आठवतं तुला ?

Submitted by अनुया on 17 June, 2017 - 15:29

आठवतं राणी तुला
त्या रात्रीचं समुद्राकाठचं चांदणं ?
अंधाराच्या काजळात माखून
काजळाचीच उदी करणारं .......?

सखे, तुझ्या चांदणदेहावरही
पांघरली होतीस तू अंधाराची साडी
त्या अंधारातही तुझी चांदणकाया
मी लख्ख पाहत होतो........
ऐकू येत नव्हती मला
साऱ्या नीरवतेला छेदणारी
उधाण सागराची लयबद्ध गाज, कारण
मला जाणवत होता फक्त तुझा धपापलेला श्वास .....

सारे किनारे गिळून टाकण्याचा पयोधीचा अंदाज
माझ्या जाणीवेपलिकडे होता, कारण
तेव्हा खुणावत होते मला तुझे
दोन उन्मत्त पयोधर.....

मी पहुडलो होतो
तुझ्या मांडीवर डोकं विसावून
अंधारवस्त्रातून गाळलेल्या चांदण्याचं
शिंपण केलेल्या मऊशार वाळूवर .....
माझ्या नजरेत होतं
वर पसरलेलं अनंत आभाळ
आणि जाणिवेत होतीस
फक्त तू ....... चांदणउटी माखलेली .....

तू मात्र होतीस
समुद्राच्या दिशेने बघत
ऐकत होतीस त्याची ती
आक्रमक गाज
नजरेने प्यायचा होता तुला तो
अनिर्बंध, किनारे जिंकलेला समुद्र !

पण ....
इतका सामोरा, एवढा सन्निध असूनही
तू त्याला पाहू शकत नव्हतीस,
तुला तो दिसू शकत नव्हता, कारण
त्याच्या-तुझ्यामध्ये होती
एक काळी, दगडी भिंत .......
माणसांनी बांधलेली...............!!

Group content visibility: 
Use group defaults