किस्से आणि निरीक्षणं (भाग ९)....”तन्मय”- एक रहस्यमय प्रवास.

Submitted by बग्स बनी on 13 April, 2017 - 19:22

आईशप्पथ...सव्वा दहा झाले...आज पण बॉसचा ओरडा खावा लागणार. श्या.... मनगटावर असलेल्या घड्याळात नजर घालून कळवळीनं कपाळावर हात मारला, त्यात पण केसांतून तसाच हात फिरवण्याचा मोह नाही आवरला. झपाझप पाउलं टाकत रस्ता क्रॉस केला. आज आकाश मोकळं होतं. बऱ्याच दिवसांनी पाउस उघडला होता. “ह्या गाडीला पण आजच बंद पडायचं होतं....” मनातल्या मनात दोष देत बिल्डींग खाली पोहोचलो. इतक्यात फोनची रिंग वाजली. एकदम धडकीच भरली, लिफ्टने न जाता तड्क पायऱ्यांनी धावत सुटलो. धापा टाकत ऑफिस च्या बाहेर आलो. केसं, इन सावरत दरवाजा उघडून आंत शिरलो. माहौल शांत होता तसा. बॉस आपल्या केबिन मध्ये पेपरात डोके घालून बसला होता. हळूच जाऊन मी आपल्या डेस्कवर अतिक्रमण केलं. थोडावेळ बसून रिलॅक्स झालो, बॅगेतून पाण्याची बॉटल काढून तोंडाला लावली. घटा घटा त्यातलं पाणी डोळे झाकून पिऊ लागलो. थोडा वेळ तसाच निघून गेल्यानंतर बॉस ने मला त्याच्या केबिन मध्ये बोलावलं.

झालं...आता बोलणं ऐकायला रेडी होऊयात. असंख्य प्रश्न घेऊन सरांच्या केबिन मध्ये डोकावलो...दरवाजा क्नॉक केला...

"कम इन..." पलीकडून आवाज आला.
"सर बोलवलंत.?" मी खुर्चीत बसत विचारलं.
आपल्या लॅपटॉप मध्ये डोकं खुपसत सर म्हणाले..."आज उशीर झाला..?"
"हा....ते....त.ग.....गाडी बंद पडली मधेच...म्हणून.., पण मी वेळेतच निघालो होतो सर...खरंच." अडखळत मी स्पष्टीकरण दिलं.
"इट्स ओके,... ते प्रियांका टी. व्ही. एस. (पनवेल) मध्ये कोण गेलं होत.?, सकाळी त्यांचा फोन आला होता. दे स्टील ह्याव ईश्शयु. काय झालंय नेमकं.?"
आज सूर्य पश्चिमेला उगवला कि काय..? चक्क उशिरा येण्यावरून काहीच नाही बोलले. एरव्ही अशी संधी कधीच न सोडणारा हा माणूस आज "इट्स ओके" बोलतोय.. चक्क इट्स ओके...? दाल मे कुछ काला जरूर है.
"काय विचारतोय मी..?" लॅपटॉप मधून डोकं वर काढत सर म्हणाले.
"हा सर... काल अजय आणि अँथनी ला पाठवलं होतं. त्यांचा सर्व्हरचा प्रॉब्लेम आहे. मी फॉलोअप घेतलाय, तुम्हाला मेल पण केलाय..." मी भानावर येत म्हणालो.
"उंदरांनी वायरिंग कुरतडलीय आणि रॅम ईश्शयु सर..." मी पुढे म्हणालो.
"ओके ओके...दॅट्स फाईन..बघतो मी." सर म्हणाले.
थोडा वेळ तसाच निघून गेला. मी सरांची केबिन न्याहाळत होतो. त्या भल्या थंड ए. सी. मध्ये सुद्धा मला घाम फुटला होता. थोडावेळ तसाच निघून गेल्या नंतर सर हळूच म्हणाले...
"तू कधी अलिबाग साईडला गेला आहेस का..?"
मी एकदम बुचकळ्यातच पडलो.
"हो...अम्म्म..नाही, नाही गेलो कधी.....का हो..?" मी विचारलं.
“काय नाही सहजच....यु मे गो नॉव” सर म्हणाले.
“ओके...” म्हणत मी उठून निघालो.

आज असं का विचारलं असेल बरं? पिकनिकला न्यायचा विचार आहे कि काय..? चल, हा काय नेतोय...काय माहित बुवा...असो...मनातल्या मनात विचार करत खुर्चीत विसावलो. आज दोन तीन कलिग्स अबसेन्ट होते. का बरं..?? आज तर पाऊस पण नाही.... मस्त पैकी सूर्य उगवलाय आज.....अय्या खरंच कि सूर्य उगवलाय. तरीच सर आज असा वागतोय. कुठून कुठे पोहोचलो. मनातल्या मनात हसत कामाला लागलो.
थोड्यावेळाने मला पुन्हा केबिन मध्ये बोलावलं.

"यार...आता काय...?" जरासं वैतागूनच मी केबिन कडे निघालो.

"काय सर.." मी डोकावून विचारलं.
"ये जरा काम आहे..." सर म्हणाले.
मी गुपचूप आत जाऊन बसलो. सरांनी एक पेपर माझ्या पुढ्यात ठेवला. मी तो अलगदपणे उचलून वाचू लागलो....
"काय आहे सर...?" मी वाचता वाचता म्हणालो.
मी वाचत होतो.....
" हा ऍड्रेस आहे...आणि बाकीची डिटेल्स.." सर हळूच पुटपुटले.
"....अ..लि..बा..ग..?" हा शेवटचा शब्द मी मोठयाने चित्कारला, मोठ्या आणि प्रश्नार्थक नजरेने सरांकडे पाहू लागलो.
एक, पाच-एक सेकंद तशीच गेल्या नंतर मी विचारलं...
"काय आहे इशू..?"
"आहे थोडाच छोटा मोठा..." सर म्हणाले.
"ओके, मी योगेश किंवा रविराज ला पाठवतो. असं म्हणत मी पुन्हा एकदा ऍड्रेस वाचला.
"जे.एस.डब्लू. (जिंदाल स्टील), डोलवी वर्क्स, वडखळ फाटा, गोआ गेट, पेण-अलिबाग रोड, अलिबाग, रायगड."
जिंदाल स्टील...नाव वाचून मी चमकलोच. अरे वाह...सही.. या आधी नुसतं नाव ऐकलं किंवा वाचलं होत...भारी...आता बघायला भेटलं तर...? कसं असेल...वैगेरे वैगेरे मी मनाशीच इमले बांधत होतो... असो, भानावर येत मी पुन्हा म्हणालो.
"सर योगेशलाच पाठवतो, हि विल हॅन्डल व्हेरी वेल.." आणि मी उठू लागलो.
"एक मिनिट..." सरांनी अडवलं.
बराचवेळ विचार करून सर म्हणाले...
"मी काय म्हणतो...तू का नाही जात..? म्हणजे तू जा....नाही म्हणजे तू जावंस अशी माझी इच्छा आहे..." अडखळत सर म्हणाले.
"मी.........???" डोळे एकदमच मोट्ठे करून सरांकडे पाहू लागलो.
"हा...म्हणजे बघ ना..तुला जमेल....तसं बाकीच्यांना नाही जमणार...प्लीज...नाव बघ ना....म्हणजे कंपनी मोठी आहे म्हणून...रेप्युटेशन चा प्रश्न आहे...प्लीज" सरांनी गोड बोलत स्पष्टीकरण दिलं.
"नाही, नाही, नाही.....नाय...नाय, नाय....च्याक...छे...सर अजिबात नाही जमणार..." मी ठाम पाने माझा नकार दर्शवला.
"आज वर मी कधी वाशीच्या बाहेर पडलो नाही एकटा...आणि आता एवढ्या लांब..?? छ्या...नाही..आणि असं हि हे माझं काम नाहीये, या कामासाठी तुमच्याकडे सेप्रेटली एम्प्लॉयी, इंजिनियर आहेत....त्या साठी मी...?" मी पुढे म्हणालो.
"प्लीज सर....प्लीज माझ्यासाठी...प्लीज सर..प्लीज"

आईच्या गावात...हा बिनसलाय का..? चक्क मला सर म्हणतोय....अरे काय बोलू याला मी...?
जाऊ दे मिळतोय मान घ्यावी हवा भरून...मी मनात पुटपुटत होतो. मी पूर्ण हवेत होतो, आता तर माझा भाव चांगलाच वाढला होता. सर काकुळतीला येऊन विनवण्या करीत होते. मी मध्ये मध्ये नकारघंटा वाजवत होतो.

"प्लीज ना...मी काय करू...? व्हॉट वुल्ड यु लाईक..?....ओके, आय विल पे डबल फॉर टुडे...व्हॉट से..ऑर टेक लिव्ह टुमारोव...बट प्लीज से येस...प्लीज" सरांनी विनविण्याची परिसीमा गाठली होती.
"नो सर, प्लीज सर...." मी म्हणालो.
पुन्हा दहा पंधरा सेकंद शांततेत गेल्या नंतर सर म्हणाले....
"ओके...व्हॉट अबाऊट इन्क्रीमेंट...?? आय विल हाईक युअर सॅलरी...ऑर एल्स प्रमोशन फिक्स..."
सरांनी सरळ बॉम्ब फोडला. मला काहीच सुचेनास झालं.
“नो सर...” मी म्हणालो.
“टेक थिस...” आपल्या खिशात हात घालून पाचशेची नोट माझ्या पुढ्यात आणत सर म्हणाले.
ती नोट घेता घेता राहिलो, भानावर येत म्हणालो.
“सर तुम्ही लाच देताय...??” आताशा माझी नकारघंटा थोडीशी मंदावली होती.
“असू दे तुला....खर्च...” सर म्हणाले.
“पण मी जातच नाहीये...” मी म्हणालो.
“प्लीज ना...तू कितिंदा हाफ डे घेतलायस, बिना नोटीस लिव्ह्स घेतल्यात...बरं जाऊ दे सगळं..... पण प्लीज..." सर म्हणाले.

मी तसाच विचार करीत बसून होतो. डील काय वाईट नाही. प्रमोशन वैगेरे वैगेरे....आणि असं हि फिरायला पण मिळेल. दिवसभर याच्याकडून डोकं खाऊन घेण्यापेक्षा हे बरं कि नाही...? जाऊयात, बघूया जे होईल ते होईल....जिंदाल...तरी पण आढेवेढे घेत मी म्हणणारच इतक्यात सर पुन्हा म्हणाले....
"नको विचार करुस...जा..."
"पण उशीर होईल...जायला दोन-अडीच तास...जाऊन येऊन पाच तास...आणि कामाला...."
"जास्त नाही एक दीड तासच...काम आहे." मला मधेच तोडत सर म्हणाले.
मी शांत पणे नाईलाजाने म्हटलो.
"बरं...ठीक आहे..."
सरांच्या तोंडावर तिसरं महायुद्ध जिंकल्याचा आनंद स्पष्ट दिसत होता.

मी उठलो. मनात जायचं हि होत, आणि नाही हि. मी माझ्या डेस्क जवळ आलो. तयारी केली. सामान आवरून मी तयार झालो. सगळे माझ्याकडे असे बघत होते कि जस काय मी मोठ्या युद्धाला चाललोय आणि परत येणारच नाही. मी रवाना झालो. बिल्डिंग खाली जाऊन मस्त पैकी वाफाळलेला एक कटिंग मारला. चार-पाच चिंगमच्या गोळ्या घेतल्या त्यातली एक तोंडात चघळू लागलो, आणि उरलेल्या खिश्यात सारल्या.
मस्त आभाळ आलं होत. चला म्हणजे आता उन्हाचं टेन्शन नाही. ऑफिसच्या गाडीवरून मार्गस्थ झालो. जाताना एवढं काही वाटलं न्हवत...आभाळ असल तरी पाऊस पडण्याची चिन्ह काही दिसत न्हवती...सूर्य आपले डोके मध्ये मध्ये वर काढत होता. मी आपल्याच धुंदीत बेभान निघालो होतो.

पनवेल सोडून आता एन. एच. १७, मुंबई-गोआ महामार्गावर लागलो. या आधी कधीच या भागात गेलो न्हवतो. म्हणून मी आरामात चौफेर नजर टाकत निघालो. हळू हळू जंगल गर्दी दाट होत चालली होती. वातावरण एकदम शीतल होतं. नागमोडी वळण घेत मी कर्नाळ्या जवळ पोहोचलो. तो भीषण पण रमणीय कर्नाळ्याचा डोंगर माझ्यासमोर आ वासून उभा होता. आत्ता गिळतो कि काय असा भास होत होता. मी पुढे जात राहिलो. सगळं कसं प्रसन्न वाटत होत. पुढे पेण मध्ये आल्यावर मी पाय मोकळे करण्यासाठी उतरलो. पुन्हा एकदा चहा घेतला. भीती तशी होतीच...पण मुळात ट्रॅव्हेलिंगची आवड शिवाय असे बरेच महामार्गीय अनुभव पदरी असल्याने एवढं काही वाटत न्हवत. बऱ्याचदा या भागाकडील अनेक हॉरर, चोऱ्या-दरोड्याच्या, भुताखेतांच्या स्टोऱ्या ऐकल्या होत्या. त्यामुळे त्याचा विचारही मनांत होताच. परंतु सकाळची वेळ असल्याने मी रिलॅक्स होतो. जवळ जवळ दोन अडीच तासांनी म्हणजेच पाऊणेएक - एक च्या दरम्यान मी इच्छित स्थळी पोहोचलो.

खरं तर जिंदाल मध्ये जायच्या आधी मला आधी एका ठिकाणी जायचं होतं. वडखळ फाट्यापासून पाच साढे पाच किलोमीटर पुढे पोयनाड या गावात छोटंसं काम होतं. लॅपटॉप कलेक्ट करायचा होता. मी ठरवलं, उलट जाण्यापेक्षा आधी पोयनाड करून मग जिंदाल ला जाऊ...पत्ता शोधत मी निघालो.

तो पट्टाच पूर्णतः भारी होता. तसा हायवे भयानक असला तरी आजूबाजूचा परिसर खूप अल्लाहदायक होता. अगदी गावाकडे आल्यासारखं वाटत होतं. शोधत शोधत मी पोयनाड मध्ये पोहोचलो. या शोधा शोधीत पण माझा बराच वेळ गेला. तिथलं काम आटोपेपर्यंत तासभर माझा तिथेच मोडला. पण माझं वेळेकडे लक्ष न्हवत. कारण ते सगळं मला माझ्या आठवणींच्या खजिन्यात साठवून ठेवायचं होत. लांबूनच ती कंपनी दिसत होती अगदी ५-६ किलोमीटर लांबून. मग जवळून किती मोठी असेल. एका ठिकाणी थांबून मी लंच घेतला. आणि पुन्हा निघालो.
कंपनीत पोहोचायला मला जवळ जवळ ३.३० झाले. बाईक पार्किंगला लावून मी गेट जवळ पोहोचलो. एन्ट्री साठीच मला जेमतेम अर्धा तास राखडावं लागलं. तिथून पुढे मग गेट पास, आणि इतर फॉर्मॅलिटी. खूप स्ट्रिक चेकिंग होत ते. पहिल्यांदाच अनुभवत होतो. एन्ट्री मिळे पर्यंत चार वाजले. झाली...एकदाची एन्ट्री मिळाली. आतमध्ये माझ्यासाठी गाडी घेऊन क्लायेंट उभे होते. मी अवाक होऊन आजूबाजूला पाहत होतो. सगळं एकदम नवीन होत माझ्यासाठी. खरंच खूपच मोठी होती ती कंपनी. अठ्ठावीस एकरमध्ये (नक्की नाही माहित अठ्ठावीस किंवा जास्त हि असेल.) स्थिरावलेली एखादी सेपरेट सिटीच जणू. अगदी हुबेहूब बोर्ड, रस्ते, सिग्नल्स. त्यांचे स्वतःचे प्लॅंट्स, कंटेनर बग्गी, ट्रॅक, रेल्वे(मालगाडी)...वैगेरे वैगेरे...आणि बरंच काही. मी एकदम निशब्द होतो. तिथे आतल्या आत फिरायला देखील गाडीशिवाय पर्याय न्हवता.

फिल्ड वर पोहोचण्यात २५-३० मिनिटे गेली. पाच वाजता मी कामाला सुरुवात केली. खरं तर मला या वेळेला परत निघायला हवं होत. काम पूर्ण होईपर्यंत ६.३० झाले. तिथून मी निघालो. पुन्हा मला गेटपर्यंत सोडण्यात आलं. मग पुन्हा गेट पास वैगेरे फॉर्मॅलिटी...बराच उशीर झाला होता. आणि मी घरी देखील कळवलं न्हवत. सगळं करून मी बाईक घेऊन सव्वा सातला तिथून हललो. वडखळ फाट्यावर येईपर्यंत ७.३० झाले. अंधाराचे साम्राज्य पसरू लागले होते. आभाळ असल्याने अजूनच अंधार पडला. आभाळ हळू हळू गरजू लागले...

वडखळ वर येऊन थोडावेळ थांबलो. पूर्ण अंधार झाला होता. पाऊस पडण्याची दाट शक्यता होती. पुन्हा चिंगम घेऊन चघळू लागलो. इतक्यात पाऊस सुरु झाला. काही कळायच्या आतच संपूर्ण धरती पावसाने व्यापली. आणि पाऊसही इतका जोरदार....बाप रे...सुदैवाने माझ्याजवळ रेनकोट होता. पण एक अडचण होती ती म्हणजे आता माझ्याजवळ दोन बॅग होत्या. एक पाठीला आणि एक पोटाला लॅपटॉपची. पाठीवरची बॅग रेनकोटमध्ये झाकून जाईल पण दुसऱ्या बॅगेच काय...? ती असल्यामुळे रेनकोटची चैन हि लागणं मुश्किल होत. आत काय करायचं...? माझी एकदम धांधल उडाली. त्या अवस्थेमध्ये सरांचा आता खूप राग येत होता. वरच जॅकेट तसंच अडकवून रेनकोटची पॅन्ट न घालता ती पुढच्या बॅगे भोवती गुंडाळली. पाऊस धोधो बरसत होता. खिशातलं मौल्यवान सामान जस, मोबाईल, वॉल्लेट, पैसे वैगेरे बॅगेत आधीच टाकले होते. अजून हि आठवतंय ते पावसाचे टपोरे थेम्ब ताडताड हेल्मेटवर वाजत होते. खड्यांचा पाऊसच जणू. पहिल्यांदाच असा पाऊस अनुभवत होतो. डॉट पाऊणे आठला मी माझा परतीचा प्रवास सुरु केला. वडखळ सोडलं.

आतापर्यंत सोबत असलेला प्रकाश हळूहळू मंदावत होता. संपूर्ण परिसर काळोखाने गिळून टाकला होता. पाऊस इतका जोरदार होता कि पुढचं सगळं धूसर दिसत होत. आणि थेंबांचा मारा इतका जबरदस्त होता कि जणू काही गाराच तोंडावर आपटतायत. त्या भीषण पावसाच्या आवाजात गाडीचा आवाज कुठेच येत न्हवता. दूर दूर वर फक्त आणि फक्त अंधार. गाडीच्या हेडलाईटचाच काय तो प्रकाश. अंधार चिरत मी हळू हळू निघालो. जरास वेगळंच वाटत होतं. नाही नाही ते विचार येत होते. एव्हाना मी भिजलोदेखील फक्त बॅग्स तेवढ्या वाचल्या. आणि तेच हव होतं.

त्या विरान, सामसूम रस्त्यावर कोणच न्हवतं. फक्त मी आणि माझी गाडी सोडली तर. ती पण कसली...गाडीचा वेग कमी करायला गेलो कि हेड लाईटचा प्रकाशही म्हंद व्हायचा. भरपूर डेंजर सिचियुअशन होती. समोरच काहीच नाही...फक्त गाडीच्या प्रकाशाने कव्हर झालेला रस्ता तेवढाच दिसत होता. शिवाय अंतर हि जास्त. त्यामुळे हळू जाऊन चालणार न्हवत. त्या तशा सामसुम आणि भयावह रस्त्यात मी खूप रोमांचित झालो होतो. हृदयाचे ठोके वाढलेले स्पष्ट जाणवत होते. हॅन्डल आवळून धरलेल्या मुठी आता आखडल्या होत्या. थंडी वाजत होती.
मनात वेगवेगळे विचार येत होते. अचानक कोणी आडवं आलं तर...? किंवा एखाद भूत मागे लागलं तर...? किंवा....... आईशप्पथ मागे कसली तरी हालचाल जाणवली......मी पांढरा फिक्क पडलो. सगळीकडे जंगल. आणि हे....आता काय करू...? काय करू...? काहीच सुचेनास झालं. सगळ ठप्प झालं. हार्ट अटॅक यायचा बाकी होता. मी गाडीचा ऍक्सलरेटोर जोरात पिळला. गाडीने वेग धरला. मागच्या सीटवर कोण तरी आहे...मी विचार करू लागलो. मागे वळून बघण्याची हिम्मतच न्हवती. अक्षरशः रडकुंडीला आलो. आता काय करावं...? पुन्हा एकदा तसच जाणवलं....पण गाडी थांबवण्याची हिम्मतही न्हवती. कारण गाडी थांबवली असती तर आहे तेवढा उजेडही गायब झाला असता. आणि बंद झाल्यावर पुन्हा स्टार्ट च झाली नसती तर मग...? या मतामुळे मी गाडी कुठेच थांबवली नाही. रादर पायही टेकवले नाहीत.
“थांबवू का गाडी...? नाही नको...पण मग काय आहे मागे...मला चांगला आठवतंय मी नक्कीच एकटाच आलोय. मग...?”
गाडीचा वेग थोडा कमी केला...पण मनाचा वेग वाढत होता. जर मी मागे बघितलं आणि अक्राळ विक्राळ अस काहीस दिसलं तर...? किंवा त्याने माझ्यावर हमाला केला तर...? मी अगदी एखाद्या पुतळ्या प्रमाणे गाडीवर होतो.

मनात विचारांचा बराच कल्लोळ माजला होता काही एक मिनिटं गेल्यांनतर पुन्हा तसंच जाणवलं. आता माझे धाबे दणाणले होते. इतक्यात.... कड…कडाड..धडाड.... विजेने सगळं आकाश चमकून गेलं. त्यापाठोपाठ सारी धरतीही. मी एकदमच घाबरलो. चेहऱ्यावरचा रंग उडून गेला. घाबरून कचकन ब्रेक दाबला...गाडी स्लो झाली. आता काय करू...? काय करू...? मी मोठमोठ्याने मनात नामजप चालू केला. त्या सरशी पुन्हा मागे तसंच....आता तर वीजही चमकू लागल्या होत्या. इतक्या जोरात इतक्या जोरात अक्षरश: वीजा पडत होत्या. जोर जोरात गडगडाट...सोबत त्या क्षणापुरता परिसर उजळून जायचा...पावसाचे पडणारे थेम्ब काही काळ स्तब्ध व्हायचे. एकदमच भयानक परिस्थिती.

गाडीच्या वेगाने लागणारा गार वारा...भिजल्यामुळे वाजणारी थंडी. थंडीने आखडलेले हाथ पाय....भिजलेले शरीर...थंडीत कुडकुडणारे दात....चेहऱ्यावर आदळणारे पावसाचे टपोरे थेम्ब...आ वासून गिळायला उभी असलेली नागमोडी वळणं....रस्त्याच्या बाजूला असलेली, माझा तमाशा बघणारी झाडे...आणि या भयानक रस्त्यात सुन्न झालेला मी... आज हि ती अवस्था आठवली कि अंगावर काटा येतो....
"आजच व्हायचं होत हे सगळं...? ते पण माझ्यासोबत..? ओम गं गणपतये नमः..."
मनात खूप जोर जोरात नामजप चालू होता. घरची खूप आठवण येत होती. वळून बघायची अजून तरी माझी हिम्मत झाली न्हवती. तेवढे त्राणच न्हवते उरले अंगात...तरीही कसबस बळ एकवटून मी हळूच मागे पाहण्याचं ठरवलं...मनात निश्चय केला..."जे होईल ते होईल..." आन मान हळूच उजव्या बाजूला किंचित वळवली....फारसं काही दिसलं नाही....पण विजांच्या प्रकाशामुळे पडणाऱ्या सावलीत फक्त मी एकटाच होतो....मनात विचार आला "भुतांची तर सावली दिसत नाही...आता काय करायचं...? त्यासरशी पुन्हा मागे तसंच झालं. कोणाचा तरी मागे बॅगेला धक्का लागतोय आणि ती हालचाल होतेय... आता थोडीशी हिम्मत अजून वाढली...मी हिम्मत करून हॅन्डल वरचा डावा हाथ काढला...हात वळता वळत न्हवता... मग साईड मिरर चा अँगल मागची बाजू दिसेल अशा पद्धतीने फिरवला. आणि वाट बघू लागलो...वीज चमकण्याची. वीज चमकली...प्रचंड गडगडाट झाला. मी श्वास रोखून त्या आरश्यात बघत होतो.....मागे कोणीच न्हवतं...तरी पण मनाला खात्री न्हवती... ते विचार डोक्यातून जाता-जात न्हवते...
पुन्हा थोडीशी हिम्मत करून मी माझा हाथ मागे नेला...हळू हळू...मागच्या सीटला चापचलं. हाथाला काहीच नाही लागलं. पुन्हा तसंच झालं. आता तर माझा हाथ पण मागे होता...मग बॅगेची हालचाल कोण करतंय...?? मी तसंच घाबरत घाबरत हाथ बॅगेवर नेला...........

आयचा घो या मोबाईलच्या......मनात माझाच राग आला आणि हसू हि...माझा फोन वाजत होता, व्हायब्रेट होत होता.....अक्षरश मला घाबरवून सोडलं.
आता मी बराचसा रिलॅक्स झालो...पण हृदयाची धडधड अजून वेगातच होती. हार्ट अटॅक ने मरायची बारी आली. माझं ते पुतळा होणं...वैगेरे त्या अवस्थेला मी माझाच हसत होतो...आयुष्यात कधीच घाबरलो नाही इतका आज घाबरलो.

तसंच मजल-दरमजल करत, नागमोडी वळणं घेत मी निघालो...मधेच एखादी गाडी यायची आणि झपकन निघून जायची...शेवटी मी एकटाच...आता मी पूर्णपणे रिलॅक्स होतोय न होतोय तोवर एका वळणावर विजेच्या प्रकाशात, रस्त्याच्या कडेला एक काळीभोर आकृती दिसली...सुरुवातीला मी इग्नोर केलं....पण पुन्हा तसंच...प्रत्येक वळणावर ती आकृती तशीच दिसायची....विजेच्या प्रकाशात दिसायची नंतर लगेच गायब...आता तर मी चमकलोच... काय खेळ मांडलाय यार...मनातल्या मनात दात ओठ खात होतो....बराच वेळ झाला होता मी ना गाडी थांबवली होती..ना पाय टेकवले होते...चिंगम चघळून चघळून जबडा सुन्न झाला होता...पावसाचा आणि विजांचा जोर आता आणखीनच वाढू लागला होता...ते टपोरे थेम्ब चेहऱ्यावर बोचत होते. डोळ्यांना धडक मारत होते..त्यामुळे समोरच बघणं हि अशक्य झालं होत...मला आता कोणाच्या तरी सोबतीची गरज तीव्र भासत होती... त्यामुळे एखादी गाडी बाजूने गेली कि मी तिच्या सोबत येण्यासाठी प्रयत्न करत होतो...पण एवढ्या भीषण परिस्थितीत गाडी जोरात पळवणे अशक्य होत...

"एक दीड तास झाला असावा..." मी आपला अंदाज मांडला...आपण कुठे आहोत हे देखील माहित न्हवत. बस लवकरात लवकर पनवेल ला पोहोचायचं एवढंच मनात पक्क होत. रस्ता सरता सरत न्हवता...कधी एकदा बाहेर पडतोय असं होत होत...पण अजून मेन पॉईंट तर बाकीच होता....."कर्नाळा".

"अरे बापरे अजून हे आहेच का...? मी आणखीनच गळटलो...आधीच हे दोन धक्के आणि त्यात आता नुसता विचार करूनच हालत बेकार झाली...कर्नाळा जसजसा जवळ येत होता तस तसं माझी धाकधूक वाढत होती....कर्नाळ्या जवळ पोहोचलो...त्या नागमोडी रस्त्यांवरून मी जाऊ लागलो....इतक्यात एका वळणा नंतर लांब पुढे एक टेल लाईट दिसली...जरासं हायस वाटलं...पुन्हा एकदा ऍक्सलरेटोर पिळलं आणि भरधाव निघालो....काहीही करून त्या गाडीला मला गाठायचं होत..मी त्या गाडी जवळ पोहोचलो...माझ्या हेड लाईट मुळे ती गाडी प्रकाशित झाली....हत्तीच्या हा तर एक ट्रेलर आहे...

एक लांब सडक ट्रेलर त्यावर स्टीलचा हा भाला मोठ्ठा रोल...गाडी नेरुळ साईडची दिसत होती...एम.एच.४६...त्या गाडीवर मागे मध्यभागी मोठ्या अक्षरात नाव लिहले होते..."तन्मय..".
काय फायदा म्हणून मी त्या ट्रेलर ला ओव्हर टेक करून पुढे निघालो....कर्नाळा क्रॉस केला...झालं...बरंचसं मळभ हटलं होत...मग मी पुन्हा विचारांच्या गर्ततेत बुडालो...काही पाच एक किलोमीटर गेल्यावर पुन्हा एक ट्रेलर दिसलं...अगदी सेम...तेच नाव...तोच रोल...आणि अगदी तशीच किंवा तीच गाडी....मी पुन्हा त्या ट्रेलर ला ओव्हर टेक करून पुढे गेलो.....पुन्हा पाच एक किलोमीटरवर गेल्यावर पुन्हा तेच...तोच, तसंच ट्रेलर....असं जवळ जवळ ७-८ वेळा झालं. आता मनात शंकेची पाल चुकचुकली....भलते सलते विचार मनात येऊ लागले....
"आपण चकव्यात तर अडकलो नाही ना...?...नाही नाही....शक्यच नाही....मग ते ट्रेलर...? नाही, काही नाही, असं काही नाही..." मनातल्या मनात मी समजावत होतो..."आता आपण गाडीचा नंबर बघू नीट...." मी मनाला समजावलं...पण भीती होतीच. बरेच विचार करीत मी रस्ता संपवत होतो. असं करत करत मी पनवेलच्या ४-५ किलोमीटर मागे पोहोचलो होतो. थोडंसं अजून हायस वाटलं....पण...इतक्यात पुन्हा तो ट्रेलर....माझा घसा कोरडा पडला...आपसूक मी स्लो झालो...मी स्लो झालो न झालो तोवर तो ट्रेलर हि स्लो झाला...आता काय करू...? थांबू का..? नाही नको...जाऊ या पुढे.." मी निघालो...जस जस ट्रेलर च्या बाजूने जात होतो तस एक वेगळच दृश्य दिसलं...त्याच ट्रेलर च्या पुढे काही ५-१० फूट एक अजून एक तसाच ट्रेलर होता....आणि प्रत्येकावर तन्मय नाव लिहिलं होतं...
माझे सगळे गैरसमज दूर झाले...जे काही न्हवतंच त्याचा विचार करून माझी मी अवस्था करून घेतली होती...उगाचच...

खरंच जर कोणी असतं मागे तर..?, जर ती आकृती मला आडवी आली असती तर..?, आणि खरंच तो चकवा असता तर...? विचार करता करता मी NH सोडला...पुढे एक बोर्ड वाचला..."पनवेल मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे..." जीवात जीव आला...मला हे सगळं विसरायचं होतं. या वाईट स्वप्नातून बाहेर यायचं होतं. घड्याळात १०.३० झाले होते....

आता भिजलेला, थरथरणारा, घाबरलेला, थकलेला असा मी, सुसाट माझ्या घराच्या दिशेने निघालो....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बोअर झाला वाचताना. बॉस याला अगदी सर म्हणेपर्यंत काय काम अडले होते याचा पत्ताच लागला नाही. वाशीच्या बाहेर कधी न गेलेल्याला, ज्याला जिंदालला जाण्यासाठी बॉसने फक्त पायावर डोके ठेवायचेच बाकी ठेवलेले, त्याला अजून पुढे 5 km पोयनाडला जाण्यासाठी कोणी फितवले तेही कळले नाही. आणि शेवटी, कर्नाळ्यासमोरून जाणाऱ्या रस्त्यावर प्रचंड ट्राफिक असतो. तो ट्राफिक नको म्हणून आम्ही चिरनेरवरून जायचा रस्ता , लांबचा असला तरी, घेतो कधीकधी.

आधीच्या गोष्टी आवडलेल्या, म्हणून. कथा विनोदी असेल तर मात्र माबुदोस.

बॉस एवढा प्लीज सर प्लीज सर म्हणुन अजीजी का करत होता म्हणे?
भारीच बॉस आहे तुमचा >>>
होय सस्मित जी नगच आहे म्हणजे होता माझा बॉस....खरंच नेम न्हवता कधी काय बोलेल..वागेल....चौथ्या भागात लिहिल्याप्रमाणे....चौथा भाग हा खास त्यांच्यावर आहे... Happy Wink खूप खूप धन्यवाद.... _/\_
तो भाग वाचण्यासाठी....
भाग ४

बोअर झाला वाचताना. बॉस याला अगदी सर म्हणेपर्यंत काय काम अडले होते याचा पत्ताच लागला नाही.>>> आमचे सरच जरा विचित्र होते. पटकन काहीही बोलून जायचे.

वाशीच्या बाहेर कधी न गेलेल्याला, ज्याला जिंदालला जाण्यासाठी बॉसने फक्त पायावर डोके ठेवायचेच बाकी ठेवलेले, त्याला अजून पुढे 5 km पोयनाडला जाण्यासाठी कोणी फितवले तेही कळले नाही.>>>>>> त्या पेपरवर, जो माझ्यापुढ्यात सरकवला होता. त्यामध्ये दिलं होतं, मी मुद्दामून ते नमूद नाही केलं. कारण जर मी सगळ्या बारकाव्या लिहिल्या असत्या तर स्टोरी खूप मोठी झाली असती. Wink

आणि शेवटी, कर्नाळ्यासमोरून जाणाऱ्या रस्त्यावर प्रचंड ट्राफिक असतो. तो ट्राफिक नको म्हणून आम्ही चिरनेरवरून जायचा रस्ता , लांबचा असला तरी, घेतो कधीकधी. >>>> पण ट्रस्ट मी त्या दिवशी खरंच तुरळक ट्राफिक होतं....किंवा मग मी हळू निघालो असल्याने मला नसेल जाणवलं....पण न्हवती जास्त वाहन...जिथपर्यंत मला आठवतंय....९-९.३० च्या दरम्यान...

आधीच्या गोष्टी आवडलेल्या, म्हणून. कथा विनोदी असेल तर मात्र माबुदोस. >>>>> मनापासून धन्यवाद....साधनाजी Happy
बाकी हे माबुदोस काय आहे..?

खूप मस्त खिळवून ठेवणार लिखाण वाटलं..... मी चौथा भाग वाचला त्यामुळे तुमच्या बॉस च वागणं डोळ्यासमोर उभं राहील शिवाय तो रास्ता .......मी बाईक ने गेलीय त्या रस्तावरुन पावसाळ्यात कंटेनर शिवाय काहीही वाहन नसते त्या रोड ला त्या वेळी .....आणि त्यामुळे लिखाण रिलेट झालं .....खूप वेळा केलाय तिथून प्रवास ..... अजून वाचायला आवडेल ......

एन. एच. ७, मुंबई-गोआ महामार्गावर लागलो>> मुंबई-गोवा महामार्ग एन. एच. १७ होता तो बदलून आता एन. एच. ६६ आहे.

खूप खूप धन्यवाद दिनेश जी.... Happy _/\_

खूप खूप धन्यवाद टीना जी ..... Happy _/\_

हि विनोदी होती ?>>>>>>म्हटलं तर हो म्हटलं तर नाही पण....तुम्ही ज्या भावात वाचाल ती तशी आहे....