Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
लाल्याची गादी

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » कार्तिक » ललित » लाल्याची गादी « Previous Next »

Mrinmayee
Friday, November 10, 2006 - 11:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"हॅलो! ओळखला का आवाज? सांग बघु मी कोण?"
फोनवर पलीकडून हा प्रश्ण विचारला गेला की फार वैताग येतो. फोन घेणारा कुठल्या मन:स्थीतीत असतो काय विचारात असतो ते काही नाही. ह्यांचा आवाज ओळखा! जणु लक्षात राहील असा आवाज अमिताभ सारखा! विचार करूनही ओळखता आला नाही.
"नाही सांगता येणार. कोण बोलताय आपण"?
"मी राहुल! आता अमेरीकेतून आल्यावर काय जुन्या ओळखी पण विसरलात"? आणखी एक वैतागवाणा कमेंट!
राहुल नावाच्या व्यक्ती आठवायचा प्रयत्न केला. मेंदु ढिम्म!
"अगं मी लाल्या"!!!
पण लाल्या म्हंटल्यावर ट्युबलाइट पेटली. आईच्या घराशेजारी रहाणारा लाल्या!!!! कसं विसरता येणं शक्य आहे! सार्‍या कॉलनीत लाल्या माहिती. त्याची धाकटी चार भावंड पण! पाचही कार्टी अत्यंत उचापतीखोर! आई बघीतली तर अगदी काडीमाडी जीव. तीनी रागवायला सुरवात केली की ती बसलेल्या खुर्चीसगट तीला स्वयंपाकघरात नेउन पटकायची ही मुलं आणि परत मनसोक्त धिंगाण्यांना सुरवात.
"ऐकतेस ना? मी आहे इथे जीवंत अजून"
जवळपास १५ वर्शांनी लाल्या बोलत होता माझ्याशी. पण थाट तोच!
"बोल बोल! कसा आहेस रे? काकी, काका कसे आहेत? बाकी गँग कशी आहे?"
"सगळे मजेत. मला कळलं तु नागपुरात आल्याचं. मीही सध्या इथेच आहे. भेटायला येईन म्हणतो. कधी वेळ आहे तुला?"
"या रवीवारी येतोस? बाकी दोनाचे चार हात झालेत की नाही?"
"हातच काय, आम्हीही दोनाचे चार झालोय. हीला आणि पोट्ट्यांना घेऊन येतो". बरेच दिवसांनी "पोट्टे" शब्द ऐकला. मस्त वाटलं.
"ये ये. आई म्हणतेय जेवायलाच या सगळी".
फोन ठेवला आणि लाल्या अँड गँगचे शेजारी असतानाचे दिवस आठवले.
अभ्यासात सगळ्या भावंडांची डोकी तशी तल्लख! पण अभ्यासाला बसवणं एक दिव्य! चार भाउ आणि एक बहीण, पल्ली. ती ह्या सगळ्यांत वरताण. शाळेतून आली की रिक्षा थांबायच्या आत उड्या मारून खाली उतरायचं. मग फाटक न उघडता त्यावरून चढून अंगणात. घरी त्यावेळी नेमका पंडित पोळ्या करत असायचा. काकींनी केलेली भाजी आणि पोळ्या पोटात ढकलून आणि कमितकमी ७-८ ताज्या पोळ्या गल्लीतल्या बेवारस कुत्राला खाउ घातल्या की मग खेळायला पसार व्हायची ही मुलं. पंडित सगळ्यांच्या नावानी ठणाणा करायचा. पण लक्ष कोण देतो?
फार क्वचित जीन्यानी गच्चीत जायची ही मुलं. एरवी पाइप जिंदाबाद! "मेल्यांनो, चोराला आणखी रस्ता कश्याला दाखवताय?" काकी म्हणायच्या.
"पाईपवरून गच्चीत चढायला आम्ही कशाला शिकवावं लागतं चोराला? चोरी करायची म्हंटलं की त्याला आपोआप सुचंत असेल" इती गोल्या उर्फ गोपाल.
उन्हाळ्याचे दिवस आले की काकींच्या पोटात गोळा यायचा. "अडीच महीने काय करु हो ह्यांचं"? त्या आईला विचारायच्या. कारण आजोळी देखील कुणी ४ दीवस ह्यांना ठेवायला तयार नसायचं. काकींची आई म्हणायची,
"जावईबापु, लेकरांची सोय करा काहीतरी आणि माझ्या पोरीला पाठवा हो. काही आराम नाही तिच्या जीवाला!"
पण काकींनाही ही मुलं टाकून कुठे जाववायचं नाही.
आमच्या कॉलनीत या मुलांना 'परिचय सिनेमातली गँग किंवा लाल्याची गँग म्हणायचे."
लाल्या म्होरक्या. मूर्खपणांना, खोड्यांना डोकं ह्याचं आणि कृतीला जोड बाकी भावंडांची.
एकदा तर कहर झाला. आईनी सर्कसला पाठवलं नाही म्हणून यांनी स्वत:ची सर्कस काढायचं ठरवलं. सिलींग फॅनला आईची साडी अडकवून त्यावर लोंबकाळणं झालं, पाईपवरून गच्चीत चढून झालं आणि ग्रँड फिनाले साठी अंगणातल्या विहीरीत उतरून पाणी काढण्याचा प्रयोग झाला. विहीरीत लाल्या सगळ्यात खाली तर सगळ्यात धाकटं विहीरीच्या काठाला. एकालाही विहीरीत पडलं असतं तर धड पोहोता यायचं नाही. वर्शातून तीनदा तरी फ्रॅक्चर बरं करायला डॉक्टरकडे धाव असायची. तर ह्या भुतावळीतला लाल्या भेटणार म्हणून मला खूप आनंद झाला. रवीवारची वाट बघत होते मी.
दिल्यावेळी लाल्या आणि मंडळी घरी आली. एरवी १० ठिकाणी बँडेज असणारा, अर्धा वेळ धुळीनी माखलेला असणारा लाल्या स्मृतीत असताना अचानक रुबाबदार स्मार्ट राहुल समोर दिसला. ओळख पटेना. बायको देखणी. मोठं पोर ५ वर्शांचं धाकटं सव्वा वर्शाचं. सगळ्यांच्या ओळखींचा सोहळा आटोपला. आम्ही लॉनमधे खुर्च्या टाकून बसलो. लाल्यानी लागलीच बॅगेतून ओडोमॉस कढून आपल्या पिल्लांच्या अंगाला चोपडलं. (ह्याच लाल्यानी धाकट्या भावंडाला कांजण्या झाल्या असता तुळस आणि कडुलिंब मिळाला नाही म्हणून परसातला गवती चहा वाटून लावला होता, आईच्या अपरोक्ष!)तेव्हड्यात धाकट्या चिरंजीवांनी गवतात फतकल मारली. लाल्यानी ताबडतोप सतरंजी मागून हंथरली. आम्हा सगळ्यांनाच त्याला 'जबाबदार बापाच्या' रोलमधे पाहून खूप गंमत वाटंत होती. उरलेला वेळ तो मुलांना खाउ-पिऊ घालंत होता. गरज पडली की त्यांच्या चड्ड्या काढून घालून द्यायची कामं करत होता. लहानपणच्या वात्रटपणाचा मागमूसही नाही! अर्थात तो आता अधीचा लाल्या नाही करता सवरता झालाय हे कळंत असूनही जरा चुकल्यासारखं होत होतं.
झालं आता लाल्या आणि गँगसारखं कुणी दिसणार नाही असा विचार करतच होते तेव्हड्यात शेजारच्या घरातून आईच्या नावानी आरडाओरडा सुरु झाला. आम्ही सगळेच धावत बाहेर आलो. बघतो तर काय, लाल्याचे जेष्ठ चिरंजीव शेजार्‍यांच्या कुत्र्याचे कान धरून त्यावर स्वार झाले होते. आणि धाकटे चिरंजीव त्याला मिळालेलं मोठ्ठ कॅडबरी चॉकलेट कुत्र्याच्या तोंडात कोंबत होते.
लाल्याची गादी चालवायला कोण हा प्र्श्णच उद्भवायला नको!


(हे वाचून कुणाला आपलं लहानपण आठवतंय का? सांगा बघु! तेव्हाची वात्रट कार्टी आताचे जबाबदार नवरे आणि बाप!:-) )


Maitreyee
Saturday, November 11, 2006 - 7:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सही गं!
मला आठवल्या माझ्या आणि माझ्या गाॅंग़ च्या एकेक उचापती
:-)

Asmaani
Saturday, November 11, 2006 - 8:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृण्मयी, सहीच!, शेवटचा कुत्र्याचा प्रसंग altimate !

Chinnu
Saturday, November 11, 2006 - 1:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृण, खुप आठवणी जाग्या झाल्यात. मी विशेष उचापतखोर नाही. पण चाळीत gang होतीच ना लाल्याची! :-)

Pendhya
Saturday, November 11, 2006 - 10:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मॄण्मयी, या बोले, बोहोत ही बढिया लिखा है तुने.
तुझं लिखाण वाचतांना पण, लहाणपणीची आठवण करुन राहीलो होतो ना मी.

कायले जादा लिहित नाही ग तू?

आमच्या घरचा पंडित पण आम्हाला गरम गरम पोळ्या करुन वाढायचा.
त्याच्या खांद्यावर लाल पंचा असायचा.
ऊत्तम स्वैपाक करायची ती लोकं.

खरय, असे मित्र - मैत्रीणी भेटतात कधी बर्‍याच वर्षांनंतर, आणी बदल दिसुन येतो.
कधी छान वाटतं, तर बरेच वेळा, एखाद्या विषयी वाटतं की, काहीही झालं तरी ह्याने / हीने, बदलालया नको.



Savani
Monday, November 13, 2006 - 9:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृ, सहीच. मला माझ्या सख्ख्या भावाचच लहानपण आठवलं. आताचा तो बघितल्यावर लोकांचा विश्वास बसत नाही की लहानपणी कसा दंगेखोर होता ते.

Sampada_oke
Monday, November 13, 2006 - 11:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झकास. मला मात्र माझेच बालपण आठवले.:-):-)

Prasik
Monday, November 13, 2006 - 12:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा हा हा! थाबतच नाही................. हा हा हा

Manuswini
Monday, November 13, 2006 - 6:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अगदी खरे मृण्मयी, हा योगायोग आहे का ग?
माझ्य आत्येला पण पाच मुले आहेत same
माझी आत्येची मुले अगदी अशीच सैतान होती लहानपणी......
मला तरी अजिबात अनुभव नाही कारण वयात जवळपास २० २१ वर्षे तरी असेल पण आईने सांगीतल्या ह्या आठवणी जेव्हा ती नविन लग्न होवुन घरात आली तेव्हा..

आणी ह्या आठवणीना उजाळा जेव्हा तेव्हा मिळतो कारण त्यांची मुले सुद्धा एक पायरी पुढे आहेत

माझ्या मोठ्या आत्येची ५ मुले त्यातील ४ मुलगे नी एक मुलगी........ ती सुद्धा भांवा बरोबर अगदी अश्याच उच्यापत्या करायची

आईला वहीनी म्हणत कीती वेळा आईने त्यांना सांगीतले तरी मामी न म्हणता 'वहीनी' .... आई तुझी डॉक्टर वहीनी आली
स्वःताच्या आजीला 'सासुबाई' म्हणत ने फीदीफीदी हसत नी आत्येला चिडवत का तर आत्या सासुबाई म्हणायची
आई खुपच अंचबीत व्हायची सुरवातीला आईला वाटले काय शिश्त नाही लावली पण आत्येने कीतीही काही करुन ती एकण्यार्‍यातली न्हवती.
अभ्यासात हुशार पण २ वर्षाआड एकाची तरी शाळा बदली करायला लागायची काहीतरी खोडी केलेली असायची की principal चक्क नको सांगत. काका बाहेर असत तेव्हा नोकरीला सगळे आत्येवर
आणी आता त्यांची पोर म्हणजे दहापट पुढे.
सगळी छान हुशार, दिसायला सुंदर well-settled आहेत. सगळ्यांना दोन, दोन मुले आहेत नी ती मुले अगदी तशीच वरताण

भेटायला येताना आवडीने सगळी मिळुन येणार सर्व त्यांच्या कारट्याबरोबर कारण मामी तशी लाडकी आहे त्यांची.

ही सर्व कारटी(आत्येभावांची कारटी(मुले)) गणपतीला आलेली होती आमच्याकडे बाहेर lawn मध्ये खेळत होती अचानक ओरडा एकायला आला तर सगळ्यात लहण बहिणीला दोघांनी दोन बाजुने(एकाने हात, तर दुसयाने पाय) पकडले होते नी झोपाळा समजुन त्याच्यावर आणखी एक कारटे तिच्या पोटावर बसले होते ती ओरडते पाहुन मजा वाटत होती असे बरेच प्रकार



Raina
Monday, November 13, 2006 - 10:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृणमयी- मस्तचं लिहीलय. अगदी डोळ्यासमोर उभे राहिले पोट्टेपाट्टे.

Dineshvs
Monday, November 13, 2006 - 10:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृणमयी छान लिहिले आहे. बहिणपण उचापती करण्यात पुढे होती, वाचुन मजा आली.

Bee
Monday, November 13, 2006 - 11:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाह मृ, अजब रसायण नंतर आणखी एक चांगले व्यक्तीचित्रण.. सुरेख लिहितेस.

Shyamli
Monday, November 13, 2006 - 11:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा!!!
मृ, छानच,
आवडल


Psg
Tuesday, November 14, 2006 - 1:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्त मृ :-)

generally मस्तीखोर मुलं पुढे इतकीऽऽऽ बदलतात की 'हीच का ती' असा प्रश्नं पडावा :-)

मनु, तुझे अनुभवही मस्त!


Mrinmayee
Tuesday, November 14, 2006 - 11:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सगळ्यांच्या प्रतीक्रियांबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!!!
मैत्रेयी आणि संपदा, तुम्ही लाल्याच्या गँगमधल्या 'पल्ली' होता तर! :-) तुमची गादी कोण चालवतंय सध्या? :-)
मनु, तुझ्या आतेभावंडांबद्दल वाचून लाल्या कंपनीचे असे अनेक किस्से आठवले. आई-बाप तरी किती डोकंफोड करणार? आजीला 'सासुबाई' म्हणायचं.. :-)
कायले जादा लिहित नाही ग तू?..पेंढ्या लई जास्त लिवलं तर येथ वाचनार न्हाई कुनी! पोट्टी बोर करते म्हनून सोडून देतील रं भाऊ


Swaatee_ambole
Tuesday, November 14, 2006 - 11:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृण, नेहेमीप्रमाणेच मस्त लिहीलंयस. खरंच मजा वाटते आपल्याबरोबरचे वात्रट प्राणी ' जबाबदार आईवडिलांच्या' रोलमधे बघताना! :-)

Rachana_barve
Tuesday, November 14, 2006 - 4:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृण मस्त लिहिल आहेस. :-)

Pendhya
Tuesday, November 14, 2006 - 9:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पोट्टी बोर करते म्हनून सोडून देतील रं भाऊ>>>>>

मॄण्मयी, अब्बे! बोर करते, असं काऊन म्हनतील? तुले लियायचं असल तर ली की. मले तर वाटून राहिलय की तसल्या " खप्ती " पोट्या - पोट्टींकडे तू जादा लक्ष देतेस.

Malavika
Tuesday, November 14, 2006 - 9:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खप्ती " पोट्या - पोट्टींकडे तू जादा लक्ष देतेस. पेंढ्या, 'देतेस' नाही, देउन राहिली.

Pendhya
Wednesday, November 15, 2006 - 9:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मालविका, खुपच आए बा तू तर.

खरय खरय ' देऊन राहिली ' च ठिक आहे.


Rupali_rahul
Thursday, November 16, 2006 - 5:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान लिहिल आहेस गं मृणमयी... मला कॉलेजात असताना केलेल्या उचापती आठवल्या...




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators