जय महाराष्ट्र! - हा शिवसेना नावाचा इतिहास आहे - श्री. प्रकाश अकोलकर

Submitted by चिनूक्स on 21 October, 2013 - 13:46

'एक नेता, एक मैदान' ही शिवसैनिकांची अनेक दशकांपासून श्रद्धा. बाळासाहेब ठाकरे गेले, आणि या श्रद्धेला तडा गेला. महाराष्ट्रातल्या राजकारणाची समीकरणंही त्यांच्या निधनामुळे बदलली.

शिवसेना हा पक्ष आता लवकरच वयाची पन्नाशी गाठेल. 'मराठी अस्मिता' जपण्यासाठी स्थापन झालेला हा पक्ष. आजवरच्या वाटचालीत या पक्षाला अनेक बिरुदं चिकटली. 'हिंदू राष्ट्रवादी', 'फॅसिस्ट' अशी नामाभिधानं मिळवणार्‍या या पक्षानं मात्र मुंबईवर अनेक वर्षं राज्य केलं आणि महाराष्ट्रातही सत्ता उपभोगली. केंद्र सरकारातली महत्त्वाची पदं मिळवली. पक्षात फूट पडली. आणि तरीही 'मराठी अस्मिता' हा फक्त आपल्या अखत्यारितला विषय आहे, अशा आत्मविश्वासानं हा पक्ष वावरत राहिला.

श्री. प्रकाश अकोलकर यांच्या पत्रकारितेतला आवाका आणि अनुभव मोठा आहे. 'शिवसेना' या विषयाबद्दल त्यांचा अभ्यास आणि त्यांचं प्रेम सर्वश्रुत आहे. यातूनच तयार झालं 'जय महाराष्ट्र! - हा शिवसेना नावाचा इतिहास आहे' हे पुस्तक. शिवसेनेचा इतिहास, शिवसेनेचं राजकारण यांबद्दल इतकं सखोल लिखाण अन्यत्र झालेलं नाही. मनोविकास प्रकाशनानं हे पुस्तक प्रकाशित केलं आहे.

या पुस्तकातलं श्री. प्रकाश अकोलकर यांचं मनोगत...

JayMaharashtraCover - Q.JPG

आवाज कुणाचा?

‘जय महाराष्ट्र!’ हे पुस्तक १९९८मध्ये प्रकाशित झालं. पुस्तक चर्चेत आलं. विविध वृत्तपत्रांनी त्यातील मजकूर प्रसिद्ध केला. नंतर अभिप्रायही बर्‍याच ठिकाणी आले. शिवाय, त्यानिमित्ताने शिवसेनेच्या भवितव्याची चर्चा करणारा एक परिसंवादही झाला. त्यात कुमार केतकर, राजदीप सरदेसाई, अरुण मेहता आणि राज ठाकरे सहभागी झाले होते. चर्चा खडाजंगी झाली. इतर वक्ते बोलत असताना, राज हे नोट्स् घेण्याचं काम करत होते आणि अखेरीस त्यांनीच शिवसेनेच्या वतीने इतरांच्या मुद्द्यांना उत्तर देण्याचं काम केलं.

खरं तर तेव्हा महाराष्ट्रात शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्या युतीचं सरकार होतं. त्यास कोणताही धोका असल्याचं जाणवत नव्हतं. दस्तुरखुद्द बाळासाहेब ठाकरेही आपला ‘रिमोट कंट्रोल’ जोमानं चालवत होते. तरीही शिवसेनेच्या भविष्याबाबत चर्चा झाली होती. या घटनेस आता १५ वर्षे झाली आणि 'महाराष्ट्र नवनिर्माण सेना’ नावाने आणखी एक ‘सेना’ उदयास आली. या नव्या सेनेने बाळासाहेब ठाकरे असतानाही शिवसेनेपुढे आव्हान उभं केलं होतं. शिवाय राज्यातील राजकीय समीकरणंही आरपार बदलून गेली होती. या १५ वर्षांच्या काळात पुस्तकाबाबत सतत विचारणा होत असे. मुळात ते पुस्तक फारच थोड्यांना उपलब्ध होऊ शकलं होतं. ते बाजारात मिळत नाही, ही अगदी पुस्तक प्रकाशित झाल्यानंतरच्या महिनाभरापासून आजतागायत ऐकू येणारी तक्रार आहे. अगदी अलीकडेच ज्येष्ठ कवी सतीश काळसेकर यांनी सांगितलं की एक-दोन ग्रंथालयांत त्याबाबत चौकशी केली. पुस्तक घेतल्याची नोंद आहे. पुस्तकाचे रीतसर तयार केलेले कार्डही आहे. पण पुस्तक मात्र नाही.

गेल्या वर्ष-सहा महिन्यांत तर या पुस्तकाची डिमांड खूपच वाढली. अगदी ‘टाइम' मॅगेझिनच्या भारतातील प्रतिनिधीपासून ‘आज तक’ या वृत्तवाहिनीच्या मुंबईतील संपादकांपर्यंत अनेकांना हे पुस्तक हवं होतं. पण त्याच्या प्रती कुठे गेल्या होत्या, कुणास ठाऊक. दरम्यान अनेक जण १९९७-९८ मध्ये लिहिलेले हे पुस्तक अपडेट करा, असं सांगत होते. त्यात काही प्रकाशकही होते. शिवसेना सत्तेवर असताना १९९७-९८मध्ये हे पुस्तक लिहायचा विचार पुढे आला, तेव्हा काही बड्या प्रकाशकांनी विविध कारणं पुढे करून नकार दिला होता. त्यापैकी एका नामवंत प्रकाशन संस्थेने बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर लगेचच संपर्क साधला आणि आम्ही पुस्तक काढायला तयार आहोत, असं कळवलं.

या सार्‍याचा अर्थ शिवसैनिक आणि वाचक काय लावायचा तो लावतीलच. पण पुस्तक जसं आहे - म्हणजेच १५ वर्षांपूर्वी लिहिलेलं - तसं पुन्हा बाजारात आणण्यात काहीच अर्थ नव्हता.. खरं तर दोन-अडीच वर्षांपूर्वीच, मूळ पुस्तकाला काही नवी प्रकरणं जोडून म्हणजेच १९९८नंतर जे काय घडले, तो तपशील जोडून नवी आवृत्ती काढायची, असा एका प्रकाशकाचा विचार होता. पण तसं करणं शक्य नव्हतं. मूळ पुस्तक लिहिल्यानंतर शिवसेनेत पहिल्या तीन दशकांत घडल्या नाहीत, इतक्या वेगवान आणि कोणी कल्पनाही करू शकणार नाही, अशा घटना घडल्या. सारे संदर्भ मुळातूनच बदलून गेले होते. त्यामुळे पुस्तकात नव्याने भर घालतानाच, मूळ मजकुरालाही नवा आकार देणे जरुरीचे होते. हे काम सोपं नव्हतं. कारण जागतिकीकरणानंतर गेल्या दोन दशकांत बदललेल्या नव्या मध्यमवर्गीय दृष्टिकोनाच्या पार्श्‍वभूमीवर नव्यानं सामोरे आलेले संदर्भ आणि देशभरातील राजकारणाचंच बदलतं अस्थिर नेपथ्य यामुळे एकुणातच नवी मांडणी करावी लागेल, असं स्पष्ट दिसत होतं.

पुस्तक नव्यानं सिद्ध करताना, थेट पाच दशकं मागे जाऊन विचार करावा लागला. ‘ग्लोबलायझेशन’नंतर विचार करण्याची पद्धत जशी बदलली होती, त्याचबरोबर त्या विचारांची भाषाही बदलली होती. त्यामुळेच लक्षात आलं की मुंबापुरीत १९६०पासूनच मराठी भाषा आणि मराठी अस्मिता यांचं चक्क ‘ब्रॅण्ड मार्केटिंग’ सुरू आहे! पण नाशिकसारख्या पूर्णपणे मराठी वळणाच्या तीर्थक्षेत्री जवळपास अर्धं आयुष्य उलटून गेलं, तरी त्याची साधी चाहूलही लागली नव्हती. त्यामुळेच बाळासाहेब ठाकरे हे नाव आयुष्याच्या कोणत्या वळणावर सामोरं आलं, ते नेमकेपणानं सांगता येणं कठीण आहे. आठवतं ते एवढंच की १९६०च्या दशकात समज आली आणि आयुष्यात हिंदी सिनेमानं प्रवेश केला, तेव्हा 'मार्मिक'मधील ‘सिनेप्रिक्षान’ हे सदर वाचण्यासाठी ते साप्ताहिक खरेदी करण्याचा रिवाजच पडून गेला. पुढे ‘शुद्धनिषाध’ या नावानं लिहिलं जाणारं ते सदर श्रीकांत ठाकरे लिहितात, हेही कळलं. तरी ‘बाळासाहेब ठाकरे’ आणि त्यांचा करिष्मा हा असा असेल, हे ध्यानीमनीही आलं नव्हतं.

नाशिकसारख्या गोदाकाठच्या गावात जन्म झालेला असल्यानं मुंबईच्या बहुरंगी-बहुढंगी आणि मुख्य म्हणजे ‘कॉस्मोपॉलिटन’ शहराची संस्कृती आणि तिथं काही मराठी माणसावर अन्याय वगैरे होतोय, याची त्या काळात कल्पनाबिल्पना येणं शक्यच नव्हतं. घरातलं वातावरण समाजवादी वळणाचं. सानेगुरुजी नाशिकच्या तुरुंगात असताना आईनं त्यांना कधी तरी डबा वगैरे पाठवलेला आणि एस. एम. जोशी, ना. ग. गोरे नाशकात आले की वडिलांच्या आणि त्यांच्या भेटीगाठी होत. प्रधान (ग. प्र.) मास्तर घरीच उतरायचे आणि घरी नियिमित येणारी नियतकालिकं होती ‘साधना’, ‘सत्यकथा’ आणि ‘ललित’. ‘मार्मिक’ घ्यायला सुरुवात केल्यानंतर त्यातले बाळासाहेबांचे राजकीय लेख, व्यंगचित्रं बघत असणारच. पण त्याकडे तेव्हा काही बिलकूलच गांभीर्यानं पाहिल्याचं आठवत नाही. खरं तर पुढे सत्तरचं ते अस्वस्थ दशक उजाडलं, तेव्हा इंदिरा गांधी यांनी जारी केलेल्या आणीबाणीच्या विरोधात काही थोडंफार कामही केल्याचं आठवतं. पण तेव्हाही बाळासाहेब ठाकरे हे नाव ठळकपणे लक्षात आलं नव्हतं. खरं तर त्या काळात नाशकात काका सोलापूरकर नावाचे एक सामाजिक कार्यकर्ते शिवसेनेचा झेंडा फडकवत होते आणि ठाकरेही नाशकात विमादी पटवर्धन या ज्येष्ठ साहित्यिकांकडे येत जात असल्याचं कळत असे. तरीही त्याकडे काही विशेष लक्ष दिलं नव्हतं.

पुढे १९७९मध्ये ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्येच नोकरी लागली आणि मुंबईला स्थलांतर झालं. दोन वर्षांतच मुंबई महापालिका हा बीट मिळाला आणि शिवसेना म्हणजे काय ते हळूहळू लक्षात यायला लागलं. तेव्हा मुंबई महापालिकेत शिवसेना विरोधी बाकांवर होती आणि वामनराव महाडिक, छगन भुजबळ आदी नगरसेवक नेतृत्व करत होते. राज्य शरद पवार यांनी तेव्हा उभ्या केलेल्या पुरोगामी लोकशाही आघाडीचं होतं. तेव्हा मनोहर आणि सुधीर जोशी यांचं पालिकेत नियिमित येणंजाणं होतं. त्यांच्याशी ओळख झाली आणि पुढे शिवसेनेविषयीचं कुतूहल वाढत जाऊन त्याचं रूपांतर अभ्यासात कधी झालं, ते कळलंही नाही.

तेव्हा म्हणजे १९८० ते ८५ या काळात बाळासाहेबांची भाषणं वार्ताहर म्हणून कव्हर करावीच लागली असणार. पण त्यांचं लक्षात राहिलेलं पहिलं भाषण हे १९८५मध्ये शिवसेनेेनं मुंबई महापालिका जिंकल्यानंतरचं शिवाजी पार्कावरचं आहे. तो शिवसेनेचा विजयोत्सवच होता आणि तेव्हा जमशेद कांगा नावाचे एक अत्यंत मवाळ प्रकृतीचे आयएएस अधिकारी महापालिका आयुक्त होते. त्यांचा उल्लेख करून ठाकरे शिवाजी पार्कवर कडाडले होते : ‘आता महापालिकेत शिवसेनेचं राज्य आहे. आयुक्त कांगा यांनी आमच्या नगरसेवकांचं ऐकलं नाही, तर त्यांनी खुश्शाल कांगा यांच्या कानाखाली आवाज काढावा!’

ठाकरे म्हणजे काय चीज आहे, याची पहिली जाणीव म्हणजे हे भाषण असणार, यात शंकाच नाही.

ते असं का बोलतात आणि मुख्य म्हणजे त्यांना असं जाहीरपणे बोलू कसं दिलं जातंय... असे प्रश्‍नही तेव्हाच मनात उभे राहिले असणार आणि त्यामुळेच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा शोध घेण्याची कल्पनाही मनात रुजली असणार, असं आता वाटतं. पुढे वेगवेगळ्या कारणांनी बाळासाहेबांची भाषणं, त्यांच्या पत्रकार परिषदा कव्हर करायला लागल्या. कधी त्यांना जवळून बघायला मिळायचं, तर कधी दूरवरूनच दृष्टिक्षेप टाकायला लागायचा. पण कधी म्हणजे पत्रकार परिषदेत जवळून भेटायला मिळालं, तरी त्यांच्याशी जवळीक मात्र कधीही साधता आली नाही. अगदी पुढे एकदा त्यांची थेट मुलाखत घेतली किंवा त्यांच्या मराठवाड्यातील पहिल्यावहिल्या दौर्‍यात सहभागी होण्याची संधी प्रमोद महाजन यांच्यामुळे मिळाली, तेव्हाही त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा झाल्याच नाहीत. एक तर तो बाळासाहेबांचा मराठवाड्यातील पहिला राजकीय दौरा होता आणि तेथील लोकही ‘ठाकरे’ ही काय चीज आहे, हे बघायला कमालीचे उत्सुक आणि उतावीळ होते. त्यामुळे जागोजागी प्रचंड गर्दी होत होती. त्या गर्दीची नशा बाळासाहेबांना चढत होती आणि त्यांच्या रसवंतीला बहार येत असे. नकला, विनोद, चुटकुले यांनी त्यांचं भाषण रंगत असे आणि त्या बहरात ते कोणालाच आपल्या तडाख्यातून सोडत नसत. अगदी महात्मा गांधीही त्यातून सुटले नाहीत. टवाळी तर ते सर्वांचीच करत असत आणि समोरच्याची खिल्ली उडवणे, हा तर त्यांचा धर्मच होता. त्यातून शिवसेनेशी युती केलेल्या भारतीय जनता पक्षाचे नेतेही सुटत नसत.
मुंबईत परतल्यावर या सार्‍याचा साद्यंत वृत्तान्त ‘महाराष्ट्र टाइम्स’नं ठळकपणे प्रकाशित केला आणि त्यांचं पित्त खवळलं. खरं तर दौरा सुरू असतानाच, होत असलेल्या तुफानी गर्दीच्या बातम्या दिल्या होत्या. तेव्हा ते खुश असल्याचं त्यांच्या निकटवर्तीयांकडून कळलं होतं. पण त्यांना वस्तुस्थितीवर आधारितही निषेधाचा साधा सूरही चालत नसे, हे मुंबईत आल्यावर पहिल्यांदा कळलं. त्यांनी ‘म. टा.’चे तेव्हाचे संपादक गोविंदराव तळवलकर यांना फोन करून, याला काढून टाका आणि मराठवाड्यात पाठवा, असा ‘आदेश’ दिला होता. तो तळवलकरांनी मानला नाही, हे उघडच आहे. पण त्यानंतरच्या दसरा मेळाव्यात त्यांनी थेट शिवाजी पार्कवरून नाव न घेता, हल्ला चढवला. ‘आमचंच खाऊन, आमच्याच ताटात ओकला...’ अशी काहीशी त्यांची भाषा होती. खरं तर या दौर्‍यात पत्रकारांना शिवसेनेनं नेलेलंच नव्हतं. मी गेलो होतो, तो प्रमोद महाजन यांच्यामुळे. महाजन सोलापूरची एकच सभा करून परतले. तरी पुढे माझी बरीचशी व्यवस्थाही त्यांनीच केली होती. एक रात्रतर अंबेजोगाईला प्रकाश महाजन यांच्या घरी काढली होती, असंही आठवतं. तरीही बाळासाहेब त्यांना हवं ते बोलले आणि पुढची जवळपास १५ वर्षे त्यांनी माझ्यावर ‘बायकॉट’च टाकला होता. मराठवाडा दौर्‍यानंतर एकदा ‘म. टा.’च्या एका फीचरसाठी त्यांची मुलाखत घ्यायला अशोक जैन यांनी मला सांगितले. ते फोनच घेईनात. मग जैन यांनीच फोन लावला, तेव्हा त्यांनी ‘अकोलकर सोडून कोणालाही पाठवा!’ असं सांगितलं. पण जैन यांनी त्यांना सांगितलं - ‘तुम्ही हवं तर मुलाखत रेकॉर्ड करू शकता. पण अमुकच पत्रकार पाठवा वा तमुक पाठवू नका, असं सांगू शकत नाही.’ त्यांनी मुलाखत द्यायचं नाकारलं आणि जैन यांनीही दुसरा पत्रकार पाठवला नाही. अखेर ते फीचर त्यांच्या मुलाखतीविनाच प्रसिद्ध झालं.

पुढे भारतकुमार राऊत ‘महाराष्ट्र टाइम्स’चे संपादक असताना, त्यांनी ‘म. टा.’च्या दिवाळी अंकासाठी बाळासाहेबांची मुलाखत घ्यायला लावली. ती त्यांच्यामुळेच आणि त्यांच्या उपस्थितीत झाली. या नव्या आवृत्तीत ती पुनर्मुद्रित करण्यात आली आहे. त्यानंतर एक लेख वाचून बाळासाहेबांचा फोन आला होता. तेव्हा मी कोकणात गणपतीला निघालो होतो. हे सांगितल्यावर ते उत्स्फूर्तपणे उद्गारले होते - गणपतीला आमचाही नमस्कार सांग आणि त्याला म्हणावं, यंदा तुझं विसर्जन नाही. आधी कॉंग्रेस सरकारचं विसर्जन आणि मगच तुझं!

दिवस जात होते. पुढे वेगवेगळ्या कारणांनी शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्या अनेक नेत्यांशी ओळखी होत गेल्या. बातम्यांच्या निमित्तानं शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्ते यांच्याशी दोस्ताना जडलेला होताच. त्यांना सामोरे येणारे अनेक प्रश्‍न विचारत राहण्याचा नाद लागला आणि त्याच काळात शिवसेनेसंबंधीचं लिखाण वाचत राहिलो. १९९१मध्ये शिवसेनेचा रौप्य महोत्सव झाला, तेव्हा लिहिलेल्या एका विस्तृत लेखास ‘अस्मितेचा रौप्यमहोत्सव’ असं अत्यंत रास्त शीर्षक अशोक जैन यांनी दिलं होतं. त्या लेखामुळेच शिवसेनेवर पुस्तक लिहावं, अशी कल्पना सुनील कर्णिक यांनी मांडली आणि अखेर त्यानंतर सहा-सात वर्षांनी ‘जय महाराष्ट्र!’ हे पुस्तक प्रसिद्ध झालं.

पण सुदैवानं पुस्तक प्रसिद्ध झाल्यावरही ‘शिवसेना’ हा विषय डोक्यातून गेला नाही. खरं तर पुस्तक प्रसिद्ध झाल्यानंतरच शिवसेनेत फार मोठ्या घडामोडी घडल्या. पुस्तक प्रसिद्ध झालं, तेव्हा महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजप यांच्या युतीच्या हाती राज्याची सत्ता होती. ती १९९९मध्ये गेली आणि त्यानंतरच्या दोन निवडणुकांतही शिवसेनेला पुन्हा मंत्रालयावर कब्जा मिळवता आलेला नाही. मात्र, नेमक्या याच काळात केंद्रात भाजपप्रणीत ‘एनडीए’चं राज्य होतं आणि ते साडेसहा वर्ष टिकलं. शिवसेना अर्थातच या आघाडीतील एक प्रमुख पक्ष होता. त्यामुळे राज्यातली सत्ता गेली, तरी केंद्रात मंत्रीपदेच नव्हे, तर थेट लोकसभेचं अध्यक्षपदही शिवसेनेला मिळू शकलं.

पण त्याच वेळी राज्यस्तरावर शिवसेनेची प्रकृती सुधारण्याऐवजी दिवसेंदिवस बिघडतच जात असल्याचं दिसत होतं. त्याची ठळक उदाहरणं म्हणजे १९९९च्या विधानसभा निवडणुकीत गमावलेली सत्ता शिवसेना-भाजप युतीला नंतरच्या दोन विधानसभा निवडणुकांनंतरही परत मिळवता आली नाही. भले या काळात मुंबई महापालिका हातात ठेवण्यात युती यशस्वी झाली; पण त्या काळात शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या मात्र कमी कमी होत गेली. शिवाय, याच काळात नारायण राणे यांनी शिवसेना सोडली. पाठोपाठ राज ठाकरे यांनीही शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र!’ केला. ही तर शिवसेनेतील उभी फूट होती.

त्यामुळे या सार्‍या घटनांकडे केवळ बातमीदार वा वार्ताहराच्या नजरेतून पाहून चालण्यासारखं नव्हतं. हे सारं ‘घडतंय... बिघडतंय...’ अशा स्वरूपाचं राजकीय नाट्य रोजच्या रोज डोळ्यांनी बघावं लागत असताना, पडद्यामागं काय घडतंय ते समजून घेण्याचा प्रयत्न सुरूच राहिला. अर्थात, ते काही सारंच्या सारं समजत होतं, असा दावा बिलकूलच नाही. पण संदर्भ आणि नेत्यांची जाहीर वा खाजगी वक्तव्यं यांचे धागेदोरे जुळवून अर्थ लावण्याचा प्रयत्न सुरू होता. १९९८मध्ये या पुस्तकाची पहिली आवृत्ती प्रसिद्ध झाली, तेव्हा घराघरांत टीव्हीची शेकडो चॅनेल्स घुसलेली नव्हती. त्यानंतरच टीव्हीचं आक्रमण झालं. त्यातील चर्चांमधून अनेकदा ताज्या घडामोडींचा अर्थ लावण्यासाठी आणखी काही मुद्दे मिळत गेले आणि त्यातून अनेकदा नवा अर्थ समोर येत गेला.
पण हे सारं सुरू असताना, गेल्या १५ वर्षांच्या काळात बदलत गेलेली शिवसेना ही विचारांना अधिकाधिक प्रवृत्त करायला लावणारी होती. उद्धव ठाकरे यांच्या हाती पक्षाचा कारभार आल्यानंतरच्या गेल्या दहा वर्षांत त्यांनी, बाळासाहेब संघटना चालवत, त्यापेक्षा अगदी वेगळ्या पद्धतीनं पक्ष चालवण्याचा प्रयत्न केला. एवढंच नव्हे तर ‘मी मुंबईकर!’ अशी घोषणा देऊन मराठी माणसांची ही संघटना सर्वसमावेशक बनवण्याचाही प्रयत्न केला. पण पुढे त्यांनाही शिवसेनेच्या पूर्वीच्याच भूमिशी इमान राखून, आक्रमक बाज स्वीकारावा लागला. तो अर्थातच त्यांच्या मूळ प्रकृतीशी न जुळणारा होता. या सार्‍या घडामोडी बघताना त्यावरील वर्तमानपत्री लिखाणही सुरूच होतं.

या पार्श्‍वभूमीवर अखेर दोन वर्षांपूर्वी अरविंद आणि आशिष पाटकर या उत्साही पितापुत्रांनी हे पुस्तक हव्या त्या पद्धतीने ‘अपडेट’ करायची मुभा दिली आणि आता ‘मनोविकास’तर्फे हे पुस्तक नव्याने येणार म्हणून एकदम उत्साह आला. पण नानाविध कारणांमुळे ते काम लांबत गेले आणि आता अखेर ते पूर्ण झाले आहे.

बाकी काय? पुस्तकाची पहिली आवृत्ती अनेकांना उपलब्ध होऊ शकली नाही. आता तसं होणार नाही, याची खात्री आहे. गेली चार-साडेचार दशकं ही संघटना मुळात टिकून राहिली आहे ती शिवसैनिकांमुळेच. ‘आवाज कुणाचा?’ या घोषणेचा उत्तरार्ध ‘शिवसेनेचा!’ असा आहे. पण ती घोषणा देणारा स्वर हा शिवसैनिकांचाच आहे. त्यामुळे त्यांनाही या संघटनेच्या इतिहासात फार मोठं स्थान आहे.

त्यामुळेच हे पुस्तक शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यावर नितांत श्रद्धा असलेल्या शिवसैनिकांनी वाचलं, तर खूप आनंद होईल.

- प्रकाश अकोलकर

***


जय महाराष्ट्र!
हा शिवसेना नावाचा इतिहास आहे

लेखक - श्री. प्रकाश अकोलकर
प्रकाशक - मनोविकास प्रकाशन
पृष्ठसंख्या - ३९६
किंमत - ३८०

***

***

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अकोलकर माझे अगदीच आवडीचे नसले तरी त्यांचे स्तंभलेखन मी न चुकता वाचतो. हे पुस्तक एकापरिने महाराष्ट्राच इतिहास असेल ह्याबद्दल वाद नाही. संग्रही ठेवावे असे पुस्तक असेल असे वाटते.

बाळासाहेब, शिवसैनिक आणि जुन्या शिवसेनेबद्दलच्या प्रेमामुळे हे पुस्तक वाचायला नक्की आवडेल.

पुस्तक वाचलेलं नाहि पण या एकंदर आढाव्यावरुन असं वाटतंय कि एका त्र्ययस्थाच्या भुमिकेतुन लिहिलेलं पुस्तक आहे. बाळासाहेब नाहि तर किमान एकतरी शिवसेना नेत्याची प्रस्तावना असायला हवी होती. ती असली तर उत्तमच, आणि नसली तर.. गो फिगर!

धन्यवाद पुस्तक ओळख करून दिल्याबद्दल.

पहिली आवृत्ती युतीच्या काळात आलेली असल्याने पुस्तक आमच्या घरी असण्याची शक्यता आहे. नसल्यास ऑर्डर करेनच.

पहिली आवृत्ती वाचलेली आठवतेय.
ही पुढच्या भेटीत वाचणार. अकोलकर महाराष्ट्र टाईम्स मध्ये लिहायचे तेव्हा त्याचे स्तंभ वाचायचो. ठाण्यात एक मुलाखत पण ऐकली होती. हल्ली सकाळ मध्ये आहेत का? ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद.

कालच वाचून संपवलं.

प्रकाश अकोलकरांनीच पुस्तकात असं म्हटलंय की, 'बाळासाहेबांवर प्रेम करणार्‍या बिनचेहर्‍याच्या सर्वसामान्य शिवसैनिकाने हे पुस्तक वाचलं तर फार बरं होईल'. त्यालाच थोडं वाढवून असं म्हणेन की, बाळासाहेबांबद्दल, त्यांच्या एकंदरीतच व्यक्तिमत्त्वाबद्दल आकर्षण असणार्‍या प्रत्येकानेच हे पुस्तक वाचायला हवं. बाळासाहेबांचं शिवसेनास्थापनेपूर्वीचं आयुष्य, 'मार्मिक', 'शिवसेना' हे टप्पे, शिवसेनेच्या गेल्या पंचेचाळीस वर्षातल्या वाटचालीतले बाळासाहेबांचे निर्णय, त्यांची धोरणे, त्यांचं वर्तन इ इ सगळं सविस्तरपणे यात मांडलंय.

शिवसेनेबद्दलचं आणि बाळासाहेबांबद्दलचं माझं तरी कुतुहल या पुस्तकाने बरंच शमवलं आहे.

आजच सकाळी जयदेव ठाकरे यांची मुलाखत पहात होतो. प्रश्न विचारला जात होता उध्द्व आणि राज यांच्या बद्दल. संदर्भ होता जेव्हा उध्दव ठाकरे यांना कार्याध्यक्ष घोषीत केले गेले आणि राज अस्वस्थ होते. जयदेव म्हणाले की प्रस्ताव आला होता की शिवसेना शहर आणि ग्रामीण अशी विभागणी करुन दोघांना द्यायची. यात कोणीतरी एक ज्याला ही विभागणी मान्य झाली नाही आणि पुढे शिवसेना विभागली.

मराठी माणसाच्या मनाचा विचार कुणी केला ? सत्तेची सोय महत्वाची झाली होती का ?