श्री संतराम (भाग ९ वा )

Submitted by मिरिंडा on 17 March, 2017 - 04:55

सांप्रत संतराम समाधी अवस्थेच्या अभ्यासात व्यग्र असल्याने त्यांचा समय उत्तम रितीने व्यतीत होत होता. संतराम या अवस्थेसाठी आसनस्थ होत तेव्हा काही कालाकरिता भावरहित अवस्थांमुळे त्यांचे शरीर जडशील होत असे. त्या अवस्थेत कधी कधी काही पळे तर काही घटिका व्यतीत होत. त्या अवस्थेमध्ये त्यांना क्षुधातृषेचेही भान राहत नसे. फक्त मीपणाची जाणीव मात्र असे. ती एकदा पार केली की समाधी अवस्था दूर नाही असे आचार्य त्यांना रोजच्या अभ्यासात सांप्रत काली समजावून सांगत असत. अर्थात अशा अवस्था फार कालपर्यंत राहिल्यास काही अपाय होऊ नये म्हणून आचार्य त्यांच्या समीपच राहतं. सभोवतालच्या जाणिवेचे विस्मरण हा अभ्यास तर त्यांना फारच महत्त्वाचा वाटला. वासनांवर ताबा मिळवणं आणि त्या नाहीश्या करण्यासाठी करावे लागणारे वेगवेगळे मंत्रतंत्र प्रयोग आणि त्याला योग्य असणाऱ्या देवतांचे स्वरूप व ध्यान हे सर्वच त्यांना आताशा अंगवळणी पडू लागले. कामिनी देवींच्या संपर्कात आल्याने निर्माण झालेल्या शारीरिक आणि मानसिक आंदोलनांवर त्यांचा ताबा येऊ लागला. आताशा ते परत राधागोविंदजींच्या मंदिरातही क्वचित गेले तरी लवकरच ध्यानावस्थेत जात . ते पाहून इतर आश्रमवासी त्यांच्याकडे परमेश्वराचे स्वरूप म्हणून पाहू लागले. असो. आता त्यांचा दैनंदिन साचाही बदलला. ते आता कामिनी देवी आणि इतर सर्व भाव भावनांना हळूहळू विसरू लागले. आता त्यांच्या मनावर नैसर्गिकरित्या बदलेल्या वनराजीचे परिणाम फक्त ध्यानाला आवश्यक असलेले विचारच निर्माण करू लागले होते. थोडक्यात बाह्य जगाचे व्यवहार आणि बाजूच्या परिस्थितीचे अस्तित्व यांच्या होणाऱ्या जाणिवेतून नेणीवेत जाण्याचे तंत्र संतराम अभ्यासू लागले होते. आचार्यांनी आजच्या प्रातःकाली आपल्या ध्यानस्थ पुत्राकडे प्रेममय दृष्टीने पहिलं आणि आपल्या कुटीत शिरणार एवढ्यात महाराजांकडून आलेल्या सोमूने त्यांना वंदन करून अभीष्ट चिंतिले. सोमू आलेला पाहून आचार्य जरा विचारात पडले. एखादा प्रतिहारी न पाठवता सोमूला महाराजांनी पाठवलेले पाहून त्यांना जरा काही अरिष्ट निर्माण झाल्याची शंका चाटून गेली.

त्याला प्रवेशाची अनुमती देत ते कुटीतील व्याघ्राजिनावर उपविष्ट झाले. सोमू त्यांच्यासमोर नम्रतेने वाकून म्हणाला, " आचार्यांनी प्रणाम स्वीकारावा. महाराजांनी आपणास व श्रीसंतरामांस उदईक चौथ्या प्रहरी भरणाऱ्या खास दरबारासाठी पाचारण केले आहे . " तो गेल्यावर आचार्यांना काही कूटप्रश्न निर्माण झाले. परंतु त्यांनी त्यास न विचारता जाण्याची आज्ञा दिली . दरबारी रीतिरिवाजाप्रमाणे संदेश घेऊन येणाऱ्यास कोणतेही प्रश्न विचारले जात नसत . आचार्य जरा सचिंत झाले. त्यांच्या अंदाजाप्रमाणे एक तर हा सामान्य दरबारातला विषय असावा आणि ज्याअर्थी सोमू आला आहे त्याअर्थी नंतर खास सभा होणार असल्याची त्यांना खात्री वाटू लागली. असो. थोड्याच वेळात आचार्यांनी समोर आलेल्या फलाहाराचा समाचार घेतला. आणि ते आपल्या दैनंदिन व्यवहारांमध्ये व्यग्र झाले. संध्यासमयी परत एकदा संतरामांची भेट घेऊन ते आपल्या कुटीमध्ये विश्राम करण्यास आले. आचार्यांच्या कानावर सुदेश पंडिताच्या विवाहाची वार्ताही आली होतीच. त्याच्या वधूचे पलायन हि त्याचीच काहीतरी खेळी असावी आणि खरंतर अशी पाताळयंत्री व्यक्ती महाराजांच्या राज्यात असण्यापेक्षा शेजारील आसक्त राजांच्या राज्यात पाठवून द्यावी असे त्यांचे मत होते. मदिरापान , अभक्ष्य भक्षण आणि विषयसेवन याशिवाय ज्याला महत्त्वाचे असे काहीही वाटत नाही त्या व्यक्तीस राज्याबाहेर घालवणे आवश्यक असल्याचे ते महाराजांकडे या समयी प्रतिपादन करणार असल्याचे त्यांनी मनोमन ठरवले. तसे पाहता राज्याला असल्या वाममार्गी पुरूषाला सोडता दुसरा कोणताही धोका त्यांनातरी दिसत नव्हता. संतरामास घेऊन जावे असे मात्र त्यांना वाटेना. पण राजाज्ञाच ती त्यांना तिचा सन्मान करणं आवश्यक होतं हेही खरं होतं. असो. ते रात्रीच्या समयी संतरामांना न घेऊन जाण्याचे निमित्त शोधणार होते. आता ते आश्रमातील इतर व्यक्तींना कसली आवश्यकता आहे का ते पाह्ण्यासाठी निघाले होते. हळू हळू रात्रीचा समय जवळ येऊ लागला. ते एकेक आश्रमवासीयांचे हृद्गद ऐकत असताना अचानक त्यांना कुणा स्त्रीच्या रुदनाचा स्वर ऐकू आला. आजपर्यंतच्या आश्रमाच्या जीवनात असला प्रसंग कधी आला नसल्याने ते उत्सुकतेने आणि थोड्या विचलित अवस्थेत एका अंधारलेल्या कुटीमध्ये डोकावले.

तेथे बसलेली स्त्री अधोमुख करून रुदन करीत होती. तशी ती दबक्या आवाजातच विव्हळत होती. पण मध्येमध्ये थोडा उंच स्वर लावून आपल्या विलापाला ती वाट करून देत होती. कुटीमध्ये असलेल्या एक मात्र मंद दीपकामुळे अंधार जास्तच जाणवत होता. त्यामुळे म्हणा किंवा रुदन करणाऱ्या स्त्रीच्या मुखकमलावर उतरलेल्या केशकलापामुळे म्हणा तिचे मुख आचार्यांना दृकगोचर होणं कठीण झालं होतं. अर्थातच त्या स्त्रीला त्याची तमा नसावी. रुदनामध्ये मात्र एक दोनच शब्द वारंवार येत असल्याने आचार्यांना एवढेच ज्ञात झाले की कुणा
पुत्राच्या वियोगाने ती स्त्री रुदन करीत असावी. प्रत्यक्ष प्रवेश न करता त्यांनी त्या स्त्रीला विचारले, " हे माते , इतका शोक करण्याचे तुजला
कारण काय बरे आहे ? " उत्तरादाखल ती वदली, "माझ्या पुत्राचा वियोग होण्याची वेळ आली आहे आणि तेही देवींनी त्यास पाचारण केले आहे. केवळ संतराम महाराजच त्यास मृत्यूपासून वाचवू शकतात. ते जर देवींना दर्शन देतील तर माझा पुत्रवियोग टळू शकतो. " आचार्यांना
देवींचे नाम जोडल्या बरोबर एक प्रकारचं आश्चर्य वाटले. ते म्हणाले, " देवींनी पाचारण करणं हे मला तरी भय निर्माण करणारे कारण वाटत नाही. सविस्तर सांगशील तर तुझे भय निवारण करता येईल. " असे म्हटल्यावर ती म्हणाली, " मी देवींची दासी सुलक्षा, संतराम महाराजांना
उदईक प्रातःकाली घेऊन येण्याच कार्य माझ्यावर सोपवले आहे. माझ्या एकुलत्या एक पुत्राचा वियोग मला कसा सहन होणार ? आपणच काहीतरी मार्ग काढावा " असे म्हणून तिने आचार्यांचे चरण धरले. आचार्य तिला उठवीत म्हणाले, " तुझ्या पुत्रास आम्ही अभय देतो. " आचार्यांना देवींचा लहरीपणा चांगलाच ज्ञात होता. ती स्त्री आचार्यांच्या आश्वासनामुळे निश्चितं होऊन निघाली. अजूनही आचार्यांना तिचे मुखदर्शन झालेले
नव्हते. परंतु तसे न दाखवता त्यांनी गमनाची अनुमती दिली. आश्रमाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ येईपर्यंत ती स्त्री हलके हलके हुंदके देत राहिली, मात्र प्रवेशद्वाबाहेर आल्यावर मात्र तिने आपली गती वाढवली आणि ती कशीतरी देवींच्या महालात प्रवेशली.

अचानक आणि अनुमती न घेता प्रवेशलेल्या प्रज्ञेला पाहून खरंतर देवींना क्रोध आला होता , परंतु ते न दर्शवता त्या वरकरणी उत्सुकता दाखवीत उद्गारल्या, " अशी भयग्रस्त पशूसारखी आमच्या कक्षात प्रवेशण्याचे कारण तरी काय ? " मग तिने देवींना
सर्व वृत्तांत कथन केला. त्यावर देवी स्वगत बोलत्या झाल्या, " उत्तम , म्हणजे हिने सुलक्षा अजून जिवंत असल्याचा आभास निर्माण केला तर. तोही आचार्यांसमोर. तरीही हिने सुलक्षेच्या पुत्रास आम्ही पाचारण केल्याचे का कथन केले ? आमचा संपर्क हिने उगाचच आणला, त्याऐवजी महाराजांचा आणला असता तर संशयाची सूची त्यांच्याकडे वळली असती. " म्हणजे हिला आता काट्यावर धरायला काहीच हरकत नाही आणि आपले काम साधल्यावर सुलक्षेच्या मार्गाने पाठवण्यातही आपलाच लाभ आहे. आणि त्या सुलक्षेच्या पुत्राचा पुरता उपयोग करून घेऊन त्यालाही जमल्यास हिच्या सोबत पाठवता येईल. त्या काहीच बोलत नाहीत असे पाहून प्रज्ञा भयाने कापत त्यांना म्हणाली, " माझ्या हातून काही प्रमाद घडला की काय ? " तरीही त्या काहीही प्रतिक्रिया देत नाहीत असे पाहून तिने त्यांच्या चरणावर लोळण घेतली. मग मानभावीपणे तिला उठवीत त्या म्हणाल्या, " प्रज्ञे , आम्ही प्रसन्न चित्त आहोत . तरीही महाराजांचे अथवा दुसरे कुणाचे नाम घेतले असतेस तर उत्तम झाले असते. असो. आता लवकरात लवकर आमच्या समोर त्या सुलक्षेच्या पुत्रास सादर कर, म्हणजे हा प्रमाद आम्ही पोटात घालू . " आता प्रज्ञेचे चित्त थोडे स्थिर झाले आणि तिने गमनाची अनुमती मागितली. मागे मागे पावले टाकीत ती कक्षाबाहेर आली.

**********************************************************************$*********************************************************************

स्वेच्छा सोबत न आणता आल्याने पंडित निराश झाला. पण त्याने आपल्या देवतेला साकडे घालण्याचे ठरवले. स्वस्थतेत उभी असलेली देवता पाहून खरंतर पंडिताला क्रोध येत होता, पण सांप्रत स्वेच्छेच्या जागी कोणास उभे करावे याचा विचार महत्त्वाचा असल्याने त्याने आपला क्रोध आवरता घेतला. मग त्याला श्रीपालाला सोडण्याचे आठवले. त्याने श्रीपालाला ठेवलेल्या कोठडीकडे जाण्याचे ठरवले. पण त्याचे चित्त थाऱ्यावर राहीना . प्रथम त्याने देवतेला मंत्रजपाने जागृत करून आपली समस्या तिच्या पुढ्यात मांडली. अखेरीस त्याने आपले मागणे पुढ्यात ठेवले, " माते, काहीही कर, पण स्वेच्छेची उपस्थिती विवाहस्थानी होईल याचा मार्ग सांग . माते दर्पण तंत्राचा प्रयोग सिद्ध होईल का ते कथन कर. माते, त्वरा कर. " देवतेचे वदन काळवंडले ते पाहून देवता कोणत्यातरी विशेष तंत्राचा प्रयोग सुचवण्याच्या बेतात असणार असे वाटून , मोठ्या आशेने पंडित तिजकडे पाहू लागला. उत्तरादाखल तिने दर्पण तंत्रावरील खास ग्रंथाकडे अंगुलिनिर्देश केला. ते पाहून पंडिताची आशा उजळू लागली. मग तिने वाम हस्ताने एका स्त्री कलेवराकडे निर्देश केला. ज्या स्त्री कलेवराकडे निर्देश केला ते इतके ओंगळवाणे होते की पंडिताला माता आपली कुचेष्टा तर करीत नाही ना अशी शंका आली. मग त्याने मातेच्या मुखकमलाकडे पाहिले. त्यावरील चैतन्य आता अंतर्धान पावत होते, पण तिच्या चक्षूंमध्ये आलेली रक्तवर्णी छटा मात्र पंडिताला भय निर्माण करून गेली. आपला शंका मातेस अनुचित वाटली असून तीस कोप आला असावा या विचाराने तो अस्वस्थ झाला . मातेचे शंका निरसन करण्याचा प्रयत्न तो करणार इतक्यात तिचे मुख अचेतन झाले, परंतु तिच्या चक्षूंमधील रक्तवर्णी छटा मात्र कायम राहिली. असे कधीही झाले नव्हते. पंडिताकडे त्यावर उपायही सद्यस्थितीत नव्हता आणि त्याला स्वेच्छेचा आभास निर्माण करण्याची त्वरा होती. ते स्त्री कलेवर पंडिताकडे पाहून हसण्याचा भाव चेहऱ्यावर आणू पाहत होते, तो तो ते जास्तच ओंगळ आणि कुरूप दिसू लागले. तरीही त्याकडे न पाहता त्याने जवळच्याच एका संगमरवरी कुंडाच्या मध्यभागी असलेल्या दगडी पुस्तक उचलले आणि तो वाचू लागला. पुस्तकात फक्त तीनच पाने होती, पण त्यात वेगवेगळे दर्पण तंत्राचे मंत्र आणि त्यातील विधी लिहिले होते. पंडिताचा दर्पण तंत्राचा अभ्यास होताच , परंतू काही विशेष तंत्रे त्यास ज्ञात नव्हती. तो एकपाठी असल्याने त्याला एकदा वाचलेले मंत्र त्याच्या चांगलेच लक्षात राहत. तंत्र अर्थातच विचित्र होते. त्याने आता त्याप्रमाणे विधीची सिद्धता केली. एकच अडचण मात्र आली ती म्हणजे , एका तरी राजकारणी पुरुषाचे नुकतेच उडवलेल्या शिराची आवश्यकता होती. आता त्यासाठी त्याला विवाहस्थळी जाण्याची आवश्यकता नव्हती. प्रमुख प्रवेशद्वारावर काही विचित्र रंगांचे आणि मानवी शरीराचे पक्षी त्याने ठेवले होते त्यातील एकाला त्याने साद घातली. " उपध्याना , वेदीसमीपच्या चौथऱ्यावर त्वरित अवतीर्ण हो. " काही क्षणांपुरता त्याचा आवाज संबंध तळघरात घुमला . त्याचे प्रतिध्वनीही उमटले. ते थांबल्यावर प्रवेशद्वारावर उभ्या असलेल्या चौघांपैकी उपध्यान नावाचा पक्षी हू ... ्हूं .. ...... हूं असा आवाज करीत चौथऱ्याच्या दिशेने झेपावला आणि लवकरच तो चौथऱ्यावर स्थिरावला आणि म्हणाला, " आज्ञा व्हावी , महाराज ....

..... "
अवतीर्ण झालेल्या पक्षाला विचित्र प्रकारचा गंध येत होता. तो कधी कुजलेल्य कलेवरासमान तर कधीकधी मधाळ फुलाच्या सुगंधासमान जाणवत होता. जवळच असलेल्या तीक्ष्ण धारेच्या सुवर्ण खड्गाने पंडिताने त्या पक्षिरुपी राजकारणी पुरुषाचे मस्तक धडावेगळे केले. उभ्या आणि तडफडत असलेल्या धडाला दोन्ही हातात घट्ट पकडून त्याच्या रुधिराने स्थंडिलाचे आंतरगर्भ प्रोक्षण करून घेतले. आता त्याने स्त्री कलेवराला जे ओंगळ दिसत होते, त्याला मंत्रोच्चार करून पाचारण केले . त्याबरोबर त्याचे एका पांढरट अशा पारदर्शंक आकृतीत रुपांतर झाले आणि ते लवकरच वेदीच्या पायरीशी येऊन पुढील आज्ञेसाठी थांबले. आता एकूण तीन मंत्र होते. त्यातील पहिला मंत्र त्या आकृतीला जड आणि दृष्य रुपात आणणारा होता. परंतू कोणत्याही अवयवांना दृष्टोत्पत्तीस न आणणारा होता. तो पंडिताने उच्च रवात जपून जवळच जळत असलेल्या स्थंडिलात त्याच्या जवळील एका सुवर्ण पात्रातील काही पाषाण त्याने त्यात फेकले. त्यासरशी तेथे मोठा प्रकाश निर्माण होऊन अग्नी धडाडून , एखादी चिता पेटते तसा पेटून उठला. आणि अचानक जवळच्या कलेवराचे रूप पांढऱ्या स्वच्छ पण सपाट स्त्री आकृतीत रुपांतर झाले. दुसऱ्या मंत्राने त्याने त्या आकृतीचे नग्न रूप निर्माण केले. आणि तिसऱ्या मंत्राने त्या आकृतीस मनोवांच्छित स्त्री रुपात आणले. अर्थातच ती आता जिवंत स्वेच्छेची प्रतिकृती होती . क्षणभरापुरता पंडितही मोहित झाला. मूळ स्वेच्छेची आवश्यकता नसल्याचे त्याचे मन त्याला पुन्हा पुन्हा जाणवून देऊ लागले. परंतु ही प्रतिकृती असून ती प्रतिबिंबाप्रमाणे असल्याने दर्पण तंत्राच्या बंधनानुसार तिचा शारिरीक उपभोग घेता येणे त्याला शक्य नसल्याचे लक्षात आले. त्याने अर्थातच तो नाद सोडून दिला. असो. विवाहस्थळी असलेल्या राजकारणी वऱ्हाड्यांचे नक्कीच समाधान होईल आणि वेळ मारून नेता येईल याची पंडीताला आता खात्री पटली . मग त्याने त्या स्वेछेला आपल्या सोबत येण्याची करपल्ल्वी केली . ती नवीन स्वेच्छा हसऱ्या चेहऱ्याने पंडिताचे अनुसरण करू लागली. पंडित थांबल्यावर तिने पंडितास पृच्छा केली, " नाथ , आपण स्तंभित झालात की काय ? " तिच्याकडे तुच्छतेने हासून तो म्हणाला, " तुझ्या कार्याचा विचार कर, स्वेच्छे. मातेला वंदन आणि अपराध क्षमापापन स्तोत्र ऐकवण्यासाठीच मी मागे वळलो. " त्यावर तिने काहीही प्रतिक्रिया दिली नाही. पंडित मातेचे क्षमामापन स्तोत्र उच्च रवात म्हणू लागला. तत्क्षणी मातेने आपल्या मधुरवाणीने पंडिताला अशिर्वाद दिले आणि दर्पण तंत्राचा पुनर्प्रयोग न करण्याचे विदित केले. कारण या तंत्रानुसार ज्याचे प्रतिबिंब निर्माण केले जाते ती व्यक्ती प्रयोगाचा उपयोग संपेपर्यंत तात्पुरत्या मृतावस्थेत जाते व पुनर्प्रयोग केल्यास सिद्ध होत नाही व झाल्यास ती व्यक्ती कायमची मृतावस्थेत जाऊ शकते , त्यासाठी कालाच्या अनुमतीची आवश्यकता असते . हे सगळे ध्यानात आल्यावर पंडिताच्या लक्षात एक गोष्ट आली ती म्हणजे तो पाहिजे तितका काल स्वेच्छेला मृतावस्थेत ठेवू शकतो.

(क्र म शः )

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मध्यंतरी मणक्यांच्या दुखण्याने आजारी असल्याने लेखन झाले नाही. आता सुरुवात करीत आहे. कृपया समजून घ्यावे ही विनंती. प्रतिसादाबद्दल आभारी आहे.

लिहा पण तब्बेतीकडेही लक्ष द्या... Happy

मी वाचलं नाही,कारण या आधीचे भाग माहीत नाही...
वाचल्यावर प्रतिसाद देइन...

लिहा पण तब्बेतीकडेही लक्ष द्या..>> १००
तुम्हाला जसे जमेल तसे लिहा आम्ही वाट पाहू पण तुम्ही काळजी घ्या

लिहा पण तब्बेतीकडेही लक्ष द्या..>> १००
तुम्हाला जसे जमेल तसे लिहा आम्ही वाट पाहू पण तुम्ही काळजी घ्या

मला परत मणक्यांचा त्रास परत सुरु झाल्याने कथा तयार असूनहि टंकलेखन करता येत नाही. त्याबद्दल क्षमस्व. हा संदेश जेमतेम टंकलि खित
केला आहे. आपणा सर्वांचा मी आभारी आहे.