श्री. विनय आपटे - मित्राची गोष्ट

Submitted by चिनूक्स on 2 December, 2009 - 11:04

मित्राची गोष्ट या तेंडुलकरांनी लिहिलेल्या नाटकाचं दिग्दर्शन श्री. विनय आपटे यांनी केलं होतं. त्यांच्या दिग्दर्शकीय कारकीर्दीचीच ती सुरूवात होती. गेल्या पंचवीस-तीस वर्षांत असंख्य नाटकांचं दिग्दर्शन केलेल्या श्री. विनय आपटे यांना मित्राची गोष्ट हे त्यांच्या कारकीर्दीतलं सर्वांत महत्त्वाचं नाटक वाटतं.

सुप्रसिद्ध दिग्दर्शक व अभिनेते श्री. विनय आपटे यांचं हे मनोगत...

---------------------------------------------------------------------------------------------------------------------

मला कायम एक जाणवत आलं आहे की, फार कमी असे लेखक आहेत की, ज्यांना नाटक लिहिण्यापूर्वी दिसतं. लिहिणार्‍याला आपलं लिखाण visualize करता येतंच असं नाही. मी नाटककारांबद्दल बोलतोय, कवींबद्दल नाही. तेंडुलकरांचे संवाद, त्यांची भाषा यांबद्दल अनेकजण बोलतील, पण तेंडुलकरांचं नाटक तेंडुलकरांना आधी दिसायचं हे मला विशेष वाटतं. मित्राची गोष्ट वाचलं तर असं लक्षात येईल की, दिग्दर्शकाला ते अनेक गोष्टी संहितेत सांगत असतात. दिग्दर्शकानं ते नाटक कसं visualize करावं, हेच जणू ते सांगत असतात. दुसरं मला एक अतिशय महत्त्वाचं वाटतं, ते म्हणजे, हा एकमेव असा नाटककार आहे जो महाराष्ट्राबाहेर भारतात, आणि भारताबाहेर जगभरात गाजला. शेक्सपिअरची नाटकं जगभरात गेली कारण ब्रिटीशांनी अर्धं जग व्यापलं होतं. जिथे जिथे इंग्रजी भाषा बोलली जात होती, तिथे तिथे शेक्सपिअरची नाटकं पोहोचली. पुढे मग इतरही भाषांत रुपांतरं झाली. मराठीत असे प्रयत्न आपण कधीच केले नाहीत, मराठी नाटक तामिळ, पंजाबी, इंग्रजी भाषांत केलं गेलं आहे, असं झालं नाही. तेंडुलकरांची नाटकं मात्र इतर भाषांत केली गेली. मराठी नाटकांचा झेंडा परदेशात फडकला तो तेंडुलकरांमुळे.

शिवाय त्यांच्या नाटकांच्या विषयांचं वैविध्यही लक्षणीय. शांतता!.., बेबी, सखाराम बाइंडर ही काळाच्या खूप पुढे असलेली नाटकं होती. तेंडुलकरांचं हेही मला विशेष वाटतं. वीस-पंचवीस वर्षांनी भेडसावू शकतील अशा प्रश्नांवर नाटक लिहिणं, हे अतिशय विलक्षण आहे. एक द्रष्टा लेखकच हे करू शकतो. माझ्या भवताली जे घडतं आहे, त्यावर नाटक लिहिणं, इतिहासाचा एखादा तुकडा घेऊन त्यावर नाटक रचणं, यांपेक्षा भविष्यात उद्भवू शकणाया प्रश्नांवर विचार करून एक सकस नाटक रचणं, हे खूप कठीण आहे. मित्राची गोष्ट हे नाटकही काळाच्या खूप पुढे होतं. कोर्टाने आता समलिंगी संबंधांना मान्यता दिली आहे, तरीसुद्धा आज कोणी हे नाटक सहज करेल, असं वाटत नाही. आजपर्यंत या नाटकाचे अगदी मोजके प्रयोग झाले आहेत. आविष्कारने मध्ये एकदा काही प्रयोग केले होते. मी दोनदा केलं. एकदा आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेसाठी केलं होतं.

मित्राची गोष्ट हे नाटक करायला तसं कठीण होतं. समलिंगी संबंधांबद्दल चर्चा कोणाशी करणार? आजूबाजूच्या मुली लेस्बियन जरी असल्या तरी माहीत असण्याची शक्यता नव्हती. समलिंगी संबंध ठेवणारे पुरुष माहीत होते, पण समलिंगी संबंध ठेवणारी एकही मुलगी पाहण्यात आली नव्हती. मग परदेशी पुस्तकं मिळवून वाचली, तेंडुलकरांशी चर्चा केली. तेंडुलकरांनी ७५ साली ते नाटक लिहीलं, तरी नाटकातला काळ त्याही पूर्वीचा आहे. पुण्यासारख्या कुठल्यातरी सनातनी शहरात हे नाटक घडतं. हा विषय नीट मांडला जाणं त्यामुळे खूप आवश्यक होतं. आम्ही भरपूर चर्चा केल्या. तेंडुलकर रोहिणीशीही भरपूर बोलले. त्या काळात अशा विषयावर कोणी इतक्या मोकळेपणी बोलत नसे. आणि आम्ही नाटक करायला निघालो होतो.

माझं हे पहिलंच व्यावसायिक नाटक होतं. मित्राची गोष्ट हे माझं पहिलं व्यावसायिक नाटक असणार होतं, आणि म्हणून त्याबद्दल चर्चाही खूप झाली कारण नाटकाचा विषय प्रचलित संकल्पनांना छेद देणारा होता. नाटकाचे आम्ही पंचवीस प्रयोग केले. नाटक धो धो चालणार नाही, याची आम्हांला कल्पना होती. प्रेक्षागृहात कितीही कमी प्रेक्षक असले तरी प्रयोग करायचेच, असं आम्ही ठरवलं होतं. मित्राच्या मानसिक समस्येवरच भर दिला जावा, हा तेंडुलकरांचा आग्रह होता, आणि म्हणूनच आम्ही सेन्सॉरकडून ए प्रमाणपत्र मागून घेतलं. त्या काळात हिट अ‍ॅण्ड हॉट नाटकांची चलती होती. प्रेक्षकांना आमचं नाटकही तसं वाटू नये, याची काळजी आम्ही घेत होतो. समलिंगी संबंध हा विषय असूनसुद्धा हे नाटक कुठेही अश्लील होऊ दिलं नव्हतं.

नाटक बघितल्यावर अनेक लोक मला भेटून जात. ’प्रयोग उत्तम झाला’, असं म्हणत, पण ’हे नाटक बघा, असं आम्ही इतर कोणाला सांगणार नाही’, अशी पुस्तीही जोडत. का? तर हे नाटक आवडलं आहे, असं म्हटल्यानंतर ते समलैंगिक आहेत, असा कोणाचा समज झाला तर? इतक्या सनातनी, झापडबंद वातावरणात आम्ही हे नाटक करत होतो. पण तरीही या नाटकानं आम्हांला खूप काही दिलं. आजही तू जर रोहिणीला तिच्या आयुष्यातल्या सर्वोत्कृष्ट भूमिकेबद्दल विचारलंस, तर ती ’मित्रा’ असंच उत्तर देईल. माझा दिग्दर्शक म्हणून व्यावसायिक रंगभूमीवरचा प्रवास याच नाटकापासून सुरू झाला. तेंडुलकरांचं माझ्यावर फार मोठं ऋण आहे. माझ्यासारख्या अगदी नवख्या, अननुभवी दिग्दर्शकावर त्यांनी विश्वास टाकला. आम्ही फ़ार जीव ओतून हे नाटक केलं. तुला सांगतो, त्याकाळी ज्यांनी हे नाटक बघितलं आहे, ते अजून या नाटकाची आठवण काढतात. मित्राची गोष्ट परत एकदा करा, असं सांगणारे प्रेक्षक मला अजूनही भेटतात. अर्थात, या प्रेक्षकांची संख्या अगदीच कमी आहे. पण आम्ही निदान काही लोकांपर्यंत आमचं नाटक पोहोचवण्यात यशस्वी झालो. लेखकानं लिहिलेल्या शब्दाला न्याय देण्याची जबाबदारी दिग्दर्शक व नटांची असते, आणि आजही ज्याअर्थी लोक आमच्या नाटकाची आठवण काढतात, त्याअर्थी आम्ही तेंडुलकरांच्या शब्दांना न्याय देऊ शकलो, असं मला वाटतं.

आजही जेव्हा रोहिणी, मंगेश कुलकर्णी, सतीश पुळेकर, लाली (उज्ज्वला जोग) असे आम्ही जेव्हा भेटतो, तेव्हा आमच्या या नाटकाच्या आठवणी निघतातच... कसे आपण प्रयोग केले, कशा तालमी केल्या, कशा हालअपेष्टा सोसल्या. आमच्याकडे पैसेच नव्हते त्या काळी, म्हणून दिवसभर एस.टी.नं प्रवास करून लगेच संध्याकाळी आम्ही प्रयोग केले होते तेव्हा. या सार्‍यात आम्हांला रघुवीर तळाशीलकरांनी अपरंपार मदत केली. आमच्या अनेक मित्रांनी आम्हांला मदत केली.

या वेगळ्या नाटकापासूनच मी सुरुवात केल्याने माझ्या दिग्दर्शकीय कारकिर्दीकडे बघण्याची लोकांची दृष्टी बदलली. त्या काळात तेंडुलकर हे वाद निर्माण करणारे लेखक होते. घाशीराम, गिधाडे, बाइंडर या नाटकांनी तर केवढे वाद निर्माण केले. आणि या नाटकांचे विषयही किती वेगळे. एकात लैंगकतेची चर्चा आहे, दुसर्‍यात क्रौर्य आहे, तिसर्‍यात राजसत्तेचा केलेला दुरुपयोग आहे. पण या सार्‍यापेक्षा मित्राची गोष्ट फार निराळं होतं. आणि अशा अनवट विषयावरील नाटकापासून माझ्या दिग्दर्शकीय कारकीर्दीची सुरुवात व्हावी, हे मला फार महत्त्वाचं वाटतं. आपल्याला रंगभूमीवर नक्की काय करायचं आहे, हे मला या नटकामुळे लवकर समजलं. या नाटकानं मला पुढेही फार मदत केली. नाटकांत खरेपण कसं राखायचं हे मला या नाटकानं शिकवलं. अगदी कुसुम मनोहर लेलेसारखं तद्दन व्यावसायिक नाटक करत असतानाही मी ते नाटक बयापैकी वास्तववादी करू शकलो. आणि म्हणूनच तेंडुलकरांचं माझ्यावर फार मोठं ऋण आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहे. चिनुक्सा, माझ्या सारख्या धेडगुजरी लोकांना मराठी, मराठी इतिहास, मराठी नाट्य, कलावंतांशी ओळख करुन दिल्या बद्दल मनापासुन धन्यवाद. मराठी दर्जेदार साहित्याशी ओळख फार उशीरा झाली. प्रवास पुलंच्या लिखाणानी सुरु झाला आणि बाकीच्या धबडग्यात तिथेच संपला देखील. आता सध्या वेळ आहे, त्या मुळे अशी नव्याने माहिती मिळाली की एखादं पुस्तक की नाटक आवर्जुन वाचणं/पहाणं होतं. आपटेंना पुर्वी कुठल्या तरी मराठी मालिकेत पाहिल्याचे आठवते, चेहरा लक्षात नसला तरी नाव लक्षात राहिलं होतं. एक महिन्या पुर्वीच साजिर्‍याच्या कृपेनी "निशाणी डावा अंगठा" पाहिला. त्यातला कमरुद्दिन काझी हे आपटे आहेत हे माहित नव्हतं पण अगदी थोड्याच वेळ असलेल्या कामात सुद्धा बघतक्षणीच अभिनयाची जबरदस्त क्षमता नजरेतुन सुटली नाही. मी मुद्दाम शेवटी कलाकरांची लिस्ट पाहात बसलो काझी कोण आहे ते बघायला, पाहातो तर विनय आपटे. Happy
असो, परत एकदा धन्यवाद.

धन्यवाद चिन्मय. विनय आपटेंसारख्या जबरदस्त कलाकार-दिग्दर्शकाकडून तेंडूलकरांबद्दल ऐकणे ही थोरच गोष्ट. Happy

'मित्राची गोष्ट' वाचायचं राहिलं आहे. बघितलेलंही नाही. आजच जाऊन शोधणार हे पुस्तक.

नेहमीप्रमाणे उत्तम दर्जेदार. मी विनयची कामे दूरदर्शन वर पाहिलेली आहेत. छान व्यक्तिमत्त्व होते तेव्हा.
आता वयाप्रमाणे मॅच्युअर छान दिसतो. आवाजाची फेक उत्तम.

धन्यवाद चिनूक्स. अक्षरवार्ता मधे आलेली पुस्तकं जशी मायबोली खरेदी विभागात उपलब्ध करुन दिली जातात तशी वेळोवेळी उल्लेख झालेली नाटकं पण मिळतील का ?

सिंडरेला,
तेंडुलकरांची 'सखाराम बाइंडर' व 'शांतता..!' ही दोनच नाटकं चित्रफितीची रूपात उपलब्ध आहेत. ही नाटकं मूळ संचातली नाहीत.

दूरदर्शनने तेंडुलकरांची जवळजवळ दहा नाटकं व तितक्याच एकांकिका मूळ संचात चित्रीत केल्या होत्या. पण तिथे archivingची सोय व पद्धत नसल्याने ही नाटकं प्रक्षेपणानंतर लगेच पुसली गेली.

दोन वर्षांपूर्वी श्री. अमोल पालेकरांनी पुण्यात 'तें' नाट्यमहोत्सव भरवला होता. त्याच्या dvd बाजारात उपलब्ध आहेत. त्यात तेंडुलकरांच्या नाटकांचे प्रवेश व काही अभिवाचनं आहेत.

मध्यंतरी डॉ. लागू तेंडुलकरांच्या काही एकांकिकांचं वाचन करणार होते. पण गेल्या वर्षी ते शक्य झालं नाही. आता पुढच्या वर्षी परत प्रयत्न करू.