Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
पारीभाषिक शब्द प्रयोग

Hitguj » Language and Literature » भाषा » पारीभाषिक शब्द प्रयोग « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through April 20, 200820 04-20-08  3:56 pm

Bee
Sunday, April 20, 2008 - 4:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शोनू, मी आत्ताच युट्युबवर नोबेल पारितोषिक बद्दल काही क्लिप्स पाहिल्यात. पण त्या ईंग्रजी मधे नव्हत्या. खरी नोबेल पारितोषिकाची लिंक आता पाहीन. बरे केलेस सुचवले ते. असल्या बक्षिसांचे थेट प्रक्षेपण ही चॅनलवाले का करत नाही. किती छान माहिती मिळेल मग.

Ladtushar
Monday, April 21, 2008 - 3:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खणगाडा सही आहे 'बलिवर्द संयंत्र' तर काही समजतच नाही काय असेल हे प्रकरण ते. पण रोड रोलर ला काय म्हणत असतील मग ?

Slarti
Monday, April 21, 2008 - 4:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बलिवर्द संयंत्र म्हणजे मेहतावाल्यांचा शब्द वाटतोय.

Ladtushar
Monday, April 21, 2008 - 4:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आल्फ्रेड नोबेल (ऑक्टोबर १३, १८३३:स्टॉकहोम-डिसेंबर १०, १८८६) हा स्विडीश शास्त्रज्ञ होता.

नोबेलचे वडील औषधांचे उद्योजक होते व आल्फ्रेडने स्वतः शालेय शिक्षण खाजगी शिक्षकांकडून घेतले. यांत्रिकी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले असले तरी आल्फ्रेडला रासायनिक संशोधनात रस होता. भरीस वडील बंधूचा स्फोटकांच्या अपघातात मृत्यू ओढवल्यावर आल्फ्रेडने स्वतःला सुरक्षित स्फोटके शोधण्यासाठीच्या संशोधनाला वाहून घेतले व पुढे डायनामाइटचा शोध लावला.

डायनामाइटमुळे नागरी तसेच लश्करी बांधकामे करणे सुलभ झाले व नोबेलने गडगंज संपत्ती मिळवली. आपल्या शोधाचा उपयोग युद्धातच जास्त होत असल्याचे व त्यामुळे आपण स्वतः इतरांच्या मृत्यूला कारणीभूत असल्याचे शल्य नोबेलच्या मनाला सलत होते. त्याकारणाने आल्फ्रेड नोबेलने दहा लाख स्विडीश क्रोनरचे ट्रस्ट स्थापन केले व जगातील उत्तमोत्तम संशोधकांना व शांतिदूतांना त्यातून पारितोषिक देण्याचे सुरू केले. हे पारितोषिक म्हणजेच नोबेल पारितोषिक होय.

सोजन्य दुवा

Farend
Monday, April 21, 2008 - 3:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बैल झोपवणारा असेही म्हणता येईल :-)
पण बुलडोझर खणत नाही ना? फक्त जमिनीवरच्या गोष्टी (बांधकामे वगैरे) तोडून ढकलण्यासाठी त्याचा उपयोग पाहिला आहे. पण खणण्यासाठी करत असतील तर माहीत नाही.


Bee
Wednesday, April 30, 2008 - 3:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Preservatives ला खास मराठी शब्द आहे पण मी तो विसरलो. एकदा एका पाकिटावर वाचला होता. लगेच नाही लिहून काढला तर असा स्मृतीभंश होतो.

Ladtushar
Thursday, May 29, 2008 - 4:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सावरकरांनी दिलेले ४५ मराठी शब्द
२८ मे २००८
- अमेय गोगटे (म.टा.)

महापौर, अर्थसंकल्प, दूरदर्शन या शब्दांची निर्मिती सावरकरांनी केली आहे, हे कदाचित तुम्हाला माहिती असेल. पण याव्यतिरिक्त अनेक शब्द सावरकरांनी मराठी भाषेला दिले. त्यांची ही भाषाशुद्धी चळवळ खूपच गाजली. त्यांच्या या शब्दसंपदेबद्दल...
...............................

पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपुल्या घरीच हाल सोसते मराठी ।
हे असे असंख्य खेळ पाहते मराठी
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी ।।

असं सुरेश भटांनी सांगितलं असलं तरी आज मराठी माणसाला, मराठी माणसाशी, मराठी भाषेत बोलायला लाज वाटते, ही दुर्दैवी वस्तुस्थिती आपण महाराष्ट्रात अनुभवत आहोत. ‘ यू नो ’ , ‘ यू सी ’ हे शब्द मराठी वाक्यात आले नाहीत, असं होत नसतं. अशा परिस्थितीत, काही राजकारणी मंडळी मराठी माणसामधलं मराठीप्रेम जागवण्याचा प्रयत्न करतायत, पण त्याहीपेक्षा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांनी मांडलेल्या भाषाशुद्धीच्या विचाराचा आज विचार व्हायला हवाय...

संवादाचं माध्यम आणि अभिव्यक्त होण्यासाठीचं साधन, म्हणजेच भाषा का ? तर, नाही. भाषा ही संस्कृतीचं द्योतक असते, संस्कृतीची वाहक असते. संस्कारातून संस्कृती घडत असते आणि म्हणूनच भाषेतून संस्कारही प्रतीत होत असतात. पण अनेक शतकं मराठी भाषेवर आक्रमणं होत होती. त्या काळात अनेक परकीय शब्द मराठी भाषेत समाविष्ट झाले. हवा, जमीन, वकील, गरीब, सराफ, मसाला, हलवा, गुलकंद, बर्फी, अत्तर, तवा, हे शब्द मराठी नाहीत, ते अरबी आणि फारशी भाषेतून आलेत हे आज सांगितल्याशिवाय अनेकांना कळणारही नाही. या संकरामुळे मराठी भाषा समृद्ध झाली, असं अनेकांना वाटतं. आजही इंग्रजी शब्द मराठीत आल्यानं मराठी संपन्न झाली, असंच भाषातज्ज्ञही म्हणतात.

पण, सावरकरांना हे मत मान्य नव्हतं. १९२४ मध्ये केसरीतून त्यांनी मराठी भाषेचे शुद्धिकरण ही लेखमाला लिहिली, त्यात त्यांनी आपली भूमिका ठामपणे मांडली होती. याच विषयावरून दत्तो वामन पोतदार आणि त्यांच्यात झालेला वादही प्रसिद्ध आहे. ‘ परकीय भाषेतील शब्द आत्मसात करून ते पचवून टाकले, ही आमची विजय-चिन्हंच नाहीत का ?’ , असा प्रश्न दत्तोपंतांनी सावरकरांना विचारला. त्यावर त्यांचं उत्तर होतं, ‘ ती काही आमची विजय-चिन्हं नाहीत ; ते तर आमच्या भाषेच्या अंगावरचे व्रण आहेत .’ सावरकरांचं हे म्हणणं एका अर्थानं योग्यही आहे. आपल्या भाषेत शब्द उपलब्ध असतानाही दुस-या भाषेचा आधार का घ्यावा ?

‘ आपण बहुधा हयगय करून कधी कधी निरुपाय म्हणून आणि इतर वेळी ऐट म्हणून आपल्या बोलण्यात-लिहिण्यात परकीय शब्द वापरतो. ते जितके अधिक वापरले जातात , तितके त्या अर्थाचे आपले शब्द मागे पडतात . पुढे पुढे तर त्या शब्दांवाचून तो अर्थ व्यक्‍तच होत नाही , असे वाटू लागते. ते परशब्द आपलेच झाले , असे खुळे ममत्व वाटू लागते आणि पर-शब्द आपल्या भाषेच्या हाडीमाशी रुतून बसतात ' , असं विश्लेषण सावरकरांनी केलंय.

‘ स्वकीय शब्द नामशेष करून परकीय शब्द बोकाळू देणं , हे औरस मुलांना मारून दुसरी मुले दत्तक घेण्यासारखे आहे. तो जसा वंशवृद्धीचा मार्ग नव्हे , तसाच हा काही शब्दसंपत्ती वाढवायचा मार्ग नाही. आपली संस्कृत भाषा किती संपन्न आहे! तिला अव्हेरून इंग्रजी , फारशी इत्यादी परक्या भाषांमधून शब्द घेणे , म्हणजे घरात असलेली सोन्याची वाटी फेकून देऊन चिनी मातीचे कप हाती घेण्यासारखे नाही का ?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आणि अनेक पर-शब्दांना मराठमोळे प्रतिशब्द सुचवले. हे शब्द किचकट होते, संस्कृतप्रचूर होते आणि समजायला परभाषी शब्दांपेक्षाही कठीण होते अशी टीका काहीजण करतात. पण दिनांक, नगरपालिका, महापालिका, महापौर, हुतात्मा, दूरदर्शन, दूरध्वनी, प्राध्यापक, नेतृत्त्व हे सावकरांनीच शोधलेले, सुचवलेले शब्द आहेत. आज ते सर्रास वापरले जातात. मराठी भाषेचं सौंदर्यही त्यातून जाणवतं.

दिनांक (तारीख)
क्रमांक (नंबर)
बोलपट (टॉकी)
नेपथ्य
वेशभूषा (कॉश्च्युम)
दिग्दर्शक (डायरेक्टर)
चित्रपट (सिनेमा)
मध्यंतर (इन्टर्व्हल)
उपस्थित (हजर)
प्रतिवृत्त (रिपोर्ट)
नगरपालिका (म्युन्सिपाल्टी)
महापालिका (कॉर्पोरेशन)
महापौर (मेयर)
पर्यवेक्षक ( सुपरवायझर)
विश्वस्त (ट्रस्टी)
त्वर्य/त्वरित (अर्जंट)
गणसंख्या (कोरम)
स्तंभ ( कॉलम)
मूल्य (किंमत)
शुल्क (फी)
हुतात्मा (शहीद)
निर्बंध (कायदा)
शिरगणती ( खानेसुमारी)
विशेषांक (खास अंक)
सार्वमत (प्लेबिसाइट)
झरणी (फाऊन्टनपेन)
नभोवाणी (रेडिओ)
दूरदर्शन (टेलिव्हिजन)
दूरध्वनी (टेलिफोन)
ध्वनिक्षेपक (लाउड स्पीकर)
विधिमंडळ ( असेम्ब्ली)
अर्थसंकल्प (बजेट)
क्रीडांगण (ग्राउंड)
प्राचार्य (प्रिन्सिपॉल)
मुख्याध्यापक (प्रिन्सिपॉल)
प्राध्यापक (प्रोफेसर)
परीक्षक (एक्झामिनर)
शस्त्रसंधी (सिसफायर)
टपाल (पोस्ट)
तारण (मॉर्गेज)
संचलन (परेड)
गतिमान
नेतृत्व (लिडरशीप)
सेवानिवृत्त (रिटायर)
वेतन (पगार)

असे शेकडो शब्द स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मराठी भाषेला दिले आहेत. असं असलं तरी, परभाषेबद्दल त्यांच्या मनात द्वेष नव्हता. फक्त कुठलीही भाषा शुद्ध असावी, इतकंच त्यांचं म्हणणं होतं आणि म्हणूनच त्यांनी भाषाशुद्धीचा आग्रह धरला. मराठी भाषेतलं त्यांचं हे योगदान निश्चितच अतुलनीय आहे. त्यांना अभिप्रेत असलेल्या भाषाशुद्धीची आजही खरंच गरज आहे.



Dineshvs
Thursday, May 29, 2008 - 5:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

किती सहज रूळलेत हे शब्द, नविन आहेत असे अजिबात वाटत नाहीत.

Bee
Thursday, May 29, 2008 - 6:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुषार, खूप खूप धन्यवाद. मस्त माहिती लिहिली आहेस. असेच लिहित रहा मित्रा..

Zakki
Thursday, May 29, 2008 - 12:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असे बरेचदा ऐकण्यात येते की वरील शब्द माहित असूनही वापरल्या जात नाहीत. नुकत्याच बघितलेल्या एका मराठी चित्रपटात एका बाजूची वकील न्यायाधिशांना म्हणते' ... परवानगी द्यावी.' एक मिनिटाने लगेच प्रतिपक्षाचा वकील न्यायाधिशाला म्हणतो ' ... permission द्यावी'. काही गरज आहे का उगीचच इंग्रजी शब्द घुसडण्याची? पण नाही. इंग्रजीत बोलायचे!

माझ्या मते, निदान आमच्या काळात तरी असा दृढ समज होता की इंग्रजीत बोलणे म्हणजे सुशिक्षितपणाचे लक्षण आहे, त्याने दुसर्‍यावर चांगली छाप पडते. आताच्या जागतिकीकरणानंतरहि तो समज कमी झालेला दिसत नाहीये. परदेशात जाऊन आल्यावर तरी लक्षात यायला पाहिजे होते की इंग्रजीत बोलणारे लोक किती मूर्ख असू शकतात. मला तर आजकाल वाटते की निदान मायबोलीवर, इतर मराठी मित्रांशी मी मराठी बोललो नाही तर ते मलाच बावळट अमेरिकन म्हणतील.


Tanyabedekar
Thursday, May 29, 2008 - 3:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सावरकरांनी इतके सारे शब्द मराठीमध्ये आणले ह्याची कल्पना देखील नव्हती. नगरपालिका, महापालिका, नेपथ्य, प्राचार्य इत्यादी शब्द शंभर वर्षांपूर्वी अस्तित्त्वात नव्हते असे वाटत देखील नाही. धन्यवाद तुषार ही माहिती पुरवल्याबद्दल

Moderator_10
Friday, May 30, 2008 - 5:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे सदर खालील जागी हलवण्यात आलेले आहे.

/node/2177




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators