स्वातीला सवयीने माहिती झाल होत.

" तु देतेस कशाला त्याला पैसे? ४ मुली आहेत तुला, त्यांची शिक्षण, लग्न नाही का करायची तुला? तो एकतर काही कामधंदा पण करत नाही म्हणतेस आणी परत त्याला पैसे देउन त्याच्या सवयीला पाठिंबा देतेस "

स्वातीची चिडचिड तिच्या बोलण्यातुन बाहेर पडत होती.

" अवो जाउंद्या हो बाई कस का असना नवरा हाये त्यो मुडदा माजा "

ह्यावर हसाव की रडाव स्वातीला कळेना. संध्याकाळी मुल आल्यावर स्वातीच्या डोक्यातुन लक्ष्मी जरा वेळ बाजूला झाली होती. पण काम आटोपून बेडरूममध्ये आल्यावर रात्री निनादपाशी स्वातीने विषय काढलाच.

" तुला ना लष्कराच्या भाकर्‍या भाजायची फ़ार वाईट सवय आहे. " निनादने नेहमीचा टोमणा मारून कर्तव्य पार पडले.

" पण अरे काहीतरी मदत नको का करायला तिला. तो तिचे सगळे पैसे दारूत उडवतो. जरा जास्त पिऊन आला की हात देखिल उगारतो म्हणे. पण हीच आपल तेच टुमण नवरा हाये त्यो माजा "

स्वातीने हातातला कंगवा खाली ठेऊन लक्ष्मीची नक्कल केली.
निनादला हसू आवरेना. " बर बास आता तुझ ते लक्ष्मी पुराण. माझ्यापेक्षा तीच तुझ्या डोक्यात जास्त असते आजकाल. सकाळी लवकर कामाला जायच आहे. झोप आता "
नाखूषीनेच स्वाती निनादच्या शेजारी पडली. सवयीने स्वातीला सकाळी ६ ला जाग आली.

" निनाद उठ उठ ना " गदागदा हलवत स्वातीने निनादला जागे करायचा प्रयत्न केला. निनादने फ़क्त कुस वळवली.

" आज लक्ष्मीला बॅंकेत घेउन जायचय. तिच खात उघडून दर महिन्याला थोडे पैसे तिच्याच पगाराचे त्यात टाकणार आहे. बिचारीला कधीतरी उपयोगी पडतील. "
" सकाळपासून काय लक्ष्मी लक्ष्मी. बास कर. आणि तुला करायचे ते कर " असे तिरसटून म्हणत निनादने दोक्यावरून पांघरूण घेतले. त्यावर हिरमुसुन न जाता स्वातीने झटपट ब्रेकफ़ास्ट तयार केला. आंघोळ करून साडी नेसुन ती तयार देखिल झाली. यथावकाश मुल आणि निनाद तयार झाले तेंव्हा स्वाती अगदी उत्साहात होती.

" आई सकाळी सकाळी कुठे निघालीस तु? " प्रिताने ब्रेडला लोणी लावत नवलाने विचारले
" अग लक्ष्मीला बंकेत घेऊन जायचे आहे. त्यासाठी तयारी केली. मग तुमच्या कोणाच्या आंघोळी पांघोळी मध्ये माझी लुडबुड नको ना म्हणून " स्वातीने निनादच्या कपाळावरच्या आठीकडे दुर्लक्ष करत सांगीतले.

" अरे सकाळपासून लक्ष्मी लक्ष्मी काय चालवल आहेस? आज तो ओफ़ीसमधला त्रिपाठी आहे ना त्याची बायको येणार आहे आपल्याकडे नविन आली आहे दिल्लीहून, मीच काल म्हंटल पाठव तुझ्या बायकोला माझी बायको दुपारी रिकामीच असते " निनादने लक्ष्मीपुराणाकडे दुर्लक्ष करत सांगीतले.

" अरे पण " स्वाती त्याच्या कपात चहा ओतता ओतता थबकली.

" सकाळी तर तु हो म्हणाला होतास.. आज लक्ष्मी लवकर येणार आहे. "

" बास आता. सारख सारख काय चालवल आहेस? आणि बंकेचे काम तु अगदी कुठल्यातरी महत्वाच्या मीटींगसारखे आहे अस भासवते आहेस. उद्या जा आहे काय आणि नाही काय "
निनादने खुर्ची सरकवून दाराकडे जाताना म्हंटले.

" प्रिता समर चला तुम्हाला जाताना शाळेत सोडतो. तुमच्या आईला बरीच काम आहेत आज. जगाचे प्रोब्लेम्स सोडवायच सगळ कंत्राट तिलाच मिळाल आहे आणि तिची ती लाडकी लक्ष्मी देखिल येणार आहे ना " निनाद हसत निघाला.

त्याचा विनोद नेहमीप्रमाणे स्वातीला दुखऊनच गेला. पण लग्नानंतर १५ वर्षांनी त्याकडे दुर्लक्ष करायला ती शिकली होती.
लक्ष्मी आल्यावर अगदी अपराध्या सुरात स्वातीने तिची माफ़ी मागीतली.

" अवो बाइ सारी कशापाई म्हनता पुन्हा कवातरी जावू. त्ये पैस आज म्या घरलाच घेउन जाते. त्यो हलकट कालपासून खिटखिट करत्यो हाये "

स्वाती गप्प बसली. लक्ष्मीला बंकेच महत्व सांगूनही फ़ारस कळल नव्हत.
काही दिवस नेहमीप्रमाणे सुरळीत गेले. अधुन मधून लक्ष्मी नवर्‍याला शिव्या घालायची पण एखादी दुपारची सीरीयल डोक्याला त्रास देऊन जाते तरी आपण ती दुसर्‍या दिवशी बघतो तितक्याच उत्साहाने तशी स्वाती तिला विचारायचीच गोपाळबद्दल.

" अवो बाई हायसा का घरात " संध्याकाळचे ५ वाजले होते. निनाद यायची वेळ झाली होती. मुल दुध पिउन कधीच खेळायला पळाली होती. आता आधी भाजी आणायला जाव की पोळ्या कराव्या ह्या गहन विचारत स्वाती होती. लक्ष्मीची हाक ऐकून ती दचकली

" लक्ष्मी तु ह्या वेळी? "
तिच्या डोक्यावरती खोक पडलेली बघून स्वाती दचकली. ती पटकन डेटोल घेउन आली. स्वछ धूउन मलम लाउन तिने त्यावर पट्टी बांधली. हे सर्व चालू असताना लक्ष्मी अखंड गोपाळच्या नावाने शिव्याचा भडीमार करत होती.

" आधी चल doctor कडे " स्वातीने तिला हाताला धरुन बाहेर ओढत नेल. टाके वगैरे नाहीत कळल्यावर स्वाती तिच्यावर ओरडलीच

" आलीस कशाला आता माझ्याकडे? सांगीतल होत तुला आधीच मी "

" व्हय हो बाई तुमी होत म्हणून बगा. घेउन चला मला तुमच्या त्या परितक्या बाईंच्या क्लबात "

स्वाती चिडली " चांगली कमावतेस आणि त्या मरतुकड्या नवर्‍याला कसली घाबरतेस. आधी घरी जा आणि सांग त्याला बाहेर हो. काहीतर कमवायला लाग आणि दारू सोड. मग ये परत म्हणून "

लक्ष्मीने मान डोलावली " व्हय त्या मुडद्याला भायेरच काढते म्या. लई वंगाळ वागत बगा आजकाल त्ये " म्हणत लक्ष्मी तरातरा बाहेर पडली.

दुसर्‍या दिवशी स्वाती आतुरतेने लक्ष्मीची वाट बघत होती. ती आल्या आल्या स्वातीने तिच्यासमोर गरम चहाचा कप ठेवला.
" लक्ष्मी? "
" व्हय जी "
" मग काल बोललीस क तुझ्या नवर्‍याला "
" न्हाय जी "
" नाही? अग मी काय कानडीत सांगीतल का तुला? तुझ्यासाठी मी माझ्या नवर्‍याची बोलणी खाते रोज आणि तु आहेस की म्हणतात ना ज्याच कराव भल "
" अवो बाई त्ये मनाने लई चांगल हाये हो. काल मला विन्ग्रजीत सारी बी म्हणाल बगा "
लक्ष्मी इथे चक्क पदर तोंडावर घेउन लाजली. स्वाती अचंब्यात पडली. तिला समजेचना काही.
" अग पण तुला काल त्याने मारल ना "
" व्हय मारल आन माज हात काय केळी खायला ग्येलेले काय म्या बी त्याला लाटण्याने बडीवल की. अवो कसा बी असला तरी त्यो मुडदा कुकवाचा धनी हाय माझा. आन म्या काय तुमच्या सारखी शिकल्येली थोडीच हाय एवड्या तेवड्यावरून नवर्‍याला सोडून द्यायला "
स्वातीला चपराक बसल्यासारखे झाले. नक्की मदत आपण का करतो आहोत हेच तिला उमजेना. मुकाट्याने ती सोफ़्यावर जाऊन बसली. टीव्हीवर सास भी कभी बहू थी लागल होत त्यात ती बघता बघता रमली. आजकाल ती लक्ष्मीच्या गोष्टी गप्प बसून ऐकते. कितीपण तिला उपदेश करायचा मोह झाला तरी तो चहाबरोबर गिळून टाकते.





Chinnu
Wednesday, December 21, 2005 - 9:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रच.. अगदी सहज आणि tea time snack सारखी गोष्ट. लक्षुमीचे dialogs सही आलेत अगदी.

Amitpen
Wednesday, December 21, 2005 - 10:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रचना... भाषा एकदम down to earth...free flowing..सुंदर!!.....पण शेवट थोडा खटकला...लक्ष्मीच्या शेवटच्या वाक्यावर स्वातीची प्रतिक्रिया सास भी कभी बहू थी मध्ये रमण्याची असायला नको होती... हि प्रतिक्रिया mature नाही वाटत...

Gandhar
Wednesday, December 21, 2005 - 11:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रचना सहज आणि सुंदर.. थोड्याफार फरकाने आमच्या कामवाली बाईबाबत असेच अनुभव माझ्या आईला आलेले मी पाहिले आहेत.. :-(

Champak
Thursday, December 22, 2005 - 10:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

याकदम झ्याक लिव्हलं बघा रचना बाई:-)

मागे सकाळ मध्ये सुधा मुर्ती असे लेख लिहीत! सत्यकथा च असत त्या..


Prajaktad
Thursday, December 22, 2005 - 2:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रचना!हे चित्र अगदि वास्तवातल आहे.

Paragkan
Thursday, December 22, 2005 - 8:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संपली की काय?

Kmayuresh2002
Thursday, December 22, 2005 - 8:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रचना,
छान ग... एक्दम साध्या सोप्या सरळ भाषेतली मांडणी आवडली... आणि कथाबिज तर आमच्या तुमच्या नेहमीच्या अनुभवातलच:-)


Rachana_barve
Thursday, December 22, 2005 - 8:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो संपली.. खर तर गोष्ट म्हणून नव्हती लिहिली. ललित सारख लिहिल होत. पण फ़रच साध वाटल म्हणून इथे टाकल. चंपक म्हणतो तशी सत्यकथा आहे.
सगळ्यांना thanks for reading आणि प्रतिक्रिया :-)


Dineshvs
Thursday, December 22, 2005 - 8:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रचना, सत्यकथेला नेहमीच अशी एक धार येते.
त्या बायकांचा हा अटिट्युड ना कधी आपल्याला कळणार, ना बदलता येणार !


Limbutimbu
Thursday, December 22, 2005 - 11:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>> ना कधी आपल्याला कळणार,
अशिक्षित असता, हातावर पोट असत अन मुख्य म्हणजे पाण्ढरपेशे नसता तर कळल असत! कळल असत म्हणण्यापेक्षा जाणवल असत अस म्हणाव! :-)
तिच्या तशा वागण्याला स्त्रीचे नैसर्गिक भावनिक कन्गोरे कारणीभुत हेत!
शिक्षणाचा उल्लेख येवढ्याकरता केला कारण आधुनिक शिक्षण पद्धतीत माणुस नैसर्गिक भावभावनान्चे खच्चीकरण करुन नाटकी मुखवटे लावुन जगतो! अस आपल माझ मत बरका भावु!
अमित, तीच सेरिअल बरोबर हे! च्यामारी घरोघरी नसलेली भाण्डण, कावे, खलबत ह्या सिरिअल मुळ घरोघरी घुसताहेत अन सासवा अन सुना चविचविन ते बघुन सोताच्या घरात शोधताहेत! जावुदे वेगळा विषय हे तो!
पर नवर्‍याला सोडुन दे असा उपाय, चारशे अठ्ठ्याण्णवचे शस्त्र वापरण्याचा सल्ला देणारे बहुतेक जीव याच सेरिअल मधुन आपापली बौद्धिक भुक शमवुन घेत असतात!
रचना, थोडक्यात आटोपत घेत छान लिहिल हेस!


Bee
Friday, December 23, 2005 - 4:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रचना, शेवट मस्त जमला आहे. गोष्टीला नाव छान दिले आहे. ह्यावेळी तू भाषेची वेगळी लय वापरली आहे, मोलकरणीच्या बाबतीत, तो प्रयत्न छान जमला आहे.

माहिती म्हणून एक की - गोष्टी, कथा ह्या देखील ललित मधेच मोडतात. साहित्यात ललित विषयाची व्याप्ती बरीच मोठी आहे. लेख, कथा - लघूकथा - दीर्घकथा, निबंध, रसग्रहण, समिक्षा, परिक्षण, निसर्ग - प्रवास वर्णन, व्यक्तीचित्रण इ.इ. सगळे ललित झाले. कथा ह्या दोन प्रकारच्या असतात, भावप्रधान आणि घटनाप्रधान. तुझी ही कथा मध्य साधते आहे, more towards the first one . गौरी देशपांडे ह्यांचे आहे हे असे आहे...', संध्या कर्णिकांचे कुणास्तव कुणीतरी' जर वाचलेस तर तुला अशा कथा लिहायला एक चांगली मदत होईल.

सत्यकथेत mostly real life tragedy दाखवली गेलेली असते. इथे tragedy ला कुठेच space दिसत नाही. तेंव्हा ही सत्यकथा नाही.

CBDG


Priya
Tuesday, December 27, 2005 - 4:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रचना, कथेचा शेवट वाचून वाईट वाटले. सदहेतुने करायला घेतलेली गोष्ट अशी सोडुन द्यावी लागली की काय वेदना होतात याचा अनुभव असल्याने शेवट वाचून आश्चर्य वाटले नाही तरी वाईट वाटले. बाकी सर्व पात्रांच्या तोंडची भाषा छान दाखवली आहे. एकच फक्त समजले नाही - आपल्या घरी काम करणार्‍या स्त्रीला अन्यायाविरुद्ध लढण्याचा प्रयत्न करण्याइतकी संवेदनाक्षम असणारी नायिका तद्दन टाकावू मालिकेत रमलेली दाखवणं टाळता आलं असतं का?

बी - सत्यकथेत mostly real life tragedy दाखवली गेलेली असते म्हणजे काय रे बाबा? अजिबात झेपले नाही. इथे tragedy ला space नाही तेव्हा ही सत्यकथा नाही? माफ कर, माझा तुझ्याएवढा साहित्याचा अभ्यास नाही, वाचनही नाही. पण tragedy नाही म्हणजे सत्यकथा नाही? मग सत्यकथा सुखांत असू शकत नाही की काय? सत्यकथा ही सत्य' असावी ना? ती शोकात्म असेलही, पण तेवढेच एक लक्षण कसे असू शकते? आता कोणी स्वतःच्या सफल प्रेमविवाहावरुन त्यांच्या लग्नाची गोष्ट लिहीली - हे गृहीत धरु क्षणभर की त्या प्रेमविवाहात रोचक आणि कथा बनण्याएवढे नाट्य वगैरे आहे - तर ती सुखात्मिका असणार आहे कारण सफल प्रेमविवाह हेच सत्य आहे, पण मग तुझ्या व्याखेप्रमाणे ती सत्यकथा नाही का? कारण त्यात tragedy ला कुठेही space नाही... विशेषतः लेखिका स्वतः म्हणते की ही सत्यकथा आहे आणि तरी तू ठामपणे म्हणतोस की ही सत्यकथा नाही हे कसे काय? लेखिकाच नाही का सांगू शकत ही सत्यकथा आहे हे?

मी म्हटले तसे, माझा तुझ्याएवढा अभ्यास नाही तेव्हा हे सगळे मुर्खासारखे वाटले तरी हसू नकोस.


Rachana_barve
Tuesday, December 27, 2005 - 7:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

thanks वाचल्याबद्दल आणि प्रतिक्रियेबद्दल.

शेवट का असा केला तर मला मालिका कोणती बघितली पेक्षा तिला लक्ष्मीची दु : ख दुर करताना रमलेले दाखवले कारण ती may be संवेदनशील होती पण तितकीच घरी एकटी असल्याने किंवा मुल आणि नवरा ह्यातच गुंतलेली असल्याने अशी कोणालातरी काहीतरी मदत करू शकतोय ह्याचेच अप्रुप जास्त होते.
ही सत्यकथा म्हंटले त्यामूळे आता लक्ष्मीकडे Bank account आहे. त्याची तिला मदत झाली त्यामुळे त्याचे महत्वही तिला पटले आहे आता. पण गोपाळचे दारू पिणे अजूनही चालू आहे. आणि ती त्याला सोडतही नाही. किंवा probably she thinks की तिच्या situation मध्ये तिलाच better deal मिळाले आहे. त्यांची खरी परिस्थिती. खरच त्यांच life कस आहे आपल्यासरख्या पांढरपेशा लोकांना कळणार नाहे Atleast स्वातीसारख्यांना तर नाहीच नाही.

शेवट केला असा कारण तीने परत आपल्या रिकाम्या डोक्याला किंवा मनाला रमवायला सुरवात केली असे.. बाकी गोष्ट साधी आहे. विशेष काही नाहीच त्यात.
असो, पण खरच वाचल्याबद्दल धन्यवाद :-)



Bee
Tuesday, December 27, 2005 - 10:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रिया, तशा बर्‍याच लेखक लेखिकांच्या कथा ह्या बहुतांश सत्यकथाच असतात आणि लिहिताना ही मंडळी फ़क्त पात्रांची नावे बदलतात. थोडेफ़ार कल्पनाविश्व तयार करतात. पण तरीही मला त्या so called सत्यकथा वाटत नाही. अनुभवपर लिखान मी म्हणू शकेल पण आजवर ज्या काही सत्यकथा वाचल्यात, चित्रपटात, नाटकात, मालिकेत बघितल्यात त्यावरून असे गृहीत' धरले की सत्यकथेचा आशय, गुंतागुंत, फ़सवणूक, किचकटपणा हा सरळ साध्या कथेपेक्षा अधिक समर्थ असतो. वर जरी रचनाने म्हंटले आहे ही कथा वास्तविकतेवर आधारीत आहे तरी तिला सत्यकथा म्हणून नाव देणे मला इतके रुचले नाही. बाकी हा प्रत्येकाच्या मर्जीचा भाग आहे.

यंदाच्या दिवाळी अंकातली अहेव की कथा तू वाचली आहेस. वाचतानाच कळते की ही कथा काल्पनिक नाही. ह्या कथेचा बाज संपूर्ण स्वानुभवावर आधारीत आहे. पण तरीही ती कथा so called सत्यकथा होऊ शकत नाही.

माझाही साहित्यभ्यास नाही. मी वाचतो ते फ़क्त करमणूक म्हणून, वेळ वाया जावू नये, कंटाळा येऊ नये म्हणून. पण त्यातूनच थोडेफ़ार आकलन होत राहते.. कदाचित ते चुकीचेही असेल.

well.. thx for ur valuable feedback on my views!


Priya
Tuesday, December 27, 2005 - 11:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रचना, तू म्हणतेस तसे खरेच आपल्याला लक्ष्मीच्या वर्गाचे भावविश्व नीट उमगत नाही हेच खरे. आणि तिला बॅंक अकाउंटचे महत्व पटण्याइतपत बदल झाला हेही नसे थोडके. कथा नेहमीप्रमाणे छान मांडली आहेस हे नक्की.

बी - तू प्रामाणिकपणे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केलास त्याबद्दल आभार. मी अजुनही गोंधळलेली आहे यात दोष तुझा नाहीच. तुझ्या आत्ताच्या पोस्टमुळे मुळात सत्यकथा आणि अनुभव लेखन यांतल्या तर्कसंगतीमुळे चक्रावले हे नक्की. सत्यकथेची ही व्याख्या मला खरेच माहीत नव्हती. मी म्हटले ते बरोबरच आहे, तुझ्याइतका माझा अभ्यास नाही. तुझा आहे हे कळतच की! तू लेखनात, वाचनात सुधारणा करावी म्हणून सर्वांना मनापासून सल्ला देतोस त्यावरुन. आता यात तू उलट अर्थ काढणार नाहीस ही अपेक्षा. खरे लिहीलेले तुला खवचट वाटले तर त्याला मी काय करू?


Bee
Tuesday, December 27, 2005 - 11:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रिया, ह्या विषयाचा अभ्यास तुझाही नाही आणि माझाही नाही. आपले field ह्यापासून खूप वेगळे आहे. तू, मी आणि इथले बहुतांश सभासद जे काही वाचन करतात तो त्यांचा एक छंद आहे, माहिती मिळवण्याचा एक मार्ग आहे. अभ्यास करण्याची जर वेळ आली तर मी पुस्तक खाली ठेवून देईल. वर करड्या अक्षरात लिहिलेले खरे नाही. उलट कुणी खर बोलल तर मला ते अधिक भावत किंवा कुणाही समंजस व्यक्तीला ते आवडेल. माझ्या स्वतःच्या लिखानात कधी शब्दांच्या चुका तर कधी व्याकरणाच्या, शुद्धलेखनाच्या ढीगभर चुका असतात. तुमचे पोष्ट वाचून वाचूनच मी माझे लिखान सुधारतो आहे. बर्‍याचदा मी इथल्या प्रेमळ आणि helping nature असलेल्या सभासदांना लिखानातली चूक दुरुस्त करण्याची विनंती करतो. आपली ही बाजू ओळखून मी कुणाला असे लिही, तसे लिही अशा सुचना करत नाही. केल्या असतील तर त्या नकळतपणे... well, thx again & good night!




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators