माणुसकीचा चष्मा

Submitted by तिलोत्तमा on 21 June, 2016 - 07:16

माणुसकीचा चष्मा
मुलांनो, रात्री झोपताना अक्षयने त्याच्या आज्जीला नेहमीप्रमाणे गोष्ट सांगण्याची गळ घातली. अज्जीनेही लगेचच तिच्या गोष्टीच्या खजिन्यावर मनातल्या मनात भरारी मारली व अक्षयला गोष्ट सांगायला सुरुवात केली .
आज्जी म्हणाली , एके दिवशी एका गावात एक वाटसरू येतो . गावाच्या वेशी बाहेर वडाच्या झाडा भोवती बांधलेल्या पारावर गावकरी गप्पा मारत बसलेले तो पाहतो . तो त्यांच्याकडे जावून विचारतो कि , "राम राम पाव्हणं , मी दूर गावातून आलो आहे . मला तुमच्या गावात नवीन धंधा सुरु करायचा आहे. परंतु त्या आधी तुम्ही मला सांगाल का कि ह्या गावातील लोक कसे आहेत ?"
हे ऐकताच गावकरी एकमेकांकडे बघतात व ते काही बोलणार इतक्यात तेथे बसलेले एक आजोबा त्या वाटसरूलाच उलट प्रश्न करतात . ते म्हणतात , " हो हो , मी सांगतो तुम्हाला आमच्या गावातील लोक कसे आहेत ते. प्रथम तुम्ही मला सांगा , कि ज्या गावातून तुम्ही आलात त्या गावातील लोक कसे होते ? त्यावर वाटसरू म्हणाला कि, " अहो आजोबा, मी ज्या गावातून आलो त्या गावातील लोक इतके चांगले होते कि काय सांगू ? त्या गावात धंदा करून माझी खूप बरकत झाली ,माझा व्यापार उदीम वाढला म्हणून तुमच्या गावातही मला जम बसवायचा आहे. "
त्यावर ते आजोबा म्हणतात , " असे आहे का? मग राव , तुम्ही नक्की आमच्या गावात धंदा सुरु करा. आमच्याही गावातील लोक खूप चांगले व मनमिळाऊ आहेत. तुमची आमच्याही गावात भरभराट होईल . " हे ऐकताच वाटसरू खुश होऊन निघून जातो . थोड्याच दिवसांनी पुन्हा एक दुसरा वाटसरू पारावरच्या गावकर्यांना तोच प्रश्न विचारतो. तेव्हा तेच आजोबा त्यालाही विचारतात कि तू ज्या गावातून आलास त्या गावचे लोक कसे होते? तेव्हा तो वाटसरू म्हणतो कि, तो ज्या गावातून आला त्या गावचे लोक फार वाईट होते. शिवाय दुष्ट व स्वार्थी होते. हे ऐकताच आजोबा पटकन म्हणतात कि, " बाबारे तू आलास तसा निघून जा . आमच्या गावात तुझा धंदा अजिबात होणार नाही . आमच्या गावातील लोक अगदी तसेच आहेत जसे त्या गावातले जिथून तू आलास. " हे ऐकून वाटसरू हिरमुसून निघून जातो.
गावातील तरुण मुल आश्चर्यचकित होतात . ते आजोबांना विचारतात, कि आजोबा तुम्ही असा कसा सल्ला देता ? कधी म्हणता आपल्या गावातील लोक चांगले आहेत तर कधी म्हणता वाईट आहेत? तेव्हा आजोबा सांगतात , कि मुलांनो , आपण ज्या चष्म्याने किव्वा नजरेने इतरांकडे बघतो तसे आपल्याला जग दिसते . आपण जर प्रेमाने व आपुलकीने सर्वांकडे बघितले तर सगळे आपल्याला तसेच दिसतात व मदत हि करतात. पण आपणच जर संशयाने इतरांकडे पाहिलं तर सर्व लोक आपल्याला फसवत आहेत असेच वाटते . म्हणून आपण आपली नजर प्रथम बदलली पाहिजे . वाईट चा चष्मा पुसून स्वच्छ करावा मग बघा सगळे मदतीचा हात पुढे करतात कि नाही?
गोष्ट ऐकल्यावर अक्षय विचारात पडला. तो म्हणाला, "आज्जी उद्यापासून मी शाळेत सर्व मुलांशी बोलणार. कोणाशीही बोलताना पूर्वग्रह ठेवणार नाही. " आज्जी सूचकतेने स्वताशीच गालातल्या गालात हसली .

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users