Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
तेल, तुप, वनस्पति वैगरे. ...

Hitguj » Cuisine and Recipies » उपयुक्त माहिती » तेल, तुप, वनस्पति वैगरे. « Previous Next »

Dineshvs
Sunday, October 15, 2006 - 5:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिवाळी जवळ आली कि आईची जमवाजमव सुरु व्हायची. त्यावेळी म्हणजे साधारण ३० वर्षांपुर्वी रवा, मैदा, साखर या वस्तु पुरेश्या मिळत नसत. आणि ऐन दिवाळीच्या तोंडावर त्या हमखास बाजारातुन गायब होत.
या वस्तुंबरोबर एक अत्यावश्यक जमवाजमव असायची ती डालडा ची. करंज्या, बेसनाचे लाडु यासाठी डालडा अत्यावश्यक असायचा. माझ्या लहानपणी हे प्रॉडक्ट बाजारात छानच स्थिरावले होते. दिवाळीच्या सुमारास त्याचे खास डिझाईनचे डबे बाजारात यायचे.
डालडाची जाहिरात कुठल्याहि माध्यमात कधी बघितल्याची आठवत नाही. त्यावेळीहि जाहिरातींचे प्रस्थ होतेच, अगदी मॉडर्न ब्रेडचीही जाहिरात होत असे. पण डालडाची आठवत नाही.
दोन किलो चा पिवळा डबा, त्यावर हिरव्या रंगातली हिंदी आणि ईंग्लिशमधली अक्षरे आणि एक खजुराचे झाड हे त्याचे नेहमीचे स्वरुप. साधारणपणे प्रत्येक कुटुंबात महिनाकाठी दोन किलो डालडा लागायचाच. त्याचे चार किलोचे डबे असायचे आणि १५ किलोचेदेखील. पुढे एक किलोचेहि निघाले.
हे डबे फ़ॅक्टरीत उलट्या बाजुने भरले जात. म्हणजे झाकणाच्या आत एक पातळ पत्रा असे त्यावर तो भरुन खालचा तळ मग जोडला जात असे. डबा उघडताना वरचे छोटे झाकण काढले कि आत पातळ पत्रा दिसे, व त्याकाळच्या गृहिणीना एक वेगळेच समाधान मिळे.
हा पत्रा सुरीने अलगद कापला कि आत अगदी रवेदार तुपाप्रमाणे डालडा असे. अगदी शेवटी तो डबा गॅसवर ठेवुन त्यातला उरला सुरला डालडा काढुन घेण्यात येत असे.
हा पातळ पत्रा आतुन सील केलेला असे त्यामुळे तो काढल्याशिवाय, रिकामा डबा वापरता येत नसे आणि तो पत्रा काढणेहि तसे जिकीरीचे असे. मग वरची कड पुर्णपणे कापुन काढुन त्या डब्याचा उपयोग झाडे वैगरे लावण्यासाठी होत असे. असे डबे कापुन देणारे कारागीरहि दारोदार फ़िरत असत.
डालडाला त्या काळात फारच प्रतिष्ठा होती. उपवासाच्या पदार्थानादेखील तो चालत असे. हे स्थान मिळवायला डालडाला बरीच खटपट करावी लागली होती. अगदी पहिल्यांदा एका हातगाडीवर डालडा मधे पुर्‍या तळुन त्या मोफत वाटल्या जात. ( या बद्दलची अगदी करुण आठवण सुधीर फडके यानी त्यांच्या आत्मचरित्रात सांगितली आहे. ) पण पुढे मात्र अश्या जाहिरातीची गरज उरली नाही.
त्यावेळी धवल क्रांती वैगरे झालेली नव्हती. मुंबईत मिळणार्‍या सरकारी टोन्ड दुधात स्निग्धांश अगदीच कमी असायचा. रतीब घालणारे भैय्ये अगदी मर्यादीत क्षेत्रात असल्याने, बहुतेकाना हे आरे डेअरीचे सरकारी दुधच घ्यावे लागे. तेहि अगदी मर्यादीत मिळे व सणाबिणाला जास्त हवे असल्यास खुप मिनतवार्‍या कराव्या लागत. या सगळ्यांमुळे घरात दुधदुभते कमीच असायचे. त्यातुन सायहि कमी आणि पर्यायाने लोणी व तुपहि कमी. जे काहि निघायचे ते वरणभातावर घेण्यासाठी व देवाला फ़ुलवात लावण्यासाठी वापरले जात असे. त्यामुळे तळायला वैगरे साजुक तुप उपलब्ध नसायचेच.
या परिस्थितीमुळे डालडा हाच तुपाला पर्याय मानला जाऊ लागला होता. त्याचे बाह्यरुप तसेच होते शिवाय वास साजुक तुपापेक्षा वेगळा असला तरी वाईट नव्हता. ते एकदा वितळले तरी परत थंड केले कि थिजत असे. नाकाला फरक जाणवत असला तरी जिभेला जाणवत नव्हता.
त्याकाळी तेलात कुठलेच ब्रॅंड नव्हते. घाणीवर जाऊन तेल आणावे लागे. मुंबईत खरे तर प्रत्यक्ष तेलाच्या घाणी नव्हत्या तरी तेलाच्या दुकानाला हाच शब्द वापरला जात असे. मोठमोठ्या पिंपातुन तेल असे आणि ते पंपाने काढुन आपण नेलेल्या बरणीत भरुन दिले जात असे. कळकट पिंपामुळे तेलाच्या शुद्धतेबद्दल नेहमीच शंका येत असे.
तेलाचा पहिला ब्रॅंड आला तो म्हणजे पोस्टमन. त्याच्या तथाकथित शुद्धतेमुळे अप्लावधीत तो फारच लोकप्रिय झाला.
आता हळुहळु डालडाची लोकप्रियता कमी होवु लागली. त्याला अनेक घटक कारणीभुत होते.
त्यावेळी साबण बनवण्यासाठी सर्रास मटन टॅलो वापरत असत. टेक्स्टाईल ईंडष्ट्रीमधे देखील तो वापरत असत. पण अचानक त्यावर बंदी आली, आणि साबणासाठीपण खाद्य तेले वापरणे अनिवार्य झाले. मुळातच मर्यादीत असलेल्या शेंगदाणा तेलाला पर्याय शोधणे भागच पडले. त्यावेळी डालडा हा फक्त शेंगदाणा तेलापासुनच बनवला जायचा. पण वरील घटनेमुळे जे पर्याय पुढे आले त्यात कॉटनसीड ऑईल, राईस ब्रान ऑईल अशी काहि तेले होती. हे तेले तशी थेट खाण्यासाठी वापरता येणारी नव्हती. राईस ब्रान ऑईल तर सामान्य तपमानालाहि घट्टच असते. मग रिफ़ाईन्ड हा शब्द पुढे आला. आणि प्रक्रिया केल्यावर हि तेले खाण्यायोग्य ठरल्याने डालडा साठी हि तेले वारण्यात येऊ लागली. त्याच वेळी डालडाच्या डब्यावर, " केवल वनस्पती तेलोंसे बनाया हुआ " असे शब्द आले. आणि त्या नंतरच वपस्पति हा शब्द अश्या प्रॉडक्ट्स साठी वापरण्यात येऊ लागला.
डालडा ने अनेक वर्षे मोनोपॉली अनुभवली. पण मग बाजारात ऊमदा आणि हिमा असे दोन ब्रॅंड आले. डालडा शब्दाला तसा काहि अर्थ नव्हता हे अचानक लोकांच्या लक्षात आले.
याचवेळी आणखी एक बदल झाला म्हणजे, पत्र्याचे डबे जाऊन त्याजागी प्लॅष्टिकचे डबे आले. या बरण्या त्याच रंगाच्या आणि आकर्षक आकाराच्या असल्या तरी, डालडा आता पुर्वीसारखा रवाळ दिसत नसे. तो थिजल्यासारखा दिसु लागला. मग जसजसे लोक जागृत होवु लागले, तशी डालडाची लोकप्रियता कमी होवु लागली. पुढे डालडा नावाने तेलहि बाजारात आले, त्यावेळी डालडाला, ग्राहकाना पुर्वपुण्याईची आठवण करुन देणे आवश्यक वाटले, पण काहि जमलं नाही बाप्पा. ( मी अलिकडेच वाचलं कि, आपल्याकडे रस्त्यावर खडी दाबणारे जे रोलर्स असतात, त्याच्या चाकात वंगण म्हणुन डालडा वापरतात. अजुनहि तसे होत असावे. )
पुढे धवल क्रांती झाल्याने, ज्याना हवे होते त्याना साजुक तुपहि सहज उपलब्ध झाले.

आता आपण तळण वैगरे प्रक्रियेचा शास्त्रीय दृष्टिकोनातुन विचार करु.
बहुतेक मानवी अन्नपदार्थाप्रमाणेच तेल देखील, कार्बन, हाय्ड्रोजन आणि ऑक्सीजन यापासुन बनलेले असतात. कारबनच्या अणुंच्या साखळीत हायड्रोजनच्या अणुची एकच जोडी असली कि त्याला मोनो अनसॅच्युरेटेड तेल म्हणायचे आणि दोन किंवा त्यापेक्षा जास्त हायड्रोजनच्या जोड्या असल्या तर ते पॉली अनसॅच्युरेटेड तेल. आता हाय्द्रोजनचे रेणु कमी असल्याने, बहुतेल तेले हि प्रवाहि असतात. त्यामधे हायड्रोजनचे रेणु सोडले कि ते घट्ट व्हायला लागते. तेलापासुन वनस्पति बनवायची हि प्रकिया सांगायला सोपी असली तरी करायला जरा क्लिष्ट आहे. ( यावेळी तेलात प्राणिज चरबी मिसळली तर हि प्रक्रिया सुलभ होते आणि डालडा बनवताना असे केले जाते, अशी एक अफवा उठली होती. )
पण हा हायड्रोजनचा भरणा केवळ २० टक्के एवढाच असतो, त्यापेक्षा जास्त भरणा केल्यास तेल थिजुन मेणासारखे होईल. तुम्ही मुटीयाल म्हणजे कोकमाच्या बियांचे तेल बघितले असेल, तर ते असेच असते ते लक्षात येईल.
आपले पदार्थ पाण्यातहि शिजवता येतात आणि तेलातहि, यात नेमका फरक आहे तो तपमानाचा. पाण्याचा उत्कलन बिंदु १०० अंश सेंटिग्रेड आहे हे आपल्याला माहित आहेच. त्यामुळे पाण्यात शिजवलेला पदार्थ याच तपमानात शिजतो. मीठ घातले तर तपमान थोडेसे वाढते ईतकेच.
तेलाला मात्र उत्कलन बिंदु नसतो. ( पुराणकथांमधले उकळते तेल, वैगरे मिथकच आहे. प्रत्यक्षात तेल उकळत नाही. ) तेलाला असलो तो स्मोकिंग पॉईंट म्हणजे तेल तापवले तर काहि वेळाने त्यातुन धुर येतो. क्वचित ते पेटहि घेते. ( ३१७ अंश सेंटिग्रेड तपमानाला. )
पण तळ्यासाठी तेल ईतके तापवायची गरज नसते. आपल्याला हवा तो खमंगपणा मिळवण्यासाठी १५० अंश सेंटिग्रेड तपमान पुरेसे असते. बहुतेक तेलांचा स्मोकिंग पॉईंट यापेक्षा कितीतरी जास्त असतो. उदा, शेंगदाणा तेलाचा तो साधारण २१६ अंश सेंटिग्रेड आहे.
आता हे १५० अंशच सेंटिग्रेड तपमान का, तर या तपमानाला पदार्थातील प्रथिने व साखर यांच्यावर रासायनिक प्रक्रिया झाल्यामुळे सोनेरी रंग यायला सुरवात होते. हिच प्रक्रिया पुढे चालु ठेवल्यास पदार्थ करपतो.
लोण्याचा स्मोकिन्ग पॉईंट १२१ अंश सेंटिग्रेड आहे. त्यामुळे लोण्यात तळणे होवुच शकत नाही. साजुक तुपातुन १७७ अंश सेंटिग्रेडला धुर येऊ लागतो, जरी हा अंक दिसायला १५० पेक्षा जास्त दिसत असला तरी तपमान तेवढेच ठेवणे खुपदा शक्य नसते आणि त्यामुळे तुपात तळताना पदार्थाला जळकट वास यायची शक्यता असते.

आपण तेलात तळायला जे पदार्थ सोडतो त्यात बहुदा पाण्याचा अंश असतोच. तेलाचे तपमान बरेच असल्याने या पाण्याची ताबडतोब वाफ व्हायला लागते आणि ती बुडबुड्याच्या रुपाने बाहेर पडते. ज्या छिद्रातुन वाफ बाहेर जाते त्याच छीद्रातुन तेलाचे रेणु आत शिरतात. तेलाचे तपमान १५० अंश सेंटिग्रेड असेल तर मायलार्ड प्रक्रिया झाल्यामुळे सोनेरी रंग येऊ लागतो. आणि आवरण पाण्याचा अंश कमी झाल्याने खुसखुशीत बनते. ( हा रंग व खुसखुशीतपणा वर लिहिल्याप्रमाणे घटक पदार्थातल्या साखरेवर आणि प्रथिनांवर अवलंबुन असतो. नुसत्या तांदळात हे दोन्ही कमी असल्याने, तो पदार्थ सोनेरी होत नाही पण उडदाच्या डाळीत प्रथिने अधिक असल्याने, उडदाचे वडे लगेच सोनेरी होतात. )

आता तळायला टाकलेल्या पदार्थात जर ओले सारण भरले असेल तर काय होते ते बघु. तपमान वाढल्याने त्या सारणाचीहि वाफ व्हायला सुरवात होते. त्या वाफेचा दाब पुरेसा असला तर बाहेरील तेल आतमधे यायला मज्जाव होतो, वा आवरण कडक बनल्यामुळे वाफहि बाहेर जाऊ शकत नाही. ( नुकताच तळलेला बटाटावडा कापल्यास त्यातुन वाफा निघतात, हे पाहिले असेलच. ) जर सारण कच्चे असेल, तर हि वाफ शोषली जाऊन, शिजण्याची प्रक्रिया पुर्ण होते. वाफ बाहेर येऊ न शकल्याने बुडबुडे येणे बंद होतात. हि वेळ नेमकी ओळखुन पदार्थ तेलातुन बाहेर काढणे महत्वाचे असते.

आता हेहि लक्षात आले असेल कि खमंगपणासाठी पाण्याचे प्रमाण पण मह्त्वाचे आहे. समजा बटाटावड्याचे आवरण करताना जर पिठ पातळ भिजवले तर आवरण नीट बसणार नाही. कदाचित सुटुनहि येईल आणि समजा बसले तरी प्रथिने कमी पडल्याने सोनेरी रंग येणार नाही.
जर पिठ घट्ट भिजवले तर सोनेरी रंग अवश्य येईल, पण आवरण जाड झाल्याने आतला भाग शिजणार नाही. व कच्चे राहिल्याने पदार्थ मऊ पडेल.
पाण्याचे नेमके प्रमाण म्हणजे जितके बेसन अगदी तितकेच पाणी. एक वाटी शीग लावुन बेसन घेतले तर तीच वाटी भरुन पाणी घ्यायचे. पिठ रवाळ असेल तर किंचीत जास्त घ्यायचे.
गरम तेलाचे मोहन, एवढ्या प्रमाणात एक टेबलस्पुन तेल असे असावे. गरम तेलाचे मोहन घातल्याने आणि ढवळल्याने, ते पिठांच्या कणात जाऊन बसते, आणि आधीचेच तेल असल्याने, पदार्थ जास्त खमंग होतो.
तळायच्या पदार्थाचे आकारमान हाहि एक महत्वाचा घटक. बटाट्याच्या फ़ोडी आणि वेफ़र्स यांच्या तळण्यात फरक आहे. फ़ोडी बाहेरुन सोनेरी आणि आतुन मऊ शिजलेल्या अश्याच असाव्या लागतात. त्यापेक्षा जास्त तळल्या गेल्या तर त्या काळ्या आणि कडक बनत जातात. पण वेफ़र्स तळताना पातळ आकारामुळे पाण्याचे प्रमाणच कमी असते. दोन्ही बाजुने वाफ बाहेर यायला भरपुर जागा असल्याने, वेफ़र्स लवकर सोनेरी होतात आणि कुरकुरीतसुद्धा. वाफ जात वेळ आत राहु न शकल्याने ते मऊ पडत नाहीत तसेच पाण्याचा अंश नसल्याने, ते बरेच दिवस टिकतात देखील.

आपण काहि घरात तेलाचे तपमान मोजु शकत नाही. यावेळी आपल्या आईची परंपरागत परिक्षा मह्त्वाची. एरवी भाजी वैगरे करताना, मोहरी हि आपली तापमापी ठरते. मोहरी तडतडली कि तेल व्यवस्थित तापले असे समजायचे. ईतरवेळी म्हणजे चकल्या वैगरे करताना, त्या पिठाचा एक साधारण त्याच जाडीचा एक तुकडा तापलेल्या तेलात टाकुन बघावा. बुडबुडे येणारच, पण तो तुकडा जर तळाशी जाऊन बसला तर तेल अजुन तापायचे आहे. जर क्षणभरात वर आला आणि भरपुर बुडबुडे आले तर तेल योग्य तेवढे तापले आहे असे समजायचे. आणि जर पटकन वर आला, भरपुर बुडबुडे आले, तुकडा लाल तपकिरी झाला आणि धुर येऊ लागला, तर तेल नको तेवढे तापले आहे, असे समजुन, गॅस बंद करावा. आणि तेल थोडे थंड होवु द्यावे.
कमी तापलेल्या तेलात पदार्थ टाकल्यास, पुरेश्या प्रमाणात वाफ तयार होत नाही आणि अटकाव न झाल्याने तेल जास्त वेगाने आत शिरते व पदार्थ विरघळायाला लागतो. या उलट जास्त तापलेल्या तेलात पदार्थ टाकल्यास, बाहेरचा भाग लवकर करपु लागतो, आणि तो कडक झाल्याने आतल्या भागाची शिजण्याची क्रिया न झाल्याने, तो भाग मऊ राहतो.

तळणीत पदार्थ घातला कि तेलाचे तपमान उतरते. आणि हा फरक कधीकधी पन्नास अंशापर्यंत देखील असु शकतो, म्हणुन घाणा किती घालायचा तेहि महत्वाचे आहे.
ज्या पदार्थात सारण वैगरे नाही, म्हणजे शंकरपाळ्यासारखे पदार्थ, आत वाफ तयार झाल्याने फ़ुगतात. ती वाफ पुर्ण शोषुन शंकरपाळी शिजायला हवी, तसे न झाल्यास आत वाफ राहते व शंकरपाळी मऊ पडते.
पदार्थात किती प्रमाणात पाणी आहे, यावर सुद्धा तळण्याचे माध्यम अवलंबुन आहे. साधारण पाण्याचा अंश कमी असणारे पदार्थ म्हणजे शंकरपाळी, कोरड्या सारणाची करंजी, गुलाबजाम, अनारसे तुपात तळले तर चालतील. तुपाचा रेणु तेलाच्या रेणुपेक्षा खुप छोटा असल्याने, तो पदार्थात लवकर शिरतो, आणि पदार्थ लवकर तळला जातो. पण ज्या पदार्थाना मुळातच तळायला जास्त वेळ लागतो, ( त्यातील पाण्यामुळे, उदा पुर्‍या ) तुपात तळु नयेत.

अगदी शेवटी एक विचार मांडावासा वाटतोय. पुर्वी दिवाळीचे पदार्थ दिवाळीलाच केले जात. फारतर तुळशीच्या लग्नाला ते परत करत. पण करंज्याचा घाट वैगरे ईतर वेळी घातला जात नसे. अधिक महिन्यात जावयाला द्यायच्या वाणासाठी अनारसे केले तरच. चकल्याची भाजणी उरली असेल तर तिचे थालीपिठ वैगरे केले जात असे. एरवी फारतर रव्याबेसनाचे लाडु होत. आता तशी परिस्थिती नाही. वर्षभर हे पदार्थ मिळतात, खाल्लेहि जातात, त्यामुळे दिवाळीच्या सकाळचे गुळपोहे सोडल्यास, मला तरी हे सगळे पदार्थ तितकेसे आरोग्यकारक वाटत नाहीत. कदाचित ते पचवायची शक्तीही आपल्यात नसेल.
अर्थात हौसेला मोल नसतेच.



Supermom
Sunday, October 15, 2006 - 7:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश,
आपल्याकडे बर्‍याच घरांमधून डालडा आता प्रकृतीला अपायकारक या कारणाने बंद झालाय. त्याला कितपत शास्त्रीय आधार आहे?


Lajo
Monday, October 16, 2006 - 12:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद दिनेश,
माहीती फारच चांगली आणि उपयुक्त आहे. स्वयंपाक करताना याची खूप मदत होईल.


Bhagya
Monday, October 16, 2006 - 12:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा! या विषयावर इतके छान कोणी लिहू शकेल यावर कधी विश्वास बसला नसता.....


Dineshvs
Monday, October 16, 2006 - 1:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुपरमॉम, आता डालडा करताना मुद्दामच तेल जर जास्त संपृक्त करत असतील, तर ते तेलच वापरणे योग्य कि.
शिवाय कुठलिही वनस्पति करताना, कुठल्या तेलाचे नेमके काय प्रमाणात मिश्रण केलेले असते, हेच आपल्याला कळत नाही. त्यापेक्षा आपल्याला रुचेल ते तेल आणुन वापरलेले चांगले.
पण मॅगी नुडल्स सारख्या काहि प्रॉडक्ट्समधुन छुप्या रितीने डालडा आपल्या पोटात जात असतो. ( मॅगीच काय, ईतरहि ज्या नुडल्स गोल असतात त्या तळलेल्या असतात, आणि त्याहि हायड्रोजनेटेड ऑईलमधे, चपट्या चौकोनी नुडल्स त्यापेक्षा बर्‍या, कारण त्या तळलेल्या नसतात. )


Sami
Monday, October 16, 2006 - 2:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, highly impressed! खूपच छान आणि उपयुक्त माहिती दिली आहे तुम्ही.

Psg
Monday, October 16, 2006 - 5:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, छान माहिती दिलीत

Bee
Monday, October 16, 2006 - 8:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, फ़ारच चिकाटीने लिहिला हा लेख. मोलाची माहिती सांगितली आणि बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्यात. जसे दिवाळीच्या दिवसात दिवल्यांमध्ये वंगण मिळे. अकोल्यात सरकारकडून आम्हाला वंगण दिले जात असे. एका व्यक्तीला एकच वंगनाची बाटली दिली जात असे. मग आम्ही खोटेनाटे कारण सांगून दोन दोन वंगानाच्या बाटल्या आणत असू.


Shonoo
Monday, October 16, 2006 - 4:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश

अतिशय अभ्यासपूर्वक लिहिलंत. दिवाळीचा फराळ करून एवढा वेळ काढून लिहिलंत म्हणजे कमाल आहे तुमची. :-)
On Food and Cooking: The Science and Lore of the Kitchen by Harold McGee या पुस्तकाची आठवण झाली.

आता एकंदरीत hydrogenated fats च्या तब्येतीवर होणार्‍या परिणामांबद्दल पण लवकरच वाचायला मिळेल अशी आशा आहे.


Dineshvs
Monday, October 16, 2006 - 6:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आपण एखादा पदार्थ शॅलो फ़्राय करतो, त्यावेळी मात्र तेलाची भुमिका थोडी वेगळी असते. ईथे तेलाचा उपयोग तपमान वाढवण्यापेक्षा, पदार्थ तळाला लागु न देणारा घटक म्हणुन जास्त असतो.
आवश्यक ते तपमान भांड्याकडुन मिळतेच. आता जर तेलाचा उपयोग ईतकाच असेल, तर नॉन स्टिक भांड्यात जास्त तेल का वापरावे. अनेक जण ही भांडी केवळ फ़ॅशन म्हणुन वापरतात. तेला तुपाचे प्रमाण अजिबात कमी करत नाहीत.
कढईत परतुन आपण जेंव्हा बटाट्याच्या काचर्‍यांची वा फ़्लॉवर वैगरे भाज्या करतो, त्यावेळी सतत परतुन आपण सगळ्या फ़ोडीना आवश्यक ते तपमान लागेल असे बघतो. असे न परतल्यास भाजी खाली लागते आणि वर कच्ची राहते.
अगदी अर्धा चमचा तेलात, ज्वारीची कांदा भाकर कशी छान खरपुस भाजुन होते ते बघायला, माझ्या पेजवर डोकवा बघु.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators