अतुल पेठे

Submitted by आरती on 25 July, 2006 - 15:07

प्रायोगिक रंगभूमी वरचे यशस्वी दिग्दर्शक. विषयातले नाविन्य, मांडणीतले वैविध्य ही त्यांची खासियत. नभोनाटक, माहितीपट, प्रायोगिक तसेच व्यावसायिक नाटकं, या सारख्या विविध क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे आगळे वेगळे दिग्दर्शक.

'वेटींग फ़ॉर गोदो', 'शीतयुध्द सदानंद', 'ऐसपैस सोयीने बैस', 'प्रेमाची गोष्ट', 'आनंदओवरी', 'उजळल्या दिशा', 'सूर्य पाहिलेला माणूस', 'चौक', 'गोळायुग' ही त्यांची आत्तापर्यंत आलेली काही नाटके.

atulpethe001.jpg१.व्यावसायिक रंगभूमीकडे न वळता प्रायोगिक रंगभूमी निवडण्याचा निर्णय कसा घेतला ?

- एकतर व्यावसायिक रंगभूमीकडे वळणे किंवा न वळणे हा प्रश्न माझ्याबाबत त्यावेळेसही नव्हता आणि आजही नाही. हा काही केलेला एक मोठा त्याग आहे अशातलाही भाग अजिबात नाही. मला काय आवडतं, मला काय येतं, माझ्या मनाला काय पटतं आणि मला कशात आनंद वाटतो हेच निकष माझ्याबाबत पहिल्यापासून राहीलेले आहेत. हे करत असताना मी आयुष्याची दिशा वगैरे पहिल्यापसून ठरवली होती असे ही अजिबात नाही. खरोखर ज्या गोष्टीतून आपल्याला काम करण्यातला आनंद मिळतो, आपली मानसिक आणि बौध्दीक समृध्दी वाढते, अशा गोष्टी मला पहिल्या पासूनच आवडत होत्या. या का आवडत होत्या याच कारण अगदी छोट आहे - आपण जे काल होतो, आपण जे मगाशी होतो ते आपण आत्ता असत नाही. जीवन हे प्रवाही असत आणि त्या प्रवाहाबरोबर आपण आपलं जगणं समृध्द करत जायला हवं. ही इतकीच बारीक माझी असलेली त्यातली अपेक्षा होती.

रंगभूमी हे जिवंत माध्यम आहे. नाटकासारख जिवंत माध्यम जिथे असतं, आणि जिथे जीवंत माणसं जीवंत माणसांशी संवाद साधत असतात, आता उघड आहे जीवंत माणस ऍकाच कालखंडात जगत असतात. त्यामुळे त्या त्या काळातल्या माणसांबरोबर त्या त्या काळातले प्रश्न आदान प्रदान करणं, आपले विचार, आपल्याला काय वाटत हे लोकांसमोर मांडणं हा एक महत्वाचा त्यातला भाग असतो. आणि त्याच्यातच खरा खूप महत्वाचा आनंद असतो. कुठलाही झालेला प्रयोग हा परत कधी होत नाही. प्रयोग नेहमी नविनच होत असतो म्हणून नाटकाला ' प्रयोग ' म्हंटलेल आहे. प्रत्येक वेळी त्याच्यात तुम्हाला काहीतरी नवीन गवसत. आता ' गवसत ' हेच जर तत्व मान्य केल तर ते गवसण्यासाठी आपल्या फुटपट्ट्या काय असाव्यात, आपण त्याला कुठल्या प्रकारच्या मोजपट्ट्या लावतो हा केवळ आपला व्यक्तिगत मुद्दा येतो. त्यामुळे व्यावसायिक रंगभूमी वाईट आहे किंवा त्यापासून उत्पन्न मिळवणारे लोक वाईट आहेत असा माझा पहिल्यापासून कधी भाव नव्हता आणि आजही तो नाही.मला जे नाटक करावसं वाटतं, करायला आवडतं त्याला लोकं प्रायोगिक म्हणतात. व्यावसायिक रंगभूमिवर अनेक लोकांचा हेतू चांगल नाटक करण हा असतोच की पण त्याच्या मधे एक दुसरं ही लक्ष असतं - पैसे मिळतात की नाही ? ते नाटक चालत की नाही ? ते लोकांना रुजतं की नाही ? . प्रायोगिक रंगभूमी मधे मात्र याच्या अगदी उलट परिस्थिती असते. इथे मला काय आवडतं, मला काय वाटतं, माझ्या आजच्या सामाजिक धारणा काय आहेत, माझ्या संवेदना काय आहेत, मला समाजकारण - राजकारणा विषयी काय वाटत, आज माणूस म्हणुन जगत असताना माझे अत्यंत कळीचे, अत्यंत टोकाचे प्रश्न काय आहेत की ज्यामुळे मला अगदी कोंडीत पकडल्या सारखे वाटते, हे महत्वाचे असते.

अभिव्यक्त कशातनंही होणं याला मी ' माध्यम ' म्हणतो. माझ्यासाठी नाटक हे प्रभावी माध्यम आहे.

प्रायोगिक नाटक करताना माझं नाटक, मी, as an actor, as a director, as a writer प्रोफेशनल असण आवश्यक आहेच की. प्रोफेशनल म्हणजे - त्या माध्यमा वरची माझी जी हुकूमत आहे, माझं जे त्यातलं कौशल्य आहे त्यात व्यावसायिक सफाई हवीच. शरीराच्या हालचाली, आवाजाची पट्टी, स्वरांवरची हुकमत ही जशी एका अर्थाने technical ताकद असेल तशीच वैचारीक ताकद पण असावी लागते. त्यासाठी अभ्यास आणि प्रशिक्षण असण खूप जरुरी आहे.

प्रायोगिक तत्वावर आधारित जे काही करायचे आहे ते अत्यंत ' प्रोफेशनल ' पध्दतीने मांडता यावं अशी मात्र इच्छा नेहमीच राहिलेली आहे.

२. अभिव्यक्त होण्यासाठी नाटक हेच क्षेत्र माध्यम म्हणुन निवडावेसे का वाटले ?

- माझ्यासाठी नाटक हे अपघाताने माझ्या आयुष्यात आले.मी आधी म्हंटल्या प्रमाणे मी अगदी लहानपणा पासून नाटकात काम करत होतो असे नक्कीच नाही. पण मी नाटक पहिल्यापासून बघत होतो. एकतर पुण्या - मुंबई मध्ये नाटकाचं वातावरणच exposure मिळण्याच्या द्रूष्टीने इतर कुठल्याही गावांपेक्षा जास्त आहे. जवळ जवळ रोज इथे वेग - वेगळ्या प्रकारची नाटक होत असतात, स्पर्धा आयोजित केल्या जातात. या सगळ्याला सामोरं जात असताना मी 'Theatre Academy' ची नाटकं बघितली, सतिश आळेकरांची नाटकं बघितली, वेगवेगळ्या लोकांची असंख्य नाटक बघितली. त्या काळामधली 'बेगम बर्वे', 'घाशीराम कोतवाल', 'महानिर्वाण' यासारखी नाटक प्रचंड आवडली. आणि मग मला अस जाणवलं की नाटकांशी आपली अगदी सहज नाळ जुळते, अशा प्रकारचं नाटक आपण करायला पाहीजे.

' हे माझ्यासाठी आहे ' असा एक क्षणभर आपल्याला शोध लागतो. तसा मी नाटकातला आहे अस मला जाणवल आणि माझी नाटक या माध्यमाशी जवळीक आली. ही सहज घडणारी प्रक्रिया आहे. त्याच्या साठी उठाबशा काढाव्या लागतात अस मला वाटत नाही. आपल्याला प्रत्येकाला कशातुन तरी आपल्या अस्तित्वाची ओळख पटावी लागते. माझ्या अस्तित्वाचा शोध मला माझ्या नाटकातुन गवसतो. पण याचा अर्थ मी आयुष्याभर हेच करेन असे नक्कीच नाही. एकाच दिशेने वाटचाल करुन अढळ धृवपदावर जाउन बसायचे आहे अशी माझी तेंव्हाही मनिषा नव्हती आणि आजही नाही.मी कदाचित लिखाणाकडे वळेन, कदाचित कविता करेन. मला कशामधे आनंद वाटतो हाच पहिल्यापासून शेवटपर्यंत निकष आहे आणि त्या निकषावरच माझं पुढचं सगळ काम होत राहील.

३. 'वेटींग फ़ॉर गोदो', 'शीतयुध्द सदानंद', 'ऐसपैस सोयीने बैस', 'प्रेमाची गोष्ट', 'आनंदओवरी', 'उजळल्या दिशा', 'सूर्य पाहिलेला माणूस', 'चौक', 'गोळायुग' - या प्रवासाकडे वळुन बघितले तर विषयातले वैविध्य जाणवते. हे जाणिवपूर्वक केले की तशी संधी मिळत गेली ?

- ही सगळी नाटक एकमेकांपासून वेगळी नक्कीच आहेत. परंतु मी आधी म्हंटल्याप्रमाणे माझ्या जगण्यातले जे प्रश्न आहेत, मला जाणवणारी माझी तगमग, माझं एकाकीपण आणि माझ्या समकाळातल्या घटनांचा अर्थ मी काय लावतो, त्याच interpretation काय करतो. ते माझ्या या सगळ्या नाटकांमधून व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. तो आर्थिकदृष्ट्या यशस्वी झाला की अयशस्वी हा विचार मी करु शकत नाही किंबहुना मी तो करत नाही. पण कुठलही नाटक घेतल तरी माझ्यासाठी ते नाटक माझ्या जगण्याशी काहीतरी नाळ जोडणार होत. माझे जे प्रश्न होते ते मी त्या नाटकांद्वारे तपासायचा प्रयत्न करत होतो आणि पर्यायाने अंतिमत : मी स्वत : समृध्द व्हायचा प्रयत्न करत होतो. नाटकामधे अजून एक गम्मत अशी असते की प्रेक्षकांशिवाय ते नाटक पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे कदाचित ही सगळी नाटक बघून माझ्याबरोबर माझ्या प्रेक्षकांचीही अशा प्रकारची वाढ झाली असण्याची शक्यता आहे. जर आपण स्वत : ला जबाबदार नागरिक, जबाबदार कलावंत म्हणून घेणार असु तर आपल्या आजुबाजुच्या आसमंतात काय घडत आहे याची जाणीव तुम्हाला आहे की नाही आणि त्याचे अर्थ तूम्हाला लावता येतात की नाही हा खरा आव्हानाचा भाग असतो. आणि ते आव्हान मी माझ्या नाटकांद्वारे पेलण्याचा प्रयत्न केला आहे.

४. एखाद्या नाटकाची CD बघताना, रंगभूमी सारखा परिणाम साधला जात नाही. असे असताना यशस्वी नाटकाचे प्रयोग ठराविक कालावधीनंतर बंद करुन त्याची CD बाजारात आणण्याचा निर्णय घेणे तसे अवघडच. हे कसे शक्य झाले आणि त्यामागे कोणता विचार होता. ?

- त्या त्या नाटकाचा एक शोध असतो. त्या त्या नाटकाचा म्हणून एक प्रवास असतो. आणि तो संपला की आपण थांबावं. एक टप्पा असा येतो की इथुन पुढे त्या नाटकाचा प्रयोग आशय दृष्ट्या मला काही देउ शकत नाही. त्यावेळी प्रामाणिक पणे थांबावस वाटलं. हा एक भाग. आणि अजून थोडं पुढे जाउन सांगायचे तर बर्‍याच अंशी माझी नाटकं ही प्रेक्षकांवर चाललेली नाटकं नव्हेत. या नाटकांचे अनेकदा प्रेक्षकवर्ग तयार करणं, प्रेक्षकाची मानसिकता तयार करणं, त्यांचा दृष्टीकोन तयार करणं हे समांतर पातळीवर मला करत जावं लागतं. माझी नाटकं बघितली तर ही थोडी 'अनगड' नाटकं आहेत. त्याच्यात प्रयोगशिलता आहे ती दोन पातळ्यांवर. एक आशयाच्या पातळीवर आहे आणि दुसरी रुपबंधाच्या (form) पातळीवर. ही धडपड करत असताना हमखास तिथे यशाची काही गणित मांडली नव्हती. त्यामुळे बरीचशी त्यातली नाटकं ही लौकीकार्थाने 'चाललेली' नाटकं नव्हेत तर मी ती चालवलेली नाटकं आहेत. मी ठिकठिकाणी माझी नाटकं घेउन गेलो आहे, लोकांपुढे गेलो आहे, लोकांना त्याबद्दल सांगितले आहे, त्यावर चर्चा घडवल्या आहेत, चर्चा केल्या आहेत. हे सगळे अत्यंत पोटतीडकीने केले आहे. कारण शेवटी काय असतं की माणूस म्हणून जगत असताना आपल्याला संवाद साधायची फार गरज असते. जसं आपल्याला काय वाटतं हे ओरडून सांगावसं वाटत तसच कोणीतरी ऐकावं ही सुध्दा गरज असतेच, असं मला वाटतं.

तरीही नाटक कधी बंद करायचं यातला महत्वाचा भाग म्हणजे त्याच्याशी संबंधित अर्थकारण. ते मी किती ताणू शकतो हे पण एका पातळीवर अत्यंत महत्वाचं असतं. आणि त्या point ला मी थांबतो. सगळ्याच नाटकांविषयी प्रेम असते, कृतज्ञता असते, लोभ असतो पण त्यांच्या खांद्यावरच नवीन नाटकाचा प्रवास असतो त्यामुळे थांबावं लागतं. आणि ते नाही केलं तर पुढच्या गोष्टीला भिडताच येत नाही.

दस्ताऐवजीकरण (Archival / Documentation) करण्याच कारणं अस की, आपल्याकडे मराठी नाटकांची दुर्‍दैवी अवस्था अशी आहे की आपण एका बाजूने 'मराठी नाटक' एकदम सम्रुध्द नाटक म्हणून म्हणतो,खर्‍याअर्थाने मराठी लोकांनी जे काही जगाला द्यायच असेल तर त्यातला एक महत्वाचा घटक म्हणजे 'नाटक'. आणि इतकी सणसणीत परंपरा असताना आपल्याकडे मात्र त्याचा योग्य प्रकारे संग्रह नाही. त्याच परिशिलन करण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी आवश्यक असणारी साधनसामुग्री नाही, जी पुढच्या पिढीला अत्यंत आवश्याक असलेली गोष्ट आहे. त्यासाठी आजची जी electronic माध्यमं आहेत ती वापरुन हे सगळ जतन करणं आवश्यक आहे.या भावनेने ती नाटक दस्ताऐवजीकरण केलेली आहेत. त्याच्यातुन आपल्याच पायवाटा तपासायच्या असतील तर ते ही शक्य होते. त्यावेळेस काय केलं गेलं आहे, आज काय करता येउ शकतं, याचा नेमकेपणाने शोध घेता येतो. तो दंतकथा आणि पुस्तकातील रमणीय कथा यांच्यावर विसंबून रहात नाही. आणि अभ्यास करणार्‍या माणसासाठी हे अत्यंत महत्वाचं आहे.

५. ' आनंद ओवरी ' या पुस्तकाचे नाट्य रुपांतर करण्याची कल्पना कशी सुचली ? प्रयोग एकपात्री करण्याचे काही खास कारण होते का ?

- ' आनंद ओवरी ' किंवा माझं कुठलही नाटक ठरलं आणि केलं असं होत नाही. ते अनेक वर्षे मनात रुंजी घालत असतं. ते मीच माझ्या मनात अनेकवेळा तपासून घेतो, की हे नाटक मला का करायचं आहे त्याच्यामधे असा काय आशय आहे की जो अभिव्यक्त करण्यासाठी
माझं मन तडफडते आहे. ' आनंद ओवरी ' च्या बाबतीत असं झाल की गेले १६ - १७ वर्षे वेगवेगळ्याप्रकारे ती कादंबरी मला छळत होती.
तुकारामांच्या विषयी जे जे संशोधन झालेलं आहे ते प्रचंड वेगवेगळ्या प्रकारचं आहे. तुकाराम आणि तुकारामांचे वाङमय या बद्दलचे विविध दृष्टीकोन गेल्याकाही काळामधे आपल्यासमोर आले. आणि या सगळ्याचा प्रभाव पडून मी 'आनंद ओवरी' कडे वळालो.
त्याच्यामधे काही मोठ्या प्रमाणावर बदलही केले. एक तर ही कादंबरी तुकारामांच्या संदर्भातली आहे पण तुकारामावरची नव्हे.
आणि 'तुकाराम' म्हणजे मी सहिष्णुतेचं प्रतिक मानतो. आजच्या काळातली जी सहीष्णुता हरवली आहे ती तुकारामाच्या रुपाने बघायचा प्रयत्न मी करत होतो.

' आनंद ओवरी ' मधे एकतर मी कादंबरीचीच भाषा बोलायची अस ठरवलेलं होत. त्याच नाटक केलेलं नाही. कादंबरीला भिडत असताना बरेच प्रकार असू शकतात. उदा. दळवींनी 'बॅरीस्टर' नाटक लिहील.त्या प्रकारचं हे नाटक नाही. एकाअर्थाने हे कादंबरीच एकपात्री अभिवाचन आहे आणि या अभिवाचनाचं अभिनयामधे रुपांतर करुन ते जिवंत करायचा प्रयत्न केला आहे. त्यामुळेही एकतर इतर पात्र आणण्याचा प्रश्नच नव्हता.आणि इतर पात्र ही कान्होबाच्या मनात आहेत. ती तशीच असणं आणि प्रेक्षकांच्या मनात ती जिवंत होणं याला माझ्या लेखी
फार महत्वाच स्थान होत. कान्होबाचा तो व्यक्तीगत झगडा आहे, त्याचं काही आयुष्याविषयी म्हणणं आहे. त्याचा संवाद म्हणजे 'आपुलाच आपुणाशी ' चाललेला वाद आहे, परमेश्वराशी केलेलं त्याच ते भांडण आहे. त्याच ते एकट्याच असणं, एकटेपणाने बोलत
रहाणं, स्वत : शीच तुकारामाचा अर्थ शोधत रहाणं तसचं ठेवावं अस मला वाटलं.

