मराठी भाषा दिन २०१७ - घोषणा (मुदत ६ मार्चपर्यंत वाढवली आहे)

Submitted by संयोजक on 15 February, 2017 - 01:28

ऐका माय मराठी तुमची कहाणी!

आंतर्जालाचे ठायी मायबोलीनामक एक तळे, त्यावर पिकती अनेक हितगुजांचे मळे आणि गुलमोहरांची झाडे. त्या तळ्यात असती आपल्याच माय मराठीचे निर्मळ झरे.

एकदा माय मराठी प्रसन्न चित्ताने त्या तळ्याला म्हणाली, 'तळ्या तळ्या माझा उत्सव कर. अमृताशी पैजा घेणारे माझे वैभव उजळून काढ.'
तळे म्हणाले, 'हा उत्सव कधी करावा? कसा करावा?'

माय मराठी म्हणाली, 'दर वर्षी २७ फेब्रुवारीला हा उत्सव करावा. तळ्याच्या काठावरच्या सर्व माणसांना, त्यांच्या लेकीसुनांना, मुला नातवंडांना उत्सवात सहभागी करून घ्यावे. विविध विचारांचे मंथन करावे. विविध खेळ खेळावेत. दरवर्षी नवीन विषय, नवीन खेळ घ्यावेत. मायबोलीने तो वसा घेतला.

असे करता करता २०१७ साल आले. मायबोलीने विचारले, 'यंदा काय करावे?'
माय मराठी म्हणाली, 'खालील विषय घ्यावेत. तळ्याकाठच्या लोकांना त्यावर लिहावयास सांगावे आणि सगळ्यांनी मिळून त्या लिखाणाचा आनंद घ्यावा. ह्या व्रताने मी प्रसन्न होईन.'

तर मायबोलीकरांनो माय मराठीने दिलेले विषय असे आहेत:

१. माझा आवडता लेखक
मराठीत उत्तम साहित्य निर्मिती होत असते. तुम्ही सगळे साहित्य प्रिय आहातच. तेंव्हा चला, तुमचा आवडता लेखक, त्याच्या साहित्यातले तुम्हाला काय आणि का आवडते, त्या लेखकाच्या आयुष्यात आलेले काही महत्वाचे क्षण अशा अनेक छटांतून त्या लेखकाचे व्यक्तिमत्व सादर करा, तुमच्याच शब्दात. न जाणो, तुम्हीही कुणाचे तरी आवडते लेखक असाल.

२. कलाक्षेत्रातील मराठी दिग्गज
साहित्य, संगीत, चित्रकला, शिल्पकला अशा ६४ कलांत, आणि आता ६५व्या जाहिरात कलेतही अनेक मराठी माणसे तळपली आहेत. त्यांचे तेज इतके दैदिप्यमान होते की महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून ते सार्‍या भारतभर पसरले, कधी कधी तर सार्‍या जगात. अशा दैदिप्यमान मराठी कलाकारांविषयी तुम्हाला लिहायचे आहे.

३. मला आवडलेले मराठी नाटक/ सिनेमा
सिनेमा आणि मराठीचे घट्ट नाते आहे. मराठी मातीतच पहिला सिनेमा घडला. नाटक तर मराठी माणसाच्या रक्तातच भिनले आहे. तुम्ही फक्त एवढेच करायचे - तुम्हाला आवडलेल्या नाटक अथवा सिनेमाचे रसग्रहण करायचे आणि समस्त मायबोलीला त्या कलाकृतीचा आनंद द्यायचा आहे.

४. पुस्तके मागच्या शतकातली
मागच्या शतकात अनेक उत्तमोत्तम पुस्तके मराठीत लिहिली गेली. नवीन पुस्तकांसारखी त्या पुस्तकांची ओळख बर्‍याचवेळा होत नाही. तेंव्हा तुम्हाला आवडलेल्या, मागच्या शतकात (१९०१ ते २०००) प्रथम प्रकाशित झालेल्या पण फार प्रसिद्ध न झालेल्या पुस्तकाची ओळख मायबोलीकरांना करून द्यायची आहे.

नियम –
१. ह्या उपक्रमात सहभागी होण्यासाठी आपल्याला मराठी भाषा दिवस २०१७ ह्या ग्रूपचे सदस्यत्व घ्यावे लागेल.
२. लिखाण स्वलिखित असावे.
३. या उपक्रमातील धागे २७ फेब्रुवारी ते ४ मार्च २०१७ या दिवसांतच काढावेत. त्यात शीर्षक या बॉक्समध्ये खालीलप्रमाणे विषय लिहावा :
विषयाचे नाव - लेखकाचे \ दिग्गजांचे \ नाटक सिनेमाचे \ पुस्तकाचे नाव - आयडी

सूचना -
हा उपक्रम आहे, स्पर्धा नाही.
या लेखनाला शब्दमर्यादेचे बंधन नाही.
एक आयडी एकापेक्षा जास्त विषयांवर लिहू शकतो. तसेच एका विषयावर एकापेक्षा जास्त लेख लिहू शकतो.

चला तर मग. सरसावा आपल्या बाह्या. कळफलक तर तुमच्या हातात असेलच. मायबोलीने वसा घेतला आहे. "ती उतणार नाही मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही" याची काळजी तुम्हालाच करायची आहे. तेंव्हा सुरुवात करा लिहायला.

विषय: 
Groups audience: 
- Private group -
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

अरे वा! आली का घोषणा? मसुदा छान आहे, आवडला.

#४ विशेष आवडला. #२ मध्ये फारशी ओळख/माहिती नसलेल्यांविषयी वाचायला मिळेल अशी आशा आहे.

२७ फेब्रुवारीला ग्रुप सदस्यत्व घेण्यासाठी खुला होइल. इतर ग्रुप्सचे जसे सदस्यत्व घेतात तसेच त्याही ग्रुपचे सदस्यत्व घ्या.

माबोवरील लेखक/लेखिके बद्दल लिहिले तर चालेल का? >>> चालतंय की! मायबोलीवर पण अव्वल दर्जाचे लेखन होतच असते.

घोषणेची स्टाईल सहीय्ये Happy

कलाकारांमध्ये मराठी चित्रपटातील अभिनेते, गायक, संगीतकार देखील आले ना, चालतील ना ?
या काही दिवसांत वेळ मिळणे कठीण आहे, तरीही काढता आलाच आणि तेव्हाच लिहायची उर्मी आली तर नक्की..

अरे वा! अगदी प्रासादिक आणि कल्पक घोषणा ! >> +१००००

कितपत भाग घेता येतोय बघतो.
गद्यच हवे? की पद्यही चालेल?

आवडलेला सिनेमा नाटक यात मालिका/कथाबाह्य कार्यक्रम हेही घेतलं तर? अलीकडे झी वर वाईट्ट मालिका चालू आहेत पण त्याआधी झी /प्रवाह / दूरदर्शन वर चांगले प्रयोगही झाले आहेत.

मंडळी, मराठी भाषा दिनाच्या व्रताला प्रारंभ झाला आहे. उद्यापन ४ मार्चला (बदललेली मुदत) आहे. तेंव्हा आपल्या खुलभर लेखनाची वाट बघतो आहोत.
ग्रूप : http://www.maayboli.com/node/61806