Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
मराठी भाषा दिवस

Hitguj » Language and Literature » भाषा » मराठी भाषा दिवस « Previous Next »

Ladtushar
Wednesday, February 27, 2008 - 4:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मराठी भाषा दिवस माघ कृष्ण ६, बुधवार(२७ फेब्रुवारी)

प्रथम सर्व मायबोली करांना मराठी भाषा दीनाच्या हार्दिक सुभेछा...

ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार व कविश्रेष्ठ वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त आज 'मराठी भाषा दिन' साजरा होत आहे त्या निमिताने आपण ही चला करुया साजरा मराठी भाषा दिवस.

प्रतिज्ञा मराठीची:

मराठी ही माझी मातृभाषा आहे.

मराठी भाषेवर माझे नितांत प्रेम आहे.

माझ्या मायमराठीला मी सदैव मान देईन.

इतर सर्व भाषांचा, नेहमी आदर करीन.

त्या भाषा मायमराठीच्या, बहिणी आहेत.

जागतिक व राष्ट्रभाषा याबरोबरच मी मराठीचा देखील नेहमी वापर करीन.

मराठी भाषेचे जतन व संवर्धन करण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे.

मराठी भाषेचे आद्य सारस्वत माऊली ज्ञानेश्वरांपासून सर्वच मला वंदनीय आहेत.

महाराष्ट्राचे महत्व मराठी भाषेच्या विकासातच आहे, याची मला जाणीव आहे.

मराठी भाषेची जडणघडण प्रादेशिक बोलींमधील विविधता व त्यातून निर्माण होणारी भारताची एकता आणि अखंडता जपण्यासाठी मी सदैव प्रयत्न करीन.

मराठी भाषेच्या विकासार्थ जास्तीत जास्त निदोर्ष बोलेन, लिखाण दर्जेदार होण्यासाठी प्रयत्नशील राहीन.

महाराष्ट्र माझा आणि मराठी माझी यांची सदैव आठवण ठेवीन.

मराठीच्या विकासातच माझा विकास आहे. म्हणूनच मी मराठीच्या विकासार्थ झटेन.

मी मराठी बोलतो, लिहितो आणि वाचतो, याचा मला अभिमान व स्वाभिमान आहे.

जय मराठी जय महाराष्ट्र जय हिंद!

(प्रतिज्ञा सोजन्य म टा : http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2817789.cms)


Trish
Wednesday, February 27, 2008 - 6:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मराठी... लहानग्यांत खेळणारी... दिशांदिशांत दाटणारी... नभांतून वर्षणारी... नद्यांमधून वाहणारी आणि मदांध तख्त फोडणारी भाषा. या मायमराठीचे असंख्य विभ्रम बोलते झाले आहेत कविवर्य सुरेश भट यांच्या या रचनेतून...

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्या एक तो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी

आमुच्या मनामानात दंगते मराठी
आमुच्या रगारगात रंगते मराठी
आमुच्या उराउरात स्पंदते मराठी
आमुच्या नसानसात नाचते मराठी

आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमुच्या लहानग्यात रांगते मराठी
आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी
आमुच्या घराघरात वाढते मराठी

आमुच्या कुला कुलात नांदते मराठी
येथल्या फुलाफुलात हासते मराठी
येथल्या दिशादिशात दाटते मराठी
येथल्या नगानगात गर्जते मराठी

येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरुलतात साजते मराठी
येथल्या कळीकळीत लाजते मराठी

येथल्या नभामधून वर्षते मराठी
येथल्या पिकांमधून डोलते मराठी
येथल्या नद्यांमधून वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी

पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपुल्या घरात हाल सोसते मराठी
हे असे कितीक 'खेळ' पाहते मराठी
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी

~सुरेश भट
(कवी)



Bee
Wednesday, February 27, 2008 - 7:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला ह्या दोन्ही कविता र ला ट जोडल्यासारख्या वाटत आहेत. जरी दोन्ही कवी माझे लाडके आहेत तरी खरच काय तथ्य आहे ह्या कवितांमधे?

Ladtushar
Wednesday, February 27, 2008 - 9:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

या कवितांबद्दल काय म्हणाल बी ??? अप्रतिम ?? शब्द अपुरे पडतात!!

खरा स्वधर्म हा आपुला
जरी का कठीणु जाहला
तरी हाची अनुष्ठीला, भला देखे

स्वराज्य तोरण चढे
गर्जती तोफांचे चौघडे
मराठी पाउल पडते पुढे !

माय भवानी प्रसन्न झाली
सोनपावली घरास आली
आजच दसरा, आज दिवाळी
चला, सयांनो, अंगणि घालू
कुंकुमकेशर सडे
मराठी पाउल पडते पुढे !

बच्चे आम्ही वीर उद्याचे
बाळमुठीला बळ वज्राचे
वारस होऊ अभिमन्यूचे
दूध आईचे तेज प्रवाही
नसांतुनी सळसळे
मराठी पाउल पडते पुढे !

स्वये शस्त्र देशार्थ हाती धरावे
पिटावे रिपूला रणी वा मरावे
तुझ्या रक्षणा तूच रे, सिद्ध होई
तदा संकटी देव धावून येई !
जय जय रघुवीर समर्थ

शुभघडीला शुभमुहूर्ती
सनई सांगे शकुनवंती
जय भवानी, जय भवानी
दश दिशांना घुमत वाणी

जयजयकारे दुमदुमवू हे
सह्याद्रीचे कडे !!

- शांता शेळके



Ladtushar
Wednesday, February 27, 2008 - 9:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय, जय जय राष्ट्र महान
महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय, माझे राष्ट्र महान
कोटी कोटी प्राणांत उसळतो एक तुझा अभिमान

बलिदाने इतिहास रंगला तुझाच पानोपान
तूच ठेविले स्वातंत्र्याचे फडकत उंच निशाण
तू संतांची, मतिमंतांची, बलवंतांची खाण
तूच ठेविला कर्मयोगमय जागृत यज्ञ महान

मातीच्या चित्रात ओतले विजयवंत तू प्राण
मराठमोळी वाणी वर्णी वेदांताचे ज्ञान
पंढरीत नांदले अखंडित भक्तीचे जयगान
ब्रीद न सुटले झुंझारांचे रणी होता निर्वाण

वज्रापुढती अभंग ठरले तुझेच ना पाषाण !
काळालाही जिंकून गेले इथले प्रज्ञावान
मानवतेचे समतेचे तू एकच आशास्थान
पराक्रमावर तुझ्या विसंबे अखंड हिंदुस्थान

गीत - चकोर आजगावकर


Ladtushar
Wednesday, February 27, 2008 - 9:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"सलाम कवि कुसुमाग्रजाना!!"


म्यानातुनि उसळे तलवारीची पात
वेडात मराठे वीर दौडले सात !

ते फिरता बाजूस डोळे किंचित ओले
सरदार सहा सरसावुनि उठले शेले
रिकिबीत टाकले पाय, झेलले भाले
उसळले धुळीचे मेघ सात, निमिषात
वेडात मराठे वीर दौडले सात !

आश्चर्यमुग्ध टाकून मागुती सेना
अपमान बुजविण्या सात अर्पुनी माना
छावणीत शिरले थेट, भेट गनिमांना
कोसळल्या उल्का जळत सात दर्यात
वेडात मराठे वीर दौडले सात !

खालून आग, वर आग, आग बाजूंनी,
समशेर उसळली सहस्त्र क्रुर इमानी,
गर्दीत लोपले सात जीव ते मानी
खग सात जळाले अभिमानी वणव्यात
वेडात मराठे वीर दौडले सात !

दगडांवर दिसतिल अजुनि तेथल्या टाचा
ओढ्यात तरंगे अजुनि रंग रक्ताचा
क्षितिजावर उठतो अजुनि मेघ मातीचा
अद्याप विराणी कुणि वाऱ्यावर गात
वेडात मराठे वीर दौडले सात !

गीत - कुसुमाग्रज


Bee
Wednesday, February 27, 2008 - 10:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुषार, ज्या वर्णनपर कविता असतात, त्यात बहुतेक कवी अतिशयोक्ती करतात. कवितेत अतिशयोक्ती करणे हे सगळ्याच कवींसाठी general आहे. ऐकदा ती अतिशयोक्ती खूप झाली की त्यातील खरा भाग देखील मग वाचावासा वाटत नाही. तू वरती ज्या कविता लिहिल्यात त्यांच्याबद्दल मी हेच म्हणेल.

इथे 'अतिशयोक्ती अलकांराचा' काहीच संबंध नाही.


Ladtushar
Wednesday, February 27, 2008 - 11:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, कदाचित तुम्ही बोलत आहत ते खरे असेल, मला कविते बद्दल तेवेढे ग्यान नव्हे, माझा हेतु फ़क्त मराठी दिवस साजरा करणे हा आहे. जसे आपण महाराष्ट्र दिनी कसे सगळी राष्ट्र भक्ति पर गीते लावतो/ऐकतो/दुसर्याना ऐकवतो तसा हा एक उपक्रम म्हणुन मी हा बीबी चालू केला! आपल्या कडे मराठी भाषा दिन साजरा करण्या साठी काही कल्पना असेल तर ती आपण इथे सुरु करुया!

Shonoo
Wednesday, February 27, 2008 - 12:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथे वर्षभर सातत्याने शेकडो लोकं मराठी लिहितात. मराठीत गप्पा, सल्ले, वाद विवाद, भांडणं, कुरापत्या ( झालंच तर कुजबुज, कुरकुर) सगळं चालतं. एक दिवस मराठीचे गोडवे गाऊन ( किंवा न गाऊन ) काय फरक पडणारे? ज्यांना हौस आहे, भाषेची ओढ आहे ते इथे येत आहेत, येत रहातील.

Bee
Wednesday, February 27, 2008 - 3:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुषार, तुला नाउमेद करण्याचा माझा मुळीच हेतू नव्हता. ज्या अर्थी मी प्रतिक्रिया लिहिल्यात त्या अर्थी तू पोष्ट केलेल्या सर्व कविता आवर्जुन वाचल्यात. माझ्याकडे बक्कळ कल्पना आहेत. पण इथे मी जर बीबी उघडलेत तर बोम्ब ठोकणारे त्याहूनही बक्कळ आहेत त्यामुळे...

Zakki
Wednesday, February 27, 2008 - 7:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तेंव्हा निदान इथे तरी मराठीतूनच लिहा. जेंव्हा काही इंग्रजी शब्द किंवा शब्दप्रयोग वापरणे टाळता येत नाही, तेंव्हा त्या शब्दांना किंवा शब्द्प्रयोगांना सार्थ, पण निव्वळ भाषांतरित नसलेले, पर्याय शोधा. सुरुवात इथून झाली तरी हळू हळू ते पसरतील.

जसे सध्या 'दिवे घ्या' म्हणतात, इथे, तसे.


Ladtushar
Thursday, February 28, 2008 - 4:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झाकी तुमची कल्पना चांगली आहे! तशी खुप मायबोलिकर ती अमलात ही आणत असतील, पण तरीही काही इंग्रजी शब्द जे आपण नेहमी वापरतो त्या ऐवजी जर का मराठी शब्द वापरयाचा प्रण जर या दिवस पासून केला तर खुप फरक पडेल, आणि या बीबी मागचा उद्देश हा एक दिवसा साठी नसून एक नविन सुरवात असा होईल !

काही उदाः
Hi : नमस्कार
Good Morning : शुभ सकाळ
thanks : आभारी आहे/ धन्यवाद
इत्यादी...इत्यादी ...



Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators