'फिर जिंदगी’- Phir Zindagi - संपूर्ण चित्रपट

Submitted by Admin-team on 4 December, 2015 - 20:53

अवयवदानाच्या प्रक्रियेत सर्व संबंधित व्यक्ती, रुग्णालय व संस्था यांच्यांत समन्वय साधण्याचं, रुग्णांच्या नातेवाइकांना मार्गदर्शन करण्याचं, गरजू रुग्णांच्या याद्या अद्ययावत करण्याचं, जो अवयव देणार त्याच्या आणि ज्याला अवयव मिळणार आहेत त्याच्या नातेवाइकांना सर्व प्रकारची मदत करण्याचं, अवयवदानाविषयी जनजागृती करण्याचं काम करते झेडटीसीसी, म्हणजे झोनल ट्रान्स्प्लांट को-ऑर्डिनेशन कमिटी. ही एक सरकारमान्य, पण बिगर-सरकारी अशी कमिटी आहे.

अवयवदानाविषयी समाजात व्यापक जाणीव निर्माण व्हावी, या हेतूनं झेडटीसीसीच्या पुणे विभागानं प्राज फाऊंडेशनच्या सहकार्यानं 'फिर जिंदगी...' या लघुचित्रपटाची निर्मिती केली आहे. सुप्रसिद्ध दिग्दर्शक सुमित्रा भावे - सुनील सुकथनकर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.

हा संपूर्ण चित्रपट आपण इथे बघू शकता -

***

आपल्या देशात दरवर्षी लाखो रुग्ण अवयव निकामी झाल्यानं आजारी पडतात किंवा मृत्यूला सामोरे जातात. मृत्यूवर अजून आपण विजय मिळवला नसला, तरी वैद्यकीय क्षेत्रातल्या नवनव्या संशोधनांमुळे संबंधित व्यक्तीच्या अवयवांना पर्याय म्हणून दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरातले अवयव काढून त्यांचं प्रत्यारोपण करता येणं आज शक्य झाले आहे. एका व्यक्तीच्या अवयवदानामुळे सात लोकांचे प्राण वाचू शकतात. मात्र भारतात दुर्दैवानं अवयवदात्यांचं प्रमाण अत्यंत अल्प आहे. भारतातल्या लाखो रुग्णांना अवयव प्रत्यारोपणाची गरज भासत असली, तरी अवयवदानाबाबत फारशी जनजागृती नसल्यानं गरजू रुग्णांना वेळेवर मदत मिळू शकत नाही. अवयवदान-चळवळीबद्दल भारतात सामाजिक, आर्थिक, धार्मिक कारणांमुळे सामाजिक जागृती करणं अतिशय कठीण असल्यानं अवयव प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियांचं प्रमाण अत्यंत नगण्य आहे.

एखादा ‘ब्रेन-डेड‘ झालेला रुग्ण किडनी, डोळे, यकृत, हृदय, फुफ्फुसं, त्वचा दान करू शकतो, अवयवदान नक्की कोणाला करता येतं, 'ब्रेन-डेड' असणं म्हणजे काय, अवयवदानाची नक्की प्रक्रिया कशी, अवयवदानामुळे नक्की योग्य त्या व्यक्तीला मदत मिळते का, असे अनेक प्रश्न रुग्णांच्या नातेवाइकांच्या मनांत असतात. जोडीला असतात अंधश्रद्धा, गैरसमज आणि मर्गदर्शनाचा अभाव. हा चित्रपट आपल्या काही शंका दूर करण्यास मदत करेल, अशी आशा आहे.

6Standy copy.jpg

आपल्या सर्व शंकांचं निरसन आणि अवयवदानासाठी मदत यांसाठी झेडटीसीसीशी आपण संपर्क साधू शकता.

http://www.ztccpune.com/

http://donatelifeindia.org/the-network/donate-life-maharashtra/ztcc-mumbai/

***

हा चित्रपट मायबोली.कॉमवर प्रदर्शित करण्यास परवानगी दिल्याबद्दल प्राज फाऊंडेशन, झेडटीसीसी व विचित्र निर्मिती (श्रीमती सुमित्रा भावे - श्री. सुनील सुकथनकर) यांचे मनःपूर्वक आभार.

***

'फिर जिंदगी' हा चित्रपट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा, अशी इच्छा आहे. हा चित्रपट यापुढे 'मायबोली'वर कायम उपलब्ध असेल. आपण या पानाचा दुवा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवावा, अशी आपल्याला विनंती आहे.

***

फिर जिंदगी

निर्मिती - प्राज फाऊंडेशन व झेडटीसीसी (पुणे विभाग)
दिग्दर्शन व संकलन - सुमित्रा भावे व सुनील सुकथनकर
कथा, पटकथा, संवाद - सुमित्रा भावे
छायालेखन - धनंजय कुलकर्णी
संगीत - साकेत कानेटकर
कविता - सुनील सुकथनकर
ध्वनिलेखन - गणेश फुके
कलादिग्दर्शन - संतोष सांखद
वेशभूषा - योगिनी कुलकर्णी
रंगभूषा - आशीष देशपांडे
दिग्दर्शन साहाय्य - वरुण नार्वेकर, तुषार गुंजाळ

कलाकार - रत्ना पाठक शाह, नासीरुद्दीन शाह, नीरज काबी, विक्रम गोखले, उत्तरा बावकर, अमृता सुभाष, ज्योती सुभाष, ग्यानप्रकाश, डॉ. शेखर कुलकर्णी, रेणुका दफ्तरदार, पर्ण पेठे, अलोक राजवाडे, कृतिका देव आणि सिद्धार्थ मेनन

***

यापुढेही असेच उत्तमोत्तम चित्रपट बघण्यासाठी ’मायबोली.कॉम’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.

www.youtube.com/maayboli

***
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मायबोली अ‍ॅडमिन टीमने अगत्यपूर्वक "फिर जिंदगी" इथे उपलब्ध करून दिल्याबद्दल संबंधित सर्वांचे मनःपूर्वक आभार. जरूर पाहाणार मी हा चित्रपट.

आई गं!!! कित्ती अफाट सुंदर सिनेमा. एकदम हेलावून गेलो मी. सिनेमा संपतो तेंव्हा डोळेभरुन येतात.

चिन्मय धन्यवाद. मी माझ्या फेसबुकच्या भिंतीवर नक्कीच ह्याबद्दल माझ्या मित्रांना सुचवणार आहे की बघा हा सिनेमा.

'फिर जिंदगी' हा चित्रपट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा, अशी इच्छा आहे. हा चित्रपट यापुढे 'मायबोली'वर कायम उपलब्ध असेल. आपण या पानाचा दुवा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवावा, अशी आपल्याला विनंती आहे.

मायबोली अ‍ॅडमिन टीमचे अभिनन्दन आणि आभार.आत्ताच पुर्ण फिल्म पाहिली.मन हेलाउन गेले.वैद्य्कीय इच्छापत्र प्रत्येकानीच ते करुन ठेवावे असे वाटते.

बघितला. खूपच सुरेख चित्रपट. रत्ना पाठक कमाल अभिनेत्री आहेत! She literally carries the film on her shoulders!

खटकलेल्या काही गोष्टी: मुंबईहून पुण्यास यायला ६ तासाहून अधिक वेळ कसा लागू शकतो? विशेषतः अशा प्रसंगी. जर आई दिल्लीत आहे (दिल्ली मुंबई फ्लाईट मग मुंबई पुणे कार) असं दाखवलं असतं तर जास्ती believable story line वाटली असती. दुसरं म्हणजे भाषा काही ठिकाणी पुस्तकी वाटली.

सिनेमा मस्त आहे अजून बघतच आहे.

सब टाय टलिंग मध्ये एक एरर आहे. his life has not gone waist. It should be waste. at about 17.01 or a bit ahead. Pl tell the teem to correct it.

शेवट परेन्त पाहिला. सिंगल पेरेंट, एकुलते एक लाडके मूल वारले की आईची काय हालत होत असेल.
त्या मानाने ती आई धीराची दाखविली आहे. एकदम सगळ्यात मोठ्या भीतीवर बोट ठेवल्या सारखे झाले. पण टिशू पाकीट बरोबर ठेवून बघितलाच. सोशल वर्कर चा रोल फार नीट आहे. मला ह्या प्रॉडक्षन हाउसचा नो नॉन्सेन्स, नो प्रिटेन्स पण सेन्सिटिव्ह अ‍ॅप्रोच फार आव्डतो. सर्वच फिल्म्स मध्ये तो दिसून येतो. मुलगा किती गोड आहे. किती लाडात वाढवलेला. तो झोपलेला अस्तो घरी तेव्हा बाजूला वर्ल्ड अ‍ॅटलास अशी बुके ठेवली आहेत. बारकाईची कमाल. ( आमच्या कडे वंडर्स ऑफ द युनिवर्स आहे एव्ढेच. )

आई त्याला बघून काही आकांत करत नाही तर हळू रडते. ते बघवले नाही. अगदी बरोबर घेतले आहे. इमोशन्स एक्स्प्लेन करायची गरजच नाही आहे. इतके सुरेख व संयत अ‍ॅक्टिंग केले आहे.

कास्ट फारच दमदार आहे. नीरज कबी आता आव्डत्या नटांपैकी होत चालला आहे. पूर्वी इर्फान होता तसा बट ही सोल्ड आउट!!. संगीत टेकिंग अ‍ॅप्ट आहे. कोणीच माणूस ऐरा गैरा नसतो हे वाक्य
जबरदस्त आहे. जीवन/ मृत्यू समोर सर्व सारखे. सर्वांचे हक्क समान. सोशल वर्करची असिस्टंट, मित्रमंडळी, सर्वांच्या प्रतिक्रिया व कामे बरोबर वठली आहेत.

अवयवदानाचे अवघड काम व त्याचा मेसेज पोहोचतो आहे.

ह्या प्रॉडक्षन हाउसचे अजून चित्रपट उपलब्ध करू शकाल का सबस्क्रिप्शन चॅनेल वर? वर्गणी भरायला तयार आहे

अप्रतिम चित्रपट. चिन्मय दामलेंचे नाव वाचले यादीत. कौतुक वाटले.

रत्ना शहा ग्रेट आहेत. भुमिका जगल्या आहेत. नसरुद्दीन शाह ह्यांच्या अभिनयाबद्दल काय बोलावे ...सगळेच अफाट. सगळ्यात आवडलेला प्रसंग..जात....गरज नाही....

अन्य एका कारणासाठी वा प्रसंगामुळे मी दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये (माझ्या भाच्याचाही मोटार सायकल अपघात झाला होता, तिथे त्याला अ‍ॅडमिट केले होते....त्यामुळे पेशंटचा मामा याच नात्याने तिथे उपस्थित) होतो आणि त्या वेळेत सारा परिसर नजरेखालून घातला होता. सुमेधला ज्या ठिकाणी ठेवलेले दाखविले आहे तिथेही मी गेलो होतो. आज "फिर जिंदगी..." पाहताना डोळे भरून आले अगदी. चित्रपटाचा शेवट काय असेल याची जाणीव अर्थातच झालेली असल्याने आईच्या सहीपूर्वीचे प्रसंग कोणत्या प्रकारे घेतले जातील याबद्दल खूप उत्सुकता होती.

अवयव कुणी दिले तसेच ते अवयव कुणाला दिले गेले या बाबत "पॉलिसी" म्हणून (कायदा म्हणून नव्हे) काही पथ्ये पाळावी लागतातच, त्यात चुकीचे काही नाही....नेत्रदानाबद्दलही हीच काळजी घेतली जाते. म्हणजे ज्यावेळी अवयव दिले घेतले जातात, त्यावेळी देणा-यांच्या नातेवाईंकाना कळत नाहीत ते कुणासाठी वा कुठे वापरण्यात आले तसेच दुसरीकडे घेणार्‍या घटकाला कळू शकत नाही की आपल्या पेशंटला कुणाचे वा कुठून अवयव आणले गेले. या पार्श्वभूमीवर चित्रपटाच्या शेवटी रुखसानासह अन्य पाच व्यक्ती नव्याने (आणि आनंदाने...) जीवन जगताना दाखविले गेले आहे.... ती बाब कथानकाचा एक भाग असेल आणि ती चित्रपट उद्देश प्रचारासाठीची गरज म्हणून अनिवार्यपणे गृहीत धरली असावी असा विचार मनी आला आहे. तितपत स्वातंत्र्य निर्माता आणि दिग्दर्शकाने घेतले आहे ते योग्य मानावे लागेल.

चित्रपटाच्या तांत्रिक दर्जाबाबत तसेच सर्वच कलाकारांच्या अभिनयाबद्दल....अगदी सुमेधच्या कॉलेजचा मित्रवर्गसुद्धा...जितके लिहावे तितके कमीच म्हणावे लागेल, इतक्या समरसतेने सर्वांनी योगदान दिले आहे.

मायबोली अ‍ॅडमिन टीम आणि संबंधित सर्वांचे मनःपूर्वक आभार.

ही शॉर्ट फिल्म मायबोलीवर उपलब्ध करुन दिल्याबद्द्ल अ‍ॅडमीनटीमचे मनःपूर्वक आभार.

फिल्मचा विषय, कलाकारांचा अभिनय एकदम दमदार आहे.

सुमेधची आई डॉक्टर दाखवण्यामागचा हेतु समजला नाही. "आई डॉ. होती म्हणून सगळं झटकन समजू शकली, सामान्य माणसाला इतकं सोपं जाईल का सगळं? असा प्रश्न पडू शकतो.

सामान्य माणसाला इतकं सोपं जाईल का सगळं? असा प्रश्न पडू शकतो.>>>>> नाहीच होत. पण हीफिल्म प्रचारासाठी/जागृतीसाठी असावी,त्यामुळे ती बाब क्षम्य आहे.

पण हीफिल्म प्रचारासाठी/जागृतीसाठी असावी,त्यामुळे ती बाब क्षम्य आहे.>>> प्रचार, प्रसार, जागृती हे सामान्य माणसांतच करायचं आहे ना? मग त्यांना ती गोष्ट त्यांची वाटायला नको का? असो.

दिग्दर्शकाचा त्यामागचा काय विचार आहे हे जाणून घ्यायला आवडेल.

Pages