संगीतक हे नवे - घोषणा

Submitted by संयोजक on 3 September, 2016 - 14:54

एकविसाव्या शतकातील
संवत्सर होते सोळा
उपक्रम हे निवडाया
संयोजक झाले गोळा

खलबते झाली अनेक
बातांच्या फैरी झडल्या
पाकृ, झब्बू, चित्रांच्या
कल्पना अनेक पडल्या

काव्य हवे, शास्त्र हवे
आम्हां विनोदही हवा
अनेक कटू रोगांवरची
तीच अक्सीर दवा

होई गणरायांचे आगमन
दृष्टीस हे सारे पडले
हसले सोंडेतल्या सोंडेत
आणि उच्च स्वरात वदले

"विनोदी लेखन नेमाने
असावे नित्य नवे नवे
नकोत नुसते संवाद
त्यात थोडे पद्यही हवे!"

आदिलेखकाचे ऐकून स्वर
मार्ग सुचला संयोजकांना
प्रसंग देऊ आपण काही
कल्पना सुचो लेखकांना!

आयुष्यात असे जरी
सक्ती तुम्हां गद्याची
आता मात्र गणेशाची
अट आहे पद्याची

कामास लागा मग सत्वरी
उत्सुक वाचकांचे येती थवे
घे लेखणी लिही लवकरी
रसिका, संगीतक हे नवे!

तर मंडळी, कळली ना स्पर्धा? आम्ही तुम्हांला काही प्रसंग देऊ. तो प्रसंग तुम्ही आपल्या कल्पनेनं फुलवायचा आहे. फक्त ग्यानबाची मेख अशी आहे की, ह्या पात्रांचे संवाद, तसंच प्रसंगाचं वर्णन, हे सगळं पद्यात असलं पाहिजे. सगळा कल्पनाविस्तार पद्यात हवा. अगदी मात्रा मोजून लिहिलं नाही, तरी यमकबद्ध व पद्य वाटेल अशी रचना असावी. तसंच हे लिखाण थोडं हलकंफुलकं, विनोदी असावं. गंभीर स्वरूपाचं लेखन या स्पर्धेत अपेक्षित नाही. या स्पर्धेची नियमावली पुढीलप्रमाणे -

(१) संगीतक पद्यात असावं. अगदी मुक्तछंदात असलं, तरी यमक व गेयता यांचा विचार संगीतक लिहिताना केला जावा.

(२) लेखन हलकंफुलकं, विनोदी असावे. पात्रानुसार थोडा गंभीर स्वर एखाद्या ओळीत लागला, तरी लेखनाची थीम ती नसावी.

(३) शब्दमर्यादा अजिबात नाही.

(४) मायबोलीकरांचा नेहमीचा उत्साह लक्षात घेता या वर्षी आम्ही एका आयडीच्या कितीही प्रवेशिका स्वीकारण्याचं ठरवलेलं आहे. विजेतेनिवड मतदान पद्धतीनं होणार असल्यानं एकाच स्पर्धकाच्या एकाहून अधिक प्रवेशिका निवडून आल्यास कुणाचीही हरकत नसावी.

वाटतेय ना मजा? मग घ्या लिहायला हे आगळेवेगळे संगीतक!

स्पर्धेत भाग कसा घ्याल?
’संगीतक हे नवे!’ स्पर्धेत भाग घेण्यासाठी नवीन लेखनाचा धागा उघडावा लागेल.
प्रवेशिका गणेश चतुर्थीपासून (५ सप्टेंबर २०१६, भारतीय प्रमाणवेळ) ते अनंत चतुर्दशीपर्यंत (१५ सप्टेंबर २०१६, अमेरिकेच्या पश्चिम किनार्‍यावरची प्रमाणवेळ) प्रदर्शित करायच्या आहेत. प्रवेशिका पाठवण्याकरता 'मायबोली गणेशोत्सव २०१६' या ग्रूपचे सदस्य असणं आवश्यक आहे. हा ग्रूप सदस्य-नोंदणीकरता ५ सप्टेंबरला खुला करण्यात येणार आहे.

