बिना भाजणीची थालिपीठं/वडे

Submitted by सायो on 2 April, 2013 - 20:40
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

बाजरीचं पीठ १ वाटी, ज्वारीचं पीठ १ वाटी, कणीक अर्धी किंवा १ वाटी, धणे-जिरं-मेथीचे दाणे- ताजे भाजून, मिक्सरला वाटून, ओवा- एक छोटा चमचा, हिंग, हळद, लाल तिखट, मीठ- चवीप्रमाणे, वडे तळायला तेल.

हेच वरचे जिन्न्स वड्यांकरता चालतील. थालिपीठांकरता जाडसर चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी.

क्रमवार पाककृती: 

सगळे जिन्नस एकत्र करुन मिडीयम (फार घट्ट किंवा सैल नाही) पीठ भिजवावं.
एखाद्या प्लॅस्टिकच्या पिशवीवर वडे थापावेत. मध्ये एक भोक पाडावं व खरपूस तळून घ्यावेत.
थालिपीठांकरताही हेच. तव्यावर झाकण घालून दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्यावीत.

वाढणी/प्रमाण: 
ह्या प्रमाणात साधारण १३,१४ वडे आणि ७,८ थालिपीठं होतील.
अधिक टिपा: 

पाककृतीत नाविन्य असं काहीच नाही पण भारताबाहेर रहात असताना बर्‍याचदा भाजणी नसते किंवा संपलेली असते तेव्हा वरची पीठं आणि धणे, जिरं, जिरं,ताजं भाजून कुटूनही छान खमंगपणा येतो हे लक्षात आलं. भाजणीची उणीव जाणवेनाशी झाली.
तोंडीलावणं म्हणून मिरच्या भाजून तिखट किंवा उसळी मिरची दह्याबरोबर वगैरे छान लागेल.

माहितीचा स्रोत: 
सुचला की लिहीन इथे.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सायो, छान आहे कल्पना. ताज्या मसाल्याचा स्वाद छान लागेल. माझ्याकडे बाजरीचे पीठ नसते पण ज्वारीचे नुसते थालिपीठ आमच्याकडे नेहेमी करतात. खरंतर भाजणी आमच्याकडे नसायचीच. नेहेमीच ज्वारीचे थालिपीठ. आता एकदा असे करून बघेन Happy

एकदम आवडता प्रकार, बरोबर दही/ताक, लोणचं, चटणी Happy
ज्वारीच्या पिठाची थालिपीठं भारी लागतात. मेथीदाणे भाजून वाटून घालायची आयडीया छाने.
रच्याकने,मक्याच्या पिठाची थालिपीठं पण मस्त लागतात.

मीपु, तोंडीलावण्याचं विसरले होते ते वर अ‍ॅड केलं.
मक्याचं पीठ अजिबातच आणलं जात नाही त्यामुळे करुन पाहिलेली नाहीत कधी.

छान आहे रेसिपि. मी सर्व पिठे मावेत थोडी भाजून घेते आयत्या वेळेस त्याने खरंच भाजणी होते त्याची व चवही आणिक चांगली येते.

आयडीया चांगली आहे.
मक्याच्या पिठाला स्वतःची चव असते त्यामुळे त्याचे वडे नि थालिपीठ दोन्ही छान होतात.

यामधे काकडी, गाजर, कोथिंबीर, कुठलीही पालेभाजी घालता येते. पीठामधे चमचाचमचाभर बेसन, नाचणीचं पीठ, ओट्समील, रवा, मक्याचं पीठ इत्यादि घालून टाकते.

यामधे थोडीशी उपवासाची भाजणी घातली तर थालिपीठ छान थापता येतात.

थालीपीठं मी डायरेक्ट तव्यावर आणि कढईमधे थापते. लोखंडी तव्यावर आणि कढईमधे खूप छान खमंग होतात.

(ती फेमस तवा चर्चा करायची का आता?) Wink

मस्त होतात अशी मिक्स पिठांची थालीपीठं.
मक्याच्या पिठात थोडी कणीक घालावी कारण मक्याचं पीठ जरा जड असते पचायला.
बारिक चिरून कोथिंबीर आणि मिरची, लसूण. खरपूस भाजली की भन्नाट लागतात! Happy

चांगली आयडिया. सासूबाई नुसती ज्वारीच्या पिठाची (अर्थातच कांदा-कोथिंबीर, हिंग-हळद-तिखट-मीठ घालून) लावतात भाजणी संपली की.
पिठं भाजून घ्यायची नाहीत का - हेच विचारणार होते.

बाय द वे, चाँद पॅलेसजवळच्या सब्झी मंडीत आता केप्रची भाजणी (साधी, चकलीची आणि उपासाचीही) मिळते. Happy

नंदिनी, थालिपिठाच्या धाग्यावर थालिपिठं लावण्याबद्दल चर्चा? वेडी की काय! Proud

आम्ही भाजणी म्हणतो.
>>यामधे थोडीशी उपवासाची भाजणी घातली तर थालिपीठ छान थापता येतात.>>
नंदिनी, वरच्या प्रमाणात चांगली थापली जातात. काल वाटलं की लाटताही येतील.
आशूडी, आमटी किंवा मुगाची उसळ वगैरेही छान लागेल.

भाजाणी सिंधी वाटतं थोडं .. Wink

>> काल वाटलं की लाटताही येतील.

अरे बाप रे! अशी थालीपीठं लाटली तर छी थू होईल की .. Wink

सायो छान रेसीपी. मीही करते अशी थालीपीठं, मात्र कधी ताजा मसाला भाजून घातला नव्हता. पुढच्या वेळेला तसं करुन बघेन.
पीठं मात्र नेहमी भाजून घेते. १ वाटी कणीक न घालता - चणाडाळ पीठ + तांदूळ पीठ + कणीक असं घेते.
आशूडीनी लिहील्याप्रमाणे शिळी आमटी, उसळ, भाजी, कोशिंबीर, भात जे काय आसेल ते लोटते त्यात. त्याप्रमाणे वरील पीठात बदल करते. म्हणजे आमटी, उसळ असेल तर च. डा. पीठ कॅन्सल. भात असेल तर तांदूळ पीठ कॅन्सल, वगैरे. (पोळी कुस्करुन घातली तर कणीक कॅन्सल का हा प्रश्न विचारु नै. Wink पोळी कुस्करली की ती थालीपीठात न जाता तिची फो.पो. होते.)