संगीतक हे नवे - रिक्शावाला आणि मी!

Submitted by सोनू. on 10 September, 2016 - 14:52

या दूरच्या दूर ओसाड जागी
किडे पाखरांवीण नाही कुणी
जावे कसे काम करण्यास आता
पहावे कुठे एक रिक्षा जुनी

तितक्यात भरधाव धाऊनी आली
पॉ पॉ करूनी रिक्षा कशी
साशंक मन हे आनंदी झाले
परी आज ये भूवरी ही जशी

आर्जवी होवोनी मी त्यास पुसले
नेशील का रे इच्छीत स्थळी
देईन तुजला योग्य ती बिदागी
निघू लवकरी वेळ नाही मुळी

मुर्दाड स्वरात तो मजसी वदला
मार्ग माझा वेगळाला असे
वाहन तुम्ही दुसरे पहावे
वेळ ना मज मी जातो कसे

म्हटले तया का हो निष्ठूर होता
असे आडवाट अन् वाहनेही कमी
उशीर होईल कामास जाण्या
दुजी मिळेल रिक्षा ही नाही हमी

परोपरी मी विनविले तयासी
देईन पैसे ज्यादा ही मी
म्हणाला नका सांगू भाड्याचे काही
पैशास मजला नाही कमी

सुरू केली रिक्षा तोऱ्यात गेला
मला एकटीला तिथे टाकूनी
विमनस्क होऊनी विचार केला
घ्यावी अता कॅब बोलाऊनी

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान जमलंय सोनू.
रिक्षावाल्याशी संवादाची अजून एक दोन कडवी टाकता आली तर बघा.

ना. घ. देशपांड्यांच्या 'समाधी' कवितेतल्या पहिल्या दोन ओळींना ट्विस्ट देऊन बनवलेली संगितीका मस्त! सर्व सामान्यांची रोजची व्यथा बरोब्बर मांडल्ये. मस्त!

समाधी >> खूप आवडते ही कविता मला. जेव्हा पण मी एकटीच आहे असं वर्णन करायचं असेल तर हमखास हेच वर्णन करते मी गमतीत. त्यामुळे इथेही तेच शब्द येणं अपरिहार्य होतं.