वेदांतील गणेशाचे स्थान

Submitted by शैलजा on 4 September, 2008 - 01:41

प्रचलित हिंदू धर्मामध्ये ज्या पाच दैवतांची पूजा प्रामुख्याने रुढ आणि लोकप्रिय झाली, त्यातील एक दैवत म्हणजे श्री गणेश. जनमानसांत गणपतीचे श्रद्धास्थान अढळ आहे. प्राचीन काळात वेदांमधेही गणपतीची स्तुती करणारे, स्तवनपर मंत्र रचलेले आढळतात.

ऋग्वेदामध्ये गणपतीला बृहस्पती, वाचस्पती आणि ब्रह्मणस्पती या नावाने संबोधलेले आहे. ब्रह्मणस्पतीस ऋग्वेदात महत्वपूर्ण स्थान असून, त्याला सर्व मांगल्याचे परम निधान, सर्व ज्ञानाचा निधी, सर्वश्रेष्ठ देव आणि सर्व वाड्गमयाचा अधिष्ठाता आणि स्वामी मानलेले आहे. अकरा सूक्तांमधे ब्रह्मणस्पतीची स्तुती रचलेली असून, त्याची कृपादृष्टी आपल्यावर रहावी म्हणून मंत्र रचलेले आहेत.

उदाहरणार्थः

ब्रह्मणस्पतये त्वमस्य यन्ता सूक्तस्य तनयं च जिन्व l
विश्वं तद्भद्रं यदवन्ति देवा बृहद् वदेम विदथे सुवीरा: ll

अर्थात, हे मंत्र सूक्तांच्या अधिपती, तूच या जगाचा पालक, शास्ता आहेस, मी/ आम्ही रचलेले हे (तुझ्या स्तुतीपर) सूक्त जाणून घे (मान्य कर) आणि माझ्या/ आमच्या संततीला प्रसन्नता प्रदान कर. तुझ्यासारखे देव ज्यांचे रक्षण करतात, त्यां सर्वांचे सतत भलेच होते. आम्ही या जीवनात (जीवन यज्ञात ) सुंदर, सुदृढ पुत्र पौत्रांसहीत तुझी स्तुती, गुणगान करतो.

अश्या ह्या ब्रह्मणस्पतीची कृपादृष्टी विद्या मिळवून देते आणि विघ्नांचा नाश करते, हे सांगताना ऋषी म्हणतात,

न तमंहो न दुरितं कुतश्चन नारातयस्तितिरुर्न द्वयाविनः l
विश्वा इदमस्माद् ध्वरसो वि बाधसे यं सुगोपा रक्षसि ब्रह्मणस्पते ll

अर्थात, हे ब्रह्मणस्पते, तू ज्यांचं रक्षण करतोस, त्यांना कोणत्याही प्रकारचे दु:ख किंवा त्रास अथवा पीडा होत नाही. शत्रू त्यांची कुठेही हिंसा करु शकत नाही, (एवढेच नाही तर), त्यांच्या कार्यांमधे कोणत्याही प्रकारचे विघ्न त्यांना बाधू शकत नाही. सर्व त्रासांपासून, हे ब्रह्मणस्पते, तू आपल्या भक्तजनांचे सदैव रक्षण करतोस.

तद्देवानां देवतमाय कर्त्वमष्नथ्नन् इळहासव्रदन्त वीळिता l
उद् गा आजदभिनद् ब्रह्मणा वलमगूहत्तमो व्यचक्षयत्सवः ll

सर्व देवांमधे श्रेष्ठ असा जो देव ब्रह्मणस्पती, कठीण असे पर्वत आपल्या बलाने विदीर्ण करु शकतो आणि जे काही कठोर आहे त्याला कोमल बनवू शकतो. ज्ञानरुपी प्रकाशाचं वरदान देऊन आणि आपल्या वाग् रुपिणी शक्तीच्या सहायाने अमंगल आसुरी शक्तींचा/ प्रवृत्तींचा नाश करुन, अज्ञानरुपी अंधकार दूर करतो.

ऋग्वेदात गणपतीला आदिदेव मानले आहे - सर्वप्रथम उत्पन्न झालेला आणि अक्षरसमूहांचा पालक, स्वामी. गणपतीची उत्पत्ती कशी झाली ह्याचे वर्णन पहा,

बृहस्पति: प्रथमं जायमानो महो ज्योतिषः परमे व्योमन् l
सप्तास्यस्तुविजातो रवेण वि सप्तरश्मिरधमत्तमांसि ll

(सर्व संसाराचा स्वामी) बृहस्पती, परम व्योमरुप शक्तीच्या महान तेजापासून* सर्वप्रथम उत्पन्न होऊन सात स्वररुपी मुख/मुद्रा धारण करुन, आणि सप्तरश्मी वा सात वर्णांची विविध रुपं ( अ, क, च, ट, त, प, य) धारण करुन नादरुपाने अज्ञानरुपी अंधार दूर करतो.

*गणेशपुराणात गणपतीला गौरीतेजोभू: म्हटले आहे. ऋग्वेदात वर्णन केलेली व्योमरुप शक्ती म्हणजेच भगवान शिवाची शक्ती- चित् शक्ती वा चित्कला.

ॠग्वेदात, अमंगल, अलक्ष्मीचा नाश करण्यासाठी आणि यज्ञाचे रक्षण करण्यासाठी गणपतीला आवाहन केलेलेही आढळते.

चत्तो इतश्चत्तामुतः सर्वा भ्रूणान्यारुषी l
अराय्यं ब्रह्मणस्पते ती़क्ष्णशृंड्गोदृषन्निहि ll

अर्थात, ही अलक्ष्मी ह्या लोकातून (पृथ्वी) तसेच त्या लोकातूनही (स्वर्ग) नष्ट होवो, जी समस्त अंकुरांना (भ्रूण), औषधींना नष्ट करते. हे तीक्ष्णदंत ब्रह्मणस्पते, तू ह्या अलक्ष्मीचा नाश कर.

गणानां त्वा गणपतिं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमम् l
ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आ नः श्रृण्वन्नूतिभि: सीद सादनम् ll

हे ब्रह्मणस्पती! तू देवाधिदेव - गणपती असून कवींमधे / विद्वानांमधे सर्वश्रेष्ठ असा कवी आणि विद्वान आहेस. तूच ब्रह्म अर्थात अन्न, आणि उत्तम कर्मांचा रक्षणकर्ता आहेस. हे ज्येष्ठराज*, आणि मंत्रसमूहाचा (असा तू जो ) स्वामी, मी तुझे आवाहन करत आहे. आम्ही केलेली स्तुती ऐकून (मान्य करुन), आमच्या ऱक्षणार्थ, आम्ही करत असलेल्या यज्ञात उपस्थित रहा.

*सर्वात आधे उत्पन्न झालेला, सर्वांपे़क्षा ज्येष्ठ, देवतांचा राजा ह्या अर्थाने.

शुक्ल यजुर्वेदामध्ये गणपती हा रुद्राच्या गणांचा अधिपती आहे (रुद्रस्य गाणपत्यम्) हे सांगणारा संदर्भ आहे. वैदिक वाड्गमयांत गण हा शब्द लोक, देव आणि मंत्रसमूहाला उद्देशून वापरलेला दिसतो. त्यांचा अधिपती तो गणपती.

गणानां पति: गणपति: l
महत्तत्त्वगणानां पति: गणपति: l किंवा
निर्गुणसगुणब्रह्मगणानां पति: गणपति: l

गणेश याही शब्दाचा अर्थ आहे - जो समस्त जीवांचा ईश अथवा स्वामी आहे.

गणानां जीवजातानां यः ईशः -स्वामी स गणेशः l

शुक्ल यजुर्वेदामध्ये गणपतीची वेगवेगळ्या नावांनी स्तुती केलेली आढळते. उदाहरणासाठी हे मंत्र पहा :

नमो गणेभ्यो गणपतिभ्यश्च वो नमो नमो व्रातेभ्यो व्रातपतिभ्यश्च वो नमो नमो गृत्सेभ्यो गृत्सपतिभ्यश्च वो नमो नमो विरुपेभ्यो विश्वरुपेभ्यश्च वो नमः ll

शुक्ल यजुर्वेद माध्यंदिन संहितेतला

गणानां त्वा गणपति हवामहे प्रियाणां त्वा प्रियपति हवामहे, निधिनां त्वा निधिपती हवामहे l वसो मम ll आहमजानि गर्भधमा त्वमजासि गर्भधम् ll

हा एक प्रसिद्ध मंत्र असून अश्वमेध यज्ञात गणपतीचे आवाहन करण्यासाठी ह्या मंत्राचा विनियोग करण्यात येत असे. या मंत्राचा साधारण अर्थ असा, हे माझ्या जिविताचे रक्षण करणारा असा तू ईश्वर, सर्व गणांचा असा तू स्वामी, तुझे आम्ही आवाहन करतो. सर्व प्रियांचा प्रिय अधिपती, आणि सर्व निधींचा निधीपती आम्ही तुझे आवाहन करतो. तू सर्व ब्रह्मांडरुपी गर्भाचा पोषणकर्ता आहेस, मलाही (तुझ्या कृपेने) प्रजारुपी गर्भाचा पोषणकर्ता बनू दे.

कृष्ण यजुर्वेदात मैत्रायणी संहितेत गणेशाचे गायत्री मंत्र आढळतात.

तत्पुरुषाय विद्महे वक्रतुंडाय धीमहि l तन्नो दन्ती प्रचोदयात् ll

अथर्ववेदामधील गणपती अथर्वशीर्ष तर प्रसिद्धच आहे व आजही गणपतीच्या पूजापाठात त्याचा विनियोग होतो. गणपतीबद्दल प्रचलित लोकश्रद्धा लक्षात घेऊन, अथर्ववेदांतर्गत गणपतीच्या स्तुतीपर चार उपनिषदे रचली गेली.

गणपत्युपनिषद् (अथर्वशीर्ष ) - रचयिता गणक ऋषी
हेरंबोपनिषद् - स्वतः भगवान् श्रीशंकराने पार्वतीला सांगितले
वरदा पूर्व - रचयिता याज्ञवल्क्य ऋषी
उत्तर तापिनी उपनिषद् -रचयिता रुद्र ऋषी

ह्या उपनिषदांमधून श्री गणेश रुपाचे वर्णन (अथर्वशीर्ष - एकदंतं चतुर्हस्तं..) आणि त्याची स्तुती केलेली आहे. गणेशाचे तेजस्वी रुप, त्याची कुशाग्र बुद्धी आणि त्याचे सर्व प्राणिमात्रांवरील आधिपत्य मान्य करुन गणपती नेहमीच आपल्या बुद्धीला सन्मार्गावर राहण्याची प्रेरणा देवो यासाठी त्याची प्रार्थना केलेली दिसते.

वेदांगातही गणेशोपासनेचा उल्लेख सापडतो. वैदिक कालापासून गणपतीची उपासना भारतवर्षात सुरु होती व यज्ञयागातही गणपतीला मानाचे स्थान होते असे दिसते.

असा हा पूर्वीपासून जनमानसात रुजलेला गणपती. आदौ पूज्यो विनायकः - ह्या उक्तीनुसार सर्व शुभकार्यांरंभी अग्रपूजेचा मान मिळालेलं हे दैवत आजही तितकच लोकप्रिय आहे.

असा हा ओंकारस्वरुपी, सार्‍या सृष्टीचा उत्पत्तीकर्ता आणि पालनकर्ता तुम्हां आम्हां सर्वांचं सतत रक्षण करो!

वेदांविषयी काही माहिती इथे मिळेल.

संदर्भः १. गणेशकोष २. कल्याण श्रीगणेश विशेषांक, गीताप्रेस, गोरखपूर.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आयटी, उत्तम माहिती दिलिस बघ, आणि फारच सोप्या शब्दात सांगितलीस.
हा लेख माझ्या संग्रही ठेवतोय... अथर्वशिर्षाचा अर्थ सुद्धा असेच ज्ञानरंजन करणारा आहे, त्याबद्दलही वाचायचे आहे.

आयटे, चान्गला सन्ग्रहणीय ले़ख! Happy
(तुझ हे अन्ग माहित नव्हत)
...;
आपला, लिम्बुटिम्बु

एक छान सोप्या भाषेतला माहितीपूर्ण लेख ! संग्रही ठेवतो.
(च्यायला... तुझ्याशी टीपी करत बोलताना जपून बोलावे लागेल आता बहुतेक Happy )

म्हणजे च्यायलाशी तू जपून बोलत नाहीस का संदीप?? Proud

गणानां त्वा गणपतिं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमम् l
ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आ नः श्रृण्वन्नूतिभि: सीद सादनम् ll >>>

ॠग्वेदातला मंत्र गणपती साठी नाही. वेद काळात गणपती नावाची देवता न्हवती. तर बृहस्पती नावाची देवता होती. वेदकाळात सर्व स्तुतीपर मंत्र हे ऐकतर विष्णू, शिव वा इंद्र या साठीच आहेत. गणेशस्तुतीपर न्हवे. ॠग्वेदात आलेले गणपती हे गण व त्याचा पती म्हणजे ऐखाद्या गणाला (पथकाला) नेतॄत्व करनार्या साठी आहे ( तसा दोन श्लोकात उल्लेख करन्यत आलेला आहे. गणपती चा शब्दशः अर्थ)

नंतरच्या उपनिशीदांमध्ये गणेशाच्या प्रथम उल्लेख करन्यात आला आहे. बॄहस्पती चे गणपती का व कधी झाले ह्या बद्दल माहीती काढायला हवी. ( अशा घुसडन्याचा अनेक घटना आहेत जसे कॄष्ण व राधा).

केदार, मी संदर्भासाठी घेतलेल्या कोषामधे मला ब्रह्मणस्पती आणि बृहस्पती ही नावे गणेशासाठी वापरल्याचे संदर्भ मिळाले. तुझ्याकडे वेगळी माहिती असेल, तर इथे जरुर लिही.

आयटी, आवडला लेख.

केदार गणपती इष्ट देवता म्हणून समजली जाते. मग ती दुसर्‍या रुपात असू शकेल न?

ह्म्म.. आवडला लेख.. लिंबूशी सहमत.. तुझ्याकडून हा लेख पाहून मजा वाटली! Happy

शैलजा हो नंतर ती वापरली गेली पण ती का वापरली गेली वा कोणी ती वापरली हे मला ज्ञात नाही (अजुन). आणि तु जो लेख लिहीला आहेस तो योग्यच आहे. मी त्यापुढे जाऊन थोडे सांगत होतो इतकेच. बॄहस्पती म्हणजेच् गणपती असे सांगीतल्या जाते पण ते का हे कुठेही नाही. नंतर कधीतरी कोणीतरी तो संदर्भ लावन्याची शक्यताच जास्त आहे.

तो जो श्लोक आहे तो प्राणप्रतिष्टेसाठी वापरतात.

आर्च गणपतीची ईष्ट देवता म्हणून गणना कधी झाली हे निट कळत नाही. वेद वा उपनिशीदात गणपती ही देवताच नाहीये. नंतर कधी तरी गणपती हा ईष्टदेव झाला.

तळटिप मी वाद सुरु करत नाहीये वा माझी गणपतीवर श्रध्दा नाही असेही नाही. फक्त थोडी माहीती लिहीली ईतकेच.

अरे, वाद कोण म्हणतय? Happy लिही की! Happy

अगं मजा वाटली म्हणजे, तुला यात इंटरेस्ट आहे हे माहीत नव्हतं.. म्हणून .. Happy

छान महिती, आयटी आणि केदार. तुम्हा लोकांमुळे पुस्तके न वाचताही खूप माहिती मिळते.

एक प्रश्न- विषयाला धरून नाही.
अथर्वशीर्ष म्हणताना फलश्रुती का म्हणत नाहीत? कारण माझ्या कडे असलेल्या सगळ्या सीडी मध्ये फलश्रुती आहे.
कोणाला माहिती आहे का?

भाग्ग्या, जितकी आवर्तने ठरवली असतील तितकी म्हणेस्तोवर फलश्रुती म्हणत नाहीत पण शेवटच्या आवर्तनानन्तर फलश्रुती म्हणली जाते!
फलश्रुती म्हणणे अत्यावश्यक मानले आहे, मात्र अनेकवेळा म्हणायचे असताना दरएक आवर्तना नन्तर ती म्हणण्याची गरज नाही, प्रघातही नाही! Happy
एकदाच म्हणायचे असल्यास किन्वा अधिक सन्ख्येने म्हणताना शेवटच्या आवर्तनानन्तर फलश्रुती म्हणली जाते! Happy
गणपती बाप्पा मोरया......!
...;
आपला, लिम्बुटिम्बु

खरोखर संग्रही ठेवण्यासारखा अभ्यासपूर्ण लेख , त्यानिमीत्तानी घडणारी चर्चादेखील चांगलीच . हाच तर खरा गणेशोत्सव ना! Happy

शैलजा लगे रहो.... छान लिहितीयेस Happy

संदीप का रे छ्ळतोस.. अस मी काय केले बुवा Happy तशी माझी ख्याती आहे वाद विवादपटू म्हणुन.. यशस्वी कलाकार वैगेरे काय काय..
म्हणुन सांभाळुन रहायचे काय?

भाग्या, लिंबुटीम्बुने फलश्रुती शेवट च्या आवर्तनात म्हणतात असे म्हटले आहे. असो पण मला वाटत. ईथे भगवद्गितेचा कर्मफल सिद्धांत असावा की केवळ फलाच्या आशेने अथर्वशिर्ष म्हणु नये.. तसे कोणतेच स्तोत्र म्हणु नये हा पायंडा नंतर पडलाय.

केदार, खरे तर गणपतीचा स्पष्ट उल्लेख वेदांमधे नाहीच, पण त्याच्या बद्दलचे वर्णन आढळते. तश्या आपल्याकडे कित्येक देव देवता ज्यांचा उल्लेख वेदांमधे नाही त्या नंतर प्रचलित झाल्यात. गणपती उपासना सुद्धा ही वेदोत्तर काळामधे जास्त लोकप्रिय झाली. तसेच तुम्हाला संतोषी माता माहित असेल ती तर चक्क आधुनिक माध्यम चित्रपटामुळे प्रसिद्ध झाली असे अनेक देव देवता ज्यांचा उल्लेख वेदांमधे नाही पण त्यांच वर्णन, गौरव हे सगळ एकाच तत्वाला उद्देशुन असत जे वेदांना अभिप्रेत आहे.

एकदम छान माहीती!!!!!धन्यवाद

गो आयटे.. १दम मस्तच गो.. महान संतोष: !
-::- -::- -::--::--::--::--::-
गणा धाव रे.. मला पाव रे..

शैलजा सुंदर अभ्यसपुर्ण माहिती, पन अजुन वाचावस वाटत आहे.

बरीच माहिती नवीन मिळाली. बृहस्पती, ठाऊक होते, पण गणपती म्हणजे बृहस्पती हे नव्हते माहिती. ब्रह्मणस्पती विषयी अजून बघावे लागेल.