मनमोकळं: प्रवेशिका क्र. ४ : शुगोल

Submitted by संयोजक on 24 February, 2013 - 00:26

Mabhadi LogoPNG.pngमनमोकळं - विषय क्र. १: माझी आवडती व्यक्तीरेखा-अंबावहिनी
दशक १९५०. कोकणपट्टीतील निसर्गाने आपलं वैभव अनंत हस्ते उधळलेलं एक गाव. घनदाट जंगल झाडीला नारळी पोफळीची डौलदार झालर. अशा या सुंदर गावी आली एक देखणी, गोरीपान आठ वर्षाची पोर. लग्न म्हणजे काय हे न कळायच्या वयातच लग्न होऊन तिने पडघवलीतील आपल्या घरी प्रवेश केला. तीच अंबा किंवा अंबावहिनी. तिचं माहेरघर पार दाभोळखाडीपासून दहा कोस आत. तिथे पाण्याचं सततचं दुर्भिक्ष. अशा रुक्ष गावातून अंबा आली ते हिरव्यागार पडघवलीमधे. अष्टौप्रहर वाहणारा थंड पाण्याचा पन्हाळ बघून ती हरखून गेली. घरी साधारण बरोबरीचे नणंद आणि दीर, गणुभावजी. हे तिचे खेळ सवंगडी. घरी सासुबाई आणि मामंजी. अगदी प्रेमळ. तसेच वयाच्या दहाव्या वर्षी विधवा होऊन माघारी आलेल्या आतेसासुबाई - आईविना वाढलेल्या अंबेवर अगदी मायेची पखरण करणार्‍या. अंबा गावात आली तेव्हा बरीच नांदती घरं होती गावात. त्यातली बारा तर अंबेच्या चुलत सासुरवाडीचीच होती. अंबेचं घर हे मुख्य घर. तिचे मामंजी खोत होते न गावचे! घरासमोर अंगण, मागं परसू, भोताली नारळी-पोफळीच्या बागा. पावसाळ्याचे चार महिने सोडले तर एरवी सात आठ महिने अंगणात मांडव. खाली सावली आणि वर वाळवणं. पोफळं, आमसुलं, साठं, कडवे वाल, गरे, आंबोशी, केळ्याचे काप, कडधान्य अन् काय काय. प्रत्येक घर खपत असे.

अशा या कामसू गावाला त्यांच्या नव्या खोतीणीचा फार आदर होता. अंबावहिनी होतीही तशीच! मनमिळावू, प्रेमळ, गावाविषयी आत्मीयता असणारी. आतेसासूबाईंकडुन शिकलेल्या, झाडपाल्याच्या औषधांनी, तिनी कितीतरी गाववाल्यांना बरं केलं होतं आणि अनेक बाळंतिणींना सोडवलं होतं. अंबेचा नवरा महादेव, तिची खूप काळजी घ्यायचा. बोलून दाखवलं नाही तरी त्याला अंबेचं कौतुक असावं. मात्र अंबेला जशी गावासाठी कळकळ होती तशी काही त्याला नव्हती. तो स्वार्थी नव्हता पण जरा आपल्यापुरतं पहाणारा होता. अंबेला याचं आश्चर्य वाटे आणि रागही येई.

अशा सगळ्या चांगल्याला दृष्ट लागायला काय वेळ? ती लागलीच, अंबेचा चुलतदीर, व्यंकुभावजीच्या रूपाने. अंबेला माणसांची उत्तम पारख होती. तिला पहिल्यापासूनच व्यंकुच्या कारनाम्यांची शंका यायची. तिचा संशय दरवेळी खरा ठरे. पण तिच्या नवर्‍याचं, भावावरील आंधळं प्रेम हेच अंबेचं मोठं दु:ख होतं. व्यंकु बाहेरख्याली होता. पैशाच्या जोरावर माणसं विकत घेऊन मनमानी करत होता. शारदेच्या( गावातलीच एक विधवा) मृत्युनंतर तिच्या प्रेताचा अंगठा इस्टेटीच्या कागदावर उठवून ती गिळंकृत करणं, तिच्या मुलाचा छळ करणं, बेकायदेशीर जंगलतोड करणं.. हे सगळं बघूनही आपला नवरा काही करत नाही म्हणून अंबू व्यथित होत असे. पण ही व्यथाच तिला दिवसेंदिवस खंबीर बनवत होती. नाकर्तेपण असह्य होत होतं. या सगळ्या कोंडमार्‍याचा स्फोट व्हायचा तो झालाच एके दिवशी. व्यंकुच्या चिथावणीनी नबीनी(नबी हा हैदरचिच्यांचा मुलगा. हैदरचिचा हे अंबूसारखेच, गावावर निस्सीम प्रेम असलेले मुसुनमान व्यक्तिमत्त्व. सिमेंटचा बांध घालून महादेवाच्या आणि गावातील इतरांच्या बागेचं पाणी अडवलं होतं. तो बांध फोडायला अंबा स्वतः हातात कुदळ घेवून निघाली. नवरा चरकला मात्र, पण स्वतः गेला नाही आणि तिला अडवलंही नाही. इतर काही गावकरी मदतीला आले आणि बांध फोडला गेला. अंबेनी सार्‍या गावासाठी पाणी वाहातं केलं. व्यंकुनी गावच्या लोकांचे आंबे मुंबईला नेऊन विकले. गावकर्‍यांना बोटी बुडाल्या असं सांगून त्यांचे पैसे बुडवले. हे प्रकरण मात्र महादेवाला खूप लागलं. स्वतःच्या खोत असण्याची जाणीव झाली. त्यानी जमीनीचा तुकडा विकून गाववाल्यांना नुकसान भरपाई दिली. कोण अभिमान वाटला अंबूला नवर्‍याच्या बाणेदारपणाबद्द्ल. मनातून ती फार फार सुखावली. महादेवानी मात्र ह्या प्रकरणाचा धसका घेतला आणि त्यातुन तो सावरलाच नाही.

या अशा संघर्षमय आयुष्यात अंबेचा एक भक्कम आधार होता तो म्हणजे गुजाभाऊजी. हा गुजा म्हणजे अंबेच्या नवर्‍याचा अगदी जवळचा मित्र. त्याचं आणि अंबेचं हे निखळ, निर्भेळ मैत्रीचं नातं महादेवालाच काय पण सगळ्या गावाला माहित होतं आणि मान्यही होतं. गुजाला तिच्या कर्तृत्वाची जाण होती आणि आदरही. महादेवानंतर अंबेनी गुजाभावजीच्या मदतीनी तिच्या मुलग्याचं शिक्षण केलं. आधी तालुक्याला आणि मग मुंबईला. गुजासारख्या ताकदवान गडयानी कोणा गुरूची दिक्षा घेतली. गुरूंना दिलेल्या वचनाचा भंग नको या सबबीखाली, तो गावातील चांगल्या कामासाठी देखील त्याच्या ताकदीचा वापर करत नसे यासाठी अंबा त्याची वेळोवेळी निर्भत्सना करत असे. गुजानी व्यंकुच्या तावडीतून रंग्याची, शारदेच्या मुलाची, सुटका केली, त्याच्यावर कसले कसले उपाय करुन त्याचं तथाकथित वेड बरं केलं आणि त्याला शहाणं आणि शिक्षित केलं म्हणून ती गुजाभावजीची फार फार कृतज्ञ होती. गुजाला, तिची पडघवलीची ओढ व कळकळ समजत असे आणि हाच त्यांच्या मैत्रीतला मोठा दुवा होता.

व्यंकुच्या कारवायांनी पडघवलीला उतरती कळा लागलीच होती. तरूणाई नोकरी धंद्याच्या नावाखाली गाव सोडून जात होती. त्यात भर म्हणून की काय महाभयंकर असं जौळ(वादळ) आलं. त्यानी तर पडघवलीची उरली सुरली रया पण घालवली. या जौळात अंबेच्या दारचा सर्वात जुना आंबा जमीनदोस्त झाला. आजोबांनी लावलेला आंबा गेला म्हणून गणुभावजी हळहळला. एरव्ही एवढ्या तेव्हढ्यासाठी जीव पाखडणार्‍या अंबावहिनीनी गणुची समजूत घातली, "काय राह्यलंय जुनं त आंब्यासाठी रडायचं? सगळं जातंय. जाऊ दे!" अंबेच्या तोंडचे हे पहिलेच निराश उद्गार! याच जौळात शेजार्‍यानी मदत न केल्यामुळे गावातल्या वृध्द यादोकाकी आणि त्यांची वासरी यांचा अंत झाला. अंबेला, गावानी तिच्यावर केलेला हा शेवटचा घावच वाटला आणि तिनी गाव सोडायचा ठरवलं.

पण पडघवली सोडून जाणार कुठे? तर मुंबईला. मुलग्याकडे. सामानाची बांधाबांध झाली. ते नावेत चढलं. अंबेची पराकोटीची घालमेल सुरू झाली. मामंजी? आतेसासुबाई? महादेव? यांची पडघवली? साक्षात पडघवली? वाडवडीलांनी वसवलेली पडघवली? माडापोफळांनी झाकलेली पडघवली? नाही! नाही!! अंबेला हे सहन झालं नाही. अंबूवहिनी पडघवलीला कधीही अंतर द्यायचं नाही हे ठरवून माघारी फिरली.

अशी ही गावाशी व गावकर्‍यांशी एकनिष्ठ असलेली अंबा. ज्या मातीत वाढली त्या मातीशी बेईमानी न करणारी अंबा. खेडयातील आपल्या जीर्णशीर्ण, कोसळू पहाणार्‍या घरकुलांकडे लक्ष पुरवा हा संदेशच जणु काही लेखक अंबेच्या व्यक्तिमत्वातून आपल्याला देत आहेत. १९५० च्या दशकातला हा संदेश आजच्या काळातही किती तंतोतंत लागू पडतो! खेडोपाड्यातील सर्जनशील मनुष्यशक्तिचे शहरात विलीनीकरण होते आहे. ग्रामसंस्था उध्वस्त होत आहेत. पूर्वपरंपरेने चालत आलेले व्यवसाय तिथेच सोडून माणसं नवनवीन व्यवसायांचे मनोरे रचू पहात आहेत. हे करताना जुनी समाजव्यवस्था मोडली तर नवी रूढ होणार का? झाली तर ती कशी असेल? तिथे समाजव्यवस्थेबरोबर माणुसकीचे संकेत पाळले जाणार आहेत का? या व अशा अनेक प्रश्नांचे समाधानकारक उत्तर मिळण्यासाठी हजारो अंबावहिनी मात्र तयार व्हायला हव्यात.

ऋण निर्देश--
बहुमूल्य सूचना व मुद्रितशोधन मदत - तोषवी
कादंबरी उपलब्ध केली - अश्विनी ओक(न-मायबोलीकर मैत्रीण)

- शुगोल

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

*

शारदेच्या( गावातलीच एक विधवा) मृत्युनंतर तिच्या प्रेताचा अंगठा इस्टेटीच्या कागदावर उठवून ती गिळंकृत करणं<<<<<
शारदा म्हणजे आंधळ्या भिऊआबाची बायको जिला व्यंकूभावजी नादी लावतो आणि जी अखेरीस गाव सोडून जाते. तुम्ही उल्लेख केला आहे ती म्हणजे रंगूभावजींची आई. नाव आठवत नाही.

छान लिहिलय.. खुप वर्षांपुर्वी हे कथानक दूरदर्शन मालिकेत आले होते. रोहीणी हट्टंगडी, स्मिता जयकर, सुमन धर्माधिकारी, माधव वझे, अनंत जोग.. असे दिग्गज कलाकार होते.

छानच लिहिलंय.
शालेय अभ्यासक्रमात (८वी/९वी) आम्हाला 'पडघवली' नावाचा धडा होता.
तो बहुतेक याच कादंबरीतील छोटासा भाग असावा.

श्रध्दा, यू आर म्हणींग राईट!
शारदेच्या( गावातलीच एक विधवा) मृत्युनंतर तिच्या प्रेताचा अंगठा इस्टेटीच्या कागदावर उठवून ती गिळंकृत करणं<<<<< >> इथे शारदेच्या ऐवजी 'कुशात्या' असं पाहिजे.
धन्यवाद.

छान लिहिलयस. अंबू वहिनी डोळ्यासमोर उभी राहातेय.
<< खुप वर्षांपुर्वी हे कथानक दूरदर्शन मालिकेत आले होते. रोहीणी हट्टंगडी, स्मिता जयकर, सुमन धर्माधिकारी, माधव वझे, अनंत जोग.. असे दिग्गज कलाकार होते.>> खूप छान मालिका होती ती. मला वाटत 'कुछ खोया कुछ पाया' असं नाव होत त्या मालिकेचं. आणि रोहिणी हट्टंगडी त्यात अंबा होती.

मस्त .. Happy

अज्ञानाबद्दल माफी .. पडघवली श्री ना पेंडसे ह्यांची आहे का? आताच बघितलं, गोनीदां ची आहे, मायबोलीवर उपलब्ध आहे .. Happy

( कुछ खोया कुछ पाया सारखी एखादी मरठी सिरीयलही होती का, मोठं कुटूंब, अनंत जोग व्हिलन की माझंच कन्फ्युजन होतंय?)

संयोजक, ह्या लेखा च्या वर विषय कुठला ते लिहीणार का? (बाकी तीन प्रवेशिकांवर लिहीलेलं आहे तसं?)

"माझी आवडती व्यक्तीरेखा" हाच विषय असावा असं वाटतंय लेखावरून ..

चांगल लिहिलय.
कोकणातलं घर उभे राहिले वरचा पॅरा वाचून.
पण एक कळलं नाही,
आधीच्या वाक्यात काळजी घ्यायचा महादेव लिहिलेय पण त्याला कळकळ न्हवती...
कळकळ असते तेव्हाच माणूस काळजी घेतो ना? असो.

शुभेच्छा!