नाटक करायचे नाटक ...

Submitted by क्ष... on 28 April, 2010 - 20:15

मी नाटक करण्याबद्दल लिहिणे म्हणजे एक मोठी गंमतच आहे. मी स्वत:आयुष्यात एकदाच फक्त स्टेजवर उभी राहिलेय ते देखील मी ३री-४थी मधे असताना कोणत्यातरी नाटकात. आम्ही सुंदर, सुबक वगैरे नसल्याने तसे प्रसंग कमीच आले शाळेत असताना. सर्वांनी मिळून करण्याचे नाटक वगैरे आमच्या शाळेतल्या बाई कधी करत नसत. पण एकुणच आमच्यावेळी शाळेत फेवरिझम बराच असे त्यामुळे हे नाटकात काम करणेवगैरे माझ्यासाठी अस्तित्वातच नव्हते. पण नाटकासाठी मदत मात्र केलेली आहे बरेचदा. आणि तो संपूर्ण प्रवास नीट अनुभवला अनेकवेळा. एका मैत्रिणीने सल्ला दिला की तुझे अनुभव शेअर कर, मजा वाटेल वाचायला म्हणून हा लेखप्रपंच.
मला नाटकासाठी मदत करायची पहिली संधी सातवीमधे मिळाली. लहान मुलींचे मेकप करणे, ड्रेसेसची तयारी वगैरे हे असे सगळे करुन दिले. पुढे कधी केले की नाही ते आठवत नाही. १९९९मधे मी भारतातून इकडे आले आणि माझ्या काकूमुळे मला ९९च्या सॅनहोजे येथे होणार्‍या बीएमएममधे खेळ मांडीयेला या अतिशय सुंदर कार्यक्रमाला मदत करायची संधी मिळाली. त्यावेळी खुप तालमीना जात असे. हे सगळे हौशी कलाकार. प्रत्येकजण नोकरी, काम, घर, शिक्षण सांभाळून वेळेवर तालमीना येत असत. प्रत्येकाच्या काही ना काही अडचणी असत पण तरीही लोक घरचे कार्य असल्यासारखे येत. या कार्यक्रमांची अजुन एक मजा म्हणजे या कार्यक्रमात काम करणार्‍यांनादेखील संपूर्ण तिकिट काढावे लागते (तेव्हातरी लागले होते). तरी सगळे हौसेने करत असत. पण माझा सहभाग अगदी नगण्य होता. साधारण ४०-४५ कलावंताचा ताफा होता. मेकप करणे, साड्या नेसायला मदत करणे, हेअरस्टाईल करणे वगैरे भरपूर कामे होती जी वॉलंटियर्सनी वाटून घेतली होती. काहींचे ६०-६५ सेकंदात ड्रेस चेंज वगैरे पण होते. पण करायला एकुणातच मजा आली.

पुढे अजुन १-२ कार्यक्रमांना फुटकळ मदत केली पण कॉलेज व नोकरी यात सगळे मागेच पडले. पुढची संधी मिळाली ती म्हणजे 'तरुण तुर्क म्हातारे अर्क' केले तेव्हा. ते म्हणजे आमचे घरचे कार्य. माझ्या नवर्‍याने दिग्दर्शित केले होते. तेव्हा तालमींचे गणित पहिल्यांदा कळले. त्या तालमी आमच्याच घरी होत. शनिवारी आणि रविवारी सकाळी ७-१० या वेळात. सुरुवातीला नुसतेच वाचन, पात्रे पक्की करणे, त्यानंतर मग एकेक प्रवेश उभ्याने करणे, बरोबरीने पात्रांचे पाठांतर चालूच असते. हे सगळे पूर्णपणे हौशी कलाकार. काही लोकाना देशात किंवा इथे आल्यावर नाटकात/ एकांकिकांमधे काम केल्याचा थोडाबहुत अनुभव असतो. पण सगळे अगदी मनापासून कष्ट करत असतात. ऑफिसची कामे, विकेंडची घरची कामे, पाहुणे, इतर सोशल कमिटमेंट्स हे सगळे सांभाळत तालमी करायच्या म्हणजे खायच्या बाता नव्हेत. काही काही कलाकार तर एकेकवेळा ३०-४० मैलाचा प्रवास करुन तालमींसाठी येतात. त्यातच ऐनवेळी ऑफिसमधे काहीतरी उपटणे, घरची आजारपणे अशी विघ्ने येतात या सगळ्यावर मात करुन सतत ५-६ महिने तालमी करणे सोपे नसते. ही सगळी तारेवरची कसरत सांभाळत कलाकार आणि दिग्दर्शक काम करत असतात. दरम्यान नाटककाराकडून प्रयोगांसाठी परवानगी घेण्यात येते. प्रयोगाच्या साधारण २ महिने आधी बाकीचे तंत्रद्य या टीमला येउन मिळातात. त्यात निर्माता, प्रकाश, संगीत, कपडेपट, मेकप, आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे सेट. सेटसाठीचे सामान गोळा करणे ही एक कसरत निर्माता आणि दिग्दर्शक पार पाडतात. नविन काही बनवायचे आहे जसे दारे खिडक्या तर ते कमी पैशात कसे बनवता येईल ते पहाणे वगैरे येते. नाटकासाठी हॉल मिळवणे, बसण्याची व्यवस्था, संगीत आणि प्रकाश देणारे इक्विपमेंट्स नीट काम करत आहेत का? वगैरे सगळे जाऊन पहावे लागते. ते काम मुख्यतः निर्माता बघतो. नाटक २-३ अंकी असेल तर कधी कधी सहाय्यक दिग्दर्शक असु शकतो. मग तालमीच्या वेळा, ठिकाणे, कोणाकोणाची तालीम आहे हे सगळे तो इमेलमधे पाठवतो. 'तरूण तुर्क' साठी सहाय्यक दिग्दर्शक नव्हता मग ते सगळे काम दिग्दर्शकानेच केले. नाटकातील पात्रांच्या व्यक्तिरेखेप्रमाणे कपडेपट ठरवणे. आपापसात कोणाकडे नसेल तर मित्र-मैत्रिणींकडे चौकशी करुन ते मिळवणे. अगदी लहान लहान गोष्टी ज्या भारतात गृहित धरल्या जातात त्यासाठी इथे प्रचंड आटापिटा करावा लागतो. अगदी सोपे उदाहरण द्यायचे झाले तर नाटकासाठी अगदी साधी घरी वापरण्याजोगी अशी साडी हवी आहे तर भारतात दुकानात जाउन आणणे सहजी शक्य असते पण ते इथे कुणाकडे आहे का हे बघत फिरावे लागते. नऊवारी साड्या वगैरे लागणार असतील तर मग त्या कोणाकडे आहेत का? की भारतातून मागवाव्या लागतील? भारतातून प्रॉप्स आणायचे असतील तर मग कोण जाणारे येणारे आहे का शोधणे. भारतात फोन करुन नातेवाईंकांना ते प्रॉप्स विकत घेण्यासाठी. कोणाकडे नेउन देण्यासाठी तगादे लावणे हे देखील करावे लागते. बहिणाबाई चौधरी यांच्या कवितांवर आधारीत कार्यक्रम केला तेव्हा विहीर, जाते असे आम्ही घरी बनवले होते एका मैत्रिणीने आणि मी मिळून.

आता तालमींना रंग भरायला लागलेला असतो. मग हळूहळू लक्षात येते की अजुन तालमींची गरज आहे, अशावेळी ऑफिस संपल्यावर तालमी होतात. रात्री साधारण ७-७.३० ते १०-१०.३० अशा तालमी चालतात. शेवटच्या २-३ महिन्यात प्रॉपर्टी (सेटचे सामान),संगित यासह तालमी करण्यावर भर असतो. मग एक दिवस रंगित तालीम ठरते. त्यासाठी एखाद्या लायब्ररीचा कम्युनिटी हॉल किंवा एखाद्या अपार्टमेंट कॉम्प्लेक्सचा हॉल असे काहितरी ठरवले जाते. मग सेट, संगित, प्रकाशयोजना, वेषभुषेसह एक किंवा दोन तालमी केल्या जातात. चुकले तरी पुढे जात या तालमी होतात. मग कलकारांची मिटींग होते. त्यात स्वतःचे काय चुकले, काय बदल करता येतील ते ठरवले जाते. संपूर्ण +ve /-ve फीडबॅक यावेळी दिला जातो. दिग्ददर्शक हे नोंदवून घेतो आणि मग पुढील तलमींमधे ते बदल केले जातात.

आता नाटकाचा दिवस जवळ येऊन ठेपतो. आदल्या दिवशी एखादी चक्री घेउन कलाकरांना विश्रांती घेण्यास सांगितले जाते. पडद्यामागच्या कलाकारांची मिटिंग होते. कॉम वर कोण असेल, कोणी कोणत्या कलाकाराला मदत करायची, कोणी सेट बदलायला मदत करायची, कोणी कपडेपट सांभाळायचा हे सगळे पक्के केले जाते. याच दरम्यात प्रयोगाच्या दिवशीचे वेळापत्रक ठरवले जाते. थिएटरवर किती वेळा जमायचे, जेवणाची सोय कोण किती वाजता करणार, पाणी, खडीसाखर वगैरेची व्यवस्था केली जाते.

नाटकाच्या दिवशी आधी स्टेज लावणारे जमतात. हे देखील सगळे व्हॉलंटीयर्सच असतात. आपला सुट्टीचा दिवस मदतीसाठी आलेले. काही लोकांना अनुभव असतो काही अगदी नवशिके असतात. पण उत्साहाने घरचे कार्य असल्याप्रमाणे काम करतात. कलाकार जमतात. थोडे खेळीमेळीचे वातावरण निर्माण करुन ताण कमी करण्याचे प्रयन चालू होतात. मेकपला सुरवात होते. कोण किती माकडासारखे दिसते याची चढाओढ सुरु होते. मग सगळॅ स्टेजवर जमतात. त्या प्रकाशात मेकप कस दिसतो, किती 'रंगवावे' लागेल याचा अंदाज घेउन उरलेला मेकप पूर्ण केला जातो. पहिल्या अंकाच्या पहिल्या प्रयोगाचे कपडे घालून कलाकार तयार होतात. तोवर सेट लागलेला असतो. नटराजाची पूजा होते. नारळ वाढवला जातो आणि सगळे कलाकार आपापल्या पोझिशन्स लक्षात घेउन तयार रहातात. लाईट्स आणि ऑडिओ सांभाळणारे आपापल्या जागी तयार असतात. पडद्यामागचे कलाकार आपापल्या विंगा सांभाळतात. कॉमवरचा माणूस तयार होतो.

हे सगळे चालू असताना प्रेक्षक येतात. नाटक सुरु होण्याआधीच्या तीनही घंटा होतात. तिसर्‍या घंटेनंतर नाटकाची अनाऊन्समेंट होते. पडदा वर जातो नाटक सुरु होते. प्रवेशाप्रमाणे कपडे बदलणे, मेकप टचप करणे, सेट बदलणे हे चालूच असते. प्रेक्षकांचा अंदाज घेत नाटकाचा पहिला अंक संपतो. प्रेक्षक चहा-बटाटेवड्याचा आस्वाद घ्यायला जातात तेव्हा कलाकार पटकन काहीतरी तोंडात टाकून पुढच्या अंकाची तयारी करतात. सेट बदलायचा असेल तर ते काम संपवले जाते. सगळे पुढच्या अंकासाठी सज्ज होतात. तिसर्‍या घंटेनंतर प्रेक्षक येउन बसल्यावर पुढचा अंक सुरु होतो.

नाटक संपते, पडद्यामागच्या, स्टेजवरच्या कलाकारांची सर्वाना ओळख करुन दिली जाते. प्रेक्षक घरी जायला निघतात पण पडद्यामागच्या कलाकारांचे काम अजुन संपलेले नसते. उभा केलेला सर्व सेट मोकळा करुन परत गोडावूनमधे टाकण्यासाठी ट्रक्समधे भरला जातो. प्रेक्षकांकडून कलाकारांचे होणारे कौतुक पहात हे पडद्यामागील कलाकार आपापली कामे करत असतात. थोड्याच अवधीत सगळे रिकामे होते. गाड्या भरतात. निर्मात्याने सोय केलेली असेल त्याठिकाणी सगळे तंत्रज्ञ, कलाकार जेवणासाठी जमतात. मग कोठे काय चुकले, काय छान झाले, पुन्हा प्रयोग झाला तर काय सुधारणा करु शकतो याचा उहापोह होतो. जेवणाच्या कार्यक्रमानंतर सगळे पांगतात. ५-६ महिने चाललेला गोंधळ संपतो. पुढच्या शनिवारी-रविवारी तालमी नसल्यामुळे कदाचीत रिकामे वाटते पण त्यावेळी काहीतरी चुकल्या चुकल्यासारखे होते.

वेगळ्या गावी प्रयोग करायचा असेल तर याला अजुन एक वेगळे वळण येते. प्रत्येक कलाकार आणि ज्या तंत्रज्ञांना जमते ते सर्व आपापल्या खर्चाने प्रयोगाच्या ठिकाणी जातात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे १०-११ एप्रिल २०१०ला झालेली एकांकिका स्पर्धा. एकूण बारा एकांकिका सादर करण्यात आल्या. त्या एकांकिमेधील सर्व कलाकारांचे संच अमेरिकेतील वेगवेगळ्या ठिकाणांहून शिकागोला जमले होते. दोनपात्री ते जवळपास १०-१२ कलाकार असलेल्या या एकांकिका पहाताना त्यांचे कष्ट दिसत होते. नविन जागा, पदद्यामागचे कलाकार माहिती नाहीत असे सगळे असुनही उत्साहाने लोक येतात आणि आपापल्या कला सादर करुन जातात. यात जाणवतो तो त्यांचा उत्साह. नाटक म्हणजे मराठी माणसाचा आत्मा आहे असे म्हणले जाते आणि नाटकांमधे काम करणारे, पहायला येणारे आणि मदत करणारे सगळे लोक पाहिले की ते किती खरे आहे याचा प्रत्यय येतो. येवढे कलाकार स्वखर्चाने कित्येक मैलांचा प्रवास करुन लोकांपुढे कला सादर करायला तयार असतात यातच सर्व आले. काहींन बक्षिसे मिळाली. कांहिंच्या खांद्यावर प्रेक्षकांकडून, परिक्षकांकडून कौतुकाची थाप पडली पण आनंद सगळ्यांनाच मिळाला.

आता हे सर्व अगदी असेच होते का? तर नाटका-नाटकाप्रमाणे थोडेफार बदल होतात पण एकून ढाचा असाच. कधी कधी एखाद्या कलाकाराचा सुप्त गुण कळतो. कधीकधी अचानक एखादा स्टेजच्यामागे मन लावून काम करणारा कलाकार सापडतो. दिग्दर्शक कसे विचार करतात, त्यांनी प्रेक्षकांची नस कितपत ओळखलेली असते हे कळते. त्यांची विषयावरची पकड जाणवते. सुदैवाने मला खरोखर चांगल्या दिग्दर्शकांचे काम बघायची संधी मिळाली. स्वतःला मुख्य भुमिका करायला मिळावी म्हणून दिग्दर्शन करणारेही असतात असे ऐकले आहे पण सुदैवाने पाहिले नाहीये.

आता यात माझा सहभाग किती आणि कोणता? तर आमच्या घरी तालमी असतील तर सर्वांना चहा करुन देणे. आणि कधीमधी त्यांच्या खाण्यासाठी काहीतरी करणे. नाटकाच्यादिवशी पडेल ती मदत करणे. संधी मिळाली तर मेकप करणे, कपडेपट सांभाळणे. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे नवरा कलाकार/निर्माता/दिग्दर्शक/पडद्यामागचा कलाकार काहीही असला तरी त्याला जमेल तशी मदत करणे.

मी आत्ता पर्यंत पडद्यामागे काम केलेली नाटके व इतर कार्यक्रम -
खेळ मांडियेला (मराठी नाच-गाण्यांची एक मस्त गुंफण असलेला कार्यक्रम)
तरूण तुर्क म्हातारे अर्क
कृष्णरंग (कृष्णाच्या जीवनातील प्रसंगांवर आधारीत गाण्यांबर बसवलेला नाचांचा कार्यक्रम)
ऑपुंशिया (एकांकिका)
बेगर्स लाईफ
माह्य मनगत (बहिणाबाई चौधरी यांच्या कवितांवर आधारीत, संपूर्ण खानदेशी भाषेत कार्यक्रम साहित्य संमेलनात सादर केला गेला)
Parikrama: the Mystic Journey - भारतीय लोकनृत्याचा कार्यक्रम
दुर्गा झाली गौरी
पोपटपंची
आणि इथुन पुढे येतील ती नाटके Wink

तुमचे अनुभव असतील तर जरुन शेअर करा.

गुलमोहर: 

छान लिहीलयस ग मिनोती.
माझा नाटकाशी संबंध येतो ते नाटक बघण्यापुरताच. पण सगळे व्याप सांभाळून अशा लष्काराच्या भाकरी भाजणार्‍या सगळ्या नाटकप्रेमींचे खूप कौतुक वाटते मला.

लेख छानच. आमच्या मंडळात दोन वर्षांपूर्वी आसं रामायण (आधुनिक संगीत रामायण) बसवलं होतं, तेव्हा तालमी करताना आलेली सगळी मजा आठवली. (नाटकात भूमिका करत नसलो तरीही ;))

नटून थटून नाटकाला जाताना, मध्यंतरात वडे / चहा चापताना, तिथे भेटलेल्यांशी गप्पा मारताना कल्पना पण येत नाही की या सगळ्यामागे केवढे परिश्रम, केवढं नियोजन असते.
मस्त लिहिलंयस.

मिनोती, तुम्हा सर्वांचं अभिनंदन. ईथे अलिकडेच 'जावई माझा भला' चा प्रयोग झाला. त्यात प्र भु विक्रम गोखल्यांनी केली होती. बाकीच्या भुमिका लोकल कलाकारांनी केल्या होत्या. खुप छान झाला प्रयोग. ईथे बरेचदा सुरुवातीचे वाचन स्काईप, मेसेंजर वर करतात त्यामुळे येण्याजाण्याचा वेळ वाचतो.

सगळ्यांचे आभार. सगळे इतक्या उत्साहाने करतात की त्यांना मदत करावीशी वाटते. मी इथे खुप लोकांचा सूर असा ऐकला की लोकल लोकांच्या कार्यक्रमाचा दर्जा यथातथाच असतो त्यामुळे आम्ही जात नाही. त्यांना लोकल लोकांचे कष्ट कळावेत म्हणून हा लेख.
लोकाल लोकांचे सगळेच कार्यक्रम दर्जेदार असतील असे नाही पण बरेचसे असतात (निनाद बे एरियामधे तरी). त्यांचे कौतुक करायला लोकही येतात अगदी लांबलांबून.
मायबोलीवर नाटकांमधे काम करणारे खुप असतील असे वाटले तर त्यांचे अनुभव देखील वाचायला आवडतील.

वा वा सहीच.. Happy
मला पुरुषोत्तम, फिरोदिया आणि कॉलेज गॅदरींगचे दिवस आठवले.. मी कधी ऑनस्टेज नाही केलं.. बॅकस्टेज केलं तीनवर्ष.. आपला हिम्या पण असायचा.. अशक्य धमाल असायची..
प्रॅक्टीस, सेट बनवणं, फिरोदियाचे इव्हेंट्स ठरवणं, ते लोकांना शिकवणं, जे लोकं स्टेजवर करणार आहेत त्यांच्याकडून प्रॅक्टीस करून घेणं, ह्या सगळ्या दरम्यान होणारा दंगा, टाईमपास, मतभेद (भांडणं नाही बर्का. Wink ) आणि मग बक्षिसे मिळाल्यानंतर मिळालेल्या पार्ट्या सगळं अगदी मनापासून एंजॉय केलं तेव्हा..

तिसर्‍या घंटेनंतर नाटकाची अनाऊन्समेंट होते. पडदा वर जातो नाटक सुरु होते >>>>> मला अजूनही त्यावेळच्या नाटकांच्या सिड्या बघताना अनाउंन्समेंट आणि पडदा उघडताना अंगावर काटा येतो.. Happy

जमेल तशी मदत करणे.>>>> कोणत्याही बॅकस्टेज कलाकाराला हेच महत्त्वाचं असतं.. !!!

असो.. फारच मोठी झाली कमेंट.. धन्यवाद मिनोती जुन्या आठवणी काढल्यबद्दल .. Happy

मस्त लेख!
एकदम पटला. सही मजा येते नाटक बसवण्यात आणि तालमीना पण. सगळी व्यवधानं सांभाळून तालमी करणं म्हणजे तारेवरची कसरत पण नाटकावरील प्रेमामुळे सगळं जमतं. एक प्रकारची नशाच आहे नाटक म्हणजे. आणि नाटक घेऊन दुसर्‍या शहरात जाणं पण एक अनुभव असतो.

मी एक कविता केली होती या अनुभवावर पण statistics च्या भीतीने टाकत नाही. Happy

मस्त लेख मिनोती.
नाटक/ गाण्याचे कार्यक्रम (आणि तदनुषंगीक वाद) काव्यगत न्यायाने देशात आल्यावरच बंद झालेत. एवढी उरस्फोड करुन कोणी काही करायला पहात नाही.

मिनोति,
सगळे अनुभव वाचून छान वाटल .
तुझं, तुझ्या नवर्‍याचं आणि भाग घेतलेल्या सगळ्यांचं अभिनंदन !
बेक्स्टेज पूर्व तयारी, छोट्या छोट्या गोष्टींची जमवा जमव आणि नेपथ्य खरच खूप मोठी जवाबदारी आहे, इथे तर सगळं टाइम बाउंड्री वर मिळवायचं म्हणजे भरपूर शोधा शोध !
नाटकाशी जोडलेल्या सगळ्याच कलाकारांचं कौतुक.. कसलीही आपेक्षा नसताना आपले व्याप सांभाळून उत्साहानी केवळ नाटकाच्या प्रेमा साठी येतात , सही लोक आहेत !
मी लहानपणी प्रोफेशन्ल बाल नाट्यां मधे काम केलं होतं ते दिवस अजुन आठवतात.
ज्या दिवशी आमचं नाटक होतं त्या दिवशी ३१ ऑक्टोबर ला नेमकी इंदिरा गांधीची हत्या झाली, मग नाटक संपल्या संपल्या सगळी धाव पळ , पटापट सगळं गुंडाळून निघायला सांगितलं होतं दंगल होण्या आधी.
कॉलनीच्या गणपती उत्सवात दर वर्षी भाग घ्यायला पण सॉलिड मजा यायची.. नाटक संपलं कि ते सगळं वातावरण जाम मिस करायचो सगळे !:)

सुरेख लिहिलय. आवडल एकदम . शाळेत असताना मी "सिंधु" चा रोल केलेला. नऊवारी साडीचा पोंगा आवरु पर्यंत नाकीनऊ आलेले. Proud बर्‍याच मराठी पिक्चर मध्ये असतात ते भालचंद्र कुलकर्णी आमच्या शाळेत इंग्रजीचे शिक्षक होते. फार चांगले होते. तेच शाळेत नाटक वगैरे बसवायचे. आमचा सगळ्याच बाबतीत आनंद होता पण तरीही बरेच पेशन्स ठेवुन काम करवुन घेतलेल त्यानी. तेही पडद्या मागचे खर्‍या अर्थान सुत्रधार होते. आणि इतके डिव्होटेड असायचे. लेख वाचुन त्यांचीच आठवण झाली एकदम.
काल प्रिंट आउट मारली आणि रात्री वाचुन काढला सगळा लेख. Happy

मिनोति,

मस्तच लिहलयस. मला बरेच दिवसांपासुन खुप उत्सुकता होति नाटक कस हळुहळु आकार घेत जात त्याचि, बॅकस्टेज बद्दल खुप वाचलय्/ऐकलय त्यामुळे. तु तो प्रवास अगदि सहि सहि आमच्यापर्यतं पोहचवलास.

आता हे सगळ प्रत्यक्ष पाहाण्याचि उत्सुकता आहे, कला ला एक नवशिक्या आणि (फक्त) उत्साहि मदतनिसाचि गरज आहे का?

मिनोती... यात आणखी एक नवीन प्रथा....

Conference Call वर सगळ्या पात्रानी येऊन संवादांची तयारी करणे...
आम्ही नाटक करतो तेव्हा हे बर्‍याच वेळा करावे लागते. कामाच्या दिवसात प्रवास करून एकत्र येणं शक्य नसतं तेव्हा अश्या तालमी घेतो. मागच्या वेळी 'राम रानडे' आमच्या एका नाटकात होते, ते भारतातून खरंतर सुट्टी साठी आले होते. त्यांना खूप गम्मत वाटली, आमची असली तालीम बघून...

हल्ली बर्‍याच साईट फुकट Conference Call ची सवलत देतात.
आम्ही तर शेवटी शेवटी म्युझिकवाल्याला देखील Conference Call वर घेऊन तालमीत घेतो.

बाकी दरवर्षी ८-१० मुलांना घेऊन नाटक करतो. त्याबद्दल कधीतरी...

मालवणीत दशावतारी कलाकारांना (रात्रीचो राजा, सकाळी कपाळार बोजा) असं म्हटलं जातं. तसंच काहीतरी....

विनय Happy

रैना, पराग, झेलम, विनय, भाई, आरती(रार), अनुदोन तुम्ही पण लिहा. कारण तुम्ही काय वेगळे करता ते आम्हालाही वाचायला आवडेल.

बाकी सर्वांना धन्यवाद.

रमा, उत्साही कलाकार नेहेमीच लागतात. पुढच्यावेळी नक्की कळवेन Happy

विनय, इकडेही होतात तलमी कॉन्फरन्स कॉलवर पण त्याला लिमिटेशन असतेच ना. त्यामुळे एकत्र मिळुन प्रॅक्टीस करणे याला तो पर्याय होत नाही.

मिनोती, छान लिहले आहे. अनेकांचे अनुभव असतील ते पण वाचायला आवडेल.
मी लहान पणी कधी नाटकात काम केल्याचे आठवत नाही. नाही म्हणायला बडे नावाचे कोणी हे आमच्या शाळेत येउन ३ नाटके बसवली होती. त्यात पण आम्ही राखीव दलात असल्याने काहीच काम नव्हते.
वर मिनितीने उल्लेख केलेल्या ’तरुण तुर्क …’ नाटकच्या निमित्ताने नाटक ह्या प्रकाराशी जवळुन संबंध आला होता. अर्थात मी पण बॅकस्टेजला मदत करत होतो. खरेतर तो अनुभव खुप सुखद होता. आमचे दिग्दर्शक यांचा सगळा अभ्यास एकदम तयार होता. प्रत्येक सेकंदाला स्टेजवर आणि स्टेजच्या पाठीमागे काय व्हायला हवे हे डोक्यात आणि कागदावर तयार होते. आणि निर्माता –दिग्दर्शक यांचा उत्तम सुसंवाद. ह्यामुळे सर्व तंत्रज्ञ, बॅकस्टेज कलाकार आणि नाटकातील कलाकार यांचे काम खुप सोपे झाले होते. त्या अनुभवा नंतर कळाले की रंगमंचावरील कलाकार जरी प्रेक्षकांसमोर असतील तरी त्यांना प्रत्येक क्षणाला इतरांवर अवलंबुन रहावे लागते. प्रकाश योजना, ध्वनी, आणि इतर. अगदी नाटकातील प्रवेश संपल्यावर स्टेज मागे आले की सगळा अंधार असतो त्यावेळी त्यांच्या रस्त्त्यात काही असायला नको तसेच त्यांच्या पुढच्या प्रवेशाची तयारी काही मिनिटात होणे आवश्यक असते. नाटकच्या तयारीबद्दल सांगायचे तर सगळेच कलाकार आंणि तंत्रज्ञ हे घरचे कार्य असल्यागत झपाटल्याप्रमाणे काम करतात. .....
….अजुन खुप काही सांगण्या सारखे आहे पण नाट्य निर्मिती प्रक्रिया ही एकदातरी सक्रिय सहभागासहीत अनुभवावीच आणि त्यात दिग्दर्शक तयारीचे सारखे असतील निखळ आनंद.
मिनोती, मी पण परत काम करायला तयार आहे. काही संधी असेल तर जरुर कळव, मी संबंधिताशी संपर्क करीन.

खरंच, नाटक यशस्वीरित्या समोर येतं तेव्हा त्यामागे किती लोकांचे orchestrated परिश्रम असतात! Lights, music, sets, props, costumes, make up या सगळ्याकरता प्रयोगाच्या खूप आधीपासून मदत करणारे, विचारांचं, कल्पनांचं योगदान देऊन मदत करणारे, प्रत्यक्ष त्या दिवशी काम करणारे अशा कितीतरी जणांची यात भूमिका असते. प्रत्यक्ष प्रयोगाच्या वेळी यातल्या एकाने जरी चूक केली तरी एकदम सॉलिड पोपट होऊ शकतो! यातल्या प्रत्येकाला ते नाटक आपलंसं वाटत असतं याच एका भावनेने तो काम करत असतो. हौशा नवशांचं म्हणूनच काकणभर जास्त कौतुक वाटतं. काहीही मोबदला नसताना जीवाचा आटापिटा करून केवळ 'खाज' म्हणून हा उद्योग चालू असतो Happy

­

आवडेश....

वर पग्यानी माझा उल्लेख केलाच आहे.. तरी पण थोडी शाई सांडतोच...

कॉलेजला असताना ३ पुरुषोत्तम आणि ३ फिरोदिया केले बॅकस्टेज म्हणून... आणि पुढचीही काही वर्षं जातोच आहे कॉलेज मध्ये.. ती जी धुंदी असते ना काम करण्याची ती परत परत अनुभवण्यासाठी...

तोच नेहमीचा गोंधळ.. उद्या शो आहे तरी आदल्या दिवशी पर्यंत काहीच न झाल्याची जाणीव... आता जी आजची रात्र आहे त्यात उरलेली सगळी कामं संपवायची आणि परत दुसर्‍या दिवशी शोसाठी पण सगळी उर्जा राखून ठेवायची.... हे सगळे प्रकार... बर्‍याच वेळेस अभ्यास करायचाय म्हणून नाही तर सेट संपवायचा आहे म्हणून मारलेल्या नाईटस..

प्रत्यक्ष शो मधे नसणारे सगळेच बॅकस्टेज असायचे आणि ते सगळे प्रत्यक्ष शोच्या वेळेस वेगळ्याच भूमिकेत शिरायचे... भरत मध्ये बसून बेंबीच्या देठापासून ओरडून आख्खं भरत हालवायचं काम त्यांच्याकडे असायचं.. आणि तो बाहेरुन येणारा आवाज पडद्याच्या मागे असलेल्या टीम साठी संजिवनी असायचा.. त्याच आवाजाच्या गदारोळात तिसरी घंटा ऐकायची आणि पाच.. चार.. तीन.. दोन.. एक.. असा आवाज देत पिटात बसलेल्या साउंडवाल्याला 'म्युझिक' असा इशारा द्यायचा... आणि त्याच बरोबर योग्य तो क्लू घेत पडदा वर घ्यायला सांगायचा.. पडदा वर जाता जाता बाहेरचा सगळा आवाज बंद होत एकदम शांतता आणि सगळ पब्लिक नाटकात समरस....

असाच एक किस्सा आहे...
कॉलेजच्या एका नाटकात 'We don't need no Education' हे गाणं घेतलं होतं.. तेव्हाचा आमचा संगीत दिग्दर्शक म्हणाला की ह्या गाण्यात जो कोरस आहे तो सगळ्यांनी म्हणा... तालीम चालू असताना हॉल मधे असलेले सगळेच जण हे गाणं चालू झालं की कोरस देत असत...
प्रत्यक्ष प्रयोगाच्या वेळेस जे कोणी जास्तीच बॅकस्टेजवाले होते ते सगळे मुद्दामच विखरून बसले होते... आणि हे गाणं सुरु झालं तसं कोरसच्या वेळेस प्रेक्षकांत बसून आमच्या सगळ्यांचा कोरस.. आणि आजूबाजूचं सगळं पब्लिक आवाक... आणि सगळ्यात जास्त आवाक आमचे मुख्याध्यापक(माझ्याच पुढच्या खुर्चीवर बसले होते)....

मिनोती, खूप प्रामाणिकपणे लिहिलं आहेस. शिवाय एकूणच नाटक काय किंवा कोणताही कार्यक्रम बसवताना त्याच्यामागे जे परिश्रम असतात ते लोकांपर्यत पोचवण्याच्या ज्या उद्देशानं लिहिलं आहेस त्याबद्दल धन्यवाद Happy

नाटक किंवा कोणताही कार्यक्रम उभा करणं ही एक नशा असते... ते २-४ महिने डोक्यात एक झिंग असते खरं तर... एक किक !
माझ्या दुर्दैवानं नाटकाचे लेखन, दिग्दर्शन, अभिनय, नेपथ्य, संगीत, प्रकाशयोजना, overall management हे विविध विभाग सांभाळू शकतील इतकी माणसंच मिळाली नाहीयेत मला कधी !
अगदी कॉलेजच्या दिवसापासून ते आजपर्यंत रंगंचावर अभिनय करण्यासाठी माणसं मिळवण्याची मारामार, बॅकस्टेज वगैरे साठी लोकं मिळणं हे फार दूरची गोष्ट. त्यामुळे बहुतेक वेळा दिग्दर्शन, अभिनय, नेपथ्य, संगीत (अभिनय करायला रंगमंचावर असल्यानं प्रकाशयोजना सांभाळताच येत नाही !) या सगळ्याची जबाबदारी माझ्यावरच येते. सुदैवानं नव-यामधे अतिशयच उत्तम communication आणि management skills आहेत. त्यामुळे तालीमी, लोकांची availability, बाहेरगावी प्रयोग असेल तर तिथली व्यवस्था यापैकी कोणत्याही गोष्टीकडे मला पाहावं लागत नाही.
हळुहळू मित्रमंडळीतले गुण ओळखून, त्यांना नवीन काही शिकवत- त्यांच्याकडून नवीन काही शिकत, थोडक्यात `ज्याच्यात जे चांगलं आहे त्याचा विकास व्हावा आणि त्या व्यक्तीकडून इतरांनाही नवीन काही शिकायला मिळावं' या उद्देशानं आम्ही आमची एक लहानशी टीम तयार केलीये. आता निदान माझ्या एकटीवर असलेली जबाबदारी मी अजून २-३ विश्वासू आणि मुख्य म्हणजे तळमळीनं काम करणा-या या मित्रमैत्रीणीवर टाकू शकते.
प्रामाणिकपणे सांगायचं तर जितकी इच्छा आहे आणि क्षमता आहे तितकं काम घडलं नाहीये अजून माझ्याकडून इथे अमेरिकेत आल्यापासून. माणसांचा अभाव खूप जाणवतो अशावेळी. पण काही विचार आहेत - डोक्यात कल्पना आहेत.. जशी जशी माणसं तयार होतील, टीम सगळे विभाग सांभाळायला तयार होईल, तसं तसं एक एक प्रोजेक्टने आकार घ्यावा अशी प्रामाणिक इच्छा आहे !

एक दिग्दर्शक म्हणून आलेले अनुभव लिहायचे म्हणले तर एक वेगळा लेख होईल. इथे तुझ्या लेखापेक्षा माझी पोस्ट मोठी होणार नाही ना ही धास्ती आहे ! तसं झालं तर प्लीज माफ कर Happy
पण एकुणच मला असं वाटतं की इथे (निदान ज्या लोकांबरोबर मी आजवर काम केलंय) त्या लोकांना नाटक तर करायचं असतं पण त्यांनी दुस-यानी केलेली नाटकं पाहिलेली नसतात. मी नाटकातल्या माझ्या कलाकारांना माझ्या आई-वडिलांनी लहानपणापासून `नकळत' शिकवलेली एक गोष्ट नेहेमी सांगते - रंगमंचावर वावरायचं असेल, किंवा एखाद्या कार्यक्रमात छोटसं निवेदन करायचं असेल.. थोडक्यात ४ लोकांसमोर येऊन स्वत:ला सादर करायचं असेल तर - लोकांनी केलेलं काम, नाटकं , कार्यक्रम, सादरीकरण बघायचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. समोरच्याचं काम चांगलं असेल तर शिकण्यासारखं असतंच, पण चांगलं नसेल तरी शिकण्यासारखं असतं आणि ते म्हणजे ’आपण स्वत: stage वर गेल्यावर काय करायचं नाही’ हे आपल्याला कळतं.. आणि काय करावं ह्या इतकंच काय करू नये हे खूप महत्वाचं असतं !
गेल्या काही वर्षात अजून एक गोष्ट मला जाणवली आहे ती म्हणजे कॉलेज मधे किंवा समवयस्क लोकांची नाटकं बसवणं आणि आपल्यापेक्षा वयानी मोठ्या असलेल्या लोकांचं नाटक बसवणं या दोन प्रक्रीयेमधे खूप फरक आहे. ग्रुपमधे वयाने सगळ्यात लहान असताना आपल्या वडिलांपर्यंत सगळ्या वयोगटातल्या माणसांना घेऊन नाटक बसवणं हा खूप मानसिक ओढाताण करणारा अनुभव आहे, चॅलेंजिंग आहे असं मला वाटतं अशा वेळी... पण एकूणच challenging गोष्टी करायला मला आवडतात ! Happy

पण तरीही एकूण नाटक बसवणं ही धमाल असते हेच खरं... त्या अनुभवांची खरी किंमत प्रयोग संपल्यानंतर - आता उद्यापासून तालमी नाहीत- अशी हुरहुर लागलेल्या अवस्थेत घरी परतताना जाणवते ! माझे तर अजूनही इतक्या प्रोजेक्ट्स नंतरही नव्याने डोळे ओले होतात दरवेळी !

माझ्या बाबांना जेव्हा आदर्श शिक्षकाचा राष्टीय पुरस्कार मिळाला तेव्हा सुधीर गाडगीळने त्यांच्या घेतलेल्या मुलाखतीत एक प्रश्न विचारला होता
रामभाउ, तुम्ही मुलांना शाळेत शिकवता कधी आणि नाटकं कधी करता.. या दोन्ही गोष्टी सांभाळता कशा ? ”
त्यावर बाबांनी दिलेलं उत्तर होतं ’ सुधीर, मी नाटकात काम करतो.. कामाचं नाटक करत नाही’ !

नाटक बसवताना किंवा कोणताही कार्यक्रम उभा करताना माझ्या डोक्यात बाबांनी त्यांच्याही नकळत दिलेली ही शिकवण असते, आणि डोळ्यासमोर सकाळपासून रात्री-अपरात्री पर्यंत आईच्या हातचा चहा पिण्यासाठी येणा-या नाटकमंडळींसाठी कधीही न थकता, न कुरकुर करता प्रसन्न मनानी आणि चेह-यानी चहा करणारी आई... आणि जोडीला संख्येने कमी असली तरी मनापासून काम करणारी माझी टीम ! Happy

नाटक.. नाटक.. विषय असा आहे की लिहायला लागले तर खूपच लिहिन म्हणून आवरतं घेते. पण एकूणच 'एकदा तरी करून आणि जगून पाहायला हवं एक तरी नाटक' असा अनुभव असतो हे मात्र खरं ! Happy

मराठी माणूस आणि नाटक, हे समीकरणच आहे. शाळेत असताना बर्‍याच नाटकात कामे केली होती, पण आम्ही हिरो (नाटकाचे) आमचे शिक्षकच बॅक स्टेज संभाळायचे. माझ्या शिक्षिका तर माझे केस पण विंचरुन द्यायच्या, त्या वेळी शाळेच्या बाहेर पण आम्हाला प्रयोग करावे लागले होते. आता काय करतात माहीत नाही, पण त्यावेळी मिशी चिकटवायला स्पिरिट गम असे, भयंकर जळजळ व्हायची त्याने.
मेकप केल्यावर चेहरा आरश्यात बघवत नसे, इतका गुलाबी रंगवलेला असे.
पुढे काही एकपात्री प्रयोग पण केले. पण पुढे अभ्यासाच्या मागे लागल्याने, हे सगळे सुटले.

पंडितराव नगरकर आमचे नातलग असल्याने त्यांची बहुतेक संगीत नाटके मी विंगेतूनच बघितली आहेत. त्या वातावरणाचा फील काही वेगळाच. अनेर्क जेष्ठ कलाकाराना प्रत्यक्ष भेटलो, आणि त्यांच्या साधेपणाने भाराऊन गेलो.
माझी आत्या, अलका आचरेकर पण नाटकाच्या बर्‍याच गमतीजमती सांगत असे. जेवल्यावर तिची मैफीलच असे.
शुभांगी गोखले, सध्या लोकसत्तामधे असेच एक सदर लिहित आहे.
काय वेड घेऊन हि माणसे नाटक आणि त्याचे दौरे करत असत. मागे लोकप्रना मधे वंदना गुप्ते आणि जयमाला शिलेदार यानी पडद्यामागच्या बर्‍याच कहाण्या लिहिल्या होत्या. खुप रोमांचक होत्या त्या.

रार, मस्तच लिहिले आहेस ग. इथे येणार्‍या अडचणी वेगळ्याच. प्रकाशयोजना आणि संगित यासाठी माणूस मिळाला तरी खुप झाले इतकी वेळ येते कधी कधी. पण ती सगळी प्रोसेस पुनःपुन्हा जगावी मात्र नक्की वाटते.

विनय तुम्ही ते मुलांच्या नाटकाचे लिहीणार होतात ते लिहा.