Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through February 21, 2007

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » फाल्गुन » कथा कादंबरी » . बंदिनी-उर्वरित भाग » Archive through February 21, 2007 « Previous Next »

Supermom
Monday, February 19, 2007 - 11:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भलीमोठी गाडी इनामदारांच्या बागांजवळ थांबली अन दोन्ही खांद्यांवरून पदर घेत रेवती माधवबरोबर खाली उतरली. ड्रायव्हरनं अदबीनं सलाम केला अन गाडी बाजूला लावली.

माधवबरोबर फ़िरत, रमत गमत रेवती त्या विशाल बागा बघू लागली. आंबा पेरू, लिंबू, कित्येक प्रकारची झाडं नुसती बहरली होती. बागेत काम करणार्‍या गड्यांनी एका मोठ्या झाडाच्या सावलीखाली सतरंजी पसरली अन एका ताटात सारा बागेतला ताजा मेवा आणून ठेवला.

गुलाबी पेरूचा लचका हळूच तोडणार्‍या रेवतीकडे बघून माधव मजेत हसला.
'
'मला कौतुक वाटतंय रेवा तुझं कालपासून.'

'का? असं काय केलं मी?'

'शहरात वाढलेली, उच्चविद्याविभूषित मुलगी तू. सतत आधुनिक कपड्यांची,वर्तणुकीची सवय असलेली. अन आमच्या घरात कालपासून दुधातल्या साखरेसारखी मिसळून गेलीयस. मोठ्ठं कुंकू काय, दोन्ही खांद्यावरून पदर काय.'

रेवतीच्या चेहर्‍यावरचं हसू थोडं फ़िक्कं झालं.

'अगदी प्रामाणिकपणे सांगू का माधव? हे सारं फ़ार कठीण आहे अंगवळणी पडायला. केवळ महिन्या दोन महिन्यांनी व्हिसा मिळाला की लगेच मी तुझ्याजवळ लंडनला येणार, याची जाणीव आहे म्हणून जमतंय हे सारं. नाहीतर....'

'ते सारं बरोबर रेवा,पण तुझ्या या वागण्यानं तू आईला फ़ार आनंदी करतेयस ग. ...'

आईंचा विषय निघताच रेवा सावध झाली.

'माधव, मला तुला काही विचारायचंय.'

'नको विचारूस रेवा. तुला धक्का बसेल ऐकून...'

ती काय विचारणार याची जाणीव माधवला आधीपासूनच असावी.

'ते चालेल माधव मला. पण आईशी बाबासाहेबांचं वागणं सहन करण्याच्या पलिकडचं आहे रे. मी सून असूनही मला इतका संताप येतो. तू तर पोटचा मुलगा आहेस त्यांचा.
कसं सहन करू शकतोस तू हे?

'थांब रेवा. मला वाटलं नव्हतं हे सारं इतक्या लवकर तुला सांगावं लागेल. पण आता इलाजच नाही ग.'

एक दीर्घ श्वास घेऊन माधवनं बोलायला सुरुवात केली.

' माझी आई ही बाबांची द्वितीय पत्नी आहे रेवा. गावात अजून एक घर आहे त्यांचं. पुतळाबाई, म्हणजे त्यांच्या प्रथम पत्नी अजून जिवंत आहेत......'

वीज अंगावर कोसळली असती तरी रेवाला इतका धक्का बसला नसता. डोळे विस्फ़ारून ती माधवकडे बघू लागली. काय नव्हतं त्या नजरेत? आईंबद्दल सहानुभूती, या सार्‍या गोष्टीचं आश्चर्य, अन हो...., ही गोष्ट लपवून ठेवल्याबद्दल माधवबद्दल प्रचंड संताप.

'काय सांगतोयस तू माधव? अन हे इतक्या दिवसात तू कधीच बोलला नाहीस? अरे लग्नाआधी कितीदा भेटलोत आपण....'

रेवतीचा स्वर इतका तीक्ष्ण होता की ती पटकन उठून चालायला लागणार असं वाटलं माधवला.


Psg
Monday, February 19, 2007 - 11:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुमॉ, छान लिहत आहेस, पूर्ण कर :-)

Jhuluuk
Tuesday, February 20, 2007 - 4:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुपरमॉम, खुपच छान लिहिताय, प्लिज लवकर कथा पुर्ण करा, पुढे काय होइल त्याची उत्सुकता लागुन राहिली आहे..

Vadini
Tuesday, February 20, 2007 - 4:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Jhuluuk च्या म्हणण्याला संपूर्ण अनुमोदन!

Supermom
Tuesday, February 20, 2007 - 9:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनावर प्रचंड ताण आल्याने माधवनं रेवतीचा हात एकदम घट्ट धरून ठेवला.

'आपलं लग्न ठरल्यापासून सतत याच अपराधीपणाच्या जाणीवेतून जातोय ग मी. सारखं तुला सांगावसं वाटत होतं पण तुला गमावून बसण्याच्या भीतीनं मात केली या सार्‍यावर. विश्वास ठेव रेवती, तुला बघायला आलो त्या दिवसापासूनच इतकी आवडली होतीस तू मला...... माझ्या लंडनच्या राहणीमान, जीवनपद्धती या सार्‍याला अगदी अनुरूप वाटलीस तू मला. त्यात तुझा हा धीट, बोलका स्वभाव. माझ्यात जी धडाडी नाही ती पुरेपूर आहे तुझ्यात. या सार्‍या गुणांचं फ़ार फ़ार आकर्षण वाटतं ग मला...'

त्याच्या निर्मळ कबुलीजबाबानं रेवती किंचित वरमली.
'खरंच किती साधा, सरळ आहे हा स्वभावानं. अन आपणही लगेच चिडतो काहीही झालं की. सांगितलं नाही त्यानं हे खरंय, चुकलंच त्याचं. पण समजा सांगितलं असतंही, तरी आपल्या निर्णयात फ़रक पडायची शक्यता नव्हतीच. आपल्यालाही तितकाच आवडला होता तो. अन तसंही त्याच्या बाबतीत नाव ठेवण्यासारखं काही नाहीच. एवढा हुशार, देखणा, स्वभावानं मृदु अन घरचाही सधन. त्याच्या आईवडिलांच्या खाजगी गोष्टींनी आपल्याला तसं म्हटलं तर काय फ़रक पडतोय?'

रेवतीच्या विचारमग्न चेहेर्‍याकडे पाहून माधव आणखीनच चरकला. तो खूप दडपणाखाली आलाय हे जाणलं तिनं, अन पटकन त्याच्याजवळ सरकून त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं तिनं.

'नाही रे मी रागावले तुझ्यावर. पण मला हे सारं काय प्रकरण आहे हे जाणून घ्यायची खूप उत्सुकता लागलीय. तुझ्या मनाला त्रास होणार असेल तर नको सांगूस.....'

'त्रास?'
माधव खिन्नपणे हसला.
'मी या सार्‍याच्या पलिकडे गेलोय रेवती. पण आज तुला सारं सांगूनच टाकतो. पुन्हा या विषयाची काळी छाया नको आपल्या सुखी संसारावर..."

'रेवती, आमचं घराणं हे गावातलं एकदम खानदानी अन श्रीमंत. माझे बाबाही आजी आजोबांचे एकुलते एकच. लहानपणापासून खूप हट्टी अन तापट. त्यात घरात नेहेमी ऐश्वर्यात वाढल्याने त्याची पुरेपूर जाणीव असलेले. आजोबांच्या मनाविरुद्ध बाबा शहरात कॉलेजमधे शिकायला गेले, अन तिथंच शिकत असलेल्या पुतळाच्या प्रेमात पडले. घराणं जातपात, अन या सार्‍या गोष्टींचा जबर पगडा मनावर असलेल्या आजोबांना हे लग्न मान्य होणं शक्यच नव्हतं.'

'घरून जिवापाड विरोध झाला. पुतळाच्या घरी विरोध करणारं कोणी नव्हतंच. लहानपणीच अनाथ झालेल्या पुतळाला मामानं आजवर वाढवलं हेच तिचं नशीब. तो तिच्या घरातून जाण्याची वाटच बघत होता.'
' आजोबांना सार्‍या प्रकाराची कुणकुण लागताच त्यांनी बाबांचं लग्न आईशी ठरवलं. आईसुद्धा तोलामोलाच्या घराण्यातली, सुरेख. म्हणून आजी आजोबांना फ़ार पसंत होती. गावात अन नातेवाइकांत सगळीकडे ही वार्ता पसरली. बाबा मनातून फ़ार चिडलेले होते. आपल्या जन्मदात्यावरचा सूड त्यांनी त्यांच्या पद्धतीनं उगवला.'

लग्नाला पंधरा दिवस राहिलेले असताना ते सरळ पुतळाशी देवळात लग्न करून तिला घरी घेऊन आले.
आजी आजोबांवर वज्राघातच झाला. आजीनं तिला घरात कशालाही हात लावायला मनाई केली. आजोबांनी तर अन्नपाणी त्यागलं. ते दम्याचे रुग्ण होते. त्यांची प्रकृती इतकी बिघडली की शेवटी बाबांना पुतळाला गावात दुसर्‍या घरात ठेवणं भाग पडलं.

'कुणालाही पत्ता लागू न देता बाबांचं लग्न माझ्या आईशी नियोजित वेळी लावण्यात आलं. तिला बिचारीला अर्थातच या सार्‍याची सुतराम कल्पना नव्हती ग. बाबा तिच्याशी नेहेमी फ़टकूनच वागत.
त्यांचा सारा वेळ पुतळाकडे जाई. ही गोष्ट एवढ्याशा गावात लपून राहणं अशक्यच होतं.'

'आईच्या लक्षात सारं आलं अन तिचा तिळपापड झाला.
तिनं संतापून जाऊन बाबांना जाब विचारला. बाबांनी तिला बोलणं, तिरस्कारानं वागणं हे तर नेहेमीचंच होतं, पण त्या दिवशी त्यांनी आईवर हात उचलला.'

'एकुलत्या एका मुलाच्या संसाराचे धिंडवडे बघून आजी आजोबा कमालीचे व्यथित झाले. त्यातच आईच्या घरचे येऊन थडकले. त्यांनी सगळ्यांना खूप शिव्याशाप दिले. बाबांचं वागणं सार्‍या पंचक्रोशीत पसरलं.'

बोलता बोलता दम लागल्याने माधव जरासा थांबला.


Supermom
Tuesday, February 20, 2007 - 11:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'सगळ्या बाजूंनी असा विरोध झाला, लोकही कुजबुजू लागले,अन बाबा थोडेसे ताळ्यावर आले. नाही म्हटलं तरी आईच्या माहेरचा दबावही बराच होता. तिचं घराणं चांगलंच वजनदार होतं ना. वाड्यात ते राहू लागले हे खरं,पण आईला पत्नीचा जो मान, दर्जा द्यायला हवा तो कधीच नीटपणे दिला नाही त्यांनी. माझा जन्म झाल्यावर ते आता सुधारतील ही आशा होती सगळ्यांना. ती फ़ोल ठरवली त्यांनी. आई माझ्या संगोपनात गुंतली अन ते परत गावातल्या दुसर्‍या घरात रमले. घरी आले तरी आईशी कधीच ते धड वागत नसत. इनामदार घराण्यात बाईनं तोंड वर करून बोलण्याची प्रथा नव्हती. आई मात्र सतत अन्यायाला शाब्दिक का होईना, प्रतिकार करते हे सहन होत नसे त्यांना... तिनं गप्प राहून सारं सोसावं ही अवाजवी अपेक्षा होती ग त्यांची.'

'असाच संघर्ष करत, माझ्यावर कायम पाखर घालत संसार झाला बिचार्‍या आईचा.माझ्याबद्दल फ़ारसं ममत्व बाबांनी कधीच दाखवलं नाही. हं, नाही म्हणायला माझ्या शिक्षणात, लंडनला जाण्याच्या निर्णयात कशातच फ़ारसा विरोध केला नाही त्यांनी. अन मलाही फ़ारसा जिव्हाळा नाही त्यांच्याबद्दल. आईनंच मला वाढवलं खर्‍या अर्थानं.'

भावनावेग असह्य होऊन माधव थांबला.

'पण, इतकं सारं होऊनही, त्या इतक्या या संसारात दुःखी असूनही सोडून का गेल्या नाहीत बाबांना? अन सुशिक्षित असूनही पुतळाबाईंनी हे सारं का होऊ दिलं?'
रेवती अजूनही संभ्रमातच होती.

माधव हसला.
'रेवा, एकतर घटस्फ़ोट अजूनही आमच्या घराण्यातच काय, गावातच इतका लोकमान्य नाहीय बरं. शहरी वातावरणात वाढलेल्या तुला या गोष्टींची कल्पनाही येणार नाही कधी. अन पुतळाबाईंचा दोष नाही, दोष त्यांच्या परिस्थितीचा आहे ग. माहेरी कुठलाच आधार नाही. एकदा बाबांशी नाव जोडल्या गेल्यानं दुसर्‍या कोणाशी लग्नही अशक्य. खेडापाड्यात हे सारं अजूनही फ़ार गुंतागुंतीचं आहे ग. त्यात बाबांवर विश्वास ठेवून शिक्षणही अर्धवटच सोडून आली होती ती. डोक्यावर छप्पर अन जन्मभराची सोय पाहिली बिचारीनं. मला तिचा राग येतच नाही. अन तसंही या सार्‍यात दोषी कोण हे ठरवणं फ़ार अवघड आहे. घराणं अन खानदान या खुळ्या कल्पनांपायी बाबांचा विरोध करणारे आजीआजोबा,की आईला काही न सांगता खुशाल तिच्याशी दुसरं लग्न करणारे बाबा, की सारं कळून आमच्या घरच्यांना दोष देणारे, पण स्वतच्या बदनामीच्या भीतीने तिला माहेरी थारा न देणारे तिचे आईवडील. सारंच कठीण आहे ठरवणं.'

सगळं कळल्यानं रेवती आता शांत झाली होती. तिनं हलकेच माधवच्या हातावर थोपटलं. तिचा तो आश्वासक स्पर्श फ़ार सुखावून गेला त्याला.

'अन रेवा, खरं सांगू, मला तुझी फ़ार फ़ार काळजी वाटतेय ग. मी लंडनला गेल्यावर तू आईबाबांच्या मधे पडू नकोस मुळीच. अन्याय समोर होत असला की विरोध करायचा पिन्ड आहे तुझा. तशीच घडली आहेस तू. पण बाबा फ़ार तापट अन वेगळेच आहेत. तेव्हा जे दिसेल त्याकडे कानाडोळा कर, अन तुझा व्हिसा झाला की लगेच विमानात बस.'

'काही वचन बिचन मागू नकोस रे बाबा. मी बोलणार नाही त्यांच्या खाजगी गोष्टींत, पण माझ्यावर हाही विश्वास ठेवून जा की कुठल्याही परिस्थितीत योग्य असंच वागेन मी.' रेवा हसून म्हणाली.'

'त्या विश्वासावरच तर हा दीड महिना काढणार आहे मी.'
माधवनं तिला प्रेमानं जवळ घेतलं.


Maku
Wednesday, February 21, 2007 - 12:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Supermom कथा चान्न्गली आहे . पण माधवला आई बद्दल काहीच वाटत नाही. त्याला फ़क्त बाईकोअची काळजी आहे असे मला तरी वाटते.
कारण मला तरी पटले नाही माधवचे वागणे.

चुकले असेल तर दिवा घ्या.

Lopamudraa
Wednesday, February 21, 2007 - 4:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ह्म्म.. माकु is right अशा परिस्थीत आई आणी मुलाचे भावविश्व जास्त दाखवायला हवे होते माधवचे वागणे फ़क्त बायकोची काळजी एव्हढेच दिसते
शेवटची ओळ " दिड महिना इथे काढणारे... " ...?


Psg
Wednesday, February 21, 2007 - 5:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असं का म्हणताय मकु, लोपा? 'आईनीच वाढवलं मला' हे कबूल केलंय माधवनी.. रेवा बंडखोर स्वभावाची आहे, ती त्याच्या वडीलांना काही बोलली तर ते तिचाही अपमान करतील असे वाटतेय त्याला.. शेवटी अश्या नाजूक गोष्टीत कोणी बोलू नये असा सल्ला देतोय तो रेवाला.. नवीन लग्न झाल्यानंतर त्याने बायकोची काळजी करणं स्वाभाविक नाही का? :-)
लोपा, दिड महिना तिकडचा गं, 'लंडन' मधला..
सुपरमॉम, सॉरी तुझ्या कथेत मी लिहिले आहे. मी जो अर्थ काढला तो बरोबर आहे का? तू पण सांग माधवची बाजू तुझ्या विचाराप्रमाणे..
बाकी, मस्त आहे, लवकर पूर्ण कर :-)


Suvikask
Wednesday, February 21, 2007 - 6:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

psg ला अनुमोदन
तो, आई किती ग्रेट आहे हेच तिला पटवुन देण्याचा प्रयत्न करतोय. त्याचबरोबर वडिलांनाहि दोषी ठरवत नाही. बायकोलाही याची माहीती व्हावी पण कलह टाळ्ण्यासाठी तिने, यात जास्त लक्ष घालु नये असे त्याचे म्हणणे आहे. कारण शेवटी सगळ्या परीस्थितीचा आईलाच जास्त त्रास होईल.


Lopamudraa
Wednesday, February 21, 2007 - 7:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ok.. ok vaad nako.. कथा वाचायला मिळाली म्हणजे झालं.. पुढे पटकन लिहि ग supermom ....

Supermom
Wednesday, February 21, 2007 - 8:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मैत्रिणींनो,
प्रतिक्रियांबद्दल मनापासून आभार.
पूनम, तुझं स्पष्टीकरण अगदी बरोबर ग.


Supermom
Wednesday, February 21, 2007 - 10:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माधवला लंडनला जाऊन दोन आठवडे झाले होते. या कालावधीत रेवती अन उर्मिलाबाईंमधे एका हळुवार नात्याचा बंध विणल्या गेला होता. रेवतीच्या सगळ्या सवयी, आवडीनिवडी जपण्याचा त्या कसोशीने प्रयत्न करीत असत. सकाळी तिच्यासाठी म्हणून खास नाश्त्याला तर्‍हेतर्‍हेचे पदार्थ त्या सत्यभामेकडून बनवून घेत. जेवणात एकतरी गोड पदार्थ असेच. तिच्यासाठी म्हणून वरच्या मजल्यावरची माधवच्या आजोबांची लायब्ररी त्यांनी उघडून ठेवली होती. रेवती बरेचदा उशिरापर्यंत वाचत बसे. तेव्हा झोपण्याआधी तिच्यासाठी केशरी दूध त्या स्वत घेऊन येत. त्यांच्या मायेनं रेवती अगदी सुखावून जात असे.

अशीच एक दिवस रेवती मध्यरात्रीपर्यंत वाचत बसली होती. वाचता वाचताच तिचा डोळा लागला. केव्हातरी कुणाच्यातरी चढलेल्या आवाजाने तिला जाग आली. आवाज अर्थातच खालच्या मजल्यावरच्या उर्मिलाबाईंच्या खोलीतून येत होता.

पाऊल न वाजवता रेवती जिना उतरून खाली आली. बाबासाहेबांचा आवाज तर चढलेला होताच, पण उर्मिलाबाईंचा स्वर प्रथमच इतका तीव्र झालेला ऐकत होती ती.

'मुकाट्यानं किल्ली दे. मला जास्त बोलायला लावू नकोस.'

'मुळीच देणार नाही मी. त्या दागिन्यांना हात नाही लावायचा. आत्तापर्यंत तुम्ही कितीतरी अलंकार तिला नेऊन दिलेत. मी ब्र नाही काढला. पण ती नथ आईंची आहे. आपल्या घरात पिढ्यानपिढ्या चालत आलेली. ती माधवच्या पत्नीलाच मिळायला हवी.'

हे ठरवणारी तू कोण? अन माझ्या वाडवडिलांच्या संपत्तीचा विनियोग मी कसाही करीन. त्यात तू बोलायची गरज नाही. चल, आण किल्ली...'

'जीव गेला तरी देणार नाही मी.......'

नंतरचे झटापटीचे आवाज इतके स्पष्ट होते की रेवतीनं दाराकडे जाण्यासाठी पाऊल उचललं, तोच मागून हलकेच आलेल्या सत्यभामेनं तिच्या खांद्यावर हात ठेवला.

रेवतीनं सत्यभामेकडे पाहिलं. त्या क्षणी रेवतीच्या डोळ्यात काय होतं हे त्या अडाणी, अशिक्षित बाईलासुद्धा स्वच्छ वाचता आलं. या घरात या ठिणग़ीचा काहीही उपयोग नाही हे तिच्याशिवाय कोण जास्त समजू शकणार होतं? तिच्या आजीपासूनची पिढी या वाड्याच्या अन्नावर पोसल्या गेली होती.

दोन्ही खांद्यांना धरून तिनं रेवतीला थोडं अधिकारानंच स्वैपाकघरात नेलं.

'राग आवरा वहिनीसायब. त्यानं काय बी होनार न्हाय. त्या माऊलीच्या नशिबी ह्ये सदाचंच हाय.'

रेवती काही बोलणार तोच बाबासाहेबांच्या दूर जाणार्‍या पावलांचा अन उर्मिलाबाईंच्या विव्हळण्याचा आवाज तिच्या कानांनी टिपला. सत्यभामेचा हात झटकून ती तीरासारखी उर्मिलाबाईंच्या खोलीकडे धावली.


गुडघ्यात तोंड घालून त्या पलंगाजवळ खालीच बसल्या होत्या. टेबलावरचं मोठं पुष्पपात्र खाली पडून फ़ुटलं होतं. त्याच्या काचांमधला एक छोटासा तुकडा त्यांच्या अंगठ्याजवळ रुतला होता. कोणीतरी हिसडा दिल्यासारखे केस सुटून पाठीवर पसरले होते. हुंदक्यांनी सारं शरीर गदगदत होतं.

रेवती हळूच त्यांच्याजवळ बसली. पुढचा अर्धा तास ती भराभर काम करीत होती. सत्यभामेनं अन तिनं मिळून त्यांची पायाची जखम नीट पुसून पट्टी बांधली. त्यांच्या डोळ्याखाली सुजायला सुरुवात झाली होती. तिथं तिनं बराच वेळ शेक दिला. दोघींनी मिळून त्यांना नीट झोपवलं. सत्यभामेला जायची खूण करून रेवती तिथेच आरामखुर्चीत बसून राहिली. सकाळी सकाळी केव्हातरी त्यांना झोप लागल्यावरच ती बाहेर आली.

पूर्वेकडे तांबडं फ़ुटायला सुरुवात झाली होती. विमनस्कपणे रेवती झोपाळ्यावर बसली.सत्यभामेनं आणलेला दुधाचा पेलाही तिनं परत पाठवून दिला.

'कसलं नशीब हे ?'

तिच्या मनात आलं.
'रूप, वैभव, सारंकाही असून हे कसं पोतेर्‍यासारखं जिणं या बाईच्या कपाळी लिहून ठेवलंय विधात्यानं?'
दुपारपर्यंत ती अस्वस्थच होती. रोजचे सारे व्यवहार यांत्रिकपणे पार पाडत होती.

उर्मिलाबाईंच्या खोलीतून चाहुलीचा आवाज आला तशी रेवती घाईघाईनंच आत गेली.

त्या झोपेतच चाळवत होत्या. त्यांच्या कपाळावर रेवतीनं हात ठेवला मात्र, अन त्यांना फ़णफ़णून ताप भरल्याचं लक्षात आलं तिच्या.

सत्यभामेला विचारून तिनं सखाराम गड्याला तालुक्याला पाठवलं. निरोप मिळताच डॉक्टर तातडीनं आले.






Supermom
Wednesday, February 21, 2007 - 1:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्या आजारातून बरं व्हायलाच उर्मिलाबाईंना पुरता एक आठवडा लागला. रेवतीनं त्यांची सतत शुश्रुषा केली. अगदी मऊ भात भरवण्यापासून सारं ती करी. बाबासाहेब मात्र एकदाही घराकडे फ़िरकले नाहीत.

आठवड्याभरात उर्मिलाबाई हिंडू फ़िरू लागल्या. अशक्तपणा मात्र होताच. रेवतीचे जायचे दिवस जवळ येत होते.तिच्यासाठी म्हणून खास एक साडी भरतकाम करायला काढली होती त्यांनी. ओसरीवर बसून त्या आता तासनतास त्या साडीवर फ़ुले भरत असत. रेवतीनं त्यांना आराम करण्याबद्दल खूप विनवण्या केल्या पण त्या मुळीच ऐकत नसत.
'आई,'...
एकदा अशाच त्या दोघी बसल्या असताना रेवतीनं हलकेच प्रश्न केला,
'मी गेल्यावर नीट रहाल ना? मला तुमची खूप काळजी वाटते हो...'

'बाळ,काळजी कशाची? प्रत्येकाचं प्राक्तन असतं ग हे.तुम्ही दोघं मजेत रहा. सुखी रहा... मग सारं मिळालं बघ मला. माझ्या लाडक्या माधवला त्याच्या मनासारखी, खंबीर बायको मिळाली, त्याचा संसार माझ्यासारखा होणार नाही, याचाच आनंद फ़ार मोठा आहे ग...'

'ती किल्ली नेली शेवटी त्यांनी?'
रेवतीनं धीर करून विचारलंच.

'छे, ती मिळाली नाही शेवटपर्यंत, त्यासाठीच तर मारलं त्यांनी मला. जाऊ दे. चल जेवायची वेळ झाली बघ. आज रखमा अन सार्‍या गड्यांना सुट्टी दिलीय मी दुपारपर्यंत. देवीच्या जत्रेसाठी. बिचारे राब राब राबतात ग एरवी....'

उर्मिलाबाईंचं वाक्य अर्धंच राहिलं. वाड्याचा भला मोठा दरवाजा उघडून बाबासाहेब दारात उभे राहिलेले दिसले रेवतीला.
हातातलं पुस्तक बाजूला ठेवून ती उभी राहिली. अवघडून जाऊन, खोलीत जावं की इथेच उभं रहावं याचा निर्णय मनात न झाल्याने.

भक्कम पावलं टाकत बाबासाहेब उर्मिलाबाईंजवळ आले.

'किल्ली न्यायला आलोय मी...'
त्यांच्या सुरात विखार होता.

'रेवती, तू खोलीत जा तुझ्या...'
तशाही परिस्थितीत उर्मिलाबाई उद्गारल्या.

जाण्याचा विचार केव्हापासून केला होता रेवतीनं, पण कसल्याशा अदृश्य शक्तीने तिचे पाय जमिनीलाच खिळून राहिले.

' देणार नाही. त्यादिवशीच सांगितलय मी तुम्हाला....'

संतापानं बाबासाहेबांच्या कपाळावरची शीर ताडताड उडू लागली होती.

'खबरदार... उलटून उत्तरं नकोत मला.. चल, सांग कुठे आहे किल्ली...'

तिरस्कारानं उर्मिलाबाईंच्या दंडाला धरलं त्यांनी. पण तितक्याच चिडीनं त्यांनी हात सोडवून घेतला.

'तुम्हाला थोडी तरी शरम असू द्या. सूनबाईच्या समोर असं वागताना काहीच कसं वाटत नाही ?'

'माझी लाज काढतेस?'
रागानं आता बाबासाहेब पुरते बेभान झाले होते.

अन रेवतीच्या ध्यानीमनी नसताना ते घडलं. बाबासाहेबांच्या हातातल्या चांदीच्या मुठीच्या काठीचा जोरकस प्रहार उर्मिलाबाईंच्या डोक्यावर बसला.त्यांच्या जखमेतून रक्ताची धार वाहू लागली.

विजेच्या वेगाने रेवती जागची हलली.सारा जोर पणाला लावून तिनं काठीचा दुसरा प्रहार होण्याआधीच बाबासाहेबांचा हात घट्ट धरला.एरवी त्यांच्या मजबूत शरीरासमोर तिचा पाड लागला नसता. पण ते बेसावध होते, अन तिच्या संतापानं शंभर हत्तींचं बळ दिलं होतं तिला.त्यांच्या हातातली काठी तिनं झटक्यानं हिसकावून घेतली.

'काय करताय तुम्ही हे? माणूस आहात की कोण?'
एखाद्या रणरागिणीसारखी ती कडाडली.

'तुझी ही मजाल? काल घरात आलेली पोर तू. चल हो बाजूला.'

उत्तरादाखल रेवतीनं फ़क्त डोळे रोखून त्यांच्याकडे बघितलं. त्या मोठमोठ्या डोळ्यातल्या अंगारानं तेसुद्धा क्षणभर चरकले. पण रागानं आता त्यांच्या सार्‍या असल्यानसल्या विवेकबुद्धीचा ताबा घेतला होता.

रेवतीच्या हातातली काठी ओढून घेण्याचा प्रयत्न ते करू लागले. सारा जोर एकवटून रेवतीनं ती काठी आडवी धरूनच त्यांना ढकललं.
तोल जाऊन पडू नये म्हणून ओसरीचा खांब त्यांनी धरला अन ते अघटित घडलं.

खांबाला धरून उभे राहताराहताच ते खाली कोसळले. तोंड वेडवाकडं झालं अन ओठातून फ़ेस बाहेर आला.

इतका वेळ डोकं गच्च धरून बसलेल्या उर्मिलाबाई लटपटत उभ्या राहिल्या, अन त्यांनी रेवतीच्या हातातली काठी काढून घेतली.

'रेवा, ताबडतोब तुझ्या खोलीत जा. मी हाक मारेपर्यंत बाहेर यायचं नाही हे लक्षात ठेव.'

त्यांच्या आवाजात विलक्षण जरब होती.

रेवती खोलीत आली अन थरथरत पलंगावर बसून राहिली.


Swaatee_ambole
Wednesday, February 21, 2007 - 4:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान लिहीत्येस सूपरमॉम. पूर्ण कर लवकर.

Supermom
Wednesday, February 21, 2007 - 4:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खालचे आवाज अगदी स्पष्ट ऐकू येत होते रेवतीला. उर्मिलाबाईंनी शेजारच्या देशमुखांच्या घरी हाक मारलेली ऐकली तिनं. अन थोड्याच वेळात देशमुखांचा नोकर जिन्यावरून धडधडत वर आला.

'बिगीनं चला वयनीसायेब. मोठ्या मालकांची तब्बेत खराब जालीया. तालुक्याच्या गावाहून दाक्तर बोलिवलाय.'

अजूनही हातापायात होणारी सूक्ष्म थरथर लपवीत रेवती खाली आली. बाबासाहेबांना त्यांच्या खोलीत झोपवलं होतं. बर्‍याच लोकांचा घोळका कुजबूज करत होता. उर्मिलाबाई त्यांच्या उशाशी बसल्या होत्या. चेहरा कमालीचा शांत.

काही वेळातच डॉक्टर घरी आले. त्यांनी बाबासाहेबांना नीट तपासलं. अन गंभीर चेहर्‍यानं निदान केलं.

'अतिशय संतापामुळे मेंदूत गुठळी होऊन यांना पक्षाघाताचा जबरदस्त झटका आलेला आहे. त्यांचं वय बघता सुधाराची शक्यता जवळजवळ नाहीच.'

रेवती सुन्न होऊन ऐकत होती.

'हे काय विपरित घडलं आपल्या हातून? असं काही होईल असं स्वप्नातही वाटलं नाही आपल्याला.काय होईल आता? आई तर तिरस्कारच करतील आपला. त्यांच्या कुंकवावरच घाला घातला आपण....'

औषधपाणी देऊन डॉक्टर गेले, अन सारे लोकही पांगले. उर्मिलाबाईंनी देशमुखांच्या गड्याला माधवला फ़ोन करायला पाठवलं.

'रेवा,..'
उर्मिलाबाईची हाक आली तशी ती जड पावलांनी त्यांच्या खोलीत गेली. त्या पलंगावर अविचल बसल्या होत्या. डोक्याच्या जखमेवर पट्टी बांधलेली होती.तिला आत आलेली बघताच त्या लगेच उठल्या अन हाताला धरून तिला त्यांनी ओसरीवर नेलं. आपल्याशेजारी झोपाळ्यावर बसायची खूण त्यांनी केली मात्र, रेवती कोसळलीच. त्यांच्या मांडीवर डोकं ठेवून ती स्फ़ुंदू लागली.

मी मुद्दाम नाही हो केलं आई. तुमचा त्रास बघून तोल सुटला माझा...'

'गप्प पोरी. आधी शांत हो पाहू. तुझा मुळीसुद्धा दोष नाही या सार्‍या प्रकारात. त्यांच्या अतिरेकी संतापानं घात केला त्यांचा. अन मी मुद्दाम हे सांगायलाच बोलावलं तुला. मला वचन दे पाहू एक तू...'

अश्रूंनी ओला झालेला चेहरा उचलून रेवतीनं प्रश्नार्थक नजरेनं त्यांच्याकडे बघितलं.

आज जे काही घडलं ते फ़क्त तुझ्या माझ्यातच राहील. तू कुणा कुण्णाजवळ बोलणार नाहीस कधी. माझी शप्पथ आहे तुला. अन त्यांना सावरताना तोल जाऊन मी पडले असं सांगितलंय मी सार्‍यांना...'

रेवती थोडी घुटमळली. पण उर्मिलाबाईंनीच तिच्या लांबसडक बोटांमधे आपली बोटं गुंफ़ली अन तिच्या मस्तकावर मायेनं थोपटलं.

नंतरच्या घटना फ़ार वेगानं घडत गेल्या. निरोप मिळताच माधव तातडीनं निघाला. रेवतीचा व्हिसाही तेवढ्यातच आला. दोघांनीही महिनाभर राहून बरोबरच निघायचं ठरवलं. बाबासाहेबांची अवस्था अगदी तान्ह्या बाळासारखी असहाय्य झाली होती. पण उर्मिलाबाई अगदी प्रेमानं त्यांचं सारं करीत. त्यांच्या वागण्यात कुठेही एवढासा विषाद नव्हता.

निघायच्या दोन दिवस आधी माधव अन रेवतीला त्यांनी जवळ बसवून घेतलं.

'तिकडे नीट रहा. स्वतला जपा. माझ्या जिवाला काळजी लावू नका...'

माधवचे डोळे भरून आले.
'आई...तुझ्याच काळजीने वेडा होईन ग मी तिकडे. तुला काही दिवस लंडनला न्यायचा विचार होता माझा, पण आता तर तू नेहेमीकरताच अडकलीस.'

' नाही बाळ. असं बोलू नये. अडकले कसली? जन्माची गाठ बांधलेली आहे रे आमची. अन इथे मी एकटी थोडीच आहे रे. इथे सगळे आपले जुने नोकरचाकर आहेत की सोबतीला. या वाड्यातच आयुष्य गेलं माझं. मला इथे अगदी शांत वाटतं. माझी मुळीच काळजी करू नका तुम्ही दोघं. दर वर्षी येत जा मात्र. अन हो, पुतळाला महिन्याकाठी चोळीबांगडी लावून दिलीय मी मुनीमजींकडून. माझ्यानंतरही ती मिळत राहील ही काळजी घ्या.'
संभाषण संपवून त्या उठल्याच.

निघायची सारी तयारी झाली. सखारामनं सगळं सामान गाडीत भरलं. कुलस्वामिनीच्या पाया पडायला म्हणून रेवती अन माधव देवघरात गेले. बाहेर येऊन दोघांनीही उर्मिलाबाईंना मिठी मारली. त्यांनीही प्रेमभरानं लेकाला अन सुनेला जवळ घेतलं.

नमस्काराला म्हणून दोघेही उर्मिलाबाईंच्या पायाशी वाकले अन रेवतीचे डोळे जागीच खिळून राहिले.

उर्मिलाबाईंच्या पायात रेवतीनं सत्यनारायणाच्या दिवशी बघितलेल्या सोनसाखळ्या चमकत होत्या.


समाप्त.


Priyab
Wednesday, February 21, 2007 - 4:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ohh ho Excellent Supermom ..tusi great..I liked it very much एखादि छान मराठि मालिका होइल या वर :-)

Kedarjoshi
Wednesday, February 21, 2007 - 5:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सोनसाखळ्या चमकत होत्या.>>>. Powershift.

सुमॉ. सुंदर. बर्याच दिवसांनी चांगली कथा वाचली. खरच प्रिया म्हणते तशी झी ला वा स्मिता ठाकरेला पाठव. वहीनीसाहेब पेक्षा नक्कीच चांगली आहे.
मॉड तो पहीला भाग गेल्या महीन्यात आहे तो ईकडे टाकाल का?

Supermom
Wednesday, February 21, 2007 - 6:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मित्रमैत्रिणींनो,
मनापासून आभार.
केदार, वहिनीसाहेब मी बघितलेली नाही. बर्‍याच दिवसांत भारतात गेलेच नाहीय.


Marhatmoli
Wednesday, February 21, 2007 - 7:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Supermom ,

अप्रतिम आहे कथा तुमचि. फ़क्त एकच लहानशि गोष्ट खटकलि कि रेवति सारखि एवढि आधुनिक मुलगि 'कुंकवावर घाला' अश्या पध्धतिने विचर करेल अगदि तश्या मनस्थिततहि हे पटत नाहि.





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators