हम तो है देस मे... परदेस मे निकला होगा चांद

Submitted by रेव्यु on 9 February, 2017 - 04:13

हम तो है परदेस मे ... देस मे निकला होगा चांद
जसजीतच्या या ओळी मला अनेक दशकांपूर्वी महाराष्ट्राबाहेर-- दूरवर हिमाचल अन उत्तरांचल तसेच विदेशी----म्हणजे अमेरिकेत कामावर असतांना अस्वस्थ करून जायच्या.. खूप गतकालविव्हल म्हणजे नॉस्टॅल्जिक होत असे.
विशेषतः कोजागिरी निमित्त एकत्र बसलो ( परदेशी ) की हमखास ही गझल व्हायची अन एकदम अस्वस्थ शांतता...... आम्हा सर्व विजनवासीयांना एका खिन्न मनः स्थितीत न्यायची. अशा बैठकीत जुनी मराठी-हिंदी गाणी व्हायची..... मसाल्याचे दूध व्हायचे.... माहौल असा खिन्न... पण सुखद अन दु:खद खिन्नता आणणारा व्हायचा... या हमदर्द भावनातून जिवलग मित्र झाले. गंमत म्हणजे या मेळाव्यात अनेक अ-महाराष्ट्रीय सुध्दा असायचे अन त्यांच्या सणात आम्ही देखील तितकेच समरस होवून सामील व्हायचे.
पण भावना मात्र तिच ... हम तो है परदेस में ... अशीच असायची ... अगदी प्रत्येकाची!
ती सुख-दु:ख संमिश्रित भावना आम्हाला एकमेकांना समभावी बनवायची.
वर्षे लोटत गेली. मुले मोठी झाल्याने म्हणा वा व्यावसायिक प्रगतीच्या हावेने म्हणा... आम्ही पांगलो. व्यवसायात यशस्वी झालो आणि बहुतेक जण मायदेशी परतलो... आपापल्या राज्यात. गुहा आणि बंदोपाध्याय कोलकात्त्याला स्थायि झाला... मणि कोयंबत्तूरला गेला.... पाटणकर इंदूरला अन सिन्ग आणि चावला... लुधियानाला.... तय्यब बोहरी अमदावादला... अशी ही पांगापांग!
मुलामुलींच्या लग्न समारंभाला आवर्जून भेटायचो... जुन्या आठवणी काढून हळहळायचो....
ती सुखद दु:खद भावनांच्या अनुभवाची वीण अजूनही घट्ट होती.... आहे.

पण...
मायदेशी परतल्यावर ते बंध रेशमाचे पुन्हा विणू शकलो नाही. अप्रूप वाटणारे पु.लंचे सी डी संच, वा मणीकडील एम एस सुब्बलक्षमींचे गायन , वा चावला आंटींच्या गिद्द्याला आपापल्या राज्यात फारसे भावनिक स्थान नव्हते अन त्यांच्या पुनरावृत्तीत ती भावनिक कौतुकाची ओढ नव्हती. एकत्र साजरा केलेला लोहडीचा, पोंगलचा, गुढी पाड्व्याचा सण आमच्या पैकी कोणा एकाच्या ......त्या राज्याच्या मूळ निवाशाच्या मनात....... ती “ हम तो है, परदेस में, देस में निकला होगा चाँद”ही ओळ व्यथित करून जायची आणि ती त्याच्या चेहर्‍यावर झळकता क्षणीच आमच्या ही मनात हुरहुर लागायची आणि मग आम्ही हमदर्द व्हायचो.
हे आता होत नाही. सण सर्व आपलेच असतात ... पण ते आर्जव नसते .... का कुणास ठावूक !!
म्हणूनच आता इथे नाशकात सण साजरे होतात तेव्हा याच ओळी मला अशा रूपात व्यथित करतात
’ हम तो है देस में... परदेस में निकला होगा चाँद !!”

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

So true!
Khup chhan lihiley. Awadle.

लेख आवडला, बराच रिलेट पण करू शकलो.

परदेशी असताना आपलं भारतीय/मराठीपण जास्तच उफाळून येतं Happy

अजून पण कधी कधी मित्रांसोबत आवर्जून ऐकलेली कोळीगीते, तद्दन फालतू पण तरी मराठी/हिंदी आहेत म्हणून पाहिलेले सिनेमे, दाक्षिणात्य मित्रांसोबत पाहिलेले तामिळ, तेलगू, मल्याळी सिनेमे / गाणी..... मित्रांना आणायला/ भेटायला/ सोडायला शंभर दीडशे किलोमीटर गाड्या पिदाडणे... मित्रांनी घरून आणलेल्या पदार्थावर आवर्जून ताव मारायला जाणे.... हे सगळं नॉस्टॅलजीक करून जातं

या सगळ्यातली मजा वेगळीच होती. मलापण अजून कधी कधी एखादं गाणं ऐकताना, टीव्ही वर लागलेला एखादा मित्रांसोबत पाहिलेला सिनेमा परत पाहताना हटकून तिकडचे दिवस आठवतात.

मस्त लिहिलंय.
गतकालविव्हल >> शब्द आवडला.

लेख आवडला, बराच रिलेट पण करू शकलो.
परदेशी असताना आपलं भारतीय/मराठीपण जास्तच उफाळून येतं
+१

मला तर 'ये गलीया ये चौबारा यहा आना ना दोबारा' हे पण गाणं आठवतं Happy

छान लिहीलय. वेगळा अँगल आहे. सत्य आहे.

अगदी सुरूवातीला अमेरिकेत विद्यार्थी म्हणून असताना, हे अनुभव जरा जास्त यायचे. माझ्या एका मित्राच्या अपार्ट्मेंट मधे गेलो असताना तिथे कुठलं तरी (बहुदा चिठ्ठी आयी है किंवा ने मजसी ने) लागलं असताना ते सगळे रूममेट्स भावनिक (साश्रुनयन ई.) होऊन स्वयंपाक करत होते ते आठवलं.

एकदा तर कहर म्हणजे ह्याच नॉस्टेल्जिया पायी 'कभी खुशी कभी गम' हा सिनेमा पाहून हळहळलो होतो आणी घरी फोन करून त्याचं ईतकं कौतुक केलं की घरचे सगळे थिएटर मधे जाऊन तो सिनेमा पाहून आले. आल्यावर मात्र माझ्या भावाने माझी बरीच मापं काढली होती :). नंतर एकदा पुन्हा तो सिनेमा बघताना 'आपल्याला त्यावेळी ह्यात ईतकं काय आवडलं होतं हा प्रश्न पुन्हा पुन्हा स्वतःलाच विचारला होता.

अर्थात जसा जसा काळ लोटतो, स्वतःची नोकरी, कुटुंब, घर वगैरे होतं तेव्हा मग ह्या कर्मभुमी शी कंफर्ट लेव्हल वाढत जाते. इमिग्रेशन ऑफिसर ने 'वेलकम बॅक' म्हट्ल्यावर होमली वाटतं.

मला आठवतंय अमेरिकेत नवीन असताना असेच एका पार्क मध्ये गेलो. सांस्कृतिक कार्यक्रम सुरु होते amphitheter मध्ये. अचानक एक ग्रुप स्टेजवर आला आणि जन मन गण सुरु झालं. आम्ही पटकन उभे राहिलो आणि डोळ्यांना धारा लागल्या होत्या.

अर्थात जसा जसा काळ लोटतो, स्वतःची नोकरी, कुटुंब, घर वगैरे होतं तेव्हा मग ह्या कर्मभुमी शी कंफर्ट लेव्हल वाढत जाते. इमिग्रेशन ऑफिसर ने 'वेलकम बॅक' म्हट्ल्यावर होमली वाटतं>>>> बरोबर आहे. आता भारतात गेल्यावर आपल्या घराची आठवण होते.

छान लिहिलंय, आपण सतत प्रवासात असतो.
जेव्हा तिकडे होतो तेव्हा इकडे यायचं होतं , इथे आलो आता तिकडची आठवण येते.
आयुष्यात येणारी वेगवेगळी स्टेशन्स. आणि त्यावेळी येणारी वेगवेगळी फीलिंग्स.
प्रयत्न करायचा की जास्त भावनिक व्हायच नाही, हाती काहीच लागत नाही.

छान लिहिलेय .. अनुभव नसल्याने रिलेट नाही झालो पण भावना पोहोचल्या Happy

अवांतर- फेरफटका, अहो तो "कभी खुशी कभी गम" खरंच मस्त पिक्चर आहे. ईतका की मी त्यावर स्वतंत्र लेख छापू शकतो. कारण सेट मॅक्सवर वरचेवर लागत असतो आणि आमच्याकडे बघितला जातो. सिल्व्हर ज्युबिली कमीतकमी झाली असेल घरच्या घरी..

हो पुर्वी नॉस्टेल्जिक ह्वायला फालतु सिनेमा/गाणं काहीही चालायच, पण आता ईझीली नविन सिनेमे/गाणी पहायला/ऐकायला मिळतात त्यामुळे प्रमाण कमी झालय. पण अजुनही गाडी मधे कितीही बोअर झालतरी KLOK 1170 च असत Lol

मग एकदा या की. आत्ताच या. भरपूर स्नो पडला आहे. काढणे जमत नाहीये. तुम्ही या नि काढून टाका.
तीहि एक रम्य आठवण.
हातासरशी भांडी घासून टाका, कपडे धुवा नि व्हॅक्युम पण करून टाका. कित्ती मज्जा नै.
भारतात काय, आपले सारखे नोकर कामाला. बंपर टू बंपर ट्रॅफिकमधे वेळेवर ऑफिसात पोचायची घाई- काय पण गंमत.
भारतात काय, अगदी गाडी चालवायला सुद्धा शोफर, नि बोंबलायला भारतात वेळेवर जातोच कोण?

नन्द्या ४३ : आपला रोख कळला नाही!
आयुष्यात त्रास ,अडचणी अन बिकट घटना अनेक असतातच. पण त्यातील मोजकेच क्षण, स्मृती ओंजळीत सुगंधी बनून जन्मभर दरवळतात. काही हृदयातील कप्प्यामध्ये जन्मभर घर करून राहतात.
त्या स्मृती कधी कधी विव्हल करतात आणि सुखावूनही जातात. माझ्या त्या भावनेला उजागर करण्याचा हा एक भाबडा प्रयत्न होता.

अहो, परदेशच कशाला? मी स्वदेशातच हा अनुभव घेतलाय. बालपणापासूनची माझी २५ वर्षे मध्यमुंबईत गेली. मुंबईचं जीवन अनुभवलं. आता गेली २८ एक वर्षे येथे उपनगरात राहतोय. पण सुरवातीची ५ एक वर्षे येथील जीवनाशी जुळवून घ्यायला कठीण गेली. जास्त त्रास तेव्हा होई जेव्हा होळी, गणपती, दिवाळी, नवरात्र हे सण येईत. ह्या सणांना मुंबईत केलेली धमाल आठवे. मन उदास होई, इथे एकटं, एकटं वाटे. तेव्हा वाटे 'स्वदेस में निकला होगा चाँद'.

पण एवढ्या वर्षांत आता येथे रुळलोय, रमलोय. इथल्या समाज जीवनाशी एकरूप झालोय. मुंबईच्या आठवणी येणे आता कमी झाल्यात. आता चुकून कधीतरी वाटतं, 'परदेस में निकला होगा चाँद.'

आणि मला वाटतं मनाची अशीच अवस्था सासरी रमलेल्या एखाद्या मुलीची, पोटापाण्यासाठी शहरात आयुष्य गेलेल्या स्थलांतरितांचीसुद्धा होत असावी.

हे आठवले.....
हरिवंश राय बच्चन यांची एक कविता आहे,त्यातून स्फूर्ती घेऊन किंवा ज्याला स्वैर अनुवाद पण म्हणता येईल अशी एक कविता :
मनाच्या आभाळात आठवणींचे पक्षी उडायला लागतात
तेंव्हा काही मित्र मैत्रिणी आठवतात ......
भूत काळात जातो तेंव्हा काही मैत्रिणी अन मित्रांबरोबर
बरोबर व्यतीतीत केलेल्या काळाच्या रेशमी गुंड्या लहरत उघडतात..
आता काय माहित कुठे ,मस्त मजेत असतीलच सगळे जण
मी रात्री जागतो कधी ,तेंव्हा काही मित्र मैत्रिणी आठवतात ........
काही गोष्टी होत्या फुलांसारख्या कोमल
तर काही होत्या केशराच्या गंधासारख्या ...
एकटाच फिरतो रस्त्यांच्या मोठ्या वळणावर...
तेंव्हा काही मित्र मैत्रिणी खूप आठवतात
सगळ्यांची आयुष्ये बदलली..
नव्या साच्यात बसून गेली
कुणाला नोकरीतून फुरसत नाही तर
कुणाला मैत्रीची जरुरी उरली नाही
सगळे यार दोस्त हरवले
तू चे तुम्ही झाले
हळू हळू वय वाढताहेत
आयुष्य आठवणीच पुस्तक बनत चाललंय
आता मनाच्या किनाऱ्या वर भाव भावनांचे शंख शिंपले वाहून येत नाहीत
आठवणीतच उरले दोस्त लोक भेटत च नाहीत .....
जगून घ्या दोस्तांनो ते क्षण...जेंव्हा असतात दोस्त आजू बाजूला तेंव्हाच !
पुन्हा फिरून दोस्तीचे जमणे होत नाही...
पुन्हा फिरून दोस्तीचे जमणे होत नाही...

आवडलं. कोजागिरी, गझल! आत्ताच्या आत्ता मैफल जमवाविशी वाटतेय.

ही गझल प्रतिकात्मक आहे ना? म्हणजे चांद हे प्रेयसीला उपमा म्हणुन वापरले आहे असे मला नेहमी वाटते.