Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through August 14, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » श्रावण » ललित » चिकाको » Archive through August 14, 2006 « Previous Next »

Mrinmayee
Friday, August 11, 2006 - 12:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लॅबमधे पहिल्या दिवशी पाय ठेवला अन आतापर्यंत पोटात असलेला गोळा घशाशी आला. स्वच्छ, सुंदर भव्य हॉल, त्यात मांडलेले ते work benches , निरनिराळे मायक्रोस्कोपस्, सेंट्रिफ्युजेस, हजारो बाटल्या आणि मन लावून काम करणारे नाना देशांचे लोक, पांढर्‍या डगल्यातले, हातात ग्लोव्स घालून आपलं काम निमूटपणे करणारे! लॅबमधे काम करणं तर नवीन नव्हतं, पण नवखं होतं ते अमेरिकेत येऊन, अचानक एका प्रोफेसरांना भेटून त्यांनी मला सरळ त्यांच्या ह्या जादुई नगरीत काम करू देणं!
बिचकतच आत गेले आणि समोर एक गोड जपानी चेहेरा तीतक्याच गोडश्या खळ्यांसगट हसून मला " Hello! Welcome to our lab ! म्हणताना दिसला. मला पण खूप हायसं वाटलं.
"मी चिकाको, आणि तु?"
मी आपलं नाव सांगीतलं. लागलीच त्याचा अर्थ वगैरे विचारून झाला. मला मात्र ही जपानी गुडीया आणी तिचा हातातलं काम सोडून मला मदत करायला येण्याचा चांगुलपणा हे सगळं क्षणार्धात भावलं!
"चल मी तुला तुझा बेंच दाखवते"
मी निमूटपणे तीच्या मागे गेले.
"काही लागलं तर सांग मला. इथे लोक जरा दुष्ट आहेत. अमुक वस्तु कुठे आहे विचारलं तर 'आहे लॅबमधेच, शोध जरा डोळे उघडे ठेवून' असं म्हणतात"! (हा अनुभव मीही पुढे घेतला!)
पहीला दिवस तर ओळखीत आणि काम समजून घेण्यात गेला. चिकाको अधुनमधून डोकवून गेली.
महिन्याभरात तिची आणि माझी चांगलीच गट्टी जमली. कायम हलकसं स्मित करायचं, हळूच बोलायचं आणि जमेल तितकी मदत करायची हे चिकाकोचं धोरण! भारताबद्दल जरासं कुतुहल आणि आपले पदार्थ शिकण्याची हौस! स्वयंपाक तर A1 करायची. मी मास खात नाही म्हंटल्यावर माझ्यासाठी वेज लसानिया करायची, केलेलं non-veg घरी नवर्‍यासाठी, मुलासाठी द्यायची.
हळुहळू घरच्या गप्पा व्हायला लागल्या. तिचा नवरा त्याच युनिवर्सीटीत रीसर्च करायचा हे कळलं. एक दोनदा भेटही झाली.
चिकाकोचं काम मध्यरात्रीपर्यंत चालायचं. बहुतेक मुलबाळ व्हायच्या आधी post-doc उरकायचा विचार असावा.
कधी काही ठराविक पदार्थ खायची तिची इच्छा झाली की मी चिडवायची आणि ती मानेला नाजुक झटका देत नकार द्यायची.
तिला कधी वीकएंडला नवर्‍याबरोबर फिरताना बघीतलं नाही, पण तिच्या कामांमधे तीला वेळ मिळंत नसावा असं वाटायचं.
असेच ६-८ महीने गेले. आणि आजकाल चिकाकोचं मंद हसु ओठात हरवलंय असं का कोण जाणे मला वाटायला लागलं. एकदाच विचारून पाहिलं.
"छे गं कुठे काय"? हे उत्तर मिळालं.
लॅब मीटिंगमधे आज चिकाकोला पहिल्यांदा सौम्य शब्दात बॉस कडून समज मिळाली. तिचं चित्त थार्‍यावर नव्हतं हे तर दिसंत होतं. मला खूप वाईट वाटलं, पण विचारावं तरी काय आणि कसं?
"चल चहा प्यायला जाऊ". मी तिला बाहेर काढंत म्हणाले. सगळ्या कॉफीभावीकांमधे 'चहा' हा आणखी एक दुवा आम्हा दोघीतला!
"हो, चल, येते मी". नाकाचा लाल झालेला शेंडा पुसंत ती म्हणाली.
त्या दिवशी कफेटेरियातली कोपर्‍यातली जागा घेऊन बसलो.
"काय होतंय चिकाको? बरं नाही का वाटंत?" मी विचारलं. एव्हाना तिच्या डोळ्यांना धारा लागल्या होत्या.
"मी वेगळी होतेय नवर्‍यापासून" तिनं सांगीतलं. मला त्यांच्यातल्या भावनिक संबंधातली फारशी माहीती नव्हती, तरी असं काही ऐकलं की मलाच जास्त नर्व्हस व्हायला होतं!
काय बोलावं ते समजेना. पण तिनीच माझी समस्या सोडवली,
"हा निर्णय घ्यायचं गेल्या वर्षभरापासून चाललंय. आता मात्र नक्की झालंय. मी नाही राहू शकंत असल्या माणसाबरोबर. अत्यंत अहंकारी अन हेकेखोर! जपान सोडलंय पण जपानी वृत्ती नाही. अगं मारलं तर त्याच्या खुणा दिसतात. पण माझे घाव तर न दिसणारे आहेत. मी पण शिकलेय त्याच्याच इतकी पण त्याच्या दृष्टीनं माझी अक्कल बटाट्याच्या गोणीइतकी पण नाहीये".
"मग काय करायचं ठरवलं आहेस? डायवोर्स इथे मिळणार की जपानला? तुला काय मदत करु"?
"मी तशी खंबीर आहे गं" ती म्हणाली. "मला मोकळं वाटतंय हा निर्णय घेऊन. माझं सामान मी हलवतेय नव्या जागी महिन्याअखेरी. पण वाईट वाटतय एकाच गोष्टीचं! काही कारण नसताना मला जपानला जाऊन त्याच्या आई-वडलांची माफी मागावी लागेल, त्यांच्या मुलाला सोडल्याबद्दल!"
"ते काय म्हणून"? मला धक्काच बसला.
"विचित्रपणाच आहे गं. पण काय करु, ही अशीच पद्धत आहे बघ. मी नाही केलं हे तर माझ्या आई-वडलांना भोगावं लागेल. माझ्या लहान बहीणींची लग्न व्हायची आहेत अजून!".
"पण यात तुझा काय दोष? त्यांच्या मुलानीच तर छळलंय ना तुला? मग माफी तु का मागायचीस?"
"ते कसं समजावु तुला? पण माझं रडू यासाठीच आहे. खूप कठीण वाटतय मला हे माफी प्रकरण, खूप अपमानकारक!"
मला एव्हाना बोलायला शब्द सुचत नव्हते. खरंच कठीण होतं सगळं!
"मी पर्वा जपानला जातेय. खूप लाजीरवाणं होतय पण पार पाडणं भाग आहे.माझं इथलं काम सफर होतय या सगळ्यामुळे"
ते तर दिसंतच होतं. पण कुणावरही अशी वेळ यावी, त्यातून तर ही इतकी शिकलेली, पी.एच. डी मुलगी याचं खूप वैषम्य वाटंत होतं! हे असं किती दिवस चालणार? जपान असो की भारत, असं लाजीरवाणं करणार्‍या प्रसंगांचं माप बाईच्याच ओटीत?
एरवी स्वत:चे रीसल्ट्स कसे बरोबर हे पटवून देणारी आणि प्रसंगी त्यासाठी प्रोफेसरशी भांडणारी चिकाको इतकी हवालदिल? मला रात्री झोप लागेना!
*****
२ आठवड्यांनी चिकाको परत आली. चेहेर्‍यावर ते गोडसं हसु. मला खूप बरं वाटलं. मी काही विचारणार येव्हड्यात मला म्हणाली,
" चल चहा प्यायला"
आज तिनं पेस्ट्रीज विकत घेतल्या. मी पैसे पुढे केले तसं म्हणाली,
" my treat !"
"कसा झाला जपान दौरा"?
"मस्तच! सगळ्या घरच्यांच्या भेटी झाल्या."
"आणि त्याच्या घरी गेल्यावर?"
"मी नाही माफी मागीतली!!!!!!!"
मला कोण आनंद!
"गेले होते त्यांच्याकडे माझं काही सामान घ्यायला. पण वाटलं, का म्हणून हे सगळे प्रकार करायचे. मला यात माफी मागण्यासारखं काही वाटंत नाही. या वयात त्यांना नातवंडांऐवजी हे बघणं नशीबात आलं त्याबद्दल वाईट वाटल्याचं मी बोलले. पण त्यांच्या मुलाबद्दल मी त्यांना आधी कधीतरी बोलले आणि त्यांनी त्याचा दोषही माझ्याच माथी मारला, तेव्हा माफी कसली?"
"आणि तुझ्या घरचे काय म्हणाले?"
"बाबा थोडेसे खट्टु झाले, पण काय सांगु, आईनी माझी पाठ थोपटली. बहीणी म्हणाल्या, आमच्या लग्नाची नको काळजी करूस, ही सुरुवात तर कुठे तरी व्हायलाच हवी"!
यावेळी आमच्या दोघींच्या डोळ्यांना धारा लागल्या. त्या कुठल्या समाधानाच्या हे काय सांगायचं?
(समाप्त)







Manuswini
Friday, August 11, 2006 - 12:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जपान्मधे अशी संस्कृती आहे का?

एवढा प्रगत देश आणी ही प्रथा? की मुलिने(च) माफ़ी मागावी?


Raina
Friday, August 11, 2006 - 1:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृणमयी- छान लिहिलं आहेस.
जपान खरेच काही बाबतीत मागच्या शतकात वावरतय (भारतासारखंच). म्हणुन तर increasingly जास्त जपानी बाया अविवाहीत राहणं पसंत करतात. आणि गायजीन (गोरा फिरंगी )नवरा मिळवण्यासाठी इंग्रजी शिकायचे वर्ग लावतात.


Dineshvs
Friday, August 11, 2006 - 1:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझाहि अनुभव असाच, भारताच्या पुर्वेकडे अश्याच प्रथा आहेत. अश्या प्रथा बघितल्या कि आपण कितीतरी बरे असे वाटायला लागते.

Moodi
Friday, August 11, 2006 - 1:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृण्मयी खूपच वेगळा अनूभव गं. वरुन गोजीरवाणी अन नाटकी दिसणारी ही भिन्न संस्कृती पण वागणे ही किती भयप्रद. सुटली ती मुलगी हेच चांगले अन घरच्यांचा पाठिंबा हे विशेष.

Chinnu
Friday, August 11, 2006 - 4:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृण, माझ्याही डोळ्यात समाधानाच्या धारा लगल्या ग!

Savani
Friday, August 11, 2006 - 4:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृ, छान लिहिलं आहेस. एव्हढ्या प्रगत देशात अजूनही अश्या प्रथा आहेत? विश्वास बसत नाही नं.

Mrinmayee
Friday, August 11, 2006 - 4:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुमच्या प्रतिक्रियांबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!
चिकाको हे तीचं मूळ नाव नाही पण प्रसंग खरा आहे. तो तीच्याच बाबतीत की आणखी हजारो जपानी मुलींच्या आयुष्यात हेच घडतं ते मला ठाउक नाही. पण रैना जपानमधे आहे आणि तिनं या देशातल्या लोकांचं आयुष्य जवळून बघीतलं असणार! तेव्हा तिनं लिहिलेलं खरं असेल ना!
ह्यात खूप मोठ्ठ काही घडतंय असं कुणाला कदाचित वाटणारही नाही. पण 'चिकाको'ची तगमग मला अस्वस्थ करंत होती हे नक्की!
नवर्‍याशी, सासरच्यांशी संबंध बिघडलेले, त्यात एकटीनं, न आवडणार्‍या सासरी जाऊन, नावडत्या सासुसासर्‍यांना "मला माफ करा" हे खालच्या मानेनं म्हणायचं हे किती कठीण असु शकतं याचा विचार करूनच मला कससं होत होतं, तीला तर प्रत्यक्ष कृती करायची होती.
नाण्याची दुसरी बाजु मला माहिती नाही. काही हीचंही चुकलं असेल कदाचित. पण हीचा नवरा कुठे जात होता कुणाची हात जोडून माफी मागायला?


Maitreyee
Friday, August 11, 2006 - 5:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जगात सुखी माणसाच्या लक्षणांमधे जसे स्विस बॅंकेत अकाउंट तसे जपानी बायको हाही एक 'ऍसेट' आहे असे ऐकले होते! त्याचे कारण जपानी मुलींची ही नको इतकी मवाळ वृत्ती असे आहे की काय!
असो, छान लिहिलयास म्रु


Bee
Friday, August 11, 2006 - 10:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मैत्रेयी ह्यात मवाळ काय... ती तर चांगली सभ्य वाटली मृच्या सांगण्यावरून.

मृ, तुझे आणि चिकाकोचे इतकी छान भावबंध जुळलेत. असे वेगळ्या देशातील मित्र मैत्रीणी मिळाल्यात तर इथेही मन रुळेल आपले..


Raina
Friday, August 11, 2006 - 11:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृणमयी- अगं ह्या देशात बायकांसाठीची support system च नाहीये गं. मुलं झाली, की त्या बायकांना अक्षरश: सगळं सोडुन घरी बसावं लागतं- म्हणजे- day care वगैरे इतकी महाग असतात की ती परवडत नाही. कोणी आपणहून आवड म्हणून घरी बसलं तर चांगले- पण पर्याय नाही म्हणून सरसकट आपले करियर सोडुन घरी बसणे- हे त्या बायकांना सुद्धा आवडत नाही फारसे.
दुसरं म्हणजे- खूप नवरे हे घरापासून दूर नोकरी करतात- म्हणजे दुस-या गावात, दुस-या देशात वगैरे- आणि बायकांनी घर सांभाळायच. नवरे फक्त weekends ना घरी येणार. बरं हे short term नाही तर वर्षानुवर्षं. माझी एक कलिग होती- ती २ मुलांची आई- सोळा वर्षानंतर परत नोकरी करायला लागली होती. नवरा असाच सटीसामाशी घरी येणार..तो दुस-या शहरात नोकरी करतो आणि गेले १० वर्ष ते असेच राहतात. तिला एकदा विचारलं की बाई तुला ह्या एकट्यानी खटारा ओढण्याचा त्रास होत नाही का? तर म्हणाली- अग- १६ वर्षांच्या संसारानंतर दूर आहोत तेच बरे आहे एका परिने नाही का/ आताशा तर उलट भिती वाटते- परत एकत्र रहायची वेळ आली तर कदाचीत संसार मोडेल.
आणि नोकरी साठी सुद्धा बायकांच्या बाबतीत खूप Discrimination आहे.
पण तसा विचार केला तर- जपान Discriminatory तर खरेच- पण ईथे सर्रास हुंडाबळी तर होत नाहीत. सुनेला संसार मोडल्याबद्दल माफी मागावी लागते हा अन्याय आहेच- पण नव्या सुनेचा छळ करुन तिला प्रसंगी पेटवून देत नाहीत. ईथल्या गोष्टी खूप खटकायला लागल्या नं की हा एक मी माझ्यापुरता नियम घालून घेतलाय- आपल्य ही देशातल्या चालीरीतींकडे पुन्हा एक्दा डोळसपणे पहायचं. तू म्हणतेस ते अगदी खरं आहे-जपान असो की भारत, असं लाजीरवाणं करणार्‍या प्रसंगांचं माप बाईच्याच ओटीत?


Rupali_rahul
Saturday, August 12, 2006 - 2:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृणमयी, खुप वाईट वाटल ग वाचुन की खरच इतका प्रगत देश असुनही अजुनही त्याच जुन्या चालीरिती, रुढी परंपरा वैगरेंच्या जाळ्यात अडकला आहे. लेख अतिशय छानच तुझ्यामैत्रिणीला आमच्या शुबेच्छा कळव बरं अणि शाबासकीही ही दे कारण कुठुनतरी तिने सुरुवात केली आहे. एकद ठिणगी पडली की वेळ लागणार नाही.

Maitreyee
Saturday, August 12, 2006 - 7:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, मवाळ या शब्दाचा अर्थ काय आहे असे वाटतेय तुला:-O
तुझ्या त्या वाक्यात गडबड वाटतेय मला :-)


Bee
Sunday, August 13, 2006 - 4:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मवाळ म्हणजे आपले हिंदीमध्ये मवालीच ना.. CBDG :-)

Maitreyee
Sunday, August 13, 2006 - 8:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाटलंच मला
बी अवघड आहे रे बाबा! 'मवाळ' आणि 'मवाली' चा काहीही संबंध नाहिये!

Mrinmayee
Sunday, August 13, 2006 - 9:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रैना, खूप छान लिहीलं आहेस पोस्ट!
बी, 'मवाळ' व्यक्ती म्हणजे 'अती सौम्य स्वभाव असणारी' !


Supermom
Sunday, August 13, 2006 - 10:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश,
आपण कितीतरी बरे असं मुळीच नाही हो.
रागावू नका पण याहूनही अनेक वाईट गोष्टी आपल्या भारतात डोळ्यांनी बघितल्यात.
बाकी रैना, लिखाण खूपच आवडलं. अजूनही कित्येक ठिकाणी मुलींनी केवळ आपला 'स्व' जपणं हादेखील भयंकर गुन्हाच मानल्या जातो तर.


Bee
Sunday, August 13, 2006 - 9:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मागे एकदा रॉबीनहूडनी कुठला तरी शब्द झक्कींसाठी वापरला होता, नक्की आठवत नाही. आता इथे रॉबीन झक्कींशी कसे बोलतात हे सर्वांनाच माहिती आहे. तर त्यावेळी आर्चनी रॉबीनला म्हंटले होते की असे शब्द फ़ार मवाळ वाटतात. त्यावेळी ते शब्द मलाही थोडे असभ्य, कुणाला टाकून बोलल्यासारखे वाटले. म्हणून माझी खात्री झाली की मवाळ म्हणजे अगदी पाजीपणा, असभ्यपणा, उर्मटपणा.. इ.इ. बहुदा आर्चनी उपरोधानी तसे म्हंटले असेल.

मागे एक दोन वर्षांपूर्वी, इथल्या एक काकू मला म्हणाल्यात तू खूप भिडस्त आहे त्यावेळी मला त्या माझ्या विरुद्ध बोलत आहेत असेच वाटले होते. तसेच पापभिरू शब्द ऐकून वाटले होते.. नंतर ह्या दोन्ही शब्दाचे अर्थ कळले त्यावेळी मी लक्षात घेतलेले अर्थ चक्क विरुद्ध होते. आत्ताही तसेच झाले.

मृ धन्यवाद!!!! मैत्रेयी तुलाही.. तू खूप मवाळ आहेस..
;-)

मित्रा रॉबीन तुझ्या नावाचा उल्लेख वाचून रागविणार नाहीस असे गृहीत धरतो..

Meggi
Monday, August 14, 2006 - 8:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृण्मयी, सुंदर लिहिलं आहेस. चिकाकोच्या निर्णयाचा आनंद झाला..

बी, मला वाटलं तू गम्मत करत होतात.. की तुला ' मवाळ ' शब्दाचा अर्थ माहित नाहिये.. :-)


Robeenhood
Monday, August 14, 2006 - 2:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तो काय शब्द वापरला होता हे मीही आठवतोय... मी तर ते विसरूनही गेलो आहे.. कुणावरही रागवायचे नाही हे मी फादर झक्कींकडूनच शिकलो आहे.. खरे तर राग धरणार्‍याना हितगुजवर येण्याचा नैतिक हक्कच नाहिये...




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators