Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through December 08, 2005

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२७ ( २००५ - ०६ ) » मार्गशीर्ष » कथा कादंबरी » एका केशरी संध्याकाळी........ » Archive through December 08, 2005 « Previous Next »

Tulip
Wednesday, December 07, 2005 - 9:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मोबाईलचा अलार्म वाजायच्या आधीच दहा मिनिटे यशूला जाग आली. जेमतेम तासभर झोप झाली असेल आपली. रात्री झोपायला दोन वाजून गेले होते. खरतर गप्पा संपल्याच नव्हत्या. पण सकाळी सगळ आवरुन निघायचय तेव्हा झोप आता! असं मीतानेच तिला जरा दटावून सांगितल म्हणून. नाहीतर यशूची तयारी होती अजून परत एकदा कॉफ़ी करुन गप्पा पुढे चालू ठेवायची.
गेली दोन वर्षे रुम शेअर करत होत्या त्या. कित्येक रात्री दोघींनी गप्पा मारत अशा जागून काढल्या होत्या. पण कालची रात्र निरोपाची होती. म्हणून जास्त हळवी होती. यशूने वळून शेजारीच झोपलेल्या मीताकडे पाहिले. नेहमीच्या सवयीने तोंडावर उशी ठेवून ती गाढ झोपली होती. आता उद्यापासून दुसरी रुमी मिळेपर्यन्त ही एकटीच. नंतर रुटीन सुरू झाल की आपली कोणती आठवण राहील नक्की हिलातरी पुढच्या आयुष्यात? आपली मोठ्ठ्या आवाजात गाणी ऐकायची सवय की कायम झटपट रुम आवरुन ठेवण्याची खोड की एकदा कानाला फ़ोन लावला की तासंतास गप्पा करत बसण्याची मीताच्या मते भयंकरच वाईट सवय. कान कसा गरम होत नाही तुझा? ती चिडून आणि कंटाळून विचारायची.

यशू स्वत : शीच हसली. होईलच सवय आता दोघींनाही आपापल्या नव्या आयुष्याची. नकळत मनात डोकावलाच श्रीश. काय करत असेल आत्ता? झोपला असेल गाढ. त्याला कुठेय सवय पहाटे उठायची! लग्नानंतर बघ तुला रोज पहाटे जॉगिंग ला नेते की नाही मी! ह्या यशूच्या धमकावणीला, तुला पहाटेपर्यन्त झोपूच कोण देणार आहे अशा काउंटर कॉमेन्टने त्याने फ़्लॅट करुन टाकले होते. यशूला त्यावेळी एक जोरदार लाजण्याचा अटॅक आल्याने नेहमीप्रमाणेच काही बोलणे सुचले नव्हते खरे पण लग्नानंतर आपण आपल्या सगळ्या चांगल्या सवयी श्रीश ला लावायच्याच हा तिने परत एकदा मनाशी निश्चय केला.

मीताची झोप डिस्टर्ब होऊ नये म्हणून यशू सेल उचलून बाहेर गॅलरीत आली. क्षितिज अजून उजळले नव्हते. काही चूकार चांदण्या अस्पष्टपणे आभाळाच्या कडेवर चमकत होत्या. समोरच्या पारिजातकाची शुभ्र पोवळी फ़ुले मात्र उमलायला सुरुवात झाली होती. त्यांच्या मंद सुवासाने यशूला वेढून टाकले. श्रीशच्या आठवणींसारखच.
जेमतेम वर्षभरापूर्वीच तर ओळख झाली. यशूच्याच इन्स्टिट्यूटमधूनच त्यानेही एमबीए केल होत पण तीन वर्षे आधी. आय आअय एम चा गोल्ड मेडॅलिस्ट श्रीश. इन्स्टीट्यूट मधे त्याच नाव कौतुकाने आणि आदराने घेतल जात होत. लास्ट सेमिस्टरला तो गेस्ट फ़ॅकल्टी म्हणून इन्व्हायटेड होता. दोघांची ओळख झाली. तीन दिवसांनंतर तो परत गेला आणि मग त्याचे आईवडील तिथेच रहाणार्‍य यशूच्या आईवडिलांना जाऊन भेटले आणि अगदी रितसर मार्गने त्यांच लग्न ठरल सुद्धा.

लग्न!! खरच आयुष्यातल इतक मोठं वळण किती सहज घेतल आपण. मोठ आणि सुंदरही. कारण ह्या वळणावर श्रीश उभा होता म्हणूनच झाल हे इतक सोप आणि सुंदर. किती अश्वासक वाटत त्याच नुसत फ़ोनवर बोलणही. खरतर भेटलोय किती कमी वेळा. पण सतत मनात असतो. आता चारच दिवसांनी लग्न!..... आज संध्याकाळी पोचणार आपण. उद्या ग्रहमुख आणि मेंदी. परवा सीमान्तपूजन. घर आताच पाहुण्यांनी भरून गेल असेल. मेंदी! यशूने एकदम दोन्ही हातांचे तळवे वर उचलून निरखले. मस्त, लालबुंद मेंदी रंगेल हातांवर उद्या.

मागून खांद्यावर स्पर्श जाणवला. मीता हातात चहाचा मग धरून उभी होती. कधी उठली ही?
मग बाजूला ठेवत मीताने यशूचे तळवे हातात घेऊन त्यावर बोटांनी मेंदी रेखल्यासारख केल. मग वर बघून हसत म्हणाली,
" मेंदी वगैरे ठिक आहे यशू. पण तो मी काढलेला टॅटू पाहून श्रीशची काय reaction झाली, त्याबद्दल मला कळव ह! अगदी सकाळीच उठल्यावर. "

OMG! गालांवर मेंदी चढावी तशी यशू त्या पहाटेच्या अंधारातही लालेलाल झालेली मीताला दिसली आणि तिला हसू आवरेना.
" अगं काय हे! किती लाजत्येस. आणि हो! मधे तीन दिवस आहेत खर म्हणजे अजून. आमच्यात मुलाला लग्ना आधी भेटू देत नाहीत पण तुम्हा महाराष्ट्रीयनांचा काही नेम नाही. प्रोग्रेस्सिव्ह ना तुम्ही. तेव्हा भेटालही आता गेल्यावर लग्ना आधी. पण खबरदार श्रीश ला सुहागरात्रीच्या आधीच तो टॅटू दाखावलास तर! मजाच जाईल मग सगळी "

" गप ग! तु म्हणजे ना? आणि कुठे भेटायला वेळ होणार आहे तसाही. इतकी तयारी राहिलीय. त्याच्याही घरी पाहूणे असतील. जेमतेमच दिवस आहेत लग्नाला "

" ह! " म्हणत दोघींनी चहा प्यायला सुरुवात केली खरी पण आता हा एकत्र घेतलेला ह्या रुमवरचा शेवटचा चहा हे दोघनाही एकदमच उमगल. मीताने मग बाजूला ठेवले आणि यशूच्या गळ्यात पडून तिने हुंदक्याला वाट करुन दिली. यशूने तिच्या पाठीवर थोपटल. आपल्याला पण वाईटच वाटतय. पण हिच्या सारख रडू का येत नाहीय? ही काल रात्री म्हणाली आता खुप एकट वाटेल. इतक छान, स्वतंत्र आयूष्य आपण दोन वर्षे शेअर केल, ते संपल्याची हुरहूर वाटतेय मनात, नक्कीच! पण वाईट नाही वाटतय. काल मीताने विचारल, श्रीशला जास्त ओळखत नाहीस तु. त्याच्या घरच्यांना, आई वडिलांना तर एकदाच भेटलीस. टेन्शन नाही वाटणार तुला? सासरी, अनोळखी लोकांत जाण्याच?
यशूला गंमतच वाटली. हे सासरी जाण वगैरे काय असत वेगळ? एका घरातून फ़क्त दुसर्‍या एका नवीन घरात जायच. बस्स! श्रीशच घर गेलो तेव्हा छानच वाटल होत की! मोठा पण अंगावर न येणारा बंगला. खाली सहा आणि वर तीन सुरेखशा खोल्या. गच्ची, बाग वगैरे. त्याच्या आईबाबांनी स्वत : फ़िरुन दाखवल सगळ घर. त्याची बहीणही गोड आहे. बोलकी. श्रीया. लग्न झालय पण मुद्दाम नंतरही तीनचार वेळा ह्या न त्या निमित्ताने फ़ोन करुन बोलली. आपल्या पुढच्या करिअर बद्दलही सगळी उत्साहाने बोलले. छानच होते सगळे. गप्पिष्ट, मोकळे. आपल्या घरासारखच आहे तिथलही वातावरण. मग ही म्हणते तस टेन्शन कशाला येईल? उलट प्रत्येक क्षण श्रीश ची ओढ प्रचंड प्रचंड वाढवत चालला आहे. काही थोडक्याच भेटी आणि फ़ोनवरच्या गप्पांत तो पूर्ण आपला' झाला आहे. किती गोड आहे! उमदा, देखणा, हसरा

मीता आता रडायची थांबली होती. यशूने तिला पाठीवर थोपटल.
"Don't worry Meetaa! अगं, भेटत राहूच आपण. कुठे परदेशात तर चालले नाहीय मी. शिवाय सेलवर आणि ऑनलाईन गप्पा तर होतच रहातील. आणि परवा सकाळी येत्येस तु नक्की. काही करुन. "

मीताच्या केसांवरुन हात फ़िरवत तिला समजावताना यशूला तिच्यामागच हळूहळू उजळत जाणार आभाळ त्यावेळी सहजच दिसल. गडद होत जाणार्‍या गुलाबी आभाळातही मावळती अस्पष्ट शुक्राची चांदणी यशूला दिसली. तिला हळूच मनातल्या मनात तिने बाय केल. पारिजातकाचा बहरही आता टपटपायला लागला होता. यशूने ते प्रत्येक चांदणफ़ुल तोडल नि मनात उतरवून घ्ययला सुरुवात केली, हलकेच!

( क्रमश : )


Ninavi
Wednesday, December 07, 2005 - 9:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

wow!! ट्यूलिप, कविताच लिहिली आहेस गद्यात!

Tulip
Wednesday, December 07, 2005 - 12:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पिवळ्या, केशरी गुलाबांनी सजवलेल्या पॉर्श मधून यशू आणि श्रीश उतरले तेव्हा दहा वाजून गेले होते. यशूने उतरता उतरता थबकून बंगल्याकडं एक नजर टाकली. श्रीयांश पहिल्यांदा वाचलं तेव्हाच तिला ते नाव आवडून गेलं होत. श्रीश आणि श्रीया च्या नावावरुन दिलेल ते नाव यशूला आपल्याही नावाशी जोडलेलं वाटल आणि म्हणूनच अपलेपणाही. बंगला दिव्याच्या माळांनी नखशिखान्त नटलेला. बागेतली झाडं निळ्या, केशरी छोट्या छोट्या लुकलुकत्या दिव्यांनी लपेटून गेली होती.

गेटपासून आत दारापर्यंत लालजर्द गुलाबपाकळ्यांच्या पायघड्या, ओवाळणं, माप ओलांडणं, फ़ोटोन्चा, फ़िल्मचा चकचकाट, बाहेर रस्त्यावर फ़ुटणार्‍या फ़टाक्यांच्या लडी ... यशूच्या अंगात चारही दिशांतून नववधूपण कसं छान भिनत चाललं होतं. दमायला झालं होत पण तरीही प्रसन्नं.
लक्ष्मीपुजन झालं. श्रीयाने पेढे वाटले, कॉफ़ी झाल्यावर काही वेळाने यशूचे आईबाबा जायला निघाले.
" येते, मजेत रहा. सिमल्याला जाण्यापूर्वी येऊन जा दोघंही " आईच्या डोळ्यातलं पाणी लपायला तयार नव्हतं.
यशूच्याही गळ्यात दाटून आलं. डोळे चुरचुरायला लागले. श्रीश आणि ती त्या दोघांच्या पायाशी वाकले. त्यांना पोटाशी धरुन बाबांनी आशीर्वाद दिला. बाहेर गेटपर्यन्त सोडायला जावं अस यशूला वाटलं, पण श्रीशचे बाबा त्यांच्यासोबत बाहेर पडले. यशूने शेवटच बाय केलं.
किंचित गोंधळून ती तिथेच उभी राहिली. लिव्हिंगरुम प्रशस्त मोठी होती. पण तरी आत्ता अगदी भरलेली वाटत होती. कुठे बसाब हे सुचू नये इतकी. सोफ़्यावर, सेटीवर सगळीकडे माणसंच माणसं दिसत होती. खाली गालिच्यावर मुलांच कोंडाळं होत. हातातल्या गुलाबाच्या पाकळ्या ती एकमेकांच्या अंगावर उडवत होती, कुस्करत होती. वरच्या फ़ॉल्स सीलिंग मधून सांडणारा पिवळा सोनेरी प्रकाश, बाजूच्या भिंतींवरच्या शोभेच्या दिव्यांचा प्रकाश, बंगल्यातले सारेच दिवे आज उजळले गेले होते. लखलखता प्रकाश आतल्या माणसांमाणसांवर पसरलेला. गप्पा, विनोद यांच्या खळाळून फ़ुटणार्‍या लाटा. श्रीशचे काका काकू, श्रीया, तिचा नवरा, श्रीशचे मामा मामी, चुलत बहिणी, आत्तेभाऊ, यशूला आता सर्वांचीच एकमेकांत सरमिसळ झाल्यासारखी वाटायला लागली. कोण कुठले ते ओळखूच येत नव्हते.
श्रीयाने तिचा हात धरुन तिला सोफ़्यावर बसवले. यशू थोडीशी अवघडूनच बसली. इतक्या सार्‍या अनोळखी चेहर्‍यांत तिने श्रीशला शोधायचा प्रयत्न केला. तो समोरच्या सेटीवर त्याच्या चुलत, आत्ते भावांच्या कोंडाळ्यात गप्पा मारत बसलेला. त्याच्याकडे बघून खुणेनं त्याला आता काय करु? असं विचारावस क्षणभर यशूला वाटलं खरं, पण संकोचही वाटला. का? तिच तिलाही या भावनेच आश्चर्य वाटल.

कितीतरी वेळ आजूबाजूच्या सार्‍यांची गडबड, गप्पा, इथून तिथे फ़िरणं, बायकांच्या आतबाहेर फ़ेर्‍या, मुलांची मस्ती सगळं चालू राहिलं. यशूला बोलणही सुचेनाच. काय बोलायच असत अशा वेळी? काय करायच असतं अशा वेळी नवरीनं?

पण हळूहळू लिव्हिंगरुम रिकामी झाली. एकेक बाई उठून आत गेली, पुरूषही कुठे गायब झाले. श्रीश कधी उठून गेला कळलही नाही. यशू एकटीच टेपवरची सनई ऐकत तिथं बसून राहिली.
हळुहळू जाणीव झाली, अंगावरचे दागिने, पैठणी, मानेवरची हेअरस्टाईल, भरगच्च गजरे सगळ्याचच ओझं होऊ लागलय. थोडं उकडतही आहे. यशूने एक खोल श्वास घेतला. भरपूर थकल्याची पुरेपूर जाणीव त्या क्षणी शरीराने घाईघाईनं करुन दिली. गेले तीनचार दिवस इतक्या धावपळीत गेलेले. आता तो साराच थकवा यशूशी बोलायला लागला होता. तिला वाटलं, अंगावरच सगळं ओझं एका क्षणात उतरवून, मस्तपैकी नाईटी चढवून झोपून जावं.

श्रीया तिच्याजवळ आली, " ये, आत चलतेस ना? कपडे बदलून घे. "



Zelam
Wednesday, December 07, 2005 - 12:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्तच सुरुवात आहे ट्युलिप.
पुढचं लवकर येऊदे


Tulip
Thursday, December 08, 2005 - 12:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

यशू लगेचच उठली आणि डाव्या बाजूच्या जिन्यावरुन वर जायला म्हणून मागे वळली. पण श्रीयाने तिचा हात धरुन थांबवल आणि, " अगं तिथे नाही, इथे चल! " असं म्हणत पडदा बाजूला करत तिने तिला खालच्या बेडरुमच्या दिशेनं नेलं. passage ओलांडून जाताना यशू जरा गोंधळली. टेरेस जवळची ती कृष्णकमळाचा वेल खिडकीतुन उलगडत गेलेली बेडरुम होती ना आपली? श्रीशची आणि आपली?

" तुझ्या बॅगा पण इथेच आहेत गं! आणि हे बघ, आजच्या दिवस साडीच नेसं. घरात इतकी जणं आहेत, आणि अंगावरचे दागिने पण सगळे नको काढून ठेवूस. नवी नवरी आहेस ना? " श्रीशच्या आई आतच काही आवरा आवर करत होत्या, त्या म्हणाल्या.
श्रीया तिला दंडावरची वाकी काढायला मदत करत होती. आजूबाजूला कोणी अनोळखी दोनतीन तरुण मुली चिवचिवत होत्या. यशूचा गप्प चेहरा पाहून श्रीया हलकेच तिला म्हणाली,
" श्रीश बोलला नाही का तुला काही? म्हणाला होता ती इथे आली की सांगिन. "

काय सांगणार होता? काही बोला सांगायला भेटलाच कुठेय तो इथे आल्यापासून? यशूने आल्या आल्या कॉल केला होता. पण तो ऑफ़िसमधे होता. त्याची रजा उद्यापासून सुरु होती. संध्याकाळी बोलू मस्तं. अस म्हणून तो कॉल जो डिसकनेक्ट झाला, त्यानंतर काही नाही. दुपारी मेंदी काढून घेताना सेल अगदी जवळ ठेवला होता. इतकं वाटत होतं तेव्हा की आत्ता श्रीशने यावं समोरुन, आपल्या गोर्‍यापानं हातापायांवरची नक्षी नजरेने टिपून घ्यावी. पणं त्याचा काही पत्ताच नाही. मैत्रीणींच्या गराड्यात श्रीशचा विषय असा न तसा निघत होताच, पण मगं बोलताना यशूलाच वाटायला लागल, इतकं बोललो आपण वर्षभर ह्याच्याशी, पणं वाटतय, फ़ार काही माहितीच नाहीये.

दुसरा दिवस सगळा ग्रहमुख, ब्लाउजेसची ट्रायल, ब्यूटीपार्लर, बारिकसारिक खरेद्या, मैत्रिणी, नातेवाईकांचा गराडा, आईबाबा, आज्जीशी गळ्यात पडून गप्पा. यशूलाही नव्हताच वेळ खरंतरं. सेलही मग तिने चार्जच केला नाही. उगीच काही sms आहे का missd call बघायलाच नको.
सीमान्तपूजनाला गर्द निळ्या कांजिवरम मधल्या तिला पहाताना श्रीशच्या खिळून राहिलेल्या नजरेला मगं यशूने मुद्दामच काही प्रत्युत्तर केलं नाही.

" अगं, उद्याच आहे सत्यनारायणाची पूजा. आजची रात्र इथेच झोप आमच्यासोबत तु. मग उद्या जा वरं. श्रीशकडे. "
पाठमोर्‍या यशूच्या हिरमुसल्या खांद्यवर बदलायची साडी ठेवताना श्रीयालाही वाटलं, सांगायला नको होत का श्रीशने हिला आधीच जरा? इतक्या तासंतास गप्पा केल्या तेव्हा हेही बोलायच.

" तुला कपडे बदलायच्या आधी वॉश घ्यायचाय का? चलं तुझी हेअरस्टाईल आणि गजरे उतरवते मी. हलकं वाटेल तुला जरा "
एकेक आकडे पीना निघाल्या, कोमेजलेले गजरे काढले तसं यशूला खरच हलकं वाटलं. श्रीयाशी बोलताना तिला मोकळही वाटायला लागलं. मानेवर केसांची साधीशीच नॉट बांधताना मगं खरतर तिला हसायलाच आलं. आपण काय हिंदी फ़िल्मच्या हिरॉईन सारखं श्रीशने आपल्या डोक्यावरचा घुंगट आणि अंगावरचे दागिने उतरवण्याची वाट बघत होतो जणू!
खरतर इतक दमायला झालय ते बरच आहे श्रीश वर आणि आपण इथे आहोत ते. शांतपणे झोपू तरी.
अंगावरच्या दागिन्यांसकट आंघोळबिंघोळ करायला यशूला उत्साह वाटेना. साडी बदलून ती तिथेच त्या बेडवर आडवी झाली. श्रीशच्या आई दूध घेऊन झोपतेस कां विचारायला आल्या तर यशू तशीच ट्यूबच्या उजेडात डोळ्यांवर हिरव्या चुड्याचे हात ठेवून झोपी गेलेली. हळूच ट्यूब बंद करुन यांनी बेडरुमचा एसी चालू केला आणि पडदा ओढून घेऊन त्या आत गेल्या.

कशाने दचकून जाग आली यशूला कळेनाच. क्षणभर आपण कुठे आहोत हेही लक्षात येईना. मंद नाईटलॅम्प आणि एसीचा स्पष्ट आवाज तेव्हढा तिला जाणवला. स्तब्ध, थंड अंधार. समोरच ड्रेसिंग टेबल, अंगावरची साडी, टोचणारे दागिने, यशूने एकदम भानावर येत बाजूला पाहील. श्रीया पाय पोटाशी घेऊन निजली होती. बाजूला अजून कोण अनोळखी बाई होती.
लग्नं झालय काल आपलं. यशू उठून बसली. डोकं प्रचंड बधीर होत. उठता उठता हातातल्या बांगड्या चांगल्याच किणकिणल्या आणि पाठोपाठ पायातली पैंजण साडीच्या काठांत गुंतून पाय अडकल्यासारखे झाले. यशूला कमालीच चिडचिडल्यासारख झाल. काय वैताग! कशाला ऐकून घेतल आपण हे असलं? हा खुशाल झोपला असेल एकटाच मोठ्ठ्या बेडवर. आणि आपण अंघोळही न करता झोपलो कधीनव्हे ते. साडीच्याच पदराने तिने चेहरा पुसून काढला. किती वाजलेत आत्ता?

पाय खालती सोडत यशू हलकेच उतरली. मधेमधे पसरलेल्या बॅगा,सामान ओलांडत तिने बाल्कनीचा दरवाजा हळूच उघडला. बाहेर छान मोकळा वारा होता. यशूने एक अगदी खोल श्वास घेतला. चंद्र अजून माथ्यावरच होता म्हणजे रात्र फ़ार उलटली नसणार. वार्‍याच्या एका झुळकीबरोबर यशूच्या नाकाला एक अस्पष्ट अनोळखी सुगंध जाणवला. कसला ते तिला कळेना. समोर बाग होती. पांढर्‍या गुलाबांची वेलही समोर होती. पण हा वास त्याचा नव्हता. रातराणी, मधुमालती कशाचाच नाही.
यशू बाल्कनीचा कठड्यावर ओठंगून उभी राहिली. सगळच अनोळखी. श्रीशशी मनातून पटलेल्या ओळखीच्या भरवशावर किती सहज आलो आपण इथे. तो तर कुठेच नाहिय आसपास. असं होत लग्नानंतर? असा काय हा? साधा दिसलाही नाही नीट ह्या घरात आल्यावर. यशूला उगीचच आईची तीव्रतेने आठवण झाली. मागोमाग सगळ्यांचीच. अगदी मितूची पण. घशातला आवंढा गिळता गिळता डोळ्यातच पाणी आल मग. त्यासकटच तिने वर आभाळाकडे पाहिल. पांढर्‍या ढगांचे पुंजके सगळीकडे पसरले होते. चांदणी तर एकही नव्हती. यशूला आता अगदी रडावसच वाटल. मोठ्ठ्यांदा. आभाळही नाही ओळखीच वाटतय इथल.

बर्‍याच वेळानं कधीतरी श्रीया मागे आली तेव्हा ती तशीच उभी होती. वर कलत्या चंद्राकडे टकं लाऊन पहात.

" ज्याचा विचार करत्येस तो वर झोपलाय गाढं "
यशू एकदम मागे वळली, " अं? नाही ... नाही. "

श्रीयाने यशूच्या हातांवर थोपटल. " झोप येत नसली तरी आत येऊन पड जरा. उद्या पूजा आहे. संध्याकाळपर्यंत पाहुणे असतील. विश्रांती नाही मिळणार. "

यशूने मग परत जबरदस्तीने ठसठसणार शरीर पलंगावर लोटले. डोळे चुरचुरत होते, डोकं जडं. तिला वाटल, ह्या आधीच्या, श्रीशशी ओळख झाल्यापासूनच्या सर्व रात्री कशा एका क्षणांत आपल्याला स्वप्नात पोचवत होत्या. आता डोळे मिटूनही मन जागंच राहिलय. मिटून घेण कस ते मनाला जमेनाच. श्रीश खरच झोपला? गाढ? jerk . तिला चिडून म्हणावस वाटल. ह्या आधी गुडनाईट कॉल केल्यावाचून झोप येत नव्हती त्याला. फ़ोन ठेवल्यावरही एखादा sms तरी यायचाच उशीवर डोकं टेकेपर्यन्त. आणि आता? बळेबळेच डोळे मिटून घेताना एक विचित्र असुरक्षितता तळातून वर आली. नव्यानच ....

सकाळी खुपच उशिरा जाग आली. शेजारचा पलंग पूर्ण रिकामा होता. सव्वा आठचे अविश्वसनीय आकडे यशूला दिसले आणि पार तारांबळच उडाली तिची. लगबगीने ब्रश करुन ती स्वयंपाकघरात आली. खरं तर पटपट जागाही सापडत नव्हत्या कसल्याच. श्रीशच्या आई आणि श्रीया ओट्यापाशी काही करत होत्या.
यशूने उठायला उशिर झाल्याबद्दल सॉरी म्हणून टाकलं तेव्हा सासूबाई वरुन काही काढता काढताच मागे न पाहता म्हणाल्या " असूदेत, असूदेत. " . श्रीयाने चहाचा कप तिच्या समोर ठेवला. " झोप लागली का? " ती हसली.
यशूही हसून म्हणाली, " हो, लागली. "

प्रसादाचा शिरा भाजतानाचा मस्त खमंग वास घरभर सुटला होता.
" मदत करु मी काही? " यशूने विचारल. त्या हो म्हणणार नाहीत अशीच आशा करुन.
" नको. अकराला बरोबर गुरुजी येईल. तु तयारी कर. चल, मी तुला घालायला देते काही. अर्रे!! आता अजून काय घालू मी अंगावर. यशूला म्हणावस वाटलं. पण सासूबाईचा चेहरा जरा कडक, करारी वाटला. मागच्या भेटींपेक्षा जरा वेगळाच.

आत नेऊन त्यांनी कपाटातून jewellary box काढली. निळ्या मखमालीवर माणकांचा सुंदर सेट लकलकत होता. त्यातली अंगठी तिच्या बोटात सरकवत त्या तिच्या नाजूक गोर्‍या हाताकडे पहात कौतुकाने हसल्या. घाल हा सेट. त्या डाळिंबी सिल्कवर छान दिसेल बघ. यशूलाही विलक्षण आवडला तो.

तयार होऊन ती बेडरुम बाहेर पडली आणि विचारांच्या गर्दीत, माणकाचं कानातल नीट बसलय की नाही हे पहात असताना समोर कुणी एकदम उभच राहीलेल तिला दिसल. श्रीश! यशूचा चेहरा फ़ुललाच एकदम. ती हसली. पॅसेज पूर्ण रिकामाच पडला होता.




Bhagya
Thursday, December 08, 2005 - 1:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ट्यु, मस्तच लिहितेयस ग. एवढी उत्सुकता ताणलीयेस......

Kmayuresh2002
Thursday, December 08, 2005 - 1:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ट्यु,
छान लिहीत आहेस.... प्रसंग फ़ुलवण्याची हातोटी दिसतेय तुझी...पुढे लिही लवकर


Neelu_n
Thursday, December 08, 2005 - 2:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ट्यु.. लाजण्याचा अटॅक
ही रोमॅण्टिक कथा आहे ना पण मला काही तरी जबरदस्त सस्पेन्स दिसतोय... लवकर पुढची कथा पुर्ण कर

Tulip
Thursday, December 08, 2005 - 5:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

यशूला वाटल, ह्या सुवर्णसंधीचा श्रीश चांगला फ़ायदाच घेणार आता. निदान डोळ्यांनी तरी बोलणारच काहीतरी, तिने मान उंचावून त्याच्याकडे पाहीले. केसं अस्ताव्यस्तच पसरले होते अजून त्याच्या कपाळावर. तो स्थिर उभा होता पण त्याची नजर अजीबात स्थिर नव्हती. तिच्या कानाच्या पाळीवर टेकलेल्या लालचुटूक बोटांवरून, हातातल्या हिरव्या मोरपिशी बांगड्यांवरुन सरकत सरकत ती तिच्या गळ्यातला माणकांचा नेकलेस आणि त्या माणकांशी स्पर्धा करणार्‍या ओठांवरुन अलगद वर सरकताना तिच्या नजरेने बरोब्बर पकडली. ह्याच्या तपकिरी डोळ्यांत एक सोनेरी मधाचा ठिपका पण आहे हे समजलेच नव्हते की आपल्याला अजून. तिच्या नजरेतले ते अधीर कुतुहल टिपेपर्यन्त मागून आत्याची चाहूल लागली. मग तिथून निघूनच जाताना तो इतकच म्हणाला, " सावकाश चाल जरा, पडशील " .

यशूला काही आपल्या मागून येऊन आत्या स्वयंपाकघरात शिरल्याच कळल नव्हत. त्याच्या पाठमोर्‍या आकृतीकडं ती बघतच राहिली.

तिला आठवल, तिला भेटायला एकदा तिकडे आला असताना, फ़िरुन येताना, श्रीशनं हात पुढं करुन अचानक तिच्या गालांवरच्या बटा माग सारल्या. यशू दचकलीच होती.
" या क्लिपमधे अडकवत जा ना अशा कशा सुटतात ह्या सारख्या " तो वैतागून ओरडलाच होता जवळजवळ.
" अरे, वार्‍यानं सुटतात. "
" उगीच काही सांगू नकोस, आधी त्या बटा अडकव. "
" का? एवढं काय पण ..."
श्रीश कारला रेलून उभा होता. हातांची घडी घालून इकडंतिकडं पहात राहिला. मग हताश स्वरात तिला म्हणाला, " सगळं बोललच पाहिजे का? तुला काही गोष्टी समजत नाहीत की काय? या तुझ्या बटा आठवतात मग तिथं ऑफ़िसमध्ये, काम सुचत नाही मग. सारखा हा चेहरा नि त्यावर हवं तसं पसरायची परवानगी असणार्‍या या बटा आठवत राहतात. "

हे सगळ बोलताना श्रीशची नजर तिच्या चेहर्‍यावरल्या बटांपेक्षा जास्त विस्कटलेली होती. आणि आता ... इतक स्थिर कस राहू शकला हा! तोच हा श्रीश आहे ना? विचारांच्या भोवर्‍यात अडकत यशू परत मागे खोलीत आली. आपलच देखण रुप आरशात निरखताना कदाचीत आपणच बदललोय की काय ह्याचा अदमास घेत असताना श्रीयाची चुलत बहिण मागून आली,
" wow .. काय दिसते आहेस! श्रीशने बघीतल ना आत्ता तर काही खर नाही त्याच्या जिवाच. " . यशू आणि श्रीया दोघीही यावर जोरदार हसल्या.

यशूला वाटलं. होऊनच जाऊदे आता श्रीशचा जीव कासाविस. बघतेच आता मी पण. ignore करतो काय मला? नाही त्याला ह्याचा पश्चात्ताप करायला लागल तर बघ. " . मान उडवून आरशातल्याच आपल्याकडे पाहून यशू तोर्‍यात हसली.

बाहेर पूजेची तयारी रंगात आली होती. तिच्या सासूबाई निलूला हातात चांदीची फ़ुलांची परडी देऊन जा जरा, वरचे केशरी गुलाब आणि जास्वंद आण म्हणून सांगताना तिने ऐकलं. यशूने जरा इकडेतिकडे नजर टाकली. श्रीश कुठेच खालती दिसत नव्हता. वरच असणार म्हणजे नक्की. तिनं घाईन ती परडी घेतली, " अं, मी आणते ना. गच्चीतलेच ना गुलाब? " .
सासूबाई हसल्या, " हो, तीथलेच. " .

यशू शांतपणे जीना चढून वर गेली. गच्ची समोरच होती. गुलाबांची कलमं टोकाला हवेत डुलत होती. तिने किंचित मान कलती करुन श्रीशच्या बेडरुमकडे नजर टाकली. दार उघडच होत. श्रीश रायटींग टेबलजवळ हातातल्या फ़ोनवर कोणाशीतरी बोळण्यात रमला होता. हाऽय! काय दिसत होता! मरुन सिल्कचा झब्बा सलवार, कपाळावरचा उभा लाल तिलक, दाट केसांची खट्याळ झुलूपं कपाळावर विहरत असलेली. यशूच्या छातीत चक्क एक गोडशी कळच आली. पण ती काही बोलली नाही. श्रीशची नजर सरळ गुलाबांच्या कलमांच्या टप्प्यात आहे हे तिने पाहिल.
गच्चीवर नुकतच कोणी पाणी मारल होत. त्या ओलसर फ़रशीवर साडीचा काठ भिजू नये म्हणून तिनं हळूच साडी किंचित वर उचलून धरली. गोर्‍या पायांवरची लालाबुंद मेंदी, रुपेरी चकाकणारे पैंजण, छुमछुमणारी जोडवी ... यशूने हलकेच एक एक पाऊल टाकायला सुरुवात केली. खालमानेन ती गुलाबांकडे गेली. दोन फ़ुले तोडून तिनं अगदी सावकाश डावीकडून मान वर करत करत श्रीशवर डोळे रोखले. श्रीश फ़ोन कानापासून बाजूला करत तिच्याकडेच पहात होता. डोळ्यातला सोनेरी ठिपका किंचित हललेला तिला इतक्या लांबूनही स्पष्ट दिसला, यशू तो क्षण पकडून ठेवणार तोच, " आंखोंसे तुने ये क्या कह दिया ...." गच्चीच्या दुसर्‍याबाजूच्या मधे टांगलेल्या झोपाळ्यावर बसलेल्या श्रीशच्या मित्रांच्या टोळक्याने गायलाच सुरुवात केली. हास्याचा जोरदार फ़वारा उडाला. यशूने सर्रदिशी बाजूला वळून पाहिलं. सगळे मनमुराद हसत होते. अगदी श्रीशही. छातीतल्या धडधडीला काबूत ठेवत ती कशी बशी हाताला लागतील तितकी फ़ुलं तोडून मागे जिन्याच्या landing वर गेली. कितीतरी वेळं नुस्तीच उभी राहिली. आतून लाजेचे शेकडो धुमारे फ़ुटले. श्वास ताब्यात आला, तशी तिला श्रीशच्या मित्रांचा रागच मनात भरुन आला. कोणकुठले loosers जमा करतो श्रीश आणि हीच वेळ मिळाली त्यांना इथे यायला?

पुढचा दिवस पूजा, उखाणे, चिडवाचिडवी ह्यांत संथ पण डौलदारपणे सरकत गेला. तरिही यशूला कुठेतरी हरवल्या हरवल्यासारखच वाटत राहिलं. जेवणाच्या पंक्तिपर्यंत तर ती पार गळून गेली. श्रीश समोरच बसला होता. भोवती मित्र आणि भाऊ. पण यशूपर्यन्त त्याची एकही हळवी नजर येईना. यशूला एकही पदार्थ जात नव्हता. श्रीशला कोणीतरी नाव घे म्हणून सांगितल तर त्यावरही मित्रांचे काहीबाही जोक्स चालूच होते " आता तरी बरोबर नाव घे रे. नाहीतर हिच नाव तिला आणि तिच हिला हा गोंधळ अजून चालू ठेवशील " . यशूचा घास हातातच राहिला. हिच नाव तिला? यशू प्रचंड संशयाने श्रीशकडे पाहू लागली. ह्याचा खरा रंग कुठला? आपल्याला जेवण जात नाही आणि हा चिक्कार हसत मस्तं खातो आहे. यशूच अंग घामेजूनच आलं. न राहवून ती पानावरुन उठली. श्रीयाकडे वळून मुद्दामच मोठ्या आवाजात जाताना म्हणाली, " मी पडू जरा? प्लिज, बरं वाटत नाही मला. " . श्रीशचा घास किंचित रेंगाळला, पण त्याने तिच्याकडे काही पाहिल नही.

आत येऊअ पडल्यावर कोणं कोणं आत येऊन चौकशी करत होते. पण डोळे श्रीश ला शोधत होते. हा कधी येणार आहे आपल्याला पहायला? या आधी फ़ोनवर आवाज नुस्ता बदलला तरी किती विचारायचा श्रीश. त्यावेळी वाटायच, जगाची राणी आहोत आपण. एकमेव देखणी आणि हुषार. मग? आता? श्रीशच्या इतक्या मुली आहेत जवळच्या ओळखीच्या माहीतच नव्हत काही. यशूच्या डोळ्यात पाणी भरुन आलं. तिला परत आई बाबा, आपल्या मित्रमैत्रिणींची आठवण झाली. आपलं कोणीच नाही इथे. यशूला आपल्या ह्या हळवेपणाच नवलच वाटलं. मिताचे परवाचे चांदण्यातले शब्द आठवले. परकं घरं, सासर, टेन्शन. थकून कधी झोप लागली कळलच नाही तिला.

चारच्या सुमारास फ़्रेश होऊन यशूने मग हल्का सिल्कचा चुडीदार घातला श्रीया जायलाच निघाली होती. यशू तयार झाल्यावर तिने तिला विचारल, " गच्चीवर येतेस? थोडावेळ गप्पा मारु. परत कधी यायला मिळतय काय माहीत मला. " .

श्रीशच्या बेडरुमशेजारुन जाताना हसण्या खिदळण्याचेच आवाज आले. तिनं किंचित डोकावून पाहील. श्रीशच. मित्रांमधे. तेच ते सकाळचे मित्र.

झोपाळ्यावर टेकत श्रीयाने हलकेच तिच्या हातावर हात ठेवला. दमलियेस ना खुप? की करमत नाहीये? सगळं नवनव वाटतय हो ना? "

यशू नकळतशी हसली. " हो, नवं तर आहेच गं, एकटा श्रीशच तर ओळखीचा होता. इतक्या पटकन मैत्री जुळली आमची. पण ..." यशू उगीचच एकेक बांगडी सरकवत म्हणाली, " इथं आल्यावर सगळच वेगळं वाटतय. अगदी श्रीशही. "

श्रीया ने अंगावरची ओढणी सावरत हलकेच पायाने झोका दिला. मग सहज स्वरात म्हणाली, " त्याचा नवरा झालाय. दुसरं काय? "
" म्हणजे? "
" म्हणजे मैत्रिणीच्या गळ्यात मंगळसूत्र अडकवल की सगळ्या पुरुषांचा होतो तोच. शिष्ठ आणि गृहित धरणारा नवरा. " .

यशूला धक्काच बसला. म्हणजे श्रीशचा असा नवरा होणार आहे ह्यापुढे? असा दुर्लक्ष करणारा, कौतुक न करणारा? मग तो जपणारा, हळूवार श्रीश? तो कुठे गेला? तिला काहीच समजेना.

श्रीया गेल्यावर घर अगदीच रिकाम झालं. सासूबाई तिला बोलवत म्हणाल्या. पाहुणी तर गेलीच ग सगळी. आम्हीही आता माझ्या मोठ्या बहिणीचा वाढदिवस आहे तिथे जाऊन येतो. उशीरच होईल बराच रात्री. तुम्ही जेवून घ्या, पाहिजे तर आता बाहेर पडा कुठे फ़िरायला बिरायला. परवा निघायचय तुम्हाला त्याची पण काही तयारी कर हवतर निवान्तपणॅ. "

सासूसासर्‍यांना निरोप देऊन ती आणि श्रीश आत आले. यशू मागं वळूनही न पाहता झटकन पुढं निघून गेली. खालच्या रुम मधले कपडे, दागिने, makeup box सगळ भराभर आवरताना मनातले रागाचे कढ जिरता जिरत नव्हते.



Tulip
Thursday, December 08, 2005 - 6:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मागून श्रीशची चाहूल जाणवली. यशू त्याच्याकडे लक्षच न देता आवरा आवर करण्यात मग्न झाली. श्रीश आला आणि समोर पलंगावर मस्तपैकी पसरला.
कानातले खस्सदिशी ओढून काढता काढता केसांना झटका बसला आणि मानेवरची क्लिप सुटून केस यशूच्या पाठभर पसरले. तीने चिडूनच हातातले earings द्रेसिंगटेबलवर आपटले. आणि एका हातात makeup box आणि दुसर्‍या हातात भरलेली बॅग उचलून उभी रहात तशीच पठमोरी रागा रागाने म्हणाली, " मी वर जातेय. "

श्रीश जागचा हललाही नाही. तिला ड्रेसिंगटेबलच्या आरशातून त्याची तिच्या पाठीवर रुतलेली नजर दिसली. ती तशीच गर्रकन वळली.
" आणि असा stare नको करुस माझ्याकडे "

आता मात्र श्रीश उठून बसला तो खो खो हसतच.
" च्यायला, लग्न झालय आता बायकोकडे स्टेअर केलं तर कोणाच्या बापाची भिती आहे? "
" शी! काय भाषा तुझी. हे बघ! तुझ्या त्या सत्रा मैत्रिणिंना करत बस स्टेअर खुश्शाल. माझं काहीही म्हणणं नाहीय I care a damn!!"
"now now... अताकोण bad language वापरतय? तेही काल लग्न झालेल्या नवर्‍याला? "

"huh! नवरा म्हणे. आत्ता आठवण झाली का लग्न झाल्याची? स्वत : तच गर्क होतास तु इतका. एकदाही मी कशी आहे, खाल्ल आहे की नाही, मला आईची आठवण येतेय का काही चौकशी ..."
आपल्याला रागाने की रडायला आल्याने काही बोलता येत नाहीय यशूला काही सुचेना. आणि कहर म्हणजे श्रीश ह्यावर मस्त हसला. मान मागं टाकत बेफ़िकीर हसला आणि हसता हसता एक खट्याळ शिट्ठी.
यशू त्याच्या ह्या क्रुर हसण्याकडे अवाक होऊन पहातच राहीली. श्रीशने काही न बोलता तिच्या हातातली बॅग उचलून खाली ठेवली. तिचे रिकामे झालेले हात धरुन तिला खाली पलंगावर बसवल. तिचे तळवे हातात धरुन तो पाहात राहिला. त्यांचा खोल श्वास भरुन सुगंध घेतला. हसला. " मस्त रंगलीय मेंदी. दोन दिवस इतकी क्यूट दिसत होतीस. "
" ओ! खरच? म्हणूनच एक नजरही टाकली नाहीस. "
" नजर? तुझ्यावरच तर होती सारखी. परवाची ती निळी साडी, हिरवी पैठणी, आजची डाळिंबी रेशमी साडी. "
यशू त्याच्याकां थोड्या आश्चर्याने पाहू लागली. खरच याचं लक्ष होत आपल्याकडं? पण मनातून राग जाता जात नव्हता. " खोटं. खोटं छान बोलतोस तू! एकही कॉल नाही, परवा मेंदीला पण आला नाहीस. टिपिकल मराठी नवर्‍यासरखा वागलास. माझे सगळे मित्रमैत्रिणी आले होते. इतकी धमाल केली. "

आता श्रीश सावध झाला. " काय धमाल? तु पण नाचलीस बिचलिस की काय? "

I have hit the spot now! यशूला जाणवले. ती अगदी समाधानाने हसली.

सावकाश त्याच्या हातातले आपले हात सोडवून घेतं तिने आपले सुटलेले केसं डाव्या खांद्यावरुन गोळा करत पुढे घेतले.
" म्हणजे काय? हो! तु ओळखतोस ना राहूल ला? राहूल वर्मा रे. कॉलेज मधे असल्यापासून मस्त डान्स पार्टनर्स आहोत आम्ही. आणि शिवाय रॉबिनही. तो साल्सा काय झकास करतो. "

श्रीश एक शब्दही बोलत नव्हता. यशूच पुढे म्हणाली. " Yu know Robin, don't yu? कमर्शिअल आर्टीस्ट म्हणून नुकताच lintas मधे लागलाय. गेल्यावेळी तुझी ओळख पण दिली होती करुन "

जांभळे सोनेरी केस केलेला, कानात स्टड घातलेला रॉबिन श्रीश कशाला विसरील?
" हं! " त्याच एकाक्षरी उत्तर.

" BTW श्रीश. मेंदी पाहीलीस तु. पण हा टॅटू बघ ना. राहून जाईल बघायचा " यशूने खांद्यावरची ओढणी बाजूला केली. सिल्क च्या कमिजच वरच हूक किंचित सैल करत तिने डाव्या हृदया जवळच ते निळ्या सोनेरी रंगातल चिमुकल फ़ुलपाखरु श्रीशच्या जवळ जात त्याला दाखवल. श्रीश च्या डोळ्यातला सोनेरी ठिपका आता तांबूस दिसत होता. फ़ुलपाखराचा टॅटू. त्याने ओढणी उचलून परत तिच्या खांद्यावर टाकली.

" सांग रॉबिनला. छान काढतो तो डिझाईन्स " .

यशू काही बोलायच्या आत तो बाहेर पडला सुद्धा.
आपल्याला श्रीशने टिपिकल नवरा बनून गेले दोन दिवस केलेल्या दुर्लक्षाचा वचपा काढल्याचं सुखं मिळतय की श्रीश मधल्या अजूनही शिल्लक असलेल्या मित्राचा possesiveness आवडतोय की त्याला आता नवर्‍याच्या मालकी हक्काच स्वरुप आलय असं वाटतय? यशूला काही मिनिट काहीच सुचेना. something has backfired तिल इतकच लख्खपणे उमगल.

ती धावतच बाहेर आली. श्रीश कुठेच नव्हता.




Tulip
Thursday, December 08, 2005 - 7:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गडबडून जात तिने इकडे तिकडे पाहील. कार तर जागेवरच होती. श्रीश ??... तिने हाका पण मारल्या एकदोन. कुठेच चाहूल नाही.
जिना चढून वर जाईपर्यन्त तिच्या नाकाचा शेंडा लालं झाला होता. फ़ारच ताणल का आपणं? बेडरुममधे शिरायच्या आधी तिने गच्चीवर, झोपाळ्यावर, कठड्याकडे नजर टाकली. सगळ स्तब्ध होत. सूर्य मावळतीला आला होता. केशरी सोनेरी किरणांनी गच्ची न्हाऊन निघाली होती. तिने बेडरुमच दार उघडून आत डोकावलं. थक्कच झाली यशू. हे सगळं कधी केलं ह्याने?
पलंग गुलाबाच्या पाकळ्यांनी गच्च बहरलेला. जागोजागी निशिगंधाचे आणि गुलाबाचे गुcच. खिडकीवरचा कृष्णकमळाचा वेळ नाजूक जांभळ्या फ़ुलांनी डुलत होता. आत्ता यशूला जाणवल, काल रात्रीचा तो अनोळखी सुवास हा होता तर. ह्या कृष्णकमळाच्या फ़ुलांचा! श्रीशचीच जागं अचूक पोचवत होता हा आपल्याला.
पण श्रीश कुठेच नव्हता आतही. ती तशीच बाहेर झोपाळ्यावर येऊन बसली. मान खाली घालून पायांनी झोके घेत. किती वेळ गेला काय माहीत. केशरी उन्ह आता गडद झाल होत. आणि समोर श्रीश हतात एका प्लेट मधे सॅंडविच आणि ज्यूस चा ग्लास घेऊन उभा होता.
" खा हे! दुपारी पण जेवली नाहीस ना? "
यशू चे डोळे परत भरुन आले. नकोय मला. मानेनच ती नाही म्हणाली.
" खा! " आता तो ओरडलाच. " आणि सारखी रडतेस काय? तुला काय वाटल तुझ ते मुर्खासारख रॉबिन कौतुक ऐकून मी रागावीन? "
प्लेट दोघांच्या मधे ठेवत आता तोही तिच्या शेजारी बसला.
" वेडाबाई. असं एक दिवसाच्या बायकोच्या भोवतीभोवती करता येतं का? बरं दिसलं असतं का ते? आणि मेंदी च म्हणशील तर तुला माहीतेय मी किती उशिरा पर्यन्त ऑफ़िसमधेच होतो तेव्हा. "

" नाही माहीत मला. तु कुठे सांगीतलस? मला मुद्दाम sms कर्रुन सांगायला मी आता थोडीच तुझी मैत्रिण राहीलेय "

" अर्रेच्चा! आता हे काय नविनच? हे बघ. माझ्या त्या सत्रा मैत्रिणी आज इथेच संपून गेल्यात. आता फ़क्त तुच एक. माझं वेडं फ़ुलपाखरु. " मिष्किल हसत श्रीशने तिच्या खांद्यावर दोन्ही हात टेकवले. तिच्या डोळ्यात त्याचे डोळे खोलवर रुतले.

असा कसा रंग बदलतो ह्याच्या डोळ्यातला हा सोनेरी ठिपका? यशूला राहून राहून नवल वाटत राहीले. आता तर चक्क केशरी दिसतोय. की ह्या केशरी संध्याकाळची जादूच उतरलीय ह्याच्या डोळ्यात?

डोळे मिटताना जाणवल ते एव्हढच की नवरेपणाच्या इतक्या सगळ्या संदर्भांतूनही ह्याच्यातला एका जिवलग मित्राचा अंश तसाच आहे, आपल्या खुप जवळ कायमचं रहाणारा, ओळखीचा.


समाप्त
And they lived happily ever after. Love is Orange


Limbutimbu
Thursday, December 08, 2005 - 7:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

hmmm.... टिपिकल मराठी नवर्‍यासरखा वागलास.
हा मराठी विरोधी सूर अजुनही कुणाकडुन तरी वाचाल्यासारख वाट्टय!
आठव लिम्ब्या नीट आठव कोण ते!

बाकी ट्युलपे, गोष्ट झकास रन्गवत नेलीस पण शेवट अगदीच उरकलास! DDD
कमीत कमी ते शेवटच पोस्ट दोन चार दिसानी टाकायचस ना!


Zelam
Thursday, December 08, 2005 - 8:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ट्युलिप मस्त लिहिलं आहेस.
बारीक details छान रंगवले आहेत.
BTW असं स्वप्न सत्यात उतरू लागलं तर काय बहार येईल ना!


Tulip
Thursday, December 08, 2005 - 8:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गपे LT शेवट उरकला काय? subtle ending म्हणतात ह्याला. आणि romantic संवादांचा स्टॉक संपला माझ्याकडचा



Ramachandrac
Thursday, December 08, 2005 - 8:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ट्युलीप, कथा छान रंगवली आहेस पण मलाही असे वाटते की शेवट खुप आटोपता घेतला आहे, BTW, एक सुचना शेवटी त्या TATOO चे रहस्य अजुन खुलवता आले तर पहा.
कथा फ़ुलवण्याची किमया छान जमते तुला.


Milindaa
Thursday, December 08, 2005 - 9:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ट्युलिप, ऑरेंज मध्ये कामाला आहेस का :-)

Neelu_n
Thursday, December 08, 2005 - 9:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे काय ट्युलीप.. मला तर वाटलेले काही तरी रहस्य नक्कीच असणार श्रीच्या वागण्यात.
काय आहे एकता कपुरच्या सीरीअल बघितल्याचा दुश)परिणाम असावा. :-)
हे ही कथानक छान आहे पण इथे शेवट इतक्यात नको होता....
अजुन एक शंका पुजेच्या वेळेला येशुच्या सासुबाइ फुले आणायला सांगतात ती नीलु' कोण बरे. कही वोह मै तो नही??


Chinmay
Thursday, December 08, 2005 - 9:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला पण तो टॅटू काहीतरी मोठा घोळ करणार असं वाटलं होतं...:-)

बाकी कथा छान आहे...:-)


Priya
Thursday, December 08, 2005 - 9:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ट्युलिप, आवडली गोष्ट. काहीतरी रहस्य असणार असं मलाही वाटलं होतं, पण साधी सरळ गोष्ट निघाली हे फारच आवडलं. खरं तर थोडं कौतुकमिश्रीत आश्चर्यही - एक दिवसाच्या बायकोच्या भोवतीभोवती करणं बरं दिसणार नाही ही जाणीव असणं हा आपल्या संस्कृतीचाच एक पैलू.

आणि हो - मित्रच राहिलेला नवरा हा किती सुखद अनुभव असतो हे मी सांगू शकते. :-)


Teerkas
Thursday, December 08, 2005 - 9:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

T^TU cyaa jaagaocaa guess cauklaa bar ka Aamacaa :-)

Divya
Thursday, December 08, 2005 - 9:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ट्युलिप कथा छानच आहे. सरळ साधी मांडणी आणि योग्य ठिकाणी संपल्यामुळे जास्त रंगली आहे.

Champak
Thursday, December 08, 2005 - 10:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुंदर कथा आहे. लग्न ठरलेल्या मुलीचे / नववधु चे भावविश्व अगदी सुरेख चितारले आहेस. :-)

Megha16
Thursday, December 08, 2005 - 10:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हाय ट्युलिप
वा खुप सुंदर, रोमांचक आहे कथा.
कथा वाचल्यावर आठवणी जाग्या झाल्या.
कथा मला ही वाटल होत की काहीतेरी सपेन्स आहे.पण छान होती कथा.सगळ वर्णन शब्द रचना मस्त आहे एकदम.


Chinnu
Thursday, December 08, 2005 - 10:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ट्यु, तुमची वर्णनशैली भावली. आणि नवरेपणा तर सही सही चितरला आहेस! गोष्ट आवडली.

Pama
Thursday, December 08, 2005 - 10:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ट्यू, सुरेख रंगवली आहेस कथा. अगदी डोळ्यांसमोर घडतेय अस छान चित्रण केलस. सरळ सोपी आणी मस्त.

Deepanjali
Thursday, December 08, 2005 - 11:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Tulip,
Cute romantic story आहे ग, पटकथेत शोभतील असे सीन आहेत :-).
BTW , मेंदी program ला येशुला जेवण भरवायला नाही गेला ना श्रीश, बघ अजुन एक point मिळाला भांडायला .
आणि मेहन्दी मधे त्याच लिहिलेल नाव शोधून काढायच असत first night ला, तो point टाकून अजुन काही romantic करता आल असत :-)



Moodi
Thursday, December 08, 2005 - 11:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला कथा खुप म्हणजे खुपच आवडली अगदी केशरी आंब्यासारखी. पण ट्यु तू तो टाटुचा प्रसंग रंगवायला पाहिजे होतास, त्यांचे पहिले भेटणे म्हणजे लग्नानंतर अन त्या गडबडीत तो high light करणारा scene मात्र हिरमुसला करुन गेला.
म्हणजे यशू बरोबर मी पण निराश झाले.
पण नवरेपणा मात्र फार छान रंगवलास, अगदी पहिल्या मेंदीसारखा.


Rachana_barve
Thursday, December 08, 2005 - 12:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे बापरे नवरा झालेला मित्र असा वागतो काय लग्नानंतर. बाकी ट्यु छान लिहिली आहेस गोष्ट. सही रंगवलेस प्रसंग

Milindaa
Thursday, December 08, 2005 - 12:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो तीरकस, आज तर तुमचा रंग पण चुकला आहे :-)

Priya
Thursday, December 08, 2005 - 12:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रचना, शेवटच्या प्रसंगासारखाही वागतो गं तेव्हा काळजी करु नकोस... :-)

Sakheepriya
Thursday, December 08, 2005 - 12:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ट्युलिप, ऑरेंज मध्ये कामाला आहेस का >>> नाही, lintas मध्ये होती
ट्युलिप, छान आहे कथा!


Asami
Thursday, December 08, 2005 - 1:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

caaMgalaI ilaihlaI Aahosa ga. typical marazI navara. kahI gaÜYTI Aazvalyaa.


Asami
Thursday, December 08, 2005 - 1:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

caaMgalaI ilaihlaI Aahosa ga. typical marazI navara. kahI gaÜYTI Aazvalyaa.


Ashwini
Thursday, December 08, 2005 - 1:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ट्युलीप, मस्तच ग. एकदम छान लिहिली आहेस कथा..

Giriraj
Thursday, December 08, 2005 - 2:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काय असाम्या?दोनदोनदा आठवल्या का?

Love is Orange!..... It have to be!




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators