फुलपाखरू छान किती दिसते, फुलपाखरू!!! - भाग २

Submitted by विद्या चिकणे-मांढरे on 15 March, 2017 - 05:14

भाग १ - http://www.maayboli.com/node/61986

छान टुमदार बंगला अन त्यावर 'मनश्री' अशी पाटी, गेटमधून आत शिरतांच बहरलेली मोट्ठी बाग, अन दाराजवळ पोहोचताच येणारे थट्टा-मस्करी अन हसण्या-खिदळण्याचे आवाज! सारं काही अनपेक्षित होतं शशांकसाठी. त्यानं कल्पना केलेलं मनवाचं घर अगदी वेगळं होतं. आंत पोहोचला अन समोर पाहिलेल्या चित्राने अजूनंच चकित झाला. भल्यामोठ्या डायनिंग टेबलवर एका बाजूला एक आजीबाई बसल्या होत्या, मेथीची भाजी निवडत. अन दुसऱ्या बाजूला मध्ये मनवा तिच्या एका बाजूला साधारण तिच्याच वयाचा एक तरुण अन दुसऱ्या बाजूला जवळपास तिच्याच वयाच्या दोन मुली, एका लॅपटॉपवर काहीतरी बघत होते.

शशांकला दारांत पाहिलं तशी मनवा उठली अन त्याला, 'अरे शशांक! ये. बैस!' अन इतरांना 'Folks, here he comes’, म्हणाली. सगळ्यांनी शशांकला वेलकम केलं. शशांक खुर्चीत बसला खरा, पण त्याचं सारं लक्ष मनवाच्या बाजूला बसलेल्या तरुणाकडे होतं. नाही म्हटलं, तरी शशांकपेक्षा उजवाच होता तो. त्यांत त्याची हसण्या बोलण्याची पद्धतही अगदी रुबाबदार होती. त्याच्याकडे पाहून नकळत का होईना शशांकला जरा आसूयाच वाटत होती....अन कुतूहलही.

शशांकच्या चेहऱ्यावरचं कुतूहल मनवाच्या नजरेतून सुटलं नाही. 'शशांक! ये सगळ्यांशी तुझी ओळख करून देते, असे म्हणत तिने एकेकाची ओळख करून द्यायला सुरुवात केली. ‘या श्रीच्या आज्जी, यांच्या वयावर जाऊ नकोस हा! हि समोरची बाग अन घरामागची शेती यांनीच फुलावलीये. या वयातही एका पैशासाठीसुद्धा कुणावर अवलंबून नाहीयेत त्या. त्यांच्या शेतातल्या लुसलुशीत मेथीचे पराठे खायला मिळणार आहेत बरं का आज तुला.' आजही मनवाला आपली आवड लक्षात आहे हे, जाणवून नकळत शशांक सुखावला. 'अन या, राणी आणि तेजू. स्वतःचं घर, नोकरी सांभाळत जमेल तशी मदत करतात मला. नोकरीबरोबर एक छोटंसं वृद्धाश्रम अन अनाथश्रम चालवतो आम्ही तिघी मिळून, तेव्हढंच समाजाचं ऋण फेडल्याचं समाधान! शनिवार-रविवार तिथे कसा जातो हेही कळत नाही. दोघीही उच्चशिक्षित तर आहेतच पण MNC कंपनीत चांगल्या पगाराच्या नोकऱ्याही आहेत दोघींच्या.’ मनवा बोलत होती अन तिचा व्याप बघून शशांक अवाक होण्यापलीकडे काहीच बोलू शकत नव्हता. शेवटी मनवाने त्या उमद्या तरुणाचीही ओळख करून दिली, 'अन हा रसिक, माझा पार्टनर. श्रीचं स्वप्न होतं, एक ट्रॅव्हल कंपनी काढावी, चार भिंतीत अडकून पडलेल्या लोकांना जग दाखवावं अन त्यांच्यासोबत आपणही पहावं. सहा महिन्यापूर्वी रसिक भेटला, श्रीसारखाच वेडा, फिरण्याची आवड, यालाही अन याच्या बायकोलाही. मग काय, दोघांना सोबतीला घेतलं अन जगू लागले श्रीचं स्वप्नं. बाहेर ती दुसरी रॉयल एन्फिल्ड आहे ना, ती याचीच. पुढच्या महिन्यात आम्ही एका ग्रुपला घेऊन लेह-लडाखच्या ट्रीपसाठी जाणार आहोत त्याचीच चर्चा करायला आलाय तो’.

'अन पहिली रॉयल एन्फिल्ड?' आत येताना पाहिलेल्या गाड्या आठवून न रहावून शशांकने विचारले. 'माझी', म्हणत मनवा खळखळून हसली.
हे सारं ऐकल्यावर, इथे येण्याआधी आपण कसले कसले विचार करत होतो हे आठवून शशांक पुरता ओशाळला.

'दोन वर्ष जीवापाड प्रेम असूनही मला तुझ्या मनाचा थांग कधीच नाही लागला अन तेव्हढ्याच कालावधीत तू आणि श्रीने एकमेकांना किती छान समजून घेतलंत. आपली वेव्हलेंथ खरंच नाही जुळत ग, मनवा! तुझा निर्णय अगदी योग्य होता तेव्हाही अन आताही.’

' हम्म! शशांक, आधार द्यायला तू सदैव तयार होतास, पण मला आधार नाही सोबत हवी होती, जी श्रीने दिली सदैवं आणि आताही देतो. त्यानंच स्वप्नं जगायला शिकवलं, आधार देऊन अधू करण्यापेक्षा साथ देऊन कणखर केलं. श्री नेहमी म्हणायचा फुलपाखरू नाजूक असलं तरी निसर्गाने त्याला पंख दिलेत अन तीच त्याची ताकद असते. आपण बाग फुलवून त्याला प्रोत्साहन द्यावं, बाटलीत बंद करून त्याचं अस्तित्व संपवू नये, त्याचं खरं सौन्दर्य त्याच्या बागडण्यात असतं......

म्हणायचा, जिंदगी लंबी नही, पुरी होनी चाहिये.'

गोष्टीचा शेवट….कि मनवाची नवी सुरुवात Happy

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आधार देऊन अधू करण्यापेक्षा साथ देऊन कणखर केलं..........जिंदगी लंबी नही, पुरी होनी चाहिये

मार्मिक बोल अगदी
छान लिहिलय

जिंदगी लंबी नही, पुरी होनी चाहिये.'
व्वा मस्त. छान लिहलय !! स्पेशली
जास्त वाट बघायला न लावता पटपट भाग टाकताय हे भारी काम करताय नाहीतर क्रमशः लिहलेल्या कथांचा अत्मा माबो वर अजून भटकतोय त्याचे धागे पण निघाले पण पुढील भाग काय येत नाहीयेत. पु.ले.शु.

Happy