६. प्रायोगिक रंगभूमी सारखेच मराठी सिनेमामधे काही नविन प्रयोग करावेसे नाही वाटले का ?

- मुळात काय आहे की आपण नाटक केलं की आता आपण सिनेमा करायला लायक आहोत असा माझा भ्रम नाही, जो अनेक लोकांचा असतो.
नाटक करण्याच्या नंतरची पायरी सिनेमा आहे आणि सिनेमा करण्याच्या आधीची पायरी नाटक आहे असे अजिबात नाही. ही दोन्ही क्षेत्र, दोन्ही माध्यम अत्यंत वेगळी आहेत, भिन्न आहेत हे आधी समजून घेतले पाहिजे.दोन्हींच असं एक स्वतंत्र स्थान आहे. स्वतंत्र अवकाश आहे. जे पेलणं अत्यंत अवघड असत.

सिनेमा करायचा विचार मनात खूप वेळा येतो. परंतु सिनेमासाठी आवश्यक असणार्‍या ज्या मानसिकता आहेत त्या माझ्याजवळ
नाहीत. त्यामधे एकतर आर्थिकता हा इतका महत्वाचा भाग येतो की सगळ्याच तांत्रिक गोष्टी त्यावर अवलंबून असतात. त्या अर्थाने नाटक हे करायला सोपे आहे. दुसरे असे की आजचा जो मराठी सिनेमा आहे तो मला कुठल्याही अर्थाने प्रामाणिकपणे पटत नाही. माझ्या मनातला जो सिनेमा आहे तो असा नाही. इतरांना जो सिनेमा दिसतो तो मला दिसत नाही.आणि मला जो सिनेमा दिसतो तो आर्थिकदृष्ट्या यशस्वी कसा ठरेल ? कारण त्यात कोणीतरी पैसे घालावे लागतील. तो चार लोकांपर्यंत न्यावा लागेल. याची यंत्रणा माझ्यापाशी तरी अजून उपलब्ध झालेली नाही. म्हणून मी असे म्हंटले की माझी ती मानसिकता नाही.

पण याला पर्याय म्हणून, माझ्या चौकटी मधे मी अनेक गोष्टी करुन बघितल्या. अनेक प्रकारचे शैक्षणिक अभ्यासक्रमावर आधारीत, मुक्त विद्यापिठांसाठी माहितीपट बनवले. किंवा आत्ता आरोग्यविषयक काम करत असताना वेगवेगळ्याप्रकारचे ८-१० माहितीपट बनवले. आणि ते सगळेच फार मोठ्या प्रमाणावर गाजले. मला जे काही म्हणायचे होते ते लोकांपर्यंत पोहोचले. ते चित्रपट नव्हते माहितीपट होते हे मान्य आहे पण, ते मला खूप आनंद देणारे होते. मला जे हवं होत तेच सादर करणारे होते, तेच चित्रीत करणारे होते.

सिनेमा होईल किंवा नाही, मला माहिती नाही. पण पुढे अशी शक्यता निर्माण झालीच तर त्याचं स्वागत करायला मी कायमच उत्सुक आहे आणि मराठी सिनेमा करण्याची खुप इच्छा आहेच आहे.

७. 'A father of experimental theatre' म्हंटल्या जाणार्‍या तेंडुलकरांवर नुकतीच तुम्ही 'तेंडुलकर आणि हिंसा : आज आणि काल' ही documentary film बनवली. तसेच तुमच्या 'आनंद ओवरी' चे संकलन तेंडुलकरांनी केले होते. तेंडुलकरांबरोबर काम करणे आणि तेंडुलकर या विषयावर काम करणे हे दोन्ही अनुभव ऐकायला आवडतील.

- मराठी रंगभूमी आणि भारतीय वाङमयाच्या संदर्भामधे विजय तेंडुलकर हे वादातीत महत्वाचं व्यक्तीमत्व आहे. आज आम्ही जे बोलू शकतो ते तेंडुलकरांचं योगदान आहे हे आधी मान्यच केल पाहीजे. त्यांची सगळीच साहित्य संपदा फारच महत्वाची आहे. नाटककार म्हणून तर ते अव्दितीय असच व्यक्तिमत्व आहे.

तेंडुलकरांच्या 'घाशीराम कोतवाल' मधे मी काम केल होतं. 'आनंद ओवरी' चे पहिले संकलन त्यांनी केले होते पण त्यांच्या आणि माझ्या चर्चा अशा कधीच झाल्या नाहीत. कारण मुळात ती कादंबरी दि.बा.मोकाशींची होती. त्याच्यात कुठलाही शब्द तेंडुलकरांनी नव्याने लिहीलेला नव्हता. ती कांदबरी कशी बोलली जावी, त्याच्यातले कुठले प्रसंग उलट - पलट केल्यास ते अधिक सुविध होतील, ते अधिक नाट्यमय कसे भासतील या गोष्टीं मधे तेंडुलकरांचा महत्वाचा सहभाग होता. पण माझ्या तेंडुलकरांबरोबर एखाद्या नाटकाच्या बैठका - चर्चा व्हाव्यात असे कधिही झाले नाही.

'तेंडुलकर आणि हिंसा' करत असताना मात्र तेंडुलकरांशी बोलण्याचा योग आला. परंतु film तेंडुलकरांच्या वरच होती त्यामुळे तेंडुलकरांचे त्याच्यात काही point of view नव्हते. point of view माझे आणि माझा लेखक महत्वाचा, मकरंद साठे, यांचे होते. त्यांचा वर माहितीपट बनवायचा असा जेंव्हा मुद्दा आला तेंव्हा काहीतरी वेगळे करावे असे मनात होते. हा माहितीपट इतर माहितीपटांपेक्षा वेगळा आहे, एका अर्थाने बौध्दीक चर्चा आहे. तेंडुलकरांच्या साहित्याचा नव्या पिढीने केलेला अभ्यास आहे. नव्या पिढीचे काही म्हणणे होते, काही प्रश्न होते ते तेंडुलकरांपर्यंत पोहोचवायचे होते, त्यांना विचारायचे होते. असा हा माहितीपट आम्हाला करायचा होता. जो मुलाखतींवर आधारित, गप्पांवर आधारित, चर्चांवर आधारित आहे. पण यावेळेस सुध्दा कुठल्याही प्रकारची माहितीपटाच्या अनुषंगाने चर्चा तेंडुलकरांबरोबर झाली नाही.

८. केवळ आवाज - संवाद एव्हढेच माध्यम वापरुन 'कोसला' हे नभोनाट्य दिग्दर्शित करताना काही मर्यादा जाणवल्या का ?

- भालचंद्र नेमाडेंची 'कोसला' ही एक अशी कादंबरी आहे, ज्या कादंबरीने मराठी वाङमयाच्या दिशाच बदलल्या. मराठी वाचकाला सजग केलं, शहाणं केल. त्यातली भाषा, त्यातले विचार सगळ्यात एक वेगळे पण आहे. ही कादंबरी आपण मैलाचा दगड मानतोच, यात काही शंकाच नाही. जेंव्हा 'पुणे आकाशवाणी' कडून हा प्रस्ताव आला तेंव्हा आकाशवाणीवर उषाताई पागे होत्या. त्यांनी नेमाडेंना विचारले तुम्हाला कोसलाकरीता कोण योग्य वाटते ? त्यात नेमाडेंनी माझे नाव सुचवले, हा मला महत्वाचा बहुमान वाटतो.

कामाला सुरुवात करताना मात्र मनावर अतिशय दडपण होतं. कारण अशा प्रकारच वाङमय जे समाजात गेली ३०,३५ वर्षे महत्वाचं स्थान मिळवून आहे त्याला भिडणं हे माझ्या दृष्टीने एक आव्हान होत. सगळ्यांना परिचीत असलेल्याच गोष्टीला हात घालायला जात असताना त्यात बरेच धोके असतात. मी जेंव्हा नविन नाटक आणतो तेंव्हा अस्पर्श असलेल्या नाटकाला मी स्पर्श करत असतो. इथे मात्र ती कादंबरी तोंडपाठ असावी इतकी जनमानसात रुजलेली. शेवटी हे दडपण घ्यायचं नाही अस मी ठरवलं आणि माझ्या पध्दतीने त्या कादंबरीला भिडलो. या नभोनाटकाला खानदेशी भाषेच एक संपूर्ण रुप यावं म्हणून जळगावचा 'शंभू पाटील' याची निवड केली. 'कोसला' हे एकपात्री निवेदन आहे. ते तसंच ठेवण्याच धैर्य मी दाखवलं. त्याच्यामधलं येणार संगीत, ध्वनी हे माझ्या दृष्टीनं महत्वाचं होत. श्राव्य माध्यमामधे वाचनाच्या जवळ जाणार्‍या गोष्टी असतात. तुम्ही तुमचं imagine करु शकता, कल्पनाशक्तीच्या आधारे ते पात्र पाहू शकता. हा श्राव्य मधला एक महत्वाचा ताकदीचा भाग आहे त्यामुळे तो फायदा घेउन मी कोसलाला सरळ भिडलो.

२५ भागांमधे ही मालिका सादर झाली. त्याचे छोटे छोटे भाग पाडण गरजेचं होतं. कारण ती रोज २० - २२ मिनीट ऐकवली जायची. त्यावेळेत एक मुद्दा पूर्ण होईल, एक घटना पूर्ण होईल ही काळजी आम्ही घेतली होती.

आणि 'कोसला' ही प्रचंड यशस्वी झाली आकाशवाणी पुणे केंद्रावर ! पुढे जळगाव तसेच मुंबई आकाशवाणी केंद्रावरही ती सादर करण्यात आली. प्रचंड पत्र आली. मोठ्या प्रमाणावर लोकांनी त्याची दखल घेतली. आणि माझ्यासाठी, श्राव्य माध्यमातुन एक interpretation करता, कस होत याचा अभ्यास करण्यासाठी एक चांगला नमुना तयार झाला.

९. प्रायोगीक रंगभूमीला फक्त मुंबई - पुण्यातच प्रेक्षक लाभतो असे म्हंटले जाते. तुमचा काय अनुभव आहे ?

- हो हे खरं आहे. पुणे - मुंबई ही मोठी मोठी शहरं आहेत त्यामुळे तिथे असणार exposure , तिथे उपलब्ध असणार्‍या संधी ह्या सगळ्याचेच प्रमाण ही मोठे आहे. म्हणजे पुणे हे शहर बघीतलं तर तिथे असणार्‍या मोठ - मोठ्या संस्था, FTI,Archives,EMRC ,बालचित्रवाणी, या सगळ्याच गोष्टी एका बाजूने महत्वाच्या असतात. मुंबई शहर जर बघितलं तर तिथे दुरदर्शन आहे, मोठ्या प्रमाणावर सिनेमा आहे, प्रचंड echonomics असणारं ते शहर आहे. हा झाला एक भाग. दुसरे म्हणजे तिथली जी माणसं असतात, त्या त्या शहरामधली त्यांच्या लोकसंख्येच्या पटीमधे तुम्हाला ती जास्त मिळतात. इथे मला असं वाटतं की त्यांच्या संस्कृती बाहेरच्या जगाचं दर्शन झालेली माणसे एकत्र येतात. आणि एक मानसिकता तयार होते, आपण काहीतरी नविन बघितलं पाहिजे, ऐकलं पाहिजे.

छोट्या - छोट्या गावांमधे जरी प्रेक्षक वर्ग मिळालाच तरी तो दृष्टीकोन असत नाही. नव्या गोष्टींना समजाऊन घेऊन सामोरे जायला तयार असणारे, ज्याला मी दृकश्राव्य साक्षरता म्हणतो ती साक्षरता असत नाही. ती साक्षरता तयार करावी लागते. आजमितीला तरी ते खूप अवघड आहे. पुणे - मुंबईच्या व्यतिरीक्त एक औरंगाबाद असेल, सोलापूर असेल, कणकवली सारख गाव असेल. कणकवली तस छोटसच
गाव आहे. पण त्या गावामधे वर्षानुवर्ष 'वसंतराव आचरेकर' नावाच्या एका संस्थेने महत्वाच काम केलेलं आहे. त्यामुळे तिथला प्रेक्षक वर्ग हा तौलनिक दृष्ट्या खुप सजग़ बघायला मिळतो. अशी परिस्थिती सगळीकडे नसण्याची अनेक कारणं आहेत. अनेक गावांमधे theatres नाहीत, बसायला उठायला एखादी जागा नाही, वाचनालय नाही, तिथे चांगली पुस्तक मिळ्त नाहीत, चांगले चित्रपट बघायला मिळत नाहीत. अशी अवस्था असताना फार मोठा संघर्ष तिथल्या लोकांना आणि नाटककर्मींना तिथे जाउन करावा लागतो.

१०. आजचा तरुण प्रेक्षक वर्ग 'आशय गर्भ' प्रायोगिक रंगभूमीकडे आकर्षित होतो आहे का ? तुम्हाला काय वाटते ?

- हो, गेल्या ४ - ५ वर्षात परीस्थीती खूप बरी दिसायला लागली आहे. वेगवेगळ्या भागामधे छोट्या - छोट्या प्रमाणावर प्रायोगिक नाटकं ही तौलनिक दृष्ट्या जास्त यायला लागली आहेत.व्यावसायिक नाटकांपेक्षा प्रायोगिक नाटकांचे लेखक, कलावंत हे जास्त ओढीने काम करत आहेत. गांभिर्याने ते नाटकाकडे बघु इच्छितात, हे चित्र आशादायक नक्कीच आहे. काही चांगल्या प्रशिक्षण देणार्‍या संस्थाही सुरु झाल्या आहेत, त्यांचही महत्वाचं योगदान आहे. ललित कला केंद्र सारखी पुण्यातली संस्था आहे किंवा अविष्कार सारखी संस्था असेल. हे सातत्याने करत रहाणार्‍या काही माणसांमुळे ही आजची छोटीशी का होईना फळं दिसत आहेत. त्यामुळे हे श्रेय त्यांना द्यावं लागेल.

११. 'साठे आणि पेठे' ही नावे बरेचवेळा जोडीने वाचायला मिळतात. त्यांचे लिखाण, त्यांची काम करण्याची पध्दत, याबद्दल थोडेसे !!

- मला असं वाटतं, प्रत्येक कलावंताच - दिग्दर्शकाच काही विशीष्ठ प्रकारच नातं असत. मकरंद साठेला माझं नाटक आवडणं आणि मला मकरंदच आवडणं या दोन्ही गोष्टी एकमेकांना पुरक असतात. आम्ही दोघेही एका काळामधल्या काही गोष्टी समांतरपणे बघायचा प्रयत्न करतो, हा आमच्यातला महत्वाचा दुवा आहे. मकरंदच्या लिखाणाच्या संदर्भात मला असं वाटतं की, तो महत्वाचा लेखक आहे, वेगळा नाटकवाला आहे, तो वेगळा विचार करतो. आजच्या जगाकडे बघण्याचा त्याचा दृष्टीकोन अत्यंत वेगळा आहे. आणि त्या दृष्टीकोनातून जग बघायला मिळणे ही मी एक संधी समजतो.

१२. 'नाटक' या संवेदनशील प्रक्रियेला सामोर जाताना येणार्‍या अडचणी आणि जाणवणार्‍या काही त्रुटी ??

- मराठी नाटक करणं हा एक अत्यंत आव्हानात्मक भाग कायमच रहात आलेला आहे. १५० वर्षांची दणकट परंपरा ही खरोखर काही व्यक्ती आणि त्यांनी चालवलेल्या संस्था यावरच आधारित राहिलेली आहे. माझे पुर्वसूरी हे इतके प्रचंड मोठे आहेत की त्यांचे प्रश्न हे कायम मराठी नाटकाचे अत्यंत तीव्र अशा संघर्षाचे आहेत. आज नाटक करत असताना तर ते प्रश्न अधिक गडद होत आहेत. अधिक व्यामिश्र आणि गुंतागुंतीचे होत चाललेले आहेत. एक म्हणजे इथे इच्छा असुन मोठ्याप्रमाणावर कुठल्याही प्रकारची उपलब्धता आजही नाही, अशी परिस्थिती आहे. सरकारची कुठल्याही प्रकारची 'सबसीडी' मराठी नाटकाला नाही. प्रायोगिक नाटकांकडे तर अत्यंत दुर्लक्षच आहे. ३३ जिल्ह्यांपैकी १० जिल्हे सोडता आम्हाला आवश्यक अशी, पूरक अशी नाट्यगृह तिथे नाहीत. त्यामुळे नाटक करायची ईच्छा आहे पण ते नाटक कुठ करायच ? त्याला जागाच नाही, ते केंद्रच नाही. मला अस वाटत की एका बाजुने शहर वाढत असताना, सुबत्ता वाढत असताना नाटकासारख्या गोष्टींचा मात्र गळा घोटला जाण्याच हे रुपक मानता येईल.

अजुन एक अत्यंत महत्वाचा मुद्दा असा आहे की, या सगळ्या नाटकांच ज्याप्रकारे दस्ताऐवजीकरण व्हायला पाहीजे, त्याच्या विषयी ज्या चर्चा व्हायला पाहीजे, त्याच्या साठी ज्या कार्यशाळा व्हायला पाहीजे. त्याचा अभ्यास करण्यासठी ज्या शिष्यवृत्या असायला पाहीजे, त्या इथे आज तरी उपलब्ध नाहीत आणि हे अत्यंत दुर्दैवी आहे. आमचं सगळं काम आत्तापर्यंत आम्ही करु शकलो याच कारण म्हणजे आम्ही नोकर्‍या करत राहीलो. आमच्या बरोबरचा जो गट असेल तो नोकरी करत नाटक करत राहीला. नोकरी करुन ८ - १० तास पिळवटून काढून घेतल्यानंतर आपण एका सर्जनशील प्रक्रियेला सामोर जाणं हा अत्यंत त्रासदायक प्रकार आम्ही आजपर्यंत करत आलेलो आहोत. याविषयी तक्रार नक्कीच नाही पण हे नष्टचर्य कधीतरी कुठेतरी संपावं अशी मात्र मनोमन इच्छा आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या grants , अशाप्रकारच्या felloships काही प्रमाणात इथे असणं हे फार गरजेच आहे, ज्याच्याकडे आतापर्यंत सगळ्यांनी दुर्लक्ष केलेल आहे.

इथे जवळ जवळ तुम्ही म्हातारे झाल्याशिवाय तुम्हाला पुरस्कार मिळणार नाहीत अशी समाजव्यवस्था आहे. ही तक्रार नाही, वास्तवतेच दर्शन आहे. या सगळ्या पार्शभूमीवर, आपण नाटका कडुन काही मागणी करत असतो. पण जर तो समाज खूजा असेल तर नाटक ही खूज व्हायला लागतं. त्या समाजाला जर नाटक बघणं, सिनेमा बघणं, पुस्तक वाचणं, शिल्पकला - चित्रकला बघणं याची गरजच वाटत
नसेल जीवनात, तर तो समाज हा अधोगतीलाच जातो. नाट्यगृह ही कुठल्याही शहराची / गावाची उर्जास्रोत असतात. तरीही तुमच्या गावामधे AC बियर बर असतात पण नाट्यगृह नसतात.

या सगळ्या पार्श्वभुमीवर आम्ही आमच्या पात्रते नुसार काम करण्याचा प्रयत्ना करत असतो. त्यामुळे सुरुवातीला म्हंटल्याप्रमाणे हा जरी आनंदाचा भाग असला तरी या आनंदाच्या खाली अत्यंत टोकदार अशी व्यक्तीगत दु : खांची पदचिन्हं मात्र आहेतच.

हे सगळं होत असताना काही छोटे - छोटे हिरवळीचे क्षण ही भेटतात. जे आम्हाला मदत करायला तयार असतात किंवा ज्यांच्या मदतीवर हा डोलारा उभा असतो.

जसे, हे जे दस्ताऐवजीकरण केलं गेलेलं आहे, ते काम California Arts Association , कला, अभय पाटील, डॉ.श्रीराम लागु, निळू फुले, अमोल पालेकर, राजेंद्र बापट यां सारख्या काही संस्था आणि व्यक्ती यांच्या बळावर आणि त्यांनी केलेल्या आर्थिक मदतीवर करता आले. त्याच्या मधे सूर्य पाहिलेला माणूस, तेंडुलकरांवरचा माहितीपट, आणि आत्ता नव्याने ध्वनीचित्रीमुद्रीकरण होणारे 'Wating for godot' हे नाटक, या कलाकृतींचा समावेश आहे.

कुठल्याही अडचणींनी डगमगून न जाता, आपल्या संवेदनशिलतेला आणि मूल्यांना चिकटून राहून सर्जनशिलतेचा नवा शोध घेणारं काम उभं करणे हा निग्रह ही त्यातूनच जपता येतो.

शेवटी आपण बोलू पहातो ते माणसांविषयक आणि जीवनाविषयक !!

Taxonomy upgrade extras: 

Ninavi

Tuesday, July 25, 2006 - 9:47 am:

व्वा!! सुंदर झाल्ये मुलाखत. अभिनंदन. मला ' सूर्य पाहिलेला माणूस' व्हीसीडीवर बघायला मिळालं होतं, आणि त्यावरून या लेखक्-दिग्दर्शक जोडगोळीबद्दल आदर आणि कुतुहल निर्माण झालं होतं. एका अतिशय विचारी व्यक्तिमत्वाशी आमचा ' संवाद' घडवून आणल्याबद्दल आभारी आहे Itsme .

Aj_onnet

Tuesday, July 25, 2006 - 10:04 am:

सही झालीये मुलाखत. निवडक प्रश्नातून त्यांची नाट्यविषयक भूमिका मस्त उलगडली आहे!

Kmayuresh2002

Wednesday, July 26, 2006 - 12:08 am:

आरती,मस्त झालीये मुलाखत.. गुड वर्क

Bee

Wednesday, July 26, 2006 - 12:35 am:

आरती, सगळे प्रश्न आवडलेत आणि त्यावरचे भरभरुन दिलेले उत्तरही आवडले. हे सर्व लिहायला वेळ काढला त्याबद्दल खरचं आभार मानायला हवेत तुझे आणि अतुल पेठेंचे. keep it up!!!!!

Raina

Wednesday, July 26, 2006 - 2:24 am:

आरती,
मुलाखत अगदी "मुलाखत" जशी पाहिजे तशी झाली आहे. प्रश्न आणि उत्तरे दोन्ही विचारप्रवर्तक आहेत. Thanks a million
फक्त एकच suggestion दिलं तर चालेल का?- जरा शुद्धलेखन आणि spellings वर हात फिरवायला हवा! eg -संस्क्रूती,सरकार्ची felloships

Karadkar

Wednesday, July 26, 2006 - 9:46 pm:

आरती, मुलाखत अप्रतीम. आनंदओवरी आणि सूर्य पाहीलेला माणुस पाहीले असल्याने ह्या कलाकाराचा अंदाज होताच.

धन्यवाद.

Dineshvs

Wednesday, July 26, 2006 - 11:43 pm:

आरती, छान झालीय मुलाखत. वर लिहिल्याप्रमाणे आम्ही सगळ्यानी हि दोनच नाटके बघितली, कारण ती सीडी वर उपलब्ध होती.
या सीडी पण अगदी छान नाट्यानुभव देतात. नाटकांचे प्रयोग बंद होण्यापुर्वी, असे जतन करणे आवश्यक आहे.

Gs1

Thursday, July 27, 2006 - 3:19 am:

एका विचारी दिग्दर्शकाची विचारप्रक्रिया उलगडुन दाखवणारी ही मुलाखत आहे.
संवाद अगदी उत्तम जमला आहे.

Paragkan

Friday, July 28, 2006 - 12:01 am:

वाह .... अगदी समर्पक आहे मुलाखत!

Kandapohe

Friday, July 28, 2006 - 12:25 am:

आरती छानच झाली आहे मुलाखत! उत्तरे पण मुद्देसूद आणि सखोल आहेत.

Devdattag

Friday, July 28, 2006 - 4:40 am:

मुलाखत अगदी सुंदर..
वेटिंग फ़ॉर गोदो बघायच राहिलं होतं.. ते सिडीवर येतय याचा फार आनंद होतोय..

Upas

Sunday, July 30, 2006 - 4:56 pm:

आरती छान घेतलेय मुलाखत.. खूप मोकळेपणाने आले आहेत सगळे मुद्दे!!

Prasad_shir

Monday, July 31, 2006 - 7:34 am:

वा आरती, मुलाखत अगदीच छान झाली आहे.

Cool

Monday, July 31, 2006 - 10:26 am:

छान मुलाखत, पेठ्यांची नव्याने ओळख झाली

Svsameer

Tuesday, August 01, 2006 - 2:50 am:

आरती
आनंद ओवरी, सुर्य पाहिलेला माणुस तसेच सामाजिक कार्यावरील २ documentaries हे पाहुन एक प्रतिमा मनात तयर झाली होती अतुल पेठेची.
तु घेतलेली मुलाखत आणि त्यातली पेठेंची मुद्देसुद उत्तरं वाचुन हा माणुस त्याच्या विचारांशी आणि कृतीशी किती प्रामाणीक आहे हे जाणवलं.
मराठी नाटकांचं दस्ताऐवजिकरण किती महत्वाचं आहे हे दूरदर्शनने कट्यार काळजात घुसली चं recording पुसुन सिद्ध केलं आहे

Lalu

Tuesday, August 01, 2006 - 2:51 pm:

आरती, सुरेख झाली आहे मुलाखत. आज निवांतपणे वाचली. यांचं कुठलंच नाटक पाहिलेलं नाही पण एक उत्कृष्ट दिग्दर्शक असणार हे मुलाखतीतून जाणवतं. 'नाटकाचा प्रयोग पुन्हा कधीच होत नसतो, प्रत्येक प्रयोग वेगळा असतो' हे पटलं.
प्रश्न छान आहेत. उत्तरंही व्यवस्थित शब्दबद्ध झाली आहेत.

Cinderella

Tuesday, August 01, 2006 - 9:12 pm:

छान झाली आहे. प्रश्न वेगले आहेत एकदम.

Limbutimbu

Wednesday, August 02, 2006 - 1:14 am:

मुळात हा उपक्रमच छान हे!
त्यामुळे बरचस भरीव आशयसम्पन्न वैचारीक तर वाचायला मिळतच पण आपल्या आजुबाजुलाच वावरत असलेल्या थोरामोठ्यान्ची ओळखही होते!

Sateesh

Saturday, August 05, 2006 - 10:35 am:

आरती,

मुलाखत सुन्दर झाली आहे! मला कल्पना नव्हती तुझ्या या क्षेत्रातल्या प्रगतीची! मी ही मुलाखत छापून घेतली आहे, म्हणजे आता ती इन्टरनेटवर नेहेमी नसणारे आणखी काही लोक वाचू शकतील.

सतीश राजहन्स, पुणे.

Audayan

Monday, August 07, 2006 - 11:40 am:

छान झाली आहे मुलखत. पण, प्रायोगिक रंगभुमि फ़क्त पुणे-मुंबई मधे आहे हे मात्र खरे नाही. सांगली, कोल्हापुर, सोलापुर, नाशिक ह्या गावांमधे प्रयोगिक रंगभुमि ची फ़ार छान जोपसन झालेली आहे आणि होते आहे. आतुल कुलकर्णी, शरद भुतडीया, वामन देगांवकर वगैरे प्रतिभावान कलावंत ह्या गावमधील प्रायोगीक रंगभुमी वरून पुढे आले आहेत.

Prasadmokashi

Tuesday, August 08, 2006 - 5:07 am:

वाह आरती! तू एक चांगली मुलाखतकार आहेस माहित नव्हते मला.
ही मुलाखत वाचणे हा देखिल एक सुंदर "learning experience" वाटला.

Itsme

Wednesday, August 02, 2006 - 1:02 am:

सगळ्यांना मनापासुन धन्यवाद,

अतुल पेठेंना मायबोली माहिती आहे का ? वगैरे प्रश्ण मी include जरी केले नसले तरी चहा घेतानाच्या गप्पांमधे विचारले नक्किच होते.

मायबोली त्यांना माहिती आहे कारण ते निरजा ला ओळखतात. मी त्यांच्या घरी गेले त्याच्या आदल्याच दिवशी त्यांची कन्या 'आतल्या सहीत माणुस' चा प्रयोग बघुन आली होती.

मायबोलीचा दिवाळी अंक (hardcopy) बघितल्याचे ही त्यांनी सांगितले.

नमस्कार आरतीजी

अतुल पेठे यांची तुम्ही घेतलेली मुलाखत मी वाचली, आवडली.

दिव्य. मराठीतर्फे पंढरपुरात होणा-या नाट्य संमेलनाच्या निमित्ताने आम्ही एक विशेष पुरवणी काढतोय. त्यासाठी आपल्या या मुलाखतीतील काही भाग ( प्रश्न क्रमाक ९, १० व १२ ची उत्तरे ) आम्ही घेऊ इच्छितो. त्यासाठी आपली परवानगी हवी आहे. लेखावर आपले श्रेय अर्थात दिले जाईलच. त्यसाठी कृपया आपले पूर्ण नाव आणि मेल आयडी पाठवावा.
मला आपल्या उत्तराची अपेक्षा आहे. उद्यापर्यंत आपण कळवाल तर आनंद होईल.
वर्तमानपत्रांची घाई आपण समजून घ्याल अशी आशा आहे.
प्रतिक पुरी
संपादकीय विभाग, दिव्य मराठी, मुंबई
९९६०२९८४०३