मनमोकळं: प्रवेशिका क्र. ६: दिनेशदा

Submitted by संयोजक on 25 February, 2013 - 02:55

Mabhadi LogoPNG.pngमनमोकळं - विषय क्र. १: माझी आवडती व्यक्तीरेखा- "कल्याणी" आशालता, नाटक " गुंतता हृदय हे"

जयवंत दळवी यांच्या "महानंदा" कादंबरीचे शं.ना. नवरे यांनी केलेले हे नाट्य रुपांतर. नाटकाचे नाव होते, "गुंतता हृदय हे". यातली कल्याणीची भुमिका, पद्मा चव्हाण, आशू आणि आशालता या तीन अभिनेत्रींनी केली. ज्यावेळी आशालता यांनी ही भूमिका स्वीकारली, त्यावेळी लोकसत्ता मधे बातमी आली होती, " आता कल्याणी अस्सल रुपात दिसणार. " आणि झालेही तसेच.

खरं तर हे कथानक कादंबरीखेरीज अनेक माध्यमातून सादर झाले. आकाशवाणीवर नभोनाट्याच्या रुपात
(बाळ कुरतडकर, नीलम प्रभु, कमलिनी विजयकर), नाटक ( डॉ. काशिनाथ घाणेकर, आशा काळे, आशालता),
मराठी चित्रपट ( विक्रम गोखले, फ़ैयाझ, शशिकला), हिंदी चित्रपट (फ़ारुख शेख, मौशुमी चॅटर्जी, शशिकला).
माझे भाग्य थोर, की या सर्व सादरीकरणांचा आस्वाद मला घेता आला. पण तरीही माझ्या मनात, कल्याणी म्हणून आशालताच आहेत आणि राहतील.

कथानक घडते ते गोव्यात. आपल्या मामाकडे, शहरातला तरुण, बाबूल येतो. त्याचे गावातील मानू म्हणजेच
महानंदा, या तरुणीवर प्रेम जडते. तिला दिवसही जातात. त्यांची लग्न करायची तयारी असते, पण देवदासी
प्रथेमूळे असे लग्न, तिची आई म्हणजेच कल्याणीला मान्य नसते. काही कारस्थान करुन ती हे लग्न होऊ
देत नाही. ते दोघे दुरावतात. कथानुकानुसार कुणाचाही असा समज होईल की कल्याणी ही खलनायिका आहे. बाकीच्या अभिनेत्री ती तशीच सादर करत असत, पण आशालता यांनी तिचा सूर नेमका पकडला होता, आणि प्रयोग झाल्यावरही कल्याणीच जास्त लक्षात रहात असे.

नाटकात, या तीन कलाकारांसोबत राजा मयेकर (पोस्ट मास्तर ), शोभा प्रधान ( दमयंती ) आणि मालती
पेंढारकर ( मामी ) पण असत. सर्वच कलाकार आपापली भुमिका अगदी चोख करत असत. केवळ दोन
प्रवेशात असणार्‍या मामीच्या भूमिकेतील, मालती पेंढारकर तर अभिनयाचा अप्रतिम नमुना सादर करत
असत. तरी आशालता यांची भूमिका प्रभावी ठरत असे. त्यांचे दिसणे तर कादंबरीत वर्णन केल्याप्रमाणे होतेच पण अभिनयातून आणि संवादातून त्या कल्याणी जिवंत करत असत. नाटक तीन अंकी होते. पहिल्या अंकात वृद्ध बाबूल आणि दमयंती यांची भेट होते आणि ती, त्याला घरी घेऊन जाते. आणि कथानक भूतकाळात जाते. बाबूलचे गावात आगमन, मानूशी ओळख असा कथाभाग येतो. याच दरम्यान आपली इतर पात्रांशी ओळख होते. कल्याणीच्या ओसरीवर तिचे ऐसपैस बसलेले असणे, आणि गावातल्या लोकांचे तिच्याशी लाळघोटेपणा करणे आपल्याला दिसते. "जाल हो कंटाळून" म्हणून तिचे सर्वांशी अघळपघळ बोलणे आपल्याला दिसते.
खास करुन पोस्टमास्टर तिच्याकडे येत असतो. लढाईवर असलेल्या सैनिकांनी आपल्या बायकोला लिहिलेली पत्रे फ़ोडून तो कल्याणीला वाचून दाखवतो. त्यातली शृंगारीक वर्णने, ती पण मन लावून ऐकत असते. बाबूल खरे तर तिच्या बालमैत्रिणीचा म्हणजेच दुर्गीचा लेक. त्याच्या घरात येण्याला, मानूशी मैत्री करण्याला, तिचा अजिबात विरोध नसतो. त्याचेही ती असेच प्रेमाने स्वागत करते. या अंकात तिचे एक लोभस रुप दिसते.

दुसर्‍या अंकात रवळनाथाच्या पालखीचा प्रसंग आहे. प्रयोगात प्रत्यक्ष पालखी येत नसे पण त्यासाठी नटून
थटून कल्याणी आणि महानंदाचे तयार होणे मात्र आहे. या प्रसंगी अंगावर शेला घेतलेली, अगदी खास नखर्‍यात आंबाड्यावरचा गजरा नीट करणारी, मानूला लगबग करणारी कल्याणी, खरे तर तिच्यापेक्षा सुंदर
दिसत असे. तो दिवस खास तिच्या मानाचा. रवळनाथाची पूजा करण्याचा मान तिचा. आणि त्याचा आनंद तिच्या चेहर्‍यावर दिसतच असे.

त्या पालखीतून काही कारण सांगून मानू निघून येते आणि बाबूलसोबत राहते. यथावकाश तिला दिवस
जातात. तिच्यावर बारीक नजर असणाऱ्या कल्याणीच्या हे लक्षात येतेच. मानूच्या ओच्यातून, "रावसाकडची भजी" खेचून काढण्याच्या प्रसंगात ती खूपच कठोर होते. "चीप. चीप रव अगदी" म्हणत तिला दाबात ठेवते. मग मात्र ती थोडा पाताळयंत्रीपणा करते. देवदासीने लग्न करायचे नाही, यावर ती ठाम असते. त्यासाठी ती बाबूलला तिची भेट घेऊ देत नाही. पण याप्रसंगी ती त्याच्याशी कठोर वागत नाही तर आपल्याच लेकीबद्दल (तिच्या चारीत्र्याबद्दल) खोटे सांगते. तरी त्याला, "येत जा हो अधूनमधून. तू काय आमाला परको नाय, माज्या दुर्गीचा झील तो." असे म्हणते. दुर्गीसाठी निगुतीने भेट बांधून द्यायची तयारी करते. बाबूल तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवून, शहरात निघून जातो. आणि आपलाही तिच्या बोलण्यावर विश्वास बसतो.

तिसर्‍या अंकात आपण परत वर्तमानकाळात येतो. मानू आणि बाबूल दोघेही आता वयस्कर झाले आहेत. दमयंती त्या दोघांना समोरासमोर घेऊन आलेली आहे. आणि अर्थातच अनेक गैरसमजांचे निराकरण केले
जाते. "देवाच्या नावाने खोटं बोलली हो ती रांड" असे मानू कल्याणीबद्दल सांगते. बाबूल तिला भेटायची
इच्छा व्यक्त करतो. त्यावेळी "अंगावर कपडा पण ठेवत नाही कधी कधी. रोज जेवायला वाढताना मी थुंकते
तिच्या अंगावर" असे म्हणत ती त्याला कल्याणीच्या खोलीत घेऊन जाते. या केवळ दोन मिनिटाच्या
प्रवेशात, आशालता काळजाचा ठोका चुकवत असत. केसाच्या झिंज्या झालेली, कोड फुटलेली, अंगावरचे
कपडे फाडणारी, पाठीला पोक आलेली अशी कल्याणी बघताच आपल्या मनात तिच्याबद्दल कणवच दाटत असे. "भाविणीनं लगीन नाय करुचा, तसाच रवूचा" असा जप ती त्या अवस्थेतही करत असते. पुढे बाबूलला मानू पटवून देते कि दमयंती हि त्याचीच मुलगी आहे. तो त्या दोघींनाही घरी न्यायची तयारी दाखवतो. पण मानू तयार होत नाही. दमयंतीला मात्र पाठवते. "कुणी विचारलं तर आई लहानपणीच गेली, असे सांग" असे शिकवते. दमयंती पण "गुदस्तांच मॅट्रीक" झालेली म्हणजे शिक्षण घेणारी असते. मानू देवाच्या आणि आईच्या सेवेसाठी तिथेच राहते.

कथानकात शोकांतिका होते ती कल्याणीचीच. आणि ती तशी का वागली, याची अस्पष्ट कारणे कथानकात
आहेत. एकतर ती या प्रथेच्या जोखंडाखाली पुर्ण दबलेली असते आणि भाविणीने लग्न केल्यास, रवळनाथाचा
कोप होईल अशी भीती तिला असते. "पेजेला देणार तो शेजेला घेणार" या व्यवहाराची तिला कल्पना असते.
शिवाय महानंदा ही बाबूलच्या मामाचीच मुलगी असल्याचे संकेत आहेत. ( मामाचे झोपताना, "कल्याणमस्तु" असे म्हणणे. मामाकडून तिला नारळाची, भाताची गोण जाणे, मामाकडच्या भांड्यांवर तिचे नाव असणे, आणि मामीचा त्रागा) त्यामुळे तिला असे करण्यास, मामानेच भाग पाडले असावे, असेही वाटत राहते. शेवटी या प्रथेची शिकार, ती स्वत:च झालेली असते. आणि म्हणून थोडेफार सुख लाभलेल्या, महानंदापेक्षा, कल्याणीच सहानुभूतीला जास्त लायक ठरत असे.

या नाटकाचे नेपथ्य ( दोन फिरते आणि सरकता रंगमंच) आणि संगीतही प्रभावी होते. कपडेपट तर होताच.
दळवींचे हे कथानक फ़ार पुर्वीचे. पुढे त्यांच्या नाटकात दिसलेला ( पुरुष, पर्याय ) "बंडा" हा व्यवस्थेविरुद्ध
बंड करणारा नेता या नाटकात नव्हता. या नाटकात प्रथेविरुद्ध कुणीच आवाज उठवत नाही. महानंदा आणि
बाबूल, आपापल्यापुरती वाट शोधतात, पण समाजाच्या प्रथेची शिकार झालेली, भ्रमिष्ठावस्थेला पोहोचलेली
आणि त्याही अवस्थेत, प्रथेला कवटाळून राहणारी, कल्याणीच मला जास्त केविलवाणी वाटते. आणि आज
अनेक वर्षांनंतरही, मनात घर करुन आहे.

-दिनेशदा

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान दिनेशदा. हे नाटक आम्हाला कॉलेजमधे होते तेव्हपासून आवडीचे आहे.

तेव्हा मी डॉ. काशिनाथ घाणेकरांच्या प्रेमात होते. आशा काळे कधीच आवडली नाही. आणि आशालताचा कधी विचारच केला नाही.

आज तुम्ही दाखवलेली आशालता - कल्याणी आवडली.

दिनेशदा...

अप्रतिम लिहिले आहेत... मी हे नाटक पाहिले आहे. खुप लहान होते आणि त्या काळी मुलांना बरोबर आणु नये अशी तंबी नसायची. त्या मुळे जेंव्हा गडकरी रंगायतन नवे बांधले तेंव्हा ही सगळी चांगली चांगली नाटके दर शनिवारी लागायची. तिकडेच मी हे नाटक पाहिले आहे. नाटक काहीच आठवत नाही, पण मामीचा त्रागा, आणि शेवटची कल्याणी मात्र मनात ठसली आहे. कारण त्या वेळेस स्पॉट लाईट टाकत असत. त्या मुळे तो भकास पणा फारच अंगावर यायचा.

आशालता बाईंनी नेहेमीच अप्रतिम भुमिका केल्या आहेत. ह्या नाटकात टाळ्यांचा राजा काशीनाथ घाणेकर असुनही लक्षात मात्र कल्याणी आणि मामीच रहातात... नंतर महानंदा कादंबरी वाचली. बाबुलच्या मामांचं आणि कल्याणीचं अफेअर, त्यांचा संबंध, सगळं खुप अंगावर आलं.... महनंदावर झालेला सिनेमा मात्र नीराशा करुन गेला. विक्रम गोखलेला काही झेपला नाही बाबुल. आणि शशीकला फारच उपरी वाटली त्या सिनेमात. आशालता बाईंनी का नसेल केली कल्याणी सिनेमात ? फक्त गोव्याचा निसर्ग आणि गाणी मात्र अप्रतिम... फैय्याज ह्या गुणी नटीचं आपण अजिबात चीज करुन घेतलेलं नाही. फुकट घालवली तिला. ह्या सिनेमात तिने खुप सुरेख काम केलय, पण कॅमेरा मात्र तिच्या अंगाखांद्यावरच फिरतो. ती दिसते पण विक्रम गोखले पेक्षा थोराड. त्या मुळे मानु कडेवर घेइल बाबुलला असे सारखे वाटते....

असो.. खुप मस्त आठवण दिलीत

सुंदर लेख. नाटक काही पाहिलेले नाही, पण समजू शकतो की आशालताच्या नुसत्या असण्यानेच कल्याणी कधीच खलनायकी वाटणार नाही.

सुंदर लिहिलेत दिनेशदा.
जयवंत दळवींच्या लेखनातून साकारलेलं गोवा अन कोकणचं शापित सौंदर्य अस्सल अन जिवंत आहे.. कल्पितापेक्षा सत्य विलक्षण असा तो सगळाच विषय.तो अभिनयातून व्यक्त करायला त्याच मातीतून आलेल्या आशालताबाईंइतकं समर्थ कोण असणार ?
या सगळ्यावर लिहून तुम्ही मराठी सारस्वतातला एक अध्याय पुनः जागवला आहे.

मस्त लिहिलं आहेत, दिनेशदा.
नाटक पाहिलं नाही पण वाचताना डोळ्यासमोर उभे राहिले, तुम्ही लिहिलेले प्रसंग.

आभार दोस्तांनो, हे सर्व लिहितांना माझ्या हातात कादंबरी वगैरे काहीच नव्हते. निव्वळ स्मरणातून लिहिलेय.
पण आजही ते सर्व नाटक, अगदी नेपथ्याच्या बारकाव्यासकट लक्षात आहे.
चित्रपटांतील बाह्यचित्रण आणि गाणी सोडल्यास, नाटकच सर्व बाबतीत श्रेष्ठ होते. या नाटकाचे, विद्याधर गोखले यांनी खाजगी चित्रीकरण केले होते, असे आठवतेय. पण ते नंतर कधी प्रकाशित झाले नाही. दूरदर्शनवर त्याचा काही भाग दाखवला होता.

दिनेशदा सुरेख लिहिलंत. नाटक मी पाहिलं नाही. सिनेमा पाहिलाय. त्यात खरंच फैयाजला पाहताना जीव कळवळला होता. तिच्यापेक्षा कल्याणी शशिकला मात्र चांगली दिसली होती. नाटकात आशालताबाईंनी नक्कीच भूमिकेचं सोनं केलं असणार.

दिनेशदा, संयोजकांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन लेख लिहिल्याबद्दल आपल्याला आमच्यातर्फे एक छोटीशी भेट Happy

MMK-Dineshda.jpg

संयोजक, माझ्याकडून लिहून घेण्याचे काम तूम्हीच केले आहेत, त्यामूळे या भेटीवर तूमचाच हक्क आहे.

लेख आवडला ..

>> हिंदी चित्रपट (फ़ारुख शेख, मौशुमी चॅटर्जी, शशिकला).

ह्याचं नाव सांगणार का?

मराठी चित्रपट महानंदा हे नाव बरेचदा ऐकलंय आणि त्यात विक्रम गोखले होता हेही आठवतंय .. (त्यातली गाणी फेमस होती का?)

लेख छान आहे. मी सिनेमा नाही पाहिला, नाटक नाही पाहिलं आणि पुस्तक पण नाही वाचलं.
सशल, मागे उभा मंगेश, माझे राणी माझे मोगा ह्यातलीच गाणी ना?

दिनेशदा, नाटक बघितले नाहिये मी. पण तुमच्या लेखातून आशालता बाईंची छबी उभी केलीत तुम्ही डोळ्यांसमोर.
मस्तच झालाय लेख.

सशल, त्या हिंदी सिनेमाचे नाव पण महानंदा च होते. लताचे छान गाणे होते त्यात.
शूम्पी, हि गाणी त्यातलीच. मागे उभा मंगेश, दोन वेगवेगळ्या चालीत आहे. शिवाय बाई माजो लवताय डावा डोळा ( लता ) पण त्यातलेच.

सुनिधी, नाटक आता कुणी रिवाईव्ह केले तरंच.. बरीच नाटके अशी हरवून गेलीत.

"महानंदा" कादंबरीपेक्षाही 'गुंतता हृदय हे" फार भावले होते, दिनेश. तुम्ही लेखात म्हटल्याप्रमाणे मीदेखील तिन्ही रुपातील 'कल्याणी...मानू...बाबुल' पाहिले आहेत. डॉ.काशिनाथ घाणेकर यांच्या त्या काळातील करिष्म्याचे काय वर्णन करावे? ते नावच तिकिट बारीवर प्रेक्षकांची झुंबड उडविण्यास पुरेसे होते. मूळात 'महानंदा' ची कहाणी जरी शोकांतिकेकडे झुकणारी असली तरी त्यातील हळवेपणा अजिबात दृष्टिआड करून चालण्यासारखा नव्हता हे दळवी आणि नवरे दोघांनाही पटले असणार, म्हणून दमयंतीचा सुखद वावर सर्वानाच भावला {हिंदीतील बाबुल फारुख शेख आणि महानंदा मौशुमी चटर्जी विजोड दिसत असत, पण डॉक्टरांच्यासमोर आशा काळे फारच खुलून दिसल्या....}

आशालता वाबगांवकर गेल्या महिन्यात कोल्हापूरातील एका पुस्तक प्रकाशन समारंभाच्या प्रमुख पाहुण्या होत्या. तो कार्यक्रम संपला आणि त्यांचा पुढील कार्यक्रम सातारा इथे होता, तिकडे जाण्याची तयारी चालू असतानाच तेथील ठेकेदाराचा "किणी टोल नाक्यावर ट्र्क्स अडकून पडल्याने वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली असल्याने तुम्ही कोल्हापूर सोडू नका....सातार्‍याचा कार्यक्रम रद्द करीत आहोत....". साहजिकच आम्ही संयोजक मित्रांनी आशालतांची शाहू स्मारक भवन गेस्ट हाऊसमध्ये निवासाची सोय केली आणि तिथेच भोजन झाल्यावर गप्पाही तासभर रंगल्या. आशालता हे नाव आणि 'कल्याणी' हा विषय निघणे अपरिहार्यच होता. त्याही मनमोकळेपणाने बोलल्या. आज अगदी २०१३ मध्येही लोकांना आपले 'गुंतता....' मधील काम आवडते, भावते हे ऐकून त्या निश्चित्तच सुखावल्याचे दिसले.

जबरदस्त व्यक्तिरेखा होती 'कल्याणी' म्हणजे..... तुलनाच करायची झाल्यास मी तर नजरेसमोर पेशव्यांच्या 'आनंदीबाई' आणू शकतो. कुळरित, प्रथा महत्वाची मानणारी आणि मानूला बाबुलशी शय्यासोबत करू देणारी कल्याणी 'लग्न' म्हट्ल्यावर भडकते हे तिच्या सामाजिक जडणघडणीशी सुसंगतच असल्याने तिला 'कारस्थानी' म्हणणे मला जड जाते, दिनेश.

तुम्ही लिहिले आहे "कथानकात शोकांतिका होते ती कल्याणीचीच.....". मान्य, पण म्हणून बाबुल आणि महानंदाही त्यानंतर अगदी आरामात जीवन जगले आहेत हे चित्रही नजरेसमोर कदापिही येत नाही. जरूर, दमयंतीचे मुंबईत शिक्षणामुळे कल्याण करण्याचा बाबुल प्रयत्न करील....पण तो कदापिही मानूला विसरू शकत नाही....[रुढार्थाने त्याने लग्न केलेले नाही हे उघडच आहे...] तर दुसरीकडे महानंदाच्या आयुष्याचीही शोकांतिकाच झाली असणार हेही उघडच.... सबब सारासार विचार करता 'महानंदा' हे नाटक/चित्रपट म्हणजे तिन्ही मुख्य पात्रांची शोकांतिकाच म्हणावी लागेल.

अशोक पाटील

अशोक, मे पण त्यांना गेल्या भारतभेटीत दादरला बघितले. त्यांच्या चेहर्‍यात काहीच फरक पडलेला नाही.

इतर कलाकारांच्या तुलनेत त्यांनी वेगळी कल्याणी साकार केली हे खरेच, पण त्याकाळच्या प्रथेत एखाद्या स्त्रीला शिक्षण / पिता आणि घर आणि त्या अनुषंगाने प्रतिष्ठा मिळाली, तर ते अप्रुपाचे.
गोव्यात उघडपणे नसले तरी खाजगीत अशा प्रथा आजही पाळल्या जातात. देवळाच्या गाभार्‍यात कुणाला प्रवेश द्यायचा याचे निकष फारच कडक आहेत. ( त्याचा फटका काही गायिकांना पण बसला आहेच. ) एका देखण्या नाट्याभिनेत्रीने दूरदर्शनवर तर थेट सांगितले होते, "आमच्यात लग्न करत नाहीत. "

म्हणून मी तसे लिहिले.

खरं तर अशी प्रथा असणे, ही आपल्या समाजाचीच शोकांतिका आहे.

००

त्यांनी "छिन्न" या नाटकात फार वेगळी भुमिका केली होती. सोबत स्मिता पाटील ( हो स्मिता पाटील ) असे.
पण त्या नाटकाचे फार प्रयोग झाले नाहीत. माझे बघायचे राहिले.