काळजाचा ठोका चुकवणारे सौंदर्य अर्थात यमुना काठची मुमताज !

Submitted by किंकर on 13 February, 2017 - 22:54

शहेनशहा शहाजहान ने त्याच्या पत्नी आणि सौंदर्यवती मुमताजच्या स्मृती प्रित्यर्थ एक अजोड स्मारक यमुना काठी तयार केले, ते स्मारक स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून ताज महाल या नावाने ओळखले जाते.

याच यमुना काठी पुढे आणखी एक सौंदर्यवती जन्मास आली. जिची निर्मिती खुदाने सौंदर्याचे सर्व मापदंड वापरून केली असे वाटावे अशा लावण्यवतीचे संपूर्ण नाव होते - मुमताज बेगम जहाँ देहलवी.

अर्थात इतके सांगूनही आपण अजून संभ्रमात असाल किंवा अजूनही तिची पूर्ण ओळख पटली नाही? कारण तिची निर्मिती करताना खुदाने सौंदर्याचे सर्व मापदंड वापरले, का तिच्या निर्मिती नंतर तिचे रूप हे सौंदर्याचे अंतिम मापदंड ठरले हेच नक्की ठरवता येणार नाही. अशी सौंदर्यसाम्राज्ञी म्हणजे आपली सर्वांची लाडकी - मधुबाला.

१४ फेब्रुवारी हा दिवस व्हॅलेंटाईन डे म्हणून जगभर साजरा करतात. त्या दिवसाच्या अनेक आख्यायिका आहेत. आधुनिक काळात प्रेम व्यक्त करण्याचा दिवस म्हणून याकडे पाहतात. अशा दिवशी जन्मास आलेली ,जणू काही तिच्या सौंदर्याच्या उपासनेसाठी हाच दिवस योग्य ठरेल अशी अजोड सुंदरी अर्थात -मधुबाला .

आपल्या छत्तीस वर्षांच्या आयुष्यात सत्तरहुन अधिक चित्रपटात विविध भूमिका करून हिंदी चित्रपट सृष्टीचा सुवर्णकाळ उपभोगणारी अभिनेत्री अर्थात -मधुबाला .

एक प्रतिभावान कलाकार म्हणून मधुबाला समजून घेताना मुगले आझम हा तिच्या कारकिर्दीतील मैलाचा दगड मानला जातो . कारण या चित्रपटाचे चित्रीकरण नऊ वर्षे चालले होते. त्या काळात प्रत्यक्ष जीवनात आलेला दिलीपकुमार एक मित्र --- प्रियकर ---दुरावलेला प्रेमिक ---- व्यवसायिक सहकारी अशा विविध नातेसंबंधात गुंफला गेला होता . त्यामुळे असेल किंवा तिच्या वाट्याला आलेले दीर्घ स्वरूपातील आजारपण असेल पण पडद्यावरील मधुबाला आणि प्रत्यक्षातील मधुबाला यातील स्वतंत्र ओळख जणू विरून गेली होती .

मधुबाला म्हणजे यशस्वी अभिनेत्री, पण पराभूत प्रेमिका हेच समीकरण वाटावे इतके आघात तिने सोसले . तिच्या जीवनात येऊन गेलेल्या प्रेमिकांमध्ये , बालपणीचे मित्र , व्यवसायिक मित्र , सहकलाकार अशा अनेक नात्यांचा सहभाग होतो . त्यात बालपणीचा मित्र लतीफ होता आणि झुल्फिकार अली भुट्टो हे देखील होते. प्रेमनाथ आणि कमल अमरोही हि नावे पण होती . पण दिलीपकुमार आणि किशोरकुमार हेच तिच्या जीवनातील राजकुमार होते .

काही जणांसाठी ती - " हाल कैसा है जनाब का "तर काही जणांसाठी " अच्छा जी मैं हारी " असे म्हणत राहिली . आणि प्रत्यक्ष जो यावा असे तिला मनापासून वाटत होते त्याची वाट पाहताना -" आयेगा आयेगा आयेगा आनेवाले " या खात्रीत राहिली. पण त्या प्रेमाने जेंव्हा अव्हेरले तेंव्हाची तिची अवस्था - भटकी हुई जवानी मंझिल को ढुंढती है ,माझी बगैर नैया साहिल को ढुंढती है । अशी झाली.

अर्थात असे असले तरी देखील आज अनेक रसिकांच्या काळजाचा ठोका चुकवणारी हि सौन्दर्यवती टाइम मॅगझीन च्या मुखपृष्ठावर विराजमान झाली . तिने अनेक रसिकांच्या हृदयात लाडकी अभिनेत्री म्हणून कायमचे स्थान मिळवले. असे अनेक रसिकांच्या काळजाला घर पडणारी हि मदनाची मंजिरी केवळ वयाच्या छत्तिसाव्या वर्षी काळजाला घर पडल्याने आपल्यातून निघून गेली

त्या अनभिषिक्त साम्राज्ञीस तिच्या जन्मदिनी मानाचा मुजरा !

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>१४ फेब्रुवारी हा दिवस व्हॅलेंटाईन डे म्हणून जगभर साजरा करतात. त्या दिवसाच्या अनेक आख्यायिका आहेत. आधुनिक काळात प्रेम व्यक्त करण्याचा दिवस म्हणून याकडे पाहतात. अशा दिवशी जन्मास आलेली ,जणू काही तिच्या सौंदर्याच्या उपासनेसाठी हाच दिवस योग्य ठरेल अशी अजोड सुंदरी अर्थात -मधुबाला .----

खरेच. याआधी माहित नव्हते वाढदिवसाबद्दल. लेख आवडला.

असं म्हणतात की मधुबाला ची प्रदर्शनात ठेवलेली फ्रेम नजर लागून तडकली होती ...
(खरे खोटे माहित नाही)
बिचारीची मरन्नोत्तर पण फरपट तिची कबर उखडून टाकण्यात आली ...