नरूमामाचा गणपती : सई केसकर

Submitted by संयोजक on 22 August, 2010 - 00:47

नरूमामाचा गणपती

2010_MB_Ganesha2_small.jpg

नरूमामा आणि गणेशोत्सव माझ्यासाठी समानार्थी शब्द आहेत. गणेशोत्सव म्हणलं की लोकांना पुण्यातल्या नाहीतर मुंबईतल्या मिरवणुका आठवतात. पण पुण्यात हिराबागेतल्या गणपतीपासून एक मिनिटाच्या अंतरावर राहूनदेखील मला कधीच पुण्यातले गणपती आपलेसे वाटले नाहीत, याचं मुख्य कारण म्हणजे माझ्या मनात गर्दीबद्दल असलेला अतीव कंटाळा. असं कुणाच्यातरी खांद्यावर बसून रोषणाई बघायला मला जाम कंटाळा यायचा, आणि गणपतीसमोरच्या बाहुल्या नक्की कुठल्या महाकाव्यातून आल्यात हे समजून घेईपर्यंत माझे डोळे मिटायचे. त्यामुळे जमेल तेव्हा आईबाबा आणि मी गणपतीला कोल्हापूरला जायचो. घरात गणपती बसवण्याची वेगळीच मजा असते. ती सांघिक गणेशोत्सवात उपभोगता येत नाही.

कोल्हापुरातला आमच्या घरातला गणपती दहा दिवस असतो. पण त्याआधीची तयारी गृहीत धरून तो पंचवीस दिवसांचा होतो. नरूमामाचा गणेशोत्सव म्हणजे महिनाभराच्या कष्टानंतर बाप्पांनी हातावर ठेवलेला एक उकडीचा मोदक. मामाला सगळ्या गोष्टी नेमक्या करायचं व्यसन आहे. त्यामुळे तो आम्हाला सगळ्यांना हाताखाली घ्यायचा. "सई आणि स्नेहा, या पताका नीट लावा. या बशीत खळ आहे. ती न सांडता वापरायची. पताका नीट त्रिकोणी झाल्या पाहिजेत. काय?" हा शेवटचा 'काय?' खूपच बोचरा असायचा. मग आमची फुलपाखरू मनं त्या पताकांवर टिकत तेवढ्या वेळेपर्यंत नरूमामा सफल; पण त्यानंतर बहुधा रात्री एक वाजता बिचार्‍याला आमचा पसारा निस्तरत बसायला लागायचं.

बाप्पाला कुठे ठेवायचं यावर घरात खूप चर्चा असायची. आजोबा शुभ-अशुभ दिशा वगैरे सल्ले द्यायचे, कुसुमअज्जी नेहमी "मुलींचे फ्रॉक दिव्याजवळ जाऊ शकणार नाहीत याकडे बघा" हा एकच मुद्दा रेटायची, तर बच्चेकंपनीला आजोबांच्या खोलीपासून शक्य तितक्या लांब बाप्पा असावेत असं वाटायचं. एकदा जागा नक्की झाली, की रोषणाई! गणपतीच्या चेहर्‍यावर सात रंग आलटून पालटून पडावेत म्हणून खटाटोप असायचा. मामा आधी कल्पना काढायचा. मग स्टुलावर चढायचा. कुठल्यातरी कोपर्‍यातून एक वायर अनेक वायरींच्या मदतीने इच्छित स्थळी यायची. मग त्यावर बल्ब लागायचा. तो चालतोय की नाही हे तपासून त्यावर "फार लख्ख नाही ना?" वगैरे लोकमत घेतलं जायचं. त्यात कुसुमअज्जी तिच्या टोमणे मारायच्या अनुवांशिक सवयीचा पुरेपूर वापर करायची. "नरू, हा बल्ब जरा जास्त आहे. म्हणजे हा लावायचा असेल तर मूर्तीसाठी एक काळा चष्मासुद्धा आणावा लागेल." यावर त्याच्या तंद्रीत आधी नरूमामा "होय ?" असं निरागसपणे विचारायचाही कधी कधी. मग त्या बल्बासमोर सात रंगी चक्र आणि ते फिरवायला छोटी मोटर असा उपद्व्याप असायचा. त्यात भाडेकरू मदत करायचे. एवढ्या अभियांत्रिकी कला एकवटून शेवटी सात रंग दिसू लागले की मी आणि स्नेहा त्यात जुही चावलाचा एखादा नाच करून तो प्रकाश साजरा करायचो. आई मात्र, "अरे, कशाला नरू एवढा खटाटोप करायचा?" असे उत्तर माहिती असलेले प्रश्न पुन्हा पुन्हा विचारायची. मग मीनामामी तिला, "बघितलंस ना कसे आहेत हे? कसा संसार केला मी माझं मला माहीत" वगैरे सगळ्या बायका सांगतात तसले किस्से सांगायची.

हे सगळे उपक्रम नरूमामाच्या कामाच्या वेळेनंतर असायचे. त्यामुळे कधी कधी आम्ही पहाटे दोन वाजेपर्यंत जागे असायचो. खोलीत सगळीकडे वायरींचे जंत असायचे. त्यामुळे आम्हाला सारखा, "या पसार्‍याचं रूपांतर नरूमामाला हव्या असलेल्या देखाव्यात होणार का?" हा गहन प्रश्न पडायचा. त्यात मदतीला आलेल्या प्रत्येक व्यक्तीशी त्याचे तात्विक मतभेद व्हायचे. माझा बाबा पहिल्यांदा ढिस व्हायचा. नरूमामाला इकडची वस्तू तिकडे गेलेली अजिबात चालत नाही आणि काम करायचं नसेल तर सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे त्याच्यासमोर बसून अतिशय गलथान आणि वेंधळेपणानी काम करायचं. मग तो काही चत्कार आणि फुत्कार टाकून तुम्हाला मुक्त करतो. ही चाल मी बर्‍याचवेळा त्याच्यावर वापरली आहे. बाबा गेला की लगेच आईसुद्धा गबाळेपणा करून ढिस व्हायची. मीनामामीकडे मोदकांची जबाबदारी असल्यामुळे ती आधीपासूनच हात झटकायची. खरं तर मोदक फक्त पहिल्या दिवशी असायचे. पण त्या कष्टांसाठी तिला सगळी मदत माफ असायची. अज्जी मदतीला आली की तिच्याबरोबर तिच्यातली मास्तरीणसुद्धा यायची. त्यामुळे नरूमामाला टोमणे आणि सूचना यांना सामोरं जावं लागायचं. आजोबांची मदत म्हणजे दर पाच मिनिटांनी कुठल्यातरी वेदाचा नाहीतर उपनिषदाचा तास. त्यामुळे बच्चेकंपनीवर त्याची सगळी भिस्त असायची. पण आम्हीदेखील भयंकर कामचुकार होतो. त्यामुळे शेवटी नरूमामाचा एकपात्री प्रयोगच असायचा. पण गणपती यायच्या आदल्या दिवशी ऐनवेळी सगळे कामाला लागायचे. सकाळपर्यंत आमचा देखावा तयार असायचा. त्यात खोलीच्या मध्यभागापासून सुरु होऊन खूप सार्‍या पताका भिंतींकडे जायच्या. मूर्ती ठेवायला थर्माकोलचं मखर असायचं.एका मखमली शेल्यानी झाकलेल्या पाटावर ते मखर ठेवलं जायचं. त्या मखरात वरती दिसणार नाही अशा जागी ते सात रंगी चक्र असायचं. खोलीच्या प्रत्येक कोपर्‍यात वेगवेगळ्या कात्रणाचे कंदील असायचे आणि त्यातून वेगवेगळ्या आकाराचा प्रकाश खोलीभर पसरायचा. आदल्या रात्री नरूमामा सजावटीवर शेवटचा हात फिरवत असताना सगळे येऊन त्याचं कौतुक करून जायचे. त्या रात्री मात्र माझा नेहमीचा स्थूल कंटाळा पळून जायचा. सकाळी उठून कुंभार गल्लीत जायचं या विचारानी उगीचच झोप उडायची.

कुंभार गल्ली म्हणजे कोल्हापुरातला कैलास पर्वत! तिथे खर्‍या अर्थानी गणेशजन्म होतो. तिथे जायला नागमोडी रस्ता आहे आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कुंभारांची घरं आहेत. छोटी छोटी झोपडीवजा घरं आणि त्या घराबाहेर अर्धवट तयार मूर्ती. नरूमामा दरवर्षी वेगळ्या प्रकारची मूर्ती घ्यायचा आणि ती कशी आहे ते कुणालाच आधी सांगायचा नाही. त्यामुळे सगळ्यांना पहिल्यांदा मूर्ती बघायची फार उत्सुकता असायची. मला मात्र कुंभार गल्लीतून गणपती आणायला जातानाचा प्रवासच जास्त आवडायचा. जाताना गणपती घेऊन परत येणारे लोक दिसायचे. सगळे एकमेकांना "मोरया" म्हणून अभिवादन करायचे. त्यात कुणी कोल्हापुरातले दुर्मिळ ब्राम्हण, जानवं घालून, सोवळ्यात गणपती घेऊन जाताना दिसायचे. त्यांची मूर्ती साधी सोज्ज्वळ असायची. पण एखादं थोरात नाहीतर मोहिते-पाटील कुटुंब मस्त लोडाला टेकलेला फेटेवाला गणपती घेऊन जाताना दिसायचं. त्यात गणपती उचलणारे काका नेहमी गुबगुबीत कापशी टोपी घालून यायचे. एखादं "तानाजी युवक मंडळ" मात्र नवकलेला उत्तेजन देत, नाचणारी नाहीतर गरुडावर बसलेली मूर्ती घेऊन जाताना दिसायचं. मग कुठल्यातरी कोपर्‍यात नरूमामाचा खास कुंभार असायचा. नरूमामाचे असे खूप खास लोक आहेत. अगदी उदबत्ती कुणाकडून घ्यायची पासून ते वडा-कोंबडा कुणाकडे खायचा हे सगळं त्यानी ठरवलेलं असतं. मूर्ती बघून सगळे पाच-दहा मिनिटं ती कशी सगळ्यात भारी आहे याचं वर्णन करायचे. पण मला एव्हाना परत त्या गल्लीतून जायची घाई झालेली असायची. गणपती घेऊन परत जाणार्‍या लोकांची वेगळीच ऐट असायची. घरी आल्यावर मामी उंबर्‍यात मामाच्या पायावर पाणी घालायची आणि मूर्तीला ओवाळायची. मग थोड्याशा अक्षतांवर मूर्तीची प्रतिष्ठापना व्हायची. तोपर्यंत घरातल्या सगळ्या बायका मामीला मोदक करू लागायच्या. नैवेद्याचे एकवीस मोदक होईपर्यंत कुणालाच मोदक मिळायचे नाहीत. सारणसुद्धा मिळायचं नाही. त्यामुळे आम्ही स्वयंपाकघरात घिरट्या घालायचो. मग अखिल भारतीय मोदक संमेलन भरायचं.

"तरी बगा मीनावैनी, कर्‍हाडच्या जोशीआज्जींचे मोदक लई बेस. तसे मोदक म्या बघिटलोच नाय बगा".
मग उरलेल्या बायका त्यांच्या आयुष्यातले सगळ्यात पातळ मोदक, सगळ्यात खुसखुशीत सारण याचे दाखले देऊ लागायच्या. त्या नादात त्यांचे हात कमी वेगानी चालायचे. मग नरूमामा येऊन 'हल्या' करून जायचा. आमच्या गणपतीच्या आरतीला सगळी बिर्‍हाडं यायची. त्याशिवाय नरूमामा आरती सुरूच करायचा नाही. रोज बिर्‍हाडातल्या एका मुलाला किंवा मुलीला आरती धरायचा मान मिळायचा. आम्हाला पण मिळायची आरती. पण आरती हवी असेल तर त्या आधी जास्वंदीचा हार, दुर्वांची जुडी, दिव्यासाठी वात हे सगळं करायला मामाला मदत करावी लागायची. मामा स्वत: हार बनवायचा. आणि आज्जी त्याला वेगवेगळी फुलं आणून द्यायची. एखाद्या दिवशी आमच्या गणपतीच्या हारात सोनचाफ्याची फुलं असायची. कधी निशिगंध, कधी टपोरे गुलाब, कधी शेवंती आणि या सगळ्या हारांमध्ये पानांची हिरवळ पेरलेली असायची.

आरती म्हणताना मात्र मला आरती सोडून इकडे तिकडे बघायलाच जास्त आवडायचं! एकीकडे मीनामामी आणि तिच्या बिर्‍हाड-मैत्रिणी एका गटात असायच्या. त्यांत तिघींत मिळून एक जीर्ण आरतीचं पुस्तक असायचं. आणि दिलेल्या वेळेत आणि तालात बरोबर आरती म्हणण्यासाठी त्यांची झटापट सुरु असायची. त्यात एखादं कार्टं त्या तीनही बायकांच्या कोपरांखालून उसळ्या मारून पुस्तक वाचायचा प्रयत्न करायचं. मामी त्यांची सरदार असायची. तिनी हुकूम केला की ती सांगेल त्या सगळ्या आरत्या आरती मंडळ म्हणायचं. तिच्या शेजारी कुसुमअज्जी एकटीच उभी असायची. ती सुद्धा माझ्यासारखीच मामीच्या जोशात गाणार्‍या आरती-पथकाची मजा बघत असायची, आणि तिच्या चेह-यावरचे खट्याळ हावभाव मी बघायचे. आजोबा आरतीच्या आधीच ते कसे मूर्तीपूजेच्या पलीकडे गेलेत हे शंभर वेळा पूजा होईल इतक्या वेळात सगळ्यांना समजावून सांगायचे. त्यामुळे ते आरती म्हणण्यात फार रस घ्यायचे नाहीत. मला सगळ्यात आवडणारी आरती म्हणजे दुर्गेची. अर्थात माझा आणि त्या देवीचा सारखेपणा हे एकच कारण नसून, त्या आरतीची रचना हेही एक कारण आहे. त्यात शेवटी 'जय महिषासुरमथिनी' म्हणताना नेहमी सगळ्यांच्या लयीचा लय होताना दिसायचा. काहींना तो शब्द काय आहे हेच माहीत नसल्यामुळे आजूबाजूच्या लोकांच्या चेहर्‍याकडे बघून काही सोय करता येतेय का असे भाव त्यांच्या चेहर्‍यावर असायचे. पण या सगळ्यात कुसुमअज्जीमधली मास्तरीण निराश होऊन नि:श्वास टाकताना दिसायची, ते बघायला मला फार आवडायचं. एखादा शब्द चुकीचा उच्चारल्यामुळे तिला जे क्लेश व्हायचे ते बघून जितक्या लवकर आपल्याला या उच्चार-वासनेतून मुक्त होता येईल तितकं चांगलं असं वाटायचं. चिकूदादाच्या लग्नात त्याने माझ्या वहिनीचं नाव बदलून "जान्हवी" ठेवलं. त्याला उखाण्यात जान्हवीतला "न्ह" नीट यावा म्हणून अज्जीनी दहावेळा उखाणा म्हणायला लावला होता! आरतीनंतर मंत्रपुष्पांजली म्हणायची मात्र माझ्यावर सक्ती असायची. त्यामुळे मी माझ्या प्रेक्षक भूमिकेतून बाहेर यायचे. आणि सगळ्यांना प्रसाद द्यायचं कामही मला मिळायचं. पण या दोन्ही गोष्टी मला मनापासून आवडायच्या.

एकीकडे मामाचा गणपती तर दुसरीकडे ताजीची गौर. मुडशिंगीच्या घरात ताजीच्या गौरी दिमाखात सजायच्या. मुखवटे, त्यांना नेसवलेल्या सुंदर साड्या, फराळ, हळदीकुंकू हे सगळे सोपस्कार अगदी मजेत व्हायचे. गौर घरात आणायला नेहमी मला, स्नेहाला आणि मनिषाला (राजामामाच्या मुलीला) मानाचं आमंत्रण असायचं. मग आमचे पाय कुंकवात आणि हळदीत बुडवून आम्ही गौर घरात आणायचो. तिघी असल्यामुळे ताजी एक गौर परत बाहेर नेऊन आत आणायला लावायची. गौरीसमोर फराळाची ताटं असायची. अनारसे, करंज्या, लाडू, चकली, कोल्हापुरी तिखट चिवडा, चिरोटे, खोबर्‍याची वडी, कोल्हापुरी पुडाची वडी असे खूप पदार्थ करायला, बघायला आणि खायला मिळायचे. त्या तयारीत माझ्या माम्या नेहमी सडपातळ बनायच्या.

शहरातून खेडेगावात गेल्यावर काहीवेळा हा सगळा खटाटोप व्यर्थ वाटतो. पण मुडशिंगीतल्या बायकांचं सणाचं कालनिर्णय असतं. एखादी गोष्ट कधी घडली हे सांगायला त्या दिवाळी, गणपती, संक्रांत आणि गावचा उरूस, हे सण वापरतात. त्यांचं वर्ष सणांमध्ये मोजलं जातं. आणि त्या सणांच्या जोडीला येणार्‍या प्रत्येक रीतीचा त्यांना निरागस अभिमान असतो. शेवटी आपल्याला आखून दिलेल्या चौकोनात, आपल्या कौशल्याचा कस लावणारी रांगोळी घालता आली म्हणजे झालं! आणि आपल्या वाट्याला आलेल्या आभाळात, आपला सगळ्यात आवडता पतंग उडवण्यात जी मजा आहे, ती सगळ्या आभाळांमध्ये सारखीच असते. आणि एक मामी अनारसे करायची, दुसरी तळू लागायची, आणि त्यांच्या खांद्यावर हात टाकून साडी नेसलेल्या, झुलणार्‍या आम्ही बघून नेहमी ताजी त्या दृश्याची दृष्ट काढायची. काही स्वप्नं सगळ्यांनी मिळून बघण्यात जास्त मजा असते. आणि जेव्हा अशी छोटी छोटी सार्वजनिक स्वप्नं घरातले सगळे हात पूर्ण करतात तेव्हा आपल्या पाठीवरच्या त्या अगडबंब एकट्या स्वप्नाचं ओझं हलकं झाल्यासारखं वाटतं!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

'नरुमामाचा गणपती' आवडला, गणपतीच्या काळातील घरातील गडबड आठवली.
परत सार्वजनिक मंडळातपण काम केल्याने (अर्थात लुडबूड) तिथली पण गडबड तर फारच भारी.

>>सगळे एकमेकांना "मोरया" म्हणून अभिवादन करायचे. << अगदी , मी पुण्यात आल्यावर गणपतीच्या दिवशी , गणपती आणनार्‍या काही लोकांना "मोरया" म्हणून अभिवादन केले पण त्यांनी चमत्कारिकपणे पाहात माझा पोपट केला ;-).

काही स्वप्नं सगळ्यांनी मिळून बघण्यात जास्त मजा असते. आणि जेव्हा अशी छोटी छोटी सार्वजनिक स्वप्नं घरातले सगळे हात पूर्ण करतात तेव्हा आपल्या पाठीवरच्या त्या अगडबंब एकट्या स्वप्नाचं ओझं हलकं झाल्यासारखं वाटतं!
खूपच छान Happy आवडल .

मस्त , अप्रतिम..........
<<<<सगळं डोळ्यासमोर उभं राहिलं. >>>>>

>>त्यात शेवटी 'जय महिषासुरमथिनी' म्हणताना नेहमी सगळ्यांच्या लयीचा लय होताना दिसायचा. काहींना तो शब्द काय आहे हेच माहीत नसल्यामुळे आजूबाजूच्या लोकांच्या चेहर्‍याकडे बघून काही सोय करता येतेय का असे भाव त्यांच्या चेहर्‍यावर असायचे.

अगदी अगदी. तीच गत मंत्रपुष्पांजलीची Happy

>>शेवटी आपल्याला आखून दिलेल्या चौकोनात, आपल्या कौशल्याचा कस लावणारी रांगोळी घालता आली म्हणजे झालं! आणि आपल्या वाट्याला आलेल्या आभाळात, आपला सगळ्यात आवडता पतंग उडवण्यात जी मजा आहे, ती सगळ्या आभाळांमध्ये सारखीच असते.
>>काही स्वप्नं सगळ्यांनी मिळून बघण्यात जास्त मजा असते. आणि जेव्हा अशी छोटी छोटी सार्वजनिक स्वप्नं घरातले सगळे हात पूर्ण करतात तेव्हा आपल्या पाठीवरच्या त्या अगडबंब एकट्या स्वप्नाचं ओझं हलकं झाल्यासारखं वाटतं!

ही वाक्यं अफलातून सई. सही!!

पण चिरोट्याची आठवण कशाला करून दिलीस. आता आईला करायला सांगावे लागतील Proud

सई आजच "नरुमामाचा गणपती" ही तु लीहलेली पोस्ट वाचली अन खर सांगु काय लीहावे तेच मला समजत नव्हते

तु प्रतिभावान आहेस हे तर मला माहीत होते पण ईतके छान तु मराठीतुन लिहतेस ह्या बद्दल तुझा अभिमान वाटला.

तुझ्या पोस्ट मधुन तु अक्षरशहा घरातील सर्वांची व्यक्तीचित्रे डोळ्या समोर उभी केलीस. नरुच्या अंगातली ही कला मला माहीतच नव्हती.

तु लीहलेले कुसुम आजीचे वाक्य़ "गणपतीच्या डोळ्यावर काळा चश्मा आणावा लागेल " एकदम सही.

शेवटचा पॅरा फारच छान लीहला आहेस. अशीच लिहीत जा. तुझ्या लीखाणातील ताजे पणा मला खुप आवडला.

सुधिर काका

काही स्वप्नं सगळ्यांनी मिळून बघण्यात जास्त मजा असते. आणि जेव्हा अशी छोटी छोटी सार्वजनिक स्वप्नं घरातले सगळे हात पूर्ण करतात तेव्हा आपल्या पाठीवरच्या त्या अगडबंब एकट्या स्वप्नाचं ओझं हलकं झाल्यासारखं वाटतं!>> हे तर फार छान लिहीले आहे. लेख मस्त नेहमी प्रमाणेच.

Pages