'चॅम्पियन्स'च्या निमित्ताने ऐश्वर्या व अविनाश नारकरांशी गप्पा

Submitted by अवल on 29 August, 2012 - 01:37

समाजाला बोलकं करण्याचं महत्त्वाचं काम चित्रपटांनी केलं. त्यामुळे चित्रपट हे केवळ करमणुकीचं साधन न ठरता त्यांतून नेहमीच सामाजाचं प्रतिबिंब दिसत आलं आहे. ऐश्वर्या व अविनाश नारकर हे गेली वीस वर्षं चित्रपट, नाटक आणि दूरचित्रवाणी यांच्या माध्यमातून अभिनयक्षेत्रात वावरत आहेत. सशक्त अभिनेते म्हणून दोघांनीही नाव कमावलं आहे. मनोरंजनाबरोबरच समाजिक भान देणारे सकस चित्रपट निर्माण करावेत, या हेतूनं नारकर दांपत्यानं स्वतःची निर्मितीसंस्था स्थापन करून 'चॅम्पियन्स्' हा चित्रपट तयार केला.

तीन वर्षांच्या सखोल अभ्यासानंतर तयार केलेल्या या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या चित्रपटाला परीक्षकांच्या पसंतीचं खास पारितोषिक जाहीर झालं. शंतनु रांगणेकर आणि मच्छिंद्र गडकर या दोघा बालकलाकारांना या चित्रपतासाठी राष्ट्रीय व राज्य पुरस्कार मिळाले.

'चॅम्पियन्स्' हा मनोरंजनातून शिक्षणाविषयीचा सुंदर विचार मांडणारा चित्रपट आहे. ऐश्वर्या नारकर या चित्रपटाच्या निर्मात्री आहेत. या चित्रपटात त्यांनी एक महत्त्वाची भूमिकाही साकारली आहे.

येत्या ३१ ऑगस्टला प्रदर्शित होणार्‍या या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांच्याशी मारलेल्या गप्पा -

Aishwarya Narkar.JPG

तुमच्या पहिल्याच चित्रपटाला, 'चॅम्पियन्स्'ला, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरची इतकी पारितोषिकं मिळाली, त्याबद्दल तुमचं हार्दिक अभिनंदन. अभिनयाच्या क्षेत्रामध्ये इतक्या मोठ्या जबाबदार्‍या पार पाडत असताना निर्मितीक्षेत्रात उतरावं, असं का वाटलं?

इतकी वर्षे काम करणं चालूच होतं. पण मुळात एखादी गोष्ट आपण व्यवसाय म्हणून स्वीकारल्यानंतर त्यातल्या सगळ्याच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे करायला मिळतील, असं नाही. काही गोष्टी आपण पैशासाठी म्हणून करत असतो, तर काही गोष्टी खरंच मनाला समाधान देऊन जातात. या सगळ्या प्रवासात असं लक्षात येत गेलं की, आजूबाजूच्या परिस्थितीबद्दल आपल्याला काही तरी म्हणायचं आहे आणि ते म्हणणं खूप वेगळं आहे. जे सांगायचं होतं, त्यासाठी स्वत: चित्रपट तयार करणं, हा उत्तम मार्ग वाटला. चित्रपटनिर्मितीत उतरायचं हे खरं कारण. कारण व्यावसायिक चित्रपट असला तरी त्यातून काही सामाजिक संदेश जावा, असं मनापासून वाटत होतं. आपण ज्या समाजात वावरतो, त्यातल्या ज्या गोष्टी आपल्याला खटकतायेत, किंवा ज्या चांगल्या वाटतायेत, ज्या गोष्टींबद्दल आपल्याला व्यक्त व्हावसं वाटतंय, त्या गोष्टी व्यक्त करणं खूप गरजेचं आहे. पण पैशाचं सोंग आपण आणू शकत नाही आणि आम्हांला कुठूनही आर्थिक पाठबळ घेऊन किंवा कोणाच्या मदतीनं चित्रपट तयार करायचा नव्हता. त्यामुळे इतकी वर्षं थांबलो होतो. आयुष्याच्या एका टप्प्यात आमच्या शिलकीमधून या चित्रपटासाठी काही पुंजी जमा झाली. ही आयुष्यातली पुंजी कुठेतरी सत्कारणी लावून आपल्या आयुष्यातली ही जी काही स्वप्नं आहेत, ती आता पूर्ण करता येतील, असा विचार मनात आला.

दुसरं म्हणजे, इतर निर्मात्याकडे असे सामाजिक विषय घेऊन तुम्ही गेलात तर व्यावसायिक गणितं त्या निर्मात्याला पटावी लागतात. अन् सामाजिक विषयांवरच्या चित्रपटांमधून किती नफा मिळू शकेल, हे आपण कसं सांगणार? तेव्हा अशा गोष्टी आपल्याला कराव्याशा वाटल्या तर त्या आपल्या पैशातूनच कराव्यात. त्या स्वबळावरच करणं उत्तम आहे. त्यानं आपल्याला एक प्रकारचं समाधानही मिळतं. आम्हां दोघांनाही हे पटलं आणि ’ऐश्वर्या आर्टस् अँड व्हिजन’ची सुरुवात झाली.

हे आपण आपल्यासाठी निर्माण केलेलं व्यासपीठ आहे. आपल्याला जे वाटेल ते आपल्या कुवतीप्रमाणे करायचं, अशी आमची भावना आहे. 'ऐश्वर्या आर्टस् अँड व्हिजन'ची प्रत्येक कलाकृती ही समाजाशी बांधलेली असेल. समाजाचं आपण काही देणं लागतो, आणि या क्षेत्रातले कलाकार म्हणून सामाजिक बांधिलकी मान्य केली पाहिजे, अशी आमची भावना आहे. लोकांचं मनोरंजन करणं ही जशी आमची जबाबदारी तशीच हीदेखील एक नैतिक जबाबदारी आहे. हे आमचं स्वतःचं असं व्यासपीठ असेल की, जिथे आम्ही असे व्यक्त होऊ शकू. मग तो चित्रपट असेल, नाटक असेल, किंवा दूरचित्रवाणी मालिका असेले. आणि एक चांगला दर्जा टिकवून ठेवण्याचा प्रयत्न आम्ही करू.

तुमचा हा पहिलाच चित्रपट. 'चॅम्पियन्स्' हाच चित्रपट करावा असं तुम्हांला का वाटलं ?

या चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन रमेश मोरेचं आहे. तो आमचा खूप चांगला मित्र आहे. या आधी आम्ही चारपाच प्रकल्प एकत्र केले आहेत. उदाहरणार्थ, ’ओळख’ ही एड्सवरची फिल्म. त्याच्या सामाजिक जाणिवाही जागृत आहेत. आम्ही एकत्र असू तेव्हा 'चॅम्पियन्स्'च्या विषयाची खूप चर्चा करत असू, पण तोपर्यंत हा विषय घेऊन आपणच काही करावं, असा विचार नव्हता. कोणी चांगला निर्माता मिळाला तर हा चित्रपट आपण जरूर करायचा, असं डोक्यात होतं. पण आपणच हा चित्रपट निर्माण करू शकतो, आपल्याला आर्थिक मदतीची गरज नाही, असं जेव्हा लक्षात आलं, तेव्हा आम्ही इतर विषयांची शोधाशोध न करता हाच चित्रपट करायचं ठरवलं. आमच्या दृष्टीनं हा आदर्श प्रकल्प होता, आणि म्हणूनच 'चॅम्पियन्स्' हा 'ऐश्वर्या आर्टस् अँड व्हिजनचा' पहिला चित्रपट आहे.

जवळपास तीन वर्षं अभ्यास करून तुम्ही, अविनाश आणि रमेश यांनी हा चित्रपट तयार केला..

हो. कारण बालकामगार आणि त्यांचं शिक्षण हा खूप महत्त्वाचा विषय आहे. अगदी जागतिक पातळीवरही ही समस्या भेडसावत आहे. त्यामुळे हा विषय आपण मांडणं गरजेचं आहे, असं आमचं मत होतं. त्यामुळे या प्रकल्पात आम्ही अगदी पहिल्या दिवसापासून सामील होतो. जवळपास तीन वर्षं आम्ही तिघं या विषयावर काम करत होतो, अभ्यास करत होतो.

या चित्रपटाच्या निर्मात्री तर तुम्ही आहातच. पण त्याचबरोबर तुम्ही या चित्रपटात अभिनयही केला आहे. या दोन्ही आघाड्या तुम्ही कशा सांभाळल्या?

झालं काय की, पैशाचं कुठलंही सोंग आम्ही आणलं नव्हतं. त्यामुळे प्रत्येक दिवसाचं काहीएक बजेट आम्ही ठरवलं होतं. या दिवसासाठी अमूकएक बजेट आहे, अन् या दिवशी आपण हे हे काम करणार आहोत अन् त्या त्या दिवशी काम केलेल्या लोकांचे पैसे लगेच देऊन टाकायचे, असं आम्ही ठरवलं होतं. त्यामुळे डोक्यावर ओझं काहीच नव्हतं. माझ्या प्रॉडक्शन मॅनेजरवर हे सगळं मी सोपवलं होतं. हा आजचा खर्च, हे आजच्या दिवसाचे चेक्स्. आजचे पैसे आज दिले की आजचा दिवस संपला, उद्या काही जुनं देणं नाही. चित्रपटाची निर्मात्री म्हणून माझी जी आर्थिक जबाबदारी होती त्याबाबत माझं असं साधंस्वच्छ धोरण होतं. त्यामुळे शूटिंग चालू असताना ’निर्मात्री’ असण्याचं काही ओझं नव्हतं.

मुळात आमची टीम खूप चांगली होती. माझ्या निर्मिती व्यवस्थापनातल्या रमेश रोकडे, अनिल गांधी यांनी खूप छान काम केलं. पेपरवर्क तयार असल्यानं, अगदी छोट्याछोट्या गोष्टींचीही नीट तयारी असल्यानं कधी गडबड, गोंधळ झाला नाही. चित्रीकरण सुरू होण्याआधी प्रत्येक दिवसाच्या कामांची यादी आधी तयार होती. त्यामुळे चित्रीकरण सुरू झाल्यावर निर्मात्री म्हणून माझी जबाबदारी खूप कमी झाली होती. चित्रपटात माझी भूमिका खूप महत्त्वाची असली तरी माझ्या वाट्याला फार प्रसंग आलेले नाहीत. चित्रपटात सगळ्यांत जास्त वावर दोन लहान मुलांचा आहे. त्यामुळे दिवसाला फारतर एकदोन प्रसंग माझ्यावर चित्रीत व्हायचे, अन् ते मला अगदी छान लक्ष देऊन करता आले, कारण निर्मात्री म्हणून कोणतंही दडपण तेव्हा माझ्यावर नव्हतं.

शंतनु रांगणेकर आणि मच्छिंद्र गडकर या दोन छोट्या कलाकारांबद्दल काही सांगाल? त्या दोघांच्या नुसत्या फोटोंतूनही त्यांचे डोळे खूप काही बोलताहेत. त्यांच्याकडून काम करून घेतानाचा अनुभव कसा वाटला?

champions-1_3.jpg

ही दोन्ही मुलं अगदी या व्यक्तिरेखांसाठीच असल्यासारखी आहेत. शंतनुची निवड तशी खूप आधी, म्हणजे चित्रीकरणाच्या महिनाभर आधी झाली होती. बर्‍याच मुलांमधून आम्ही शंतनुला निवडलं होतं. शिवाजी पार्क सोसायटीमधला, त्या संस्कृतीतला तो आहे. उच्चभ्रू समाजात वावरणारा, अगदी ब्राह्मणी वातावरणात वाढलेला हा मुलगा आहे आणि या चित्रपटाची कथा ही धारावीमध्ये घडणारी, तिथल्या समाजाची आहे. त्यामुळे त्याचा अभिनय हा ’अभिनय’ वाटता कामा नये, असं काम त्याच्याकडून करवून घेणं महत्त्वाचं होतं.

दुसरा मच्छिंद्र. त्याची निवड खूप आयत्या वेळेस झाली. तो धारावीतला आहे. त्याला बघितल्यावर आम्हांला वाटलं, की हाच तो. दुसरा कोणी असूच शकत नाही त्या व्यक्तिरेखेसाठी.
त्या दोघांनी इतकं एकमेकांशी मिसळून काम केलंय. खरं तर हे दोघं अगदी वेगळ्या वातावरणात वाढलेले आहेत. पण ही दोघं सख्खी भावंडं नाहीत, असं हा चित्रपट पाहताना तुम्हांला अजिबात जाणवणार नाही. मुलांनी इतकं सुरेख काम केलं आहे, की चित्रपट पाहून बाहेर पडल्यानंतरही तुम्हांला ती दोघं आठवत राहतील. फार ताकदीनं कामं केली आहेत या मुलांनी.

दिग्दर्शक श्री. रमेश मोरे यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता?

रमेश हा मुळात अशाच वातावरणातून पुढे आलेला आहे. नोकरी करून साहित्यात एम. ए केलं त्यानं. परिस्थितीशी कष्टानं झगडून तो वर आला आहे. काही स्वयंसेवी संस्थांचा तो सक्रिय कार्यकर्ता होता. त्यामुळे या चित्रपटात बालकामगार, शिक्षण याचबरोबर स्वयंसेवी संस्थांच्या काय मर्यादा आहेत, तिथे काय अडचणी येतात, यावरही काही भाष्य तुम्हांला दिसेल. अर्थात या समस्यांचं सूतोवाच केलं आहे फक्त, फार खोलात जाऊन ऊहापोह करणं हा आमचा हेतू नव्हता. रमेश त्या वातावरणात वावरल्यामुळे त्याच्याकडून छान पद्धतीनं तिथलं जीवन लिखाणात उतरलं आहे आणि ते प्रसंग पाल्हाळीक नसल्यानं, प्रत्यक्ष विषयाला जाऊन धडकणारे असल्यामुळे जास्त भावतात. चित्रपटात अनेक मुद्द्यांना स्पर्श केला आहे, पण ते एकमेकांत गुंतून गोंधळ उडाला आहे, किंवा प्रेक्षकांना उपदेशाचे डोस पाजले, असं कुठेही वाटत नाही. आणि याचं श्रेय जातं रमेशला.

रमेशनं शंतनु आणि मच्छिंद्र या दोघांना त्यांच्या व्यक्तिरेखा व्यवस्थित समजावून सांगितल्या. दोघांना त्यानं चारपाच दिवस स्वतःबरोबर स्वतःच्या घरी ठेवून घेतलं, आणि त्यांना अनेक गोष्टी समजावून सांगितल्या. मुलांना बरोबर घेऊन तो धारावीला गेला. तिथल्या वस्त्यांमध्ये ते फिरले. जिथे बालकामगारांचा वावर आहे, त्या ठिकाणी त्यानं मुलांना नेलं. ती मुलं कशी वावरतात, त्यांची देहबोली कशी आहे, हे सगळं रमेशनं मुलांना प्रत्यक्ष दाखवलं, समजावलं. चित्रीकरणाच्या वेळेस नुसतं ’असं करा’ हे सांगण्यापेक्षा मुलांना त्यानं आधी हे सगळं दाखवलं. त्यामुळे चित्रीकरणाच्या वेळेस आपोआपच ते आतून आलं. मच्छिंद्र तिथेच वाढला असल्यानं त्याला वेगळं काही सांगावं लागलं नाही. परंतु प्रश्न शंतनुचा होता, कारण शंतनु अगदी वेगळ्या वातावरणात वाढला आहे. पण रमेशनं त्याच्याकडून हे सगळं फार छान पद्धतीनं करून घेतलं.

दुसरं असं की, नव्वदपैकी जवळपास पंचऐंशी प्रसंग हे वन शॉट सीन्स् आहेत, आणि कॅमेर्‍यांची जागा, त्यांची मांडणी फार छान जमली आहे. मुळात आमच्या छायादिग्दर्शक योगेश जानी यानं चित्रपटाचा एक सुरेख पोत राखला आहे, आणि त्यामुळे एक वेगळंच रूप मिळालंय संपूर्ण चित्रपटाला. तो ताजा वाटतो. अंधार-उजेडाचा एक खूप छान तोल त्यात सांभाळलाय आणि आम्हांला जे म्हणायचंय तेही त्यातून उत्तमरीत्या व्यक्त झालं आहे.

'चॅम्पियन्स्' या चित्रपटाचं वैशिष्ट्य, वेगळेपण तुम्ही काय सांगाल?

champions4.JPG

या चित्रपटामध्ये आम्ही फक्त समस्या मांडली नाहीये. समस्या आहेत, समस्या असू शकतात आयुष्यात, हे सांगितलं आहे, पण त्यांची उत्तरंही असतात, हेही सांगितलंय. आपल्या आजूबाजूला अनेक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वं असतात. त्यांच्याकडे पाहून, त्यांच्याकडून काही शिकून आपण पुढे जाऊ शकतो. समस्या आहेत म्हणून कुढत बसायचं, हातपाय गाळायचे, हे काही योग्य नाही. आपल्या भवताली अनेक सकारात्मक गोष्टी घडत असतात आणि त्यांच्यापासून ऊर्जा घेऊन आपण पुढं जाऊ शकतो. अशी सकारात्मकता तुम्हांला या चित्रपटात दिसेल. जेव्हा चित्रपटातल्या या दोन मुलांवर खरोखर संकट येतं, तेव्हा अगदी दुसर्‍या दिवशी ती कामाला लागतात. आम्हांला शिकायचंय, शाळेत जायचंय. असं म्हणून ती कामाला जायला लागतात. ती कुठेही रडत बसत नाहीत. ती स्वतःची स्वतः उभी राहतात. मला वाटतं हे खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा मी समाजातील समस्या घेऊन चित्रपट काढते, तेव्हा मला त्यांची उत्तरंही देता आली पाहिजेत. तरच कुठेतरी ती कथा पूर्ण होते.

शिवाय या चित्रपटात कोणतीही व्यक्तिरेखा अगदी पूर्ण नकरात्मक रंगवलेली नाहीये. प्रत्येकजण खरा आहे. प्रत्येकाच्या स्वतःच्या काही समस्या आहेत आणि प्रत्येकजण आपापल्या परीनं त्यावर मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतो. दुसर्‍याला आपल्या मर्यादेत मदत करण्याचाही प्रयत्न करतो. म्हणजे कुठल्याही समस्येच्या निवारणासाठी प्रत्येकजण आपापल्या परीनं काहीतरी करू शकतो. चित्रपटाच्या विषयासंदर्भात बोलायचं झालं तर, जरी आपण बालमजूरी करणार्‍या मुलांना त्यातून बाहेर काढू शकणार नसलो, त्यांना दत्तक घेऊ शकणार नसलो, तरी आपल्या घरातल्या मोलकरणीच्या मुलीच्या शिक्षणासाठीतरी आपण काही करू शकतो, ही जाणीव तरी नक्की होईल. हे आपल्या खिशाला परवाडणारं आहे. आपलं कुटुंब, आपली जबाबदारी सांभाळून आपण ते करू शकतो. निदान इतकंतरी आपण करायलाच हवं. आपल्यालाही समाधान मिळेल अन् समोरच्याचं आयुष्यही त्यातून घडू शकेल, हा एक साधासरळ दृष्टिकोनही या चित्रपटातून मिळू शकतो.

'चॅम्पियन्स्' करताना खूप आनंद देऊन गेलेला किंवा हेलावून टाकणारा असा एखादा प्रसंग, अशी घटना तुम्ही अनुभवलीत?

आनंद तर प्रत्येक क्षणाला होत होता. आपल्याकडून काहीतरी छान क्रिएटिव्ह होतंय, हे ’आपलं’ आहे, याचा आनंद सततच होता. अन् हेलावून टाकणारा एक प्रसंग मी सांगू शकेन. चित्रपटात माझ्या व्यक्तिरेखेचं नाव अनुराधा आहे. ती इथल्या स्थानिक मुलांच्या शिक्षणासाठी झटतेय, इथल्या समाजासाठी काहीतरी करता यावं, म्हणून ती झगडते आहे. पण तिचा स्वतःचा मुलगा बाहेर परदेशी जाऊन शिकतोय. त्याला या गोष्टींमध्ये काहीच इंटरेस्ट नाहीये. ’माझा आयफोन’, ’माझं सोशल नेटवर्क’ यातच तो अडकलाय. या सगळयाचं जरा वाईट वाटतं तिला. एक छोटासा प्रसंग आहे. ती त्याला इमेल करते की, मी त्या दोघा मुलांच्या आईला भेटून आले आणि आता मी ठरवलं आहे की, त्या दोघांना मी शाळेत पाठवणार. खूप कळकळीनं आपल्या मुलाला ती हे सांगते आणि ते त्याला सांगितल्यावर तो म्हणतो, "इट्स् ओके! तू कर तुला पाहिजे ते. हा माझा आयफोन बघ. अन् पैसे ट्रान्सफर करायला शीक हं आई आता". यातून ती खूप दुखावली जाते. हा सीन करताना मला खूप जाणवलं, की आत्ताच्या पिढीला तुम्ही तुमच्या देशाला, माणसांना जोडलेले राहा, ही जाणीव करून देणं खरंच खूप गरजेचं आहे. मग मला जाणवलं की, अमेय (माझा मुलगा) मोठा होईल, मोठा झाल्यावर तो बाहेर शिकायला गेला की मग तो जो एकटेपणा असेल, जी एक हुरहूर असेल, ती अशीच असेल. ही हुरहूर मी तेव्हा अनुभवली, आणि हेलावून जायला झालं....

champions3.JPG

तुमचे भावी प्रकल्प कोणते?

हा अध्याय संपेपर्यंत आम्ही थांबलो होतो. ३१ ऑगस्टला 'चॅम्पियन्स्' एकदा प्रदर्शित झाला की आमची ही जबाबदारी संपेल. मग पुढचं पाऊल नक्की. मी आणि अविनाश एक नाटक करणार आहोत. त्याची तयारी अगदी शेवटच्या टप्प्यात आहे. शिवाय इतर काही विषय आहेत डोळ्यासमोर. कामही सुरू केलंय त्यांवर. येत्या डिसेंबरपर्यंत त्याबद्दल नक्की सांगू शकेन.

***

अविनाश नारकर हे 'चॅम्पियन्स्' या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत. त्यांच्याशी साधलेला संवाद -

पहिला चित्रपट करताना तुम्ही निवडलेला विषय हा काहीसा वेगळा आहे. सामाजिक समस्येवर भाष्य करणारा आहे. असे चित्रपट गंभीर असतात, आणि त्यांतून मनोरंजन होत नाही, असा एक समज आहे.

कलेची सुरुवात झाली, त्यामागे मानसिक स्वास्थ्य देणं, हे जसं एक कारण होतं, तसं समाजप्रबोधन करणं, हेही एक फार महत्त्वाचं कारण होतं. लोककलांचा आपण अभ्यास केला, तर हे सहज लक्षात येतं. आपल्याकडे कीर्तन, भारुड यांचाही उद्देश हाच होता. सध्या आपल्या अवतीभवती इतकी अस्थिर परिस्थिती आहे, की खरोखर गांगरून जायला होतं. अशावेळी आपल्या कलाकृतीद्वारे आपण काही सकारामक विचार लोकांपर्यंत पोहोचवावेत, अशी इच्छा होती. मराठी भाषेत आशयघन चित्रपटांची एक फार छान परंपरा आहे, कारण मुळात मराठी माणसाला समाजाबद्दल, सामाजिक प्रश्नांबद्दल आत्मियता असते. आजूबाजूला काय चाललं आहे, याबद्दल आपण सजग असतो. या समस्यांबद्दल मराठी माणूस बोलतो, लिहितो, चर्चा करतो. मीही हल्लीच्या सामाजिक समस्यांबद्दल विचार करतो, आणि मग त्या समस्यांवर मला भाष्य करायचं असेल, तर त्यासाठी चित्रपट किंवा नाटक करणं हाच एक पर्याय माझ्यासमोर आहे, कारण मी एक अभिनेता आहे. सामाजिक किंवा समाजातील समस्यांवर भाष्य करणारा चित्रपट म्हणजे काहीतरी गंभीर, असं नव्हे. समाजातल्या परिस्थितीवर अनेकप्रकारे भाष्य करता येऊ शकतं. अगदी ब्लॅक कॉमेडीचाही त्यासाठी आधार घेता येतो, आणि हे चित्रपटही प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करतात. दोन तास फक्त हसवणं म्हणजे मनोरंजन नव्हे. प्रेक्षकाला पडद्यावर जे काही सुरू आहे, त्याच्याशी समरस करणं म्हणजे मनोरंजन करणं, आणि असा चित्रपट तयार करावा, अशी आमची इच्छा होती.

इराणी चित्रपटांमध्ये तिथल्या समाजाचं एक फार छान प्रतिबिंब दिसतं. हे चित्रपट तांत्रिकदृष्ट्या उत्तम असतात, त्यांचा आशय वरच्या दर्जाचा असतो, आणि मुख्य म्हणजे त्यांना काहीतरी सांगायचं असतं, आणि ते प्रेक्षकांपर्यंत थेट पोहोचतं. असेच चित्रपट मराठीतही निर्माण व्हावेत, अशी आमची इच्छा आहे.

मराठीमध्ये हल्ली नवे प्रयोग होत आहेत, नवे दिग्दर्शक, निर्माते, कलाकार वेगवेगळ्या विषयांवर चित्रपट करत आहेत. अशावेळी मराठी चित्रपट चकचकीत असावेत, त्यांची भरपूर प्रसिद्धी व्हावी, अशी प्रेक्षकांची अपेक्षा असते.

मला असं वाटतं की, मराठी चित्रपटांमध्ये जी आशयघनता आहे, ती चकचकीत हिंदी चित्रपटांमध्ये क्वचितच आढळते. पण आपण चकचकीतपणाकडे हल्ली चटकन आकर्षित होतो. मॉलसंस्कृतीचा हा प्रभाव असावा. या वरच्या दिखाव्यात आपण आतून कोरडेच राहतो, हे लक्षात येत नाही. आजचा समाज विखुरलेला आहे, संवेदना नाहीशा होत चालल्या आहेत, संवाद हरवत चालला आहे. दिखाव्याचा हव्यास हेच या मागचं कारण आहे. चित्रपटांच्या बाबतीतही हा दिखावा दिसतोच. दोनतीनशे रुपयांची महागडी तिकिटं काढून आपण चित्रपट बघतो, आणि थेटरातून बाहेर पडतो, तेव्हा आपलं डोकं रिकामं असतं. जर थेटरातून बाहेर पडेपर्यंतसुद्धा ती कलाकृती आपल्याबरोबर राहत नसेल, तर तिला सशक्त कसं म्हणायचं? प्रेक्षकांनी याचा विचार करायला हवा.

दुसरं म्हणजे जर एक कोटी रुपये खर्चून मराठी चित्रपट तयार झाला असेल, आणि एक कोटी रुपये त्या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी खर्चावे लागत असतील, तर निदान दोन कोटी रुपये त्या निर्मात्याला परत मिळाले पाहिजेत. एवढं मिळतं का उत्पन्न? नाही. दोन कोटी रुपये जेव्हा निर्माता खर्च करतो, तेव्हा त्या चित्रपटाच्या निर्मितीत सहभागी असलेल्या सर्वांचे पैसे देऊन झालेले असतात. पण निर्मात्याला त्यानं गुंतवलेले पैसे परत मिळवता येत नाहीत, कारण तेवढा प्रेक्षकवर्ग मराठी चित्रपटांना नाही. मग पुढचा चित्रपट त्या निर्मात्यानं कसा काढायचा, आणि त्या चित्रपटाच्या प्रसिद्धीवर पैसे कसे खर्च करायचे? त्यामुळे उत्तम चित्रपट जर प्रेक्षकांना हवे असतील, तर त्यांनी चित्रपटगृहात जाऊन चित्रपट बघायला हवेत. करमुक्त असल्यामुळे पन्नाससाठ रुपयांमध्ये मराठी चित्रपट बघता येतो. मराठी प्रेक्षकांनी मराठी चित्रपटांना उचलून धरलं तरच निर्मात्याला पैसे मिळतील, आणि तो पुढेही उत्तम, दर्जेदार निर्मिती करू शकेल. नाहीतर एकच चित्रपट काढून तो कर्जबाजारी होईल, आणि दुसरा चित्रपट काढण्याची तो हिंमतच करणार नाही. नुसते पैसे खर्च करण्यासाठी कोणी चित्रपट तयार करत नसतो. त्यातून पैसेही मिळायलाच हवेत. जर प्रेक्षक थेटरात गेलेच नाहीत, तर पैसे कसे मिळवायचे? निर्मात्यांची, दिग्दर्शकांची ही बाजू प्रेक्षकांनी समजून घ्यायला हवी.

***

शब्दांकनसाहाय्य - सशल, पूर्वा

***
विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा छानच मुलाखत्.......उत्सुकता वाढलीये.........सिनेमा पाहीलाच हवाय्य्य्य्य ..... Happy

अविनाश नारकर यांच्याशी चिनुक्सने संवाद साधला Happy
सशल, पूर्वा धन्यवाद Happy
' मायबोली ' धन्यवाद ही संधी दिल्याबद्दल Happy

मायबोली प्रायोजक आणि अवल यांना धन्यवाद.
मला स्वतःलाहि चांगले विषय असलेले मराठि चित्रपट कुटुंबासहित जाऊन चित्रपटगॄहातच बघायला आवडतात. कारण मोठ्या पडद्यावरचा आनंद वेगळाच असतो शिवाय आपणच चित्रपटगॄहात गेलो नाहि तर निर्माते चांगले मराठि सिनेमे बनवणार नाहित हिहि एक भावना असतेच त्यामागे. Happy
हा सुध्दा नाक्किच जाऊन पाहणार.

मस्तच आहे मुलाखत..!!

एक प्रश्न : निर्मात्री असा शब्द बरोबर आहे का? तो निर्माती असा हवा ना?

उत्तम मुलाखत.
सिनेमाला शुभेच्छा !

'निर्मात्री' हा शब्द मीसुद्धा पहिल्यांदाच वाचला.

जरासे अवांतर- जर प्रेक्षक थेटरात गेलेच नाहीत, तर पैसे कसे मिळवायचे? निर्मात्यांची, दिग्दर्शकांची ही बाजू प्रेक्षकांनी समजून घ्यायला हवी.
या विधानात 'निर्मात्याला पैसे मिळावेत ही प्रेक्षकांची जबाबदारी' असल्यासारखे ध्वनित होते, जे जरासे खटकते. आपलं प्रॉडक्ट आपल्यालाच विकावं लागतं. ग्राहकाला गृहीत धरता येत नाही. असो.

कालच पाहिला चित्रपट. खरच फार सुंदर आहे. मुलांची कामे अप्रतिम. दिग्दर्शन अप्रतिम. अन निर्मात्यांची व्हिजन वाखाणण्याजोगी. माझ्या आठवणीत अलिकडच्या काळात इतका वास्तवाला धरून असलेला पहिला चित्रपट असेल हा. ग्लोरिफिकेशन ची भरपूर संधी असूनही शेवटापर्यंत अतिशय वास्तववादी चित्रपट ! डॉक्युमेंट्रीच्या तपशीलाची ताकद आणि चित्रपटातील अभिनय्-गोष्ट सांगण्याची ताकद यांचा फार चांगला समन्वय.
माझ्या कडून १० तले ९ गुण. ( एक गुण फारच छोट्या गोष्टीसाठी वगळावा लागलाय. )