'असा घडला भारत' - रोहन प्रकाशन

Submitted by चिनूक्स on 17 June, 2013 - 12:17

कुठल्याही देशाचं वर्तमनातलं स्वरूप हे त्याच्या सामाजिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक, आर्थिक इतिहासावर अवलंबून असतं. भारतही याला अपवाद नाही. अगदी सिंधू संस्कृतीपासून ते ब्रिटिशकाळापर्यंतच्या असंख्य घडामोडींनी या देशाला आजचं रुपडं बहाल केलं आहे. या हजारो वर्षांच्या काळातल्या व्यक्तींचं, घटनांचं म्हणूनच आजही महत्त्व आहे. कारण भूतकाळातल्या घटनांवरच वर्तमानकाळ उभा असतो आणि आपण आज जे व्यक्तिगत व सामाजिक राष्ट्रीय स्तरावर जगतो, त्यातून भविष्यकाळ आकार घेत असतो.

आपला देश १५ ऑगस्ट, १९४७ रोजी स्वतंत्र झाला. स्वातंत्र्य मिळालं, आता लक्ष्य होतं देशबांधणीचं. तीन वर्षांतच भारताला घटना मिळाली, पं. नेहरूंनी अनेक कारखान्यांची पायाभरणी केली. रिझर्व बँकेची स्थापना, अणुऊर्जा आयोगाची, राष्ट्रीय प्रयोगशाळांची स्थापना, हरित क्रांती, भारताचा अंतराळ-कार्यक्रम, कुटुंबनियोजन कार्यक्रमाची मुहुर्तमेढ, पंचवार्षिक योजना, शेजारी राष्ट्रांशी झालेली युद्धं, आणीबाणी, निवडणुका, क्रिकेटमध्ये जिंकलेला विश्वचषक, पंतप्रधानांच्या हत्या, बाबरी मशिदीचा विध्वंस, दंगली, पूर, अपघात, बॉम्बस्फोट, 'शोले'सारखे गाजलेले चित्रपट, अमर्त्य सेन यांना मिळालेले 'नोबेल' अशा असंख्य बर्‍यावाईट घटनांनी या देशाचं प्राक्तन घडवलं.

रोहन प्रकाशनानं अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर, आर्थिक झीज सोसून सिद्ध केलेला 'असा घडला भारत' हा बृहद्ग्रंथ भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीपासून २०१२ सालापर्यंतच्या महत्त्वाच्या घटनांची नोंद घेतो. अर्थात हा ग्रंथ म्हणजे केवळ नोंदी नव्हेत. जोडीला आहे ते अभ्यासकांनी केलेलं विश्लेषण. हे विश्लेषणही एखादी विशिष्ट भूमिका घेऊन केलेलं नाही. त्यामुळे वाचकाला एकाच घटनेच्या वेगवेगळ्या बाजूंचा साक्षेपी विचार करता येतो. स्वसत्ताक वसाहत ते प्रजासत्ताक, जनगनना, राज्यनिर्मिती, सुरक्षा यंत्रणेची उभारणी, घटना, कायदे, समाजकारण, राजकारण, राजकीय पक्ष, राज्यांतील प्रश्न व घडामोडी, राजकीय-सामाजिक चळवळी व आंदोलनं, निवडक आंतरराष्ट्रीय घडामोडी, आर्थिक घडामोडी, औद्योगिक घडामोडी, वाहतूक व दळणवळण, टपाल, दूरध्वनी व दूरसंचार क्षेत्र, विज्ञान व तंत्रज्ञान, कल्याणकारी उपक्रम, प्रसारमाध्यमं व पत्रकारिता, कलाक्षेत्र, साहित्यक्षेत्र, क्रीडाक्षेत्र, नैसर्गिक आपत्ती, अपघात-दुर्घटना अशा असंख्य विभागांतल्या नोंदी विश्लेषणासह या महाग्रंथात अंतर्भूत आहेत. मिलिंद चंपानेरकर, सुहास कुलकर्णी, कुमार केतकर, सुहास पळशीकर, एकनाथ बागुल, संजीवनी मुळ्ये, न्या. नरेंद्र चपळगावकर, सुनीती सु. र., नीलम गोर्‍हे, चंद्रशेखर धर्माधिकारी, प्रतापराव बेहरे, असीम सरोदे, अभय टिळक, सुरेश नाईक, डॉ. वर्षा जोशी, दीपक घारे अशा ज्येष्ठ अभ्यासकांनी या नोंदी लिहिल्या आहेत. कुमार केतकर यांची प्रस्तावना लिहिली आहे, तर या ग्रंथाचं संपादन केलं आहे ते मिलिंद चंपानेरकर आणि सुहास कुलकर्णी यांनी.

भारतीय साहित्यक्षेत्रात आजवर इतिहासातील घटनांची दशकवार नोंद, त्यांचा परस्परसंबंध यांचा घेतलेला आढावा, असा ग्रंथ अस्तित्वात नव्हता. 'असा घडला भारत'नं ही कमतरता भरून काढलेली आहे. भविष्याकडे डोळसपणे पाहण्याची प्रेरणा हा ग्रंथ देतो. सामाजिक, राजकीय घडामोडींमध्ये रस असणारे वाचक, लेखक, पत्रकार, प्राध्यापक, वकील, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी, विविध स्पर्धा परीक्षा देणारे परीक्षार्र्थी, पीएच. डी. करणारे संशोधक अशा सार्‍यांसाठी ‘असा घडला भारत’चे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

'असा घडला भारत' या ग्रंथात समाविष्ट केलेल्या प्रकाशकांच्या मनोगताचा संपादित भाग, संपादकीय आणि या ग्रंथातल्या काही नोंदी -

Asa Ghadla Bharat_RGB.jpg

प्रकाशकाचं मनोगत

१५ ऑगस्ट १९४७ रोजी ब्रिटिशांची राजवट संपुष्टात येऊन भारत स्वतंत्र झाला. विविध विचारसरणीच्या, विविध धर्म-जाती-वर्ग-पंथाच्या व सांस्कृतिक समूहांच्या सहभागातून आणि संघटित संघर्षातूनच हे यश प्राप्त झालं होतं. १५ ऑगस्टचा तो दिवस या दृष्टीनेही ऐतिहासिक होता की, या विविध जनसमूहांनी प्रथमच स्वतंत्र लोकशाही देशाचे नागरिक - अर्थात भारतीय अशी संयुक्त ओळख धारण करून त्या दिवशी आपल्या जीवनाची नव्याने वाटचाल सुरू केली होती. परंतु, स्वातंत्र्यप्राप्तीचा काळ जवळ आला असताना घडलेल्या अनेकविध घटना-घडामोडींतून काही तणावांची छाया पुढील काळातही भेडसावत राहणार आहे, याचे संकेतही जनतेला मिळाले होते. एकंदरीत, अनेकविध समस्यांचं ओझं घेऊन आणि सर्वांगीण उत्कर्षाची मोठी स्वप्नं उराशी बाळगून आपल्या नवस्वतंत्र देशाने वाटचाल सुरू केली.

स्वातंत्र्यलढ्याची वा स्वातंत्र्यपूर्व काळात घडलेल्या विशिष्ट घटनांची माहिती देणारे वा त्यांची चिकित्सा करणारे अनेक लहान-मोठे ग्रंथ उपलब्ध आहेत. परंतु स्वातंत्र्यानंतर देशाची पुढची वाटचाल कशी झाली वा त्या वाटचालीदरम्यान विविध क्षेत्रांत कशा स्वरूपाचे बदल संभवले त्याची वस्तुनिष्ठ माहिती देणारा समग्र ग्रंथ अपवादानेच आढळतो. अशा अभावाच्या पार्श्वभूमीवर, जनजीवन नियत करणारी सर्व प्रमुख क्षेत्रं लक्षात घेऊन त्या क्षेत्रांतील महत्त्वपूर्ण घटनांचा मागोवा घेणार्‍या मोठया ग्रंथाची रचना करावी, असा विचार पक्का होत गेला आणि 'असा घडला भारत' या प्रस्तुत ग्रंथाचा प्रकल्प हाती घेण्याचा निर्णय 'रोहन प्रकाशन'ने घेतला. १९४७पासून राजकारण, समाजकारण, अर्थकारण, विज्ञान-तंत्रज्ञान ते कला-क्रीडादी विविध क्षेत्रांत ज्या महत्त्वपूर्ण घटना-घडामोडी घडल्या, त्यांचा वेध घेत स्वतंत्र भारताचा पट उलगडून दर्शवावा, हीच या ग्रंथाची मूळ संकल्पना आहे. स्वतंत्र भारताच्या वाटचालीतील विविध वळणं, बदलत गेलेलं जनजीवन सहजपणे वाचकाच्या लक्षात यावं, या दृष्टीने ग्रंथाची दशकवार रचना केली आहे.

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, विविध वयोगटांतील वाचकांना डोळयासमोर ठेवून ही मध्यवर्ती संकल्पना साकार केली आहे. म्हणजे साधारणपणे ज्यांनी गेल्या ६५ वर्षांतील बराच मोठा कालखंड स्वत: अनुभवला आहे त्यांचा आणि विशेष करून ज्यांनी अलीकडील दोन-तीन दशकांचाच काळ पाहिला आहे त्या तरुण वर्गाचा विशेष गांभीर्याने विचार केलेला आहे. कारण असं की, विशेषत: या तरुण वर्गाशी संवाद करताना असं प्रकर्षाने जाणवत होतं की, गतकालातील बर्‍याचशा घटनांविषयी ते अनभिज्ञ आहेत वा त्या बाबतीत त्यांना असलेली माहिती एकांगी आहे. एखाद्या विशिष्ट घटनेचे अनेक पैलू, त्यामागची पार्श्वभूमी, तत्कालीन वाद-प्रवाद याबाबतची माहिती (अनेक कारणांस्तव) त्यांच्यापर्यंत पोहोचलेलीच नसते वा त्याचा परस्परसंबंध लावण्यात ते कमी पडतात. त्यामुळे अनेक समकालीन घटनांबाबतची त्यांची समजही फारशी सखोल नसते, असं जाणवत होतं. विषयांची निवड करताना ही वस्तुस्थितीही लक्षात घेतली आहे आणि त्याचप्रमाणे अभ्यासकाचा काटेकोरपणा आणि मांडणीतील सुटसुटीतपणा याचा मेळ घालून ग्रंथाची रचना केली आहे.

थोडक्यात, विविध वयोगटांतील जनसामान्यांना स्वतंत्र भारताचा समग्र प्रवास समजावा, हा या ग्रंथामागचा महत्त्वाचा उद्देश आहे. स्वातंत्र्य मिळाल्यावर भारतापुढे कोणती आव्हानं होती? भारताची राजकीय, सामाजिक, आर्थिक, औद्योगिक व सांस्कृतिक घडी कशी बसवली गेली? पुढील काळात त्यात कशा प्रकारचे व कोणत्या कारणास्तव बदल संभवले? कोणत्या आंतरराष्ट्रीय घटनांचे लक्षणीय परिणाम आपल्या देशात दिसून आले? कोणत्या क्षेत्रात व कोणत्या घटकांची विकास-प्रगती दिसून आली? अधोगती कोणत्या बाबतीत व का संभवली? अनेक चळवळी वा विचारसरणी कशा विकसित झाल्या वा का खुंटल्या? कलाक्षेत्रात विविध प्रवाहांचा उद्गम कसा व का संभवला? माध्यमांची स्वरूपं कशी बदलत गेली? अशा अनेक प्रश्नांच्या अंगाने गतकालातील घटना जाणून घेणं व समकालीन घटनांचा अन्वयार्थ समजून घेणं, हे वाचकाला साध्य व्हावं, हाच या ग्रंथामागचा प्रमुख उद्देश आहे.

***

संपादकीय

घटना घडत राहतात. घडामोडी होत राहतात. देश आकार घेत राहतो. इतिहास सूक्ष्मतेने साकार होत राहतो. समाजसमूहाची एक-एक पिढी त्या-त्या काळातील घटनांची प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे साक्षीदार असते. अनेकजण या प्रक्रियेत सक्रियपणे सहभागी नसले, तरी नागरिक या नात्याने विविध क्षेत्रांत घडलेल्या घटनांची स्पंदनं त्यांनी टिपलेली असतात. केवळ राजकारण, समाजकारणच नव्हे, तर अर्थकारण, विज्ञान, तंत्रज्ञान, उद्योग, वास्तुकला, संगीत, चित्रकला ते चित्रपट अशी बहुविध कलाक्षेत्रं; वृत्तपत्रं, दूरवाणी ते दूरचित्रवाणी आदी अनेक माध्यमं - अशा सर्वच क्षेत्रांत ज्या ठळक आणि बोलक्या घटना घडत असतात, त्यांचे पडसाद लोकांच्या मन:पटलावर उमटत राहतात. त्याचाच सेंद्रिय परिणाम घडून एकेका पिढीचं भावविश्व तयार होत असतं, मनोभूमिका तयार होत असतात आणि अर्थातच अशा जनमनाचं देशभावनेशीही नातं असतं.

परंतु, विशेषत: आपल्यासारख्या विषमता, प्रांतीयता, जातीयता, सांप्रदायिकता आदी समस्यांनी ग्रस्त असलेल्या देशात अनेक अंतर्विरोध दीर्घकाळ कायम राहिलेले आहेत हे लक्षात घेता सर्वच घटकांची व वर्गांची भावविश्वं एकसारखीच असतात असं म्हणता येत नाही. मात्र स्वातंत्र्योत्तर काळातील म्हणजेच गेल्या सहा दशकांतील अनेक घटना हे दर्शवून देतात की, वैविध्य, विग्रह आणि अंतर्विरोध असले तरीही विविध क्षेत्रांत काही बाबतींत सामाईक धागे जुळून येतात. असेच धागे एक सामाईक भावविश्व निर्माण होण्यास साहाय्यभूत ठरल्याचं दिसून येतं.

बहुसंख्य समाज प्रस्थापित दृष्टिकोनाशी जुळवून घेऊन आपलं जीवन व्यतीत करत असतो. राजकारण-समाजकारण क्षेत्रांत जो प्रस्थापित विचारप्रवाह प्रबळ असेल, त्याचाच परिपोष विज्ञान, उद्योग ते विविध कलामाध्यमांतून झालेला दिसून येतो. परंतु, आपल्यासारख्या लोकशाही देशात पर्यायी विचारप्रवाहांना वाव राहिलेला आहे. त्यामुळेच प्रत्येक पिढीत पर्यायी विचारप्रवाहांचा पुरस्कार करणारे लक्षणीय प्रमाणात दिसून येतात. त्यांची परिणामकारकता कमी-अधिक तीव्र राहिली, तरी त्यांचंही प्रतिबिंब समाजमनावर उमटलेलं दिसून येतं. तात्पर्य हे की, जेव्हा एकेका पिढीचं भावविश्व साकारत असतं असं आपण म्हणतो, तेव्हा असे संमिश्र परिणाम लक्षात घ्यावे लागतातच.

आता लक्षणीय गोष्ट अशी की, एक तर प्रत्येक व्यक्तिमन आपापल्या मानसिकतेनुसार सापेक्ष दृष्टिकोनातून विविध घटनांचे पडसाद टिपत असतं. दुसरं म्हणजे शिक्षणाचा वा सामाजिक जाणिवेचा अभाव, रूढींचा पगडा, आर्थिक-सामाजिक परिस्थितीमुळे स्वीकारलेली समाजशरणता, उत्पादनसाधनांवर नियंत्रण करणार्‍या शक्तींनी केलेल्या मूल्यप्रसाराचा प्रभाव, पूर्वापार चालत असलेल्या मूल्यव्यवस्थेशी फारकत घेण्याची अनिच्छा अशा अनेक गोष्टी घटनांकडे पारदर्शकतेने पाहण्यावर बाधा आणत असतात. त्यामुळे प्रत्येक पिढीला आपल्या भावविश्वाचं मोठं मोल असलं, तरी दृष्टी 'बाधित' करणार्‍या अशा गोष्टी लक्षात घेणंही आवश्यक ठरतं.

आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी की, प्रत्येक पिढीने सामूहिक स्तरावर भावनिकदृष्टया भारावून टाकणार्‍या अशा काही घटना अनुभवलेल्या असतात, त्याचप्रमाणे हेलावून वा हादरवून टाकणार्‍या 'ट्रॉमॅटिक' घटनाही अनुभवलेल्या असतात. त्यांतील काही सकारात्मक घटना एकाहून अधिक पिढ्यासाठी चैतन्यदायी ठरल्याचं दिसून येतं हे खरं; परंतु हेसुद्धा खरं की, त्यांतील हादरवून टाकणार्‍या काही घटनांची काळी छाया कालपटलावर दीर्घकाळ रेंगाळलेली दिसून येते. तत्कालीन पिढीलाच नाही, तर पुढील पिढ्यांनाही ती छाया भेडसावत राहिल्याचं दिसून येतं (उदाहरणार्थ, भारत-पाकिस्तान फाळणी व त्या दरम्यानची सामूहिक हत्याकांडं). काही वेळा असंही दिसून येतं की, विविध अंतर्विरोधांमुळे दीर्घकाळ अमूर्त स्वरूपात अस्वस्थता वाढत राहते आणि एखादी क्षुल्लक घटना निमित्तमात्र ठरून त्या अस्वस्थतेला वाचा फुटते वा प्रस्फोट होतो. अशा अनेक प्रकारच्या घटनांचा एकात्म परिणाम पिढी-पिढीच्या भावविश्वावर होत असतो.

व्यक्तिमन वा समाजमन नेहमीच केवळ घटनांचे पडसाद टिपण्याच्या भूमिकेत असतं असं नाही. त्या घटनेला प्रतिसाद म्हणून वा प्रतिक्रिया म्हणूनही त्यांकडून काही कृती घडलेली असते. काळाच्या विविध टप्प्यांवर, विविध समाजघटकांनी त्यासाठी भिन्न-भिन्न मार्ग स्वीकारलेले दिसून येतात. उदाहरणार्थ, कधी सामाजिक अस्वस्थतेला कवितेच्या माध्यमातून पहिला हुंकार लाभलेला दिसून येतो, तर कधी मोठ्या प्रमाणावर रंजनवादाचा आसरा घेऊन कलाक्षेत्राने वा समाजानेही पलायनवादी मार्ग स्वीकारल्याचं आढळून येतं. कधी वास्तवाला भिडून त्याची तड लावण्याचा आग्रह धरल्याचं दिसून येतं, तर कधी अगतिक होऊन हिंसक मार्गाचाही अवलंब केल्याचं दिसून येतं. त्यातून अनेक प्रकारचे कलाप्रवाह, साहित्यप्रवाह, सामाजिक वा राजकीय चळवळींचा उद्गम संभवल्याचं दिसून येतं. प्रत्येक पिढीच्या भावविश्वावर अशा सर्व गोष्टींचा ठसा उमटलेला असतो. मात्र अर्थातच हा ठसा किती ठळक असेल, ते त्या-त्या काळातील संवेदनशीलतेच्या आणि समूहजाणिवेच्या तीव्रतेवर अवलंबून असतं.

घटना आणि पिढी-पिढीचं भावविश्व असा सविस्तर ऊहापोह करण्यामागचा उद्देश हाच की, स्वातंत्र्योत्तर भारतातील घटनांवर आधारित या ग्रंथाची रचना करताना विविध घटनांना आम्ही कोणत्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानलं, समजून घेतलं आणि कोणत्या दृष्टिकोनातून त्यांची निवड केली ते स्पष्ट व्हावं. आमच्याप्रमाणे वाचकांनीही या ग्रंथात दिलेल्या घटनांबाबत जाणून घेण्यापूर्वी उपरोक्त भूमिका लक्षात घ्यावी व आपापल्या 'जमान्या'शी निगडित घटनांकडे जास्तीत जास्त वस्तुनिष्ठपणे पाहावं, हासुद्धा उद्देश त्यामागे आहेच. त्याचप्रमाणे, आजच्या तरुण पिढीने गतकालातील घटना जाणून घेताना, देशाची सर्वांगीण वाटचाल कशी झाली ते जाणून घेताना वरील गोष्टी जरूर ध्यानात घ्याव्यात व सार्थ सिंहावलोकन करावं, ही अपेक्षा आहे.

हा तसा रूढार्थाने इतिहासाचा ग्रंथ नाही, मात्र मुळात या ग्रंथाची संकल्पनाच अशी आहे की, ज्यांना-ज्यांना स्वातंत्र्योत्तर भारताच्या इतिहासातील प्रमुख घटना जाणून घेण्याची इच्छा असेल, त्यांना इतिहासात डोकावण्यासाठी घटनारूपी 'खिडक्या' उपलब्ध करून द्याव्यात, जेणेकरून चौकस वाचकांना व अभ्यासकांना विविध क्षेत्रांत घडलेल्या प्रमुख घटनांची नेमकी माहिती वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून मिळावी.

साधारणपणे, इतिहासाच्या ग्रंथांमधून राजकारण, समाजकारण या क्षेत्रांतील घटनांबाबतच माहिती मिळते. मात्र या ग्रंथाची रचना करताना आम्हांला इतरही अनेक क्षेत्रांचा विचार अभिप्रेत होता. म्हणजे असं की, प्रत्येक नागरिकाचं देशाशी व विविध घटकांशी 'हाडामांसा'चं जे नातं निर्माण होतं, ते विविध क्षेत्रांतील आदान-प्रदानातून. अनेक अंगांनी तो समाजाशी जुळलेला असतो आणि अनेक घटना देशभर विखुरलेल्या नागरिकांमध्ये साहचर्याची भावना निर्माण करत असतात. उदाहरणार्थ, सचिन तेंडुलकरने शतकाचं शतक पूर्ण करणं, ही घटना सर्वदूर सर्वांना आनंद देणारी ठरते. अशा अनेक गोष्टी लक्षात घेऊन जनजीवनाला आकार देणार्‍या राजकारण, समाजकारण, विज्ञान, तंत्रज्ञान, अर्थकारण, उद्योग, समाजविकास आदी क्षेत्रांतील घटनांप्रमाणेच समाजमनाची जिवंत स्पंदनं ज्यांतून ठळकपणे दिसून येतील अशा विविध क्रीडाप्रकारांतील आणि वास्तुकला, चित्रकला, संगीत, नाटकं, चित्रपट आदी कलाक्षेत्रांतील घटनांचाही वेध या ग्रंथातील स्वतंत्र लेखांतून घेतलेला आहे. प्रत्येक वर्षातील घटनांवरील लेख क्षेत्रवार - म्हणजे साधारणपणे राजकारण, समाजकारण ते क्रीडाक्षेत्र अशा विशिष्ट क्रमाने योजलेले असल्याने वाचकांना संबंधित वर्षाचं चित्र स्पष्ट होईलच, परंतु दशकवार विभाग केलेले असल्याने प्रत्येक दशकाचं समाजचित्रही सर्वांगाने पुढे येईल. अर्थात, बदलत्या समाजचित्राचा कालपट उलगडत जावा आणि संदर्भासाठीही सहजसुलभ असावं, या दृष्टीनेच या ग्रंथाची रचना केली आहे.

प्रत्येक घटनेचा कमी-अधिक प्रभाव, महत्त्व, परिणाम आणि अर्थातच पृष्ठमर्यादा अशा सर्व गोष्टींचा साकल्याने विचार करून आम्ही घटनांची निवड आणि वर्गवारी केली आहे आणि त्या वर्गवारीनुसार दीर्घलेख, मध्यमलेख व लघुलेख वा नोंदीस्वरूपात लेख लिहून घेतले आहेत. साधारणपणे राष्ट्रीय स्तरावर वा राज्यस्तरावर मोठा वा दूरगामी परिणाम साधणार्‍या सकारात्मक व नकारात्मक घटनांची सखोल माहिती आम्ही दीर्घलेखाद्वारे दिली आहे. परंतु एकंदरीतच प्रत्येक घटनेचं अंतरंग उलगडावं आणि वाचकाला सखोल माहितीसाठी दिशा मिळावी, दृष्टिकोन लाभावा अशी भूमिका आम्ही सर्वच प्रकारच्या लेखांबाबत स्वीकारली आहे. प्रत्येक घटनेची माहिती वस्तुनिष्ठपणे व जास्तीत जास्त तटस्थतेने पुढे यावी, घटना घडण्यामागची कारणं वा वादाचे मुद्दे आणि घटनेचे परिणाम नेमकेपणाने समजावेत, या दृष्टीने बहुतांश लेखांची रचना आम्ही खालीलप्रमाणे एकसमान केलेली आहे -

l घटना नक्की काय, कुठे व कधी घडली
l घटनेमागील पार्श्वभूमी
l घटनेचे तपशील व कारणमीमांसा
l घटनेचे तात्कालिक वा दूरगामी परिणाम

आपल्याकडे बर्‍याच वेळा एखाद्या घटनेचं केवळ बाह्यरूप माहीत होतं आणि त्यातून अनेक वाद-प्रवाद निर्माण होऊन ते दीर्घकाळ कायमही राहिलेले आढळतात. विशेषकरून वादग्रस्त घटनांबाबत असं आढळतं की, घटना उघडकीस येते वा घडते त्या काळात अनेक शंका उपस्थित होतात, आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा उडतो, अनेक प्रश्न अनुत्तरित राहतात आणि पुढील काळात पुन:पुन्हा ते प्रश्न तोंड वर काढतात. अशा घटनांच्या बाबतीत घटनेचे तपशील वस्तुनिष्ठपणे देतानाच अशा प्रवादांचाही उल्लेख आम्ही केला आहे.

वस्तुनिष्ठपणे माहिती देताना लेखांमध्ये रूक्षपणा येऊ नये, जिवंत चित्र उभं राहावं या दृष्टीने विशिष्ट अशा शैलीचं सातत्य राहावं व लेखनात प्रवाहीपणा राहावा यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न केला आहे. यासाठी लेखकांनी लिहिलेल्या लेखांमध्ये आवश्यक ते सुधार, बदल करून घेतले आहेत. ग्रंथाचा एकूणात विचार करून लेखांमध्ये आवश्यक तिथे भरही घातली आहे. त्याचप्रमाणे त्या त्या 'काळाची धून' कानात गुंजावी या उद्देशाने प्रत्येक विभागाच्या अखेरीस संबंधित दशकातील अभिजात व लोकप्रिय अशा हिंदी चित्रपटगीतांची झलक दिली आहे. भाषा, प्रांत यांच्या सीमारेषा पार करून हिंदी चित्रपटगीतं देशाच्या कान्याकोपर्‍यात पोहोचली व तत्कालीन जनजीवनाशी जणू अविभाज्य साहचर्य असावं, इतकी ती प्रभावी ठरली, हे लक्षात घेऊनच हा प्रयोग केला आहे.

एकंदरीत, स्वातंत्र्योत्तर काळाच्या विविध टप्प्यांवरील समाजचित्र सर्वांगाने उभं करणारा ग्रंथ सिद्ध करावा, या भूमिकेतून प्रकाशक प्रदीप चंपानेरकर यांच्याशी आम्ही संपादकद्वयाने सांगोपांग चर्चा केली व त्यानंतर आम्ही संपादकद्वय, संशोधक चमू व जाणकार लेखकगण सर्वांनी मिळून ही अभिनव संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचा यथाशक्ती प्रयत्न केला. गेल्या पाच वर्षांतील सर्वांच्या अविरत प्रयत्नांतून आणि सांघिक योगदानातूनच हा महाग्रंथ साकार झाला आहे.

स्वातंत्र्योत्तर भारताच्या १९४७ ते २०१२ दरम्यानच्या ६५ वर्षांच्या वाटचालीचं विहंगावलोकन केलं, तर आपल्याला ढोबळमानाने तीन टप्पे दिसून येतात. पहिला टप्पा म्हणजे, साधारणपणे १९४७-५० दरम्यानचा राष्ट्रनिर्मितीचा काळ अधिक १९५१-८० दरम्यानची तीन दशकं - या टप्प्यात भारताने पंडित नेहरूप्रणित समाजवादाची कास धरून व संमिश्र अर्थव्यवस्था स्वीकारून देशाची घडी बसवण्याचा प्रयत्न केला. दुसरा टप्पा म्हणजे १९८०चं दशक - हा काळ म्हणजे हिंसात्म घटनांमुळे पसरलेल्या स्तिमिततेचा, सुप्त अस्वस्थतेचा, तंत्राधारित आधुनिकतेला दरवाजे किलकिले करून देणारा आणि एकंदरीत अनेक अर्थाने स्थित्यंतराचा. तिसरा टप्पा म्हणजे १९९१नंतरच्या सुमारे दोन दशकांचा - सांप्रदायिकता व दहशतवादाने ग्रस्त अशा या काळात भारताने समाजवादी घडी मोडून उदारीकरणाला पोषक अशा खासगीकरणाला व माध्यमक्रांतीला प्राधान्य देणारी अशी व्यवस्था निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू ठेवले.

एकंदरीत आधी नेहरूप्रणित समाजवादी घडी बसवण्याकडे - नंतर स्थित्यंतराचं दशक - त्यानंतर परस्परविरोधी दिशेने समाजवादी घडी मोडून खासगीकरणाच्या दिशेने मार्गस्थ होण्याकडे - असा भारताचा काहीसा प्रवास झालेला दिसून येतो आणि त्याचंच प्रतिबिंब व्यापक स्तरावर विविध दशकांत आणि क्षेत्रांत पडल्याचं दिसून येईल. हा धागा पकडून विविध दशकांमध्ये डोकावून पाहिलं, तर अनेक घटनांचा परस्परसंबंध लक्षात येऊ शकतो आणि त्या त्या टप्प्यांतर्गत दशकांतील प्रवासाचे अनेक सूक्ष्म पैलूही लक्षात येतील. एकंदरीत, अशा अवलोकनाद्वारे तत्कालीन समाजचित्राला असलेले अनेक पदर व अस्तरंही वस्तुनिष्ठपणे जाणून घेता येतील - आणि अर्थातच या महाग्रंथामागचा तो एक महत्त्वाचा उद्देश आहेच.

या ग्रंथाची एकंदर रचना दशकवार असली, तरी पहिल्या विभागात आम्ही सुमारे तीन वर्षांच्या अर्थात १९४७-५० दरम्यानच्या राष्ट्रनिर्मितीच्या काळातील घटनांचा समावेश केलेला आहे. १५ ऑगस्ट, १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं, तरी २६ जानेवारी १९५० रोजी राज्यघटना स्वीकृत होऊन हा देश प्रजासत्ताक होईपर्यंत हा देश केवळ एक 'स्वायत्त डोमिनियन' म्हणून अस्तित्वात होता. या दरम्यानच्या काळात राष्ट्रनिर्मितीची प्रक्रिया सुरू असताना राजकीय व इतर क्षेत्रांत घडलेल्या घटना समजून घ्यायच्या, तर तत्पूर्वीच्या म्हणजे देश स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर असतानाच्या काळातील घटना-घडामोडी लक्षात घेणं अपरिहार्य ठरतं. म्हणूनच या पहिल्या विभागाच्या प्रारंभी आम्ही 'ब्रिटिश राजवटीचा संधिकाल', 'फाळणीचा अंध:कार' आणि 'स्वातंत्र्याची पहाट' या तीन दीर्घलेखांची योजना केली आहे. सत्तेचं हस्तांतर कसं झालं, फाळणी का व कशी झाली, फाळणीच्या आगडोंबाच्या काळयाकुट्ट धुराने आकाश काळवंडलं असताना स्वातंत्र्याची पहाट कशी झाली आदी महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं या लेखामधून मिळतीलच, परंतु त्याचसोबत तत्कालीन जनमनाची संमिश्र मनोवस्थाही उमजून येईल.

१९४७-५० दरम्यानचा काळ मोठा विलक्षण आणि समाजमनाला ढवळून काढणारा असाच होता. पारतंत्र्यात मान झुकवून राहणारं समाजमन नवस्वतंत्र राष्ट्राच्या नव्या राष्ट्रध्वजासमोर ताठ मानेने उभं राहू लागलं होतं. परंतु, फाळणीनंतर झालेल्या महास्थलांतरादरम्यान घडलेल्या अमानुष हत्याकांडांमुळे आणि १९४८च्या पूर्वार्धात झालेल्या महात्मा गांधींच्या हत्येमुळे समाजमनाची उंचावलेली मान शरमेने खाली गेली. तिथे निजामाच्या अखत्यारीत राहिलेल्या हैदराबाद संस्थानात दडपशाही वाढल्यावर जरी भारताने सैन्यकारवाई करून ते संस्थान भारतात विलीन करून घेतलं, तरी तेलंगण भागात सरंजामी व्यवस्थेविरोधातील शेतकर्‍यांच्या डाव्या साम्यवादी चळवळीने तीव्र सूर पकडला होता. एकंदरीत, काँग्रेसप्रणित मध्यममार्गी विचारधारा, हिंदुत्ववादी उजवी विचारधारा आणि कम्युनिस्टप्रणित डावी साम्यवादी विचारधारा - अशा तीन धारांनी प्रेरित राजकीय शक्ती पुढील काळात स्वतंत्र भारताच्या राजकारणात कमी-अधिक प्रभावी राहणार, यांचे संकेत त्याच काळात दिसून आले होते.

सुमारे तीन वर्षांच्या अल्पावधीत संस्थानांचं राष्ट्र-राज्यात पुनर्गठन, पोलीस व संरक्षण यंत्रणेची नव्याने उभारणी, 'रिझर्व्ह बँके'च्या स्थापनेद्वारे देशाची अर्थव्यवस्था मार्गी लावणं, 'चित्तरंजन लोकोमोटिव्ह'ची स्थापना, दूरध्वनी उद्योगाची स्थापना, टपालखात्याचं नव्याने नियोजन यांसारख्या घडामोडी धडाक्याने घडून येत होत्या. त्याचप्रमाणे, नवराष्ट्राच्या निर्मितीसाठी कटिबद्ध झालेल्या या देशात सर्वोच्च न्यायालयाच्या स्थापनेद्वारे लोकशाहीच्या तिसर्‍या स्तंभाचा पाया रचणं, 'पीटीआय'च्या स्थापनेद्वारे पत्रकारितेच्या चौथ्या स्तंभाची सुनिश्चित वाटचाल सुरू करणं व त्याचप्रमाणे प्रजासत्ताकाच्या स्थापनेनंतर पहिला व दुसरा स्तंभ पूर्ण क्षमतेने उभा राहावा यासाठी 'निर्वाचन आयोगा'ची स्थापना करणं, विविध राजकीय पक्षांची स्थापना होणं, नव्या प्रशासनिक उभारणीसाठी 'केंद्रीय लोकसेवा आयोगा'ची स्थापना करणं, अशा अनेक पायाभूत घडामोडी या काळात घडून आल्या. याच काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अथक प्रयत्नांतून राज्यघटना सिद्ध झाली व २६ जानेवारी, १९५० रोजी ती स्वीकृत झाली.

राजकीय, आर्थिक आदी क्षेत्रांत अशा घडामोडी सुरू असतानाच कलेच्या विविध प्रांतांत लोकसहभागाचं दर्शन घडवणार्‍या अनेक गोष्टी घडत होत्या. 'प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट ग्रूप'ची स्थापना, 'फिल्म सोसायटी' चळवळीची सुरुवात, हिंदी चित्रपटसंगीताच्या सुवर्णयुगाची सुरुवात ही त्याची काही उदाहरणं - भारतीय हॉकी संघाला सुवर्णपदक मिळवण्यात यश मिळणं, हेसुद्धा नव्या जोशाचं निदर्शक ठरत होतं. परंतु १९५०च्या अखेरीस वल्लभभाई पटेल यांचं निधन झालं आणि मोठा आधारच हरपला. एकंदरीत अशा सर्व सकारात्मक-नकारात्मक घडामोडींच्या एकात्म परिणामातून जनांच्या संमिश्र मनोवस्थेचं व तणावाचं दर्शन या पहिल्या विभागाच्या अवलोकनाद्वारे होईल. एकीकडे 'जन, गण, मन'चे सूर राष्ट्राभिमान जागवत होते, तर दुसरीकडे लता मंगेशकर या नवोन्मेषी गायिकेने गायलेल्या 'आयेगा आनेवाला...' (महल-१९४९) या गीताचे सूर गूढ-आर्त संकेत देत होते.

अशाच प्रकारे अन्वय लावून पाहिला तर पुढील दशकांबाबत असं थोडक्यात म्हणता येतं की, १९५१-६० चं दशक हे देशउभारणीचं, पंडित नेहरूंच्या नेतृत्वाखाली नवस्वतंत्र देशाची नवी स्वप्नं प्रत्यक्षात आणू पाहणारं, अनेक अंतर्विरोध सामावून घेऊ पाहणारं, कलाक्षेत्रात वास्तवदर्शी व आशावादी आविष्कार घडवणारं, १९६१-७०चं दशक हे चीन व पाकिस्तान या शेजारी राष्ट्रांशी युद्ध ओढवणारं, दुष्काळ - अन्न-तुटवडा आदी अरिष्टांचं दर्शन घडवणारं, अनिष्ट वृत्ती व भ्रष्टाचाराचा शिरकाव आणि मूल्यांच्या घसरणीमुळे भ्रमनिराशाचं वातावरण निर्माण करणारं, नक्षलवादी उद्रेकाने हादरवणारं आणि एकंदरीत अस्थैर्याकडे नेणारं, परंतु त्याच वेळी संरक्षणसिद्धतेवर भर आणि 'हरित क्रांती'च्या माध्यमातून आत्मनिर्भरता या गोष्टींची गंभीर दखल घ्यायला लावणारं, १९७१-८० चं दशक हे 'बांगलादेश' युद्धातील यशामुळे स्फूर्ती देणारं परंतु त्यापाठोपाठ देशांतर्गत अस्वस्थतेचे प्रस्फोट घडवणारं, व्यवस्थेला प्रश्न विचारणारं, 'आणीबाणी'चा काळिमा सोसणारं, परंतु त्याच वेळी कलाप्रांतात विविध प्रवाहांचं आगमन साधणारं... नंतर १९८१-९०चं दशक वर म्हटल्याप्रमाणे अनेक अर्थांनी स्थित्यंतराचं. या दशकाच्या पूर्वार्धात प्रामुख्याने मुंबईतील गिरणी-कामगारांचा प्रदीर्घ संप अयशस्वी ठरल्यावर देशभरात कामगारवर्गात निर्माण झालेली मरगळ; पंजाबमधील 'खलिस्तान'चं हिंसक आंदोलन, त्यातून उद्भवलेली इंदिरा गांधींची हत्या आणि शिखांचं हत्याकांड या हिंसात्मक घटनांनंतर पसरलेली स्तिमितता - अशा सर्व पार्श्वभूमीवर या ऐंशीच्या दशकाच्या उत्तरार्धात एकीकडे तंत्राधारित आधुनिकतेला दरवाजे किलकिले करून दिले गेले, तर दुसरीकडे 'मंडलवादा'ची सुरुवात केली गेली. यातून स्थित्यंतराकडे प्रवास सुरू झाला.

पुढे १९९१नंतरच्या दोन दशकांत भारताचा चेहरामोहराच बदलू लागला. उदारीकरणाच्या धोरणाचा स्वीकार, कॉर्पोरेट क्षेत्राचे प्रभुत्वाचे प्रयत्न, नवमध्यमवर्गाची आगेकूच, शेतकरी-कामगारवर्गाची पीछेहाट, सांप्रदायिक शक्तींची 'ऊर्ध्वगामी' वाटचाल, दहशतवादी तत्त्वांचा उन्मुक्त संचार, 'एलटीटीई'द्वारे पंतप्रधान राजीव गांधींची हत्या, काश्मीरमध्ये वाढता असंतोष आणि त्याच वेळी 'एनजीओ' व जनाभिमुख चळवळींच्या आगळ्या प्रवाहांचा उदय, कलाक्षेत्रात नव्या उपधारा आणि अभूतपूर्व माध्यमक्रांती असं सर्व व्यामिश्र चित्र दिसून येतं.

एकंदरीत, असा सर्व दशकवार प्रवास बारकाईने जाणून घ्यायचा, तर या ग्रंथातील एकेक घटना महत्त्वाची ठरते. त्या दृष्टीने प्रत्येक विभागाच्या सुरुवातीला त्या त्या दशकातील महत्त्वाच्या घटना-घडामोडींकडे लक्ष वेधणारा दशक-परिचय आम्ही दिलाच आहे. परंतु, अर्थातच विविध क्षेत्रांतील जाणकार व वाचक आपापल्या दृष्टिकोनातून आगळा अन्वय लावू शकतात. मात्र त्यासाठी मुळात किमान घटनांचं आकलन वस्तुनिष्ठपणे व्हावं, यासाठीच हा सर्व प्रपंच आहे. त्यातून नवं भान लाभून प्रगल्भतेने नवे अन्वयार्थ संभवले, नवे दृष्टिकोन उदयास आले, तर हा ग्रंथप्रपंच खर्‍या अर्थाने सार्थ ठरेल - तसा तो ठरावा, हीच 'कमाल' अपेक्षा!

बर्‍याच वेळा काहीजण 'तो काळ वेगळाच होता', 'आमच्या जमान्यात असं नव्हतं' असं सहजपणे म्हणून जातात. वास्तविक, असं म्हणताना त्यांना तुलनात्मक विधान करणं अभिप्रेत असतं. म्हणजे, त्या काळातील विविध क्षेत्रांतील घटना तेव्हा त्यांच्या डोळयासमोर असतात; तत्कालीन 'जमान्या'चं एकात्म, पण 'अमूर्त' असं समाजचित्र त्यांच्या डोळ्यासमोर तरळत असतं आणि त्या चित्राशी ते समकालीन समाजचित्राची तुलना करू पाहत असतात. मात्र तत्कालीन घटनांचे संदर्भ नेमकेपणाने व ठोसपणाने माहीत नसल्याने ते तसं 'सहज विधान' करून थांबून जातात. सामान्यजनच नाहीत, तर बर्‍याच वेळा अभ्यासकही नेमक्या व सुलभ संदर्भाअभावी 'थबकून' गेल्याचे आढळतात. त्यामुळेच सहज संदर्भासाठी हा ग्रंथ अशा सर्वांसाठीच उपयुक्त ठरेल, असं वाटतं. इतकंच नाही, तर गतकालातील घटनांची 'पुनर्भेट' झाल्याने प्रौढ पिढीचे अनेक पूर्वग्रह दूर होऊ शकतात वा त्या घटनांचं त्यांना नव्याने आकलनही होऊ शकतं. त्याचप्रमाणे, विशेषकरून तरुण पिढीचं समकालीन काळाचं भान अधिक प्रगल्भ होऊ शकतं.

आज अशा अनेक गोष्टी दिसून येतात की, ज्यांचा उद्गम व विकास स्वातंत्र्योत्तर काळात झाला आणि आज त्या आपल्या जनजीवनाचा भाग झालेल्या आहेत. विशेषत: अनेक सेवा, सुखसोयी, सुख-सुविधांची उपकरणं, कर्मचार्‍यांना मिळणारे भत्ते, निवृत्तिवेतन, प्रॉव्हिडंट फंड इत्यादी. यांतील काही गोष्टी 'कल्याणकारी शासनव्यवस्थे'ची संकल्पना स्वीकारल्यामुळे शासकीय वा सार्वजनिक उपक्रमांद्वारे साध्य झाल्या, तर काही कामगार-संघटनांच्या चळवळी, स्वयंसेवी संस्था वा सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने उभ्या झालेल्या चळवळी यांद्वारे जनतेने दीर्घकाळ भांडून मिळवलेल्या आहेत. वास्तविक पुढील पिढ्यांना त्याचीच फळं आज प्राप्त झालेली असूनही त्यांना त्याबाबत फारशी जाणीव असल्याचं दिसून येत नाही. किंबहुना त्याबाबत संवेदनांचं बधिरीकरणही झाल्याचं जाणवतं.

या पार्श्वभूमीवर, विविध दशकांतील जनकल्याणकारी गोष्टींशी निगडित चळवळी, सामाजिक संस्था, शासकीय योजना-उपक्रम व जनहितकारी कायदे (मॅटर्निटी बेनीफिट ते माहिती अधिकार) आदींचा उद्गम दर्शवणार्‍या या ग्रंथातील घटना सर्वच पिढ्यांना आगळी अंत:दृष्टी (इनसाइट) देणार्‍या ठराव्यात, अशी रास्त अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे ध्वनिमुद्रिका, ऑडिओ कॅसेट्स ते सीडी, व्हिडिओ कॅसेट्स ते डीव्हीडी, 'एसटीडी' सेवा ते मोबाईल, संगणक ते इंटरनेट आणि दूरदर्शन ते खासगी वाहिन्या - अशा अनेकविध सुखसुविधांचं, सुखकारक माध्यमांचं आगमन साधणार्‍या घटनांची माहिती (वा प्रवास) रोचक ठरेलच, पण त्याचसोबत बदलत्या समाजचित्राचं आगळं भान येईल, असं विश्वासपूर्वक वाटतं.

साधारणपणे अर्थकारण, उद्योग, विज्ञान, तंत्रज्ञान यांबाबतच्या रूढ ग्रंथांमध्ये देशाचा त्या त्या क्षेत्रातील विकासाचा एकेरी प्रवास आढळतो. मात्र या ग्रंथाच्या विशिष्ट अशा रचनेमुळे अशा प्रत्येक क्षेत्रातील मूलभूत विकासाची ओळख होईलच, परंतु त्याचसोबत जनजीवनाशी निगडित पैलूंचंही दर्शन साध्य होऊ शकतं. उदाहरणार्थ, वर म्हटल्याप्रमाणे भारताने अर्थक्षेत्रात आधी समाजवादाकडे कल असलेली अर्थव्यवस्था आणि नव्वदच्या दशकापासून उदारीकरणाला पोषक अशी अर्थरचना - असा दोन भिन्न दिशेने प्रवास केला. या ग्रंथातील पंचवार्षिक योजना, सार्वजनिक क्षेत्राला प्राधान्य, विमा व बँक क्षेत्राचं राष्ट्रीयीकरण अशा घटनांपासून ते नव्वदच्या दशकातील 'गॅट कराराला मान्यता' यांसारख्या घटनांमधून उपरोक्त वाटचालीचं प्रतिबिंब दिसून येईलच, पण त्याचसोबत विमा क्षेत्रातील दालमिया आर्थिक घोटाळा (१९५८), हर्षद मेहता शेअर घोटाळा (१९९२) ते 'टू जी घोटाळा' (२०१०) यांसारख्या घटनांतून अर्थव्यवस्थेचा गैरवापर, हितसंबंधाचं स्वरूप व जनसामान्यांना त्यासाठी मोजावी लागणारी किंमत याचं 'सनसनाटी-मुक्त' भान येऊ शकतं. त्याचप्रमाणे भारतीय नाणी-नोटांचं प्रथम चलनात येणं, पुढील काळात नव्या 'डिनॉमिनेशन'च्या नोटा येणं अशा जनसामान्यांच्या जीवनातील दररोजचे व्यवहार घडवणार्‍या गोष्टींबाबतही आगळी जाण प्राप्त होऊ शकते.

एकंदरीत, अर्थव्यवस्थेचं अंतरंग उलगडून दर्शवण्यासाठी ज्याप्रकारे आम्ही अर्थक्षेत्रातील अनेक प्रकारच्या घडना निवडल्या तशाच प्रकारे आम्ही विज्ञान, तंत्रज्ञान, औद्योगिक क्षेत्र, वाहतूक-दळणवळण आदी क्षेत्रांतील वाटचाल दर्शवणार्‍या निवडक महत्त्वाच्या घटनांचा समावेश केला आहे. त्यामुळेच या ग्रंथातील अणुऊर्जा आयोगाची स्थापना (१९४८), 'बीएआरसी'ची स्थापना (१९५७), 'इस्रो'ची स्थापना (१९६९), संगणकाचं आगमन (१९५५) ते सॉफ्टवेअर उद्योगाचा विकास, 'रोहिणी' अग्निबाण (१९५९) ते 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्रांच्या (२००६) यशस्वी निर्मितीद्वारे संरक्षणसज्जता अशा घटनांपासून ते घराघरात दूरदर्शनचं प्रसारण साध्य करणार्‍या 'इन्सॅट-४' सॅटेलाईटचं प्रक्षेपण आदी बहुविध घटना वाचकांची जाण समृद्ध करणार्‍या ठरतील, अशी खात्री वाटते.

समाजातील संवेदनशीलतेचं, प्रतिभेचं, चैतन्याचं आणि रसरशीतपणाचं दर्शन घडवणारं क्षेत्र म्हणजे कलाक्षेत्र. त्यातील विविध कलाप्रकारांतील आविष्काराचं प्रातिनिधिक दर्शन घडावं, या दृष्टीने 'इव्हेन्ट्स'ची निवड कशी करावी, मुळात या बाबतीत 'घटना' कशाला मानावं, हे आमच्यासमोर मोठे प्रश्न होतेच, परंतु ते आम्ही इतर क्षेत्रांपेक्षा वेगळया प्रकारे हाताळले. उदाहरणार्थ, स्थापत्यकला व नगररचनेबाबत सांगायचं तर नवभारताचं भविष्यचित्र प्रत्यक्षात उभारावं या उद्देशाने 'चंडीगड' शहराचं साकार होणं (१९६५) हे आम्ही संकल्पनेच्या व स्थापत्यकलेच्या दोन्ही अंगांनी महत्त्वाचं मानलं. त्याच वेळी निवडक अशा कलासंस्था, शिक्षणसंस्था, आधुनिक इस्पितळं, स्मारकं, आर्ट गॅलरीज इत्यादी व त्याचप्रमाणे निवासी-संकुलं यांबाबतीत रचनेच्या दृष्टीने नवे, जनाभिमुख व सर्जनशीलतेच्या दृष्टीने वस्तुपाठ घालून देणार्‍या वास्तुरचना निवडल्या व त्यांचं पूर्णत्वास येणं यालाच 'घटना' मानलं. अशीच भूमिका स्वीकारून आम्ही चित्रकला, शिल्पकला यांसारख्या क्षेत्रांतील नवे पायंडे, नवे कलाप्रवाह निर्माण करणार्‍या कलासंस्थांची स्थापना वा राष्ट्रीय स्तरावरील प्रदर्शनांचं आयोजन अशा घटनांची माहिती दिली आहे; शास्त्रीय संगीत क्षेत्रातील महत्त्वपूर्ण अशा राष्ट्रीय स्तरावरील संगीत महोत्सवांची दखल घेतली आहे आणि नाटयक्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर नवे प्रवाह निर्माण करणार्‍या नाटयसंस्थांची स्थापना व नाटयप्रयोगांचं मंचन आदींची दखल घेतली आहे. हिंदी चित्रपट आणि चित्रपटसंगीत हे तर संपूर्ण भारताचे जिव्हाळयाचे विषय आणि कला म्हणून मान्यता मिळवतानाच, 'उद्योग' म्हणूनही या क्षेत्राने जागतिक मान्यता मिळवली. बर्‍याच वेळा या माध्यमातून समाजचित्राचं वास्तव दर्शन घडलं, तर बर्‍याच वेळा रंजनवाद व पलायनवादाचा आश्रय घेतल्याचंही आढळलं. तरी एकप्रकारे चित्रपटमाध्यम हे जनजीवनाचं जणू अविभाज्य भाग बनलं. हे लक्षात घेता आम्ही लोकप्रिय व अभिजात अशा विविध हिंदी व प्रादेशिक चित्रपटांची माहिती दिली आहे व 'समांतर', 'मध्यममार्गी' आदी त्याचप्रमाणे विविध चित्रपटप्रवाहांबाबतही माहिती दिली आहे.

साहित्यक्षेत्राबाबत मात्र आम्ही एका अर्थाने अपवाद केला आहे. म्हणजे जरी आम्ही या क्षेत्रातील राष्ट्रीय स्तरावरील घटना, मन्वंतर व प्रवाहांची दखल घेतली आहे आणि 'साहित्य अकादमी'सारखे पुरस्कार प्राप्त करणार्‍यांची सूची प्रत्येक विभागाअखेरीस दिली आहे, तरी विविध जनमान्य साहित्यकृतींची स्वतंत्र लेखरूपाने दखल घेतलेली नाही. कारण एक तर बहुतांश प्रादेशिक भाषांतील साहित्याचा पसारा अफाट आहे आणि त्यावरील समीक्षा व इतर साहित्यही वैपुल्याने उपलब्ध आहे. त्या सर्वांची दखल घ्यायची तर स्वतंत्र पुस्तकच होईल इतकी त्याची व्याप्ती आहे. म्हणूनच अखिल भारताकडे वा भारतीयांच्या अंतरंगाकडे तटस्थपणे वा बहुकोनांतून पाहणार्‍या अगदी मोजक्या अशा निवडक इंग्रजी, हिंदी व मराठी साहित्यकृतींची आम्ही या ग्रंथात स्वतंत्रपणे दखल घेतली आहे. साहित्य हा समाजाचा आरसा असतो, हे मान्य असूनही असा कठोर निर्णय घेणं भाग होतं.

क्रीडाक्षेत्राचा विचार करतानाही क्रिकेट ते कुस्ती अशा विविध क्रीडाप्रकारांतील बहुतांश राष्ट्रीय स्तरावरील घटनांची दखल आम्ही घेतलेली आहे. बदलत्या समाजचित्राचा सर्वांगाने मागोवा घ्यायचा तर समाजविघातक कृत्यं करणार्‍या गुन्हेगारी क्षेत्राची दखल घेणं गरजेचं होतं आणि त्याचप्रमाणे समाजाची वाताहत घडवणारे मोठे अपघात, दुर्घटना, वादळ, महापूर, भूकंप यांसारख्या घटनांचाहीसमावेश करणं आवश्यक होतं. त्या दृष्टीने त्यातील काही निवडक घटनांचा समावेश या ग्रंथात केला आहे.

एक स्वतंत्र देश सार्वभौम असला तरी, जागतिक स्तरावरील आंतरराष्ट्रीय घडामोडींचा प्रभाव, परिणाम त्यावर होत असतोच. भारत स्वतंत्र झाला त्याच काळात म्हणजे १९४७-४८मध्ये पाकिस्तान, श्रीलंका, म्यानमार हे शेजारी देश स्वतंत्र झाले आणि १९४९मध्ये चीनने साम्यवादी देश (पीपल्स रिपब्लिक) म्हणून वाटचाल सुरू केली. हे लक्षात घेता या शेजारी राष्ट्रांची स्थापना व त्याचप्रमाणे तेथील अशा घटनांची आम्ही दखल घेतली आहे, ज्यामुळे भारताच्या अंतर्गत परिस्थितीवर वा परराष्ट्र धोरणावर प्रत्यक्ष परिणाम संभवले. याच दृष्टिकोनातून अमेरिका, सोव्हिएट रशिया, अफगाणिस्तान आदी देशांतील व जागतिक स्तरावरील काही निवडक घटनांचीही आम्ही दखल घेतली आहे.

आता अखेरची गोष्ट. घटना-निवडीचे निकष, ग्रंथाचं स्वरूप व संकलन आणि पृष्ठमर्यादा या सर्वांचं भान राखून आम्ही विविध क्षेत्रांतील जास्तीत जास्त महत्त्वपूर्ण अशा घटनांचा समावेश केला आहे व हा ग्रंथ सर्वसमावेशक करण्याचा यत्न केला आहे. मात्र तरीही वाचकांची आपापल्या रुचीनुसार वा दृष्टिकोनानुसार 'या घटना सुटून गेल्या', 'या घटनांचा समावेश व्हायला हवा होता', अशी तक्रार राहणार याची आम्हाला जाणीव आहे. त्याचप्रमाणे, या ग्रंथातील सर्वच लेखांतील मतांशी संपादक व प्रकाशक सहमत असतीलच असे नाही. वस्तुनिष्ठ मांडणी करण्याचा सर्वांनीच प्रयत्न केलेला आहे, परंतु त्यातूनही मत-मतांतरं उद्भवू शकतात. अशा वेळी प्रतिवाद जरूर करावा, पण भावनिक प्रतिक्रिया टाळाव्यात आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा आदर राखावा, हेच आपल्या सुदृढ लोकशाहीत अपेक्षित आहे.

प्रत्येक घटनेची तारीख, काळ व लेखात नमूद केलेल्या तपशिलांची आम्ही जास्तीत जास्त काटेकोरपणे फेरतपासणी व पडताळणी करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु तरीही काही चुका राहून गेल्या असू शकतात. वाचकांनी त्या आमच्या निदर्शनास आणून दिल्यास त्यांचं स्वागतच आहे.

२००५पासून केलेले सांघिक प्रयत्न आणि अथक परिश्रम यांच्या फलस्वरूप पाच वर्षांनी लेख-संकलन सिद्ध झालं, त्यावर संपादकीय संस्कारही झाले. परंतु ग्रंथाची एकंदर व्याप्ती पाहता निर्मितिप्रक्रियाही मोठी जिकीरीची होती. त्याचप्रमाणे ग्रंथाला परिपूर्णता आणण्याच्या दृष्टीने व उच्च निर्मितिमूल्ये प्रदान करण्याच्या दृष्टीने 'रोहन प्रकाशन' नेहमीच अनेक स्तरांवर प्रयत्नशील असतं आणि प्रकाशकांचा असा लौकिक पाहता या महाग्रंथाच्या निर्मितीसाठी अधिक वेळ लागणारच होता. या सर्व प्रक्रियेत दोन वर्षांचा काळ गेल्यावर २०११-१२ या दोन वर्षांतील काही 'अपडेट्स'सह हा ग्रंथ आज प्रकाशित होत आहे. सर्व जिज्ञासू व विविध क्षेत्रांत रुची असणार्‍या वाचकांसाठी व सर्व प्रकारच्या अभ्यासकांसाठी हा ग्रंथ महत्त्वपूर्ण व सहाय्यीभूत ठरावा आणि हा अभिनव ग्रंथप्रकल्प सार्थ ठरावा, हीच अपेक्षा.

- मिलिंद चंपानेरकर, सुहास कुलकर्णी

***

१५ ऑगस्ट, १९४७ - स्वातंत्र्याची पहाट

ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून भारताचं वसाहतीकरण साधल्यावर इ. स. १८५८मध्ये भारतीय वसाहतीची सूत्रं अधिकृतपणे पूर्णत: इंग्लंडच्या राजाकडे सोपवली गेली होती. अखंड भारतावर साम्राज्यवादी सत्ता लादणार्‍या ब्रिटिश सरकारने प्रदीर्घ अशा स्वातंत्र्यलढयानंतर आणि हजारो स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानानंतर अखेरीस १८ जुलै, १९४७ रोजी ब्रिटिश पार्लमेंटमध्ये '१४ ऑगस्ट, १९४७च्या मध्यरात्री भारताला स्वातंत्र्य बहाल केलं जाईल' अशी घोषणा केलेली होती. १४ ऑगस्ट, १९४७चा तो सुदिन उजाडला. घोषणेनुसार त्या दिवशीच्या संध्याकाळपर्यंत व्हॉईसरॉय माऊंटबॅटन यांनी कागदोपत्री सत्तांतराची औपचारिक प्रक्रिया पूर्ण केली. गुलामगिरीच्या काळात देशात सर्वत्र फडकणारे युनियन जॅक त्या दिवशी संध्याकाळी उतरवण्यात आले. १५ ऑगस्ट, १९४७च्या पहाटे भारताला अधिकृतपणे स्वातंत्र्य प्राप्त झालं आणि अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात राजधानी दिल्लीत व देशात सर्वत्र भारताचा तिरंगी ध्वज दिमाखाने फडकू लागला.

१४ ऑगस्ट : हुरहूर, काहूर आणि उत्साह

१४ ऑगस्टच्या दिवशी सगळीकडेच वातावरण आतुरलेलं होतं. उत्साहाबरोबरच मनं कातरलेली होती, आशेनं मनं ओथंबलेली असतानाच निराशेची एक धून मनात काहूर माजवू पाहात होती. देशाभिमानाने ऊर भरून येत असतानाच भविष्याबद्दलची अनामिक अनिश्चितताही भारतीय मनांना भेडसावू पाहत होती. एकंदरीत अशीच एक सार्वत्रिक संमिश्र मानसिकता घेऊन भारतीय जनमन १४ ऑगस्टच्या मध्यरात्रीला सामोरं जाऊ पाहत होतं.

१४ ऑगस्ट, १९४७ रोजी मध्यरात्रीच्या ठोक्याला स्वातंत्र्य मिळणार होतं. सुमारे ९० वर्षं दिल्लीच्या लाल किल्ल्यावर बेमूर्वतपणे फडकणारा युनियन जॅक खाली उतरवला जाऊन भारताचा तिरंगी ध्वज तेजस्वीपणे फडकणार होता. असं दृश्य प्रत्यक्षात येत असताना १४ ऑगस्टच्या त्या रात्री संपूर्ण भारतीय खंडात कुणाला झोप लागणं कठीणच होतं. कारण सर्वांनाच तो क्षण अनुभवायचा होता. फाळणीची विषण्णता मनातून दूर करून स्वातंत्र्याचं स्वागत करायचं होतं. फाळणीनंतर सुरू झालेल्या दंग्यांची दाहकता शमलेली नव्हती, पण त्याची तमा न बाळगता लोक त्या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी दिल्ली गाठण्याच्या प्रयत्नात होते.

१४ ऑगस्ट हा दिवस उजाडला तोच मुळी सनईच्या स्वरांनी, तुतार्‍यांच्या निनादांनी, 'भारतमाता की जय'च्या गगनभेदी घोषणांनी आणि हजारो लोकांच्या उत्स्फूर्त मिरवणुकांनी. विविध राज्यांतून हजारोंच्या संख्येने लोकांचे जथ्थे मिळेल त्या वाहनाने दिल्लीतील तो स्वातंत्र्यसोहळा पाहण्यास निघाले होते. दिल्लीत अलोट गर्दी जमू लागली. दिल्लीतील भव्य रस्ते निरुंद भासू लागले. प्रासादांचे आकार गडद होत गेले. दिल्लीतील लष्कर विभाग, सिमल्याचं 'व्हाईसरॉय भवन', जिथे ब्रिटिश रॉबर्ट क्लाईव्हने साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली तो कोलकात्याचा 'फोर्ट विल्यम', मद्रासचा (आता चेन्नईचा) 'फोर्ट सेंट जॉर्ज', मुंबईचं उच्च न्यायालय व तेथील व्हिक्टोरियन दगडी इमारती- सर्व वास्तूंवरचे 'युनियन जॅक' १४ ऑगस्टच्या सूर्यास्ताच्या वेळी विनासोहळा उतरवण्याचे कार्यक्रम मध्यरात्रीचे १२ वाजल्यावर होणार होते.

१४ ऑगस्टच्या दिवशी व्हाईसरॉय माऊंटबॅटन दिल्लीतील आपल्या अभ्यासिकेत व्यग्र होते. सत्तांतरासंबंधीची सरकारी कागदपत्रं अभ्यासून, तपासून सह्यानिशी तयार ठेवण्यात ते संध्याकाळपर्यंत गर्क होते. तिथे नव्या दिल्लीतील घटना समितीच्या सभागृहात आणि बाहेर लोकांची झुंबड उडाली होती. काही तासांनंतर सत्तांतराचा जो औपचारिक समारंभ होणार होता, त्याचं दृश्य डोळ्यांत साठवून ठेवण्यासाठी त्यांची धडपड सुरू होती. कॉन्स्टिंटयूअंट असेंब्ली अर्थात घटना समितीच्या सभागृहात सर्वत्र दिव्यांचा लखलखाट होता. जसजसं अंधारून येत होतं, तसतसं घडयाळाचे काटे फारच हळू फिरत असल्याचं भासत होतं.... मध्यरात्रीचे १२ वाजण्याची सर्वच जण उत्कंठेने प्रतीक्षा करत होते. जवळजवळ साडेतीनशे वर्षांपूर्वी व्यापारासाठी भारतखंडात शिरकाव करणार्‍या आणि १८५७च्या उठावानंतर देशावर अधिकृतपणे सत्ता गाजवणार्‍या इंग्रजांचा जाण्याचा क्षण जवळ आलेला होता.

भारताच्या सर्वच राज्यांमध्ये स्वातंत्र्यसोहळा होणार होता. तरुण, मुलं, आबालवृद्ध सर्वच रस्त्यावर आले होते; आनंदाने बेभान झाले होते. कुठे लेझीम-ढोलांच्या तालावर गुलाल उधळत मिरवणुका निघत होत्या, तर कुठे समारंभाच्या ठिकाणी शाहिरी पोवाडे गायले जात होते. महात्मा गांधी, नेहरू, लोकमान्य टिळक आदी नेत्यांची चित्रं व्यासपीठाच्या ठिकाणी लावलेली होती. इमारतींवर, दुकानांवर सर्वत्र रोषणाईचा लखलखाट, झगमगाट झालेला होता. देशात सर्वत्र असं पराकोटीच्या राष्ट्रभावनेचं दर्शन घडत होतं.

रात्री ११ वाजता घटना समितीच्या सभागृहात प्रतिनिधीजन आसनस्थ झालेले होते. उत्कंठा ताणली जात होती... बारा वाजायला पाच मिनिटं बाकी असताना वातावरणातील कल्लोळ कमी झाला. आपापसातलं बोलणं कमी झालं... सर्वत्र जणू आध्यात्मिक शांतता पसरली... ...१५ ऑगस्टच्या स्वागतासाठी....

१५ ऑगस्ट : जल्लोष आणि आनंदाश्रू

जसे घडयाळाच्या काटयांनी बाराच्या आकडयावर हात जोडले, तसा निमिषार्धात जल्लोषाचा एकच स्फोट झाला. १५ ऑगस्ट उजाडताच देशभर आनंदाचं उधाण आलं. दिल्ली जल्लोषात न्हाऊन निघाली. शासकीय इमारती व इतरत्र तिरंगी अशोकचक्रांकित ध्वज सरसर वर चढवला गेला. झेंडा फडकू लागताच लोकांच्या डोळयांतून आनंदाश्रू ओघळू लागले. काहीजण ओक्साबोक्शी रडू लागले. ज्या क्षणाची आत्यंतिक आतुरतेने वाट पाहिली तो क्षण येताच लोकांची मनं भारावून गेली. स्वतंत्र भारताची पहिली प्रभात आता उजाडणार होती... भावना व्यक्त करणं कठीण झालं होतं. काहींच्या मनात संमिश्र भावना होत्या. 'राष्ट्रपिता' गांधीजी अनुपस्थित होते. पंजाब व बंगाल प्रांतांत सांप्रदायिक हिंसेचा आगडोंब उसळला होता, या पार्श्वभूमीवर गांधीजी पश्चिम बंगाल-मधील बेलियाघाट आदी दंगलग्रस्त भागात शांती प्रस्थापित करण्यासाठी फिरत होते. त्या हिंसेने व्यथित झालेले गांधीजी 15 ऑगस्टचा पूर्ण दिवस तिथे उपोषण करणार होते.

नियतीशी करार

स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू अत्यंत दाटलेल्या अंत:करणाने बोलायला उभे राहिले. मन उचंबळलेलं असताना शब्द फुटणं कठीण जात होतं. पण भावनांना आवरून त्यांनी त्यांचं अत्यंत गाजलेलं असं 'नियतीशी करार'बद्दलचं भाषण सुरू केलं. ''अनेक वर्षांपूर्वी आपण नियतीशी एक करार केला होता. आज त्याची सर्वांशानं का नसेना, पण पुष्कळशा अंगानं आपण पूर्ती करत आहोत. मध्यरात्रीच्या प्रशांत समयी सारं जग झोपलेलं असताना भारत स्वातंत्र्याच्या युगात नवा जन्म घेत आहे. पुन्हा एकदा नव्या भारताचा शोध हा देश घेत आहे. ही वेळ क्षुद्रपणा गाडून टाकण्याची आहे. विघातक टीकेला मूठमाती देण्याची आहे. आपल्याला स्वतंत्र भारताचा एक उत्तुंग प्रासाद उभारायचा आहे. दारिद्रय, अन्याय, विषमता यांचा शेवट करायचा आहे. देशाची सेवा म्हणजे येथील गरीब जनतेची सेवा. या युगातील सर्वश्रेष्ठ माणसाचं, महात्मा गांधींचं, स्वप्न आपल्याला भूतलावर प्रत्यक्षात उतरवायचं आहे. प्रत्येक नेत्रातला अश्रू आपल्याला पुसून टाकायचा आहे. ही गोष्ट आपल्या शक्तीबाहेरची आहे, असं आपल्याला वाटेल, पण जोवर जगात यातना आणि अश्रू आहेत तोवर आपलं सेवेचं काम चालू असलंच पाहिजे...''

स्वतंत्र भारताच्या इतिहासाची वाटचाल सुरू...

अशा भावोत्कट समारंभाने १५ ऑगस्ट, १९४७ रोजी स्वतंत्र भारताच्या इतिहासाची वाटचाल सुरू झाली. सुमारे १५ महिन्यांपूर्वी म्हणजे १६ मे, १९४६ रोजी अखंड भारताच्या स्वसत्ताक वसाहतीसाठी (डोमिनियनसाठी) संविधान अर्थात राज्यघटना तयार करण्याचे हक्क ब्रिटिशांनी दिले होते. पण दरम्यान ३ जून, १९४७ रोजी भारत-पाकिस्तान फाळणीची घोषणा केली गेली आणि १४-१५ ऑगस्ट रोजी पाकिस्तान व भारत अशा दोन स्वसत्ताक वसाहती (डोमिनियन्स) अस्तित्वात आल्या. भारताची राज्यघटना तयार होऊन ती पुढे लागू झाल्यावर (२६ जानेवारी, १९५०) भारत प्रजासत्ताक देश ठरणार होता. तोवर भारत तांत्रिकदृष्टया एक 'स्वसत्ताक वसाहत' म्हणून मानला गेला. त्याचप्रमाणे १४ ऑगस्ट १९४७पर्यंत व्हॉईसरॉय म्हणून भूमिका निभावणार्‍या लॉर्ड माऊंटबॅटन यांनी १५ ऑगस्ट, १९४७ रोजी भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून सूत्रं स्वीकारली (२२ जून, १९४८पर्यंत). या काळात घटना समितीला कायदेमंडळाचे अधिकार प्रदान केले गेलेले होते. जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखालील अशा कायदेमंडळाच्या माध्यमातून १५ ऑगस्ट, १९४७पासून पारतंत्र्यमुक्त भारताच्या पुढील जडणघडणीला सुरुवात झाली होती.

अणुऊर्जाक्षेत्रातील संशोधनासाठी भारतीय अणुऊर्जा आयोगाची स्थापना

कल्याणकारी योजनांसाठी अणुऊर्जेचा वापर शक्य व्हावा आणि त्यासाठी सखोल अभ्यास व संशोधनाला चालना मिळावी, या उद्देशाने १० ऑगस्ट, १९४८ रोजी भारतीय अणुऊर्जा आयोगाची (ऍटॉमिक एनर्जी कमिशनची) स्थापना करण्यात आली. सुप्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ डॉ. होमी भाभा यांची या आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली.

१९४७मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यावर भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विज्ञानाद्वारे राष्ट्राची प्रगती साधण्याचं धोरण अवलंबलं होतं. त्या दृष्टीने ते देशातील सर्वच शास्त्रज्ञांना आवाहन करत होते व प्रोत्साहन देत होते. अणुऊर्जेच्या संदर्भात डॉ. होमी भाभा यांनी स्वातंत्र्यपूर्व काळातच म्हणजे १९४४पासूनच या क्षेत्रातील संशोधनाला देशांतर्गत सुरुवात केलेली होती. वीजनिर्मितीसाठी अणुऊर्जेचा प्रचंड उपयोग शक्य असल्याचं त्यांनी ओळखलं होतं. १२ मार्च, १९४४ रोजी त्यांनी सर दोराबजी टाटा ट्रस्ट या संस्थेला पत्र लिहून अणुऊर्जा क्षेत्रातील संशोधनासाठी त्यांची मदत मागितली. या संस्थेने प्रतिसाद दिल्यावर १९ डिसेंबर, १९४५ रोजी 'टाटा मूलभूत विज्ञान संशोधन संस्था' (टाटा इन्स्टिटयूट ऑफ फंडामेंटल रिसर्च- टीआयएफआर) या संस्थेची मुंबईतील कुलाबा भागात स्थापना झाली. गणित, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र या विषयांमध्ये उच्च दर्जाचं संशोधन करण्याची सुरुवात तेव्हापासूनच या संस्थेत झाली होती. हे सर्व लक्षात घेऊन नेहरूंनी अणुऊर्जेच्या क्षेत्रातील राष्ट्रीय स्तरावरील कार्यासाठी डॉ. भाभा यांना प्रोत्साहन दिलं. भारत शासनाने १५ एप्रिल, १९४८ रोजी अणुऊर्जा कायदा अर्थात ऍटोमिक एनर्जी ऍक्ट संमत केला आणि या क्षेत्रातील घडामोडींना चालना मिळाली. अणुऊर्जा आयोगाच्या स्थापनेसाठी डॉ. भाभा यांना के. एस. कृष्णन (सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ सी. व्ही. रामन यांचे शिष्य) आणि शांतिस्वरूप भटनागर या ज्येष्ठ शास्त्रज्ञांचं मोलाचं सहकार्य लाभलं. या सर्वांच्या सहकार्याने डिपार्टमेंट ऑफ सायंटिफिक रिसर्चच्या अंतर्गत १० ऑगस्ट, १९४८ रोजी अणुऊर्जा आयोगाची निर्मिती झाली.

पुढे १९५४मध्ये भारतीय अणुऊर्जा विभागाची (डिपार्टमेंट ऑफ अ‍ॅटॉमिक एनर्जी- डीएई) निर्मिती झाल्यावर या आयोगाचा या विभागात अंतर्भाव करण्यात आला. (अधिक तपशील 'अणुऊर्जा विभागाची स्थापना' १९५४ या लेखात.) अणुऊर्जेचा सखोल अभ्यास करण्याच्या दृष्टीने या काळात उचललेलं आणखी एक महत्त्वाचं पाऊल म्हणजे २१ एप्रिल, १९४८ रोजी कोलकात्यामध्ये 'इन्स्टिटयूट ऑफ न्यूक्लिअर फिजिक्स'च्या इमारतीची कोनशिला बसवण्यात आली. ११ जानेवारी, १९५० रोजी सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ मेरी क्युरी यांच्या नोबल पारितोषिक विजेत्या कन्या इरीन जोलिओ क्यूरी यांच्या हस्ते या संस्थेचं उद्‌घाटन झालं. १९५५ साली डिपार्टमेंट ऑफ ऍटॉमिक एनर्जीतर्फे अनुदानित म्हणून ही संस्था गणली गेली व २२ मार्च, १९५८ रोजी तिचं नामकरण साहा इन्स्टिटयूट ऑफ न्यूक्लिअर फिजिक्स असं करण्यात आलं. पुढं नव्वदच्या दशकात म्हणजे २७ ऑगस्ट, १९९२2 रोजी अणुऊर्जा खात्यांतर्गत संशोधन व प्रशिक्षणाचं कार्य करणारी स्वायत्त संस्था म्हणून या संस्थेला मान्यता मिळाली.

पदार्पणापासून वीस वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भारताचा पहिला कसोटी क्रिकेट विजय

स्वातंत्र्योत्तर काळात १९५२ साली इंग्लंडचा संघ भारत दौर्‍यावर आला असताना भारताने ५ सामन्यांच्या क्रिकेट कसोटी मालिकेतील चेन्नई (तेव्हाचे मद्रास) येथील पाचवा सामना जिंकून इतिहास घडवला. १० फेब्रुवारी, १९५२ रोजी भारताने विजयावर शिक्कामोर्तब केलं आणि भारताच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील हा पहिला विजय ठरला.

या मालिकेतील दिल्ली, मुंबई व कलकत्ता येथील तीन कसोटी सामने अनिर्णित राहिल्यानंतर चौथी कसोटी इंग्लंडने जिंकली होती. मात्र फेब्रुवारी १९५२मध्ये झालेल्या मद्रासमधील कसोटीत विजय हजारे यांच्या नेतृत्वाखाली खेळणार्‍या भारतीय संघाने इंग्लंडवर दणदणीत विजय मिळवला. १९३२मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून २० वर्षांनी भारताने आपला पहिला विजय साध्य केला आणि इतिहास घडवला.

मद्रासच्या कसोटीत नाणेफेक जिंकून इंग्लंडने फलंदाजी घेतली, मात्र विनू मांकड यांच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर भारताने इंग्लंडचा डाव २६६ धावात संपवला. विनू मांकड यांनी फक्त ५५ धावा देऊन इंग्लंडच्या ८ फलंदाजांना तंबूत पाठवलं. त्यानंतर निर्धाराने खेळत भारताने ४५७ धावांचा डोंगर रचला. पंकज रॉय आणि पॉली उम्रीगर यांच्या शानदार शतकांमुळे भारताला एवढी धावसंख्या उभारता आली. दुसर्‍या डावातही भारताने इंग्लंडला १८३ धावातच गुंडाळलं. या डावात विनू मांकड आणि गुलाम अहमद यांनी प्रत्येकी ४ बळी घेतले. तडाखेबंद फलंदाजी आणि भेदक गोलंदाजीच्या बळावर १० फेब्रुवारी, १९५२ रोजी विजय हजारे यांच्या नेतृत्वाखाली भारताने कसोटी क्रिकेटमधील पहिला विजय नोंदवला. या विजयात यष्टीरक्षक प्रोबीर सेन यांनी ५ फलंदाजांना यष्टीचित करून विजयात आपला वाटा उचलला.

'पाच वर्षांपूर्वीपर्यंत ज्या इंग्रजांनी आपल्यावर राज्य केलं, त्यांच्यावर मिळवलेला विजय अनन्यसाधारण महत्त्वाचा ठरतो,' अशी भारताचे आघाडीचे फलंदाज पंकज रॉय यांनी या सामन्यानंतर व्यक्त केलेली प्रतिक्रिया बोलकी ठरली.

पतौडीच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाचा विदेशातील पहिला विजय

१९३२मध्ये जागतिक कसोटी क्रिकेट विश्वात पदार्पण करणार्‍या भारताला विदेश दौर्‍यावर आपला पहिला विजय नोंदवण्यासाठी तीन दशकांहून अधिक काळ वाट पाहावी लागली. १९६७-६८मध्ये ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडच्या दौर्‍यावर गेलेल्या मन्सूर अली खान पतौडीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने १५ फेब्रुवारी ते १९ फेब्रुवारी, १९६८दरम्यान न्यूझीलंडमधील डबलिन येथे खेळल्या गेलेल्या पहिल्याच कसोटी क्रिकेट सामन्यात न्यूझीलंड संघाचा पाच गडी राखून पराभव केला आणि पदार्पणानंतर सुमारे ३६ वर्षांनी या संघाने भारताचा विदेशातील पहिला कसोटी विजय नोंदवला. इतकेच नाही, तर १५ फेब्रुवारी ते १८ मार्च, १९६८दरम्यान झालेली ही चार कसोटी सामन्यांची मालिका भारताने ३-१ अशी जिंकून भारताच्या कसोटी इतिहासातील पहिला मालिका विजयसुद्धा नोंदवला.

पहिला सामना प्रसन्ना व वाडेकर यांनी गाजवला

डबलिन इथे खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार ग्रॅहम डाउलिंग यांच्या शतकी खेळीच्या (१४३) भरोशावर न्यूझीलंडने पहिल्या डावात ३५९ धावा केल्या होत्या. त्यानंतर अजित वाडेकर (८०) आणि यष्टिरक्षक फारुख इंजिनियर (६३) यांनी भारताच्या पहिल्या डावाला आकार देऊन तीनशेचा पल्ला गाठला, तर गोलंदाज रमाकांत देसाई (३२) व बिशन सिंग बेदी (२२) यांनी ५७ धावांची चिवट भागीदारी करून भारताला ३५९ची मजल गाठून दिली व त्यामुळे पहिल्या डावात भारताला ९ धावांची आघाडी मिळाली. न्यूझीलंडच्या दुसर्‍या डावात ब्रुस भरे (५४) व एम. जी. बर्जेस (३९) सोडून इतर कुणाचाही भारतीय फिरकी गोलंदाजांपुढे निभाव लागू शकला नाही आणि न्यूझीलंडचा संघ अवघ्या २०८ धावांत गुंडाळला गेला. भारताच्या इरापल्ली प्रसन्ना या ऑफ-स्पिनरने ४० षटकात केवळ ९४ धावा देऊन ६ बळी घेतले व न्यूझीलंडची वाताहत केली. तर बिशनसिंग बेदी (२२-११-४४-१) आणि बापू नाडकर्णी (१२-७-१३-१) यांनी आपल्या डावखोर्‍या अचूक गोलंदाजीने न्यूझीलंडच्या फलंदाजांची पुरती कोंडी केली. त्यानंतर वाडेकर (७१) रुसी सुती (४४), चंदू बोर्डे (१५) यांनी संयमित फलंदाजी करून विजयासाठी आवश्यक १९९ धावांचे लक्ष्य गाठले व भारताने ५ गडी राखून हा ऐतिहासिक विजय साध्य केला.

लक्षणीय बदल व मालिका-विजय

यानंतर दुसरा सामना जिंकण्यात न्यूझीलंडला यश प्राप्त झालं, तरी तिसरा सामना भारताने ८ गडी राखून जिंकला आणि चौथा सामना २७२ धावांनी जिंकला व मालिकेतील आपले प्रभुत्व सिद्ध केले. यापूर्वी भारत विदेशात खेळताना बचावात्मक पवित्रा स्वीकारत असे व फार तर सामने अनिर्णित राखण्यात समाधान मानत असे. या दौर्‍यादरम्यानही रमाकांत देसाईचा अपवाद वगळता कुणी अनुभवी द्रुतगती गोलंदाज संघात नव्हता व बचावासाठी मदार पूर्णत: फिरकीवरच होती. परंतु, कर्णधार पतौडीने फिरकीपटूंचा आक्रमकतेने वापर करण्याची नीती अवलंबली व ती यशस्वी ठरली. या मालिकेत प्रसन्नाने आपल्या कौशल्यपूर्ण व धूर्त गोलंदाजीने ४ कसोट्यांत मिळून एकूण २४ बळी घेतले व कर्णधाराची खेळी सार्थ ठरवली, तर बिशनसिंग बेदी (१६ बळी) आणि बापू नाडकर्णी (१४ बळी) यांनी फलंदाजांवर सतत दबाव कायम ठेवून (षटकामागे सरासरी केवळ दोन धावा) डावपेच यशस्वी ठरवले. फलंदाजांमध्ये अजित वाडेकर (मालिकेत एकूण धावा ३२८), इंजिनियर (३२१), रुसी सुर्ती (३२१), चंदू बोर्डे (२४२), पतौडी (२२१), अबीद अली (१२४) यांचं योगदान महत्त्वपूर्ण ठरलं.

न्यूझीलंडमधील या विजयानंतर भारतीय संघ विजिगिषु प्रवृत्तीने खेळण्यास सुरुवात झाली व संघाच्या शैलीतही फरक पडू लागला. यानंतर तीनच वर्षांनी म्हणजे, १९७१-७२मध्ये अजित वाडेकरच्या नेतृत्त्वाखाली संघाने वेस्ट इंडिज व इंग्लंडमधील मालिकाही जिंकण्याचा पराक्रम साध्य केला. (अधिक तपशील 'वेस्ट-इंडिज दौर्‍यातील चैतन्यदायी विजय' १९७१ या लेखात)

***

असा घडला भारत

संपादन - मिलिंद चंपानेरकर, सुहास कुलकर्णी
रोहन प्रकाशन
पृष्ठसंख्या - ९२५
किंमत - रु. १३५० फक्त. (भारतात शिपिंग मोफत)

***

***
विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

interesting वाटतेय पुस्तक. घटनावळींच्या स्वरुपात आहे का ? अशी संदर्भासाठी वापरली जाणारी पुस्तके soft copy च्या स्वरुपामधे उपलब्ध झाल्यास बरे होईल.

धन्यवाद या माहितीबद्दल चिनूक्स. इंटरेस्टिंग दिसते हे पुस्तक. वरती लिहील्याप्रमाणे जर गेल्या २०-३० वर्षांतील माहितीसुद्धा भरपूर असेल तर आणखीनच आवडेल वाचायला.