अबोली

Submitted by विजय... on 17 June, 2017 - 05:54

कामं आटपून निघायला मला ३:३० वाजून गेले.
पण काही वेळा असा उशीर पथ्यावर पडतो. तेव्हाही तेच झालं. मी ऑफिससमोरचा रस्ता क्रॉस करण्याचं दिव्य पार करून पलीकडे रिक्षासाठी वाट बघत उभा राहिलो. एक रिक्षावाला आला, अपेक्षेप्रमाणे त्याने स्टेशनला यायला नकार दिला, मी सवयीप्रमाणे थोडी हुज्जत घातली आणि त्याला रामराम केला. तो गेला तोपर्यंत मागे आणखी एक रिक्षा येऊन उभी होती - अबोली. महाराष्ट्रात सर्वप्रथम ठाण्यात महिला रिक्षा सुरू झाल्या त्याच या 'अबोली' सेवा म्हणून.
रिक्षामध्ये मुळातच तीन जण होते - दोन पुरुष आणि एक मुलगी. तरीही त्या महिलेने रिक्षा थांबवली, त्या अर्थी मी पुढे बसणं अपेक्षित होतं. तरिही मी 'चालेल का?' असं खुणेने विचारूनच पुढे बसलो. मुळात या अबोली रिक्षा पुरुषांसाठीही असतात हे मला माहित नव्हतं, त्यात पुढे बसायचं तर चालक महिलेला अवघड व्हायला नको म्हणून सगळी काळजी.
जशी रिक्षा चालू झाली तसे एका महिलेने रिक्षा चालवण्याचे वेगवेगळे पैलू मला दिसू लागले. महिलेने रिक्षा चालवणे हे केवळ नाविन्य नव्हतं, तर तिच्या आर्थिक स्वावलंबित्वाचं ते प्रतीक होतं. संसाराचं दुसरं चाक खंबीर करण्याच्या प्रयत्नांच ते द्योतक होतं. वडीलधाऱ्यांच्या जबाबदाऱ्या आणि मुलाबाळांच्या महत्वाकांक्षा पूर्ण करण्याच्या धडपडीतलं ते एक पाऊल होतं. जी क्षेत्र आपलीच आहेत असं पुरुषांना वाटतं, त्यातल्या एका क्षेत्रात पाय रोवून उभं राहण्याच्या निर्धाराचं प्रतीक होतं. चौथा प्रवासी पुरुष असला तरी त्याला आपल्या सीटवर शेजारी बसवून घेण्याच्या धैर्याचं प्रतीक होतं.
आणि एवढया सगळ्या गोष्टींचं कौतुक होतं, म्हणून ड्रायव्हिंगमध्ये काही एक्सक्युजेस होते का? अजिबात नाही! अर्जंट ब्रेक लावतानाही जर्क न बसण्याइतकं माहीर ड्रायव्हिंग होतं!
एवढं माझ्या डोक्यात सुरू असतानाच ठाणे स्टेशन पर्यंत आम्ही येऊन पोहोचलो. बाकीचे प्रवासी पैसे देत असताना मी मुद्दामच मागे रेंगाळलो. ते तीन प्रवासी गेल्यावर त्या महिलेचं नाव मुद्दाम विचारून घेतलं - सरस्वती भानुदास माने! तिच्या परवानगीनेच फोटोदेखील काढला.
अशी सर्वसामान्य व्यक्तिमत्व सुध्दा खूपदा प्रेरणादायी ठरतात - खरं तर असामान्यच ती
- विजय दुधाळ

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अक्षयजी, छान आहे लेख !
महिला रिक्षाचालकाचं केलेलं कौतुकमिश्रित सहज निरीक्षण एवढंच ह्या छोट्याशा लिखाणातून सामोरं येतं असं नव्हे, तर त्यातून तुमची गुणग्राहकता आणि व्यक्तीला माणूस म्हणून जाणून घेण्याची संवेदनशीलता अधोरेखीत झाली आहे.
अभिनंदन !!

Happy छान