एक वर्ष इंटरमिटंट फास्टिंगचे

Submitted by सई केसकर on 21 April, 2017 - 07:05

या महिन्यात मला इंटरमिटंट फास्टिंग सुरु करून एक वर्षं झाले. या एका वर्षात माझे वजन १४ किलो कमी झाले. पहिले दोन ते तीन महिने वजन झपाट्याने कमी झाले आणि नंतर मात्र व्यायाम आणि काटेकोर आहार यांच्या जोडीने कमी झाले. या आधी मी कित्येक वेळा ६ महिन्याच्या वेटलॉस प्रोग्रॅम मध्ये ५-८ किलो वजन कमी केलेले आहे. पण ते नेहमी एका वर्षाच्या आतच वाढायचे. एवढे जास्त वजन कमी करायची आणि सलग एक वर्ष तो ग्राफ टिकवून ठेवायची माझी पहिलीच वेळ आहे. आणि त्यात फक्त इंटरमिटंट फास्टिंगचा वाटा नसून काही लावून घेतलेल्या सवयी आहेत. त्याबद्दलही लिहिणार आहे.

इंटरमिटंट फास्टिंगमुळे झालेले फायदे:

१. भुकेची जाणीव बदलली आहे.

सतत १६/१८ तास न खायची सवय लागल्याने खाण्याच्या वेळेत अति खाल्ले जात नाही. आधी मला याची काळजी वाटायची. म्हणून मी माय फिटनेस पॅलमध्ये मी खाल्लेल्या पदार्थांची नोंद करू लागले. तसे केले असता लक्षात आले की इंटरमिटंट फास्टिंग करताना मी माझ्या पूर्वीच्या डाएटिंग करायच्या आहारापेक्षा २००-३०० उष्मांक जास्त घेते. फक्त त्यामध्ये पोळी आणि भात यांचे नियोजन वेगळे आहे. दिवसाला मी दोनच पोळ्या (किंवा १ पोळी आणि १/२ वाटी भात) खाते. पण त्या जोडीला २ अंडी, १-२ मोठे बाउल सॅलड, १ मोठा बाउल वरण (किंवा १०० ग्राम चिकन), ठराविक वेळेस चहा कॉफी असे घेते. या सगळ्याची बेरीज करता पोषण मूल्यांमध्ये माझा आहार कुठेही कमी नाही. पण मध्ये मध्ये चमचमीत काही बाही खाण्याची सवय पूर्ण गेली आहे.

२. खाण्याबद्दल असलेल्या अपराधी भावनेपासून सुटका

ठरलेल्या वेळात योग्य आहार घ्यायचा आणि उरलेल्या वेळात उपास करायचा अशा सवयीमुळे कधी खाणे थोडे जास्त झाले तरी त्याबद्दल अपराधी वाटत नाही. आणि "उद्यापासून नीट करणार" अशी सबब मिळत नाही. कधी कुठे कार्यक्रमाला जायचे असेल तर मी २ दिवस आधी थोडा व्यायाम वाढवून, थोडा आहार नीट तपासून किंवा उपासाचे काही तास वाढवून आधीच तयारी करून ठेवते आणि कार्यक्रमात व्यवस्थित जेवते.
या उन्हाळ्यात मी दर एक आड एक दिवशी ब्रेकफास्टला हापूस खाल्ला. पण त्या बरोबर मात्र पोळी/पुरी असे काहीही खाल्ले नाही. फक्त आंब्याचा मनसोक्त आस्वाद घेतला.

३. डाएट फूड साठी होणारी दगदग कमी झाली

या पद्धतीने वजन कमी करायचा एक महत्वाचा फायदा म्हणजे मला माझ्यासाठी कमी तेलाचे किंवा उकडलेले असे वेगळे काही पदार्थ करावे लागत नाहीत. जो स्वयंपाक घरात असतो त्यातूनच मी माझा आहार घेऊ शकते. संपूर्ण अंडे (विथ यलो), फॅट असलेल्या दुधाचे दही/पनीर खात असल्याने बराच काळ पोट भरल्याची भावना टिकून राहते. आणि एकाच वेळी भरपूर खाल्ल्याने थोडा मानसिक आधार मिळतो. ५-७ वेळा थोडे थोडे खात होते तेव्हा माझी खूप चिडचिड व्हायची.

या एका वर्षात काही सवयी मी लावून घेतल्या आहेत ज्यांचा मला वजन कमी करण्यासाठी आणि ते वाढू न देण्यासाठी खूप फायदा झाला

१. वर्क वीक आणि चीट मील

मी स्वतःसाठी एक साधा नियम केला आहे. वर्कींग वीक मध्ये बाहेर खायचे नाही. आणि विकेंडला एक चीट मील घ्यायचे. जशी जशी सवय होत गेली तसे या चीट मीलचे अप्रूप कमी होत गेले. आता आम्ही महिन्यातून एकदा बाहेर जेवायला जातो. पण तेव्हा मात्र छान रिसर्च करून पुण्यातल्या नवीन नवीन रेस्तराँची माहिती करून जातो.

२. रोज वजन करणे

आधी मी वजन काट्याला खूप घाबरायचे. आणि ३-४ दिवस आहार सारखा चुकला तर मग वजन काट्याला ४-६ महिने टाटा व्हायचा. आता मी रोज वजन करते. आणि रोज त्याची नोंद करून ठेवते. त्यामुळे वजन वाढले तरी १ किलोच्या वर कधी जात नाही. लगेच हातपाय हलायला लागतात आणि तोंड बंद होते.

३. वजनाचा दिसण्याशी संबंध लावणे कमी केले

आपण चांगले दिसायला वजन कमी करतोय या भावनेतून डाएट किंवा व्यायाम काहीही करताना खूप नकारात्मक भावना यायची. आपण आहे असे चांगले आहोत पण आपल्या आरोग्यासाठी वजन कमी करतोय ही भावना जास्त सकारात्मक वाटली. त्यामुळे आता जरी भरपूर वजन कमी झाले असले तरी अजून चांगल्या आरोग्यासाठी प्रयत्न चालूच राहिलेत. यामुळे अमक्या अमक्या तारखेच्या आधी मला अमुक अमुक किलो व्हायचे आहे असे भयंकर टार्गेट पण ठेवले जात नाहीत. आणि संथ गतीने, पण योग्य रीतीने वजन कमी होते.

४. चढ उतार गृहीत धरून पुढे जाणे

काटा कधी खाली कधी वर जाणार हे गृहीत धरून पुढे जायचं. थोड्याश्या अपयशाने लगेच स्वतः बद्दल करुणा वाटून घ्यायची नाही. किंवा थोड्याश्या यशाने लगेच आपण किती महान आहोत असे वाटून घ्यायचे नाही.

५. खाली खेचणाऱ्या लोकांना बाय बाय!

अशी कुठलीही मोहीम हाती घेतली की नकार घंटा वाजवणारे कित्येक लोक आजूबाजूला भेटतात. त्यांना लिटरली बाय करायला जमले नाही तरी त्यांच्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करायला तरी शिकले पाहिजे. आणि आपल्याला आगे बढो म्हणाऱ्या लोकांशी संपर्क वाढवावा. या बाबतीत मायबोलीचा माझ्या आधीच्या लेखावरचा प्रतिसाद हा माझ्यासाठीच फार प्रोत्साहन देणारा होता.

या वर्षात मला अजून ५ किलो वजन कमी करायचे आहे. आणि आता पुन्हा पाळायला सुरुवात करून एखादी रेस पळायची आहे. पुढच्या एप्रिलपर्यंत यातील काहीही एक जमले तरी खूप झाले!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच सई! तुझी ही सिरीज खूपच मोटिव्हेटिंग आहे.

रच्याकने, मायबोलीवर फिटनेसवाल्यांचं एक वेगळं वहातं पेज्/कायमस्वरुपी धागा काढता येईल का ज्यात फिटनेस -डाएट- व्यायाम संबंधित मुद्दे रुटिनली डिस्कस करता येतील? एनी थॉट्स?

मस्त लेख.
स्वतःकरता असं कमिटमेंट सिरियसली घेऊन शिस्तीत वागायला मला कधी जमेल?

>>>रच्याकने, मायबोलीवर फिटनेसवाल्यांचं एक वेगळं वहातं पेज्/कायमस्वरुपी धागा काढता येईल का ज्यात फिटनेस -डाएट- व्यायाम संबंधित मुद्दे रुटिनली डिस्कस करता येतील? एनी थॉट्स? +१११

माझे खूप थॉट्स आहेत. पण गेले बरेच दिवस असा वाहत धागा कसा उघडायचा हेच मला कळत नाहीये माबोवर.

मला ३ धागे काडायचेत असे
१. सगळ्या हेल्थ आणि फिटनेस अवेअर माबोकरांसाठी आपापले डाएट्स आणि ट्रिक्स डिस्कस करणारा धागा (फारच धेडगुजरी झालं हे वाक्य. सॉरी!)
२. लहान मुलांना (२ + )सक्ती न करता भाज्या खायला शिकवण्याच्या युक्त्या
३. वेगवेगळ्या देशात राहणाऱ्या माबोकरांच्या त्या त्या कल्चर मधून शिकलेल्या आणि भारतीय जिन्नस वापरून करता येणाऱ्या सोप्या हेल्दी रेसिपीज.

याबद्दल कोणी एन्थु असेल तर मला प्लिज मदत करा!!

सई, अभिनंदन.
(फोनवरून) याच पानाच्या तळाला आणि अन्य साधनांवरून उजवीकडे
नवीन लेखन करा - दिसतंय. त्यात लेखनाचा धागा, वाहते पान हे पर्याय आहेत.

हव्या त्या ग्रुपाचे सदस्यत्व घेऊन तिथे धागे, वाहती पाने उघडायची.

@भरत,

सदस्य व्हायची स्टेप गाळली जात असावी बहुतेक त्यामुळे गोल गोल होत होते.
परत ट्राय मारते.

काही दिवसांपूर्वी मी, माझा IF अनुभव लिहून काढला पण तो पोस्ट केला नव्हता. आता असे वाटतेय की तो पोस्ट करावा.

मस्त अभिनंदन !

आणि .... वजनाचा दिसण्याशी संबंध लावणे कमी केले .... याला प्लस सेव्हन एटी सिक्स!

काही दिवसांपूर्वी मी, माझा IF अनुभव लिहून काढला पण तो पोस्ट केला नव्हता. आता असे वाटतेय की तो पोस्ट करावा.>> नेकी और पूछ पूछ?

माझं पण शेवटचे ३-४ किलोच राहिले आहे, जे अतिशय स्टबर्न वाटत आहेत. सध्या तब्येत स्किनी फॅट म्हणतात तशी आहे काहीशी. हे शेवटचे ४ किलो बहुतेक कार्ब साधारण १-२ महिने बंद करुन मगच होतील पण प्रश्न असा आहे की "येवढी गरज आहे का?". उद्या कुडं जंगलात, वाळवंटात हरवलो तर ३-४ दिवस उपासमारीत टिकायला अंगावर एखाद टायर नको का? आणि समजा घालवलं टायर, तर मला स्पोर्ट्स इलस्ट्रेटेड किंवा मेन्स फिटनेसच्या फ्रंट कवर वर टाकणार आहेत का? जाउद्या त्यापेक्षा. आणा ती आंबा लस्सी वित वॅनिला आईसक्रिम गोळा इकडे....
Lol

वा! शेवटी करुनच दाखवलंत.. जेब्बात! कन्सिस्टन्सी इज द रिअल गेम चेन्जर....

(आज जिमवाल्या क्लायन्टला भेटायला त्यांच्या जिममधे गेलो होतो, वजन केले. ..... कोणीतरी ह्या कन्सिस्टन्सीशी जमवून द्या राव माझे! बाकीचं मी बघून घेईन.. Wink )

>>काही दिवसांपूर्वी मी, माझा IF अनुभव लिहून काढला पण तो पोस्ट केला नव्हता. आता असे वाटतेय की तो पोस्ट करावा.

नक्की पोस्ट करा!! आम्हाला सगळ्यांना वाचायला आवडेल. तुमच्याकडून इन्स्पिरेशन घेऊन मी गेले २ आठवडे ओमॅड करते आहे. आणि मस्त वाटतंय!

>>खूप छान. अभिनंदन. खाण्याच्या वेळा आणि काय खायचात हे सविस्तर लिहाल का?

मी मोस्टली १६ तास फास्टिंग करते. सकाळी ८ वाजता ब्रेफा, १ वाजता लंच आणि ४ वाजता चहा बरोबर छोटेसे स्नॅक. मग ४ ते ८ काही नाही. पण ब्रेफा आणि लंच मध्ये मिळून साधारण १००० उष्मांक होतील असे खाते. कधी कधी मी वन मिल अ डे करते. म्हणजे २३ तास उपास. पण त्या एका जेवणात पुन्हा ८०० पर्यंत किंवा जास्त उष्मांक असतात. दिवसातून एकदाच जेवले तर मला पोळी, भाजी, भात असे सगळे जेवण एकाच वेळी घेता येते. यामध्ये काहीतरी गोड खायचे असल्यास त्यासाठी पण जागा असते. पण शक्यतो वीकडे ला मी अशा अव्हेलेबल कॅलरीज, दही, भरपूर कोशिंबीर, मला आवडणाऱ्या पद्धतीने केलेली आमटी वगैरे खाऊन वापरते. तुम्ही कुठल्याही रेस्तरॉमधले नॉर्मल जेवण घेतले की साधारण ७५०-८०० उष्मांक होतात. त्यामुळे चीट मील नंतर मी दुसऱ्या दिवशी लंचपर्यंत उपास करते.
थोडक्यात: आपल्या वजनाप्रमाणे जितके खायला हवेत तितके उष्मांक १ नाहीतर २ जेवणांमध्ये वाटून खायचे. साखर शक्यतो पूर्णपणे बंद करायची पण अगदीच जमत नसेल तर ज्या दिवशी गोडाचे काही खाल्ले जाईल त्या दिवशी चहा कॉफी मध्ये साखर घ्यायची नाही.
उदा: २५० ग्राम हापूस मध्ये १० % सुक्रोज असते. म्हणजे २५ ग्रॅम. १ टीस्पून साखर म्हणजे ४ ग्राम. असे ६ टीस्पून जरी चहा कॉफीतून घेतले तरी एका आंब्याएवढी साखर खाल्ली जाते. आणि वर आंबा पण खाल्ला तर मग कल्याणच! Happy
वजन कमी करण्यात साखरेचे गणित बसवणे खूप अवघड आहे. म्हणून मी सोपा मार्ग म्हणून साखरच बंद केली. कारण इतर पदार्थांमधून अप्रत्यक्ष साखर मिळतच असते. त्याचेही सारखे गणित करत बसने अवघड आहे.

>>>माझं पण शेवटचे ३-४ किलोच राहिले आहे, जे अतिशय स्टबर्न वाटत आहेत. सध्या तब्येत स्किनी फॅट म्हणतात तशी आहे काहीशी. हे शेवटचे ४ किलो बहुतेक कार्ब साधारण १-२ महिने बंद करुन मगच होतील पण प्रश्न असा आहे की "येवढी गरज आहे का?". उद्या कुडं जंगलात, वाळवंटात हरवलो तर ३-४ दिवस उपासमारीत टिकायला अंगावर एखाद टायर नको का? आणि समजा घालवलं टायर, तर मला स्पोर्ट्स इलस्ट्रेटेड किंवा मेन्स फिटनेसच्या फ्रंट कवर वर टाकणार आहेत का? जाउद्या त्यापेक्षा. आणा ती आंबा लस्सी वित वॅनिला आईसक्रिम गोळा इकडे....

हा हा. त्या लस्सीची पोस्ट माझेही चित्त विचलित करत आहे गेले कितीतरी दिवस.
पण बुवा तुम्हाला कुणी मासिकाच्या कव्हरवर कशाला टाकायला पाहिजे? मायबोली आहे ना! इथेच टाका फोटो! खाली वैद्यबुवा असे नाव पण.
पण माझंपण थोडं असं झालं आहे. अशा वेळेस सुपर मोटिव्हेटेड लोक आजूबाजूला हवेत. परवा केदार ची व्यायामाची पोस्ट वाचून थोडं तसं झालं. पण बुवा तुम्ही एखादा ग्रुप जॉईन करू शकता. जिथे सगळे हायली मोटिव्हेटेड आहेत. लस्सी कडे वळायचा आधी गिव्ह इट अ शॉट!

>>>वा! शेवटी करुनच दाखवलंत.. जेब्बात! कन्सिस्टन्सी इज द रिअल गेम चेन्जर....
त्यात सुद्धा ती शॉर्ट टर्म असली पाहिजे. आपण पुढे पुढे विचार करत जातो. मला आठवतंय, सुरुवातीचा वजन कमी होण्याचा रेट ३ किलो/महिना होता. तेव्हा मी वर्षाला ३६ किलो कमी करायची दिवा स्वप्न बघायचे. ३६ किलो कमी केले असते तर मला सलाईन लावावे लागले असते ही गोष्ट विसरून. नंतर लक्षात आलं की महिन्या पेक्षा आठवड्याचा विचार करावा. आणि आता तर मी आल्या दिवसाचा विचार करते फक्त. आणि वजन नाही तर आज काय खायचे आहे. आणि त्यात कसे यशस्वी व्हायचे एवढाच. व्यायामासाठी मला मानसिक कष्ट लागत नाहीत. आहारच अवघड आहे.

सगळ्यांचे आभार!

फारच छान सई! अभिनंदन! आणि ह्या इंटरमिटंट फास्टिंगची मायबोलीवर ओळख करून दिल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद Happy
अनेक कारणांमुळे (सबबींमुळे खरंतर) माझे इंटरमिटंट फास्टिंग बंद पडले आहे. ते सुरू करायला हवे अशी जाणीव झाली आहे!

सई, वर लिहिलेल्या विषयांवर लवकरच लिहाल अशी अपेक्षा आहे. नंबर २ जिव्हाळ्याचा विषय आहे सध्या.

वैद्यबुवानी एवढ्यातच १२७ hrs. नैतर कास्ट अवे बघितलाय वाटतं.

सई Happy
मोटिवेशन आहे फक्त जरा मार्ग, टेकनिक शोधत होतो हे शेवटचे ३-४ किलो किंवा किलोंपेक्षा शेवटचं २-३ टक्के जे फॅट जास्त उरलेलं आहे, ते घालवायचं. कॅलरी इन्टेक हा प्रॉबलेम नाहीये सहसा. जे काही खातोय ते पण सहसा वॉच करतो.
अजून एक गोष्ट सुधारता येइल असं अलिकडे लक्षात आलं. ऑवरॉल जरी कॅलरी कंट्रोल मध्ये असल्या, तरी एका वेळी जास्त खाललं जातय. म्हणून आता आज पासून सगळे मील्स ब्रेक करणार आहे. साधारण २००-३०० कॅलरीचे मील्स दिवसातून ५-६ वेळा. बघू काही फरक पडतो का.

नक्की पोस्ट करा!! आम्हाला सगळ्यांना वाचायला आवडेल. तुमच्याकडून इन्स्पिरेशन घेऊन मी गेले २ आठवडे ओमॅड करते आहे. आणि मस्त वाटतंय! >>

बापरे, मला अहोजाहो. Happy

हो पोस्ट करतो थोड्यावेळात.

>>>अजून एक गोष्ट सुधारता येइल असं अलिकडे लक्षात आलं. ऑवरॉल जरी कॅलरी कंट्रोल मध्ये असल्या, तरी एका वेळी जास्त खाललं जातय. म्हणून आता आज पासून सगळे मील्स ब्रेक करणार आहे. साधारण २००-३०० कॅलरीचे मील्स दिवसातून ५-६ वेळा. बघू काही फरक पडतो का.
हो पडतो त्यानी फरक!
मी हल्ली खूप रँडम रूटीन करते. काही दिवस नीट फास्टिंग, आणि काही दिवस असे २००-३०० कॅलरी अशी ४-५ मिल्स.
हल्ली उन्हाळा आहे त्यामुळे खूप खावंसं वाटत नाही. म्हणून त्या छोट्या मिल्स मध्ये मस्त सॅलड्स करते.
त्यात अजून नट्स, गार दही असे छोटे छोटे स्नॅक्स असतील तर अजून छान वाटते.

४-५ छोटे मिल्स घेतेना मात्र अगदीच काटेकोरपणे पाळावे लागते. तिथे थोडं ओव्हरइटिंग सुद्धा चालत नाही.

>>>बापरे, मला अहोजाहो.

इथे सगळेच सगळ्यांना अहो जाहो करतात! म्हणून उगीच!

Pages