१. 'मायबोली गणेशोत्सव २०१६' पानाच्या उजवीकडे दिसणार्‍या 'मायबोली गणेशोत्सव २०१६' या निळ्या शब्दांवर टिचकी मारा. नंतर 'सामील व्हा' या शब्दांवर टिचकी मारा. आता आपण 'मायबोली गणेशोत्सव २०१६' या ग्रूपचे सदस्य झाला आहात.
२. याच ग्रूपमध्ये उजवीकडे 'नवीन लेखनाचा धागा' या शब्दांवर टिचकी मारा. (कृपया 'मायबोली गणेशोत्सव २०१६' ग्रूपमधील 'गप्पांचे पान', 'नवीन कार्यक्रम' हे पर्याय वापरू नका. )
३. नवीन लेखनाचा धागा उघडला जाईल. त्यात शीर्षक या चौकटीमध्ये खालीलप्रमाणे विषय लिहावा -
’संगीतक हे नवे’ - ’<तुम्ही निवडलेल्या विषयाचे नाव>’ हे विषयाचं नाव खाली दिलेल्या नावांपैकी असेल.
४. शब्दखुणा या चौकटीमध्ये ’संगीतक हे नवे!’ आणि ’मायबोली गणेशोत्सव २०१६’ हे शब्द लिहा.
५. नवीन लेखनाच्या धाग्यावर सर्वांत खाली 'Save' या कळीच्या वर ग्रूप असा शब्द दिसेल, त्यावर टिचकी मारा.’सार्वजनिक’ या शब्दाच्या आधी असलेल्या चौकटीवर टिचकी मारा. म्हणजे तुमची प्रवेशिका सर्वांना दिसू शकेल.
६. Saveची कळ दाबा.
७. जर काही मजकूर लिहायचा राहिला असेल / बदलायचा असेल तर सर्वांत वर दिसणारा 'संपादन' हा पर्याय वापरून प्रवेशिकेत बदल करू शकता.
८. या स्पर्धेचा अंतिम विजेता मायबोलीचे सभासद मतदान पद्धतीनं ठरवतील. या मतदानासाठीचा धागा अनंत चतुर्दशीनंतर उघडण्यात येईल.

संगीतकासाठी दिलेले विषय -

(१) विषयाचे नाव - मी टिळकांशी बोलतो! : यामध्ये लेख लिहिणारी मायबोलीकर व्यक्ती आणि लोकमान्य टिळकांचा पुतळा (कुठल्याही शहरातील) यांच्यातील संवाद पद्यात असावा.

(२) विषयाचे नाव - रिक्शावाला आणि मी! : यामध्ये लेख लिहिणारी मायबोलीकर व्यक्ती आणि इष्ट स्थळी जाण्यास नकार देणारा रिक्शावाला यांच्यातील संवाद पद्यात असावा.

(३) विषयाचे नाव - गांधीजी मीट्‌स्‌ फ्रँकलिन! : ‍यामध्ये भारतीय नोटेवरचे गांधीजी आणि अमेरिकन नोटेवरचे बेंजामिन फ्रँकलिन यांच्यातील संवाद पद्यात असावा.

(४) विषयाचे नाव - कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी व कनिष्ठ अधिकारी यांच्यातील संवाद पद्यात असावा.
___________________________________________________________________________

या स्पर्धेला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल आभारी आहोत!
कृपया खालील लिंक वर जाऊन आपल्या आवडत्या संगीतकाला आपले अमूल्य मत द्या Happy

संगीतक हे नवे - मतदान
http://www.maayboli.com/node/60252

मतदानाचे धागे येत्या रविवार म्हणजे २५ सप्टेंबरपर्यंत खुले असतील.
विजेत्यांची घोषणा मंगळवार दि. २७ सप्टेंबर रोजी केली जाईल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारी आहे! कसं सुचते एकेक Happy

पद्यात लिहायचे म्हणजे पद्य म्हणजे नेमके काय कसे ईथपासून सुरुवात करावी लागेल. पण शेवटी लिखाणच असल्याने आणखी एक धागा माझ्या खात्यात जमा करायची संधी सहजी सोडणार नाही. शक्यतो घेईनच भाग Happy

वा..... मस्त.

सगळ्यांनी गाण्यातच बोलायचे असा आदेश काढणाऱ्या राजाच्या गोष्टीची आठवण झाली. Happy

प्रस्तावना भारी झाली आहे. या स्पर्धेतल्या प्रवेशिका वाचायला मजा येइल. मस्त उपक्रम हो संयोजक Happy

मस्त उपक्रम!
टिळकांशी संवाद असताना पुन्हा गांधीजी आणि फ्रँकलिन विषयात थोर आदरणीय व्यक्तिमत्वेच येतायत. तिसरा विषय बदलून द्या. Happy

लिमिटची चिंता नको. बाप्पांचा आत्ताच टेक्स्ट आलाय.
काढून टाका तो निळा चेहरा.

एक आयडी कितीही प्रवेशिका देऊ शकतो, असा वरती नियमात बदल केला आहे.

कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी व कनिष्ठ अधिकारी यांच्यातील संवाद पद्यात असावा.
>>>>>
कार्यालयातीलच हवा का?
घरचा बॉस - बायको किंवा गर्लफ्रेंड यांच्याशी घडणारा संवाद नाही चालणार का.. फारसा फरक नसतो हो Wink

या स्पर्धेला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल आभारी आहोत!
कृपया खालील लिंक वर जाऊन आपल्या आवडत्या संगीतकाला आपले अमूल्य मत द्या Happy

संगीतक हे नवे - मतदान
http://www.maayboli.com/node/60252

मतदानाचे धागे येत्या रविवार म्हणजे २५ सप्टेंबरपर्यंत खुले असतील.
विजेत्यांची घोषणा मंगळवार दि. २७ सप्टेंबर रोजी केली जाईल.