संवाद - वीणा जामकर / सोनाली नवांगुळ

Posted
7 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
7 वर्ष ago

’वळू', 'गाभ्रीचा पाऊस', 'विहीर', 'जन्म', ’बेभान’, ’मर्मबंध’, 'लालबाग परळ', ’तुकाराम’, 'पलतडचो मुनिस', 'कुटुंब', 'मित्रा' असे चित्रपट असोत, किंवा 'चार दिवस प्रेमाचे', 'एक रिकामी बाजू', 'दलपतसिंग येता गावा', 'खेळ मांडियेला', 'जंगल में मंगल', ’दावेदार’, ’वदनी कवळ घेता’, ’तीच ती दिवाळी’ यांसारखी नाटकं, वीणा जामकर यांचा अप्रतिम अभिनय कायमच समीक्षक व प्रेक्षकांकडून वाखाणला गेला आहे. वयाच्या पाचव्या वर्षी रंगभूमीवर पदार्पण करणार्‍या वीणा जामकर यांनी व्यक्तिरेखेचा सखोल अभ्यास आणि भूमिकेशी समरस होण्याच्या वृत्तीमुळे एक उत्तम व सजग अभिनेत्री म्हणून ओळख निर्माण केली आहे. आजपर्यंत त्यांनी नऊ नाटकं, तेरा एकांकिका, दोन दीर्घांक आणि बावीस चित्रपटांतून अभिनय केला आहे. त्यांची भूमिका असलेले अनेक चित्रपट व लघुपट कान, टोरंटो, बर्लिन अशा बिनीच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत गाजले आहेत. 'पलतडचो मुनिस' या त्यांची प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटाला टोरंटो चित्रपट महोत्सवात समीक्षकांचं पारितोषिक मिळालं होतं. ’बेभान’ या त्यांच्या पहिल्याच चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा महाराष्ट्र राज्य पुरस्कार त्यांना मिळाला होता. २०१० साली ’लालबाग परळ’ या चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्रीचा म. टा. सन्मान व मिफ्ता पुरस्कार त्यांना मिळाला होता. याशिवाय नाटकांमधील त्यांच्या कामगिरीसाठी नटवर्य मामा पेंडसे पुरस्कार, मामा वरेरकर पुरस्कार व प्रतिष्ठेचा तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.

२०१६ सालच्या 'पर्ण' दिवाळी अंकात श्रीमती सोनाली नवांगुळ यांनी श्रीमती वीणा जामकर यांची सुरेख मुलाखत घेतली होती. ती मुलाखत पुनर्प्रकाशित करत आहे.

Veena1.jpg

वीणा जामकर. चित्रपट केवळ मनोरंजनासाठी बघणार्‍या प्रेक्षकांपासून ते जाणकार अभ्यासकांपर्यंत कौतुक मिळालेली अभिनेत्री. रायगड जिल्ह्यातल्या उरण या आपल्या गावातून बालनाट्यांमधून उत्कृष्ट कामं करत महत्त्वाच्या बक्षिसांची मानकरी ठरलेली वीणा आज राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पुरस्कारांनी गौरव झालेलं एक महत्त्वाचं नाव आहे. महाविद्यालयीन काळात नटवर्य मामा पेंडसे, मामा वरेरकर यांच्या नावाचे पुरस्कार अभिनयासाठी पटकावणार्‍या वीणाच्या नावावर आज विसाहून जास्त चित्रपट व नाटकं आहेत. अनुभवांतून परिपक्व होत जाताना ती काय व कसा विचार करते, तिच्या प्रतिक्रिया कशा ठरत जातात, बदलत्या काळाच्या कोलाहलात ती स्थिरचित्त राहू शकते का, वगैरे अनेक प्रश्‍न होते. यांतल्या काही विषयांना घेऊन झालेल्या या मोकळ्या गप्पा.

वीणा, काळ फार झरझर बदलतोय. मराठी सिनेमे भरपूर येताहेत, पण आता जुन्या नटांसारखी दीर्घ कारकीर्द लाभण्याचे दिवस नाहीत. तू अगदी जुनीही झाली नाहीस व नवखीही उरलेली नाहीस, तेव्हा आता कारकिर्दीसंबंधात, या काळासंबंधात तुझ्यासमोर कुठले प्रश्‍न असतात?

हं, हा बदलाचा वेग नि स्वरूप प्रचंड थकवणारं आहे. हे खरंय की, माझ्याकडे हाताच्या बोटावर मोजून सांगायला पूर्ण केलेल्या कामांची संख्या आहे. त्यामुळे एक 'एस्टॅब्लिश्ड अ‍ॅक्टर' म्हणता येईल मला माझा बायोडेटा वाचून. तरी ‘आज’ तुम्ही किती व्यावसायिक आहात, किती लोक तुम्हांला ओळखतात, यांवरच बरेचदा यशाचं गणित ठरवलं जातं. कुठल्याही शहाण्या माणसाच्या बुद्धीला यशासाठी असे चाकोरीतले ठोकताळे पटत नसतात. मात्र या सगळ्याचा रेटा इतका असतो आणि आहे की, तुम्ही विनाकारणच जगात सगळ्याला व सगळ्यांना उत्तर देण्यास बांधील होऊन बसता. उदाहरण सांगते, मी एका गावाला गेले होते तेव्हा एकांनी विचारलं की सिरीयल नाही का करत तुम्ही? हा नेहमीचाच प्रश्‍न. मला कधी यात तथ्यच वाटलं नाही. दैनंदिन मालिकांमधला अभिनय, काही सन्माननीय अपवाद वगळता, मला अभिनय वाटलेला नाही. त्यात काहीही घडत नाही. मुंबईत माझ्या घरी असताना मी संध्याकाळचा टीव्ही लावत नाही, पण आईबरोबर असताना ते कानावर पडतंच. ऐकताना मला जाणवतं की, यात करण्यासारखं काहीच नाही. शेवटचा पर्याय म्हणून तो घ्यावा लागेल, इतकंच. एखादा निराळा लेखक, दिग्दर्शक या एकसुरी प्रकरणात जान आणू शकतात, याची उदाहरणं आपल्याकडे आहेत. पण लोक विचारतात तेव्हा सांगते, ‘नाही हो आवडत मला. त्यात अजून तरी इतकं इंटरेस्टिंग काही वाटत नाही.’ मग पुन्हा प्रश्‍न येतो की, ते इतकंच बिनमहत्त्वाचं असेल तर मग बाकीचे का करतात? एखादी कल्पना पटली तर करायला हरकतही नाही, पण ‘सगळे करतात म्हणून तुम्हीही करा’ हा काय प्रकार आहे? या सगळ्या रेट्यामध्ये तुम्हांला काही वेगळं करायचं असेल, अभिनयाकडे, कलेकडे बघायचा तुमचा विचार वेगळा असेल, व्यावसायिक चित्रपटसृष्टीकडेही बघण्याचा वेगळा कोन असेल, तर ते जिथं जास्ती जास्त सापडू शकतं ते का नाही करायचं? ‘एक रिकामी बाजू’ किंवा ‘दलपतसिंग येती गावा’ यांसारखी नाटकं करताना तुमच्याकडे जे स्वातंत्र्य असतं, हवं ते करून बघण्याची ताकद लावायला मिळते, त्याचं समाधानच वेगळं असतं. शिवाय अभिनेता म्हणून जोखीम कमी असते. तुमच्यावर कुणीतरी करोडो रुपये लावलेले नसतात, त्यामुळे नाटकाचे प्रयोग किती होतील याची जबाबदारी तुमच्यावर नसते. नाटक चालेल की नाही याचा ताण तितक्या प्रमाणात नसतो, जो सिनेम्याच्या बाबतीत असतोच. चित्रपटाच्या बाबतीत काही करून बघण्याचा तसाच्या तसा आनंद जोवर तुम्ही प्रत्यक्ष सेटवर असता, तोवर असतो. पण आजच्या काळात चित्रपट एक प्रॉडक्ट म्हणून विकताना मला निखार्‍यावर पाय ठेवून चालल्यासारखंच वाटतं. गेल्या दोनतीन वर्षांत एकूण चित्रपटक्षेत्राबद्दल माझी जाण वाढल्यावर मला हे जाणवतं आहे. भयानक वाटतं. त्यातूनही तुमचा मार्ग शोधण्याकडे आटापिटा चाललेला असतो. आपल्याला आपल्याच पद्धतीचं काम करायचंय, चांगलेच व्यावसायिक सिनेमे करायचेत आणि पुन्हा ते व्यावसायिकदृष्ट्या कसे चालतील यासाठीही काम करावं लागणार. हा असा विचार करताना अवतीभवतीचं जग हे रूढीप्रियच असतं. ते पुन्हापुन्हा विचारत राहतं, इतके लोक करतात तर तुम्ही का करत नाही डेली-सोप? अशावेळी मला चेतन दातारची खूप आठवण येते. असं वाटतं की, या दहा वर्षांत जग केवढं बदललं! दहा वर्षांपूर्वी मी आले तेव्हाही नाटकं, सिनेमे यांकडे बघताना ‘कला’ असा एक दृष्टिकोन होता, तो आता बदलला की काय, असा प्रश्‍न पडतो. असं का वाटतंय की, तो जमाना आता लोपला, जेव्हा वेडझवी माणसं अभिनयाचा किंवा कलेचा झपाटल्यासारखा विचार करून त्यात अख्खं आयुष्य मुरवायची? त्यातनं ‘छनछन’ किती वाजेल याचा विचार ती करायची नाहीत. ही लेखक-दिग्दर्शक-कलाकार माणसं कुठेच कशी दिसत नाहीत? की आपणच आता त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही? अचानक असं काय घडलं की, या वेगाशी जुळवून घेण्यात तथ्यच वाटत नाही? असं नाहीये की, आपल्याला काही कळेनासं झालंय, आपण दमलोय, म्हातारे झालोय. पण वेगाशी जुळवूनच का घ्यायचं याचं लॉजिक सापडत नाही... लागत नाही! अभिनय होऊन जातो, खरं तर तो मुद्दा सध्या माझ्या डोक्यात नाहीये. पण मुळात तो करायचाच कोणासाठी? कसा? का? आपण अभिनेते का आहोत? आणि ज्या कारणानं आपण अभिनय करायला लागलो ते खरोखरी साध्य होणारे की मार्केटिंगच्या या रेट्यात जी मूल्यं महत्त्वाची वाटतात ती टिकणार, नाही टिकणार? आपण जे करतो त्यासाठी त्याचा प्रेक्षक राहील की नाही? प्रश्‍न खूप आहेत...

बदलत्या काळाच्या सवयी अंगवळणी पडत जातात. ज्याच्या त्या पडत नाहीत तो त्याला नकळत बाजूला फेकला जाणारे. जर काळ 'वाजवून घेण्याचा' आहे, तर तगण्यासाठी काळाची गरज म्हणून मिळेल त्या माध्यमातून वाजवून घ्यावं वाटतं?

वाजवून घेण्याचीही साधनं फार नाहीत. आहे तो जास्तीजास्त दर्शकांपर्यंत सहज उपलब्ध टीव्हीचा पडदा. त्यावर काय आहे? तर रोजच्या मालिका किंवा नाचगाण्याचे कार्यक्रम. या व्यतिरिक्त दोन्ही गोष्टींचं संतुलन साधता येईल, असा पर्याय तुमच्याकडे नाहीये. म्हणजे एकतर तुम्ही मालिका करा किंवा सिनेमात काम करा. अर्थात हे चित्र सहा महिन्यांतही बदलू शकते. याबद्दल भाकित वर्तवता येत नाही.

म्हणजे असं का की, तुझी क्षमता शोषून घेईल असं सध्या तुला काही दिसत नाहीये...?

अर्थातच! सध्याचं वातावरण पाहता मग हाच एक पर्याय राहील की, काही काळ पैसे कमावायचे आहेत, त्याला द्या व उरलेल्या वेळेत तुमचं काम करा. पण आतून जो विचार केला जातोय आणि जे वागायचं ठरवलं जातंय त्यात तफावत वाटते. माझ्यावर वेळ आली की मलाही या चक्रात जावंच लागणार आहे. जशी गेली दहा वर्षं मी ’काहीतरी करता येईल वेगळं’ अशी स्वत:तली रग ठसठसती ठेवून स्वत:ला ताणून धरलं आहे, तसं अजून सहा महिने, वर्षभर ताणून धरू शकेन! अंगातल्या रगेनंच आपण जो मार्ग निवडतोय त्यातून काय निष्पन्न होईल, काही नवं घडवता येणारे अथवा नाही, याचा विचारच करू दिला नाही. निव्वळ करत राहिले. आम्ही कॉलेजला असताना आमच्या पिढीवर झालेले हे संस्कार होते की, तुम्ही फक्त काम करा, प्रसिद्धीसाठी झटू नका, ती आपोआप तुमच्यामागे येते. पण आजचं चित्र अगदी उलट आहे. तुम्हांला स्वत:ला प्रसिद्ध करावंच लागतं. त्याच्यासाठी मग फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, स्वत:चा पीआर आला. तुम्ही काय केलं यापेक्षा तुम्ही ‘किती दिसता’ हे महत्त्वाचं झालं. जे शिकलो त्यापेक्षा विरोधात जाणारं हे वर्तमान. याचा वेग कळायच्या आत सगळं उलटसुलट झालं. आपण आपलं काम करायचं, पुरेसे कष्ट करायचे, तर मग लोकांचं लक्ष जातंच... तुमची मेहनत लपून राहत नाही. ही जी सगळी मूल्यव्यवस्था होती, ती आता राहिली नाही, असं मला म्हणायचं नाही, पण तिचा परिणाम किंवा वेग कमी झाला आहे, असं वाटतं. ’वाजवून’ घेण्याच्या या जगामध्ये वाजवलं जातं तेच इतकं दिसतं की, कर्तृत्त्वाचा आवाज क्षीण होत जातो, गेला. तो आवाज टिकवून ठेवावा असं माझ्या बाजूनं मला वाटतं. पण यासाठी काळ, काम, वेग यांचं गणित ‘वेगळं’ राहणार, हे समजून टिकाव धरावा लागणार...

सारखे नवे ब्रॅन्ड लागतात माणसाला, तसं एखाद्या अभिनेत्रीनंही सगळ्या तर्‍हेचं दिसावं ही ही अपेक्षा असते. तुझं नृत्यकौशल्य, तुझं ग्रामीण बाजापेक्षा निराळं असणं, तुझं सूत्रसंचालनाच कौशल्य अशा कितीतरी गोष्टी समोरच आलेल्या नाहीयेत.

मी तेच म्हणतेय! हे फक्त माझ्याबाबतीत नव्हे, तर अशा वेगवेगळ्या गुणवत्तेच्या अभिनयक्षेत्रातल्या माणसांना आपली गुणकौशल्यं दाखवता येतील याची जी साधनं उपलब्ध आहेत, ती काय आहेत? रोज उपलब्ध असणार्‍या टीव्हीच्या पडद्यावर काय दिसतं? रोजच्या मालिका, विनोदी स्किट, बातम्या, पुरस्कार सोहळे, नाचाचे कार्यक्रम दिसतात. या माध्यमात पैसा आहे. अनेकजण आहेत ज्यांना असा प्लॅटफॉर्म हवा होता. तुमच्यामधलं ‘विशेष’ जे कोणाला माहिती नाही, ते माहिती करून द्यायची संधी इथं आहे. सध्या माझी मन:स्थिती ही आहे की, अभिनय तर करायचाच आहे, पण या सगळ्यामध्ये माझ्यातली रग न गमवता टिकायचं आहे. जर मला पोटातून काहीतरी वाटतं तर मला कष्ट करत, शोधत राहायला पाहिजे. माझ्या अभिनयात एक विलक्षण चैतन्य असलं पाहिजे. या सगळ्या कोलाहलामध्ये माझा आवाज टिकून कसा राहिल, हे पाहिलं पाहिजे.

कुठल्या भूमिकांमुळे तुला वाटेल की, आपल्या अभिनयक्षमतेचा बळी चाललाय?

भूमिकांमुळे तसं होत नाही. वाईटांतली वाईट भूमिका मिळाली तरी ज्या पद्धतीनं तुम्हाला सादर केलं जातं, त्यानं फरक पडतो. भूमिकेचं काय? भूमिका वाईट लिहून दिली, मला त्यात करण्यासारखं काही नसलं, तरी माझं एक शहाणपण वापरून मी ती भूमिका नियंत्रणात ठेवू शकते. कुठलाही बरा नट हे करू शकतो. बदलतं सगळं ते मार्केटिंगनं. सिनेमा तुमच्या जगण्यापेक्षा मोठा कधीच नसतो. ती एक कलाकृती आहे. ‘चिन्ह’चा गायतोंड्यांवरचा अंकच बघ. तो एक जगज्जेता कलाकार होता, त्यांची चित्रं आज करोडोंना विकली जातात. पण तो माणूस एका खोलीच्या घरात राहिला. पेटिंग करत असताना त्यांनी त्या कलेलाच महत्त्व दिलं. गायतोंडे त्यांच्या पेटिंगपेक्षा मोठे झाले नाहीत नि पेटिंग त्यांच्या जगण्याहून मोठं झालं नाही. म्हणजे तुमच्या व्यक्तिमत्त्वापेक्षा तुमची कला भारी ठरते का? मला नाही वाटत असं होतं किंवा व्हायला हवं.

पर्याय कमी असतील तर काही न काही स्वीकारत राहावं लागतं. तुझा काय विचार?

हो, खरंय. माझा प्रत्येक चित्रपट माझ्यासाठी मोठी भूमिका घेऊन येणारा नव्हता. उदाहरणार्थ, ‘भाकरखाडी ७ किलोमीटर’, ‘सरपंच भगीरथ’ असतील, नाहीतर ‘महादू एक मिथक’ असेल. या चित्रपटांमधल्या भूमिका काही ‘तप्तपदी’, ‘लालबाग परळ’ किंवा ‘लालबागची राणी’ यांच्यासारखे मोठ्या नव्हत्या. अगदी ‘टपाल’मधली भूमिकासुद्धा लहान असली, तरी त्या चित्रपटाची कथा, त्याचा दिग्दर्शक या सगळ्या गोष्टी मोठ्या असल्यामुळे कामाचा अनुभव येतोच. हे तुम्हाला करावंच लागतं. कुठल्याच नटाच्या जगण्यात असं नसतं की, त्याचा प्रत्येक सिनेमा ‘आऊटस्टँडिंग’ असेल. खूप वर्षांपूर्वी मी पुण्यात मुद्दाम समर नखात्यांना भेटायला व मनातल्या शंका मोकळेपणानं विचारायला गेले होते. मी म्हटलं त्यांना, ‘प्रत्येक सिनेमात मी ‘मीच’ आहे, माझ्यात काहीच बदल होत नाहीये... कपडे, कुंकवाचा आकार वगळता. आणखी फारतर साडीऐवजी नऊवारी येते. असं काही असतं का की नट स्वत:ला अमूलाग्र बदलतो, त्याच्या आवाजापासून सगळंच, तरीसुद्धा तो खोटा वाटत नाही, असं काय असतं? मी यासाठी काय करू?’ तेव्हा ते मला म्हणाले, ‘मी परीक्षक म्हणून किंवा अन्य कारणानं चित्रपट महोत्सवांना जातो, तेव्हा एखाद्या अप्रतिम अभिनेत्रीचा तद्दन फालतू सिनेमाही बघितलाय आणि त्याचवेळी तिनं काहीतरी भारी काम केलेला सिनेमाही बघितलाय. तू ठरवू शकत नाहीस की मी आता फार ग्रेट काम करते. तू काम करत राहिलं पाहिजे. जे आवडेल ते घेत राहिलं पाहिजे’. नखातेसरांचं हे बोलणं मला खूप उपयोगाचं झालं होतं. त्या वर्षी मी सात चित्रपट केले होते. ‘मित्रा’नंतर ‘लालबागची राणी’ येणार होता. त्यात दीड वर्षांचा काळ गेला. दरम्यान ‘भगीरथ’ येऊन गेला. कुठे कार्यक्रमांमध्ये जायचा प्रसंग आला की, लोक बोलता बोलता म्हणायचे, ‘मध्ये काहीतरी येऊन गेलं नं तुमचं? ट्रेलर पाहिल्यासारखा वाटतोय.’ तर कशानंतरी आठवण जागी राहिली. सतत चर्चेत राहायला दरवेळी तुम्हांला पर्याय नसतात आणि भारीच काम मिळेलं, असं नसतं, जगाच्या पाठीवर कुठेच असं नसतं. त्यामुळं त्याचा ताण येत नाही मला. मात्र झालंय असं की, जे काही माझ्यासमोर आलं, त्यातल्या निवडीमुळे माझं व्यक्तिमत्त्वच असं झालंय की मी थोडे सामाजिक अंगानं जाणारे चित्रपट करते, ’कमर्शिअल’ कामं मला मानवत नाहीत, असा समज होऊन बसलाय. अर्थात ’कमर्शिअल’ म्हणजे नक्की काय, हेसुद्धा एक कोडंच आहे. पण मराठी चित्रपटाचं बलस्थान ‘गोष्ट’ किंवा संहिता हीच आहे. अलीकडे हिट झालेले काही सिनेमे नि त्यातल्या अभिनयाला मिळालेला प्रतिसाद यामुळे काही गोष्टी बदलू पाहत आहेत. काळ वेगळा येतोय, तो समजून घ्यायला हवा.

तुझ्यावर टीका होते? काय होते?

तर तर! होते ना टीका. घरचे आणि जवळची मित्रमंडळी करतात, पण गंमत अशी की, टीका अभिनयावर नाही, वेगळ्या गोष्टीवर होते. बर्‍याचजणांचं म्हणणं असतं मी ’हिरोईन’सारखं राहत नाही.

म्हणजे कसं राहायचं?

म्हणजे काय? तो शोध माझाही चालू आहे... की म्हणजे डिझायनर कपडे घालायचे का? कुठले? जर मी कुणाची नक्कल करायला गेले नि स्वत:ला हरवून बसले तर फसलंच ना! प्रत्येकाचीच स्वत:ची एक पर्सनॅलिटी असतेच आणि तुम्ही चुकीच्या पद्धतीनं त्यावर कष्ट घेतले, तर काम बिघडून जाण्याची शक्यता अधिक. काही विशिष्ट कपड्यांत तुमचं व्यक्तिमत्त्व खुलून येतं, एक डौल येतो. हे तुमचं तुम्हांला कळावं लागतं. प्रेझेंटेबल राहण्याचा इतका ताण या आधी कधीच नव्हता. ‘लालबागची राणी’च्या वेळी जाणवलं मला हे. व्यक्तिगत आयुष्यात मी अत्यंत साधी राहते. कुठं विशेष कार्यक्रमाला चालले असेन तर मी अगदी व्यवस्थित तयार होऊन जाते. तुमचा चित्रपट चालला पाहिजे म्हणून 'प्रमोशनला जाताना ट्रेंडी कपडे घालून जा', असंही ‘मार्केट’ तुम्हांला सुचवतं. चित्रपट तशा पद्धतीनं चालला असता, तर इन्स्टाग्रामवर नि अन्य सोशल साईट्सवर ‘क्ष फॅन क्लब’, ‘क्ष टीम’ असे ग्रूप बनवून रोज फोटो का टाकत राहावे लागतात? या सगळ्या ग्रूपचे फॉलोअर वाढले म्हणून सिनेमा चालतो का? - नाही. कलाकार म्हणून तुमच्याकडून अभिनयाची, उत्तम कामगिरीची अपेक्षा असायची, तर त्याबद्दल कोणी चकार शब्द काढत नाही. कुणी चर्चा नाही करत. तुम्ही काय घातलं, तुम्हांला काय सूट होतं, तुम्ही ग्लॅमरस राहता का, रोज नवी हेअरस्टाईल दिसते का, हेच सारे प्रश्‍न नि व्यवधानं! - अरे अभिनय, त्यातले बारकावे, हुकलेल्या गोष्टी, नव्या गोष्टींची इच्छा, असं काही नाहीच का यार? याबद्दल फारतर रिलिजपूर्वी एकदोन प्रश्‍न विचारले जातात. गोंधळाची परिस्थिती आहे. कोणालाच काही समजेनासं झालंय. कुठलाच सिनेमा फार चालत नाहीये... आत्ता मी सिनेमाबद्दल जास्त बोलतेय कारण मी तेच करते आहे. नाटक चालू नाहीये सध्या...

Veena2.jpg

तुझा चेहरा सर्वपरिचित. सतत लोकांशी बोला, हसा, नीट वागा, याचा ताण जाणवतो? त्यासाठी स्वत:ला तयार कशी करते?

संयम ठेवावा लागतो. त्यासाठी मेहनत घ्यावी लागते. ते या प्रसिद्धीक्षेत्राचं बायप्रॉडक्ट आहे. ते सभ्यपणे आणि आकर्षकरीत्या हाताळताच आलं पाहिजे. जुन्या ओळखीच्या लोकांच्या तक्रारी असतात की, मी आता त्यांना वेळ देत नाही, गप्पा होत नाहीत. तेव्हा शक्य तितकं समजावून सांगायचं. एरवी मी वाईटपणा नाही घेत. कधीतरी माझ्या घरच्यांच्या ओळखीतले किंवा मला अपरिचित असणारे, अभिनयामुळे माझं कौतुक असणारे काही लोक खूप साधे असतात. मी पाच मिनिटं त्यांच्या घरात जाण्यानं माझं फार नुकसान नाही, मी विसरूनही जाईन, पण त्यांना ती पाच मिनिटं कायम लक्षात राहाणार असतात. आपल्याबद्दलची कडवट आठवण का ठेवावी लोकांच्या मनात? राजकीय पक्षांच्याबाबतीत मात्र मी मोकळेपणानं जमत नसल्याचं सांगते.

veena8.jpg

‘लालबाग परळ’मधले तुझे दोनतीन प्रसंग अगदी अंगावर येणारे होते. त्यातली तू साकारलेली मंजू भावनातिरेकात साडी सोडते किंवा मारवाडी दुकानदाराच्या तरूण मुलासोबत लैंगिक बाबींत पुढाकार घेताना दिसते. प्रथमच तुला इतकं एक्सपोज्ड पाहताना घरच्यांची काय प्रतिक्रिया झाली?

अग्गं ऽऽऽऽ फुल ड्रामा! सिनेमात लग्नाच्या प्रसंगात सप्तपदी होते, अन्य विधी होतात तेव्हा लग्न थोडीच करतो आपण! तशाच सीनसारखा हा सीन. उगीच अवाजवी महत्त्व कशाला द्या, म्हणून मी घरी याबद्दल काही बोलले नव्हते. हा एकूण सिनेमाही डार्क. त्या सिनेमाच्या प्रिमिअरला आमचं सारं कुटुंब कौतुकानं माझ्या गावाहून, उरणहून खास गाडी करून आलं होतं. मी आईबाबा बसलेल्या रांगेत गेले, त्यांना विचारलं, ’आवडला?’ - माझी आई, काका, काकू माझ्याकडे डोळे विस्फारून बघत होते की, ही आमचीच मुलगी आहे का, की ही नाहीच आमची मुलगी? आयुष्यात पहिल्यांदा त्यांच्या डोळ्यांत मला अनोळखीपण जाणवलं. एकीकडे मला हसायला येत होतं, नि दुसरीकडे टेन्शन आलं की यांना फारच जिव्हारी लागलेलं दिसतंय. कुणी काही बोलायलाच तयार नाही माझ्याशी. वडिलांना म्हणजे भाईंना म्हटलं, कसं वाटलं? भाई मोकळेपणानं म्हणाले, सुंदर! तरी पुढे रेटलं नि म्हटलं, तुम्हांला काही वाटलं नाही का? - त्याच मोकळेपणानं त्यांनी सांगितलं, ‘नाही. तुझा जॉब आहे तो. तुझा रोलच तसा आहे.’ मनातून हायसं वाटत म्हटलं, यार, आपले बापू सही आहेत. इतकी रॅशनॅलिटी जगण्यात दाखवू शकणं कठीण असू शकतं. सगळे परत उरणला निघाले. दुसर्‍या दिवशी आईनं सहज बोलताबोलता सांगितलं, ‘राणी, मला इतकी भूक लागली होती. काहीतरी खायचंय, वाटेत गाडी थांबवा, असं म्हणत होते. पण काका इतके रागावले होते की त्यांनी घर आल्यावरच गाडी थांबवली.’ मला धडधडलं. अरे बापरे! एवढा परिणाम होतो! - चार दिवसांनी काकांचा मला फोन आला, ‘राणी, सॉरी. आम्हांला तुला असं बघायची सवय नव्हती. दुसर्‍या हिरोईनला ‘असं’ बघताना काही वाटत नाही. कळतं की ती हिरोईन आहे आणि ती तिची भूमिका करते आहे. मात्र आमच्या घरातल्या मुलीला कुणीतरी स्पर्श करतं, तिच्या शेजारी कुणी झोपतं, हे काही सहन होत नव्हतं. धक्का बसला. काही सुधरेना. त्यावेळची आमची अवस्था नि त्यामुळे प्रतिक्रिया तू प्लीज समजून घे.’ खरंच होतं त्यांचं सांगणं. घरात कुणीच न स्वीकारलेला पेशा नव्या पिढीतलं कुणी स्वीकारतं, तेव्हा घरालाही तुमच्या सोबत यायला एक वेळ द्यावा लागतो. माझ्यापेक्षा तीन वर्षं मोठा असणारा भाऊ विशाल. त्याच्याबाबतीतही त्याला तो द्यावाच लागला होता. तो इंजिनीअरिंग करून मग पूर्ण वेळ आदिवाशांसाठी काम करायला लागला. इतकं शिकूनसवरून तो मागास ठिकाणी कुठे जाऊन बसला, म्हणून आई-भाईंना त्याचा राग यायचा कधी कधी. मग मी म्हणाले होते कधीतरी त्यांना की, तो अन्य देशात ठरवलेल्या पेशात काम करत असता, तर तुम्हांला नसतं काही वाटलं. तर तुम्ही तुमच्या घरच्या वळणापेक्षा वेगळ्या व्यवसायात असाल, तर घराला त्यातले ताणेबाणे ठाऊक नसल्याने वेळ द्यावाच लागतो.

आणखीही एक. संबंधितांपैकीच एकांनी विचारलं, सिनेमातून तुमच्याकडून एवढं किसिंग सीन वगैरे करून घेतात, मग पैसे का गं इतके कमी देतात? कसं उत्तर द्यावं या प्रश्‍नाचं? किसिंग सीनचं जाऊ दे, पण ’इतके कमी पैसे का देतात?’ हा प्रश्नही असतोच. मुळात प्रश्‍न तुम्ही सीन कुठले देता याचा नाही, बजेटचा आहे. जिथे मराठी सिनेमा बनतोच दोन कोटीत, तिथे पन्नास लाख तुम्हांला नाही मिळू शकत. दीपिका पदुकोणेला १२ कोटी कसे मिळतात, याच्याशी तुम्ही तुलना नाही करू शकत, कारण तिला तितके मिळतात तेव्हा हॉलिवूडच्या अभिनेत्रीला १२० कोटी मिळत असतात. ही त्या त्या देशाची व तिथल्या इंडस्ट्रीची अर्थव्यवस्था असते. मग ते म्हणाले, ‘ मग काय फुकट दाखवायचं का अंग? यावर मी विचारलं, ‘पैसे दिले तर दाखवायचं का?’ प्रश्‍न किसिंग सीनचा किंवा साडी सोडण्याचा नाहीये, तर कथानकाचा आहे. ते पटलं तर बाकी गोष्टीत अर्थ नाही. वैचारिक गफलत असेल तर मात्र कठीण होत जाणार.

तुझे भाई नि आई यांचा संदर्भ तू ‘चॉईसेस’ विषयी बोलताना दिला होतास. ते उलगडशील?

माझ्या वडिलांना, म्हणजे भाईंना, ते जुनी एसएससी झाले, तेव्हा नोकरीसाठी दोन कॉल आले. एक एसटीमध्ये कंडक्टर म्हणून व दुसरा पीडब्ल्यूडीमधला ड्राफ्टस्मन या पदासाठी. त्यावेळी एसटीमध्ये चाळीस रुपये जास्त पगार होता. घरी पैशांची वानवाच असायची. त्यामुळे प्राधान्य जास्त पैसे देणार्‍या नोकरीला असतं तर नवल नव्हतं. त्यांनी आईला विचारलं, ‘‘काय करू, अलका? मला आलेल्या जॉबमधलं अमुक काम मला खूप आवडतं, पण त्यात पैसे कमी आहेत.’’ आई त्या परिस्थितीतही त्यांना म्हणाली, ‘‘तुला जे आवडतं तेच कर.’’ मला असं वाटतं की, माझ्यामध्ये त्यांचाच गुण उतरला आहे. पैशांकडे न बघता आपल्याला जे आवडतं ते आपण निवडायचं. आई आता नगरपालिकेच्या शाळेत मुख्याध्यापिका आहे.

तुझ्या आईबाबांचं आंतरजातीय लग्न. जातपात मानणं, न मानणं याचे काही अनुभव?

लहानपणी आईबाबांनी त्यांच्या त्यांच्या आयुष्यात केलेल्या बंडखोरीविषयी मला काही विशेष जाणवलं नाही. मात्र याची अस्फुट जाणीव आजूबाजूच्या माणसांच्या प्रतिक्रियांमधून होत होती. लोक आपल्याकडे वेगळं बघतात, म्हणजे विशेषत: वडिलांकडे, असं क्वचित लक्षात येई. एक किस्सा सांगते, लहानपणी एकदा आम्ही आईकडच्या नातेवाइकांकडे गेलो होतो. ‘आमची राणी डान्स खूप छान करते. नाटक खूप छान करते...’ असं म्हणून मला नाटक तिथे करायला लावलं गेलं. मी शाळेच्या धड्यातली रामशास्त्री प्रभुण्यांची नाटुकली सादर केली. एवढ्याशा मुलीचं चटकदार काम बघून समोरचे लोक एकदम भावुक झाले. डोळे टिपताना त्यांच्यातली गोरीगोमटी, तशीच मुलंबाळं असणारी बाई म्हणाली, ‘मस्त केलंस गं. साऊथच्या पिच्चरमध्ये काम मिळेल.’ साऊथच्या पिच्चरमध्ये, कारण माझा रंग सावळा! मी आणि विशाल एकदम गप्प बसलो. घरी येऊन सहज हे सांगितलं तर ऐकून भाईंना हुंदका आला. आम्ही हातातलं सगळं टाकून त्यांच्याभवती गोळा झालो. आई म्हणाली, ‘अरे वेडा आहेस का मनू तू? कुणाचं मनाला लावून घेतो. लक्ष द्यायचं असतं का असं?’’ तर ते त्याच भावनावेगात म्हणाले, ‘‘नाही, माझ्यामुळं तुमच्यात काहीतरी उणीव आली. मी स्वत:ला कसं माफ करू?’’ हे बोलू नये असं त्यावेळी मला कळलंच नाही, मात्र प्रसंग कायम मनावर कोरलेला राहिला. रंग व जात यांवरून हिणवलेला... किंवा, राणी नाटकात काम करते?- हा! कारण तिची आई वडिलांपेक्षा वरच्या जातीतली. त्यामुळं काहीतरी वेगळं केलं की क्रेडिट जायचं आईला. वडिलांना डावललं जायचं. याच्या उलटा किस्सा पण एकदा झाला. जेव्हा ‘वळू’, ‘गाभ्रीचा पाऊस’ हे सिनेमे आले ना त्यादरम्यान. आम्ही प्रवासात होतो. सोबत एकदम गोरीगोमटी एक अभिनेत्री होती. मी त्या तुलनेत सावळीच. ती म्हणाली, ‘‘मी म्हटले त्या दिग्दर्शकाला, अरे मला तुझ्याबरोबर काम करायचंय. तो म्हणाला की तू जरा गोरी आहेस गं! आम्हांला सावळी मुलगी पाहिजे.’’ गमतीनं तिनं पुस्ती जोडली, ‘सावळ्या रंगाचं फावतंय ना!’ किती विरोधाभास आहे ना! ज्या रंगामुळे मला हिणवलं गेलं होतं, त्याच्याचमुळे मला नवं काम करता आलं होतं.

कॉलेजमध्ये गेल्यावर...

मी उरणमधून येऊन मुंबईत खूप स्पर्धांमध्ये भाग घ्यायचे. माझं काम परीक्षकांना खूप आवडायचं, पण मला कधीच पहिलं बक्षीस नाही मिळायचं. एकदा आईबाबा म्हणाले, जामकर आडनाव आहे ना आपलं, म्हणून देत नाहीत बक्षीस. अनेकदा ते जाऊन परीक्षकांना विचारायचे, आमच्या मुलीचं पाठांतर चुकलं का? अभिनयात अधिकवजा झालं का? काय चुकलं? तर ते काहीच बोलायचे नाहीत. फारच जोर धरला तर ‘काही नाही हो, जरासं इकडे तिकडे झालं...’ असं गुळमुळीत उत्तर मिळायचं. नेमकं उत्तर व नंबरही न मिळाल्यानं मला कॉम्पलेक्स होता. मी शेवटचातरी नंबर येऊ दे, असंच मनात म्हणत राहायचे. अकरावीला रूपारेल कॉलेजला आल्यावर माझा थेट पहिला नंबर आला. मला आत्मविश्‍वास मिळाला की, आपण उरणसारख्या गावातले असलो तरी मुंबईत आपला पहिला नंबर येऊ शकतो! भारी वाटत गेलं...जाणवलं की ज्याच्याकडे गुणवत्ता असेल, त्याला मुंबईत जागा आहे. तिथं तुमच्या जातीचा, रंगाचा विचार केला जात नाही. या पहिल्या अनुभवानं पुढची पाच वर्षं मला उत्साही ठेवलं. आत्मविश्वास तयार होत गेला. त्यावेळी नंबर येणं आत्मविश्‍वासासाठी जरूरी होतं, आता एवढ्या वर्षांच्या अनुभवानं त्याचे संदर्भ बदलले.

लहानपणी स्पर्धांसाठीची तयारी करायला आईबाबा, शाळेतले शिक्षक तुला मार्गदर्शन करायचे. कदाचित ते व्यवसायिक मार्गदर्शन नसेलही. तुझ्यातले गुण जाणून तू रूपारेलला प्रवेश घ्यावा, असं तुला कमलाकर सोनटक्क्यांनी सुचवलं. उरणमधून रूपारेलला आल्यावर तुझ्या अभिनयातलं काय बदललं? बदललं का?

मी दहावीला असेपर्यंत उरणमध्ये इतक्या स्पर्धा गाजवल्या होत्या की, स्थानिक वर्तमानपत्रांमध्ये कायम माझ्याबद्दल काही ना काही बातमी, लेख छापून यायचे. कोडकौतुक खूप वाट्याला आलं. उरणमधली स्टार बालकलाकार होते मी. डान्स असेल तर वीणाला बोलवा, नाटक असेल तर वीणाला बोलवा, वक्तृत्व स्पर्धा किंवा तत्सम काही असेल तरी वीणाला बोलवा.. सगळ्यांत निमंत्रण असायचं ठरून गेलेलं. त्यामुळं मला वाटायचं की, मुंबईतल्या कॉलेजला गेलो म्हणून काय झालं मला सगळं येतं. शिवाय रूपारेलला नंबर मिळाल्यावर तर ते पक्कंच झालं. अकरावी-बारावीत असताना केलेल्या नाटकांमध्ये माझ्या वाट्याला मुख्य भूमिका नव्हती. तालमीच्या वेळी बसून राहायचं, चहा आणायचा, जिमखाना झाडायचा अशीपण कामं कधी कधी करावी लागायची. त्यावेळी मधुरा वेलणकर, अद्वैत दादरकर सिनिअर होते मला, ते मुख्य भूमिकांमध्ये असायचे. मला वाटायचं, मला येतंय सगळं तर मला का नाही घेत हे मुख्य भूमिकेत? त्या लूकचा, त्या मॅच्युरिटीचा किंवा वयाचा प्रश्‍न या निवडीमागे असायचा. बरं, थिएटर करायचं म्हणजे फक्त अभिनय करायचा, बाकी काही नाही करायचं, अशी मी नव्हते. मला त्या सगळ्याच प्रक्रियेची मजा वाटायची. पुढे बारावीत असताना मी दुबेजींच्या दहा दिवसांच्या वर्कशॉपला होते. त्यानंतर मी जी बदलले ना, खूपच बदलले! तौफिक कुरेशी, बिरजू महाराज अशांसारखी मोठी मोठी माणसं वरळीच्या नेहरू सेंटरला विनामोबदला आम्हा नवोदितांना मार्गदर्शन करायला यायची. या सगळ्यांनी जमिनीवरच आणलं आमचं विमान. दुबेजींनी अभिनय, पिच, फोकस, आवाज, देहबोली, निरीक्षणशक्ती यांबद्दल जे द्न्यान दिलं, त्यातून मला जाणवलं की, यातलं काहीच आपण केलेलं नाहीये...आणि आजवर जे केलं, ते सगळं पुसून आपल्याला नवी सुरुवात करावी लागणार आहे. त्या दहा दिवसांत ज्या तर्‍हेचे एक्झरसायजेस आमच्याकडून करून घेतले गेले, तो माझ्यासाठी टर्निंग पॉईंट होता. सगळ्यांना माझ्यातला बदल जाणवायला लागला. काहीतरी मन:पूर्वक शिकल्याचं उतरनं नं आपल्या आत! तसं! त्यावेळी मला पाहिलेले आजही म्हणतात की, अकरावी-बारावीला तोंडातून शब्द नाही निघायचा हिच्या, गपचूप बसून असायची. पहिल्या वर्षापासून हिला तोंड फुटलं.

बारावीत दुबेजींचं वर्कशॉप झालं. मग मी सिनियरही झाले. त्यानंतर प्रत्येक नाटकात हवं तसं काम करायला मिळालं. शफाअत खानांची ‘क’ नावाची एकांकिका, श्याम मनोहरांच्या ’कळ’ कादंबरीवरचं नाटक. काम चांगलं झालं. कौतुक झालं. ‘क’ जेव्हा रूपारेलकडून यूथ फेस्टिवलला मुंबई विद्यापीठात केली, तेव्हा चेतन दातार परीक्षक होता. आम्हाला बक्षिसं मिळाली. चेतननं आम्हाला ‘आविष्कार’ला ते नाटक करायला सांगितलं. भाऊ विशाल मुंबईतच इंजिनीअरिंगला होता. त्याचा खूप प्रयत्न असायचा की, राणीला कुठे पोहोचवायचं, ती कुठल्या ग्रूपला गेली पाहिजे. त्याचा सतत शोध चालू असायचा. तो म्हणायचा, ‘‘तुला आविष्कारला एंट्री मिळाली पाहिजे यारऽऽ’’ मी घाबरून म्हणायचे, ‘‘अरे पण कशी करायची एन्ट्री? कसं होणार?’’ - तर चेतननं सुचवल्यामुळे ‘आविष्कार’ची संधी हाताशी आली.

दुबेजींनी तुझ्या आतलं काहीतरी हलवलं. तू बदललीस. मग चेतनने ते पुढे नेलं की...

चेतन दुबेजींच्या स्कूलचा. मला खूप अनुभव नाही मिळाला चेतनबरोबर. माझा अनुभव म्हणजे, मला करायला मिळालेल्या एका नाटकाचा तो दिग्दर्शक होता, एकाचा लेखक, एकात त्याच्याबरोबर छोटं काम नि एकात त्याचं मार्गदर्शन. ‘खेळ मांडियेला’ हे नाटक इरावती कर्णिक करत होती, त्यावेळी त्याचं जे मार्गदर्शन मिळालं, ते छान होतं. मुळात कलाकाराकडून काम काढून घेण्याची त्याची शैली छान होती. कलाकाराला नेमकं काय सांगायचं, हे त्याला अचूक कळायचं. त्यामुळे प्रसंगामधले रंग भरणं सोपं व्हायचं. नाहीतर अभिनयाबद्दल शिकवताना पोपटपंची खूप होते, जिचा उपयोग नसतो. तो बरंच काही जाणवून द्यायचा स्वत:तलं. मध्यमवर्गातल्या मुलींची आई, त्या वयात आल्या, की खांदे पाडून चालायला सांगते. पोश्‍चर नसतं. पोक काढून उभं राहायचं नि छाती झाकायची सतत. आपल्याला उत्तानपणा नको आहे, पण जो सरळ बांधा आहे तो दिसायलाच हवा, नाहीतर अभिनेत्री म्हणून तुम्ही बेढब दिसता. मी तशी नव्हते. पण तरी तो सांगायचा, ‘सरळ डौलदारपणे उभी राहा, एकदम ताठ, ब्रेस्टबद्दल लाज बाळगू नको. असं समज की तू सहा फूट उंच आहेस. बुटकी आहे, बुटकी आहे, असं नाही म्हणायचं स्वत:ला. तुझे कान आहेत ना, कान? ते तुझ्या चेहर्‍यापासून थोडे वेगळे आहेत. तर हेअरस्टाईल करताना कानावरून केस घ्यायला शीक. ‘वीणा किती चांगली आहे, चांगली आहे’, असं सगळ्यांनी म्हणून नि नुसतं चांगलं राहून काही उपयोग नसतो. कामात चांगलं पाहिजे माणूस. आणि जमत नसेल तर घरात बस. करिअरबिरिअर काही होणार नाही.’ चेतननं असा एकदम हाग्या दम भरला! मी त्याचं रूप बघून घाबरले, पण त्यानं हे मोलाचं सांगितलं. कॉलेजातली इतर मुलं दिग्दर्शक म्हणून काही सांगताना घाबरायची, त्यांच्याकडे तो अनुभव आणि तो एक अधिकारही नव्हता. चेतन वयानंही मोठा होता, त्यामुळं माझ्यासारख्या सतरा-अठराच्या मुलीला त्यानं सांगितलं ते महत्त्वाचं होतं. नाहीतर घरच्यांच्या अनुभवातून आलेल्या सूचनांपुढे कोण बोलणार? आणि आपण वर्षानुवर्षाचं कसं ते तोडायचं? ते आपल्यावरचे संस्कार ना! काहीही करा, कितीही करा, पण आपल्या चौकटीत राहून करा. मात्र खर्‍या अर्थानं तुम्हांला प्रगती साधायची असेल, तर संस्कारातून आलेल्या, पण लॉजिक नसलेल्या गोष्टी मोडून तुम्हांला पलीकडे पाहावंच लागतं. कुंपण ओलांडावं लागतं. एखादा प्रसंग करताना तुम्ही जितके कमीत कमी हातवारे करता, तितकं तुमच्या शब्दांकडे, हावभावांकडे लक्ष जायला मदत होते. संवादामधली भाषेची ताकद नाही तुम्ही ओळखली नाही, तर काही खरं नाही.

IMG_15022.jpg

आणखी कोण होतं सोबतीला तुझा नवखेपण घालवायला? किंवा पुढे नवखेपणा राहिला नाही, तरी तुमच्या तुमच्यात इंडस्ट्रीमध्ये संवाद साधला जातो का?

अभिनयाच्या बाबतीत तसं दुबेजी किंवा चेतन यांच्याइतक्या ठाम सूचना करणारं कुणी भेटलं नाही. तसे कोर्सेस होते वीणापाणी चावला वगैरेंचे, पण जाता नाही आलं तिथंवर. मनातली संदिग्धता बोलायला कुणीतरी लागतं अशा काळात. कारण अभिनय करणारे म्हणून तुमचा दृष्टिकोन, तांत्रिक भान, प्रत्येक दिग्दर्शकाचं भान व त्यांचा दृष्टिकोन अशी कुठली कुठली भीती घालवायला तुमच्याकडे अनुभव नसतो. अशातच कुणी ‘कॉम्प्रोमाईज करावं लागतं’ असंही पिल्लू मनात सोडून देतं. ते खरं नाही किंवा हे निर्णय व्यक्तिसापेक्ष असतात, हे कळायला एक काळ जावा लागतो. अभिनय कॅमेर्‍यासमोर गेल्यावर आपण करणारच असतो, पण मुळात मुद्दा अभिनेता म्हणून जगायचं कसं, हा आहे. मध्यमवर्गीय संस्कार कुठे तोडायचे नि कुठे नाही, हे ठरवताना चाचपडायला होतंच. अशावेळी कुणीतरी समजवावं लागतं, कुणाशीतरी चर्चा करावी लागते. असं कोणी सापडेलच असं नाही, हा पेच असतो.

सुरुवातीला ज्या काळाबद्दल आपण बोललो, त्याच्या रेट्यामुळे विखुलरेपणाची भीती सगळ्यांमध्ये आहे. त्यामुळं खरं तर असं व्हायला पाहिजे की, माणसांनी एकमेकांशी खूप बोललं जायला हवं... पण घडतं उलटंच आहे. जो तो तगून राहण्याच्या धडपडीतच एवढा व्यग्र आहे की, एकमेकांना भेटावं, बोलावं, काही सांगावं यासाठी जो उल्हासितपणा लागतो ना, तोच हरवून गेलाय. यामुळे असुरक्षितता वाढते. जर मी बोलले नि माझे दोन चित्रपट हातातून गेले तर? आणि हे खरं की, काम एवढंही नाहीये की दोन सिनेमे हातून सुटल्यावर आपण खाऊनपिऊन सुखी राहू शकू. प्रत्येक संधी आपल्याला मिळाली नाही तर आपण तग धरूच शकत नाही. मग त्याच्यापेक्षा गुप्तता पाळा! लोक, खास करून मराठी इंडस्ट्रीतले, या असुरक्षिततेपायी एकमेकांशी आपल्या कल्पना शेअर करत नाहीत, अशी खंत रवी जाधवने एकदा बोलून दाखवली होती. अनेकदा कलाकारांना पटकथाचा दिली जात नाही, कोणाला कळू नये म्हणून. कळलं तर चोरी व्हायची शक्यता... यशाची, पैसे परत मिळण्याची खात्री नाही, कौतुक व्हायचीही खात्री नाही. पेड न्यूजपासून ते पेड समीक्षकांपर्यंत सगळं उपलब्ध आहे. सांस्कृतिक देवाणघेवाण व्हायलासुद्धा एक सुकून लागतो, तो या असुरक्षिततेमुळे जात चाललाय. पण येईल तो कधीतरी...मला खात्री आहे.

या सगळ्यांत तुझा भाऊ विशाल याचं तुझ्याबरोबर भावनिकदृष्ट्या बरोबर असणं तू खूप महत्त्वाचं मानतेस... हो नं?

मी खूप नशीबवान आहे या बाबतीत. लहानपणी विशालशी टिपीकल शाळेतली नि घरातली भांडणं व्हायची. ती खास भाऊ-बहीण भांडणं! नकोच मला असला भाऊ म्हणून मी रडायचे. आमचं खरं बॉण्डिंग मी कॉलेजला गेल्यावर झालं. मुंबईला जाऊन मी शिकावं नि अभिनयाच्या क्षेत्रात जावं, यासाठी आईबाबांशी माझ्या बाजूनं भांडणारा तोच होता. त्याच्या आयुष्यात त्यानं खूप बंडखोरी केलीय, ज्याचा फायदा मला झाला. समाजकार्याचं छत्तीसगडमधलं त्याचं क्षेत्र खडतर आहे, कौतुकाची थाप पटकन मिळण्यासारखी नाहीये. तरी त्याचं नेटानं सगळ्यांना घेऊन पुढं जाणं मला खूप ताकद देतं. त्याच्याशी मला वाट्टेल ते बोलता येतं. ‘दादा’ म्हणण्यानं येणारी ऑथॉरिटी नको म्हणून आता मी त्याला विशूच म्हणते. घरात मोठ्या भावंडांनी दिलेला असा पाठिंबा खूप मोठा असतो. त्यांना तुमच्या त्रुटी, तुमच्यात खास काय आहे, असं सगळं माहिती असतं. असा विनाअट पाठिंबा मिळणं ही माझी जमेची बाजू.

पहिला केलेला सिनेमा व आत्ताचा. काय अंतर? काय फरक?

ढोबळ भाषेत सांगायचं तर, पहिल्या सिनेमाचं चित्रीकरण निम्मं झाल्यावर मी भाईंना म्हटलं होतं, मला सिनेमात कामच नाही करायचं. हे कॅमेर्‍यासमोर करायचं खोटं खोटं, माध्यमच मला आवडत नाही. मला कंटाळा येतो, मला नाटकातच काम करायचं. या प्रवासात पुढे जाताना मला या माध्यमाच्या शक्यता नि ताकद जाणवायला लागली. आर्थिक गणितं वगळता विषय मांडण्यासाठी जो आवाका तुम्हाला सिनेमा देतो, जो एक कालखंड तुम्हांला इथे निर्माण करता येतो, तो मला आवडायला लागला. कॅमेर्‍यासमोर उभं राहणं आव्हानात्मक वाटायला लागलं. त्या तांत्रिक गोष्टींमध्ये तुमच्या भूमिकेची लय पंचवीस-तीस दिवस न घालवता, पुढचे मागचे प्रसंग कधीही, कुठेही चित्रीत होत असतानाही ती लय राखणं यातही मला मजा वाटायला लागली.

veena5.jpg

सिनेमातल्या व्यक्तिरेखेनुसार भाषा बदलते. तिचं काय?

त्यासाठी मला नाटकाचा नि वाचनाचा खूप उपयोग झाला. ‘बघणं’ फार नाही झालेलं माझं. नाटकासाठी एक व्यक्तिरेखा उभी करताना तुम्ही सतत त्या विचारात राहून ते घोकता, घोटता व जगत राहता. त्यानं तुमच्या बुद्धीला व विचारांना सवय पडते, व्यक्तिरेखेला धरून ठेवण्यासाठी लागणारा एकाग्रतेचा काळ वाढतो. या सरावाचा उपयोग सिनेमामध्ये होतो. अभिनयासाठी मला वाटतं ही सगळ्यांत महत्त्वाची गोष्ट. कारण प्रत्येक कलाकाराची कौटुंबिक पार्श्‍वभूमी कशी आहे, त्याला अनुभव काय आले, यांवर त्याची समज ठरते. तुमचे अनुभव तुमच्या हातात नसतात, पण निरीक्षणशक्ती असतेच ना! इकडेतिकडे फिरताना, नुसते ’असताना’ मोठ्या व सूक्ष्मही गोष्टी पाहत राहाण्याची सवय जर अंगात मुरली, तर कुठल्याही वैचारिक भूमिकांचे अडथळे न आणता गोष्टी टिपकागदासारख्या टिपून घेता येतात. समजा ‘मित्रा’सारखा रोल आहे, समलैंगिक असणार्‍या मुलीचा आणि एक मुलगी किंवा अभिनेत्री म्हणून मला जर ते ‘जगणं’च मान्यच नाहीये, एक मुलगी दुसर्‍या मुलीवर प्रेम करते, ही बाब एक व्यक्ती म्हणून मला मान्यच नसेल, तर भूमिका करताना तुम्ही पूर्ण न्याय नाही देऊ शकत. तुम्हांला कपडे काय मिळतात, संवाद काय मिळतात, तुम्ही देहबोली कशी बदलता, हे सगळं तुमच्या वकुबावर अवलंबून आहे. पण किमान अनेकविध प्रकारचं आयुष्य असू शकतं, लोक वेगवेगळ्या प्रकारचं जगत असतात, हे मान्य करणं व स्वीकारणं आपण करूच शकतो.

एकदा काही शूटिंगनिमित्तानं आम्ही अष्टविनायकांपैकी एका गावात होतो. माझ्याबरोबर असणारी कलाकार म्हणाली, अगं, मला दर्शन घ्यायचं होतं, पण इतक्या जवळ येऊन मी नाही करू शकत. म्हटलं का? तर म्हणाली, अगं माझे पिरिअड्स्‌ चालू आहेत ना! मी मनात चकित झाले. पेहरावानं, कामाच्या पद्धतीत, राहणीमानानं इतकी आधुनिक असणारी व्यक्ती अशा समजांना बाळगून आहे, हे कसं? वरपांगी आपण खूप आधुनिक झालो, तरी विचारांची आधुनिकता किंवा किमान शास्त्रीय सत्य का नाही समजून घ्यायचं? जर असा पॅटर्न असेल, तर अशा भूमिका येतील तेव्हा त्या देखण्या बाईनं कशा करायच्या? मनातून स्वीकार नसेल तर संवाद बोलता येईल का? आईबाबांच्या लग्नामुळे माझ्यात स्वीकार जास्त चांगल्या तर्‍हेनं तयार झाला, असं मला वाटतं. दोन्ही घरांतल्या वागण्याबोलण्याच्या पद्धती, खानपान, भाषा, वातावरण, विचार करायची, भांडणाची पद्धत, सगळ्यांत इतका फरक असूनही मला दोन्ही घरांबद्दल तितकंच प्रेम आहे, कारण ती माझी माणसं आहेत. हा स्वीकार तुम्हांला तुमचं काम अधिक चांगलं करायला मदत करतो.

नाटकाच्या संस्कृतीमधून आल्यानंतर याच स्वीकारामुळे तू चित्रपटात रमलीस, हो ना?

हो, तरी गोंधळ व्हायचाच की, पैसे प्रायोगिक नाटकांपेक्षा चित्रपटात जास्त मिळतात, पण ते करण्यात मन रमत नाही. मी काय करू? वाट बघितली. मी या क्षेत्रात आले, तेव्हा आतासारखा जोरावर नव्हता सिनेमा. मी बारावीत असताना ‘श्‍वास’ला सुवर्णकमळ मिळालं. नंतर ‘नॉट ओन्ली मिसेस राऊत’ आला. त्यानंतर ‘टिंग्या’ नि मग ‘वळू’. माझी तयारी सिनेमाची नव्हती, नाटकाचीच होती. त्यामुळे फिजिकल ग्रूमिंग, बॉडी ट्रेनिंग, बॉडी टोनिंग, लूक यांवर काम जास्त होण्यापेक्षा अभिनयावर काम जास्त व्हायचं.

पाहिलेल्या माणसांचा उपयोग होतो अभिनय करताना, व्यक्तिरेखा शोधताना?

खाण्यापिण्याची आबाळ नाही, शिक्षणाला विरोध नाही, अभ्यासक्रमाव्यतिरिक्तच्या गोष्टींना सतत उत्साहानं प्रोत्साहन अशा, म्हणजे आईवडिल मुलांच्या विकासाबाबतीत अत्यंत दक्ष असणार्‍या घरात मी वाढले. अशा कुटुंबातून आल्यामुळे माझं अनुभवविश्‍व फार सीमित होतं. अन्नासाठी, निवार्‍यासाठी संघर्ष करावा न लागल्यानं त्या तर्‍हेचं आयुष्य माहीत नव्हतं. सगळं मिळालं की तेवढी धार नाही येत तुमच्या अभिव्यक्तीला, व्यक्तिमत्त्वाला. अशावेळेस तुमच्या आवाक्यात नसलेली व्यक्तिरेखा सादर करायला तुम्ही कशाचा आधार घेणार? अर्थात निरीक्षणाच्या! ‘गाभ्रीचा पाऊस’मधली नवर्‍याच्या आत्महत्येला सामोरी जाणारी तरूण बाई मी कशी केली? त्या गावात पोहोचल्यावर त्या बायकांच्यात जाऊन बसायचं, त्यांना येताजाता, चालताना बघायचं, त्यांच्याशी बोलून ती भाषा आत्मसात करायची व तिची नक्कल करायची हेच मार्ग होते. शिवाय दिग्दर्शक सतीश मनवर यानंही खूप मदत केली. त्यामुळे माझ्या बहुतेक भूमिका या बाह्य अनुभवांवरच अवलंबून होत्या. तसं माझं अनुभवविश्‍व फार मोठं व बहुआयामी नाहीये.

veena7.jpg

तुझे सिनेमे येऊ लागले तशी तुझ्या नि विद्या बालनच्या चेहरेपट्टीच्या साम्याविषयी लोक बोलायला लागले. ही तुलना होते, तेव्हा तू ती कशी घेतेस?

मी ‘चार दिवस प्रेमाचे’ नाटक करत होते, तेव्हा विद्याचा ‘परिणिता’ नुकताच येऊन गेला होता. सुरुवातीला मला खूप त्रास व्हायचा तुलना ऐकली की. प्रमाण वाढत गेलं, तेव्हा त्रास वाढला कारण मी काही दहाएक वर्षं काम करून स्थिरावले नव्हते, तर माझी स्वत:ची ओळख तयार करण्यासाठी धडपडत होते. त्यावेळी ती सिनेमातून आली नि एकदम स्टार झाली. मनात यायचं की हिंदी सिनेमासृष्टीत आपण जायलाच नको, कारण जर ही इतकी प्रसिद्ध नि यशस्वी आहे तर आपल्याला नवं काम मिळेल का? उत्साह निघून जात होता. हळूहळू यातून सावरले, कारण तुम्ही यात काहीच करू शकत नसता. जिच्याशी तुलना होते ती सुजाण आहे, तिचं एक छान व्यक्तिमत्त्व आहे, तर बोलूदे बोलणार्‍यांना. शेवटी तुमची अभिनयशैली, तुम्ही करत असलेले प्रयोग, त्यावर घेत असलेली मेहनत यानं तुम्ही कसे वेगळे उठून दिसू शकाल याकडे लक्ष द्यायचं. तेच बरं!

आज आपण काळाबद्दल फार बोलतोय. आजचा काळ डिकोड करता येत नाहीये. तरीही अपडेटेड राहावं, तुम्ही सगळ्या विषयांवर बोलावं, अशी सक्तीच होत जाते. तेव्हा?

याचा ताण मी घेतच नाही. न्यूज चॅनलवाले बोलावतात. अर्ध्या तासाच्या भागासाठी चर्चेत भाग घ्यायचा. मी काही कुठली वक्ता किंवा प्रवक्ता नाही. कधी कुणी सेलिब्रिटी चेहरा हवा, म्हणून बोलवतात तेव्हा मी सांगते, अभिनय किंवा स्त्रिया यांच्याशी संबंधित काही असेल तरच मला बोलवा. ज्या विषयात मला गती नाही त्यावर मी बोलले तर माझी किंमत कमी होते. त्यामुळं मी खरोखरी चीड येते तेव्हाच बोलते. फेसबुकसारखं माध्यम माझ्यापाशी आहे म्हणून मी कुठल्यातरी गंभीर किंवा वादग्रस्त विषयावर बोललंच पाहिजे, हे कशासाठी? पूर्ण व्यक्त व्हायला सामाजिक माध्यमांचं व्यासपीठ कमी पडतं. मग कशाला विषाची परीक्षा?

विशालमुळे एक चांगली गोष्ट झाली की, तो अचानकच सामाजिक कार्याकडे वळल्यामुळे मलाही एक चांगलं भान आलं. एक जबाबदारी जाणवायला लागली. मी त्याच्याबाजूनं आईबाबांशी वाद घालायचे. मात्र एकाएकी वाटलं, आपण त्याच्या कामात मदत काहीच करू शकत नाही, ना आदिवाशांचे प्रश्‍न समजून घेऊ शकतो ना त्यांची शेती करू शकतो. किमान अभिनेत्री म्हणून आपलं वागणं, बोलणं व निवड अशी असली पाहिजे ज्यातून त्याला ऊर्जा मिळावी. भाऊ काय काम करतो आणि बहीण भलतंच काहीतरी करते, असं होऊ नये. घरातलं कुणी जर चाकोरीबाहेरचं काम करत असेल, तर वाटतं ना आपणही हातभार लावावा... तो छत्तीसगडहून यायचा तेव्हा त्याचे गावातले व बाहेरचेही मित्र त्याच्याशी चर्चा करायचे, त्याचं ऐकून घ्यायचे, काहीतरी मदत त्यांच्या संस्थेकरता देऊ पाहायचे... तेव्हा तो सांगायचा की, आम्हाला कामासाठी पगार मिळतो व्यवस्थित... मी भारावून विचारायचे की, असं नसतं कारे तुमच्याकडे की महिनाभर येऊन स्वयंसेवक म्हणून काम केलं... यावर तो खूप हसायचा, म्हणायचा, राणी तुझं क्षेत्र खूप मोठं आहे, तू तिथंच काम कर गं! तरी त्याला सपोर्ट मिळावा असं आपण काय करू शकतो, हे मनात चालू राहायचं. त्यामुळे चित्रपटांच्या पटकथा आल्यावर वाटायचं की, हे दुसरं कुणी करायला हो म्हणत असेल अगर नसेल, आपण करायलाच हवं. सामाजिक मुद्द्यांवर आपल्यातर्फे आपण एखाद्या मुद्द्याला पाठिंबा देऊ शकतो.

वाचणं, जागतिक सिनेमे पाहणं यानं एक नट म्हणून काय फरक पडतो?

फरक पडतोच. माझा दिवसातला बराचसा वेळ वाचनात जातो. घरात, बाहेर, प्रवासात कुठेही असले तरी. यातून आवाका वाढतो. सिनेमे पाहण्यानं मात्र आधी न्यूनगंड येतो की, काय दर्जाची कामं करतात ही माणसं! प्रेरणा मिळतेच, मात्र खुजेपणाची जाणीव जास्त होते. आपल्याकडून कुणाची नक्कल नको व्हायला, या गोष्टीचं मी भान ठेवते. कारण तुम्ही एखाद्या नटाचं इतकं सूक्ष्म निरीक्षण करता की, चौकसपणातून तुम्ही आवडतं त्याची नक्कल करता. बरेचदा माझे चित्रपट हे सामाजिक आशयाचे व विशिष्ट धाटणीचे आहेत, हे पाहून ’स्मिता पाटीलची आठवण येते’ असं लोक म्हणाले आहेत. मी दचकले. ती खूप आवडते म्हणून तिचं काम बघत राहून तिच्यासारखं करायला लागले तर नुकसान होईल, हे स्वत:ला बजावलं. जसं ‘लालबागची राणी’ करताना अनेकांनी मला ‘सदमा’ बघ असं सांगितलं. मी मुद्दाम नाही बघितला. एरवी खूप सिनेमे पाहिले तरी एखाद्या सिनेमाची तयारी करायची असेल तर मी सिनेमा नाही बघत. मात्र एरवी खूप बघत राहते. अनेकदा या चित्रपटांच्या कथावस्तू इतक्या रंजक असतात की, चकित व्हायला होतं. कधी कधी संहिता साधीच असते, पण मग घडणावण अशी असते की तुम्ही पाहतच राहता. हे सगळं पाहण्यानं जाण वाढते. कळत गेलं तरी मी अजून नाही सांगत चित्रीकरणाच्या वेळी की, माझा हा अँगल घ्या, असा क्लोजप छान वाटेल. मला ते अनैतिक वाटतं. शिवाय कधीकधी आपण फक्त आपल्याच व्यक्तिरेखेचा विचार केलेला असतो. दिग्दर्शक संपूर्ण सिनेमाचा विचार करून स्वत:ची शिस्त लावत असतो.

चित्रपटाची बाकीची अंगं वापरून पाहावी वाटतात का?

या पुढे अजून काही वर्षं मी अभिनय करेन, पण संपूर्ण वेळ अभिनयच करेन, असं वाटत नाही. तुमच्यावर कधीकधी खूप बंधनं येतात, सांगितलेल्या गोष्टींच्या चौकटीत काम करावं लागतं. इतक्या वर्षांच्या अनुभवानंतर तुमचं तुमचं तुम्हांला सांगावंसं वाटतं. त्यासाठी लेखन, दिग्दर्शन अशासारख्या गोष्टी नक्कीच मला मदत करतील. भविष्यात मी ते आणखी एक्सप्लोअर करेन.

आणखीही काही मनात रेंगाळतंय. नाटक किंवा कुठलीही कला असेल, त्यांची संस्कृती प्रसारित व्हायला कुणीतरी काम करायला पाहिजे. जसं ‘जुनून’ गावागावात जाऊन थिएटर करतं, लोकांशी जोडून घेतं. लोक रोजच्या मालिकांना चिकटलेले असतील, तर कलांमधला गुणात्मक फरक कळत नाही त्यांना. हा दोष लोकांचाही नाही, कारण त्यांच्यापर्यंत हे ‘धन’ पोहोचतच नाही. कुठलीही कला गावोगावी पोहोचेल कशी, संवादाचा पूल कसा तयार होईल, हे पाहण्यात व त्यात काम करण्यात मला रूची आहे. मला कळायला लागल्यापासून मी अभिनयच करतेय. मला तेच ट्रेनिंग आहे. कब्बडीवाल्याला लांब उडी नाही मारता येत, त्याप्रमाणे बोलणं, संपर्क ठेवणं, माहिती काढणं, कुठल्या प्रक्रियेमधून एखाद्या गोष्टीचं काय होतं वगैरे कसब माझ्यात अजून तयार झालेलं नाही. मी माझ्या निर्णयक्षमतेनुसार काम केलं. आजवर काम हवं तसं करता आलं आहे. मात्र यशाच्या कल्पना आता बदलत चालल्या आहेत. पुरस्कारांच्या पलीकडे मला जायचंय.

म्हणजे?

‘भाकरखाडी ७ किलोमीटर’मध्ये मी नर्सचा रोल करत होते. नर्स अशा गावातल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामधली जिथं डॉक्टर जवळपास येतच नाही. मी मुद्दाम आमच्या गावच्या सरकारी रुग्णालयात जाऊन तिथली नर्स बघत राहिले. तिची देहबोली, पेशंटशी असलेलं तिचं नातं, डॉक्टर नसल्यामुळं तिच्यावर असणारा कामांचा व निर्णयाचा ताण, तिथला बकालपणा. त्या दरम्यान अख्खं पोस्टमॉर्टम माझ्या पाहण्यात आलं. दिवाळीचा पहिला दिवस होता, घरी न सांगता तिथे गेले. भयानक वेगळा अनुभव. माझ्या भूमिकेशी संबंध नव्हता, पण अभिनेत्री म्हणून ही एक संधीच! तिथं कातडीच्या आवरणाखाली असलेले अवयव सुटेसुटे होऊन बघताना मी गोठले. नुकता झोपलाय असं वाटणारा माणूस घणाचे घाव घातल्यावर उठत नाही, हे पाहताना मृत्यू ही कशी गोष्ट असते, हे एकदम चरचरीत जाणवलं. हा असा निष्प्राण, अचेतन देह जाळून, पुरून त्याचं बारावं-तेरावं करण्यातला फोलपणा पुन्हा एकदा जाणवला. तिथला दरवाजा पकडून मी उभी होते. भीती वाटली तर पळून जायचं म्हणून. आज देहातली चरबी वाढते म्हणजे कुठं नि ती जळते म्हणजे काय, हे उगीचच जाणवत राहातं. जगण्याबद्दलचा झालेला तो एक निराळाच साक्षात्कार माझ्यात निराळी जाणीव पेरून गेला. आपण चौकटी फोडून बाहेर पडलो नसल्यामुळे अचाट अनुभव क्वचित वाट्याला येतात... जेव्हा येतात तेव्हा मतभेद, वैमनस्य, हेवेदावे, जातीपाती, अस्मिता नि असं काय काय वाफ होऊन जातं. माणूस म्हणून एक मोकळं तल्लखपण जाणवू लागतं. ते उलगडत राहायला हवं. बस्स!

IMG_15334.jpg

***

पूर्वप्रकाशन - पर्ण (दिवाळी) - २०१६

मुलाखतीतली सर्व प्रकाशचित्रे श्रीमती वीणा जामकर यांच्या खाजगी संग्रहातून.

प्रकाशचित्र क्र. २ - छायाचित्रकार - श्री. तेजस नेरूरकर

ही मुलाखत मायबोली.कॉमवर पुनर्मुद्रित करण्यास अनुमती दिल्याबद्दल 'पर्ण', श्रीमती सोनाली नवांगुळ व श्रीमती वीणा जामकर यांचे मनःपूर्वक आभार.

***
प्रकार: 

अभिनेत्री म्हणून वीणा आवडतेच पण माणूस म्हणून तिचे विचार फार आवडले, मुलाखत इथे पुनःप्रकाशित केल्याबद्दल आभार!

मुलाखत आवडली. विचारांनी अतिशय प्रगल्भ आणि प्रामाणिक वाटली. तिचा वळू हाच चित्रपट पाहिला आहे, त्यातही सहज, नैसर्गिक अभिनयामुळे लक्षात राहिली होती. इथे मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद.

सुरेख मुलाखत. वीणा जामकर तिच्या जनरेशनच्या नायिकांपेक्षा वेगळी वाटते, आणि तिचं हे वेगळेपणच भावतं. तिची नाटकं नाही, पण काही चित्रपट पाहिले आहेत. अतिशय प्रगल्भ, भूमिकेशी प्रामाणिक राहणारी, आपली तत्त्वं, वेगळेपण टिकवून ठेवणारी अभिनेत्री आहे. तिला तिची क्षमता दाखवता येइल अशा भूमिका करायला मिळो याकरता शुभेच्छा!
तिला जेव्हा तन्वीर पुरस्कार मिळाला त्यावेळी केलेले सुरेख भाषण इथे मायबोलीवर ऐकले होते आणि अजुनही आठवते. ती लिहितेही छान.

किती सुस्पष्ट विचार आहेत वीणाचे. स्वत:च्या विचारांशी, मतांशी प्रामाणिक असणं आवडलं.
खुप आवडला लेख. आता तिचा एखादा सिनेमाही बघेन.

सुंदर मुलाखत.
वीणा जामकर अभिनेत्री मधून आवडतेच. मुलाखत वाचल्यावर आणखी आवडली. एकदम क्लिअर आणि पॅशनेट विचार आहेत. फोटो वर सही आलेत.
धन्यवाद.

सुपर्ब मुलाखत! वीणा उत्तम लेखिकाही होऊ शकेल. प्रासादिक (विशेषतः तन्वीर नाट्यधर्मी पुरस्काराच्या वेळचं भाषण) बोलली तरी she doesn't lose me amidst words . फार खरीखुरी (genuine) वाटते. बाकी बदलता काळ, तत्त्वसंघर्ष हे सगळीकडेच आहे. तिला स्वतःचे असे एक अढळपद मिळो ही प्रामाणिक सदिच्छा.

किती सुस्पष्ट विचार आहेत वीणाचे. स्वत:च्या विचारांशी, मतांशी प्रामाणिक असणं आवडलं.
खुप आवडला लेख. <<<+११

इतका विचार करु शकणारी माणसं सुद्धा हल्ली दुर्मिळ होत चालली आहेत. सुरेख मुलाखत.
दोनदा व्यवस्थित वाचली. वाचून खरोखर बरें वाटले.

सुंदर मुलाखत. आपल्याला काय हवे आहे व आपल्या सीमा काय आहेत याची व्यवस्थित जाणीव असलेली अभिनेत्री. खरच रैना म्हणते तसे असा विचार करु शकणारी माणसेही हली दुर्मीळ होत आहेत.

वीणा जामकर आवडातेच. आता आणखी आवडायला लागली. Happy